अशी ही बनवाबनवी

Prakashputra's picture
Prakashputra in जनातलं, मनातलं
24 Sep 2018 - 10:10 am

आज व्हाट्सअँप वरती एक मेसेज आला कि 'अशी ही बनवाबनवी' ला ३० वर्षे पूर्ण झाली. ते वाचून मला बनवाबनवीबद्दल काहीतरी लिहावे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. २३ सप्टेंबर १९८८ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या पिक्चरला लोकांनी अफाट प्रेम दिले. हा पिक्चर अफाट गाजला आणि अजूनही गाजतोच आहे. 'Cult Following' असं जे म्हणतात ते या पिक्चरला मिळाले. मी दादा कोंडक्यांच्या जमान्यातला नाही, त्यामुळे त्यांचे चित्रपट किती गाजायचे याचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही, पण त्याबद्दल ऐकून आहे. तेवढेच किंवा जास्तच प्रेम बनवाबनवीला मिळाले. दादांचे चित्रपट आता एवढे बघितले जात नाहीत, पण बनवाबनवी अजूनही कायम बघितला जातो, बाप आपल्या मुलांना त्याची ओळख करून देतो आणि पुढची पिढीपण बनवाबनवीच्या प्रेमात पडती. मी अमेरिकेत शिकायला आलो तेंव्हा Torrent वरून जे काही चित्रपट डाउनलोड करून बघितले त्यात पहिल्यांदा होते ते म्हणजे बनवाबनवी, एकापेक्षा एक, गोलमाल आणि अंगूर. (आतातर सगळंच युट्युबवर उपलब्ध असते, तरीपण कधीकाळी प्रलय आला आणि इंटरनेट नसेल, तर हाताशी असावेत म्हणून या सगळ्या पिक्चरच्या CD /DVD मी साठवून ठेवल्यात.) माझी मुलगी मोठी झाल्यावर, पालकांवर जी नैतिक जबाबदारी असती, ती जबाबदारी मी हे सगळे पिक्चर तिला दाखवून पार पाडलीय.

आत्तासुद्धा जेंव्हा हा लेख मी लिहायला बसलो तेव्हा बनवाबनवीतले प्रसंग आठवून हसू यायला लागले आणि मग बनवाबनवी परत बघायला लागला आणि म्हणूनच लेख पूर्ण करायला वेळ लागला. मी बनवाबनवी पहिल्यांदा केंव्हा बघितला हे मला लख्ख आठवतंय. माझ्या वडिलांची सगळी भावंडे आणि त्यांची सगळी मुले दिवाळीला आजी आजोबांकडे सांगलीला जमली होती. स्वतःहून पिक्चरला जाण्याची परवानगी मागण्याचे वय झाले नव्हते, चोरून जाण्याची अजून सवय लागली नव्हती (ती पुढे लागली आणि त्यावर एक कादंबरीचं होईल), त्यामुळे आम्हाला मोठ्या भावंडांवर किंवा काकांवर अवलंबून राहावे लागायचे. मुंबईचा कॉलेजला असणारा एक चुलतभाऊ सांगलीला आला होता, मग आम्ही त्यालाच खुप गळ घातली आणि तो मग आम्हाला घेऊन गेला. सांगलीला त्यावेळी एकंदर नऊ चित्रपटगृहे होती आणि त्याची सगळी नावे मला त्यावेळी (आणि अजूनही ) पाठ होती. माझी एक गंमतच होती, कुठलं गाव किती मोठे आहे याचा अंदाज मी तिथे किती चित्रपटगृहे आहेत यावरून लावायचो. त्यामुळे एखादा चुलतभाऊ किंवा मामेभाऊ आमचं गाव एवढं मोठं आहे वगैरे सांगू लागला तर मी त्याला तिथे थिएटर्स किती आहेत ते विचारायचो आणि त्या गावाची सांगलीशी तुलना करायचो.

सांगलीला त्यावेळी गावभागातच 'जयश्री' म्हणून थिएटर होते (आता ते पाडून तिथे मोठी इमारत झालीय) आणि बनवाबनवी जयश्रीला लागला होता. आम्ही सगळे दिवाळीचे नवे कपडे घालून बनवाबनवीला गेलो. तुफान गर्दी, तिकिटे ब्लॅकनेच घ्यावी लागली. त्यावेळी बाल्कनीचे तिकीट फक्त ४-५ रुपये होते. बनवाबनवीने त्यावेळी तीन कोटींचा व्यवसाय केला, आजची तुलना केली तर ते जवळपास ७०-८० कोटी होतील. त्यावेळी मला अजून एका गोष्टीचे आकर्षण वाटायचे ते म्हणजे मध्यंतरात मिळणारा वडा-पाव. सांगलीतला वडा मुंबई-पुण्यापेक्षा वेगळा. सांगलीत गोल आणि खुप मोठा वडा मिळायचा. वड्याचा पापुद्रा खुप जाड असायचा. त्या वड्याबरोबर त्रिकोणी पाव मिळायचा. वडा -पावची किंमत फक्त सव्वा रुपया.

