पडसाद

Primary tabs

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in जे न देखे रवी...
6 Nov 2018 - 10:55 am

मऊ सांजवेळी प्रभा दाटलेली, दिसे आसमंतात आता धुके
तुझ्याही मनी तेच कल्लोळते का? जशी मंदिरातील घंटा घुमे!

स्फुरे का इथे मंत्र बीजाक्षरांचा जरी अंतरंगी जळे वेदना
नुरे शब्दमालेतला प्राण तरिही गमे मालकंसातली सांत्वना

सरे शुद्ध भावातली सत्यसाक्षी कळा शब्द गीतात साकारता
उदासी उगा आर्द्र चित्ती उरावी नदीच्या प्रवाही दिवे सोडता

झंकारता त्या स्मृतींची नुपूरे, क्षणांची द्युती शुभ्र तेजाळते
जणू ते दरीतील अंधारलेल्या अरण्यातले क्षीणसे काजवे

उरी सावल्यांच्या निखारे व्रणांचे, भृगुच्या पदांचे विरागी टिळे
कदंबासही का वृथा मोहवावे अनादि चिरंजीव काही निळे?

अता पार्थिवाची सराईत वसने लेऊ कसा? सांग जेंव्हा मला
दिसे ह्या गुहेतील अस्तित्व माझे, जळे भास, मंत्रातली वंचना!

कविता