नेदरलँड्सची सफर भाग -३

Primary tabs

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in भटकंती
6 Jun 2018 - 8:43 pm

नेदरलँड्सची सफर भाग -३
मेहुण्याच्या (अक्षय) घरी वास्तव्य असल्याने बऱ्याच गोष्टी फार सुलभ झाल्या हि एक वस्तुस्थिती होती. त्याने आम्ही येणार म्हणून तेथे वापरायची दोन ovi chipkaart नावाची प्रीपेड कार्डे घेऊन ठेवली होती. यात जालावरून पैसे भरायचे आणि बस, ट्राम, मेट्रोमध्ये चढल्यावर आणि उतरताना तेथल्या यंत्रावर टेकवायचा कि आपोआप त्यातून पैसे वळते होतात.
एकंदर युरोपातील हवामान बेभरंवशी असते हे ऐकून माहित होते. त्यामुळे तेथे हवामानाचा अंदाज पाहूनच बाहेर पडत होतो. आजकाल हवामानाचा अंदाज बऱ्यापैकी अचूक असतो, त्यामुळे जेंव्हा त्यांनी पाऊस पडेल सांगितले तेंव्हा जवळचीच ठिकाणे पाहायला गेलो आणि हवामान स्वच्छ आणि निरभ्र आहे हे पहिले तेंव्हा क्यूकेनहॉफ सारख्या ठिकाणी गेलो.
यामुळे आमच्या आठही दिवसांच्या वास्तव्यात आम्हाला सर्वोत्तम हवामानाचा फायदा घेता आला.
तेथे पोहोचल्यावर दुसरा दिवस हा जवळच सहलीला जाऊ असे ठरवले होते. कारण विमानातील झोप हि तितकी चांगली झाली नव्हती.
दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच म्हणजे ऍमस्टरडॅमला जाऊन तेथली वस्तुसंग्रहालये, कालवे आणि बागा पाहायचे ठरवले. त्यासाठी सकाळी व्यवस्थित नाश्ता करून पाण्याची बाटली घेऊन आणि निघण्यापूर्वी स्वच्छतागृहात जाऊन निघालो.
याचे कारण युरोपात कुठेही स्वच्छतागृहा वापरण्यासाठी अर्धा (४० रुपये) ते पाऊण युरो(६० रुपये) इतके पैसे द्यावे लागतात. शिवाय कुठेही पाणी मिळत नाही. हॉटेलात सुद्धा पाणी विकतच घ्यावे लागते ज्याची किंमत ४ युरो आहे. ३२० रुपये देऊन एक बाटली. आपल्याकडे कोणत्याही हॉटेलात कधीही पाणी फुकट मिळते. मुंबईत तर कोणत्याही रेस्टोरंट मध्ये शिरा टेबलावर असलेले पाणी प्या ते नसेल तर पाणी मग प्या आणि चालू लागा हि सवय असल्यामुळे पाणी विकत घ्यावे हे काही पटतच नाही.
स्वच्छतागृहाच्या वापरासाठी पैसे द्यावे हे ठीक आहे कारण ते बांधण्यासाठी आणि साफ ठेवण्यासाठी साधनसामग्री आणि मानवी श्रम लागतात. पण पाण्यासाठी ४ युरो हे काही पटले नाही.जी गोष्ट जवळ जवळ फुकट मिळते ती इतक्या महाग विकत घ्यावी लागते हे चक्क अन्यायकारक आहे असेच वाटते. संपूर्ण ८ दिवसात मी एकदाही पाणी विकत घेतले नाही. सगळीकडे घरचे पाणी घेऊन जात होतो आणि एकदा प्रसंग आला तर मी चक्क ७ अप विकत घेतले जे पाण्यापेक्षा स्वस्त म्हणजे अडीच युरोला १ लिटर होते.
असो.
आम्ही सर्वप्रथम व्हॉन्डेल पार्क या शहराच्या मध्यभागी असलेल्या उद्यानात गेलो. अतिशय शांत फारशी गर्दी नसलेले उद्यान, छान झाडी, मोकळे निरभ्र आकाश आणि हवेत थोडासा गारवा. VONDEL PARK

त्या उद्यानात भटकून आलो. थोडे फार फोटो काढले. एका ठिकाणी १५ मिनिटे शांतपणे बसून आजूबाजूच्या वातावरणाचा मुक्तपणे आस्वाद घेतला. VONDEL PARK

