स्पर्श ...तसाही आणि असाही ..

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
23 Jul 2018 - 4:38 pm

स्पर्श ...तसाही आणि असाही ..
मी परत एकदा बँकेच्या पासबुकात निरखून बघितलं . फाईल मधल्या सगळ्या ठेवींच्या नोंदी बघितल्या.परत एकदा कागदावर केलेली आकडेमोड तपासून बघितली. पुढच्या तीन महिन्यांचे होणारे खर्च आईकडून तपासून घेतले. मला आपला रक्तदाब एकदम वाढलाय कि काय असे वाटायला लागले. हृदयातील धडधड एकदम मला स्वतःलाच एकू यायला लागली आहे ,असे वाटायला लागले. .... गेले २/३ तास माझा आणि माझ्या आईचा प्रयत्न चालला होता कि महिन्याचा खर्च कमी कसा करता येईल?दुधाचे बिल,वाण्याचे सामान,वीज ,बस चा खर्च,मोबाईल चे बिल,सोसायटी चार्जेस , पेट्रोल चा खर्च सगळे विचारात घेतले होते. वर्तमान पत्र बंद केले होते.घरकामाला येणाऱ्या बाईला या एक तारखेपासून येऊ नको असे सांगितले होते. माझ्या कॉलेजची फी अगोदरच भरली होती.सगळे सगळे विचारात घेतले होते. ....
कितीही बचत केली ,सर्व बँकेतील ठेवी मोडल्या तरी एकच उत्तर येत होते. आमच्या कडचे सर्व पैसे ३ महिन्यानंतर संपणार होते. त्या नंतर काय? आमचा उदरनिर्वाह कसा होणार होता? घराचे हप्ते विम्याच्या पैश्यातून पूर्ण भरले गेले नाहीत तर? आम्हाला हे राहते घर तर विकावे लागणार नाही? मग आम्ही राहू कुठे? प्रज्ञा मावशीची मदत घ्यावी का?शक्यतो मला माझ्या हिमतीवर हे घर चालवायचे होते.
परत परत एकच उत्तर येत होते.. मला शिक्षण सोडून नोकरी करावी लागणार होती.
२ महिन्यापूर्वीच माझ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचा private taxi चा व्यवसाय होता. महाबळेश्वर येथून एका कुटुंबाला घेऊन येताना त्यांच्या गाडीला एका बस ने धडक दिली होती. बाकी कुणाला फारशी दुखापत झाली नव्हती पण माझ्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताच्या विम्याचे पैसे ,गाडीच्या लोन फेडण्यात जाणार होते. वडिलांच्या विम्याचे पैसे मिळणार होते पण त्या विम्यावर घराचे लोन काढले होते. आमच्या हातात फार थोडी रक्कम येणार होती. पण बहुतेक EMI संपणार होते.
मी माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या आईकडे बघितलं.२ महिन्यात किती थकलेली आणि पराभूत दिसायला लागली होती ती. नाहीतर किती आनंदी आणि सतत सर्वांशी खूप गप्पा मारणारी माझी आई कालपरवापर्यंत माझ्या डोळ्यासमोर होती.. गेल्या दोन महिन्यात एकदम अबोल आणि गलितगात्र झाल्यासारखी झाली होती ती.... डोळ्याभोवती काळी वर्तुळे दिसायला लागली होती. डोळे एकदम खोल गेल्यासारखे दिसत होते. अस्ताव्यस्त केस,आणि पांढऱ्या रंगाची कुठली तरी जुनी साडी नेसलेली माझी आई किती केविलवाणी दिसत होती.आपल्या हातापायातील सारी शक्ती कुणीतरी काढून घेतल्या सारख्या हालचाली करणारी.......बऱ्याच वेळा ती उगीचच कुठे तरी भकास नजरेने पहात बसलेली मला दिसे.. मीच मग तिला काही तरी करून बोलकी करत असे. आमच्या कॉलेज मधील काही घटना सांगत असे. काही वेळा आई कृत्रिम का होईना हसत असे. मला मग गड जिंकल्यासारखा आनंद होई..मी त्यांची एकुलती एक मुलगी . आता मलाच काहीतरी करणे भाग होते. पण नोकरी करायचा निर्णय एवढा सोपा नव्हता.. मी B.Com. च्या शेवटच्या वर्षात होते.. मी CA(CharteredAccountancy) ची Intermediate परीक्षा पास झाले होते आणि माझे अजून ६ महिने articleship चे शिल्लक होते.. नोकरी करायची म्हणजे मला CA करता येणार नव्हते.माझी आतापर्यंतची मेहनत वाया जाणार असे चित्र दिसत होते.. मी ज्या फर्म मध्ये जात होती ती खूप मोठी आणि प्रसिद्ध होती. माझ्या सरांनी मला आपण यातून काही तरी मार्ग काढू असे वचन दिले होते ,पण या गोष्टीला एक आठवडा उलटून गेला होता. अजून काही मार्ग दिसत नव्हता.
