ओंकार पत्की - काही आठवणी....

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
29 Nov 2018 - 9:46 pm

ओंकारवर लेख लिहायला घेतला होता, पण काय लिहू आणि काय नाही असं झालं....
या केवळ त्याच्या आठवतात तशा आठवणी....

त्याची आणि माझी मैत्री गेल्या तीस - बत्तीस वर्षांची. मला आठवतं आम्ही सहावीत असताना तो आमच्या शाळेत आला आणि पहिल्या दिवसापासून असा काही रमला होता की जणू माँटेसरीपासूनच आमच्याबरोबर होता! तेव्हापासूनच तो असा बिनधास्त आणि काहीसा विक्षिप्त होता. पुढे सातवी - आठवी दोन वर्ष आम्ही एका बेंचवर शेजारी बसत असल्याने बडबड केल्यामुळे कित्येकदा एकत्रं शिक्षा भोगली असेल याचा हिशेबच नाही!

मला आठवतं सातवीत असताना त्याच्या हात फ्रॅक्चर झाला होता. दुसर्‍या दिवशी हाताला प्लॅस्टर घालून हे महाशय वर्गात आले आणि आल्याआल्या माझ्यासमोर पेन धरुन म्हणाले,

"घे, याच्यावर सही कर!"

"सही? प्लॅस्टरवर?" मला काहीच कळेना.

"कर रे! सगळ्यांच्या सह्या घेणार आहे आणि डॉक्टरला दाखवणार आहे!"

दहावीला ८७% मार्क असूनही (१९९१ मध्ये) आणि सर्वांनी सायन्सला जाण्याचा आग्रह करुनही तो हट्टाने आर्ट्सला पोतदार कॉलेजला गेला. कॉलेजमध्ये असताना तिथे नाटक आणि पुढे असिस्टंट डायरेक्टर आणि लेखक म्हणून मनोरंजन क्षेत्रात गेला. किती जणांना कल्पना आहे माहित नाही, पण 'चार दिवस सासूचे' या सिरीयलचा तो असिस्टंट डायरेक्टर होता आणि सुमारे दीडेकशे भाग त्याने लिहीलेले होते. या महारटाळ सिरीयलवरुन आम्ही सगळेच त्याची चेष्टेने सतत खेचायचो. त्याच्यासारखा मनस्वी आणि अत्यंत सृजनशिल माणूस पुढे या क्षेत्रातून बाहेर पडला आणि कॉर्पोरेट ट्रेनिंगसारख्या रुक्ष क्षेत्रात गेला हे काहिसं अनाकलनियच होतं. त्याबद्दल त्याला विचारलं तेव्हा तो इतकंच म्हणाला,

"कॅमेरा हे माझं काम नाही, माझं काम आहे लिहीण्याचं, मी त्यातच कम्फर्टेबल आहे. पण सिरीयल्समधला भंपकपणा आणि चॅनल्सच्या सूचना मला पटत नाहीत, आणि मला हवं तस मी लिहू शकत नसेन तर त्याचा काय उपयोग आहे? मी दुसर्‍यांच्या समाधानासाठी माझी क्रिएटीव्हीटी मारु शकत नाही!"

मला आठवतं आम्ही सलग चारचार - पाचपाच तास अशा अनेक विषयांवर फोनवर गप्पा मारत बसायचो. मी डलासमध्ये आणि तो मुंबईत असल्याने शेवटी दोघांपैकी कोणाला तरी झोप अनावर झाली की मग गप्पा आवरत्या घेतल्या जायच्या. सिनेमे, क्रिकेट, इतिहास, राजकारण त्याला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. त्याचं वाचन अफाट होतं आणि नुसतं वाचन अफाट नव्हतं तर त्यातला नेमका संदर्भ नेमक्या वेळेस आठवण्याची तीव्र स्मरणशक्ती होती. तो किती सिद्धहस्तं लेखक होता हे मी कोणाला सांगण्याची जरुरच नाही.

मला आठवतंय, २०१२ मध्ये माझे वडिल काहीही होत नसताना अचानक गेले. हा माणूस दादरहून मला भेटायला रात्री नऊ वाजता माझ्या घरी कल्याणला आला. तासभर गप्पा मारत बसला आणि मग बाहेर पडला तो बोरीवलीला जाण्यासाठी!