VONDEL PARK

VONDEL PARK

VONDEL PARK

थोडावेळ शांतपणे बसल्यावर तेथून जवळच असलेल्या व्हॅन गॉग च्या संग्रहालयाला भेट देण्याचे ठरवले.
याचे तिकीट तुम्हाला ऑनलाइनच काढावे लागते. याचे दुपारी तीन वाजताचे तिकीट काढले आणि आता फक्त बारा वाजले होते मधल्या काळात काय करावे म्हणून ऍमस्टरडॅमच्या कालव्यातील बोटीचे तिकीट काढले. (१२.५ युरो एका तिकिटाला/ १००० रुपये माणशी). बऱ्यापैकी ऊन होते म्हणून छप्पर असलेल्या बोटीचे काढले. छप्पर असले तरी पुढे किंवा मागे असलेल्या मोकळ्या जागेत जात येते. तसेच छताला काच होती आणि खिडक्या पण मोठ्या मोठ्या होत्या.
अन्यथा उघड्या बोटीचेहि तिकीट मिळते, ते काढले नाही म्हणून बायको जरा नाराज झाली. पण काही वेळाने उन्हाचे चटके बसू लागले तेंव्हा नवरा इतका मूर्ख नाही याची तिला खात्री पटली असावी. असो
ऍमस्टरडॅमच्या कालव्यातील हि सफर सुंदर आहे. त्यात एक गाईडपण होती जी इंग्रजीत सर्व माहिती सांगत होती आणि याचा फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन भाषेत अनुवाद हेडफोनद्वारे ऐकण्याची सुविधा पण होती. या शहराचा इतिहास तेथील बऱ्यचशा सुंदर इमारती या कालव्याच्या काठाने असल्याने पायी फिरण्यापेक्षा असे बोटीने फिरणे फारच छान झाले. बोटीत जागा पण भरपूर होती. त्यामुळे उजवीकडे, डावीकडे असे दोन्ही कडे खिडकीत बसून पाहता आले. ऍमस्टरडॅम च्या कालव्यात किंवा इतर जलमार्गात फिरणाऱ्या या सर्व बोटी या विजेवर चालणाऱ्या( रिचार्जेबल बॅटरीवर) असल्याने तुलनेत बऱ्याच शांत असतात आणि कुठेही रहदारीचा आवाज किंवा वाहनांच्या हॉर्नचे आवाज येत नाहीत त्यामुळे अशा बोटीतून फिरायला जास्त छान वाटते.

CANAL

CANAL

CANAL
कल्पना करा कि पुण्याच्या पेठांमधून गल्ल्याबोळातुन किंवा मुंबईत फोर्ट भागातील इमारती रस्त्यातून शांतपणे बोटीतून फिरून पाहायला किती छान वाटेल. बाकी इमारतींबद्दल त्यांनी वेगवेगळी माहिती सांगितली तितकी आता माझ्या लक्षात नाही( म्हणजे तितकी ती महत्त्वाची नव्हतीसुद्धा).
काही इमारतीचे फोटो (जालावरून साभार).
हि सहल करून आलो तेंव्हा अजून सव्वातास बाकी होता तेवढ्या वेळात पोटपूजा आटपली म्हणजे एक फूटभर लांब "बागेत" (baguette) या पावात चिकन सॉसेज, सॅलड, तीन तर्हेची सॉसेस आणि चीज घालून केलेला रोल घेतला. तेवढ्यात आमचे दोघांचे तुडुंब पोट भरले. ( नाही तरी आम्ही दोघे खाण्यात फुकटच आहोत).
यानंतर परत व्हॉन्डेल पार्कमध्ये आलो. तेथे छान पैकी एका झाडाखाली आम्ही पहुडलो. अर्धा तास निःशब्दपणे आडवे होऊन शांतता ऐकण्याची मजा काही और असते.
तेथे शेजारीच तो म्युझिअम होता.पावणे तीन ला चालत चालत तेथे गेलो. या संग्रहालयात व्हॅन गॉगच्या संपूर्ण चरित्राचे वर्णन त्याने काढ्लेली स्वतःची आणि इतर चित्रे पाहिली.
कदाचित माझी अपेक्षा फार असावी पण एकंदर तेथे असलेली चित्रे पाहून बर्यापैकी निराशाच झाली. पिवळ्या रंगाच्या विविध छटातच बहुसंख्य चित्रे होती. पण एकंदर रंग आणि चित्रे पाहून माझी पार निराशा झाली.
व्हॅन गॉगची चित्रे म्हणजे त्यांना चांगलेच म्हटले पाहिजे असा एकंदर ती पाहिलेल्या बऱ्याच लोकांचा अविर्भाव होता/ आहे.
हे म्हणजे के एल सहगल यांची गाणी चांगली आहेत असे म्हटलेच पाहिजे असा भाव येतो. मला चित्रकलेत काहीही समजत नाही. तसा माझा दावाही नाही.
मी काढलेली प्रकाशचित्रे वर काच असल्याने नीट येत नाहीत हे समजल्याने दोन चित्रानंतर मी कॅमेरा बंद केला

