नखरेल नयना आणि तिचा प्रताप ..

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
29 Oct 2018 - 5:06 pm

नखरेल नयना आणि तिचा प्रताप ..

नखरेल नयना ...उद्यम वाडीतील झोपडपट्टी मधल्या आपल्या घरातून नेहमीसारखी झोकात बाहेर पडली. आज तिने गुलाबी लहान लहान रंगाची फुले असलेला top घातला होता ...आपली बरीचशी पाठ उघडी राहील असा top तिने मुद्दाम शिवून घेतला होता ,आणि त्या खाली आज तिने निळसर रंगाची घट्ट जीन घातली होती . खांद्यापर्यंत नीट कापलेले केस तिने आज मोकळेच सोडले होते. कपाळावर गुलाबी रंगाची मोठी टिकली आणि ओठावर हलकेसे पण भडक रंगाचे लिपस्टिक. आपली कंबर एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे अशी हलवत ती बाहेरच्या कच्च्या रस्त्यावर आली. आपल्याकडे कोणी बघतंय कि नाही याचा तिने जरा अंदाज घेतला. रस्त्यावर आत्ता कोणीच नव्हते. तिची जरा निराशाच झाले. पण तिला माहित होते कि पाच दहा मिनिटे चालत गेले कि डाव्या बाजूला झाडाखाली तीन चार चहाच्या ..विडी काडी आणि वडापाव विकणाऱ्या टपऱ्या होत्या. तिथे बरीच वर्दळ नेहमी असायची . बरीच तरूण मुले काही आपल्या मोटार सायकल वर किवा तिथल्या बाकड्यावर बसून टिवल्या बावल्या करत असतात. नयना रस्त्यावरून निघाली की त्यांच्या नजरा तिच्या सर्वांगावरून फिरत. एक दोन जण हळूच शिट्टी पण मारीत असत ..काही तरी तिला उद्देशून बोलत पण असत.

नयनाला ते खूप आवडत असे. मग ती आपले टपोरे आणि काजळ घातलेले डोळे हळूच त्यांच्यावरून फिरवत असे आणि आपल्या कंबरेला जरा जास्तच झोका देत भर भर चालत आहोत असे दाखवत तिथून पुढे सटकत असे. मग थोडे पुढे गेल्यावर आपल्या एका हाताने आपली छोटीशी पर्स आपल्या छातीवर दाबून धरत एका हाताने आपले मोकळे सोडलेले केस उगीचच विस्कटून परत सारखे करत असे.
“ हाय हाय ! मार डाला ! ...क्या अदा है ! …” किवा असेच काही तरी तिच्या कानावर पडत असे. मग आपण खूप लाजलो आहोत असे दाखवत ती खाली मान घालून पुढे सरकत असे. मधेच आपल्या डाव्या मनगटावर असलेल्या सोनेरी रंगाच्या घड्याळात बघून आपल्याला आज जरा उशीरच झालाय असे दाखवून आपला चालण्याचा वेग वाढवीत असे.

आज सुद्धा त्या टपरीवर अशीच चारपाच तरूण मुले उभी होती . तिथे उभी असणारी बहुतेक मुले तिथे तिला दररोज दिसत असत . पण आज तिला एक नवीनच मुलगा एका झोकदार मोटार सायकलवर बसलेला तिला दिसला. होंडा ! तिला सगळ्या मोटार सायकली माहित होत्या. वीस पंचवीस वर्षाचा तो मुलगा बहुतेक नेहमी जिम मध्ये जात असावा. त्याने घातलेला गर्द हिरव्या रंगाचा हाफ शर्ट त्याच्या दोन्ही सावळ्या रंगाच्या दंडात रुतून बसलेला होता. नयनाचे आपल्याकडे लक्ष गेले आहे हे बघताच त्याने आपल्या भरदार छातीचे स्नायू खालीवर करून दाखवले. त्याने सध्याच्या पद्धतीप्रमाणे आपली दाढी थोडीशी वाढवली होती पण ती व्यवस्थित कापलेली होती. त्याचे डोळे जरा राखाडी रंगाचे होते . त्याच्या एका हातात चहाचा कप आणि एका हातात सिगारेट होती . ...त्याचा त्याने एक झुरका घेतला आणि तिच्या दिशेने तोंडातून धूर सोडला. मोठा रुबाबदार मुलगा दिसत होता तो … नयना जरा चमकली . त्याच्या नजरेला तिने हळूच नजर भिडवली . एक क्षणभरच ...मग एकदम मान खाली घालून ..ती गडबडीने तिथून पुढे आली. तिच्या उघड्या पाठीवर त्याची नजर तिला किती तरी वेळ जाणवत होती.

