युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १
युरोपच्या डोंगरवाटा २: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) उर्वरित भाग
युरोपच्या डोंगरवाटा ३: नॉर्वेतील एक अविस्मरणीय बसप्रवास
अनेक जागांची, देशांचीही आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. जसं ग्रीस म्हटलं कि आठवतो तो निळाशार समुद्र, बेटं आणि अक्रोपोलिससारखे प्राचीन अवशेष. ग्रीस हा युरोपातील पर्वतीय देशांपैकी एक असला तरी पर्यटकांमध्ये ग्रीस ट्रेकिंगसाठी विशेष प्रसिद्ध नाही. याला अपवाद म्हणजे ग्रीसचं क्रिटी बेट. ग्रीसच्या अनेक बेटांपैकी क्रिटी हे आकाराने आणि लोकसंख्येनेही सगळ्यांत मोठं. युरोपातील जुन्या मिनोअन संस्कृतीच्या पुरातन वास्तू, तसेच उत्तर आणि पूर्व किनार्यांवरचे सागरी पर्यटन ही इथली मुख्य आकर्षणे. त्याचबरोबर पूर्वपश्चिम पसरलेल्या या बेटावरील पर्वतांमधील गुहा, घळी, घाटवाटासुद्धा भटक्यांना खुणावत असतात.
यावर्षी एप्रिल महिन्यात नवर्यासह केलेल्या क्रिटीच्या सहलीत पायी भटकंतीसाठी दिवस राखून ठेवले होते. बेटाच्या पश्चिम भागातील Lefká Óri (White Mountains) अर्थात श्वेत पर्वत असं नाव पडलेल्या पर्वतरांगेतील समारिया आणि इम्ब्रोस घळी पाहण्याचा बेत होता. या घळी दक्षिणेकडे समुद्राच्या दिशेने उतरत जातात. क्रिटी बेटाच्या या भागात फिरायला सार्वजनिक वाहतूक चांगली नाही. स्वतःचं वाहन असल्यास बरं पडतं. मुक्कामासाठी आम्ही फ्रांगोकास्टेल्लो (Frangokastello) हे समुद्रतीरावरचं गाव निवडलं होतं.
समारिया घळ ही क्रिटीच्या डोंगरवाटांमध्ये सगळ्यात लोकप्रिय आहे. १३ किलोमीटर लांबीचा समारियाचा ट्रेक साधारणतः मे ते ऑक्टोबर महिन्यांत पर्यटकांसाठी खुला असतो. बहुतेक पर्यटक उत्तर टोकाहून ट्रेक सुरू करून दक्षिण टोकाला पोहोचल्यावर तिथून ३ किमीवर समुद्रकिनारी असलेल्या अगिया रोमेली (Agia Roumeli) गावी येतात. तिथून फेरी बोटीने सोवगिया (Sougia) किंवा स्फाकिया (Hora Sfakion) ला (फेरी बोट, पोहणे किंवा चालणे हेच उपलब्ध पर्याय!) जाऊन पुढचा प्रवास करता येतो.
समारियाचं उत्तर टोक समुद्रसपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. यातला बराच उतार ट्रेकच्या सुरुवातीला असल्याने हा ट्रेक तसा कठिण आहे. या तीव्र उतारानंतरचा घळीचा भाग अधिक सुंदर आहे. त्यामुळे दक्षिण टोकाकडून सुरुवात करून तुलनेने सोपा अर्धा ट्रेक करून परत येणे हा उपाय माझ्यासारख्या थोड्या आळश्यांसाठी आहेच. अर्थात यात अंतर खूप कमी होत नाही आणि दोनदा फेरी बोट घ्यावी लागते.
हिवाळ्यानंतर घळीतलं पाणी कमी झालं की वाटेची डागडुजी करतात. मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्यापासून समारियाचा दक्षिणेचा भाग खुला होतो, असं जालावर वाचलं होतं. २०१७ ची तशी बातमीही वाचली होती. त्यात गेल्या हिवाळ्यात पाऊस जास्त पडला नसल्याने एप्रिल महिन्यात खालचा अर्धाअधिक भाग नक्की पाहता येईल असं वाटत होतं. ट्रेक नाही करता आला तर समुद्रमार्गे छान सहल झाली असतीच.