तर ती बनवाबनवीशी पहिली ओळख, मग असंख्य वेळेला तो पिक्चर बघितला, मित्रांबरोबर बघितला, नातेवाईक आले कि व्हिडिओ आणून बघितला. गणपतीला आमच्याकडची मंडळे व्हिडिओ आणून किंवा पडद्यावर पिक्चर दाखवायची, तिथे परत बघितला. अमेरिकत आल्यावर जेंव्हा जेंव्हा आपल्या मातीची आणि आपल्या माणसांची ओढ लागायची तेंव्हा तेंव्हा अशा पिक्चरनी आणि गाण्यांनी जीवन सुसह्य बनवले. अमेरिकेत शिक्षण घेत असताना तर दाक्षिण्यात रूममेट्सनासुद्धा बनवाबनवी आवडला होता. आता तर बनवाबनवी युट्युबवर सारखा बघितला जातो.

बनवाबनवी हा निखळ व्यावसायिक पिक्चर आहे, निखळ मनोरंजन, कसला संदेश द्यायची फुशारकी नाही, एक साधीसुधी कलाकृती, पण मनाला भिडणारी. एक गोष्ट खुप जणांना माहित नाही, ती म्हणजे, बनवाबनवी घेतलाय ह्रिषीकेश मुखर्जीच्या 'बीवी और मकान ' या १९६६ च्या चित्रपटावरून. त्यात होते विश्वजीत आणि मेहमूद. पण सचिनने एक सच्ची मराठी कलाकृती बनवलीय. मला डायरेक्टर सचिन हा ऍक्टर सचिनपेक्षा जास्त आवडतो. सचिनचा अभिनय मला थोडा कृत्रीम वाटतो. सचिन अभिनय करताना खूप जास्त प्रयत्न करतोय असं वाटतं. पण बनवाबनवीत सचिनने सुधाचा अभिनय खुप छान केलाय. सुधीरपेक्षा सुधाच्याच भूमिकेत सचिन जास्त रमलाय असं वाटतं. सराफमामांबद्दल काय बोलायचं ? लक्ष्याबरोबरचे किंवा सुधीर जोशींबरोबरचे सराफमामांचे सगळे सीन्स हिट. एक साधारण रूपाचा कलाकार, यथा तथा नाच करणारा, निव्वळ अभिनयाच्या जोरावर किती पुढे जाऊ शकतो हे सराफमामांकडे बघून पटते. सुधीर जोशींनी पुणेरी घरमालक काय रंगवलाय ? त्यांना बघताना आपण पिक्चर बघतोय असं वाटतच नाही, हे प्रत्यक्षात घडतंय असंच वाटतं. राहून राहून असं वाटतं की त्यांचे अजून २-३ सीन्स टाकायला पाहिजे होते.

बनवाबनवीचे संवाद तर तीस वर्षे झाली तरी अजून हिट आहेत. "धनंजय माने इथेच राहतात का ? " , "तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे", "हा माझा बायको, पार्वती ", "हि सुधा, त्याचा बायको", आठवून आठवून हसायला येतं . संवादाबरोबरच काही दृश्येतर कायमची डोळ्यांवर कोरली गेलीत. जेव्हा साडी नेसून लक्ष्या लीलाबाई काळभोरांकडे रिक्षातून जातो आणि जेव्हा तो रिक्षातून उतरतो, ते म्हणजे युद्धाच्या पावित्र्यातच, अशोकला त्याला सांगायला लागतं कि जरा बाईसारखे वाग म्हणून. जेव्हा पार्वतीला बाळ होणार म्हणून सगळे तिला भेटायला जातात तेव्हा पार्वती बिडी ओढत बसलेली असते तो प्रसंग. सचिन लक्ष्याला म्हणतो, "जाऊबाई", तर लक्ष्या म्हणतो, "नका बाई इतक्यात जाऊ". सगळे प्रसंग एकापेक्षा एक. अजूनही हे प्रसंग काही विनोदी गोष्टींसाठी आणि इंटरनेटवर मिम्ससाठी वापरले जातात. जेव्हा पंतप्रधान मोदी इस्त्रायलला चालले, तेंव्हा त्यांना "मधुमेहाचे औषध" आणायला सांगणे. कोर्टाने जेंव्हा समलिंगी संबंधांना मान्यता दिली तेंव्हा धनंजय मानेंचे "हा माझा बायको" हे वाक्य सांगून धनंजय मानेंना किती दूरदृष्टी होती हे सांगणे. या सगळ्या गोष्टीतून हा चित्रपट सतत जिवंत राहतो. मला सचिन, अशोक, लक्ष्याचा "एकापेक्षा एक " पण खुप आवडतो, पण त्याला बनवाबनवीएवढे Cult Following नाही लाभले.

