अनुभव सिन्हांचा 'मुल्क'

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
16 Aug 2018 - 8:15 pm
गाभा: 

उत्तरप्रदेशीय हिंदी दिग्दर्शक अनुभव सिन्हांचा चित्रपट 'मुल्क' नुकताच म्हणजे १५ ऑगस्टच्या मुहुर्तावर पाहीला. या चर्चा लेखाचा उद्देश्य चित्रपटातील वैचारीक मांडणीच्या उहापोहाचा आहे. चित्रपटातील रंजकतेची ओळख करुन देणे नाही. चित्रपटाची रंजकता मुल्याच्या दृष्टीने चित्रपटाचे वृत्तपत्रीय रिव्ह्यू माझ्या खालील त्रोटक माहिती पेक्षा अधिक माहिती देणारे आणि रंजक असू शकतात. त्यात उदाहरण म्हणून महाराष्ट्रटाईम्सचा हा रिव्ह्यू वाचण्यास हरकत नसावी.

चित्रपटाची त्रोटक ओळख

वाराणसीच्या मुराद आणि बिलाल या आधीच्या पिढीतील दोन भावांचे आणि त्यांच्या पुढील तरुण पिढीचे कुटूंब. ज्यात मुराद एक सश्रद्ध सकारात्मक विचाराचा वकील त्याच्या पत्नी सोबत रहातो आहे. त्याचा स्वतःचा मुलगा आणि हिंदू असलेली वकील सून 'आरती' परदेशात असतात त्यातील सुन परदेशातून कुटुंबीयांना भेटण्यासाठी परदेशातुन वाराणसीला आली आहे. मुरादचा भाऊ बिलाल - याचे मोबाईल फोन सेवांचे दुकान आहे -बिलालची पत्नी , मुलगी आणि नंतर अतीरेकी होणारा बिलालचा मुलगा असे एकुण कुटूंब. यात केवळ बिलालचा मुलगा अतीरेक्यांना सामील होतो आणि पोलीस गोळीबारात मृत्यूमुखी पडतो.

बिलाल स्वतःच्या मोबाईल फोन शॉपमधून सीम कार्ड ओळखपत्रांशिवाय दिली जातात त्याची वेळीच दखल घेण्यास कमी पडतो, सोबतच स्वतःच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी पाकीस्तानातील नातेवाईकांकडून पैसे मागवतो ते पैसे नेमके बाँंब स्फोट होऊन गेल्या नंतर हवालाने त्याला पोहोचतात ते पोलीसांच्या नजरेत येते. बाँब स्फोटापुर्वी त्याचा मुलगा अतीरेक्यांच्या म्होरक्याला दुकानात घेऊन आलेला असतो त्या म्होरक्याला केवळ कर्टसी म्हणून बिलाल त्याच्या स्कुटरवरुन रेल्वे स्टेशन पर्यंत नेऊन पोहोचवतो. एकुण मुराद, बिलाल आणि उर्वरीत कुटूंबाला त्यांच्या मुलाच्या अतीरेकी कारवाया आसपास होऊनही थांगपत्ता नसतो. पण बिलाल निष्काळजीपणामुळे कटाच्या आरोपात पोलीसांकडुन अडकतो. आणि मुस्लीम असलेला पोलीस आधिकारी आणि हिंदू असलेला सरकारी वकील दोघेही एका अतीरेकी कुटूंबसदस्याची शीक्षा संपूर्ण कुटूंबाला देऊ पहात आहेत आणि त्यातून मुरादची हिंदू सून 'आरती' या पुर्वग्रहीत दोषारोपातून उर्वरीत कुटूंबास वाचवते असा हा त्रोटक कथा पटल.