VAN GOGH

VAN GOGH
जालावर त्यांच्या चित्रांची प्रकाशचित्रे आहेत.
https://www.google.co.in/search?rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&biw=1164&bih...
परंतु एकंदर ऍमस्टरडॅममध्ये संग्रहालये यांचा उदो उदो ( गाजा वाजा- hype) इतका जास्त केला गेला आहे कि तुम्ही तेथे जाऊन अमुक तमुक म्युझियम पहिला नाहीत तर तुमचे आयुष्य फुकट गेले असे म्हणण्यापर्यंत hype केलेली आहे.
( पुण्यातहि याचा अनुभव येतो-- तुम्ही सवाई गंधर्व महोत्सवाला गेला नाहीत? किंवा मी फक्त भीमसेन ऐकतो बाकी सर्व फालतू गायनाला कोण जाणार इ इ ).
ऍमस्टरडॅम येथे एकंदर ४० म्युझियम आहेत. एकंदर प्रत्येक वस्तू जतन करून ठेवण्याची त्यांची पद्धत चांगली आहे (आणि तिचा उदो उदो/ गाजावाजा करून पैसा करण्याची सुद्धा) कोणताही म्युझियम २० ते २५ युरो आहे म्हणजे १५०० ते २००० रुपये माणशी.
हे सर्व पूर्ण वैयक्तिक आस्वादाचा प्रभाव आहे आणि यात व्हॅन गॉग यांचा उपमर्द करण्याचा कोणताही हेतू नाही
शेवटी मला जे आवडतं तेच संगीत/ चित्र मी चांगलं म्हणणार.
असो. आपल्याला चित्रातील काहीच कळत नाही हे गृहीत धरून मी परवाच ३ जून ला मुद्दाम मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय( जुने नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) येथे चित्रे पाहायला गेलो. (उलटी तुलना लगेच झाली. तिकीट ८५ रुपये. एक युरो फक्त. पाणी फुकट. प्रसाधन फुकट.) तेथे असलेली असंख्य सुंदर सुंदर चित्रे ज्यात हळदणकर राजा रविवर्मा सारखे आणि काही दिग्गज युरोपियन चित्रकार यांची चित्रे पाहून आलो. हि चित्रे मला नक्कीच जास्त भावली. या संग्रहालयात अक्षरशः २ हजार वर्षा पूर्वी पासूनच्या हडाप्पा संस्कृती लोथल येथील वस्तू कलाकृती पासून ते १८ १९ व्या शतकातील असंख्य कलाकृती, अत्यंत सुबक मूर्ती, वस्त्रे, शस्त्रे, चित्रे आणि कलाकुसरीच्या वस्तू आहेत. बऱ्याच वर्षांनी आपल्याच देशातील आपल्याच शहरातील इतक्या उत्कृष्ट संग्रहालयात आपण गेलो आणि आपला समृद्ध वारसा पाहायला मिळाला याचा मला अक्षरशः अभिमान वाटला. परत येताना संग्रहालय ते सी एस एम टी स्टेशन चालत आलो आणि मुंबईतील असंख्य १८ व्या आणि १९ व्या शतकातील जुन्या इमारती पाहत पाहत आलो. मध्ये भूक लागली म्हणून महेश लंच होम मध्ये पोटपूजाही केली.

एक गोष्ट मी मनाशी खूणगाठ बांधून ठेवली आहे कि जोवर भारत देश बऱ्यापैकी पाहून होत नाही तोवर युरोप अमेरिकेत तेथील इमारती/ वास्तुकला स्थापत्य पाहायला जायचे नाही.

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

6 Jun 2018 - 8:45 pm | सुबोध खरे

https://photos.app.goo.gl/WFdHyEokE4zDjVyz5
फोटो दिसत नसतील तर वरील लिंक वर टिचकी मारावी

'मी परवाच ३ जून ला मुद्दाम मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय( जुने नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) येथे चित्रे पाहायला गेलो. (उलटी तुलना लगेच झाली. तिकीट ८५ रुपये. एक युरो फक्त. पाणी फुकट. प्रसाधन फुकट.) तेथे असलेली असंख्य सुंदर सुंदर चित्रे ज्यात हळदणकर राजा रविवर्मा सारखे आणि काही दिग्गज युरोपियन चित्रकार यांची चित्रे पाहून आलो. हि चित्रे मला नक्कीच जास्त भावली. या संग्रहालयात अक्षरशः २ हजार वर्षा पूर्वी पासूनच्या हडाप्पा संस्कृती लोथल येथील वस्तू कलाकृती पासून ते १८ १९ व्या शतकातील असंख्य कलाकृती, अत्यंत सुबक मूर्ती, वस्त्रे, शस्त्रे, चित्रे आणि कलाकुसरीच्या वस्तू आहेत. बऱ्याच वर्षांनी आपल्याच देशातील आपल्याच शहरातील इतक्या उत्कृष्ट संग्रहालयात आपण गेलो आणि आपला समृद्ध वारसा पाहायला मिळाला याचा मला अक्षरशः अभिमान वाटला. परत येताना संग्रहालय ते सी एस एम टी स्टेशन चालत आलो आणि मुंबईतील असंख्य १८ व्या आणि १९ व्या शतकातील जुन्या इमारती पाहत पाहत आलो. मध्ये भूक लागली म्हणून महेश लंच होम मध्ये पोटपूजाही केली.'
परदेशांत अनेक गोष्टी खूप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवतात हे खरे आहे.... पण आपल्याकडे काहीच करत नाही असे नाही.. असे मला वाटते

आपल्या भारतातच पाहण्यासारखं इतकं काही आहे, इतकी प्रचंड विविधता आहे की ते पाहायलाच सात जन्म पुरायचे नाहीत.