बनवाबनवीला तीस वर्षे झाली, पार्वतीला बाळ झालं असतं तर ते तीस वर्षाचं झालं असतं आणि कदाचित त्यालाही घर शोधण्यासाठी अशीच धडपड करायला लागली असती.

-- प्रकाशपुत्र

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

24 Sep 2018 - 11:28 am | मंदार कात्रे

छान लिहिलं आहेत

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!

गूगलमध्ये सत्तर रुपये असं टाईप करायला जाऊन पाहिल्यास "सत्तर रुपये वारले" अशी टॉप सजेशन दिसेल.

Prakashputra's picture

25 Sep 2018 - 8:01 am | Prakashputra

अरे, खरंच की . आत्ताच Try करुन बघितले . धन्यवाद

प्रसाद_१९८२'s picture

24 Sep 2018 - 12:22 pm | प्रसाद_१९८२

ऑल टाईम फेव्हरेट !

स्वधर्म's picture

24 Sep 2018 - 12:33 pm | स्वधर्म

गेले ते दिवस, असं वाटलं. अापल्या गावाची अाठवण अाली. अाता माधवनगर रोडला मल्टीप्लेक्सही झालंय, पण जयश्री, प्रताप, त्रिमूर्तीची अाठवण अजून येतेच.

मला वाटतं स्टेशन रोडला पण आता मल्टीप्लेक्स झालंय. त्रिमूर्ती आणि स्वरुप खूप मोठी थिएटर्स होती. स्वरूपचे तर नंतर विभाजन करून दोन केली

त्या काळी असा उत्तम चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला खरंच भाग्य लागत.
आम्ही मात्र हा चित्रपट घरी दूरचित्रवाणी वर पहिल्यांदा पहिला होता .त्या नंतर प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा हा चित्रपट लागतो नक्की पाहते .
या चित्रपटातील गाणी खरंच खूप छान आहेत.

मराठी कथालेखक's picture

24 Sep 2018 - 4:05 pm | मराठी कथालेखक

मी फक्त एकदाच पाहिलाय अगदी लहानपणी -मी दहा- बारा वर्षांचा असेन, शेजार्‍यांनी व्हिडिओवर मागवला होता आणि आम्हाला आवर्जुन बोलावले होते.... विनोदी चित्रपटांची फारशी आवड नसल्याने पुन्हा कधी पाहिला नाही. पण आता तुमचा लेख वाचून एकदा पाहीन म्हणतोय.
जाता जाता माझ्या स्मरणशक्तीची चाचणी करुन घेतो.. स्त्रीवेषातील एक पात्र दाढी करत असते आणि ते पाहून कुणा वयस्कर स्त्रीला चक्कर येते असं काहीसं दृष्य आहे का ??

ते बनवाबनवी मधलं नाही.. ते पात्र विजय चव्हाण यांनी रंगवलं होतं _/\_.. चित्रपटाचं नाव लक्ष्यात येत नाही. प्रसंग आठवून मात्र अजूनही हसू येतं.. =)

अनुप ढेरे's picture

25 Sep 2018 - 10:13 am | अनुप ढेरे

मोरुची मावशी या नाटकातला प्रसंग आहे हा बहुधा.

चौकटराजा's picture

24 Sep 2018 - 5:34 pm | चौकटराजा

सर्व गाजलेले मग तो गन्स ऑफ नॅव्हरोन असो वा प्रपन्च, यात एक साम्य असते ते म्हणजे उत्त्म कथा , पटकथा व पात्र योजना .मदर इन्डिया, वक्त, शोले, हम आपके है कौन ई चित्रपट याची साक्ष देतात. बाकी संगीत ,छायाचित्रण, दिगदर्शन हे तर महत्वाचे आहेतच ! अशी ही बनवानवी ची भट्टी जमली आहे ती अशीच !