या कच्च्या रस्त्यावरच उजवीकडे ..दोन तीन बंद पडलेले कारखाने होते. त्याच्या कुंपणाभोवती..बरेच गवत उगवले होते ..त्याच्या लोखंडी फाटकाला आता गंज चढला होता . एक मोठे कुलूप मात्र त्याला लावलेले होते. पलीकडच्या कारखान्याची सुद्धा हीच परिस्थिती होती . एखादा रखवालदार केव्हातरी तिथे दिसे आणि केव्हातरी काही सूट बूट घातलेले लोक आत जाऊन उगीचच संपूर्ण कारखान्याला फेरी मारत असत. रस्त्यापासून थोड्या आत असलेल्या कारखान्यात नयनाचा बाप काही दिवस काम करत होता. तो कारखानाच आता बंद पडला होता. तिचा बाप मग असेच कुठेतरी दिवसा मजुरी करायचा आणि रात्री ते सगळे पैसे देशी दारूवर उडवून टाकायचा . तिच्या मोठ्या भावाला रघु ला भोसरीत एका कारखान्यात नुकतीच नोकरी लागली होती . ती आणि तिची आई जवळच्या दोन तीन सोसायटीत धुणे भांडी करून पैसे मिळवत होत्या.
हे दररोज दिसणारे दृश्य पहात नयना राहुल सोसायटीत साडेनऊ पर्यत येत असे. सगळ्यात पहिल्यांदा दुसऱ्या मजल्यावर २३ नंबर मधील सावंत काकू ..मग तिसऱ्या मजल्यावर ३६ नंबर मधील जोशी काकू आणि सगळ्यात शेवटी समोरच असलेल्या दुमजली रो हाउस मधील पवार काकू. सावंत काकू आणि जोशी काकूच्या कडची भांडी घासणे ,धुणे धुऊन वळत घालणे … सगळ्या खोल्यामधील केर काढणे ..बाथरूम धुणे असे करत तिला पवार काकूंकडे जायला बारा वाजत असत. तिला हे काम सगळ्यात जास्त आवडत असे. पवार काका आणि काकू या मोठ्या बंगल्यात दोघेच होते. ते दोघे खालच्या मजल्यावर रहात . वरचा मजला रिकामाच होता. पूर्वी त्यांचा मुलगा आणि सून तिथे रहात असत . आता ते कुठेतरी अमेरिकेत होते. आठवड्यातून एकदा नयनाला वरच्या दोन बेडरूम ,बाथरूम आणि किचन साफ करावे लागे . ते तिला खूप आवडत असे. पवार काकू गुढघे दुखतात म्हणून काही वर येत नसत आणि पवार काका नेहमी काही तरी टीवीवर कार्यक्रम पहात बसत. मग महिन्यातून एकदा वरचा मजला साफ करायच्या निमित्ताने वरचा मजला नयनाच्या ताब्यात असे. वरच्या मजल्याच्या एका बाथरूम मध्ये टब बाथ होता. तो साफ करताना सगळे कपडे काढून टब भर पाणी घेऊन त्यात आंघोळ कारणे हा नयनाचा एक छंद होता. तिच्या घरात अंगाभोवती काही तरी गुडाळून तिला गडबडीने अंघोळ करावी लागे. असे टब मध्ये पूर्ण कपडे काढून आंघोळ करताना आपण एखाद्या सिनेमातील नायिका आहोत असे तिला वाटे. तसेच तिथल्या बेडरूम मधील मऊसूत गादीवर झोपायला सुद्धा तिला आवडे. ती त्या गादीवर मग उगाचच काही वेळ झोपून घेई. तिच्या घरी तर तिला सतरंजीवर जमिनीवरच झोपायला लागे.
नयनाच्या नेहमी मनात येई ..किती छान राहतात ही माणसे ? आपल्याला असे कधी राहायला मिळेल का ? नयनाने अगदी नक्की ठरवले होते कि आपण एखाद्या रूबाबदार आणि श्रीमंत माणसाशी लग्न करायचे … आपण किती सुंदर आहोत ...कोणीही श्रीमंत माणूस आपल्याशी हसत हसत लग्न करेल ! त्या शिवाय काही आपल्याला हे सुख मिळायचे नाही. शिक्षणात तिला अजिबात स्वारस्य नव्हते तेव्हा ..तिच्याकडे हा एकच मार्ग होता.
तिला एकदम आज सकाळी होण्डावर बसलेला तरूण आठवला आणि तिला खूप म्हणजे खूप लाजल्यासारखे झाले.

नयना दुपारी घरी जाताना आई बरोबर जात असे . तरी तिरक्या नजरेने तिने आज सकाळी दिसलेला मुलगा दिसतो का ते ती पहात होती . पण तो काही तिला दुपारी दिसला नाही . दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तो नयनाला दिसला. परत तीच चोरटी नजर भेट . मग हे असेच दोन तीन दिवस चालू राहिले. एकदा तर त्याने तिच्याकडे बघून हसून दाखवले आणि तिच्याकडे बघून हात हलवला. मग एक दिवस तो मुलगा तिच्या मागे मागे मोटारसायकल घेऊन आला . ती कुठे जाते हे त्याने पाहून ठेवले. तिची कामे संपली आणि ती सोसायटीबाहेर आईची वाट पहात उभी होती तेही त्याने हेरून ठेवले. एक दोन दिवसात त्याने नयनाच्या झोपडपट्टीचा पण पत्ता लावला होता. नयना तिरक्या डोळ्याने हे सगळे पहात होती ...काही न बोलून त्याला प्रतिसाद देत होती. त्याने धिटाई करून एकदा आपल्याशी बोलावे आपले नाव विचारावे ...आपले नाव सांगावे असे नयनाला वाटत होते ..ती धिटाई त्याने केली ..पण ती चुकीच्या वेळी.

