आभाळ

शब्दवेडी's picture
शब्दवेडी in जनातलं, मनातलं
18 Aug 2018 - 6:36 pm

तुझ्याविना घर खायला उठतं मला. तू असताना जांभळीच्या पांनातून येणारं वारं सोबत शहारे घेऊन येतं आणि तू नसताना, मनाला कापरं भरवतं. तू नसल्याच्या जाणीवेनी माझा भूप भैरवी बनतो आणि मागे उरतात फक्त काही आर्त स्वर – काळीज चिरत जाणारे.

तुला कितपत कळेल माझी भाषा, माझी आर्तता, माझ्या भावना, नाही माहिती मला. तरीपण तुला सांगावासं वाटतं, तू माझा आधार आहेस. माझं आभाळ आहेस. म्हणशील मला तू खुळचट आणि विचारशील “अगं वेडे, आभाळ कधी आधार देऊ शकतं का?” इतरांना नाही देऊ शकणार कदाचित पण तू आहेस माझं आभाळ आणि आधारपण!

लोकांना जगण्यासाठी डोक्यावरती छप्पर लागतं, एक निवारा लागतो, चार भिंती लागतात. तू नाही बनु शकणार माझा निवारा कदाचित पण माझ्यासारख्या आकाशात उंच भरार्‍या घेण्याची स्वप्न पाहणार्‍या रंगीत पक्ष्याला, तुझासारखं आभाळच हवं; आणि मग तुझा आधार वाटतो! माझा भावी निवारा कदाचित माझा आधार नाही होऊ शकणार. पण माझ्यापासून विरक्त राहूनही माझ्या सतत बरोबर राहणारा तू विरळाच....

खूप वर्षांनी जेव्हा माझी गात्रं थकतील, तेव्हाही माझ्यासाठी तूच असशील, हात पसरून उभा, मला कवेत घेणासाठी. आणि म्हणूनच आज सगळं काही संपूनही तू माझा आहेस, आणि राहशील माझाच – मी तुझ्यात विलीन होईपर्यंत!

-स्वतेजा अडावदकर

कथालेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Aug 2018 - 7:25 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.

शब्दवेडी's picture

2 Sep 2018 - 10:11 am | शब्दवेडी

आभार प्रचेतस!

जव्हेरगंज's picture

2 Sep 2018 - 5:35 pm | जव्हेरगंज

फारच उत्तम!!!

लिहा अजून...!

श्वेता२४'s picture

7 Sep 2018 - 2:06 pm | श्वेता२४

दुनियादारीतील स्वप्निल जोशी व उर्मिला यांच्यात याच अर्थाचा एक संवाद आहे. पण तुम्ही हे विस्ताराने व समर्पक लिहीलंत

लौंगी मिरची's picture

7 Sep 2018 - 6:02 pm | लौंगी मिरची

सुंदर :)