दोसतार-१७

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
5 Nov 2018 - 3:02 pm

मागील दुवा https://www.misalpav.com/node/43463

शिक्षकाना निदान एकच विषय असतो. आम्हाला इथे गणीत , मराठी , इंग्रजी, भुगोल, भौतीक शास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र , चित्रकला, हे सगळेच विषय. प्रत्येक विषयाचा गृहपाठ वेगळा. काळकाम वेगाच्या गणीताचे उदाहरण देताना प्रत्येक मजूर स्वतःच्या वेगळ्या विटा घेवून भिंत बांधतो असे कुठेच सांगीतलेले नव्हते.

पुढच्या आठवड्यात घटक चाचणी. शाळेत घरी रस्त्यातून येता जाताना काय जे एकमेकांशी बोलणे चालणे व्हायचे ते सगळे घटक चाचणी संदर्भात. आम्हाला तर वर्तमानपत्रातही घटक चाचणी दिसत होती. वर्तमानपत्राच्या आतल्या पानात काहितरी शुभराशी कल्याण अशा बातमीखाली कसलेतरी चौकटीतले अंक असतात. एल्प्या म्हणायचा की ती कसल्यातरी गणीताची उत्तरे असतात. त्याचे एक काका ते अंक रोज एका छोट्या वहीत नोंदवून ठेवतात. एल्प्याला प्रश्न पडायचा की काका कोणत्याच शाळेत जात नसतानाही ही गणीताची उत्तरे त्यांना कशाला हवी असायची. मी एल्प्याला म्हणालो सुद्धा की नसेल रे. मला सांग कोणी नुसती उत्तरे का छापतील ती ही त्यावर गणीत नसताना? एरवी परीक्षेत गणीत अगोदर देतात आणि ते सोडवून उत्तर काढायचे असते. इथे काहितरी उलटे असावे बहुतेक. उत्तरावरून गणीत शोधायचे असे.
नव्या गणीताच्या पुस्तकात सगळ्यात शेवटी उत्तरे दिलेली असतात. त्यावरून सोडवलेले गणीत बरोबर की चूक हे ताळा करून पहायचे. तसाच असेल हे काहिसे. किंवा एका वर्तमानपत्रात गणीत देत असतील आणि दुसर्‍या वर्तमान पत्रात त्याचे उत्तर. कोणीतरी कल्याण नावाचा माणूस ही उत्तरे सोडवून देत असावा. एल्प्याने त्याच्या काकाला एकदा ही गणीते कोणत्या पेपरात असतात हे विचारले होते. त्यावर काका नुसताच फस्सकन हसला होता. आणि एल्प्याच्या वडीलांनी एल्प्याच्या कानाखाली आवाज काढला होता. त्यामुळे त्याची अधीक अभ्यास करायची इच्छाच मरून गेली. म्हणे.
घटक चाचणीची तयारी करायची म्हणजे तसे काही फार मोठस्सं नसतं. पुस्तक वाचलेलं असलं तर फार पाठांतरही करायला लागत नाही. कोण कोणास म्हणाले , संदर्भासह स्पष्टीकरण हे तर अगदीच सोप्पे. प्रश्नातच उत्तराचा अर्धा भाग दिलेलाच असायचा. त्यातल्या त्यात निबंध वगैरे प्रकरण जरा अवघड होते. विषय दिलेला असला तरीही त्यावरचा निबंध पाठ करून लिहिणे हे अवघडंच असतं.
" काय अवघड नसतं रे. एक नवी आयडीया सापडली आहे. मला त्या शेजारच्या सीमा ने संगितली." टंप्याला काहितरी नवी आयडीया सापडली होती. ती नेहमीपेक्षा वेगळी होती म्हणे. टंप्याच्या डोक्यातून काय आयडीया निघेल हे कोणी इतर काय पण तो सुद्धा संगू शकेल याची खात्री नसते. गेल्या वर्षी त्याने म्हणे गृहपाठात उत्तरे लिहिण्यापेक्षा सरळ पुस्तकातून तेवढी वाक्ये कापून चिटकवुया असे म्हणत होता. ते तसे कापून चिकटवेले तर पुढच्या वेळेस अभ्यासाला काय वाचायचे या प्रश्नावर तो म्हणाला. खरेच की.... हे लक्षातच आले नाही. पण ही नवी आयडिया त्याला कोणीतरी संगितली होती. म्हणजे ती त्याची स्वतःची नव्हती . त्यामुळे ती तितकीशी अचाट नसेल. आणि कोणीतरी ती वापरून बघितलेली आहे हे महत्वाचे. यात काही फार बिघडणारे नव्हते.