कुटूंबातील एक सदस्य चुकला म्हणजे उर्वरीत सर्व सदस्य दोषी असतीलच असे नाही तसे मुस्लीम किंवा कोणत्याही समाजातील काही लोक मार्ग भरकटले म्हणजे तो संपूर्ण समाज भरकटलेला असतो असे नाही, असा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा करताना दिसतात. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक संघर्षास कारणीभूत होणारे समाजातील काही पुर्वग्रह दूर करणे तर काही प्रश्न चर्चेत आणणे असा अनुभव सिन्हांचा चित्रपट निर्मिती मागचा उद्देश्य असावा.

* नेहमी प्रमाणे मी मागून पुढे या दिशेने चित्रपटाच्या कथासूत्रातील वैचारीक मांडणीचा उहापोह करु इच्छितो.

चित्रपटाच्या शेवटी न्यायाधीश आणि त्या आधी कुटूंबाची बाजू कोर्टात सांभाळणारी वकील सून आरती समाजातील पुर्वग्रहांची आणि सामाजिक दरीच्या कारणांची चर्चा करताना दिसतात. न्यायाधीश महोदय सामाजिक दरी वाढवली जाणे या बद्दल विशीष्ट राजकीय पक्षांना जबाबदार धरत नसले तरी निवडणूकांच्या कॅलेंडरकडे निर्देश करुन खापर राजकीय परिस्थितीवर फोडताना दिसतात. सामाजिक संघर्ष राजकारणाच्या स्पर्धेत चव्हाट्यावर येतात हे खरे असले तरी जमिनीपातळीवर कुठेतरी आधीपासून असलेल्या पुर्वग्रहीत भेदांनाच एक्सप्लॉईट केले जाऊ शकत असावे. या पुर्वग्रहांना अंशतः सामाजिक अपसमज तर अंशतः काही वेळा ग्रंथप्रामाण्यचे अप्रत्यक्ष प्रभावांचे ते इतर अनेक परिपेक्ष असू शकत असावेत.

यातील आर्थीक आणि राजकीय फायद्यासाठी इस्लामचा गैर उपयोगाकडे न्यायाधीशाचे शेवटचे वक्तव्य लक्ष्य वेधतच नाही असे नाही. पण संबंधीत वाक्य सर्वसामान्य प्रेक्षक श्रोत्याच्या श्रवणातून सहज ओघळून जावे तसे येऊन गेल्यासारखे वाटते.

सोबतच आपापल्या तरुण मुलांवर निटसे लक्ष्य न ठेऊ शकण्या बाबत भाष्य आहे. यात अंशतः तथ्य आहे. जसे की सीम कार्ड ची ओळखपत्रे पुरेशी दिसली नाही की बिलालने अधिक चौकशी करुन संबंधीत सीमकार्डे मोबाईल कंपनीकडून बंद करुन घ्यावयास हवी होती. पण बाकी लक्ष्य ठेवायचे म्हणजे नेमके काय करावयाचे ? तारुण्यात आल्यानंतर व्यक्तीचे आचरण स्वतंत्र आकलनाने व्हावयास सुरवात झालेली असते . हे आकलनातील तर्क चुकू नयेत म्हणून विवीध माध्यमातून मांडल्या जाणार्‍या युक्तीवादांचा विवीध दिशांनी वैचारीक परामर्ष घेतला जाणे अभिप्रेत असावे, पण प्रत्यक्षात विवीध कंपु (फक्त मिपावरचे नव्हे) चर्चाच होणार नाही हे पहातात, झाली तर सुव्यवस्थित समिक्षण, प्रबोधन संबंधीतापर्यंत पोहोचण्यासाठीच्या व्यवस्थेचा अभाव असतो.

