सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ३

स्वच्छंदी_मनोज's picture
स्वच्छंदी_मनोज in भटकंती
14 Aug 2018 - 12:37 pm

(थोड्याकाळाचा ब्रेक घेतल्यावर परत दोन नवीन शब्दचित्र लिहितोय)

पहील्या दोन भाग इथे पाहता येतील -

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १
सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २

---------------
सह्याद्रीतील शब्दचित्रे:

काल परवाच गाडीने एका ठिकाणी जाण्याची वेळ आली होती. जायचे होते ते ठिकाणाचा नक्की रस्ता माहीत नव्हता. बरे जायचे ते ठिकाण पुण्यातही नव्हते म्हणजे "बरोबर" पत्ता कुणाला विचारून मिळायची शक्यता जवळजवळ शुन्य होती :). पण अशा वेळेस आपल्या मदतीला गुगल येते. गुगल मॅप्सवर कोणालाही "न" विचारता योग्य पत्त्यावर पोचलो खरा पण त्याच वेळेला आपल्या सह्याद्रीतल्या अश्या अनेक गुगलची आठवण आली. ह्या मोबाईलमधल्या गुगल मॅप्सला माती खायला लावतील असे हे गुगल मला अनेकवेळा भेटलेत. त्यांच्या विषयी थोडेसे आज -

शब्दचित्र सातवे: नागनाथ क्षक्षक्षक्ष - मु.पो. चोरवणे, खेड.

कल्पना करा तुम्ही भर दुपारच्या टळटळीत उन्हात (हो...डिसेंबर महीना असला तरी उन्ह तुफानी होते) चोरवण्यातून नागेश्वरला चढत आहात, भट्टी तापलीय. पायर्‍या चढतोय तो कातळ भयंकर तापलाय. येणारा आणि जाणाराही श्वास गरम आहे. पाठीवरच्या ओझ्यातले १०० ग्रॅम जरी कमी झाले तरी हायसे वाटतेय पण जेवणाचा ब्रेक नागेश्वरच्या गुहेतच घ्यायचे ठरलेय. पण त्याचवेळी बरोबरीचा नागनाथ त्याच तापलेल्या कातळावरून फक्त स्लिपर, कापडी पिशवी घेवून "बार" मारुन पुढे पळत असतो. अशातच दुपारी १.३० ला तुम्ही नागेश्वरच्या गुहेत येता. प्लॅन केव्हाच गंडलेला असतो (तसा तो चोरवण्यातून सकाळी १०.०० वाजता निघतानाच गंडलेला असतो :) ). जेवणाचे चार घास पोटात टाकताच नागनाथ माझ्याजवळ येतो जरा कोपर्‍यात चला म्हणतो आणि सांगतो पुढचा रस्ता मलाही माहीत नाही. माझ्या डोक्यावर वरच्या गुहेचाच डोंगर कोसळला कि काय असे फिलिंग यायला लागते.

हा नागनाथ आमच्या चोरवण्याच्या मंगेशनी (ह्याच्या सारखा जंटलमन माणूस नाही कोणी. ह्याच्या बद्दल पुन्हा केव्हातरी) आमच्या बरोबर दिलेला. म्हणाला होता हा तुम्हाला नक्की माडोशीला घेऊन जाईल. आणि आता नागनाथ म्हणत होता की अभयारण्या झाल्यास मी तिकडे फार काय फिरकत नाही (आणि हा स्वतः फोरेस्ट मधे होता बर का :) ). पण तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला घेऊन जाईनच. वेळेचे गणीत बघता माडोशीला स्पेशल बोट बोलवायची वेळ आली होती. ते काम पण नागनाथनेच केले. बोट तापोळ्यावरून निघाली आणि आम्ही गुहेतून निघालो. निघाल्यावर लगेच मळलेला रस्ता सोडला, एक भलताच गवतातला रुट घेतला आणि आम्हाला नागनाथवर"च" डिपेंड होऊन पुढे जायला लागणार हे नक्की झाले.