एका क्षणात नियती माणसाचे सारे जीवन बदलून टाकते असे मी कथेत आणि कादंबऱ्यात वाचले होते. माझ्याच जीवनात मला ते अनुभवला येईल असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.
पण मला आता हात पाय गाळून चालणार नव्हते.
मी नाईलाजाने नोकरी करायचा निर्णय घेतला होता. म्हणजे त्या दिशेने शोध तरी सुरु करायचा असे ठरवले होते. . वर्तमानपत्रातील जाहिराती बघून मी अनेक अर्ज केले होते. फार कमी ठिकाणी मला मुलाखतीला बोलावले होते. २/३ ठिकाणी माझी मुलाखत चांगली होऊन सुद्धा मला कुठेही अजून नोकरी मिळाली नव्हती. या सगळ्या प्रकारात १/२ महिने होऊन गेले होते. आता काहीतरी लवकरात लवकर करणे जरुरी होते. काही दिवसांपूर्वी मला समजले होते कि भोसरी मधील एका कंपनीला त्यांच्या ऑडीट खात्यात एका जुनिअर माणसाची जरुरी आहे.. मी त्या कंपनीची सारी माहिती काढली होती. आणि लगेच आपला अर्ज पाठवून दिला होता. आज दुपारी मला त्यांनी मुलाखतीला बोलावले होते. देवाला आणि आईला नमस्कार करून मी वेळेवर कंपनीत पोचले.. HR ने माझ्या कडून एक फॉर्म भरून घेतला,माझी सर्व प्रमाणपत्रे तपासली आणि मला Audit Manager कडे पाठवले. बराच वेळ मला Manager च्या कॅबीन बाहेर बसवून ठेवण्यात आले. काही वेळाने मला आत बोलावण्यात आले. मी अधिकाऱ्याचे नाव आधीच बघून ठेवले होते.श्री .सुधीर सोळंकी.
टेबलामागे एक टक्कल पडलेला ,मध्यम वयाचा माणूस बसला होता. पांढरा शर्ट आणि भडक पिवळ्या रंगाचा टाय त्याने घातला होता. कसला तरी उग्र सेंट चा वास मला आत येताच जाणवला.त्याने आपला निळ्या रंगाचा कोट आपल्या मागे खुर्चीला अडकवला होता. टेबलावर अनेक फाईल्स अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. त्यांच्या खुर्चीच्या मागे भडक रंगसंगती असलेले एक कसले तरी अगम्य पेंटिंग होते. या माणसाला रंगाचा सेन्स अजिबात नसावा !
मला पाहून त्याने स्मित केले ,पण परत मान खाली घालून आपल्या समोरचा कागद पाहायला सुरुवात केली. मी त्याच्या टेबलासमोर तशीच अवघडून उभी होते.. आपल्याला बसायला सांगत नाहीत तो पर्यंत उभे राहायला पाहिजे हे मला माहित होते. मी तशीच उभी होते. थोडा वेळ असाच शांततेत गेल्यावर सोळंकीसाहेबांनी मान वर केली. मला जणू पहिल्यांदाच पहात आहोत असे भासवत ते म्हणाले,
“ अरे ,तुम्ही उभ्या का? बसा ना!”
“ धन्यवाद सर!” मी खाली बसले. आणि माझी सगळी प्रशस्तीपत्रे असलेली फाईल त्यांच्या हातात दिली.
“ अरे वा! तुम्ही CA ची एक परीक्षा पास झालात वाटते?” साहेब माझी फाईल चाळत म्हणाले. त्यांनी आता आपला जाड भिंगाचा चष्मा आपल्या डोळ्यावर ठेवला होता आणि ते आपल्या भेदक डोळ्यांनी माझ्या कडे पहात होते. त्या चष्म्यातून त्यांचे डोळे उगीचच खूप मोठे दिसत होते.एकंदरीत मला ते ५०/५५ वर्षाचे असावेत असे वाटले.
“ होय ,सर! मला पहिला वर्ग मिळाला आहे” मी म्हणाले..
“ yes,yes . छान मार्क्स आहेत तुम्हाला.पण मग पुढची परीक्षा न देता नोकरी का बघत आहात ?”
“ घरचे काही प्रोब्लेम्स आहेत सर!”
“ CA सोडून नोकरी ? तुम्हाला मार्क चांगले आहेत . Any major problem?”
“ ४ महिन्यांपूर्वी माझे वडील एका अपघातात गेले. मी त्यांची एकुलमी एक मुलगी आहे.मला नोकरी करायलाच पाहिजे.” मी सांगितले.. मला खरे तर आपले वैयक्तिक प्रोब्लेम्स असे चारचौघात सांगायला आवडत नसे ,पण मला हे सांगणे भाग होते. मला असंही जाणवले कि मला हे असे आता बऱ्याच जणांना सांगायला लागणार आहे . मला नोकरी मिळेतो पर्यंत तरी. माझ्या नकळत माझ्या डोळ्यांत पाणी आले. मला आपल्या भावना अश्या दाखवायच्या नव्हत्या.पण माझ्यावर झालेला आघात इतका ताजा होता कि ,माझा स्वतःवर ताबा राहिला नाही.
“ ओह ,सो sorry to hear that !” सोळंकी साहेब म्हणाले.त्यांनी बघितलं कि माझ्या डोळ्यात पाणी आले होते. ते ताबडतोब आपल्या खुर्चीतून उठले.समोरच्या टिशू होल्डर मधून दोन तीन टिशू काढले आणि ते माझ्या खुर्ची जवळ आले.