अगदी हा चित्रपट आणि त्याचे दिग्दर्शक, मुस्लीम समाजात सखोल सुधारणा अणि प्रबोधनाची गरज समजून आहेत हे चित्रपटातून नीटसे जाणवत नाही. जो काही सामाजिक उपदेश आहे तो वरकरणी भासतो. वरकरणी उपदेश तर अनेक दशकांपासून चालू आहेत. ह्या उपदेशांच्या वरकरणीपणामुळे अपेक्षित प्रभाव पडत नसेल ना, हे दिग्दर्शक महोदयांपर्यंत पोहोचले आहे का? आणि ते चित्रपटातून नीटसे पोहोचते का? याची साशंकता वाटते. कलेची तीन उद्दीष्ट्ये असू शकतात कलेसाठी कला, रंजनासाठी कला, प्रबोधनासाठी कला. या विषयाची नरहर कुरुंदकरानी त्यांच्या साहित्यातून सविस्तर चर्चा केली आहे. कला हे माध्यम प्रबोधनासाठी राबवताना कलेचे पुर्णत्व प्रकट होण्यात ज्या मर्यादा येऊ शकतात, त्या या चित्रप्टात जाणवतात का असे कुठेतरी चित्रपट संपता संपता वाटून जाते.

पोलीसांच्या आणि वकीलांच्या पुर्वग्रहांची आणि अनुचित वर्तनाची चर्चा होते, ती केलीच पाहीजे. पण जसे एखादा समुदाय एकाच ब्रशच्या रंगाने रंगवणे अनुचित असेल, तसे पोलीस आणि वकील एकाच ब्रशच्या स्ट्रोकने रंगवले जाण्यासाठी, हा चित्रपट माध्यम बनणार नाही याची काळजी चित्रपटातून घेतली गेली नाही असे जाणवते. त्यासाठी संबंधीत पोलीस आणि वकीलांसमोरची आव्हाने, विवीध समाजशास्त्रांच्या माध्यमातून, अभ्यासपूर्णपणे अभ्यासली जाऊन नाट्यमयता आणि प्रेक्षकांना आकर्षित करुन घेणे या उद्देश्यापलीकडे जाऊन, पोलीस आणि वकीलांसमोरच्या आव्हानाम्च्या रास्त बाजू समोर येण्यास वाव असावा. अगदी हाच आक्षेप, पोलीसांचे चौकशी करण्यासाठीची वैध गरज आणि अधिकारही, अनुभव सिन्हांच्या 'मुल्क' चित्रपटातून रंगवले जात आहेत का अशी साशंकता imdb.com वरील दहा एक जणांच्या प्रतिक्रीयातून व्यक्त होताना दिसते.

अनेक वेळा पोलीस आणि वकील, सुयोग्य इन्व्हेस्टीगेशनमध्ये कमी पडतात, केसवर काम चालू असतानाच केसवरचे काम प्रोफेशनली चालु आहे का? याच्या पिअर रिव्ह्यूची निवृत्त अथवा परराज्यातील पोलीस आणि वकीलांकडुन ऑडीट करुन घेण्यास सध्याच्या व्यवस्थेत जागा नाही, ती निर्माण करण्यास वाव असावा. सध्या काय होते की, कोणत्याही कमतरतांमुळे आरोपी सुटला की, बघा बघा आरोपी निर्दोष होता, पोलीस आणि सरकार हकनाक छळतात, असे म्हणत त्यांच्या माथ्यावर खापर फोड होते.

निरपराधाला शिक्षा देणार्‍या न्यायाला न्यायही म्हणता येत नाही, म्हणून शंभर अपराधी सुटले तरी चालतील निरपराधाला शिक्षा होऊ नये हे न्यायिक तत्वच आहे. पण हे न्यायालयाचे काम झाले. पोलीसांचे काम चौकशीचे आहे तर सरकारचे काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे असते. त्यासाठी या दोन्ही यंत्रणांना दबाव निर्माण करावे लागत असणार. चित्रपटात दाखवलेल्या खटल्यात पोलीस पुर्वग्रहात व्यस्त राहील्यामुळे तपास चातुर्यात उणिवा राहतात असे दाखवले आहे. अटक आणि चौकशी हे तपासाचे मार्ग आहेत, त्याचा गैर उपयोग टळला पाहीजे, पण त्याच वेळी अटक आणि चौकशी ही पोलीस दलांची सत्यापर्यंत पोहोचण्याची महत्वाची साधने आहेत.
हि साधने वापरलीच का ? वापरली की पोलीस आणि सत्ताधारी दोषी असे पहाणे सुयोग्य चौकशीत बाधा टाकणारे असावे.

