पाकळी!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
21 Oct 2018 - 11:55 am

सकाळ झाली
कोवळी किरणे अंगावर आली
अन् पाकळ्यांनी हळूच
डोळे किलकिले केले
एक फुलपाखरू बागडतच
पाकळीवर येऊन बसले
अन् मिटलेल्या साऱ्या पाकळ्या
फूल फूल होऊन गेल्या...
किरणांनी न्हाऊन ताज्या झाल्या,
वाऱ्यासंगे डोलू लागल्या,
सुगंध उधळत झुलू लागल्या...
उमलत्या पाकळ्यांना
फुलपाखरांचे थवे
गुदगुल्या करू लागले
अन् हसूहसूं होऊन
पाकळ्या लाजल्या...
सारा दिवस तोच खेळ!

तिन्हिसांजा झाल्या
किरणांनी अलगद दडी मारली
पंख मिटून फुलपाखरांनी
पानाआड दडी मारली...
कोवळी पालवी मिटू लागली...
वाराही मिटून गेल्यागत
चिडीचूप होऊन बसला...
उजेडही मिटून गेला,
अन् दिवसभर डोळे मिटून बसलेल्या
अंधाराला जाग आली...
अचानक अंगावर आलेला
अंधार पाहून घाबरलेल्या
पाकळ्यांनी डोळे मिटून घेतले
मिटूमिटू पाहणाऱ्या नजरा
पेंगाळून गेल्या, अन् सारे रान
मिटून गेलं...

सकाळ झाली की उठून जाऊ
तोवर सगळे मिटून घेऊ...

शहाणं झाड पाकळ्यांना म्हणाले,
अन् फूलफूल झालेल्या पाकळ्या
सगळ्या पुन्हा मिटून गेल्या!!

कविता

प्रतिक्रिया

अन् मिटलेल्या साऱ्या पाकळ्या
फूल फूल होऊन गेल्या...

म्हणजे प्रत्येक पाकळीचं फुल झालं असं अभिप्रेत आहे का ?

मला उत्तर पाहिजे राव , नाहीतर डोक्याला शॉट शॉट बसून राहतील .. हे घ्या

पाषाणभेद's picture

24 Oct 2018 - 8:44 am | पाषाणभेद

गुढता महत्वाची आहे. जे जे पाहीजे ते ते घ्या.