अत्यंत प्रॅक्टिकल वर्णन. पुभाप्र. (तेव्हढी युरोपातही मध्येच पुण्याला आणायची मुंबईकरांची सवय काही आवडली नाही. :-) )

सुबोध खरे's picture

6 Jun 2018 - 11:25 pm | सुबोध खरे

एस साहेब
मुंबईतही असे दांभिक लोक आहेत पण ते दक्षिण मुंबईत आहेत आणि RNI (resident non indian) या श्रेणीतील आहेत. पण ते मराठी बोलत नाहीत (मराठी असले तरीही उदा. शोभा डे). त्यामुळे ते लोक आपल्या रोजच्या संपर्कात येत नाहीत म्हणून उदाहरण सर्वाना पटकन पटेल असे नाही

आणि ते मुंबईला बॉम्बे म्हणतात. दक्षिण मुंबई नव्हे तर SOBO

विअर्ड विक्स's picture

9 Jun 2018 - 12:38 am | विअर्ड विक्स

इतके दिवस दक्षिण मुंबईत म्हणजे गिरगावात राहूनही "सोबो " चा अर्थ मला माहित नव्हता . सोबो सेंट्रल मधील सोबो आता उलगडले .

पिलीयन रायडर's picture

6 Jun 2018 - 9:17 pm | पिलीयन रायडर

मी न्यूयॉर्कमध्ये van गॉग चे स्टारी नाईट पाहिले होते. मला तरी ते आवडलं. ग्रेट का आहे ते कळलं नाही, पण चित्र छान आहे.

पण तिथेच पिकासो ची अनेक चित्रं होती, एकही कळलं नाही!

सफर चांगली चालली आहे. पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2018 - 10:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे सफर. मनाने अ‍ॅमस्टरडॅममध्ये जाऊन आलो ! :)

***एक गोष्ट मी मनाशी खूणगाठ बांधून ठेवली आहे कि जोवर भारत देश बऱ्यापैकी पाहून होत नाही तोवर युरोप अमेरिकेत तेथील इमारती/ वास्तुकला स्थापत्य पाहायला जायचे नाही.***

अगदी.
काही नोकरी धंद्यानिमित्त तिथे राहण्याचा योग आला असता तर आजचबाजूला फिरलो असतो. मग माझ्या आवडीचं नक्कीच काही सापडलं असतं. मुद्दामहून खर्च करणार नाही.

मित्राचा मुलगा आहे यात्रा कंपनीत कामाला. ,सतत हेच काम. तो म्हणाला तुम्हाला त्यातलं कळत असेल तरच जा.

आम्ही जयवंत दळवी,पुलं,भिमसेन,बालकवी यांचीही घरं पाहिली नाहीत. शेक्सपिअरचं पाहून काय करणार.

स्पष्ट मतं आवडली.

वरुण मोहिते's picture

7 Jun 2018 - 8:41 am | वरुण मोहिते

प्रवासवर्णन. आवडले .

सुमीत भातखंडे's picture

7 Jun 2018 - 11:24 am | सुमीत भातखंडे

हा भागही मस्त.
व्हॅन खॉख च्या पेंटींग्जबाबत सहमत.
"rijksmuseum" ला भेट दिलीत का? इथेसुद्धा बहुतांशी पेंटींग्जच आहेत पण ही जास्त आवडली.
खासकरून "The Milkmaid", "The Night Watch", "The Battle of Waterloo" इ.
मला जुनी युरोपीयन "realist" प्रकारातली पेंटींग्जच अतिशय आवडतात. म्हणूनच "rijksmuseum" ला आवर्जून गेलो होतो.

अनिंद्य's picture

7 Jun 2018 - 11:46 am | अनिंद्य

@ सुमीत भातखंडे,
मला त्या rijksmuseum मध्ये एक दुर्मिळ योग जुळून आला होता 'डच मास्टर्स ऑफ टू सेन्चुरीज' असे फक्त १० निवडक चित्रकारांचे lifesize paintings चे प्रदर्शन बघायला मिळाले होते. यासाठीचे तिकीट - वेगळे २० युरो.