“ हे घ्या ! तुम्हाला आता खूप धीराने घ्यायला हवे.” असे म्हणून टिशू माझ्या हातात ठेवले. ते टिशू माझ्या हातात ठेवताना माझ्या बोटांना त्यांनी सहज स्पर्श केला.माझ्या बोटांवरून आपली बोटे फिरवली. सहजपणे हालचाल झाल्यासारखी. मग ते माझ्या मागच्या बाजूला आले. माझ्या दोन्ही खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवत त्यांनी मला थोपटल्या सारखे केले.आणि पटकन आपल्या खुर्ची कडे वळले.पण जाताना माझ्याकडे पहात म्हणाले.
“ असा धीर सोडून कसे चालेल? आता तर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे ना?”
आपल्या बोटांवरून एकदम काहीतरी घाणेरडे,खरखरीत आणि किळसवाणे गेल्यासारखे मला वाटले. खांद्यावर तर एकदम मला पाल पडल्यासारखे वाटले. मी दचकून सोळंकी साहेबांकडे पाहिले.हे जे घडतंय ते खरच घडतंय कि माझ्या कल्पनाशक्तीचे खेळ आहेत?
तेवढ्यात ते आपल्या खुर्चीकडे गेले होते आणि खुर्चीत बसत त्यांनी माझी फाईल परत बघायला सुरुवात केली.. माझ्याकडे बघायचे टाळत ते म्हणाले,
“ तुमची articleship पण अजून पूर्ण झाली नाही.पण या काळात तुम्ही कोण कोणती audits केलीत? काय काय काम केलेत ते मला सांगा ?”
मी आपण केलेल्या कामाची माहिती दिली. मी बोलत होते , पण माझ्या मनातून सोळंकी साहेबांचा माझ्या बोटांना झालेला स्पर्श आणि त्यांनी माझ्या खांद्यावर ठेवलेले हात जात नव्हते.
मला पुरुष स्पर्श नवा नव्हता.मी बऱ्याच ऑडीटला वेगवेगळ्या कंपनीत गेले होते.. पुरुषांशी हस्तांदोलन मला नवीन नव्हते.काम करताना पुरूष सहकार्यांच्या शरीराचा स्पर्श हि मला नवीन नव्हता.फर्म मध्ये आणि कॉलेज मध्ये माझे मित्र होते. त्यांच्याबरोबर दुचाकी वरून जाताना हि मला फारसे वावगे वाटले नव्हते. किती तरी माझ्या जवळच्या मित्रांनी काही प्रसंगात माझ्या खांद्यावर हात ठेवला होता. . मग हा स्पर्श ? असे किळसवाणे का वाटले मला? हा भास होता कि सत्य?खरे तर सोळंकी साहेब माझ्या वडिलांच्या वयाचे होते.
कशी बशी हि मुलाखत संपवावी आणि इथून बाहेर जावे असे मला वाटत होते. .मी काय बोलत होते, ते माझे मलाच कळत नव्हते.
“ मिस हेमा पाटील , तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे ऑडीटचा .तुम्ही ज्या फर्म मध्ये काम करत आहात ती खूप चांगली आहे. तुम्हाला आम्ही ऑफर देऊ शकतो .पण फक्त एकच प्रोब्लेम आहे!”सोळंकी साहेब म्हणाले.
मी आता खूपच सावरले होते.. आपल्यालाही नोकरी मिळवणे किती महत्वाचे आहे याची मला जाणीव होती . बाकी सोळंकी साहेबांच्या प्रश्नांवरून आणि मी आत्मविश्वास पूर्वक दिलेल्या उत्तरांवरून , आपल्याला ही नोकरी मिळणार असे मला वाटू लागले होतेच .
“ काय प्रोब्लेम आहे सर?” मी म्हणाली.
“ आमची कंपनी २ वर्षाचा बॉंड घेते. तुम्हाला २ लाख रुपयांचा बॉंड द्यावा लागेल. तुम्ही जर २ वर्षात नोकरी सोडली तर तुम्हाला २ लाख रुपये भरावे लागतील . अर्थात तुम्ही जर पुढे मागे CA झालात तर आमची कंपनी तुमचा पगार वाढवून देईल. तुम्ही विचार करा.आमची कंपनी तुम्हाला महिन्याला सर्व मिळून ५०००० रुपये पगाराची ऑफर देवू शकते.” सोळंकी साहेब म्हणाले.
मला आपण या भल्या माणसाबद्दल उगीचच शंका घेतली असे वाटायला लागले. पण बॉंड ची अट मला जाचक वाटत होमी. महत्वाचे निर्णय मी कधीही असे तडकाफडकी घेत नसे.
“ सर ,मी विचार करून १/२ दिवसात सांगितले तर चालेल ?” मी म्हणाली.
सोळंकी साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या.त्यांनी माझ्या कडे जरा रोखून पाहिलं.त्यांची नजर आपल्या सर्वांगावरून फिरते आहे ,जणू ते आपले वस्त्र हरण करत आहेत असे काहीसे मला वाटले. त्यांची नजर पाहून मी पुन्हा अस्वस्थ झाले..