त्या दिवशी रविवार होता . नयना नेहमी प्रमाणे सकाळी आपल्या कामावर निघाली होती . आज जरा उशीरच झाला होता म्हणून ती जरा गडबडीने निघाली होती. सावंत काकूंकडे आज कोणी पाहुणे येणार होते म्हणून त्यांनी नयनाला लवकर ये असे बजावून ठेवले होते. पण नयनाचा मेकअप लवकर संपला नाही . त्या टपरी पाशी ती आली आणि तो होंडा वरचा मुलगा एकदम तिच्या समोर आला. त्याने आपली मोटारसायकल तिच्या समोर आणून तिचा रस्ता अडवला.
“ आज उशीर झाला का ? मी सोडू का तुला ? माझ्या मोटारसायकलवरून सोडतो तुला …” तो मुलगा मोठ्या धिटाईने म्हणाला .
“नको ,नको ...मी जाते ...माझी वाट सोडा ..” नयना जरा भांबावून म्हणाली .
“ तुझे नाव तरी सांग कि ! माझे नाव प्रताप आहे ..” तो म्हणाला आणि तो नयनाच्या अजून थोडा जवळ आला. नयना थोडी मागे सरकली ..प्रताप ने आपली मोटारसायकल परत थोडी पुढे आणली.
“ नयना.. नयना नाव आहे माझे ...पण आता मला जाऊ द्या …” नयना म्हणाली आणि ती पुढे जायला लागली . तेव्हड्यात तिने बघितले कि तिचा भाऊ रघु मागून येत होता त्याने हे बघितले होते आणि तो पळत पळत पुढे आला.
“ ए ! ! ए ! काय लावले आहे ? बहिणीला छेडतो का माझ्या ?...” असे म्हणत त्याने प्रतापची मान धरली . तिचा हा भाऊ जरा आडदांड होता. कुस्ती खेळायचा ….प्रताप एकदम मागे सरकला ..त्या गडबडीत त्याची मोटारसायकल खाली पडली . प्रताप कसाबसा सावरून उभा रहात होता तोच रघूने त्याच्या तोंडावर एक ठोसा ठेऊन दिला .
“ दादा ...दादा ...जरा थांब …” असे म्हणत पुढे येणाऱ्या नयनाकडे दुर्लक्ष करत रघु ने प्रताप ला एक लाथ पण ठेऊन दिली.
“ मी फक्त बोलत होतो ...बोलत होतो ….” असे काही तरी सांगणाऱ्या प्रताप कडे दुर्लक्ष करत रघूने त्याला लाथाबुक्क्याने मारणे चालूच ठेवले. मग प्रतापने पण एक ढोसा ठेऊन दिला . तेवढ्यात झोपडपट्टीत राहणाऱ्या दोने तीन तरुणांनी आपला रघुला कोणी तरी मारतो आहे हे बघून तिकडे धाव घेतली आणि प्रतापला सगळ्यांनी मिळून ठोकायला सुरवात केली. प्रतापने बराच वेळ प्रतिकार केला पण या तीन चार तरुणांसमोर त्याचे काही चालेना. मग त्याने आपली मोटारसायकल तिथेच टाकून पळ काढला.
“ बघून घेतो तुला ...बघून घेतो ….” असे जोरात ओरडून सांगत तो पळून गेला.

हे सगळे विस्फारित नजरेने पहाणाऱ्या नयनाचा हात धरून मग रघूने तिला ओढतच घरी नेले.
“ गप गुमान घरी जा आता ….बाहेर पडशील तर तंगडे मोडीन…” असे म्हणत तो नयनाला घरी घेऊन गेला. नयनाला त्या दिवशी मग नाईलाजाने कामाला सुट्टी द्यावी लागली. नाहीतरी नयनाला रविवारी काम करायचा कंटाळाच यायचा .
प्रताप तिथून पाळला ते त्याने थेट भोसरी गावातील आपले घर गाठले. त्याचा बाप नेहमीसारखा कामावर गेला होता . तो एक उत्तम सुतार होता आणि त्याच्याकडे मोठमोठ्या दुकानाचे फर्निचर करायचे काम यायचे. प्रताप सुद्धा त्याच्या बरोबर काम करी….पण काम करण्यापेक्षा कामाला दांडी मारण्याकडे त्याचा जास्त कल असे. त्यात आईविना वाढवलेला एकुलता एक मुलगा ...त्याचा बाप सुद्धा आपला मुलगा अजून लहान आहे ...मस्ती करायचे त्याचे वय आहे ... या सबबीखाली त्याच्या कामावरच्या दांड्याकडे दुर्लक्ष करी.