Heraklion या क्रिटीच्या मुख्य शहराहून १६ एप्रिलला निघालो आणि फ्रांगोकास्टेल्लोला येऊन पोहोचलो. समुद्रतीरी असलेल्या कॅसलमुळे गावाला हे नाव पडलं आहे. चौदाव्या शतकात वेनिशिअन्सनी बांधलेल्या या आयताकृती गढीच्या बाहेरच्या भिंती आणि चार कोपर्यांवरचे बुरुज तेवढे सुस्थितीत आहेत.
समारियाला केलेला भोज्जा
१८ एप्रिलला संपूर्ण ग्रीसमध्ये फेरी बोटी चालवणार्यांचा संप होता. समारियासाठी फेरीने जायचं असल्याने १७ ला समारिया आणि १८ ला इम्ब्रोसला जाणं भाग होतं. एप्रिल महिन्यात दिवसाला दोनच फेरी असल्याने १७ तारखेला स्फाकियाहून सकाळी साडेदहाच्या पहिल्या फेरीने अगिया रोमेलीला जाऊन ट्रेक करून संध्याकाळी पाचच्या फेरीने परत यायचं होतं. सकाळची फेरी चुकू नये म्हणून जरा लवकरच न्याहारीला गेलो. पण ग्रीसमध्येही खूपदा सुशेगात कारभार असतो. त्यामुळे व्हायचा तो उशिर झालाच. गाडीने स्फाकियाला आलो तेव्हा फेरी सुटायला पाच मिनिटं होती. धावतपळत जाऊन तिकिट काढलं. समारिया स्पेशल नावाने परतीचं थोडं स्वस्त तिकिट होतं. ते काढताना समारियाला जाता येईल ना असं विचारल्यावर तिथल्या बाईंनी गावापर्यंत जाता येईल असं सांगितलं. पण नक्की कुठलं गाव ते त्या सांगेनात. मनात पाल चुकचुकली. कारण घळीत एक ओसाड पडलेलं समारिया नावाचंच गाव आहे. तिथपर्यंत की अगिया रोमेलीपर्यंत हे कळेना. मागे रांगेत आणखी लोक होते. त्यामुळे जास्त विचारताही आलं नाही. अगिया रोमेली आणि वाटेतील लोट्रो या गावांसाठी फेरी हेच वाहतुकीचं साधन आहे. त्यामुळे पर्यटकांच्या बरोबरीने स्थानिक लोकही खूप होते. या गावांचं सगळं सामान (एक वॉशिंग मशिन आणि काही फर्निचर दिसलं), भाजीपाला वगैरे फेरीने आणला जातो. (कचर्याच्या विल्हेवाटीची सोय नसल्याने तोही लोट्रोत बोटीवर चढवला गेला.) एकदाचं सगळं सामान आणि गाड्या बोटीवर चढल्या आणि बोटीने धक्का सोडला. पुढचा वेळ खारी हवा खात आणि किनारपट्टी बघत मजेत गेला. वाटेत लोट्रोला थांबा होता. इथे बरेच लोक उतरले. डोंगर आणि समुद्राच्या मधल्या टिचभर जागेत असलेलं हे गाव पर्यटकांत प्रसिद्ध व्हायला लागलं आहे. स्फाकिया, लोट्रो आणि रोमेलीला जोडणारी समुद्राच्या कडेने जाणारी वाट आहे. मी तेवढी जीवावर उदार झालेली नसल्याने तो ट्रेक करायची कल्पनाही मनात आली नाही.
वाचने
10821
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम लिहिलंय.
छान वर्णन आणी फोटो .
@ निशाचर,
क्रिटीला क्युट म्हणण्यापेक्षा
In reply to @ निशाचर, by अनिंद्य
जय हो !
In reply to क्रिटीला क्युट म्हणण्यापेक्षा by निशाचर
मस्तं लिहिलंय !
लिखाण आवडलं.
आभार
चारही भाग वाचले, मस्त लिहित आहात.
मस्त भ्रमंती
टर्मीनेटर आणि कुमार१, धन्यवाद
खुपच छान लिखाण, बर्याच
धन्यवाद!
In reply to खुपच छान लिखाण, बर्याच by दुर्गविहारी
अनवट वाटांवरील भटकंती आवडली.
धन्यवाद, अथांग आकाश!
In reply to अनवट वाटांवरील भटकंती आवडली. by अथांग आकाश
भारी!!
तुमच्या प्रतिसादासाठी आणि
In reply to भारी!! by सोन्या बागलाणकर