आरशाला एक पत्र !

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
5 Aug 2018 - 11:44 am

आरशाला एक पत्र !
( आज तुला गेलेला तडा पाहताना , तू विखुरण्याच्या आधी , एवढंच सांगावंसं वाटतं ! )

नेहमीच का सगळ्यांनी माझ्या आधी निघून जायचं ?
आज तू तरी थांब, आणि मी आधी जाते.....
म्हणजे कधीतरी असं होईल कि
कुणाच्यातरी आयुष्यातून, ‘मी’ आधी निघून गेले !

रोज सकाळी तीच स्वप्ने घेऊन तुला पाहताना
स्वतःचे प्रतिबिंब पाहून तुझ्यावरच हसतांना ,
तूझ्या मध्ये दिसलेले पाणीदार डोळे पुसतांना
मी स्वतःला शोधत आहे कि अजून कुणाला
तुला हे कळत असेल सगळं ... म्हणून जरा थांब !

सोबतीचे आश्वासन तू दिले होतेस म्हणून
तू मला विसरणार नाहीस हि खात्री आहे म्हणून
तुझ्या शिवाय बोलायला कुणी नाही म्हणून
किंवा
तुझ्याशिवाय "माझे"असे कुणी नाही म्हणून....
म्हणून ..... तरी थांब !

मी खरी नसेन कदाचित, पण माझे डोळे आहेत
तू बघितले आहेस त्यांना स्वप्न रंगवताना
आणि हरवलेली स्वप्ने पुन्हा शोधतांना
एक स्वप्न ...... तुही पाहिलं होतंस या डोळ्यात .......
.....म्हणून तरी थांब !

काय हवंय तुला, सांग,
माझी सगळी सुखं दुःख गहाण ठेवेन हवं तर ....
स्वप्न ,इच्छा,भावना यांचा सौदा करू हवं तर .....
मी कफल्लक होईपर्यंत... जे मागशील ते देईन ....
फक्त तू थांब .....अजून काही क्षण ........

"त्याला " फक्त एकदा दाखव
त्याच्या प्रतिबिंबाशेजारी उभी असलेली, "माझी" सावली
त्याच्याच डोळ्यातून मनात आत आत उतरून
त्याला एकदा तरी जाणीव करून दे 'माझी '……..
फक्त एवढ्यासाठी थांब ...!

आयुष्य संपण्याच्या आधी हे त्याला कळायला हवं
नाहीतर दोघंही आम्ही स्वतःचे प्रतिबिंब बघत राहू ...स्वतंत्र
तडा गेल्यावर ..... तुझ्या विखुरण्याबरोबर बरंच काही तुटणारे,,,,,हे माहीत आहे तुला!

.....म्हणून क्षणभर तरी थांब !

........ फिझा

कविता

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

6 Aug 2018 - 6:21 pm | अभ्या..

वाह,
अप्रतिम.
आपल्या लौकिकाला साजेशीच कविता, अनवट अन अलौकिक.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Aug 2018 - 7:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

प्रगल्भ कविता..

बाजीगर's picture

9 Sep 2018 - 2:29 am | बाजीगर

धूक्यातून पाहतांना जसे काही दिसते न दिसते,
तशी वाटते आपली कविता.

काही कळले असे वाटते...एक पारदर्शी मन असलेली,संवेदनशील
पण तीचं मन समजून घेण्यात ,मत समजून घेण्यात,अस्तित्व समजून घेण्याची जवळच्या गरज वाटली नाही, प्रियजन बिछडे सभी बारीबारी ?

मग वाटते तसे नसावे.

स्टाईलाज्ड कविता,
मला आवडली.

फिझा's picture

11 Sep 2018 - 8:59 am | फिझा

प्रतिसाद आवडला!

श्वेता२४'s picture

11 Sep 2018 - 12:35 pm | श्वेता२४

फारच आवडली. भावली.