सांग सांग. काय आहे ते ऐकुया तरी.
अरे... काय आहे की गेली तीन वर्षे निबंध हे माझी शाळा किंवा माझा आवडता प्राणी या विषयावरच येतात. फार तर आवडता प्राणी या ऐवजी गाय, किंवा शेळी या वर निबंध लिहायला सांगतात. यात अवघड काय आहे. निबंध घोकून पाठ करायचा. गाईला चार पाय असतात, दोन शिंगे असतात. गाय दूध देते, गाय चारा खाते, वगैरे वगैरे.
यात गाई ऐवजी म्हैस किंवा शेळी असे आले तर फक्त तेवढे बदलायचे. शेळी म्हैस आणि गाय तीघानाही शिंगे असतात,तिघीही दूध देतात. ते मुलांना आवडते वगैरे वगैरे.
या निबंधात
माझी शाळा हा निबंध ही असाच. शाळेची इमारत दगडी आहे. पाचवी पासून दहावीपर्यंत वर्ग आहेत, खेळाचे मैदान आहे, मैदानावर कबड्डी खोखो हुतुतू खेळ होतात , शाळेत एक प्रेक्षागृह आहे तेथे सांस्कृतीक कार्यक्रम होतात वगैरे वगैरे. या ऐवजी शाळेचे मैदान, अभ्यासिका असले काही आले तरी त्यात ही शाळेचे वर्णन करणारी वाक्य घेता येतात. त्यानेच अर्ध्याहून अधीक निबंध भरून जातो. मग उरलं सुरलं जे काय सुचेल तसे भरून काढायचे.
आम्ही हे बोलत असतानाच पलीकडच्या बाकावरून वैजयंती आणि सुषम नी हे ऐकले. झाले आमची ही निबंध पाठ करायची आयडिया आकाशवाणीवरून प्रसारीत व्हावी तशी वर्गात सगळ्याना कळाली. प्रत्येकाना गुपचूप दोन्ही किंवा मिमान दोन्ही पैकी एक म्हणजे माझी शाळा आणि माझा आवडता प्राणी या विषयांचे निबंध घोकायला सुरवात केली. आता निबंधाचा आम्हाला प्रत्येकाला पैकीच्या पैकी गुण मिळणार होते.
घटक चाचणीचा सुरू झाली. गणीताच्या चाचणीत वर्गात शिकवलेलीच गणीते होती . बहुतेकांची ती गणीतेही पाठ होती.थोडाफार फरक म्हणून उदाहरणातील माणसांच्या नावात फरक केलेला होता म्हणजे वर्षाच्या जागी हर्षा, प्रीतीच्या जागी मोती आणि एक तास या ऐवजी दोन तास किंवा तीन तास . त्यामुळे मजा आली. म्हणजे उत्तर तेच पण गणीतातली नावे बदललेली.
आम्हाला मराठीची घटक चाचणी. सरांनी फळ्यावर पेपर लिहीला. निबंधाला विषय आले होते. माझे बाबा आणि दुसरा विषय होता माझा पहिला विमान प्रवास.
आम्ही पाठ केलेल्या दोन्ही विषयांपैकी एकही विषय आलेला नव्हता. पण प्रत्येकजण काही ना काही लिहीत होता. चाचणी परीक्षा सम्पल्यावर कोणी काय लिहीले आहे ते कोणीच सांगत नव्हते. एखाद्या राष्ट्राने लष्करी गुपीत जपावे तसा आपण काय निबंध लिहीला हे कोणीच सांगायला तयार नव्हते.
सोनसळे सर आम्हाला पुढच्या सोमवारी गुण सांगणार होते. आम्हाला गुणांपेक्षा कोणी काय लिहिले आहे याचीच जास्त उत्सुकता होती.
सोमवार आला. सोनसळे सर वर्गावर उत्तरपत्रीकांचा गठ्ठा घेवून आले. त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव पाहून नकी काय झाले आहे याचा अंदाज बांधता येत नव्हता.
त्यानी गुण सांगायला सुरवात केली. शर्मिला चा अपवाद वगळता कोणालाही दहापैकी दोन पेक्षा जास्त गुण नव्हते. तीला चार होते इतकेच.
सरांनी प्रत्येकाला तपासलेल्या उत्तरपत्रिका दिल्या . आपल्यापेक्षा शेजारच्याच्या उत्तरपत्रीकेत काय लिहीले आहे याचीच उत्सुकता होती.
आपण काय दिवे लावलेले आहेत हे सगळ्यानांच माहित होते. त्यामुळे प्रत्येकाने त्याचे डोके शेजार्‍याच्या उत्तरपत्रीकेत खुपसले. मला एल्प्याचे अक्षर लागेना. सरांनाही बहुतेक ते लागले नसावे. मोठे आणि गिचमीड ही दोन्ही विशेषणे लावता येतील असे. त्यामानाने टंप्य्याचे अक्षर बरे होते. निदान वाचता तरी येत होते.