जो पर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तो पर्यंत दोषी न धरणे आणि मिडिया आणि सोशल मिडिया ट्रायल टाळण्यासाठी सामाजिक जागरुकतेची गरज असावी. त्या शिवाय समुदायातील परस्पर अविश्वास कमी व्हावेत म्हणून ट्रूथ अँड रिकंसिलीएशन कमिशन सारख्या व्यवस्थेचा अभाव असण्याकडे चित्रपटकारांचे लक्ष्य जाण्याचा संभव नाही. कारण स्तुत्य उद्देश असूनही चित्रपट वरकरणी च्या संदेशात अडकला जातो आणि प्रभावाची साशंकता वाटत रहाते. ज्यांच्या मनात सौहार्द साधणे आहे ते तसेही साधतात. चित्रपटाचा उद्देश्य फ्रिंज एलेमेंटचे मत परिवर्तन असेल तर फ्रिंज एलेमेंट ला काउंट करुच नका असे न्यायाधिश म्हणताना दाखवले आहे आणि नेमक्या त्या ठिकाणीच फ्रिंज एलेमेंटना विश्वासात घेऊन मुख्यधारेत आणण्यासाठी अधिक समतोल समाजशास्त्रीय अभ्यास आणि मत परीवर्तनासाठी अ‍ॅडव्होकसी र्‍हेटॉरीक नव्हे तर सोशल मार्केटींगची गरज असावी.

भारतात कोणते समुदाय आधी किंवा नंतर आले, कोणता विचार भारतबाह्य आहे आणि कोणता भारतबाह्य आहे; ह्या पेक्षा धर्माशी गल्लत न करता, जे इतर संस्कृतीतील चांगले आहे ते भारतीय संस्कृतीत स्विकारणे आणि भारतीय संस्कृतीच्या विवीध अंगांना धर्माशी गल्लत न करता, सांस्कृतिक देवाण-घेवाण अधिकतम स्वरुपात करणे यास सांस्कृतिक सम्रुद्धीच्या दृष्टीने आणि परस्पर विश्वास निर्मितित महत्व असावे.

दुसरे केवळ नकारात्म उदाहरणांची चर्चा न होता विवीध समुदायांच्या सुधारणावादी लोकांच्या सकारात्मक योगदानाची अधिक दखल समाज माध्यमे आणि मास मिडीयाने घ्यावयास हवी. चित्रपटातील न्यायाधीश महोदय या मुद्द्यांची अप्रत्यक्ष दखल घेतात. एक व्यक्ती/समुह दुसर्‍या व्यक्ती/समुहाची उणी दुणी काढतो यात समस्या नसते, एकमेकांच्या मर्यादा मनमोकळेपणाने दाखवण्यास जागा हवी, सुधारणा आणि प्रबोधनाची दिशा हवी. समस्या चर्चा वैचारीक उहापोहा पर्यंत मर्यादीत न राहता, प्रसंगी वैचारीक चर्चा बंद पाडून, प्रश्न रस्त्यावर सोडवण्याचे संकुचित आग्रह होतात किंवा प्रत्यक्षात येतात ती काळजीची गोष्ट असते.

फ्रिंज एलेमेंटस ना भावनिक रिअ‍ॅक्ट करु नये अथवा इंट का जवाब पत्थर असा विचार होऊ नये हे मान्यच. पण फ्रिंज एलेमेंटसच्या वैचारीक निसटत्या बाजूंचा कार्यकारण भावाचा अभ्यास होऊन त्यांचे वैचारीक पातळीवर निराकरण करणे. इथे केवळ कोणत्याही एकाच बाजूला चुक ठरवणे टाळून, जे काही रास्त वेदनाकोष असतील त्यांची ट्रूथ अँड रिकंसिलीएशन कमिशन सारख्या प्रणालीतून मानसिक वेदनाकोषांवर फुंकर घालणे हे पाहिले जावयास हवे. वेदनाकोषांवर फुंकर घातल्या शिवाय केवळ 'आरती वकीलाच्या तोंडी हम आणि वो हा द्वैतभाव संपवण्याच्या भावनिक आवाहनांना तात्पुरत्या मलमपट्टीचे स्वरुप येते. असाच एखादा वाईट प्रसंग झाला की जुन्या जखमा पुन्हा उघड्या होण्यास वेळ लागत नाही. कायम स्वरुपी मलमपट्टीसाठी कायम स्वरुपाच्या विश्वास निर्माण करणार्‍या प्रक्रीया राबवल्या जाण्याची आवश्यकता असावी असे वाटते.