सुबोध खरे's picture

7 Jun 2018 - 12:03 pm | सुबोध खरे

खरं सांगायचं तर व्हॅन गॉग ची चित्रे पाहून माझा भ्रमनिरास झाल्यासारखा झाला होता त्यामुळे "rijksmuseum मध्ये जाऊन अजून चित्रे पाहावीत असे वाटले नाही. त्यातून त्या संग्रहालयात युरोपातील मध्ययुगीन फर्निचर, कला आणि इतिहास अशा गोष्टींबद्दल आहे ज्यात मला किंवा माझ्या बायकोला फारसा रस नाही. इ स १२०० ते २००० या कालावधीतील डच इतिहासातील ८००० गोष्टी तेथे ठेवल्या आहेत. इतक्या गोष्टी पाहून होणे अशक्य आहे. याचीही कल्पना होतीच. यास्तव हे संग्रहालय किंवा ऍन फ्रँक हाऊस जाऊन पाहावे असे मला आतून वाटले नाही.
खरं तर तेथे गेल्यावर आपण आपल्या भारताचा इतिहास सांस्कृतिक वारसा शिल्पकला चित्रकला वस्त्रकला हेच नीट पाहिलेले नाही याची जाणीव झाली ज्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत त्या न पाहता परक्या लोकांचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा पैसे देऊन पाहतो आहेत हे जाणवून स्वतःची शरम वाटली. म्हणून वेळ मिळाल्याबरोबर ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय पाहून आलो. आणि आपला सांस्कृतिक वारसा हा केवळ ७००-८०० वर्षांचा नसून अक्षरशः हजारो वर्षांचा आहे आणि अतिशय समृद्ध आणि विविधतेने नटलेला आहे याचीहि जाणीव झाली.
भारतात मिळणाऱ्या एका एका गोष्टींची किंमत तेथे गेल्यावर जाणवायला लागली आहे हे या सहलीचे अत्यंत महत्त्वाचे फलीत आहे असेच मी म्हणेन.

अनिंद्य's picture

7 Jun 2018 - 11:43 am | अनिंद्य

सुंदर फोटो आणि माहिती. देश सुंदर आहे हा, वादच नाही.

सुबोध खरे's picture

7 Jun 2018 - 12:09 pm | सुबोध खरे

आपल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात काढलेल्या काही पाषाणातील मूर्तींचे भ्रमणध्वनीवर काढलेले फोटो खाली टाकले आहेत.

csms

csms

csms

csms

csms

csms

या सर्व मूर्ती ५व्या सहाव्या शतकातील आहेत.

सुबोध खरे's picture

7 Jun 2018 - 12:20 pm | सुबोध खरे

वरील प्रतिसादांमुळे काही लोकांना मी नैराश्यवादी असल्याचे वाटेल.
त्या देशाचे निसर्ग सौंदर्य नक्कीच वेगळे आहे. तेथील शिस्त, स्वच्छता, मोकळे वातावरण, अत्यंत कमी रहदारी या गोष्टी नक्कीच अनुभवण्यासारख्या आहेत ज्यांचे वर्णन पुढील भागात येतीलच.

सुधीर कांदळकर's picture

8 Jun 2018 - 8:44 am | सुधीर कांदळकर

प्रकाशचित्रे खरेच तितेह घेऊन जाणारी. व्हॅन गॉगच्या चित्रांबद्दल आश्चर्य वाटले. मुंबईच्या म्यूझिअममधली प्रचंड आकाराची चित्रे मी बालपणापासून अनेकदा पाहिली आहेत. त्यातल्या एका शेकोटीच्या चित्रात शेकोटीजवळ जमिनीपासून फूटभर उंचावरून फिश आय लेन्समधून ते दृश्य जसे दिसावे तसे आहे. त्याने ते चित्र रंगवले तेव्हा कॅमेरे तरी अस्तित्त्वात होते की नाही कोण जाणे. त्या चित्रकाराच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे.

असो. सुंदर लेखाबद्दल तसेच माझ्या मुंबैतल्या म्यूझिअमधल्या चित्रांची आठवण ठेवल्याबद्दल धन्यवाद.

भंकस बाबा's picture

10 Jun 2018 - 9:29 am | भंकस बाबा

खरे साहेब आप तो छा गए.
व्हैन गॉगबद्दलचे मत माझ्याशी जुळणारे आहे, आन्तरजालावर काही चित्रे बघितली होती, तेव्हाच कळले की हा आपला प्रांत नाही, तेव्हा अतिशय उदास वाटले होते की आपल्याला यातील काहीच कळत नाही, पण तुमचे मत वाचले आणि सुस्कारा टाकला

दुर्गविहारी's picture

10 Jun 2018 - 9:22 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीलयं. उगाच युरोपला जाउ आले कि ईथले बरेच लोक अति भारावून जातात आणि मग परदेश कसा भारी आहे आणि भारत कसा फालतु हे सुरु होते. हा आव तुम्ही आणला नाही आणि जे आहे ते स्पष्ट मांडताय या बध्दल अभिनंदन. पु.भा.प्र.