पण त्याने त्याची उत्तर पत्रीका बंद करून ठेवली होती.
बाकी सर्वांना दोन आणि एकट्या शर्मिलालाच चार गुण का? आपल्या गुणपत्रीकेचा सार्वजनीक पंचनामा नको म्हणून जो प्रश्न विचारायचे आम्ही टाळत होतो तो प्रश्न अंजीने विचारलाच. हीला ना कुठे , कधी , केंव्हा आणि काय विचारायचे ते शिकवायला हवे कोणीतरी .
सोनसळे सरांनी संज्याला त्याचा पेपर घेवून बोलावले. त्याने माझा पहिला विमानप्रवास या विषयावर निबंध लिहीला होता.
सरांनी संज्याला निबंध वाचायला सांगितले. तो आढेवेढे घेवू लागला. मग सर म्हणाले मी वाचू का तुझा निबंध.
संज्या निबंध वाचू लागला. " माझा पहिला विमान प्रवास आहे. आमचे विमान आहे. विमान दगडानी बांधलेले आहे. लोकमान्य टिळकांकडून प्रेरण घेऊन उभ्या राहिलेल्या या विमानाला गेल्याच वर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली. विमानात पंचेचाळीस वर्ग आहेत. एक खेळाचे मोठे मैदान आहे. या मैदानात आम्ही खो खो कबड्डी हुतूतू खेळतो. विमानात शिक्षक आम्हाला अनेक विषय शिकवतात. माझ्या विमानावर माझे फार प्रेम आहे.
संज्याने माझी शाळा या निबंधातील शाळा हा शब्द खोडून त्या ऐवजी विमान हा शब्द वापरला होता. दगडी बांधकामाचे विमान ऐकल्यावर सोनसळे सरांसहीत आख्खा वर्ग पोट धरुन हसत होता. सुरवातीला हसावे की कसे या संभ्रमात असलेला संज्यादेखील हसायला लागला. बहुतेक सगळ्यांचे निबंध थोड्या फार फरकाने संज्यापेक्षा फारसे वेगळे नव्हते.
सरांनी शर्मिलाला चार मार्क दिले का दिले याची आम्हाला उत्सुकता होती. सरांनी तीला निबंध वाचायला सांगितले.
शर्मिला वाचू लागली.
गेल्या महिन्यात आई बाबा पिंट्या आणि मी असे विमानाने गावी जाणार होतो. मी या अगोदर कधीच विमान प्रवास केला नव्हता. त्यामुळे विमानात बसायचे या विचारानेच भिती आणि उत्सुकता वाटत होती. विमानात बसण्यासाठी अगोदर एस्टी पकडण्यासाठी जसे एस्टी स्टँडवर जावे लागते तसे विमानाच्या स्टँडवर जावे लागते. विमानाच्या स्टँडला विमानतळ म्हणतात. इथे बरीच विमाने उभी होती. प्रत्येक विमानावर ते कुठे जाणार आहे त्याची पाटी लावलेली होती. आम्ही विमानतळावर गेल्यावर बाबांनी कंडक्टरला रिझर्वेशनचे तिकीट दाखवले. आणि आम्ही आमच्या गावाकडे जाणार्‍या विमानात एका शिडीवरून चढून बसलो. विमानात बसायला खूप ऐसपैस सीत होत्या. त्यात बसल्यावर तिथल्या मावशींनी आम्हाला पट्टे बांधायला संगितले आणि गोळ्या दिल्या. विमानाचा ड्रायव्हर विमानात बसला. विमानाच्या ड्रायव्हरला पायलट म्हणतात. खुप आवाज करत आमचे विमान सुरू झाले. मला खिडकी जवळची जागा मिळाली. पन ही खिडकी उघडतच नव्हती. विमान जमिनीवरुन धावत गेले आणि एकदाचे उडाले. वर वर जाऊ लागले. खिडकीतून खाली खूप छान दृष्य दिसत होते. डोंगर टेकडी, रस्ते सगळे छोटे छोटे दिसत होते. मी माझी शाळा शोधत होते.
