युरोपच्या डोंगरवाटा ४: ग्रीसच्या क्रिटी बेटावरील समारिया घळ (Samaria Gorge, Crete)

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
29 Aug 2018 - 7:07 am

युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १
युरोपच्या डोंगरवाटा २: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) उर्वरित भाग
युरोपच्या डोंगरवाटा ३: नॉर्वेतील एक अविस्मरणीय बसप्रवास

अनेक जागांची, देशांचीही आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. जसं ग्रीस म्हटलं कि आठवतो तो निळाशार समुद्र, बेटं आणि अक्रोपोलिससारखे प्राचीन अवशेष. ग्रीस हा युरोपातील पर्वतीय देशांपैकी एक असला तरी पर्यटकांमध्ये ग्रीस ट्रेकिंगसाठी विशेष प्रसिद्ध नाही. याला अपवाद म्हणजे ग्रीसचं क्रिटी बेट. ग्रीसच्या अनेक बेटांपैकी क्रिटी हे आकाराने आणि लोकसंख्येनेही सगळ्यांत मोठं. युरोपातील जुन्या मिनोअन संस्कृतीच्या पुरातन वास्तू, तसेच उत्तर आणि पूर्व किनार्‍यांवरचे सागरी पर्यटन ही इथली मुख्य आकर्षणे. त्याचबरोबर पूर्वपश्चिम पसरलेल्या या बेटावरील पर्वतांमधील गुहा, घळी, घाटवाटासुद्धा भटक्यांना खुणावत असतात.

यावर्षी एप्रिल महिन्यात नवर्‍यासह केलेल्या क्रिटीच्या सहलीत पायी भटकंतीसाठी दिवस राखून ठेवले होते. बेटाच्या पश्चिम भागातील Lefká Óri (White Mountains) अर्थात श्वेत पर्वत असं नाव पडलेल्या पर्वतरांगेतील समारिया आणि इम्ब्रोस घळी पाहण्याचा बेत होता. या घळी दक्षिणेकडे समुद्राच्या दिशेने उतरत जातात. क्रिटी बेटाच्या या भागात फिरायला सार्वजनिक वाहतूक चांगली नाही. स्वतःचं वाहन असल्यास बरं पडतं. मुक्कामासाठी आम्ही फ्रांगोकास्टेल्लो (Frangokastello) हे समुद्रतीरावरचं गाव निवडलं होतं.

समारिया घळ ही क्रिटीच्या डोंगरवाटांमध्ये सगळ्यात लोकप्रिय आहे. १३ किलोमीटर लांबीचा समारियाचा ट्रेक साधारणतः मे ते ऑक्टोबर महिन्यांत पर्यटकांसाठी खुला असतो. बहुतेक पर्यटक उत्तर टोकाहून ट्रेक सुरू करून दक्षिण टोकाला पोहोचल्यावर तिथून ३ किमीवर समुद्रकिनारी असलेल्या अगिया रोमेली (Agia Roumeli) गावी येतात. तिथून फेरी बोटीने सोवगिया (Sougia) किंवा स्फाकिया (Hora Sfakion) ला (फेरी बोट, पोहणे किंवा चालणे हेच उपलब्ध पर्याय!) जाऊन पुढचा प्रवास करता येतो.

समारियाचं उत्तर टोक समुद्रसपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. यातला बराच उतार ट्रेकच्या सुरुवातीला असल्याने हा ट्रेक तसा कठिण आहे. या तीव्र उतारानंतरचा घळीचा भाग अधिक सुंदर आहे. त्यामुळे दक्षिण टोकाकडून सुरुवात करून तुलनेने सोपा अर्धा ट्रेक करून परत येणे हा उपाय माझ्यासारख्या थोड्या आळश्यांसाठी आहेच. अर्थात यात अंतर खूप कमी होत नाही आणि दोनदा फेरी बोट घ्यावी लागते.

हिवाळ्यानंतर घळीतलं पाणी कमी झालं की वाटेची डागडुजी करतात. मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्यापासून समारियाचा दक्षिणेचा भाग खुला होतो, असं जालावर वाचलं होतं. २०१७ ची तशी बातमीही वाचली होती. त्यात गेल्या हिवाळ्यात पाऊस जास्त पडला नसल्याने एप्रिल महिन्यात खालचा अर्धाअधिक भाग नक्की पाहता येईल असं वाटत होतं. ट्रेक नाही करता आला तर समुद्रमार्गे छान सहल झाली असतीच.