बरे नागनाथ पक्का फॉरेस्टवाला. नजर एकदम पक्की. आम्ही समोरच्या झाडाची खुण विचारायचो, तर तो समोरच्या डोंगराची किंवा दुरवरच्या एखाद्या झाडाची खुण सांगायचा :). पहीला अर्धातास त्याने आम्हाला असे गवतातून फिरवले की ज्याचे नाव ते. बरे तोंडाचा पट्टा सतत चालू. गावाच्या, घराच्या, बायकोच्या अनेक कहाण्या. फॉरेस्टमध्ये काम केल्याने जंगलाचे अनेक अनुभव. एखाद्या हुशार मुलाने घडाघडा धडा/अभ्यास म्हणून दाखवावा तसे जंगल वाचून दाखवत होता. झाडे कुठली, वाटेत लागणार्‍या विष्ठा कुठल्या, फळे कुठली, प्राणी कुठे दिसतील, गव्यांचा कळप कुठल्या डोंगरावर चरतो, तो पाणी प्यायला खाली धरणावर कधी आणि कुठे येतो, वासोट्यावर बंदी घालून सरकारने कशी लुस्कानी (हा त्याचाच शब्द :)) केलीय, सततच्या आजाराने त्याला नोकरी कशी सोडावी लागली असे अनेक विषय. आणि वर सतत उशीर होईल, चला बिगीबिगी ह्याचा जप. थोडक्यात गुगल कसे मॅपवर रुटचे डायरेक्शन दाखवताना रेस्टॉरंट कुठे, थिअटर कुठे, शाळा कुठे, स्टेशन कुठे असे दाखवत राहाते तसेच काहीसे :).

अर्धातास सपाटीवर चालल्यावर चढ लागला. सभोवतीचे कोयनाचे खोरे, कोकणातल्या दर्‍या, पायाखालचे जंगल असे काहीही निमित्त काढून आम्ही पाच मिनिटे ब्रेक घेत घेत चढत होतो. पण हा काय थांबायचे काय नाव घेईना. वाटेत अनेक प्राण्यांच्या विष्ठा लागल्या. त्या बघ, झाडांची फळे बघ, नवीन कुठलेही झाड दिसले की त्याला निरख, टँग बनव, फोटो काढ असे अनेक चालले होते पण नागनाथचे एकच चालू होते. लवकर चला. मला म्हणाला की फॉरेस्टने बंदी केल्यावर मी दहा वर्षांनी इकडे येतोय, पुर्वी डुकरांच्या शिकारीला यायचो. म्हणत होता की आपण जननीच्या टेंभ्याला पोचलो की सुटलो तोपर्यंत पाय उचला.

आम्ही पहीले दोन टप्पे पार केले आणि वाट संपलीच. समोर रिज, टॉपला जंगल, उजवीकडे खाली मेट इंदवलीचे खोरे आणि पलीकडे वासोटा-जुना वासोटा, डावीकडे आस्तान खोर्‍यातल्या दर्‍या, पाठीमागे नागेश्वर आणि अश्या ठिकाणी हा म्हणातो आता यापुढची वाट शोधायला लागणार. कर्म आमचं... :). आम्हाला त्या तश्या पाउलभराच्या ट्रॅवर्सवर बसवून हा बागेत बागडावे तसा त्या नसलेल्या वाटेवरच्या असलेल्या स्क्रीवरून पुढे वाट शोधायला निघून गेला. १५ मि. झाली तरी आला नाही तेव्हा आम्ही थोडेसे घाबरलोच. कारण मोबाईलला रेंज नाही, फॉरेस्टमुळे जोरात ओरडून हाका मारायची सोय नाही, पुढे कसे जायचे ते माहीत नाही, मागून कुठून आलो ते माहीत नाही. टोटल लॉस्ट :)... पण १५ मिनीटात आला तो शुभवार्ता घेऊनच. म्हणाला पार पुढे वरून येणार्‍या ओढ्यापर्यंत गेलो पण ही ती वाट नाहीच आहे :) :)... आता आलो तसेच रिज चढू. वर जंगलात जाऊ मग बघू. अरे???? इथे मोकळ्या एरीयात रस्ता सापडेना तर हा म्हणतो कोयनेच्या जंगलात रस्ता शोधू? :(. वाजले होते ४. सुर्य कलायला सुरु झाला होताच. जर नागनाथवर विश्वास नसता तर मी काही असले धाडस करायचा बिल्कूल प्रयत्न केला नसता.