“ हेमा ! तुम्ही माझ्या पेक्षा वयाने खूप लहान आहात.तुमच्याशी मी एकेरीत बोललो तर चालेल का?”
मी नाखुषीनेच मान होकारार्थी हलवली. सोळंकी साहेबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले.
“ हेमा ! तुझ्या वरचा प्रसंग पाहून मला खूप वाईट वाटते आहे. येवढी हुषार मुलगी तू! काही महिन्यात सहज CA झाली असतीस .पण काय प्रसंग आलाय? तुझ्या कडे बघून मी खूप चांगली ऑफर तुला देतोय.आता विचार कसला करते आहेस?” परत ती जीवघेणी नजर.
“ सर ,मी तुमची आभारी आहे,पण या बॉंड बद्दल मला विचार करायला लागेल.”
“ ठीक आहे. मी पण आमच्या डिरेक्टर साहेबांशी या बॉंड बद्दल बोलतो. मला कळतंय कि अट जाचक आहे. हा बॉंड तुझ्या केस मध्ये रद्द करता येईल का ते मी बघतो. ते खरे तर माझ्या शब्दाबाहेर नाहीत पण त्यांना विचारले पाहिजे ना?”
असे बोलत सोळंकी साहेब उभे राहिले आणि माझ्या जवळ आले. मी पण उभी राहिले..त्यांनी आपला हात पुढे केला.
“ सो हेमा ! बेस्ट ऑफ लक टू यू !”
मी नाखुषीने आपला पण हात पुढे केला. सोळंकी साहेबांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या दोन्ही हाताने दाबला.
“ आमच्या ऑडीट शाखेला तुझ्यासारख्या हुशार आणि स्मार्ट मुलीची खूप गरज आहे. आमची कंपनी खूप develop होते आहे.दिल्ली, बेंगलोर,हैद्राबाद,मुंबई,मद्रास इथे आमच्या शाखा आहेत.ह्या सर्व ठिकाणची ऑडीट तुला करावी लागतील , अर्थात तू सगळीकडे विमानाने फिरशील ! you have a great future here! तर लगेच निर्णय घे आणि लगेच जॉईन हो ! काय?” असे काही तरी ते बोलत राहिले.पण हे सगळं बोलत असताना त्यांनी माझा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट धरून ठेवला होता. मी आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला पण सोळंकी साहेबांनी तो तसाच धरून ठेवला होता. मग थोड्या वेळाने ,माझा हात त्यांच्या हातात आहे हे आपल्या आत्ताच लक्षात येत आहे असे दाखवत त्यांनी माझा हात सोडला.
“ ओह ! तर माझ्या शुभेच्छा! तुझा बॉंड रद्द होईल असे मी काही तरी करतो. एका आठवड्यात तुला ऑफर येईल. सहा महिन्यात आपण परत तुझा पगार वाढवू.अर्थात तुझ्या कामाच्या प्रगतीवर अवलंबून आहे ते! हा घे तुझा गेट पास.” सोळंकी साहेब म्हणाले.
मी गेट पास घेतला आणि मी कॅबिनच्या दाराकडे निघाले. . पण येवढा वेळ मला जी शंका होती ती जाऊन मला पक्की खात्री झाली होती कि सोळंकी साहेब माझा गैरफायदा घेत आहेत. मुलींच्या शोषणाबाबत मी अनभिज्ञ नव्हते, पण माझ्यावर असा प्रसंग येईल अशी मी कल्पना पण केली नव्हती. पण मी आता पूर्ण सतर्क होते. मी या लंपट माणसाला, माझा आणखीन फायदा घेऊ देणार नव्हते.
मी दाराकडे जाताना ,सोळंकी साहेब पण माझ्या मागे आले. मी दार उघडण्यासाठी हात पुढे केला.पण मला आपल्या मागे काहीतरी हालचाल जाणवली म्हणून पटकन मागे वळून पहिले. माझा अंदाज खरा ठरला. सोळंकीसाहेब माझ्या मागेच होते.
“ हेमा ,मला तीन दिवसांनी फोन कर. तो पर्यंत तुझ्या बॉंड चा प्रश्न मार्गी लागला असेल.” असे म्हणत त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि तो हळूच माझ्या कंबरे पर्यंत आणला.... .मी झुरळ झटकावे तसा तो हात झटकला आणि मला स्वतःला सुद्धा काही कळायच्या आत सोळंकी साहेबांना एक सणसणीत थोबाडीत ठेऊन दिली.
“ फट.......” असा काही तरी आवाज त्या कॅबीन मध्ये घुमला.
मी पटकन दार उघडले आणि बाहेर पडले . कॅबिनच्या बाहेर तेव्हा सुदैवाने कोणी नव्हते. सोळंकी साहेब माझ्या मागे येतील अशी मला भीती वाटत होती ,त्यामुळे आपली फाईल सावरत मी तातडीने तिथून बाहेर पडले . माझे सर्वांग थरथरत होते. कपाळावर घाम आला होता. मला आपले शरीर तापाने फणफणले आहे असे वाटायला लागले होते..