Heraklion या क्रिटीच्या मुख्य शहराहून १६ एप्रिलला निघालो आणि फ्रांगोकास्टेल्लोला येऊन पोहोचलो. समुद्रतीरी असलेल्या कॅसलमुळे गावाला हे नाव पडलं आहे. चौदाव्या शतकात वेनिशिअन्सनी बांधलेल्या या आयताकृती गढीच्या बाहेरच्या भिंती आणि चार कोपर्‍यांवरचे बुरुज तेवढे सुस्थितीत आहेत.

.

.

फ्रांगोकास्टेल्लो छोटंसं निवांत गाव आहे. मोठ्या रिसॉर्ट्ससारखी इथे पर्यटकांची गर्दी नाही. अर्थात काही न्याहारीनिवास आणि लहान हॉटेल्स सोडल्यास इथे फार सोयीही नाहीत. आजूबाजूच्या इतर गावांचीही हीच कथा आहे. क्रिटीच्या या भागात बरेच पर्यटक हानियाहून (Chania) एका दिवसाच्या सहलीसाठी येतात. अनेक टूर कंपन्यांच्या समारिया, इम्ब्रोससाठी तश्या सहली आहेत. आम्हाला दोन्ही ठिकाणी जायचं असल्याने तिकडे राहणं जास्त सोयीचं होतं.

आम्ही बुकिंग केलेल्या निवासात पोहोचलो तर तिथल्या मालकिणबाईंचं म्हणणं पडलं की आज काही कोणी नवीन गेस्ट येणार नाहियेत, तुमचं इथे बुकिंग नसेल!! त्यांच्याच नावाने आलेली इमेल बघायलाही तयार नव्हत्या. त्या आम्हाला कटवायलाच बघत होत्या. त्यांच्या हेकटपणामुळे डो़कं तापायला लागलं होतं. पण दुसरी सोय करणं ही सोपं नव्हतं. बाबापुता केल्यावर त्यांच्या रजिस्टरमधे बुकिंगची नोंद शोधायचं नाटक सुरू झालं. शेवटी समोर दिसणारं नाव त्यांना दाखवल्यावर सॉरी म्हणणं दूरच उपकार केल्यासारखी एकदाची किल्ली मिळाली. एवढी वाईट वागणूक ग्रीसमध्ये कधी मिळालेली नाही.

दोनतीन दिवसांच्या मुक्कामात मालकिणबाईंचा नूर बदलला नाही. पण ती कसर त्यांच्या मुलीने आणि वयस्कर यजमानांनी मात्र भरून काढली. त्या दोघांशी मस्त गप्पा झाल्या. मालकिणबाईंच्या यजमानांनी मर्चंट नेव्हीत खलाश्याचं काम केलं होतं. त्यामुळे इंग्रजी छान बोलता येत होतं. भारतातील मुंबई, विशाखापट्टण, कांडला अश्या अनेक बंदरांनाही त्यांनी भेटी दिलेल्या. ती नोकरी सोडल्यावर त्यांना प्रथमच भारतीयांशी बोलायला मिळत होतं, त्यामुळे ते भरभरून बोलत होते. सत्तरऐंशीच्या दशकांतले, जग जवळ येण्यापूर्वीचे त्यांचे अनुभव, आठवणी ऐकायला मिळणं ही पर्वणी होती. हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञानातील त्यांचा रस पाहून त्याकाळी कुणीतरी भेट दिलेलं भगवद्गीतेच्या इंग्रजी भाषांतराचं पुस्तकही आम्हाला दाखवलं. मग भारत आणि ग्रीसचे प्राचीनत्व, संस्कृती ते राजकारण, आर्थिक स्थिती अश्या अनेक विषयांवर संध्याकाळी गप्पा रंगत.

समारियाला जाता येईल की नाही, ही शंकाही त्यांनी दूर केली. अर्धा भाग नक्कीच खुला आहे, असं त्यांनी सांगितलं.