त्याला कॅन्सरचं निदान झाल्यावरही त्याची प्रतिक्रीया त्याच्या स्वभावाप्रमाणेच होती.
"कॅन्सरला मी झालोय!"

गेल्या नोव्हेंबरमध्ये मी मुंबईला आलो होतो तेव्हा आम्ही शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर तास - दीडतास गप्पा मारत बसलो होतो. त्याची केमोथेरपीची ट्रीटमेंट पूर्ण झाली होती आणि त्यानंतरच्या चेकअपमध्ये कॅन्सरच्या कोणत्याही सिमटर्म्स आढळलेल्या नव्हत्या, त्यामुळे तो खूप रिलॅक्स होता. तो तळेगावला शिफ्ट झाला होता, पण नेमका त्या दिवशी काहीतरी कामानिमित्ताने मुंबईत आला होता. बोलताबोलता म्हणाला,

"च्यायला एकदाची ही कॅन्सरची कटकट आटपली ते बरं झालं. माझं मोसाद तसंच अर्धवट पडलं आहे. गिरीशबरोबर एक नवीन सिरीजही सुरू करायची आहे. आता त्याच्या मागे लागतो...."

त्यानंतर बातमी आली ती त्याचा कॅन्सर पुन्हा उपटल्याची... त्यानंतर एकापाठोपाठ एक वाईटच बातम्या येत राहिल्या. गेल्या तीन - चार महिन्यांत तर तो पूर्णपणे अंथरूणाला खिळला होता. डॉक्टरांनी स्पष्टपणे सर्वांना कल्पना दिली - इट्स मॅटर ऑफ टाईम!

यावर्षीच्या खरंतर भारतात येण्याचा काहीही प्लॅन नव्हता, पण अचानकच काही कामानिमित्ताने जेमतेम दहा - बारा दिवसांसाठी घाईघाईत भारतात येणं झालं. सुरवातीचे तीन - चार दिवस जेट लॅग आणि इतर काही कामांमध्ये गेल्यावर शुक्रवारी २३ तारखेला मी आणि अंजली त्याला भेटायला तळेगावला गेलो. अवघ्या वर्षाभराने झालेली ही भेट पण त्याची अवस्था पाहून काय बोलावं सुचत नव्हतं. स्वत:चा पाय हलवण्याचीही त्याच्यात ताकद राहिली नव्हती. तो मात्रं एकदम उत्साहात होता. नेहमीप्रमाणे गप्पा सुरु होत्या. त्याचा हजरजबाबीपणा आणि बोलण्यातला मिस्कीलपणा कणभरही कमी झालेला नव्हता. बोलताबोलता एकदम म्हणाला,

"बरं झालं आलास ते! पुढल्या वेळेला येशील तेव्हा मी नसेन बहुतेक!"

चर्र होणं म्हणजे काय हे त्या क्षणी पुरेपूर कळून चुकलं...
दोघांनाही वेळेचं बंधन होतं त्यामुळे निघायचं जिवावर आलेलं असूनही बाहेर पडलो.

जेमतेम आठवड्याभरातच त्याने आपले शब्दं खरे केले...

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

मनिमौ's picture

29 Nov 2018 - 9:55 pm | मनिमौ

मृतात्म्यास शांती लाभावी हीच प्रार्थना.

अभ्या..'s picture

29 Nov 2018 - 9:56 pm | अभ्या..

च्यायला,
आधी व्यनित गप्पा आणि एकदोनदा फोनवर बोलणे झालेले. पण कल्पना केलेली अगदी तसाच होता हा माणूस हे आत्ता कळले.
चटका बसलाय बेक्कार.

पद्मावति's picture

29 Nov 2018 - 10:05 pm | पद्मावति

चटका लावून गेले बोका -ए -आझम :(

टर्मीनेटर's picture

29 Nov 2018 - 10:18 pm | टर्मीनेटर

एक चांगली व्यक्ती आणि उत्तम लेखक काळाच्या पडद्याआड गेला...

vcdatrange's picture

29 Nov 2018 - 10:23 pm | vcdatrange

पत्की साहेब म्हणजे माझे वडील. . . जाम लक्षात राहीलेला डायलॉग त्यांचा

गॅरी ट्रुमन's picture

29 Nov 2018 - 10:25 pm | गॅरी ट्रुमन

त्याचे 'Miles to go before I sleep' हे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस बघून विलक्षण कालवाकालव व्हायची.