Prakashputra's picture

25 Sep 2018 - 8:17 am | Prakashputra

हे अगदी खरे आहे. उत्तम कथा, दिग्दर्शन, अभिनय यावर चित्रपट यशस्वी होतो. मग तो एका रूममध्ये चित्रित झाला असेल तरी (उदा. १२ अँग्री मेन )

चौकटराजा's picture

25 Sep 2018 - 10:26 am | चौकटराजा

तुम्हाला " तुम्ही उल्लेखिलेला" सिनेमा आवडला असेल तर मग त्याचाच हिन्दी एक रूका हुआ फैस्ला ही पहा ! यू त्यूब वर आहे ! तसेच मी सांगतो तो एक सिनेमा अजिबात चुकवू नका .. नाव " EXAM" एक रूम, आठ परिक्षार्थी आठ टबले आठ खुर्च्या, आठ कागद , आठ पेन्सिल्ली, एक सम्योजक एक गार्ड व एक घड्याळ बस इतकाच खर्च !

मुक्त विहारि's picture

2 Oct 2018 - 1:27 am | मुक्त विहारि

+ १

ज्योति अळवणी's picture

24 Sep 2018 - 11:31 pm | ज्योति अळवणी

प्लाझाला बघितला होता. घरून खास परवानगी आणि पैसे घेऊन... शाळेतल्या 9 मैत्रिणी गेलो होतो BEST ने. कितीतरी planning करून!

'हे बालगंधर्व न... आणि ह्या मिसेस बालगंधर्व का?' असं अशोक सराफला त्याचा धाकटा भाऊ विचारतो आणि बनवाबनवी सुरू होते ती शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला हसवायलाच!

मजा आली त्या जुन्या आठवणींनी!

अंतु बर्वा's picture

25 Sep 2018 - 1:38 am | अंतु बर्वा

फेवरेट चित्रपट! जेव्ढ्या वेळेस समोर दिसलाय तितक्या वेळेस पाहिलाय. एकदा तुनळीवर वेगळच काहितरी पाहत असताना फक्त रिलेटेड विडिओज मध्ये दिसला म्हणुन ज्या कामासाठी तुनळी उघडली होती ते सोडुन पुर्ण चित्रपट पाहिलाय! पुन्हा पुन्हा पाहिल्यावर खुप गमतीजमती दिसुन येतात. जसे लक्षाने विजु खोटेला सारखं सारखं त्याच झाडावर काय? म्हणणे हे स्क्रिप्टमधे असण्यापेक्शा या मंडळींनी आयत्या वेळी केलेले इंप्रोवाय्जेशन वाटते. पुढच्या पिढीला अशा छोट्या छोट्या संवादातील गंमत कळेल की नाही कुणास ठाउक, पण सध्याच्या पिढीचा बराचसा काळ अशा चित्रपटांनी हलकाफुलका बनवलला हे मात्र खरं!

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे खुप आभार.

आमच्याकडे सचिन, लक्ष्या, अशोक सराफ, महेश कोठारे यांचे या काळातले सिनेमे अगदीतोंडपाठ आहेत. आणि कितीही
वेळा लागले तरी बघितले जातात.गमत जंमत, नवरी मिळे नवर्‍याला पण सचिनचा
अतिशय चांगला सिनेमा आहे.

खट्याळ पाटिल's picture

27 Sep 2018 - 3:50 pm | खट्याळ पाटिल

खूप छान लेख. बनवावी असं चित्रपट पुन्हा होणे नाही ऑल टाईम हिट . तो चित्रपट पाहताना प्रत्येक वेळेस तितकाच आनंद मिळतो. ऑफिस मध्ये पण गप्पा मध्ये अजून हि बनवाबनवी चित्रपट मधील धम्माल किस्से आठवून आणि बोलून खूप हसतो सर्वे.
यातील मित्र मंडळी दाखवली आहे ती सर्वाना आपल्या खऱ्या मित्र सारखीच वाटतात. प्रत्येकाने जवळपास थोडे तरी असे दिवस मित्रां सोबत घालवलेले असतातच. अजून पण वाटते लीला बाई काळभोर चे घर पाषाण ला असावे आणि ते सर्वे मित्रांनी बघावे .

मुक्त विहारि's picture

2 Oct 2018 - 1:23 am | मुक्त विहारि

लेख आवडला

माझा ऑल टाईम फेव्हरीट मराठी चित्रपट. कितीही वेळा बघितला तरी कंटाळा नाही येत.