आज सकाळपासून हवा कुंद होती , ढगाळ वातावरण असल्याने पाऊस कधीही पडेल असेच वाटत होते आणि झालेही तसेच.
थोड्याच वेळात पाऊस पडायला लागला.मात्र आमचा नाश्ता वगैरे होईपर्यंत ढग पांगले आणि स्वच्छ ऊन पडले.
गाडी तयार होतीच. हॉटेलचे बिल चुकते करून निघालो. साधारण २ तासांचा प्रवास होता. सुरुवातीला रस्त्याच्या कडेने असणारा समुद्राचा सहवास हळूहळू संपला आणि तद्दन शहरी रस्ते लागू लागले.इतक्या दिवसात ना जाणवलेले ट्रॅफिक आणि गर्दी जराजरा दिसू लागले. खरेतर आधीही काही ठिकाणी ट्रॅफिक लागले होते पण कदाचित आम्हीच ट्रिप मूडमध्ये असल्याने ते तेव्हा इतके जाणवले नव्हते. आता मात्र खिसा रिकामा होत आला होता आणि आठवडाभराच्या भ्रमंतीने जरा दमणूकही झाली होतीच. त्यामुळे मन लहान सहान गोष्टींनी त्रासत असावे.
यथावकाश आम्ही कोलंबो शहरात दाखल झालो. पुन्हा एकदा समुद्राच्या जवळून जाणारे पण ट्रॅफिकने सिग्नलने आखलेले शहरी रस्ते मागे पडत होते. मुंबईच्या महालक्ष्मी वरळी हाजी अली किंवा केम्प्स कॉर्नर वगैरे भागात फिरताना कसे वाटेल तसेच वाटत होते. एकिकडे उपुलची टकळी चालू होती.
हे इथले जुने संसद भवन , हा कमळाच्या आकाराचा टॉवर, हे पंतप्रधानांचे निवास स्थान असे करत करत आम्ही पुढे चाललो होतो.
वाटेत कोलंबो राष्ट्रीय संग्रहालय लागले पण तिकडे प्रवेश फी फक्त श्रीलंकन रुपयात घेत होते आणि आमच्याकडे ते नव्हते त्यामुळे तो बेत बारगळला. एका भारतीय हॉटेलात जेवलो आणि गाडी पुढे गंगाराम टेम्पलकडे वळली.
प्रवेश द्वारापासूनच चित्तवेधक कलाकृती इथे स्वागत करीत होत्या.
आतमध्ये एक विहार , स्तूप , जुन्या मोटारींचे संग्रहालय , बोधी वृक्ष ,असेम्ब्ली हॉल असे बरेच काही होते.
जागोजागी कोरीव काम केलेल्या मूर्ती किवा सुंदर रंगवलेली चित्रे लक्ष वेधून घेत होती.विशेष म्हणजे प्रवेशद्वारापाशीच आम्हाला एक पत्रक दिले होते ज्यात १/२/३ असे नंबर घालून माहिती दिली होती आणि प्रत्येक वास्तूलाही तेच नंबर दिले होते.
त्यामुळे १ नंबर ठिकाणी उभे राहून पत्रकात १ नंबरची माहिती वाचली कि समजत होते.
तासभर तिथे घालवून भरपूर फोटोग्राफी करून पुढे निघालो.
कोलंबोचा स्वातंत्र्य चौक हा आमचा पुढचा टप्पा होता.साधारण आपले इंडिया गेट आणि संसद भवन परिसरात जसे वाटते तसेच इथेही शाळा कॉलेजच्या ट्रिप, गर्दी वगैरे माहोल होता.
फक्त आपल्या सारखे भेळपुरी पाणीपुरीवाले आणि पडलेले कागद नव्हते.
थोडीफार फोटोग्राफी करून निघालो.आमचा शेवटचा कार्यक्रम मॉलला भेट देणे हा होता. पण ते मॉल बघून पुण्यातले फिनिक्स मार्केट सिटी ह्यापेक्षा दसपट मोठे आहे असे वाटू लागले.शिवाय तिकडे पार्किंग साठी मारामारी होती ती वेगळीच.