स्व-धर्मीयांच्या समज-गैरसमजांची चिकित्सा करणारे 'मुल्क' सारखे चित्रपट येतात तशा पद्धतीची चिकित्सा मुस्लीम धर्मीयांकडूनही होऊन, मुस्लीम समाजात भरीव सुधारणावादाची आणि प्रबोधनाची कास धरली जावयास हवी.

बाकी चित्रपट दिग्दर्शकाच्या उद्दीष्टाला धरुन चित्रपट प्रथम दर्शनी व्यवस्थीत वाटतो. काही काही ठिकाणी आपल्या डोळ्याच्या कडा ओलावण्यात माणसातील माणुसपण जागे करण्यात दिग्दर्शक अंशतः यशस्वी होताना दिसतो. अवघड विषय हाताळण्यात सहजता वाटते.

* चित्रपटाच्या इतर मर्यादा

दहशतवादी बाँब स्फोटाचे दृश्य ग्राफीकल असल्यामुळे जे गांभीर्य येते ते कोर्टातील अर्ग्युमेंट जोरकस असूनही ते गांभीर्य प्रेक्षकाच्या मनात उमटण्यात काही अंशाने का कोण जाणे मागे राहील्यासारखे वाटते. जे प्रसंग खटकले त्यात अतीरेक्याला गोळी घातल्या नंतर पोलीस त्याला जमिनीवरुन फरफटत नेतात असे दाखवले आहे, पोस्ट मार्टेमच्या आधी पोलीस अशा पद्धतीने अतीरेक्याची बॉडी फरफटत नेत असण्याची शक्यता वाटत नाही.

दुसरे न्यायाधीश महोदयांना राज्यघटनेच्या प्रिअँबलचा हवाला देताना दाखवले आहे ते उचितच आहे, पण भारतीय राज्यघटनेला केवळ प्रिअँबलचे पान नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची समानतेची इतरही पाने आहेत, राज्य घटनेच्या मुल्यांना जसे एका गटाने मुरड घालु नये तसे दुसर्‍या गटानेही मुरड घालू नये या बाबतच्या सजगतेची भारतातील इतर सर्व समाज समजून घेण्याची गरज आहे तशी ती मुस्लीम समुदायासही असणार आणि त्या दिशेनेही प्रबोधनास वाव असावा.

तिसरे चित्रपटाच्या पुर्वार्धात सुरवातीसच प्रेम विवाह केलेल्या 'आरती'स मुल होऊ देण्याच्या आधी तिचा नवरा त्या नव्या मुलाला कोणत्या धर्मानुसार वाढवायचे ते ठरवून घेऊ असा हट्ट धरलेला दाखवले आहे, नंतर कथानक अचानक वेगळ्या दिशेने जाते आणि ह्या विषयाला दिग्दर्शक पुन्हा हात घालतच नाही. भारतीय मुस्लीम इतिहासात हिंदू सून मुस्लिम परिवारात जाणे शतकोंन शतके चालत आले असावे. पोषाख बांगडी, मेंदी सारख्या गोष्टी मुस्लीम संस्कृतीनेही स्विकारल्या पण रांगोळी कुंकू ह्या आणि अनेक इतर वस्तुतः धार्मिक परिपेक्ष नसलेल्या गोष्टी मागे पडल्या. विवीध धर्मीयांनी एकमेकांना स्विकारले एक जिनसी पणा आला, सांस्कृतिक एकेरीपणाचे आग्रहांची संस्कृती जोपासली गेली नसती तर मुलाला कोणत्या धर्मानुसार वाढवायचे असा प्रश्नही पडावयास नकोत, पालकांना ज्यातले जे सुंदर वाटते ते निवडता यावे समान नागरी कायदे किमान आंतरधर्मीय विवाहातील संततींना लागू व्हावेत या दृष्टीने गरजेचे असलेले परिशिलन या चित्रपटात निसटलेले दिसते.