सुबोध खरे's picture

12 Jun 2018 - 6:39 pm | सुबोध खरे

मूळ मी

युरोपात कशासाठी जातो?

हा महत्त्वाचा विचार आहे.

यात "खिशात चार पैसे जास्त खुळखुळले की' च माणूस तेथे पर्यटनासाठी जातो हि वस्तुस्थिती. (तेथेच कशाला कुठेही)

(यात कंपनीच्या पैशाने किंवा शिक्षणासाठी जाणारे येत नाहीत)

फेसबुक इंस्टाग्राम किंवा तत्सम जालावर फोटो टाकण्यासाठी किंवा मित्रमंडळीत भाव खाण्यासाठी जाणाऱ्या लोकांना "युरोपात अनुभव चांगला आला नाही" असे सांगितले तर आपले पैसे फुकट गेले म्हणून लोक आपल्याला मूर्ख समजतील हि अनाहूत भीती वाटत असते.

किंवा काही लोक आपली अभिरुची उच्च आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात मग अशाना तेथे "उदो उदो" झालेल्या ( hype) गोष्टी भिकार आहेत असे म्हणणे शक्य नसते.

माझ्या बाबतीत माझी अभिरुची काय आहे हे मला लोकांना सिद्ध करण्याची गरज वाटत नाही.

त्यामुळे मला जसे दिसले किंवा जसे जाणवले तसेच मी लिहिलेले आहे. मी एक सामान्य माणूस आहे ज्याला कलेतील काही कळत नाही. एखादी गोष्ट मनाला भावते म्हणून मी ती पाहतो, ऐकतो, खातो किंवा आस्वाद घेतो हि वस्तुस्थिती.

ज्यांना कलेची जाण आहे त्यांना माझ्यासारखाच अनुभव येईल असे माझे मुळीच म्हणणे नाही.

उदा एखादा अनवट राग ज्याला कळतो तो त्यातील ख्याल/ बंदिश/ विलंबित जास्त चांगला रस घेऊन ऐकू शकतो/ आस्वाद घेऊ शकतो.

आणि अर्थात मला माझ्या गरजेपेक्षा चार पैसे जास्त मिळत आहेत जे मी आज खर्च करू शकतो म्हणून मी तेथे गेलो हि पार्श्वभूमी आहेच.

विन्सेंट वेन गॉग वर बेतलेला 1956 सालचा चित्रपट ‘लस्ट फाॅर लाइफ’ अप्रतिम असाच होता. त्यात कर्क डगलस (माइकल डगलस चे वडील), एंथनी क्विन होते. कर्क ने गॉग ची भूमिका केली होती...

Brilliant, Yet Painful Classic Offers Douglas’ Finest Performance...

“Lust for Life”, Vincente Minnelli’s rich interpretation of Irving Stone’s Vincent Van Gogh bio-novel, is a film both compelling and repelling; in delving into the psyche of the artist (unforgettably portrayed by Kirk Douglas), one can see an untrained, unbridled genius smashing convention to open viewers’ eyes to a world defined by passion; yet in doing so, we share in the growing nightmares and agony of his creative mind, teetering toward the madness that would destroy him, and it is an unsettling experience, to be sure!

This is a film so rich in visual imagery (with a Technicolor ‘palette’ that attempts to recreate Van Gogh’s view of his world), that it demands repeated viewings, just to savor the details. From wheat fields ‘aflame’ in color, to night skies that nearly writhe in waves of darkness, the elemental nature of the artist’s vision is spectacularly captured. And in experiencing the world through his eyes, the loving, yet uncomprehending concern of his brother (James Donald), and more hedonistic, shallow patronizing, and gradual disgust of fellow artist Paul Gauguin (Anthony Quinn, in his Oscar-winning performance), become elemental ‘barriers’, as well. Van Gogh wants to ‘speak’, but no one can understand his ‘language’, not even the artist, himself!

Kirk Douglas never plunged as deeply into a portrayal as he did, in “Lust for Life”, and the experience nearly crushed him, as he related in his autobiography, “Ragman’s Son”. His total immersion in the role SHOULD have won him an Oscar (Yul Brynner won, instead, for “The King and I”), and his bitterness and disappointment at the snub would haunt him, to this day. With the passage of time, his performance has only increased in luster and stature, and it certainly shows an actor at the top of his form!

“Lust for Life” is an unforgettable experience, not to be missed!

सप्तरंगी's picture

14 Jun 2018 - 5:49 pm | सप्तरंगी

Van Goghची पेंटिंग्स त्याचा एकाकीपणा, त्याच्या वेदना, दुःख, संघर्ष, अस्वस्थता, अस्थिरता समजल्याशिवाय आवडत नाहीत. त्याच्या कहाणीने त्याच्या पिवळ्या पेंटिंग्समधील करुण संदर्भ कळतात आणि मन त्याच्यासारखंच एकाकी, खिन्न, उदास होते...