तशीच रिज चढून वर आलो आणि कोयनेच्या त्या (अ)भयारण्यात प्रवेश केला. कसले बेक्क्कार जंगल. वेलीच काय पण झाडांचा पण एकमेकात गुंता झालेला. पायाला पानांचा चिकट द्रव लागलेला त्यामुळे चालताना जबरी चिडचिड होत होती. आम्ही तर दिशाज्ञान केव्हाच विसरलो होतो. आमचे ओरीयंटेशन केव्हाच गंडले होते. थोड्यावेळाने बहुतेक नागनाथचे ही तेच झाले असावे पण पठ्या हार मानायला तयार नव्हता. पाच मिनीटे चाल, थोडेसे वर बघ, थोडेसे आजू बाजूला बघ मग रस्ता सापडल्याच्या आवेशात पुढे निघ असे सतत चालले होते. साधारण तासभर त्याने कोयनेचे जंगल असे शोधले.

मग जेव्हा अचानक समोर धरणाच्या पाण्याचा पट्टा आला तेव्हा म्हणाला आलोच आपण. आणि झालेही तेच. पाच मिनिटात आम्ही जननीच्या टेंभ्यापाशी आलो. रचून ठेवलेले तांदळे, फासलेला शेंदुर, टांगलेल्या घंटा, एखादा फोडलेला नारळ अशी ही जननी. स्थानीक गावकर्‍यांची ही स्थानीक देवता. पण गेला अडीच तास न भरकटता नागनाथने नागेश्वरहून आम्हाला इथवर आणून सोडले होते. तेही सहीसलामत. पुढचा रस्ता सोपा होता कारण पायाशी माडोशी गाव दिसत होते. जर नागनाथ नसता तर आम्ही नागेश्वरहून इथपर्यंत येणे निव्वळ अशक्यच होते. गुगल मॅप्सलाही न झेपणार्‍या अश्या पद्धतीने नागनाथने फक्त स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या जंगल वाचण्याच्या ज्ञानावर आम्हाला इथवर वेळेत आणून सोडले होते.

असे अनेक नागनाथ मला अनेक वेळा सह्याद्रीत भेटलेत. धुआंधार पावसात ढाकोबाच्या पठारावर भेटलेत, आस्तानसरी चढून उचाटला जाताना भेटलेत, अहुप्यातून वेतोबावरून दमदम्याला जाताना भेटलेत, रसाळवरून सुमारला जाताना भेटलेत, कुडपणवरून वडगावला जाताना भेटलेत, टेकपावळेतून खानूला जाताना भेटलेत, रायरेश्वरहून पाठशिळेला जाताना भेटलेत. असे अनेक वेळा. किती सांगू. अशी अनेक उदाहरणे आहेत. ह्या सगळ्यांची नावे घेत नाही कारण कमी अधीक फरकाने सगळे नागनाथच. नागनाथ फक्त या सगळ्यांचे प्रातीनिधीक उदाहरण. सगळ्यांचा एकच गुण. हरवलेल्या, नसलेल्या, मोडलेल्या, बंद अश्या कश्याही वाटा असल्या तरी हे सह्याद्री गुगल तुम्हाला बरोब्बर नेमक्या जागी नेणार"च". कितीही परसआंगण आहे, नेहेमीचा रस्ता आहे, लहानपणापासून जाताहेत, पायाखालची वाट आहे असे काहीही आपण म्हटले तरी त्यांच्यासाठी पण हरवलेल्या वाटा हे कोडे असेलच की. पण नजर, दिशाज्ञान एवढे पर्फेक्ट की लगेचच योग्य वाटेवर येणार आणि एखादवेळी नसेलच वाट तर लगेच योग्य वाट बनवणार.

अश्या रिमोट, दुर्गम जागी जाताना कोणाला बरोबर घ्यावे किंवा घेऊ नये हा वेगळ्या चर्चेचा (वादाचा म्हणत नाहीये मी :) ) मुद्दा आहे त्यात मला पडायचे नाही कारण यावर प्रत्येकाची स्वतंत्र मते, प्रत्येकाचे वेगळे अनुभव असतीलच पण हे सह्याद्रीतले गुगल नुसतेच वाट दाखवत नाहीत तर भोवतीच्या रानाच्या, शिकारीच्या, गावाच्या राजकारणाच्या, शहराच्या, घरच्या गप्पा मारतात. तुमच्याबरोबर फक्त स्लिपर, चार भाकर्‍या, एखादी छत्री घेऊन चालताना जर आपण त्यांच्यातलेच एक आहोत असा विश्वास त्यांना दिला तर जास्त खुलतात. "बार" मारून, क्वचीत कधी एखादी चपटी "झोकून"ही का होईना तुमच्या बरोबर चालतात अक्खा दिवस तुमच्या बरोबर घालवून, तुमच्या सोबत तुमच्या चालीने चालून त्यांना चार पैसे मिळतात आणि तुम्हाला गावकीच्या चार नवीन गोष्टी कळतात. मोबाईल मधला गुगल मॅप्स, जिपीएस हे सगळे करेल काय? :).