एखाद्या मुलीला नोकरीची गरज आहे आणि आपण ती देऊ शकतो या गुर्मीत हा माणूस आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीचा एवढा गैरफायदा कसा काय घेऊ शकतो? का ही यांची सवयच आहे? यांना कुणीच आजवर विरोध केला नसेल ?
राग आणि किळस अश्या काही तरी संमिश्र भावनेच्या तिढ्यात आपण अडकलो आहोत असे काहीतरी मला वाटायला लागले. मला परत परत माझ्या हातावरचा तो खरखरीत स्पर्श आठवत होता. आपल्या अंगावर कुणी तरी काहीतरी घाण आणि बुळबुळीत टाकले आहे आणि ते आपल्याला काढून टाकता येत नाही असे मला वाटत होते. आपली स्कूटर घेऊन मी घरी कशी आले ते माझे मलाच समजले नाही.
मी घरी आले आणि मला सोफ्यावर प्रज्ञा मावशी बसलेली दिसली... तिला बघताच माझा सगळा ओढून तोढून आणलेला धीर जणू गळून पडला. मी प्रज्ञा मावशीच्या कवेत स्वतःला झोकून दिले आणि ओक्साबोक्शी रडू लागले.. प्रज्ञा मावशीने मला बराच वेळ रडू दिले. तेवढ्यात आई सुद्धा स्वयपाक घरातून बाहेर आली. तिला काहीच कळेना पण तिनेही माझा हात हातात घेतला.
“ काय झालं बाळा ! मला नीट सगळं सांग बघू!” प्रज्ञा मावशी म्हणाली.
मी डोळे पुसत प्रज्ञा मावशी कडे बघितलं. तिच्या कडे पाहताच मला नेहमी आपल्या मावशीचा अभिमान वाटे तसाच आत्ताही वाटला. ही माझ्या आईची लहान बहिण. हिंजेवाडीतील Datson software नावाच्या आंतरराष्ट्रीय कंपनीत ती Project Manager होती . सारखी परदेशातच असे ती .
बाबा गेले तेव्हाही ती सिंगापोरला होती . इथे एक आठवडा राहून परत गेली. गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि राखाडी रंगाची जीन्स घातलेली प्रज्ञा मावशी काळी असली तरी खूप स्मार्ट दिसे. तिचे बॉब कट केलेले आणि खांद्यापर्यंत रुळणारे केस प्रज्ञा मावशीला खूप शोभून दिसत. चाळीशीत असूनही तिने लग्न केले नव्हते आणि ती मला आपली मुलगीच माने.
मी घडलेला सर्व प्रसंग सांगितला.ते ऐकताना प्रज्ञा मावशी सोफ्यावरून उठली आणि दिवाणखान्यात फेऱ्या मारू लागली. ही तिची नेहमीची सवय. सर्व प्रसंग ऐकताना प्रज्ञा मावशी गंभीर झाली.तिने आपल्या मुठी आवळलेल्या मला दिसल्या. आई पण गंभीर झाली होती. शेवटी मी आपले सांगणे संपवले. बराच वेळ मग कोणीच काही बोलले नाही.मग प्रज्ञा मावशी थोडीशी हसली. माझ्या कडे पहात ती म्हणाली,
“ मग ,कळले कि नाही त्या लंपट पुरुषाला ?कि तुझी गाठ एका असहाय कोमलांगीशी नसून कणखर दुर्गेशी आहे हे?”
हे प्रज्ञा मावशीचे नेहमीचे होते.गंभीर प्रसंगात सुद्धा ती विनोद बुद्धी सोडत नसे.
मला पण थोडे हसू आले. आपल्या बाबांनी मला लहानपणापासून कराटे शिकायला लावले होते याचे मला आता महत्व कळले. लहानपणी मला कंटाळा यायचा पण आज मी आपल्या बाबांची ऋणी होते..
“ हेमा ,मला एक सांग! हे नोकरीचे खूळ मधेच काय काढलेस?तुला CA पूर्ण करायचे आहे ना?” मावशी म्हणाली.
“ आमची सध्याची परिस्थिती पाहता मला नोकरी करणे जरुरीचे आहे!” मी म्हणाले .
“ हेमा ,मी जिवंत आहे ना अजून ? लहानपणी तू मला काय म्हणायचीस तुला आठवते आहे ना?” मावशी जरा चिडूनच म्हणाली.”
“ हो. छोटी आई !”
“ मग ! ते काही नाही ! आता पुढचे वर्ष फक्त अभ्यास आणि अभ्यास .तुला नोकरी करायची काहीही गरज नाही. तुझे शिक्षण होई पर्यंत मी आता इथेच राहायला येणार आहे. ताई आणि मी आत्ता तेच बोलत होतो. माझा कोथरूड चा flat मी भाड्याने देणार आहे.नाही तरी मी बरेच दिवस परदेशी असते. मी तिथे राहिले काय आणि इथे राहिले काय?’” मावशीने प्रश्न निकालात काढला.
“ मावशी मी जरा स्वच्छ अंघोळ करून येते. मला खूप ओंगळ आणि अपवित्र काहीतरी माझ्या अंगावर पडले आहे असे वाटते आहे” मी म्हणाले आणि नंतर मी बाथरूम मध्ये गेले..किती तरी वेळ साबणाने सर्वांग घासून स्नान केले तरी माझे समाधान होईना.जरा वेळाने मी कपडे बदलून बाहेर आले आणि प्रज्ञा मावशी शेजारी बसले..