टेकडी मागे वळण रस्त्यावरुन पुढे माझी शाळा दिसली. माझी शाळा म्हणजे दगडांच्या भक्कम इमारत आहे. लोकमान्य टिलकांपासून प्रेरणा घेवून बांधलेल्या या शाळेला मागील वर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली. माझ्या शाळेत पंचेचाळीस वर्ग आहेत. माझ्या शाळेत खेळासाठी खूप मोठे मैदान आहे. आम्ही तेथे लंगडी , खोखो , व्हॉलीबॉल खेळतो. शाळेत शिक्षक आम्हाला निरनिराळे विषय शिकवतात. शाळेत मोठे वाचनालय आहे. तेथे खूप पुस्तके आहेत. मला माझी शाळा खूप आवडते. शाळेतील मैत्रीणी आणि खेळ आठवता आठवता विमानप्रवास कधी संपला ते समजलेच नाही. माझे माझ्या शाळेवर खूप प्रेम आहे.
शर्मिला ने प्रवासवर्णन कमी आणि शाळेचेच वर्णन जास्त केले होते. पण तिने कहिमुद्दे तरी नीट लिहीले होते. त्याचेच तीला चार गुण मिळाले होते
अरे मुलांनो आपल्याला निबंध लिहायला सांगतात ते आपली कल्पनाशक्ती वाढवावी वापरावी म्हणून. नीत वाक्य रचना करता यावी म्हणून. पुस्तकातील निबंध पाठ केला तर परिक्षेत गुण मिळतील पण तुमची कल्पना शक्ती वाढणार नाही. पाठांतर करणे हा अभ्यासाचा हेतू नसतो. तुम्ही तुमची वाक्ये वापरा चुकू देत त्याची काळजी करू नका. तुमची वाक्ये वापरलीत तरच तुमची भाषा सुधारेल. सोनसळे सरांचे म्हणणे आम्हाला समजत नव्हते. पण ते अगदी आतून सांगत होते. ते असे आतून बोलत असताना त्यांचे डोळे चमकत असतात. त्याना खूप काही सांगायचं असतं
मला वेगळीच चिंता होती. टंप्याने निबंधासाठी " माझे बाबा " हा विषय घेतला होता. टंप्याने पालथा करून ठेवलेला त्याचा निबंधाचा कागद सरळ करुन मी मनातल्या मनात वाचायला लागलो.
माझे बाबा : माझा सर्वात आवडता प्राणी म्हणजे माझे बाबा. माझ्या बाबांना दोन डोळे दोन कान आणि चार पाय आहेत. माझ्या बाबांना जेंव्हा आम्ही गळ्यात दोरी बांधुन फिरायला नेतो तेंव्हा त्याना खूप आनंद होतो. ते आनंद शेपूट हलवून व्यक्त करतात. काही वेळा ते उड्याही मारतात. पण त्यांचा स्वभाव खूप शांत आहे. त्याना अन्न म्हणून आई चारा वैरण किंवा कडबा देते. तीन घमेली वैरण आणि दोन बादल्या पाणी हे त्यांचे एका वेळचे जेवण आहे. बाबा कधी कधी दूध देतात.
.......
बरे झाले सरांनी टंप्याला निबंध वाचायला सांगितले नाही. मला समोर दोरीने बांधलेले चट्टेरीपट्टेरी लेंगा बनियन घातलेले टंप्याचे बाबा शिंगे उगारून हम्मा हम्मा करत आमच्या अंगावर येताना दिसू लागले.

क्रमश :

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Nov 2018 - 4:54 pm | यशोधरा

=))

विनिता००२'s picture

6 Nov 2018 - 11:08 am | विनिता००२

=)))

सिरुसेरि's picture

6 Nov 2018 - 6:14 pm | सिरुसेरि

+१ . छान

विजुभाऊ's picture

12 Nov 2018 - 9:23 am | विजुभाऊ

_/\_

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2018 - 10:34 am | सुधीर कांदळकर

मस्त झकास. लो. टिळकांच्या प्रेरणेने बांधलेले दगडी विमान आणि शिंगे उगारून अंगावर येणारे बाबा आवडले. मज्जा आली. धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Feb 2019 - 2:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

दगडी विमान आणि शिंगेवाले बाबा, काय पण कल्पनाविलास :)

विजुभाऊ's picture

28 Feb 2019 - 3:24 pm | विजुभाऊ

:)

चौथा कोनाडा's picture

13 Jul 2020 - 5:42 pm | चौथा कोनाडा

शुभराशी कल्याण गणिताचा किस्सा भारी आहे !
निबंध प्रकरण पण लै थोर आहे ! :-)))
__________________________________________________________________
पुढचा भाग :

"दोसतार-१८"

>दोसतार-१८