------------------------

सह्याद्रीतील शब्दचित्रे:

गेले काही दिवस कधी पाऊस म्हणून, कधी संप म्हणून, कधी अजून काही म्हणून आपल्या इथल्या शाळा एखाद दोन दिवस बंद राहील्या. पण कदाचीत आपल्याला काही वाटले नाही त्याचे. काहींनी त्यांच्या डेली प्लॅनिंगमध्ये थोडा बदल करावा लागला म्हणून नाराजीचा सूरही लावला असेल पण आपल्या सह्याद्रीमध्ये डोंगरदर्‍यातून असणार्‍या आणि वाड्या वस्त्यांमधून राहणार्‍या आपल्याच लोकांसाठी शाळा ही चैन आहे की गरज की अगतीकता असा विचार मात्र माझ्या मनात येऊन गेला. शहरात आपण, आपल्या मुलांनी कधीचाच शाळा ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवलाय पण डोंगरात राहणार्‍या आपल्यासारख्याच छोट्यांनीही असेच केलेय काय? कुठे हो तर कुठे नाही. मला ट्रेकिंगदरम्यान भेटलेल्या अश्याच काही अगदी अंतर्भागातील शाळांविषयी थोडेसे (आणि थोडकेच) आज -

शब्दचित्र आठवे: खर्‍या शि़क्षणाचा मार्ग काट्याकुट्यातून जातो.

वरती लिहीलेले वाक्य कुठल्याही शाळेच्या वर्गातल्या खांबावर, फळ्यावर सुविचार म्हणून शोभेल पण सह्याद्रीतल्या अगदी अंतर्भागात राहणार्‍या लोकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी हे १००% सत्य आहे. त्यांचा मार्ग काट्याकुट्यातूनच नव्हे तर दगड धोंड्यातून आणि दरीखोर्‍यातूनही जातो. सर्व शिक्षण अभियान, गाव तिथे शाळा अश्या योजनांमधून सह्याद्रीतल्या बर्‍याचश्या गावांत शाळा पोचली खरी पण सद्यस्थितीत खुप ठिकाणी नुसतीच कागदावर चालू राहीली. मग उरले काय तर जिथे शाळा नाही तिथल्या छोट्यांनी एकतर शाळा सोडून गुरे हाका, शहरात नोकरी करा किंवा जवळच्या शाळेत चालत जा. सुखावह चित्र हे की मी माझ्या ट्रेकिंग मध्ये बहुतांश वेळा दुसरा पर्याय निवडलेले बघीतले :).

गाव हिरडी पण शाळा मात्र भांबर्डे. गाव कोंढवळ पण शाळा मात्र डोंगरपाडा. गाव कामतपाडा पण शाळा मात्र जामरुंग. गाव आस्तान पण शाळा मात्र आंबिवली. गाव गोपे पण शाळा मात्र भुतोंडे, गाव कुडपण पण शाळा मात्र पोलादपुर, गाव जोर पण शाळा मात्र वाई, गाव घोळ पण शाळा मात्र पानशेत, गाव पदरवाडी पण शाळा मात्र निगडाळे. ही मी बघीतलेली काही उदाहरणे वानगी दाखल. अशी अनेक अनेक सांगता येतील. बरं हे गाव आणि शाळेतले अंतर काही हाकेच्या किंवा स्टोन्स थ्रो अंतरावर नव्हे तर किमान १५ किमि ची तंगडातोड दररोज. निदान आठवड्यातून तीन दिवस तरी नक्कीच (इमॅजिन राहायला दादरला आणि शाळेला ठाण्याला किंवा राहायला कोथरूडला आणी शाळेला बाणेरला. पण जायचे मात्र चालत हां. दररोज.. :) ).