प्रतापने आपले कपडे बदलले ...तोंडावर आणि हातापायावर जरा मलमपट्टी केली. जखम कुठे नव्हती पण डोळ्याखालची बरीचशी जागा काळीनिळी झाली होती. त्या नयनाच्या भावाला शिव्या घालतच त्याने कपडे बदलले आणि फ्रीज मधील पेप्सीची एक बाटली उघडून .एक दोन घोट उभ्याउभ्या प्यायल्यावर त्याला जरा बरे वाटले . मग तो सोफ्यावर बसून जरा शांत डोक्याने विचार करायला लागला. पहिल्यांदा त्याची मोटारसायकल त्याला आणायला जायला लागणार होते. किल्ली मोटारसायकललाच होती. तेव्हड्यात तिला कोणी पळवून नेऊ नये म्हणजे झाले. त्याने फोन करून त्याच्या एक दोन मित्रांना ताबडतोब असाल तसे या असा निरोप दिला . मग पेप्सीचा स्वाद घेत घेत तो नयनाचा विचार करायला लागला. चला आज तिचे नाव तरी समजले आणि तिला सुद्धा आपण आवडतो ..हे समजले ते बरे झाले. नाही तर तिने आपले नाव कशाला सांगितले असते? तेवढ्यात तिचा भाऊ कडमडला ….नाही तर आजच तिला मोटारसायकल वरून लांबवर फिरवून आणली असती ...
नयनाची मादक चाल आठवत तो सोफ्यावर बराच वेळ बसून होता.
“ च्यायला काही झाले तरी ही पोरगी गटवायला पाहिजे ….” प्रतापने अगदी निश्चयच केला.

तेव्हड्यात त्याचे मित्र आले आणि त्याचा काळानिळा डोळा पाहून हा परत कुठे तरी मारामारी करून आला आहे हे त्यांना समजले. प्रतापच्या तापट स्वभावामुळे दर पंधरावीस दिवसाने हा कुठे तरी हाणामारी करून येतच असे. नेहमी हा लोकांना मारी आज यालाच कोणीतरी भरपूर हाणलेले दिसत होते.

सगळी हकीकत समजल्यावर ते सगळे जाऊन त्या टपरी पासून प्रतापची मोटारसायकल घेऊन आले. त्या टपरीच्या मालकाने ती नीट रस्त्याच्या कडेला लावून ठेवली होती आणि किल्ली आपल्या ताब्यात ठेवली होती. प्रतापने त्याला शंभर रुपये बक्षीस दिल्यावर तो खुलला आणि प्रतापला त्याने नयनाची माहिती पुरवली. ती कशी उद्यम वाडीतील झोपडपट्टीत राहते..राहुल सोसायटीत ती कसे काम करते आणि रघु नावाचा तिचा भाऊ कसा जरा तापट डोक्याचा पण चांगला मुलगा आहे ...अशी सगळी माहिती प्रतापला मिळाली.