माझ्यासारख्याला तो गेल्याचा इतका धक्का बसला असेल तर तुम्ही किंवा अजयाताई या शाळेपासूनचे मित्र असलेल्यांना केवढा धक्का बसला असेल याची कल्पनाच करवत नाही.

आपण तिघेही एकत्र निव्वळ फाजिल गप्पा मारतोय असा पहिला आणि शेवटचा कट्टा शुक्रवारी केला .आता परत होणे नाही. जाऊ नका रे असं आपल्याला सांगून थांबवणारा ओंकार चार दिवसांत पसार झाला ...

स्पार्टाकस's picture

29 Nov 2018 - 10:41 pm | स्पार्टाकस

त्या दिवशी खरंच पाय निघत नव्हता.
कदाचित पुन्हा तो भेटणार नाही याची कल्पना आल्यामुळे असेल...

मी पूर्णपणे हतबुद्ध झालोय.. काहीच कळेनासे झालेय. 15 दिवसांपूर्वी गद्रेकाका आणि आज बोकशेठ, मृत्यू अनाकलनीय असतो हेच खरे.
ईश्वर त्यांना सद्गती देवो...

राही's picture

29 Nov 2018 - 10:58 pm | राही

प्रत्यक्ष ओळख काहीच नव्हती. लेखनातूनच मनावर ठसलेलं व्यक्तिमत्त्व. लेखन आवडायचं. आजाराची कल्पनाच असणं शक्य नव्हतं. अशी बातमी अचानक कोसळल्यावर खूपच वाईट वाटलं. जिथे असतील तिथे त्यांच्या स्वभावानुसार सुखात असोत. त्यांना सद्गती प्राप्त होवो.

माधुरी विनायक's picture

29 Nov 2018 - 11:08 pm | माधुरी विनायक

कित्येक महिन्यांनंतर आज मिपा वर आले आणि कुठून आले असं झालं. बोका-ए-आझम हे मिपा वरच्या माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. त्यांच्या आजारपणाबद्दल मला आधीपासून कल्पना असण्याचं कारणंच नव्हतं. पण आता मि पा चं पान उघडल्यावर वाचलेल्या बातमीमुळे बसलेला धक्का खूप मोठा आहे..त्यांचे प्रियजन या धक्क्यातून सावरो..

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Nov 2018 - 11:12 pm | माम्लेदारचा पन्खा

काहीच सुचत नाही सकाळपासून .....
एक माहितीपूर्ण महाग्रंथ न वाचताच वाचनालयात परत गेल्यासारखा वाटतोय......

नंदन's picture

29 Nov 2018 - 11:35 pm | नंदन

दु:खद, धक्कादायक बातमी. त्यांचं लेखन आणि प्रतिसाद वाचून किती निरनिराळ्या क्षेत्रांत त्यांनी डोळस मुशाफिरी केली आहे, याची चुणूक पहायला मिळत असे. एखाद्या मिपा कट्ट्यात यांना भेटायला हवं, अशी मनाशी खूणगाठ बांधली होती; ते आता होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली.

सोन्या बागलाणकर's picture

30 Nov 2018 - 2:27 am | सोन्या बागलाणकर

सुन्न करणारी बातमी!
बोका-ए-आझम माझ्या आवडत्या मिपालेखकांपैकी एक. त्यांच्या मोसाद, अंधारक्षण अश्या अनेक मालिका अतिशय आवडल्या.
या काळ्या ढगासारख्या बातमीला एकच सोनेरी किनार की ते त्यांच्या लेखनरूपाने नेहमीच आपल्याबरोबर आहेत.

भावपूर्ण श्रद्धांजली!

मंजूताई's picture

30 Nov 2018 - 3:22 am | मंजूताई

भावपूर्ण श्रध्दांजली !

मुक्त विहारि's picture

30 Nov 2018 - 7:52 am | मुक्त विहारि

भावपूर्ण श्रध्दांजली.

डाम्बिस बोका's picture

30 Nov 2018 - 7:58 am | डाम्बिस बोका

त्यांचे लेखन नेहमीच लक्षात राहील. चटका लावणारी बातमी

चांदणे संदीप's picture

30 Nov 2018 - 8:08 am | चांदणे संदीप

मिपावर माझ्या सुरूवातीच्या दिवसांत माझी आवर्जून विचारपूस करणारे बोकाशेठ. तो उत्तेजना देणारा संवाद कायम लक्षात राहील.