समारियाला केलेला भोज्जा

१८ एप्रिलला संपूर्ण ग्रीसमध्ये फेरी बोटी चालवणार्‍यांचा संप होता. समारियासाठी फेरीने जायचं असल्याने १७ ला समारिया आणि १८ ला इम्ब्रोसला जाणं भाग होतं. एप्रिल महिन्यात दिवसाला दोनच फेरी असल्याने १७ तारखेला स्फाकियाहून सकाळी साडेदहाच्या पहिल्या फेरीने अगिया रोमेलीला जाऊन ट्रेक करून संध्याकाळी पाचच्या फेरीने परत यायचं होतं. सकाळची फेरी चुकू नये म्हणून जरा लवकरच न्याहारीला गेलो. पण ग्रीसमध्येही खूपदा सुशेगात कारभार असतो. त्यामुळे व्हायचा तो उशिर झालाच. गाडीने स्फाकियाला आलो तेव्हा फेरी सुटायला पाच मिनिटं होती. धावतपळत जाऊन तिकिट काढलं. समारिया स्पेशल नावाने परतीचं थोडं स्वस्त तिकिट होतं. ते काढताना समारियाला जाता येईल ना असं विचारल्यावर तिथल्या बाईंनी गावापर्यंत जाता येईल असं सांगितलं. पण नक्की कुठलं गाव ते त्या सांगेनात. मनात पाल चुकचुकली. कारण घळीत एक ओसाड पडलेलं समारिया नावाचंच गाव आहे. तिथपर्यंत की अगिया रोमेलीपर्यंत हे कळेना. मागे रांगेत आणखी लोक होते. त्यामुळे जास्त विचारताही आलं नाही.

अगिया रोमेली आणि वाटेतील लोट्रो या गावांसाठी फेरी हेच वाहतुकीचं साधन आहे. त्यामुळे पर्यटकांच्या बरोबरीने स्थानिक लोकही खूप होते. या गावांचं सगळं सामान (एक वॉशिंग मशिन आणि काही फर्निचर दिसलं), भाजीपाला वगैरे फेरीने आणला जातो. (कचर्‍याच्या विल्हेवाटीची सोय नसल्याने तोही लोट्रोत बोटीवर चढवला गेला.) एकदाचं सगळं सामान आणि गाड्या बोटीवर चढल्या आणि बोटीने धक्का सोडला.

पुढचा वेळ खारी हवा खात आणि किनारपट्टी बघत मजेत गेला. वाटेत लोट्रोला थांबा होता. इथे बरेच लोक उतरले. डोंगर आणि समुद्राच्या मधल्या टिचभर जागेत असलेलं हे गाव पर्यटकांत प्रसिद्ध व्हायला लागलं आहे. स्फाकिया, लोट्रो आणि रोमेलीला जोडणारी समुद्राच्या कडेने जाणारी वाट आहे. मी तेवढी जीवावर उदार झालेली नसल्याने तो ट्रेक करायची कल्पनाही मनात आली नाही.

.

अगिया रोमेली जवळ आलं आणि समारियाचे डोंगर दिसायला लागले. थोडं धुकं होतं, तरीही भव्यता नजरेत भरत होती. गावापासून घळीपर्यंत बरंच चालत जावं लागतं. बोटीतून उतरल्यावर कोणत्या दिशेने जायचं हे कुणी सांगायची गरज नव्हती. ट्रेक करायला़ आलेल्या इतर प्रवाश्यांप्रमाणे आम्हीही गावाकडे न जाता घळीच्या दिशेने चालायला सुरूवात केली.

.

बरोबर थोडा कोरडा खाऊ होता. पण आणखी काहीतरी खायला घ्यायचं होतं. वाटेतल्या एकमेव सुरू असलेल्या हॉटेलच्या उपहारगृहातही सँडविच वगैरे बरोबर नेण्यासारखं काही नव्हतं. जेवणात वेळ घालवायचा नव्हता. फार भूकही नव्हती. मग एका ऑम्लेटची ऑर्डर दिली. कुक कम मालकिणबाई किचनकडे वळल्या आणि मालकांशी बोलणं सुरू झालं. ट्रेक करून संध्याकाळच्या फेरीने परत जायचंय, म्हणून आम्ही घाईत आहोत कळल्यावर त्यांनी समारियाचा ट्रेक अजूनही बंद असल्याचं सांगितलं. ट्रेकसाठी येणारे लोक रोज निराश होऊन परत जात होते.