Rijks (अर्थात पेंटिंग्सची आवड असणाऱ्यांसाठी) अफलातून आहे. Vermeer आणि Rembrandt अजरामर आहेतच. मिल्कमेड, night watch आणि बाकी सगळी बघायलाच हवीत अशीच आहेत.

आणि प्रत्येक पेंटिंगमागे एक गोष्ट आहे. असतेच. कलाकारांमध्ये रस असेल, माहिती असेल, माहिती करून घेतली किंवा कुणी गोष्ट सांगत असेल तर गोष्टी जास्त भावतात. इतिहासामध्ये गोष्टींमध्ये रस नसेल किंवा गोष्टच माहित नसेल तर सगळे वरवरचे आहे, मग सगळंच hype वाटेल. (नेहमीच असेल असे नाही).
भिकार हा तर फार मोठा शब्द आहे, शहरे/कलाकृती/देश/इतर गोष्टी काहींना उत्तम काहींना भिकार वाटतही असतील (मला तर कोणतेच नाही वाटत तरी ) पण त्यामुळे ती तशी ठरत नाहीत हेच खरे.
युरोप महाग आहेच, मुळात देशा-देशांची अशी तुलनाच जितकी करू तितके त्रासदायकच आहे.

तुमची बाकी ट्रिप छान झाली असावी, तुम्ही हॅण्डवेगला राहत होतात असे वाटतंय:).. शुभेच्छा.

सुबोध खरे's picture

14 Jun 2018 - 7:10 pm | सुबोध खरे

Van Goghची पेंटिंग्स त्याचा एकाकीपणा, त्याच्या वेदना, दुःख, संघर्ष, अस्वस्थता, अस्थिरता समजल्याशिवाय आवडत नाहीत. त्याच्या कहाणीने त्याच्या पिवळ्या पेंटिंग्समधील करुण संदर्भ कळतात आणि मन त्याच्यासारखंच एकाकी, खिन्न, उदास होते...

व्हॅन गॉग चे संग्रहालय बघायला जायच्या अगोदर मी त्याची कहाणी संपूर्णपणे वाचूनच गेलो होतो. परंतु तरीही ती चित्रे मला आवडली नाहीत.
एकंदर युरोपातील कोणत्याही गोष्टीचा "उदो उदो" करण्याची वृत्ती मला फारशी आवडली नाही. मग ते "चीज" असो किंवा "डच पॅनकेक" असोत. (याबद्दल पुढे येईलच)
आपण ज्याला कोथिंबीर वडी म्हणतो ती साठ रुपयाला चार "मोठ्या चौकोनी " वड्या येतात.
त्याला लहान लहान गोल आकार देऊन धनिया कबाब सर्व्हड विथ डिलिशियस मिंट चटनी म्हणायचं आणि सहा छोट्या कबाबला चौकोनी प्लेटमध्ये ठेवून रुपये २५० अधिक कर लावायचे असा प्रकार वाटला.

अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे आणि मला कलेतील "काहीही कळत नाही" असे मी प्रामाणिकपणे कबूल करतो/ अगोदर पण केले आहे.

ज्यांना माझ्यासारखेच कलेतील फारसे कळत नाही अशा अनेक लोकांनी माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. कदाचित लोकांसमोर मला ती चित्रे आवडली नाहीत असे म्हणण्याचे धारिष्ट्य नसावे.

येथे मला एक उदाहरण द्यावेसे वाटते. -- मी एशियन हार्ट रुग्णालयात विभागप्रमुख असताना एक सिटीझन कंपनीचे सोनेरी डायल आणि चामड्याचा पट्टा असलेले क्वार्टझचे सुंदर घड्याळ विकत घेतले.
मला दोन तीन रुग्णांनी आणि दोन तीन मित्रांनी त्याबद्दल विचारले घड्याळ सुंदर आहे इ इ.
यानंतर मी इतर काही जणांना हि त्याची किंमत किती असेल हे विचारले तर त्याची किंमत ६ हजार ते २० हजार पर्यंत लोकांनी सांगितली होती.
अर्थात हि किंमत घड्याळ घातलेल्या मनगटाची होती.
कारण ते घड्याळ मी कुर्ल्याच्या पुलावर ७० रुपयाला विकत घेतलेले चिनी बनावटीचे घड्याळ होते. परंतु विभागप्रमुख असलेल्या वरिष्ठ डॉक्टरच्या हातावर केवळ ७० रुपयाचे घड्याळ असूच शकत नाही हाच विचार प्रबळ ठरतो.
बऱ्याच वेळेस असेच असते.
कृपया हा प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नये तर मानवीवृत्ती दाखवण्याचा एक (फार तर तोकडा) प्रयत्न आहे.