या रघुला आता एकदा चांगली अद्दल घडवायला पाहिजे असा प्रतापने निश्चय केला . पण नयना शी लग्न करायचे त्याने नक्की केले असल्यामुळे आपण जरा बाजूला उभे राहून आपल्या मित्रांकरवी त्याची धुलाई करायची त्याने नक्की करून टाकले. जास्त काही हाणायचे नाही पण अद्दल तर घडवायला पाहिजे.
मग प्रताप आणि त्याचे दोन अगदी जिवलग मित्र कश्या आणि रम्या यांनी जमाना हॉटेल मध्ये बसून दोन तीन दारूच्या बाटल्या संपवत अगदी पूर्ण प्लान केला .
दोन दिवस पाळत ठेऊन त्यांनी रघूची बित्तम बातमी काढली .रघू भोसरी मधील रमाकांत इंजिनीरिंग मध्ये ऑपरेटर होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास कंपनीची बस त्याला मेनरोड पर्यंत सोडत असे आणि मग तो चालत चालत झोपडपट्टी पर्यत जात असे. प्रताप आणि त्याच्या मित्रांनी ठरवले कि त्या दोन तीन बंद पडलेल्या कारखान्यापाशी त्याला गाठायचा ...थोडे आतल्या बाजूला नेवून त्याची धुलाई करायची . नाहीतरी आताशा लवकरच अंधार होतो . आपल्या गाड्या जरा लांबच ठेवायच्या ...कुणाला काही कळायच्या आत मग लगेच पळून जायचे असे ठरले. प्रतापने मात्र जरा लांबूनच हे सगळे पहायचे असे ठरले. तेव्हड्यात रम्याने शक्कल काढली कि आपण रघूला पकडला कि लगेच त्याच्या तोडावर एक मोठी कापडी पिशवी टाकू म्हणजे आपल्याला कोण मारतेय हे त्याला कळणार नाही ...एका कुठल्यातरी नुकत्याच लागलेल्या सिनेमात त्याने असे केलेले बघितले होते.
एके दिवशी संध्याकाळी ..शेवटी कश्या आणि रम्याने ..रघूला त्या बंद पडलेल्या कारखान्यापाशी गाठला . बेसावध असताना त्या दोघांनी रघूला कारखान्याकडे जाणाऱ्या कच्या रस्त्याकडे ढकलले . रम्याने काही कळायच्या आत त्याच्या डोक्यावर पिशवी टाकली आणि त्याच्या पाठीवर आणि छातीवर रट्टे देत ..त्याला बंद पडलेल्या दुसऱ्या कारखान्यापर्यंत आणले. प्रताप जरा मागे होता. सगळे अगदी प्लान प्रमाणे चालले होते ...पण रम्याला आणि कश्याला रघूच्या ताकदीचा अंदाज नव्हता. रघूने पहिल्या धक्यातून सावरताच काही दिसत नसताना सुद्धा जवळ आलेल्या कश्याची मानगूट आपल्या कवेत धरून जोरात आवळली….पैलवान गडी होता तो ..किरकोळ कश्या गुदमरून ओरडायला लागला. त्यातच एक हवेत झाडलेली रघूची लाथ रम्याच्या पोटात बसली आणि तो विव्हळत खाली पडला. रघूने मग आपल्या एका हाताने डोक्यावरची पिशवी काढून फेकली आणि आपली समोर मान धरून ठेवलेल्या कश्यावर आपला पूर्ण जोर लावत त्याचा गळा आवळायला सुरवात केली. कश्याचे डोळे पांढरे झाले….
हे सगळे लांबून पहात असलेल्या प्रतापने मग आपण यात पडायलाच पाहिजे असे ठरवून रघूवर जोरदार मुसंडी मारली . त्या धक्याने रघूने कश्याला सोडले आणि तो धडपडत खाली पडायला लागला. तेवढ्यात जरा सावरलेल्या रम्याने रघूच्या छातीवर एक जोरदार लाथ मारली ..रघू एकदम मागे पडला आणि त्या बंद पडलेल्या
कारखान्याच्या लोखंडी दारावर त्याचे डोके आपटले. एकदम जोरकस आवाज झाला. ...प्रताप ,कश्या आणि रम्याने एकदम दचकून एकदा रघूकडे आणि एकदा आजूबाजूला आपल्याला कोणी पहात नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी साठी पाहिले. रघू लोखंडी दारावर आपटून आता खाली घसरून पडला होता आणि त्याची काही हालचाल नव्हती ...अगदी निपचित पडला होता.
“ बस झाले ..पळा आता ….” प्रताप म्हणाला.
कठीण प्रसंगी सुद्धा डोके शांत ठेवणारा म्हणून रम्या प्रसिद्ध होता ...तो चाहूल घेत रघूजवळ गेला ...तो काही हालचाल करत नाही याची खात्री करत त्याने रघूच्या खिशात हात घालून त्याचे पाकीट काढून घेतले.मग त्या तिघांनी तिथून पळ काढला. आपल्या गाड्या घेऊन ते तिघे वेगवेगळ्या दिशेने गेले. अर्ध्या तासांनी जमाना हॉटेल मध्ये भेटून दारू प्यायची असा त्यांचा बेत आधीच ठरला होता.
ते जेव्हा हॉटेल मध्ये पुन्हा भेटले तेव्हा कश्या सोडला तर बाकी कुणाला फारशी इजा झाली नव्हती . रम्याला पोटात लाथ बसली होती पण तो आता ठीक होता. हॉटेलात येताना त्याने रघूच्या पाकिटातील पैसे काढून पाकीट कुठे तरी टाकून दिले होते.
“ चोरीच्या प्रयत्नात मारा मारी झाली असे वाटायला पाहिजे …..” रम्या म्हणाला.
मग प्रतापच्या आणि रघूच्या पाकीटातील पैशाने भरपूर दारू पिऊन तिघेही आपल्या घरी गेले.

दुसऱ्या दिवशी प्रताप उशिरा उठला होता आणि तो घरीच बसून होता. एक दोन दिवस नयनाला भेटायला जायचे नाही असेच त्याने ठरवले होते. रघूने त्याला अंधारात ओळखणे शक्यच नव्हते पण तरी त्याला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती.

दुपारचे जेवण करून प्रताप आता जरा ताणून द्यावी असे ठरवत असतानाच त्याच्या घराची बेल कुणीतरी वाजवली ...पाठोपाठ दारावर पण कुणीतरी धड धड असे जोरात बडवले. मग परत एकदा बेल वाजली.

“ कुणाला इतकी आग लागली आहे ? आलो ..आलो …” असे म्हणत त्याने दर उघडले तर त्याचा मित्र रम्या धापा टाकत भसकन आत आला. दार धाडकन लावत तो प्रताप ला म्हणाला …
“ घरी बाबा नाहीत ना ? ...ताबडतोब टीवी लाव ...मराठी बातम्या बघ ….सारखी ब्रेकिंग न्यूज दाखवतायत…..लाव लवकर ….”
“ अरे काय झालाय ? तू येवढा घाबरला का आहेस ?” असे म्हणत प्रताप ने टीवी लावला
“ उद्यम वाडीतील ..बंद कारखान्याजवळ खून ...आज सकाळी प्रेत सापडले…..” अशी बातमी परत परत दाखवत होते….
प्रताप डोके धरून खाली सोफ्यावर बसला. रम्या पण अजून उभाच होता. ..काहीवेळाने आपल्या पायातील त्राण गेले आहे असे त्याला वाटायला लागले आणि तो सुद्धा सोफ्यावर मटकन बसला.
थोड्याच वेळात बातम्या वरून त्यांना कळले कि आज सकाळी रघू नावाच्या एका तरुणाचे प्रेत बंद पडलेल्या कारखान्याच्या गेट पाशी सापडले होते. त्या माणसाचे डोके गेट वर जोरात आपटले होते आणि त्या मुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. प्रेत पोस्ट मार्टेम ला नेले होते आणि पोलीस पुढील तपास करत आहेत ….प्रेताची ओळख पटली असून तो जवळच्याच झोपडपट्टीत राहतो अशी पोलिसांना माहिती मिळाली आहे ….