अतीव दु:ख झाले. त्यांना शांती लाभो एवढेच...

Sandy

ज्योति अळवणी's picture

30 Nov 2018 - 8:26 am | ज्योति अळवणी

बोका ए आझम यांचे लेखन खूप आवडायचे. त्यांच्या लेखनाच्या प्रतिसादाला त्यांचे उत्तर देखील मस्त असायचे. तसे मी केवळ वाचक म्हणून त्यांना ओळखत होते. तरीही ही बातमी वाचून धक्का बसला.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो

प्रचेतस's picture

30 Nov 2018 - 8:35 am | प्रचेतस

वाइट वाटलं खूप. उमदा माणूस.

योगी९००'s picture

30 Nov 2018 - 9:19 am | योगी९००

बोका ए आझम यांचे मोसाद व इतर लेखन खूप आवडायचे. तसे मी केवळ वाचक म्हणून त्यांना ओळखत होते. तरीही ही बातमी वाचून धक्का बसला. त्यामुळे तुमच्या सारख्या मित्राला व त्यांना जवळून ओळखणार्‍यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करवत नाही.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटूंबीयांना यातून सावरण्यास बळ देवो.

मित्रहो's picture

30 Nov 2018 - 9:31 am | मित्रहो

भावपूर्ण श्रद्धांजली
प्रचंड धक्का बसला
खरं म्हणजे ओळख फक्त मिपावरील प्रत्यक्षात भेट नाही बोलण नाही तरी हा माणूस ओळखीचा वाटायचा. गेल्या बर्‍याच दिवसात त्यांचे प्रतिसाद का नाही हा प्रश्र्न होता त्याचे उत्तर आज मिळाले. फार वाईट वाटले.

मनापासून श्रद्धांजली

वैभवजोशि's picture

30 Nov 2018 - 10:55 am | वैभवजोशि

आताच त्यांच्या लिखाणाचे अजून एक पारायण संपवले होते. भावपूर्ण श्रद्धांजली

अमोल काम्बले's picture

30 Nov 2018 - 10:55 am | अमोल काम्बले

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली

नरेश माने's picture

30 Nov 2018 - 11:05 am | नरेश माने

भावपूर्ण श्रध्दांजली.

संजय पाटिल's picture

30 Nov 2018 - 11:16 am | संजय पाटिल

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली _/\_

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली _/\_. त्यान्च्या मोसाद, स्केअर्क्रो वाचल्या होत्या.

प्रसाद_१९८२'s picture

30 Nov 2018 - 12:24 pm | प्रसाद_१९८२

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली

गावचा पाटील's picture

30 Nov 2018 - 12:28 pm | गावचा पाटील

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली

पियुशा's picture

30 Nov 2018 - 1:08 pm | पियुशा

भावपूर्ण श्रध्दांजली ___/\__

भावपूर्ण श्रध्दांजली !

प्रवास's picture

30 Nov 2018 - 1:33 pm | प्रवास

मृतात्म्यास शांती लाभो.

माझीही शॅम्पेन's picture

30 Nov 2018 - 2:07 pm | माझीही शॅम्पेन

एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची अखेर इतक्या लवकर आणि खरंच कधी होईल असं वाटली नाही , काल पासून सुन्न झालोय , फार काही लिहिवंत नाही

भावपूर्ण श्रध्दांजली !

बोका-ए-आझम ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली...ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास सद्गती देओ आणि त्यांच्या आप्तजनांस दु:खातून सावरण्यास बळ देओ.

_/\_

नीलमोहर's picture

30 Nov 2018 - 2:09 pm | नीलमोहर

एखाद्या कधीही न भेटलेल्या व्यक्तीच्या जाण्याने डोळ्यांत पाणी यावं असं फार क्वचित घडतं, पण पत्की यांच्याबाबत ते घडलं खरं.

त्यांच्याशी ओळख इथलीच, बोलणं इथे होईल तेवढंच, प्रत्यक्ष कधी भेट नाही बोलणं नाही,
तरी ही बातमी कळल्यावर फार जवळचं कुणी गेल्यासारखं वाटलं .
असं काही ऐकलं की देव-बिव, श्रद्धा सगळ्यावरून विश्वास उडतो.