सप्तरंगी's picture

18 Jun 2018 - 7:56 pm | सप्तरंगी

वैयक्तिक मत आवड-निवड मान्यच आहे. आंबोळीची चव जिभेवर रेंगाळणाऱ्या आपल्याला एका झटक्यात किंवा कधीही पॅनकेक उत्तम वाटावा अशी अपेक्षापण नाही. काही लोक बढाव-चढाव बोलतातही त्यांचे काही करू शकत नाही. जागेनुसार किमती तर सगळीकडेच बदलतात. उदा. काही ठिकाणी अगदी वर उल्लेखलेले ७अप १.६०/per lr सुद्धा मिळते आणि पाणी ०.७० ला १lr सुद्धा. लंच ५युरो ते १००युरो pp असे इथेपण मिळते ते पण भारतीयांना आवडण्यासारखे. पण तरी सगळेच महाग आहे -असे लिहिले- त्या लिहिण्याला मी hype म्हणू शकत नाही तुमचा त्या वेळचा अनुभव म्हणू शकते.

भारतात बघायला खूप जास्त काही आहे हे कायमच वाटत आलं आहे, पण म्हणून मी एखाद्या ठिकाणी जाऊन तिथले must see म्युझीअम मिस करू इच्छित नाही उलट आपले काय.. कधीही बघता येईल असं वाटतं . सगळेच पैसे खुळखुळतात म्हणुन प्रवास करत नाहीत तर काही प्रवास करावा वाटतो म्हणून पैसे साचवतात.

एकूण काय तर कुठेच सगळे परफेक्ट नाही euमध्ये आणि इंडियामध्येसुद्धा...आणि माणसेपण वेगवेगळी असतातच, पदार्थ नावडीचे असतात पण म्हणुन hype किंवा भिकार असतील असे म्हणणे पटत नाही.

तुमच्या म्हणण्याला दुजोरा न द्यायचं धारिष्ट्य करतेय ( EU मधे बोलताना एवढे धारिष्ट्य करावे लागत नाही मिपावर करावे लागते :))

सुबोध खरे's picture

18 Jun 2018 - 8:51 pm | सुबोध खरे

सप्तरंगी ताई
आपले म्हणणे मान्य आहे.
परंतु युरोपात जायचा नुसता विमानाचा खर्चच माणशी ६० हजार (जाऊन येऊन आहे) यात थेट विमान नसून एका ठिकाणी बदलून आणि बऱ्यापैकी स्वस्त अशा विमान कंपन्याच्या तिकिटाचा आहे. तेथे राहण्याचा खर्च आणि प्रेक्षणीय स्थळे पाहून येण्याचा खर्च माणशी कमीत कमी १ लाख रुपये होईल. म्हणजे जोडप्याचा कमीत कमी दोन लाख खर्च होईल. हा खर्चस्वतःच्या खिशातून करण्यासाठी नक्कीच कमी नाही.
त्यानंतर एका संग्रहालयाचे किमान तिकीट १६ युरो म्हणजे १२५० रुपये आहे. ऍमस्टरडॅम मध्येच ४० संग्रहालये आहेत.
क्यूकेनहॉफच्या बागेत असलेली ट्युलिप दरवर्षी काढून नवी लावावी लागतात. त्यांची मशागत खत पाणी आणि एवढ्या अवाढव्य जागेची देखरेख तेथे येणाऱ्या बसेसची देखरेख हे सर्व असूनही १७ युरो देणे( शिफॉल विमानतळापासून बागेपर्यंत जाणे आणि येणे गृहीत धरून) हे पटण्यासारखे आहे.
(याशिवाय त्या बागेत मिळणारे जेवण हे नक्कीच किफायतशीर होते.)
त्याच्या तुलनेत या संग्रहालयांना इतका काही देखरेखीची खर्च येत नाही. यामुळे हि hype आहे असेच मी म्हणेन.
हि तुलना मी भारतीय सेवेशी करत नाही कारण युरोपात सर्वत्र मानवी सेवा हि अतिशय महाग आहे हे गृहीत धरून तेथीलच दोन गोष्टींची तुलना केली आहे.
तसेच हॉटेलात ५ युरोला पाण्याची बाटली विकत घ्यायची हि शुद्ध फसवणूक आहे. हे (साधन /resource ) पाणी हे त्यांच्या नळाला फुकट असले तरी तुम्हाला ते प्यायची परवानगी नाही. ते पाण्याचा ग्लास आणून देत नाहीत. एवढेच नव्हे तर बऱ्याच हॉटेलात तुमचे पाणी आणून प्यायला परवानगी नाही हे अति होते.
अशीच hype आपल्याकडे एकंदर पंजाबी लोकसंस्कृती आणि मुसलमान पाककलेबद्दल आहे. मी भारतभर फिरून आलो आहे त्यामुळे मी याबद्दल नक्की बोलू शकतो.

शेखरमोघे's picture

14 Jun 2018 - 8:56 pm | शेखरमोघे

प्रवासवर्णन तसेच "कला समजण्याची कला" (की जी समजली नाही तरी समजली असे म्हणावे लागते) दोन्हीही आवडले.