प्रताप आणि रम्या बराच वेळ टीवी कडे टक लावून बघत होते. ..
त्यांच्या डोळ्यासमोर चित्रे हलत होती पण त्यांच्या डोक्यात काहीच शिरत नव्हते.

दोघांच्याही डोक्यात एकच प्रश्न होता ...आता आपण काय करायचं ? आपले आता काय होणार ?
मग रम्या म्हणाला …
“ या कश्याला आता शोधायला पाहिजे. ..फोन लाव त्याला …”
प्रताप ने फोन लावला ...तर कश्या काही कामासाठी भोर ला गेला आहे असे त्याला समजले. आजच्या टीवी वरची बातमी सांगून तू दोन तीन दिवस तिथेच रहा असे त्याला प्रतापने बजावले.
मग तो तिरमिरीत फ्रीज कडे गेला आणि दोन पेप्सीच्या बाटल्या घेऊन आला. पेप्सी पीत पीत प्रताप आणि रम्या सोफ्यावर ..टीवी समोर बसून होते….किती तरी वेळ …

बराच वेळ कोणी काहीच बोलले नाही ...मग रम्या म्हणाला….नेहमी याचे शांत डोके.
“ प्रताप ...हे प्रकरण आता आपल्या हाता बाहेर गेले आहे ...आपल्याला आता एखाद्या वकिलाचा सल्ला घ्यायला पाहिजे. ….”
प्रताप ला अजूनही यातून काही मार्ग निघेल असे वाटत होते. पण आता हे आपल्या बापाला सांगितले पाहिजे असे त्याला वाटू लागले होते. आपला बाप यातून काही तरी नक्की मार्ग काढेल याची त्याला खात्री होती. आपल्या कामा मुळे त्याच्या खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी होत्या ...आणि तो बक्कळ पैसा ही बाळगून होता.

प्रतापने मग बापाला फोन केला ..प्रतापचा बाप विठ्ठलराव एक कुशल सुतार होता. मोठ मोठ्या दुकानाची ..बंगल्याची सगळ्या फर्निचर ची कामे तो घेत असे आणि हातात कला असल्यामुळे आणि आपल्या मेहनती स्वभावामुळे त्याच्याकडे कामे चालत येत असत. त्याने वीस पंचवीस लोकांना आपल्या हाताखाली कामाला ठेवले होते. एका वेळी तीन चार ठिकाणी त्याची कामे चालत असत. नेहमीप्रमाणे तो कामात होता पण प्रतापने फार महत्वाचे काम आहे ..ताबडतोब या असा सूर लावल्यामुळे तो तासाभरात घरी हजर झाला.
“ आता काय भानगड करून ठेवली ? कुठे परत मारामारी केली ?” असे म्हणतच तो आत आला. रम्या आणि प्रताप गंभीर पणे सोफ्यावर बसलेले बघून त्याने प्रतापला प्रश्न केला.
“ किती वेळा सांगितलं ..आता जरा कामात लक्ष दे ...आता बोला धडा धडा ..लई कामे पडलीत मला.”