“ हेमा ,आजचा हा प्रसंग घडला त्या वरून तुला एक धडा घ्यावा लागेल. या विषया बद्दल बरेच दिवस मला तुझ्याशी बोलायचे होते” मावशी म्हणाली.
“ म्हणजे काय? काय बोलायचे आहे.” मी म्हणाले..
“तू अश्या क्षेत्रात जात आहेस ज्या क्षेत्रात तुला बऱ्याच वेळा पुरुष सहकाऱ्यांच्या सहवासात रहायला लागणार आहे. बरेच असंस्कृत पुरुष तुझा गैरफायदा घ्यायला टपून असतील . केव्हा ते मित्र म्हणून तर केव्हा तुझे सहकारी म्हणून, तर केव्हा तुझे वरिष्ठ म्हणून ते तुझ्या जवळ अनेकदा येतील. आजकाल च्या मुक्त वातावरणात पुरुषाचा स्वीकार्य आणि अस्वीकार्य स्पर्श कोणता याचा विवेक तुला कायम ठेवायला हवा. तुला अनेक पार्ट्या मध्ये जायला लागेल.अनेक समारंभात जायला लागेल.अनेक पुरुष तुझ्या भोवमी घोटाळतील . तुला सुद्धा काही पुरुषांचे आकर्षण वाटेल.
पण एक लक्षात ठेव ,रामायणात सीतेसाठी एक लक्ष्मणरेषा , लक्ष्मण काढून गेला होता. आता मात्र अशी रेषा तुझी तुलाच काढायला आणि ती पाळायला शिकायला पाहिजे. आणि एखाद्या पुरुषाने ती रेषा ओलांडली तर आज जसा तू त्या सोळंकीला धडा शिकवलास तसा त्या पुरुषालाही शिकवायला पाहिजे. अर्थात तू सुद्धा ती रेषा योग्य पुरुष तुझ्या आयुष्यात येई पर्यंत ओलांडता कामा नयेस.” प्रज्ञा मावशी म्हणाली.
“ पण मावशी अशी रेषा आपणच का काढायची? पुरुषांची काहीच जबाबदारी नाही ?” मी विचारले.
“ का नाही? त्यांची ही ती जबाबदारी आहे. किती तरी पुरुषांची सुद्धा अशी एक लक्ष्मणरेषा असते. ते स्त्रियांना ती ओलांडून देत नाहीत. ते स्त्रियांना खूप आदराने आणि माणुसकीने वागवतात. जगात सोळंकी सारखे पुरुषच फक्त आहेत असे नाही.आजकालच्या जगात बऱ्याच स्त्रियां सुद्धा अशा आहेत कि ज्या, पुरुषांचा वापर करून आपले ध्येय साध्य करून घेतात. पण आपण तुझ्या बद्दल बोलतोय म्हणून मी तू लक्ष्मणरेषा काढावीस असे म्हणते आहे.” मावशी म्हणाली.
थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. मग माझी आई म्हणाली.
“ प्रज्ञा म्हणते ते काही खोटे नाही.पण मला तुला याची एक वेगळी बाजू सुद्धा सांगायची आहे. सगळेच पुरुष काही लांडगे नसतात.जगात सुसंस्कृत पुरुष ही खूप आहेत. ते तुझ्या आयुष्यात तुझे बाबा म्हणून आले होते,तुझ्या फर्म मध्ये किवा तुझ्या कॉलेज मध्ये तुझे शिक्षक म्हणून आहेत.तुझे खूप चांगले मित्र म्हणून आहेत. तुझा एखादा मानलेला भाऊ म्हणून येईल.काही दिवसांनी एखादा सुंदर राजकुमार तुझ्या आयुष्यात तुझा जीवन साथी म्हणून येईल. प्रेम खूप सुंदर असते. ते शब्दांपेक्षा स्पर्शाने आणि नजरेने जास्त गहिऱ्या पद्धतीने व्यक्त करता येते.तेव्हा प्रत्येक स्पर्शाकडे संशयाने बघू नकोस.आजचा अनुभव तुला लवकर विसरता येणार नाही पण हा अनुभव प्रत्येक स्पर्शा मध्ये आणू नकोस. तसा प्रयत्न कर...... नाही तर तू जीवनातल्या खूप सुंदर अनुभवा पासून वंचित राहशील.आपल्या जोडीदाराचा आश्वासक आणि मधाळ स्पर्श तुम्हाला जीवनात किती उभारी देतो याची कल्पना तो स्पर्श अनुभवला तरच येऊ शकते.” आई म्हणाली आणि ती थोडी हसली.मला खूप बरे वाटले.आज माझी आई किती दिवसांनी हसली होती .
“ का हसलीस?” मी विचारले.
“ आयुष्याची सुरुवात करताना आनंदाने आणि हे जग सुंदर आहे या भावनेने कर. नाहीतर आहेच या प्रज्ञा सारखे !” आईने प्रज्ञा कडे हसून पहिले.
“ माझ्या सारखे म्हणजे कसे? काय म्हणायचे आहे तुला ताई?” मावशी म्हणाली.
“ म्हणजे ,हेच अविवाहित रहायचे !” आई म्हणाली. प्रज्ञाचे लग्न न करणे हा त्यांच्या दोघीतला एक कायमचा वादाचा विषय होता.पण या वेळी मावशी हसली.
“ हो पण मला पुरुष स्पर्श वर्ज्य नाही !” प्रज्ञा मावशी म्हणाली. आईने प्रज्ञाकडे डोळे वटारून बघितलं.
“ पण मी म्हणाले तशी लक्ष्मणरेषा मी माझ्यापुरती आखली आहे आणि ती मी नेहमी पाळते.”प्रज्ञा मावशी म्हणाली.