या मुद्याकडे thebetterindia.com वरील पत्रकार JOVITA ARANHA खालील शब्दात लक्ष्य वेधताना दिसतात.

There is Arti, the quintessential modern bahu who is fighting with her husband Aftab because she doesn’t want to have kids too soon and is at loggerheads when it comes to deciding the religion their future kids will follow. In a particular scene, she emphasises the armchair liberalism of inter-caste marriages where she says, “Jab shaadi hui thi, tab Insan se hui thi, mazhab se nahi. Toh ab mazhab par jhagda kyun?”

नमुद केलेल्या उणीवात शेवटचे पण कमी महत्वाचे नसलेली एक साशंकता कथा सूत्राच्या निवडीत अंतर्निहित दोष आहे का अशी ही कुठे तरी जाणवत रहाते ती म्हणजे चित्रपटात वर्णीत बाँबस्फोटात पाकीस्तानचा हात असल्याचे दाखवण्याचे टाळणे, चित्रपटाच्या उद्दीष्टाला दुहेरी अडचणीत आणणारे आहे. दिग्दर्शकाचा उद्देश्य सर्वसाधारण भारतीय मुस्लीम पाकीस्तान धार्जीणानसून भारतप्रेमीच आहे हे दाखवण्याचा असावा आणि हा उद्देश्य ठिकही आहे. कथासुत्राच्या निवडीतील अडचण पहिले म्हणजे भारतातील बहुसंख्य अतीरेकी कारवायात पाकीस्तानचा हात रहात आला आहे अतीरेक्यांना पाकिस्तानात नेऊन प्रशिक्षण पुरवणे आर्थीक मदत आणि सरते शेवटी पाकीस्तानात संरक्षण देणे हे पाकीस्तान दशकोन दशके करत आला आहे पण नाकारत असतो. या चित्रपटामुळे भारतातील दहशतवाद पाकीस्तानकृत नसून भारतातला अंतर्गत प्रश्न आहे अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारत विरोधी भारतात तयार झालेला चित्रपट वापरुन घेण्याची सोय होते.