पावसाळ्याचे चार महीने एकाच दिवसात पडून जातील कि काय अश्या अत्यंत तुफानी पावसात आसनवडी ते हिरडी चाललो होतो. वाटेतले जंगल चालत असताना किती ओहोळ क्रॉस केले त्याचा काऊंट नाही अश्या स्थितीत हिरडी गाव जवळ आले असताना डो़क्यावर प्लॅस्टीक घेऊन शाळेची दप्तर घेऊन जाणारी मुले बघीतली आणि निशःब्दच झालो. शाळेला गेलेच पाहीजे अश्या जिद्दीने ही मुले त्या तश्या भयाकारात १५ किमि चालत भांबर्डेला जात होती. कुणीही त्याना जबरदस्ती केली नव्हती. अश्या दिवशी शाळेला दांडी मारून घरी बसले असते तरी चालले असते. आपणही तेच करतो नाही का? पण ही मुले शाळेत जात होती. ही फक्त शिक्षणाचीच ओढ म्हणता येणार नाही. आपण कुठेतरी प्रवाहाच्या पाठी पडू नये, शिक्षण हीच उन्नतीची शिडी आहे हे कुठेतरी "आत" मध्ये पटलेले असते हेच खरे. अश्याच स्थितीत मला कोंढवळहून डोंगरपाड्याला जाताना, कुडपणहून पोलादपूरला जाताना, बिरमणीहून आंबिवलीला जाताना मुले दिसलीत. कारण एकच शाळा, शि़क्षण हेच आपली सध्याची परीस्थिती बदलू शकेल याची खात्री. ज्यांना दररोज चालत जाणे शक्य नाही त्यांनी जवळचे वनवासी कल्याण आश्रम किंवा आश्रमशाळा जवळ केल्यात (ज्यात ३ वर्षांपासूनची मुले-मुली घरापासून लांब राहतात आणि आठवड्याला एकदा घरी जातात) पण शिकीनच हा निर्धार बाळगलाय.

पण नाण्याच्या दुसर्‍या बाजूकडेही बघीतले पाहीजे. नव्हे सह्याद्रीत फिरताना ही दुसरी बाजूही अत्यंत बोल्ड, अंडरलाईन करून माझ्यासमोर आलीय. केवणी काय, शेवत्या काय किंवा कुमठे काय इथल्या किंवा अश्याच सारख्या परीस्थितीतल्या शाळा ह्या चक्क बंद पडल्या. ज्या शाळेत प्रार्थेनेचे सुर गुंजले त्या शाळेत कोल्हेकुई ऐकू यावी, ज्या शाळेत मुले खेळली त्या शाळेत उंदीर घुशींने खेळावे, ज्या शाळेत मुलांच्या चित्रांनी फळे रंगवले गेले त्या शाळेत गावातल्या उनाड पोरांनी गुटखा तंबाखूने भिंती रंगवाव्या या सारखी दुसरी खंत नाही. केवणी गावात तिन चार वेळा जाणे झाले, प्रत्येक वेळा बंद शाळेचे दरवाजे ओरखडा उमटावायचे. विचारले तेव्हा कळले की पहील्यांदा मुले शाळेला जायची बंद झाले मग शेवटी मास्तरही ऐकोलेवरून यायचे बंद झाले. शेवत्या, कुमठे, चकदेव इथल्या कथाही अश्याच असणार हे नक्की. इथल्या मुलांना शिकावेसे का वाटले नसेल हे मला कळावयास मार्ग नाही पण मुलेच नसतील तर शिक्षक काय रिकाम्या वर्गात शिकवणार आणी शिक्षकच जर यायचे बंद झाले तर ती शाळाच कसली. काही अती दुर्गम भागात, मोजक्या ठिकाणी अगदीच रडतखडत का होईना पण शाळा चालू आहेत पण तिथेही फक्त मुलेच, मुलींचे प्रमाण कमीच. मुली शिकून काय करणार भाकर्‍याच थापणार ना हा विचार अजूनही एवढा घट्ट रुजलाय की त्यातून बाहेर पडायला ह्या लोकांना वेळ लागेल खराच. "मुलगी शिकली, प्रगती झाली" ही टॅगलाईन म्हणायला आकर्षक आहे पण प्रगती व्हायला टॅगलाईनचा पहीला पार्ट अंमलात यायला लागतो हे ही यांना कुणीतरी समजाऊन सांगीतले पाहीजे. गुगुळशी, खानू, हेडमाची, येळवली अश्या सह्यपदरातल्या गावात मुले शाळेत जाताहेत आणि मुली ओढ्यावर कपडे धुवायला जाताहेत असे दृश्य मला बरेच वेळा सह्याद्रीत हिंडताना दिसलेय.