“हेमा, आजच्या जगात तर ही लक्ष्मणरेषा खूप गरजेची आहे. आजकालची मुले मुली एकमेकांच्या गळ्यात गळे काय घालतात , टू व्हीलर वर चिकटून काय बसतात एकमेकांच्या अंगचटीला काय येतात!,.......आज काल सगळे असेच करतात ..... या वाक्याचा आधार घेऊन तुम्ही स्त्री पुरुष स्पर्श सवंग करून टाकला आहे!” आई म्हणाली. आईच्या सांगण्यात तथ्य होते . मी सुद्धा थोड्या फार प्रमाणात याची दोषी होते.
मी त्या दोघींचाही हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले ,
“ होय! मी पण माझी लक्ष्मणरेषा आखून ठेवीन आणि माझा राजकुमार मला भेटेपर्यंत सर्वांना पाळायला सुद्धा लावीन!” मी म्हणाले..
“ नाही तर आहेच आमच्या कणखर दुर्गेचा प्रसाद!” प्रज्ञा मावशी हसत म्हणाली. मग त्या तिघीही हसायला लागल्या.आमच्या घरात किती तरी दिवसांनी हास्य फुलले होते.
खरच!...... माणसाला आनंदी व्हायला किती लहानशी घटना पुरते नाही?
तेवढ्यात माझा मोबाईल वाजला.माझा खूप जवळचा मित्र विराज काळे बोलत होता. हा पण CA होता ,पण मला २/३ वर्षे सिनिअर होता. एका आंतरराष्ट्रीय फर्म मध्ये होता. लंडन मध्ये सध्या तो प्रोजेक्ट करत होता. बाबा गेले तेव्हा तो इथे नव्हता.आम्ही फोनवर बोललो होतो.आज सकाळीच तो आला होता. त्याला माझ्या आईला आणि मला भेटायचे होते.
“ मला घरात खूप कोंडल्यासारखे झाले आहे. आपण कॉफी हाउस ला भेटूया का?” मी त्याला सांगितले.
“ हेमा ,पण मला तुझ्या आईला आणि मावशीला भेटायचे आहे!” विराज म्हणाला.
“ मग आपण असे करू.तू मला पिक अप कर,आपण कॉफी घेऊ आणि आणि परत येताना तू आमच्या घरी ये” मी मार्ग सुचवला.
आम्ही कॉफी हाउस मध्ये कॉफी घेता घेता बोलू लागलो. मला खूप काही त्याला सांगायचे होते. विराजला ही खूप काही बोलायचे होते.
“ हेमा. ह्या सगळ्या प्रसंगात मी तुझ्या बरोबर नव्हतो ,याचे मला खूप वाईट वाटते आहे...... मी परत यायचा खूप प्रयत्न केला पण ,नाही जमले!” विराज म्हणाला.
“ अरे,तू प्रोजेक्ट वर होतास! तू तरी काय करणार ? मला समजू शकते ते. आणि फोन वर तुझ्याशी बोलून सुद्धा मला किती आधार वाटत होता”
“ मी तुला फोन वर पण सांगितले आणि आत्ता ही सांगतो. मी सर्व बऱ्यावाईट प्रसंगात तुझ्या बरोबर असेन” त्याच्या या बोलण्याने माझ्या मनात एकदम एखादा बांध फुटावा तसे झाले. बाबांचा अपघाती मृत्यू,आईची वेदना,आमची फरफट,आणि त्यात आजचा प्रसंग. आज जणू काही माझ्या रडण्याचा दिवस होता. माझ्या डोळ्यातून परत अश्रुपात सुरु झाला. मला खूप लाजल्यासारखे झाले होते ........चारचौघात असे रडताना. लोक काय म्हणतील ? विराज ला किती अवघडल्यासारखे वाटेल?
विराज काही बोलला नाही. त्याने फक्त माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि माझ्याकडे आपुलकीने पहात तो शांत बसून राहिला.
मला खूप आतून जाणवले कि ,हृदयातील प्रेम जर स्पर्शातून फुलले तर तो स्पर्श अमृताचा असतो.सर्वांग रोमांचित करणारा असतो. पण तोच स्पर्श जर प्रेम विरहीत असेल तर तो काटेरी झुडपासारखा आणि विषारी भासू शकतो.
त्या सोळंकीनी केलेलाही पुरुषाचा स्पर्शच होता आणि विराजनी केलेला सुद्धा पुरुषाचा स्पर्शच होता .......पण अनुभव किती भिन्न. दोन ध्रुव जणू .
विराजचा स्पर्श झाला आणि मला वाटले ,कि आसमंतात एकदम स्वर्गीय सुगंध दाटून आला आहे.चोहोबाजूंनी प्राजक्ताच्या फुलाचा सडा पडावा तसा.
त्या स्पर्शात सोळंकींचा तो घाणेरडा,ओंगळ स्पर्श, विरघळून गेला.... वाहून गेला.....दाटून आलेले मळभ जाऊन स्वच्छ सूर्यप्रकाश पडावा आणि आसमंत सोनेरी प्रकाशात बुडून जावा तसे काही तरी मला वाटले.
मला एक नवी उमेद आली. बाबा नसलेल्या जगात जगण्याची !.........
...................................................................................................