याच नाण्याची दुसरी बाजू अशी की, एखाद्या सार्वजनिक हिंसक घटनेतील सहभाग , अविश्वास आणि त्यानंतर क्रिया आणि प्रतिक्रीया साखळीचा भाग असतो असे तरी दाखवायचे आणि सर्वच असहिष्णू आणि हिंसक क्रिया प्रतिक्रीयाच्या साखळीची निंदा करावयाची , पण त्या एवजी चित्रपटात दुसर्‍या असहिष्णूता आणि कमी किंवा इतर हिंसक घटना सुद्धा दहशतवादी घटनाच असतात की असा बचावात्मक पवित्रा एका चुकीच्या वर्तनाने दुसर्‍या चुकीच्या वर्तनाचे समर्थन होते या गटात नकळत चित्रपटास घेऊन जात नाही ना अशी साशंकता वाटते. आणि अगदी पाकीस्तानातून हवालाने आलेला पैसा आरोग्याच्या कारणासाठी आला होता असे चित्रपटात सांगण्याचा प्रयत्न आहे तर त्या कथासूत्रास आरोपी डॉक्टरकडे जातो हॉस्पीटलचा खर्च कळवतो इत्यादी पुराव्यांची शृंखला चित्रपटाने दाखवावयास हवी होती, त्या एवजी चित्रपटात हवाला प्रसंगाचे वकील सूनबाई केवळ इमोशनल समर्थन करत निर्दोष बिलालच्या आरोग्य विषयक समस्येने झालेल्या मृत्यूस पोलीसांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करते, एका प्रकारे बिलालच्या मुलाने दहशतवादी कृती केलीच नसती तर बिलालला त्याच्या कडे सापडणार्‍या सिमकार्ड रेकॉर्ड मधील उणीवेवरुन चौकशी साठी पोलीस अटके पर्यंत गेले नसते, त्याने हॉस्पीटल मध्ये उपचार करुन घेतला असता आणि सुखेनैव राहू शकला असता त्यामुळे कुटूंबावर अप्रत्यक्षपणे ओढावलेल्या अप्रीय परिस्थितीस बिलालच्यास मुलाचे अतिरेकी वागणे जबाबदार आहे हे दाखवता आले असते त्या एवजी दोष समाजाकडे वळवून फेससेव्हरचे रुपांतरण उर्वरीत समाज अन्यायी आहे अविश्वास निर्मितीच्या चित्रणात होतो ते स्पृहणीय वाटत नाही. 'हम आपके है कौन' असे शिर्षक असलेला चित्रपट सर्वांचा होऊन जातो पण हम आणि वो मधील अंतर मिटवण्याचा उद्देश्य असलेला चित्रपट पूर्णपणे फसत नसलातरी बर्‍यापैकी धसतो, सर्वांचा होण्याचे राहून 'अनुभव सिन्हांचा 'मुल्क', अनुभव सिन्हांपुरता मर्यादीत होतो .

बाकी चित्रपट आवडला का याचे उत्तर कदाचित होकारार्थी राहू शकले असते किंबहूना हे वाक्य आधी बर्‍यापैकी आवडला असे आधी होते त्याचे कारण चित्रपटाचा उद्देश्य स्तुत्य होता आणि आहे पण सखोल विचार केल्या नंतर चित्रपटाच्या सकारात्मक उद्देश्याचे आणि प्रश्न मांडण्याचे प्रयत्नांचे महत्व मान्य करतानाच, चित्रपट त्याच्या मूळ उद्दीष्टात पुरेसा सफल होतोय का, या बाबत साशंकता वाटते आहे . तरीही चित्रपटपूर्व ज्या पत्रकार परिषदातून प्रत्येक समस्येचे उत्तर चित्रपटात असल्याचा अविर्भाव होता त्या हाइप केलेल्या अपेक्षांना चित्रपट पूर्णपणे उतरणे अवघड होते कदाचित उरलेल्या बाजूंवर चित्रपट निर्मात्यांना अजून एखाद दोन चित्रपट काढण्याची संधी असावी.

साधारणतः अशा स्वरुपाची " ....And so if you ask me- Is Mulk a brilliant film? I am not sure. But it is an important film. ..." कॉमेंट Jovita Aranha
यांच्या लेखातून येताना दिसते आणि त्यांच्या लेखाचे शीर्षक आहे Mulk: We Need More Films That Ask Uncomfortable Questions. Here’s Why! अर्थात या लेखातील सर्वच मतांशी सहमत होणे जरासे कठीण असावे.

इतर काही रिव्ह्यू वर्तमान पत्रातून आलेले दिसतात. त्यातील बहुतेक दिग्दर्शक अनुभव सिन्हानी पत्रकार परिषदेतील टेपच पुन्हा वाजवताना दिसतात. सर्वच रिव्ह्यू वाचून झाले नाही, इंडियन एक्सप्रेस मधील निशांत शेखर यांचा Mulk calls out Islamophobia, but raises valid questions for Muslims too
लेख केवळ दिग्दर्शकाची बाजू रेटण्यापलिकडे जाऊन समतोल वाटतो. मराठीत महाराष्ट्र टाइम्स मध्ये दोन एक लेख आलेले दिसतात. व्यक्त आणि ‌अव्यक्तही ‘मुल्क’ हा लेख भारतीय चित्रपटातील आता पर्यंत रेखाटलेल्या प्रतिमांच्या तुलनांमध्ये 'मुल्क' चित्रपट कुठे बसतो ते शोधताना दिसतो. मिपा वाचकांनाही काही रिव्ह्यू अपील झाल्यास त्याचे दुवे प्रतिसादातून देण्यास हरकत नसावी.