प्रतापने आणि रम्याने हळू हळू सगळे प्रकरण समजावून सांगितले….विठ्ठलराव एकदम भडकला. प्रतापला एक थोबाडीत द्यावी म्हणून त्याने हात उगारला पण तो क्षणात सावरला ,
“ येव्हडा घोडा झाला आता ...तुला मारून तरी काय होणार ?”
“ प्रताप आणि रम्या मला काल तुम्ही काय काय केले ? किती वाजता घराबाहेर पडला ...कुठे कुठे गेला ...ही मारामारी किती वाजता झाली ...नंतर कुठे गेलात ते अगदी डिटेल मध्ये सांगा ...काही विसरू नका …” बाप आता जरा थंड डोक्याने विचार करायला लागला होता.
सगळे समजावून घेतल्यावर विठ्ठलराव म्हणाला ..
“ रम्या आता तू जा घरी ...आता यावर कुठेही बोलू नको ..कश्याला पण तसेच सांग. आपल्या आई वडिलांना तर यातले काही कळू देऊ नको . जा आता ..मी बघतो काय करायचे ते. ...तुरुंगात खडी फोडायला जायचे नसेल तर ..मी सांगतो तसे करा.”
रम्या खाली मान घालून निघून गेला.
बापाने मग प्रताप समोर उभे राहून त्याला एकच प्रश्न केला ..
“ ही पोरगी नयना ...तुला अगदी म्हणजे अगदी पसंद आहे का ?”
प्रताप एकदम बावचळला ...प्रसंग काय आणि बाप काय विचारतोय ? आता याच्याही डोक्यावर परिणाम झाला कि काय ?
“ नाही म्हंजे आहे खूप चांगली पण ..आमची अजून फार काही ओळख नाही ...पण लई मनात भरली आहे माझ्या ...तिचा भाऊ परवा मध्ये आला नाही तर ..आमची अजून ओळख झाली असती …” प्रताप म्हणाला.
“ लग्न करशील का तिच्याशी ? …” बाप म्हणाला .
प्रताप अगदी खूष झाला .आपल्या बापाबद्दल त्याचा आदर अजून वाढला ...या प्रकरणातून आपला बाप काही तरी मार्ग नक्की काढणार असे त्याला वाटतच होते ...त्यात नयना शी लग्न !
“ हो ..करतो कि ..पण हे प्रकरण तर बंद झाले पाहिजे ?”
“ ते मी काय करायचे ते करतो … आता तुम्ही आपल्या पिंपरीत चालू असलेल्या कामावर हजरी लावा. आज रात्री अकरा पर्यंत अगदी हलू नका तिथून ...जा आता ...काय जीवाला घोर लावून ठेवताय एक एक…..आणि .. मला ही मुलगी कुठे राहती ते सांग ...आणि त्या भावाचे नाव काय ? रघू नाही का ? ! आणि बाप काय करतो तिचा ? ”
प्रताप ने नयनाचा त्याला माहित असलेला झोपडपट्टी चा पत्ता सांगितला. रघू कुठे काम करत होता याची पण माहिती दिली . नयनाचा बाप काय करतो याची प्रतापला काही कल्पना नव्हती .
आपल्याला असलेली माहिती देऊन तो बापाच्या डोळ्यासमोरून सटकला. लगेच त्याने पिंपरीतील कामावर जाऊन काम सुरु केले. आपल्या बापाला काही दिवस तरी त्याला खूष ठेवायला पाहिजे होते.
प्रताप गेल्यावर त्याच्या बापाने तिजोरीतून थोडे पैसे काढून खिशात ठेवले आणि आपली स्कूटर काढून थेट नयनाची झोपडपट्टी गाठली. नयनाची झोपडी शोधायला त्याला कष्ट पडले नाहीत ...तिथे बरीच गर्दी जमली होती. बायकांची बरीच रडारड चालू होती. आपण रघू ला ओळखतो आणि त्याच्या कंपनीत माझी ओळख झाली होती असे सांगून प्रतापचा बाप आत शिरला. आत बरीच गर्दी होती. नयना आणि तिच्या बापाला शोधणे त्याला अवघड गेले नाही . तो त्यांना आतल्या खोलीत घेऊन गेला ...तिथल्या सगळ्या लोकांना बाहेर काढून त्याने नयनाच्या बापाच्या हातावर पन्नास हजार रुपयांचे बंडल ठेवले. नयनाचे आणि तिच्या बापाचे डोळे विस्फारले. इतके पैसे एकदम त्यांनी पहिल्यांदाच पाहिलेले.
“ सगळी नीट व्यवस्था करा मयतीची….मला उद्या रात्री तुम्ही दोघेही येऊन भेटा … अजून काही पैसे लागले तर मला सांगा ..रघू मित्र होता माझा ... हा माझा पत्ता. ” असे सांगून तो तिथून निघाला . जाता जाता नयनाला एका बाजूला बोलावून त्याने सांगितले कि तो प्रतापचा बाप आहे आणि प्रतापची आणि तिची मैत्री त्याला माहित आहे. आपल्या भावाच्या अकस्मिक निधनाने बावचळलेली नयना काही बोलली नाही ..पण या माणसाने आपल्या बापाच्या हातावर ठेवलेले नोटांचे बंडल अजून तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हते.

आपल्याला अजून पैसे मिळतील या आशेने नयना आणि तिचा बाप पांडुरंग ... दुसरे दिवशी रात्री ..विठ्ठलरावचे घर शोधत आले. प्रताप पण घरीच होता. नयना आणि प्रताप एकमेकांकडे बघून लाजले. विठ्ठलरावने त्यांना आमचे घर बघून या असे सांगून आत पिटाळले .

विठ्ठलरावने नयनाच्या बापाला समोर बसवून ...काही दिवसापूर्वी प्रतापला रघूने आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती हे सांगितले. नयनाने ते पहिले आहे हेही सांगितले. दुसऱ्याच दिवशी रघुला मारहाण झाली आणि तो मेला ..याचा आळ प्रतापवर येऊ नये असे काही तरी करायला पाहिजे हे हि सांगितले. पांडुरंग विचारात पडला असे बघताच अजून एक पन्नास हजाराचे बंडल त्याच्या हातात ठेवले.
“ माझा मुलगा ..हकनाक गेला ...आता तुम्हीच माझी काळजी घ्या ….मग माझे काही म्हणणे नाही ….!” असे तो बिलंदर पांडुरंग आता म्हणायला लागला.
तेवढ्यात नयना आणि प्रताप आले.
“ आपण नयना आणि प्रतापचे लग्नच लावून देऊ कि !आता प्रतापला तुमचा मुलगाच समजा !...” विठ्ठलराव धूर्तपणे म्हणाला. नयना पण हे तीन खोल्यांचे घर बघून खूष होती . प्रताप तिला आवडला होताच.
मग त्या सगळ्यांनी मिळून बसून नीट ठरवले. ज्या दिवशी रघूचा खून झाला त्या दिवशी संध्याकाळ पासून प्रताप आणि नयना पुण्यात गेले होते. त्यांनी लग्न ठरवले होते म्हणून ते खूष होते. ते संभाजी पार्क मध्ये गेले ...पाव भाजी एका गाडीवर खाल्ली ...आणि रात्री उशिरा प्रतापने नयनाला घरी सोडले आणि तो मित्रांबरोबर पार्टी करायला जमाना हॉटेल मध्ये गेला.