असं व्हायची शक्यता गृहित धरलीच होती. आता काय हातात बराच वेळ होता. हे हॉटेल थोडं उंचावर बांधलेले होतं, त्यात आम्ही पहिल्या मजल्यावर टेरेसवर बसलो होतो. त्यामुळे समोर थोडा दूर समुद्र आणि डावीकडे डोंगर आणि उंच कडे असं मस्त दृश्य दिसत होतं. तेवढ्यात आलेल्या ऑम्लेटची चव चाखली आणि आणखी एक ऑम्लेट आणि संत्र्याच्या रसाची ऑर्डर दिली. खाऊन झाल्यावर कॉफी पित निवांत गप्पा मारत बसलो. मालकही आले मग गप्पा मारायला. त्यांनी आधी सैन्यात आणि मग बोटीवर काम केलं होतं. त्यांनाही भारताबद्दल उत्सुकता होती. आम्हाला एवढं लांब आलोय तर किमान समारियाचं बंद गेट तरी बघायचं होतं. म्हणून शेवटी तिथून निघालो. मालकांनी परत जाताना त्यांच्याबरोबर कॉफी प्यायला यायचं आग्रहाचं आमंत्रण दिलं. शिवाय बरोबर पिशवीत घालून चार संत्री दिली. का? तर आम्हाला यायला वेळ नाही मिळाला किंवा नेमके ते तेव्हा बाहेर गेले तर कॉफी प्यायची राहून जाईल. त्यांचा आग्रह मोडवेना. कॉफी प्यायला नक्की येऊ असं सांगून निघालो.

छोट्या का असे ना ट्रेकची सुरूवात झाली. व्यवस्थित दगडात बांधलेली वाट होती. दहाएक मिनिटांनी वाट नदीच्या कडेने जायला लागली. पाणी अगदी कमी होतं. पाण्यापलीकडचा ताशीव कडा मात्र अंगावर येत होता.

.

.

मधेच काही घरं लागली. कुंपणांच्या आड जुने ऑलिव्हचे वृक्ष होते. जागा मिळेल तिथे फुलं फुलली होती. आता हलका चढ सुरू झाला होता. थोडं पुढे एका चर्चचा बोर्ड दिसला. डोंगराच्या कपारीत लहानसं चर्च होतं. एवढी जागा असताना तिथे चर्च का बांधलं असेल कुणास ठावूक!

.

.

घळीची रुंदी कमी होऊ लागली आणि एकदाचं समारियाच्या बंद गेटपाशी येऊन पोहोचलो. माहितीचा बोर्ड लावला होता. आत तिकिट खिडकी दिसत होती. गेटबाहेर एक कॅफे आहे, तिथे साफसफाई सुरू होती. उगाच दमल्यासारखं करून जरा वेळ बसलो. थोडे फोटो काढले आणि तिथून निघालो.

.

.

.

.

रमतगमत ठरल्याप्रमाणे कॉफी प्यायला गेलो. गोडसर चवीचा पाव, आम्ही एराक्लिओनहून आणलेल्या कुकीज आणि कॉफी बरोबर पुन्हा गप्पा रंगल्या. क्रिटी बेटावर पर्यटनाला कशी सुरूवात झाली, वेगवेगळ्या देशांतील पर्यटकांच्या तर्‍हा, आमचे युरोपातील अनुभव, युरोपियन युनिअन, ग्रीसचं अर्थकारण असे एकेक विषय निघत होते. पाय निघत नव्हता, पण फेरीच्या वेळेआधी निघणं भाग होतं.

धक्क्यावर गर्दी बरीच होती. पाच वाजता एक बोट आली, ती अगदी लहान होती. बोटीपाशी गेल्यावर कळलं ती आमची बोट नव्हती. धक्क्यावर लाटांचं पाणी उसळत होतं. लाटांचा अंदाज घेऊन आम्ही दोघं आणि आणखी दोनतीन जण परत जात असताना नेमकी पोटातली लाट आली आणि भिजवून गेली. बेटावर येऊनही समुद्रस्नान व्हायचं होतं ते झालं एकदाचं. बुटात पाणी भरलं होतं. ते काढून वाळत ठेवले. बोटीचा पत्ता नव्हता, बोटीशिवाय तिथून निघायचा दुसरा मार्ग नव्हता. बायको आहे लक्ष द्यायला म्हटल्यावर नवर्‍याने मस्त झोप काढली. दीस तास उशिराने बोट आली. तोपर्यंत आधी वाट पाहणं, मग त्रागा, फेरी कंपनीवरचा (आणि नवर्‍याला झोप कशी लागते याचा) राग, थोडीशी काळजी, मग आपल्या हातात (नवर्‍याची झोपमोड करण्याशिवाय) काहीच नाही हा हताशपणा अशी स्टेशनं घेत मन जगन्मिथ्या पर्यंत पोहोचलं होतं :)

परतीच्या प्रवासात सकाळी धुक्यात दडलेले डोंगर बघण्यात वेळ गेला. क्वचित कुठे एखादी पुळण दिसत होती, मोठे बीच नव्हतेच. स्फाकियाला उतरून गाडीने कास्टेल्लोला आलो.