अनिरुद्ध प's picture

30 Nov 2018 - 2:10 pm | अनिरुद्ध प

ईश्वर सद्गती देवो

एकविरा's picture

30 Nov 2018 - 3:49 pm | एकविरा

धक्कादायक बातमी ,ओळख फक्त मिपा वरची तरिहि वाइट वाटले .

रोमन रेन्स's picture

30 Nov 2018 - 3:59 pm | रोमन रेन्स

भावपूर्ण श्रध्दांजली .....

विशुमित's picture

30 Nov 2018 - 7:37 pm | विशुमित

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली...!!

जेसीना's picture

1 Dec 2018 - 9:07 am | जेसीना

भावपूर्ण श्रध्दांजली !

सुबोध खरे's picture

1 Dec 2018 - 10:08 am | सुबोध खरे

बोका शेट ची माझी ओळख कशी झाली हे ही नक्की आठवत नाही. कोणत्यातरी कट्ट्याला आला होता तेंव्हा बराच वेळ गप्पा मारल्या होत्या पण तो आमच्या कोणत्यातरी व्हाट्सअँप च्या ग्रुप वरही होता. तेथे त्याची मते तो आग्रहीपणे मांडत असे. त्याच्या मोसाद लेखमालिकेबद्दल मी भरभरून बोललो होतो तेंव्हा तो अत्यंत विनयशिल पणे त्याबद्दल बोलला होता.
परंतु साधारण दोन वर्षांपूर्वी त्याला हनुवटीच्या खाली गाठ आली तेंव्हा त्याने मला फोन केला. मी त्याला त्या गाठीचा फोटो काढून मला पाठवायला सांगितला. ती गाठ बऱ्यापैकी मोठी( मोठ्या बोराएवढी) होती. ते पाहून मी त्याला त्यातून सुईने बायोप्सी करायला सांगितली होती. गाठ दुखत नसे त्यामुळे त्याने काही काळ चालढकल केली आणि नंतर बायोप्सी केली. बायोप्सीचा रिपोर्ट त्याने मला पाठवला. तो वाचून मला काळजात चर्रर्र झाले कारण हा त्वचेचा कर्करोग (MALIGNANT MELANOMA) निघाला होता आणि त्वचेचा कर्करोग गाठीत पोहोचला म्हणजे चौथ्या स्टेजचा होता हे मला समजले आणि अनुभवाने त्याच्या हातात दिवस दोन वर्षपेक्षा जास्त नाहीत हे माहिती होते. केमोथेरपी आणि इम्म्युनोथेरपि बद्दल त्याची आणि माझी बरीच चर्चा झाली होती. बऱ्याच लोकांनी मला त्याच्या आजाराबद्दल विचारले असताना मी त्याच्या (PRIVACY) गोपनीयतेमुळे कुणालाही सांगितले नव्हते. केमोथेरपीमध्ये गाठ दिसेनाशी झाली तेंव्हा तो फार उत्साहात होता. पण हे तात्कालिक आहे हे समजून असल्यामुळे मी त्याला जास्त माहिती दिली नाही. परत जेंव्हा आजार उद्भवला तेंव्हा मात्र तो आपल्या कवचात गेला आणि त्याने संपर्क टाळला होता. मी पण त्याच्या कोशात शिरण्याचा प्रयत्न केला नाही.
उत्साहाचा झरा असलेला गोष्टीवेल्हाळ माणूस अचानक अशा दुर्धर रोगाला का बळी पडतो याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही. नियतीच्या मनात काय असते ते कुणालाच सांगता येणार नाही. परमेश्वर त्यासारख्या आत्म्याला मुक्ती देवो एवढीच प्रार्थना

बोका ए आझमना श्रद्धांजली..

डॉक्टर, तुमचा वरील प्रतिसाद वाचून आठवलं: वेळेवर लक्षात आले तर अनेक प्रकारचे कॅन्सर बरे होणं / आटोक्यात आणणं शक्य असतं असं वाचलं आहे. तुम्ही उल्लेख केलेल्या मेलानोमा या स्किनकॅन्सरबद्दलही हे खरं आहे.

याविषयी जागरुकता आणण्यासाठी काही लिहिलंत तर पुढे या बाबतीत किमान काही जण वेळेत या भयंकर आजाराची लक्षणं ओळखू शकतील.