पण वरचे चित्र आहे तसे ते हल्ली अगदीच अपवादानेच दिसतेय हेही तितकेच सांगीतले पाहीजे. घोळ गावातल्या शाळेत दापसरवरून येणारे शिक्षक, तेलबैला गावातल्या शाळेत मुलां-मुलींबरोबर जोशाने मैदानी खेळ खेळणारे शिक्षक, दगड-पिंपरी सारख्या दुर्गम गावात मुलांबरोबर सकाळच्या वेळी सुंदर आवाजात प्रार्थना म्हणणारे शिक्षक, राहायला कुमशेतला पण आधुनीक तंत्रज्ञानाला तेवढेच जवळ करणारे शिक्षक, माजुर्णे ते कुंभेवाडी चढउतार करणारे शिक्षक, स्वखर्चाने दररोज बाईकवरून बोरघरहून कामथ्याला येणारे शिक्षक, असे अनेक प्रकारचे शिक्षक मला माझ्या भटकंतीत भेटलेत. जोवर असे शिक्षक आहेत तोवर सह्याद्रीतील मुले काटेकुटे, दगड धोंडे, दर्‍या खोर्‍या आवडीने तुडवत राहतील यात मला शंका नाही.

"शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली" हे खरे पण यशाचे कुलुप उघडायला या डोंगरदर्‍यांतून राहणार्‍या लोकांना शिक्षण तर मिळाले पाहीजे. माझ्या सह्याद्रीतील वेगवेगळ्या भागांमधील ट्रेकिंगमधे अश्या अनेक शाळा बघायला मिळाल्या की ज्या बघून मी कधी स्मितीत झालो, कधी आश्चर्यचकीत झालो, कधी दु:खीकष्टी झालो तर कधी सुखावलो. शाळा हे ट्रेकर्सचे तसे हक्काचे निवार्‍याचे ठिकाण पण दमून भागून आल्यावर ज्या शाळेत निवारा घेतोय ती शाळा जर चालू असेल तर वेगळाच आनंद मिळतो. अन्यथा बंद पडलेल्या शाळेच्या वर्गात रात्रीचा निवारा घ्यायची कल्पना कुठल्याही ट्रेकर्सला दु:खदायकच असते. अश्या बंद पडलेल्या शाळेसाठी आपण खरेतर काही करू शकू की नाही हे मला माहीत नाही, पण दिवसेंदिवस अश्या बंद पडलेल्या शाळेचा काऊंट वाढू नये अशी प्रार्थना तर नक्कीच करू शकतो.

---------------

क्रमशः

Nisargsahyadreetrekking

प्रतिक्रिया

सुरेख व वेगळ्या विषयाला हात घालणारे लिखाण मनोज! लिहिता रहा!!

या व अशा अनेक सह्यपुत्रांची परवड पाहून पोटात ढवळुन येतं. सुरगाणा परीसरात असताना काहींचा आठवडी बाजार म्हणजे मीठ आणि केवळ लाल मिरच्या. कवडीमोल भावात धान्य विकणारे आदिवासी पाहिलेत. त्यांची अगत्यशीलता तर आपल्या थोबाडीत मारणारी आहे.

यशोधरा's picture

14 Aug 2018 - 2:08 pm | यशोधरा

सुरेख, संवेदनशील लिखाण.

सिरुसेरि's picture

14 Aug 2018 - 5:07 pm | सिरुसेरि

सुरेख आणी माहितीपुर्ण लेखन .

प्रचेतस's picture

14 Aug 2018 - 5:35 pm | प्रचेतस

खूपच छान लिहित आहेस. नागनाथबद्दलचं प्रातिनिधिक लिखाण फार आवडलं.

सह्याद्रीतल्या दुर्गम भागातील शाळा वेगळाच विषय. तुझ्या लेखनात त्याबद्दल वाचून छान वाटले. ह्या शाळा आणि छोटेखानी मंदिरे ह्या ट्रेकर्सचा हक्काचा निवाराच. खूप आठवणी जाग्या झाल्या.

दुर्गविहारी's picture

14 Aug 2018 - 6:52 pm | दुर्गविहारी

अफलातून लिहीले आहे. शाळाविषयक भावना अनुभवली असल्याने थेट पोहचली. अर्थात नागनाथही भेटले आहेतच. आणखी येउ द्या. पु.ले.शु.