.

.

.

एक लांबलचक दिवस संपला. त्याआधी रूममधून हॉटेलच्या पाळलेल्या कुत्र्याने कपडे पळविण्याचं उपनाट्यही घडलं. ट्रेक करता आला नाही तरी या आठवणींमुळे समारिया लक्षात राहील.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Aug 2018 - 8:20 am | प्रचेतस

उत्तम लिहिलंय.
समारिया घळीबद्दल पहिल्यांदाच ऐकलं.

सिरुसेरि's picture

29 Aug 2018 - 10:45 am | सिरुसेरि

छान वर्णन आणी फोटो . पुभाप्र .

अनिंद्य's picture

29 Aug 2018 - 11:19 am | अनिंद्य

@ निशाचर,

खूप दिवसांनी लिहिलंत.
ग्रीसची सफर मस्त झाली दिसते आहे, क्रिटी इज अ क्यूटी.

कुत्र्याने कुणाचे कपडे पळविल्याचे याआधी कधी ऐकले नाही :-)

पुढील भाग लवकर येतील या अपेक्षेत,

अनिंद्य

क्रिटीला क्युट म्हणण्यापेक्षा 'राकट देशा, कणखर देशा' म्हणणं जास्त योग्य ठरेल :)

पुढचा भाग इम्ब्रोस वर लिहीत आहे. यावर्षी अजूनतरी इतर ट्रेकिंग झालेलं नाही. त्यामुळे सध्या ट्रेक्सवर लिहायचा प्लॅन नाही.

अनिंद्य's picture

30 Aug 2018 - 11:11 am | अनिंद्य

जय हो !

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2018 - 1:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लिहिलंय !

यशोधरा's picture

29 Aug 2018 - 9:17 pm | यशोधरा

लिखाण आवडलं.

निशाचर's picture

29 Aug 2018 - 10:16 pm | निशाचर

प्रचेतस, सिरुसेरि, अनिंद्य, डॉ म्हात्रे आणि यशोधरा, आपणा सर्वांचे प्रतिसाद दिल्याबद्दल आभार!

चारही भाग वाचले, मस्त लिहित आहात. फोटो पण छान आहेत पहिल्या भागातील आणि नॉर्वे बस प्रवासातले फोटो विशेष आवडले.

कुमार१'s picture

30 Aug 2018 - 2:50 pm | कुमार१

आवडली.

टर्मीनेटर आणि कुमार१, धन्यवाद!

दुर्गविहारी's picture

31 Aug 2018 - 3:11 pm | दुर्गविहारी

खुपच छान लिखाण, बर्याच दिवसांनी आले. अजिबात माहिती नसलेल्या ठिकाणाची ओळख झाली.
बाकी गेस्टहाउसचा अनुभव कटु म्हणावा लागेल.
समारीयाच्या माझ्यासारख्याला जायलाच हवे..

निशाचर's picture

1 Sep 2018 - 3:59 am | निशाचर

फारश्या प्रसिद्ध नसलेल्या काही ठिकाणांची ओळख व्हावी, हा एक हेतू आहेच लिहिण्यामागे.

समारीयाच्या माझ्यासारख्याला जायलाच हवे..

नक्कीच आवडेल तुम्हाला समारिया.

अथांग आकाश's picture

12 Sep 2018 - 1:10 am | अथांग आकाश

अनवट वाटांवरील भटकंती आवडली.

road

निशाचर's picture

14 Sep 2018 - 12:28 am | निशाचर

धन्यवाद, अथांग आकाश!

सोन्या बागलाणकर's picture

20 Sep 2018 - 3:53 am | सोन्या बागलाणकर

लेख आवडला . वाचताना मीना प्रभूंच्या तुर्कनामा, दक्षिणरंग वगैरे पुस्तकांची राहून राहून आठवण आली.
तुमची आणि त्यांची लेखनशैली बरीच मिळती जुळती आहे.
तुम्ही एखादं प्रवासवर्णन का नाही प्रकाशित करत?

तुमच्या प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी धन्यवाद!