शेवट

मनुष्य's picture
मनुष्य in जनातलं, मनातलं
27 Jun 2018 - 6:47 pm

पंधराव्या मजल्यावरून खाली बघताना तिच्यात कसलीच भावना नव्हती. फक्त वरून सारं जग खेळण्यातलं वाटत होतं. टेरेसच्या कठड्यावर चढताना तिच्या पायांना सुरवातीला घाम सुटला होता पण आता भितीची कणभर ही जागा तिच्यात उरली नव्हती. फक्त श्वासांचा आवाज आणि वाऱ्यामुळे कुडत्याचा फड-फडण्याचा आवाज. पण सकाळच्या पाखरांची किलबिल तिच्या काना पर्यंत पोहोचत नव्हती. एक दिर्घ श्र्वास घेत तिने डोळे मिटले. कोणतातरी पाखरू अलगद तिच्या खांद्यावर येऊन बसल्याचा भास तिला झाला आणि मनाने ती थेट बालपणात जाऊन पोहचली.

"एक होती चिऊ" अशी बोलणारी आई. इवल्याशा फाईटने जोराचं लागलं असं खोटं-खोटं ॲक्टिग करणारे बाबा. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हात फिरवताना गोड हसणारी आजी. ते बाल मैत्रीणीसोबत खेळलेले बालपणीतले खेळ, कॉलेजचा पहिला दिवस. तो. पहिल्यांदा त्याच्याशी नजरा-नजर. पुढे मैत्री. तासंतास त्याच्या सोबत घालवलेला वेळ. कसलीतरी मंतरलेली अवस्था. त्याला केलेलं प्रपोज. त्याचा नकार. पुढे कित्येक दिवस रडणारी मी. पाच वर्षाच्या मैत्री नंतर थेट लग्नासाठी विचारणारा तोच तो आणि त्याचं आर्मीतलं सिलेक्शन. आता पर्यंत जबाबदारीचा लवलेश हि नसलेली आणि अचानक आलेल्या जबाबदारीने घाबरून गेलेली मी.

पुढे लग्न, नवीन नाती, त्याचा स्पर्श. पहिल्यादा त्याला सीमेवर जाताना मनाचा सुटलेला बांध, मग त्याच्या शिवाय तरीही त्याच्याच परिघात चालणारं स्वतःच आयुष्य. दररोज रात्री त्याच्या विषयी धाकधूक. सुट्यामध्ये तो घरी परतल्यावर फक्त त्याच्या भोवती सामावलेले जग आणि तो जाताना मनाने किती तरी हात लांब करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणारी मी. काही दिवसांपूर्वी तो जाताना जमिनीवर धाडकन कोसळलेली मी. डोळ्यापुढे संपुर्ण अंधार.

सगळ्यागोष्टी डोळ्यांपुढे फेर धरू लागल्या, बालपण... आई-वडील... हसरी आजी... अंधार... तो... आर्मी... फोनची रिंग... लग्न मत्रं... आदित्य शहीद झाला... बॉम्ब... ह्रदयाची धडधड... मम् करा.. प्रॉमिस दे मला... I love you... बालपण... आई ची कविता... बोबडे बोल... माझा बाबा... अंधार... Bye bye... फोन-रिंग... शहीद आदित्य... हॉस्पिटल... यु आर प्रेग्नेंट... प्रॉमिस दे... हाताचा स्पर्श... Happy Valentine....
तिचे डोळे धाडकन उघडले. खांद्यावरचा पक्षी भुर्रकन उडून गेला. पोटाशी हात घेत कसलीतरी भीती तिच्या डोळ्यात दाटु लागली...

https://www.facebook.com/photo.php?fbid=1976390932371268&set=a.669930269...

कथाप्रकटन