लेखक .
जयंत नाईक.
ही माझी कथा सुवासिनी मासिकाच्या जुलै १८ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

कथालेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

23 Jul 2018 - 6:59 pm | उगा काहितरीच

टिपीकल असली तरी आवडली कथा. छोटाच , साधा प्रसंग पण छान फुलवलात . सगळेच स्पर्श एकसारखे नसतात हे वाचून खूप छान वाटलं . बऱ्याच वेळी पुरूषाला , स्पर्शाला वाईट ठरवून मोकळे होतात. असो ! एकंदरीत छान आहे कथा.

Jayant Naik's picture

24 Jul 2018 - 1:51 am | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jul 2018 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

टिपीकल असली तरी आवडली कथा.

+१

प्रसंग फुलवून सांगण्याच्या तुमच्या कौशल्याने कथा सुंदर झाली आहे.

Jayant Naik's picture

24 Jul 2018 - 1:53 am | Jayant Naik

आपल्या लेखा मध्ये असलेल्या याच कौशल्यावर मी फिदा आहे !

चांदणे संदीप's picture

24 Jul 2018 - 5:03 am | चांदणे संदीप

हिंजवडी असं नाव आहे गावाचं.

Sandy

Jayant Naik's picture

27 Jul 2018 - 4:50 pm | Jayant Naik

मान्य.

जेम्स वांड's picture

24 Jul 2018 - 12:58 pm | जेम्स वांड

आवडली, तरल आहे एकदम कथा. म्हणजे प्रत्येक पुरुष वखवखलेला नसतो तसेच मर्यादा पुरुषोत्तमही नसतो हा समतोल आवडला, पण उत्तम पुलावात खडा यावा तसे एक वाक्य खटकले

ते म्हणजे "मावशी काळी होती तरी स्मार्ट होती

हे वाक्य, अजाणतेपणी काळेपणा/सावळेपणाला व्हीलिफाय केलं गेलंय का? मावशी इतकी यशस्वी आहे तर तिच्या त्या यशातलेच काहीतरी तिची व्यक्तिरेखा खुलवायला वापरलं असतं तर जास्त आवडलं असतं. कितीतरी "काळ्या पोरी" प्रचंड यशस्वी असतात दीपिका पदुकोण, चित्रांगदा सिंग, वगैरे तारकाही आल्या की त्यात! बघा विचार करून, जाणवलं ते लिहिलं.

लिहिण्याच्या ओघात तसे लिहिले गेले. कोणालाही दुखावण्याचा अजिबात हेतू नाही . तरीही माफ करावे. इंग्रजांनी आपल्या मनावर जे गोऱ्या रंगाबद्दल नको इतके आकर्षण निर्माण केले आहे त्याचा कुठेतरी प्रभाव असावा. पण या पुढे नक्की काळजी घेईन . तसा मी सुद्धा सावळाच आहे.

शब्दबम्बाळ's picture

27 Jul 2018 - 10:28 pm | शब्दबम्बाळ

+1

ज्योति अळवणी's picture

24 Jul 2018 - 10:28 pm | ज्योति अळवणी

आवडली कथा.

Jayant Naik's picture

27 Jul 2018 - 4:44 pm | Jayant Naik

आपल्या नेहमीच मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल आभार.

चौथा कोनाडा's picture

25 Jul 2018 - 12:52 pm | चौथा कोनाडा

वाह, खुप सुंदर ! अतिशय ओघवते लेखन आहे ! एकदा वाचायला घेतली ते लेखनशैलीने शेवटपर्यंत वाचावयास लावली !

रामायणात सीतेसाठी एक लक्ष्मणरेषा , लक्ष्मण काढून गेला होता. आता मात्र अशी रेषा तुझी तुलाच काढायला आणि ती पाळायला शिकायला पाहिजे.

किती तरी पुरुषांची सुद्धा अशी एक लक्ष्मणरेषा असते. ते स्त्रियांना ती ओलांडून देत नाहीत. ते स्त्रियांना खूप आदराने आणि माणुसकीने वागवतात. जगात सोळंकी सारखे पुरुषच फक्त आहेत असे नाही.आजकालच्या जगात बऱ्याच स्त्रियां सुद्धा अशा आहेत कि ज्या, पुरुषांचा वापर करून आपले ध्येय साध्य करून घेतात.

विराजनी केलेला सुद्धा पुरुषाचा स्पर्शच होता .......पण अनुभव किती भिन्न. दोन ध्रुव जणू .
विराजचा स्पर्श झाला आणि मला वाटले ,कि आसमंतात एकदम स्वर्गीय सुगंध दाटून आला आहे.चोहोबाजूंनी प्राजक्ताच्या फुलाचा सडा पडावा तसा.

वाह क्या बात हैं

Jayant Naik's picture

27 Jul 2018 - 4:42 pm | Jayant Naik

आपल्याला कथा आवडली ...मस्त वाटले. वाचक हाच लेखकाचा सर्वस्व असतो. त्याला आवडली . मग काय हवे ?

जयन्त बा शिम्पि's picture

26 Jul 2018 - 1:51 am | जयन्त बा शिम्पि

छान , कथा आवडली. पुलेशु.

Jayant Naik's picture

27 Jul 2018 - 4:40 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

Nitin Palkar's picture

27 Jul 2018 - 12:28 pm | Nitin Palkar

नेटके लेखन. प्रसंग फुलवण्याची हातोटी छानच. पुलेशु.

Jayant Naik's picture

27 Jul 2018 - 4:39 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

खूप छान कथा. मनापासून आवडली. प्रसंग खूपच छान रंगवले आहेत. लिहीत रहा.