याविषयी जागरुकता आणण्यासाठी काही लिहिलंत तर पुढे या बाबतीत किमान काही जण वेळेत या भयंकर आजाराची लक्षणं ओळखू शकतील.)
... खरंच तुम्ही याबाबत लिहावे.

सुबोध खरे's picture

3 Dec 2018 - 10:00 am | सुबोध खरे

मेलॅनोमा हा त्वचेच्या रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशींचा कर्करोग हा भारतीयांना अतिशय तुरळक प्रमाणात होणार कर्करोग आहे. हा रोग होण्याची शक्यता भारतीय वंशाच्या माणसात साधारण १ लाख लोकांत फक्त एका व्यक्तीला होतो.

त्यामुळे श्री बोका याना हा रोग झाला हे केवळ दुर्दैव म्हणता येईल.

गोऱ्या लोकांना( ज्यांच्या त्वचेत मेलॅनिन हे रंगद्रव्य फार कमी प्रमाणात असते) हा रोग होण्याची शक्यता भारतीय लोकांपेक्षा २५० पट जास्त असते. मेलॅनिन हे रंगद्रव्य अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करते आणि हा कर्करोग अतिनील किरणांचा त्वचेवर होणाऱ्या परिणामामुळे होतो.
मुळात हा रोग होण्याची शक्यता भारतीय वंशाच्या व्यक्तीत फार कमी असल्यामुळे या रोगापासून बचाव करण्यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम अस्तित्वात नाही.
परंतु दुर्दैवाशी सामना कसा करणार हा एक फार गहन प्रश्न आहे.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

7 Dec 2018 - 10:28 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

हे मान्यच करावं लागेल!

लई भारी's picture

1 Dec 2018 - 1:35 pm | लई भारी

सुन्न करणारं आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_

स्मिता_१३'s picture

1 Dec 2018 - 9:18 pm | स्मिता_१३

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली. _/\_

नूतन सावंत's picture

1 Dec 2018 - 11:03 pm | नूतन सावंत
नूतन सावंत's picture

1 Dec 2018 - 11:04 pm | नूतन सावंत
भारद्वाज's picture

2 Dec 2018 - 6:14 am | भारद्वाज

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

श्रीरंग_जोशी's picture

2 Dec 2018 - 11:20 am | श्रीरंग_जोशी

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बोका-ए-आझम माझ्या आवडत्या मिपा-लेखकांपैकी एक होते. माझ्या दुर्दैवाने माझा त्यांच्याशी झालेला संवाद जुजबी पातळीच्या पलिकडे जाऊ शकला नाही.
त्यांचे इतक्या कमी वयात निघून जाणे अत्यंत वेदनादायी आहे.

परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो तसेच त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ देवो.

बोका-ए-आझम यांचे लेखन कायमच प्रेरणा देत राहील.

स्पार्टाकस - जवळच्या मित्राच्या अकाली निधनानंतर लगेचच तुम्ही त्यांच्याबाबत थोडक्यात पण समर्पक ओळख करुन देणारा लेख लिहिला यासाठी __/\__.

भावपूर्ण श्रद्धांजली

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Dec 2018 - 12:28 pm | हतोळकरांचा प्रसाद

कुठेही कधीही प्रत्यक्षात न भेटलेली हि अशी माणसं हा एवढा जीवाला चटका देऊन अचानक निघून जातात तेव्हा जाणवते कि किती मोठी मौल्यवान गोष्ट आपल्यातून गेली आहे. "जो आवडतो सर्वाना, तोचि आवडे देवाला..." याची प्रचिती एवढ्या क्रूर पद्धतीनेच यायला हवी का?

स अर्जुन's picture

3 Dec 2018 - 6:30 pm | स अर्जुन

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली. _/\_

सुचेता's picture

3 Dec 2018 - 8:22 pm | सुचेता

भावपूर्ण श्रध्दांजली.

सविता००१'s picture

4 Dec 2018 - 10:48 am | सविता००१

भावपूर्ण श्रध्दांजली.

मोसाद लेख मालेमुळे बोका भाऊंचा fan झालो. ऊत्तम लेखमाला. त्याद्वारे खूप माहिती मिळाली.
अकाली निधनामुळे हळहळ वाटली. व्यक्ति म्हणून या व ईतर लेखाद्वारे त्यांच्या बद्दल माहिती कळाली. तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांच्या प्रतिक्रयांवरून ही कळाली. ऊगाच मन ऊदास झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.