पुढे काही दिवस पोलिसांनी चौकशी केली ...नयना आणि प्रतापने आपण बरोबर होतो हे सांगितले .नयनाच्या बापाने पण तेच सांगितले.

काहीच धागेदोरे मिळत नाहीत म्हणून शेवटी केस बंद झाली.

एका महिन्याच्या आत नयना आणि प्रतापचे लग्न झाले. नयना आपल्या झोपडपट्टीतील घरातून तीन खोल्यांच्या घरात राहायला गेली. आता तिने आपली सगळी धुण्या भांड्याची कामे सोडली होती. प्रतापच्या घरी कामे करायला दोन तीन बायका होत्या. त्यांच्यावर नयना मालकीणबाई म्हणून डाफरत होती...ती आणि प्रताप महाबळेश्वर ला आठ दिवस हनिमून ला सुद्धा जाऊन आले. नयनाच्या बापाला मधून मधून व्हीस्की ची बाटली जात होती. प्रतापच्या मोटारसायकलवरून जाताना नयना त्याला कवटाळून बसली कि प्रताप एकदम खूष होत असे. लोक आपल्या कडे बघत आहेत हे दिसल्यावर नयना प्रतापच्या कानांना हळूच चावा घ्यायची ..प्रताप खूष व्हायचा ….

नखरेल नयना खूष होती. प्रताप खूष होता ..त्याचा बाप खूष होता...नयनाचा बाप खूष होता ..नयना मधून मधून त्याला पैसे आणून देत होती. ..प्रतापचा बाप केव्हातरी विदेशी दारूची बाटली पाठवत होता. आपला पोरगा सही सलामत सुटला आणि घरात सून आली म्हणून विठ्ठलराव पण खूष होता. रघूच्या आईला बिचारीला केव्हातरी रघू ची आठवण येई ..ती उगीचच आसू गाळी….पण मग आपली नयना चांगल्या घरात पडली म्हणून ती सुद्धा खूष होई.
आपल्यावर काही बालंट आले नाही आणि प्रताप कडून मधून मधून पार्टी उकळता येते म्हणून रम्या आणि कश्या पण खूष होते.

राहता राहिला रघू ..तो बिचारा आपल्या झोपडीत एका फोटोत बसून होता. तो कुणाच्या स्वप्नात यायचा नाही ...कुणाला भूत म्हणून दिसायचा नाही ...म्हणजे तो सुद्धा जिथे कुठे असेल तिथे खूष असावा.

जाता जाता बिचारा रघू सगळ्यांना खूष करून गेला.

नखरेल नयनाचे नखरे आता जास्तच वाढले होते. आपल्यासाठी मेलेल्या आपल्या मोठ्या भावाची तिला फारशी आठवण सुद्धा येत नव्हती .

*********************************************************************************************************

कथालेख

प्रतिक्रिया

साध्या सोप्या भाषेत सांगितलेली छम्मकछल्लोची कथा आवडली.

Jayant Naik's picture

30 Oct 2018 - 7:21 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सतिश म्हेत्रे's picture

30 Oct 2018 - 9:06 pm | सतिश म्हेत्रे

..आपला पत्ता असा आंतरजालावर उघडउघड देवू नये असे आमचा सल्ला.

या पुढे काळजी घेतली जाईल . धन्यवाद.

Jayant Naik's picture

31 Oct 2018 - 11:50 am | Jayant Naik

आता हा पत्ता कसा नाहीसा करता येईल ?

विनिता००२'s picture

31 Oct 2018 - 2:20 pm | विनिता००२

संपादकांना कळवावे. ते करतील डिलिट :)

Jayant Naik's picture

2 Nov 2018 - 9:39 am | Jayant Naik

आपल्या सहकार्याबद्दल आभार.

टर्मीनेटर's picture

31 Oct 2018 - 12:03 am | टर्मीनेटर

छान लिहिली आहे कथा, आवडली.

Sanjay Uwach's picture

31 Oct 2018 - 7:56 am | Sanjay Uwach

छान कथा , आवडली.

श्वेता२४'s picture

31 Oct 2018 - 2:09 pm | श्वेता२४

:)

सविता००१'s picture

1 Nov 2018 - 11:31 am | सविता००१

आवडली कथा

अभ्या..'s picture

1 Nov 2018 - 12:11 pm | अभ्या..

१९९६ च्या आवाज दिवाळी अंकात परफेक्ट शोभली असती कथा, ज्ञानेश सोनारांनी नखरेल नैना अशि चितारली असती की बस्स.

सविता००१'s picture

1 Nov 2018 - 3:08 pm | सविता००१

पटेश

कलम's picture

1 Nov 2018 - 1:34 pm | कलम

.

नखरेल नयना आणि तिचा प्रताप आवडला!

.

Jayant Naik's picture

4 Nov 2018 - 1:53 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. सर्व मिपाकरांना दिवाळीच्या शुभेच्छा.