चित्रपट ३ ऑगस्टला रिलीज झाला आणि १५ ऑगस्टच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये अनुभव सिन्हांचा लेख आला आहे त्यातील काही अवतरणे

.

...There were many such questions that were brewing inside me for at least three decades. I did not know how to deal with them. The biggest one was around social harmony. Not just communal harmony, but also caste harmony and many other such divides. I wanted to pose these questions to my fellow countrymen. I realised that there was no single answer. I realised that all of us had to work individually towards finding them. The most important task was to pose these questions....

..Overall, what is clear is that my countrymen agreed with the questions. They agreed that they were ignoring these questions. They found it brave and essential because I posed them. Another point of joy is that they want to address these questions, they want to answer them. ...

* लेखातील काही संदर्भ दुवे अद्ययावत करणे अद्याप बाकी ते बहुधा उद्या करेन.

* अनुषंगिका पलिकडे अवांतरे करु नयेत, चर्चा चित्रपट आणि धागा लेखास अनुसरुन असाव्यात, चंद्र सोडून चंद्राला दाखवणारे बोट कसे वाकडे अशा प्रकारचे व्यक्तिगत चर्चा करणारे प्रतिसाद टाळण्यास आभार.

* पुर्वग्रहांवर आधारीत प्रतिसाद देण्यापेक्षा संयम बाळगून जेव्हा केव्हा चित्रपट पहाल त्या नंतर प्रतिसाद द्यावा. वैचारीक भूमिका काहीही असल्या तरी चित्रपटात किमान पक्षी पहाण्याचे टाळावे असेही काही नसावे,

* या निमीत्ताने माझे काही मिपा दुवे.

** भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा
; राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू ; 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व ; संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ; विवीध अभिव्यक्ती कलांमधील, सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रातील यशवंत मुस्लीमांची व्यक्ती चरीत्रे इत्यादी
** पक्षपाताच्या टिकेचे आव्हान

** वेदनाकोष हि मिपाकर जयंत नाईक यांनी मांडलेली संकल्पना धागा लेख

* काही संदर्भ

* लाईव्ह मिंटची बॉक्स ऑफीस बातमी

* imdb.com वरील काही निवडक प्रतिक्रीया , , , ,

* निवडक ट्विटर प्रतिक्रीया :

* ओपी इंडिया संस्थळावरचे टिका वृत्त ,

* इंग्रजी विकिपीडिया लेख : मुल्क चित्रपट

* इंग्रजी विकिपीडिया लेख : अनुभव सिन्हा

*इंग्रजी विकिपीडिया लेख : तापसी पन्नु
* पाकीस्तानी ऑनलाईन वृत्तपत्र thenews वरील अल्प रिव्ह्यू बातमी

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

17 Aug 2018 - 4:37 pm | ट्रम्प

माहितगार साहेब , अतिउत्तम परीक्षण केले आहे .
वाचताना पूर्ण सिनेमा डोळ्यासमोर तरळत असतो , हे परीक्षण वाचताना आम्ही त्यातील एक पात्र कधी झालो हे आम्हालाच समजले नाही अशी ताकत तुमच्या लेखणी मध्ये आहे .
तुमची असे परीक्षण लिहण्याच्या सद्गगुणाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद .

माझी एक विनंती आहे त्या खान गॅंग चे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक सिनेमा चे परीक्षण फेसबुक , ट्विटर , सगळ्या आंतरजालीय स्थळा वर लिहाल का ?
आपल्या ला त्यांचे पिक्चर पडायचे आहेत हो !!!!