थोडा वेळ तिथे घालवून उगाचच विंडो शॉपिंग करून बाहेर येऊन बसलो. ट्रिप संपल्याची एक खिन्न भावना उगीचच मनात दाटून आली.खरेतर आठवडाभर चांगलेच फिरलो होतो.मजा केली होती.वेगवेगळे अनुभव घेतले होते. या नकाशाप्रमाणे हिंडलो होतो.
एकीकडे डोंगरांपासून ते घनदाट जंगल आणि प्राण्यांमध्ये प्रवास तर दुसरीकडे हिल स्टेशन पासून विषुव वृत्ताजवळच्या बेंटोटा पर्यंत वास्तव्य. कधी बुद्ध मंदिरातले धीर गंभीर वातावरण तर कधी समुद्रावर अर्ध्या कपड्यात वावरणारे फॉरेनर असे सगळे अनुभवले होते. सगळीकडे श्रीलंकन लोकांचे चांगले अनुभवच आले होते.सगळी हॉटेल्स स्वच्छ आणि सुंदर मिळाली होती. कुठे बोट ठेवायला जागा नव्हती . ड्रॉयव्हर मृदुभाषी होता. रस्त्यात कुठे वादावादी /कटकट झाली नाही.गाडी बंद पडणे ,पेट्रोल संपणे, हॉटेलवर लाईट जाणे ,गरम पाणी न येणे ,सामान विसरणे, कोणी तरी आजारी पडणे वगैरे प्रकार घडले नाहीत. त्या सर्व गोष्टी लक्षात घेता ट्रिप उत्तमच झाली होती.
आता दिवस मावळू लागला होता. उपुलला गाडी काढायला सांगितली. कोलंबोची संध्याकाळची गर्दी ,ठिकठिकाणी रस्त्याची पुलांची कामे चालू असल्याने बंद केलेले रस्ते, समोरून वळणारे मोठे मोठे कंटेनर , वैतागलेले ट्रॅफिक पोलीस हे सगळे बंद काचेआडून बघताना मुंबईतच असल्यासारखे वाटत होते. तासाभराच्या झटापटीनंतर उपुलने गाडी सरळ टोल रोडवर घेतली आणि चित्र एकदम बदलले. मुंबई पुणे हायवेसारखा चौपदरी रस्ता मिळाला आणि गाडी सुसाट वेगात निघाली.अंधार पडता पडता कोलंबो एयरपोर्टला उतरलो आणि उपुलचा निरोप घेऊन पुन्हा एका कंटाळवाण्या प्रवासासाठी मनाची तयारी केली. मात्र पुन्हा कधीतरी श्रीलंकेला भेट द्यायची आणि राहिलेली ठिकाणे बघायची हे मनाशी ठरवतच.(समाप्त)
वाचने
15073
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त लिहिलंय
सहल छान झाली
भाषेत काही साम्य जाणवले का?
In reply to सहल छान झाली by समर्पक
मार्च पासून मी श्रिलंकेत
साधी नॅनो गाडी तेवीस लाखाला
सर्व वाचकांचे धन्यवाद
सुंदर देशाची सुंदर सहल. आवड
आवडत्या शेजारी देशाची सफर छान
तुमच्या *
लेखमालिका आवडली.
प्रत्येक बर्यावाईट अनुभवाला ......
छान झाली लेखमालिका. आवडली.
मलाही आवडले लेख. सगळ्या
मेहेंदळे साहेब , मी
खिलजी साहेब तिकडे झोपडपट्टी
In reply to मेहेंदळे साहेब , मी by खिलजि
@खिलजि
In reply to मेहेंदळे साहेब , मी by खिलजि
उत्तम लेखमाला झाली ही.
छान झाली लेख मालीका
पुर्ण लेखमाला आवडली. फक्त
नकाशा
In reply to पुर्ण लेखमाला आवडली. फक्त by दुर्गविहारी