उन्हाळी भटकंती: कमळगड (Kamalgad)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
1 Jun 2018 - 1:25 pm

पर्यटकांनी प्रचंड गजबजलेल्या महाबळेश्वराच्या कोणत्याही पाँईटवर उभारले कि आकाशावेरी गेलेल्या सह्याद्रीच्या रांगा मन मोहून टाकतात. याच रांगात अनेक गड किल्ले दिसत असतात. ईतिहासात अजरामर झालेल्या प्रतापगडाखेरीज, महाबळेश्वरावरुन दिसणार्‍या अन्य किल्ल्यांची ओळख मात्र सर्वसामान्य पर्यट्कांना नसते. पाचगणीच्या पारशी पाँईटवरुन रायरेश्वर, केंजळगड, पांडवगड दिसतात. मुंबई ( बॉम्बे ) पॉईंटवरुन मधुमकरंदगड दिसतो. ऑर्थरसीट पाँईटवरुन चंद्रगड, मंगळगड, हवा स्वच्छ असेल तर रायगड, लिंगाणा, वरंधा घाटातील कावळ्या किल्ला ईतके गड दिसतात हे किती जणाना माहिती आहे ? असाच आणखी एक दुर्लिक्षीत किल्ला म्हणजे, " कमळगड". नीडल होलमुळे, एको पॉईंट आणि पायथ्याच्या निळ्याशार बलकवडी धरणाच्या पाण्यामुळे पर्यटकांना "केटस पाँईट" चांगलाच परिचयाचा असतो. मात्र तेथे उभारल्यानंतर उत्तरेकडे दिसणारा डोंगर म्हणजे "कोल्हेश्वराचे पठार" आणि त्यालाच चिकटून असणारा झाडीभरला डोंगर म्हणजेच कमळगड हे कोणाच्या गावीही नसते.
Kamalgad 1
महाबळेश्वर ते वाई या रस्त्यावर हा कमळगडाचा डोंगर उत्तरेला सतत खुणावत असतो. त्याचे एका बाजुला असणारे सुळके लक्षवेधी आहेत. याच गडाची आज सैर करायची आहे.
सुट्टी आणि सवड अशा दोन गोष्टी एकत्र येण्याचा दुर्लभ प्रसंग जमून आला आणि मी व माझा मित्र प्रमोद दोघांनी वाई गाठली. कमळगडासाठी वाई हे सोयीचे ठिकाण.
Kamalgad 2
तसे बघीतले तर कमळगडाला जायचे झाले तर चार पर्याय आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.
१) परतवडी किंवा नांदगणे मार्गे :-
वाईवरुन वहिगावमार्गे परतवडी किंवा नांदगणे गाठायचे. दोन्ही कडून गडावर जायला वाटा आहेत. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते. ह्या वाटा सोप्या आहेत. यासाठी वाईवरुन बसची व्यवस्था खालीलप्रमाणे आहे.
परतवडी- १०.००, २.४५, ५.४५
आकोशी:- ७.००,१०.१०, २.४५,५.४५
या गाड्या थेट नांदगणे किंवा परतवडीला सोडतात. मात्र त्या मिळाल्या नाहीत तर वहिगावपर्यंत खाजगी जीप आहेत, तसेच जोर या गावी जाणार्‍या गाड्या वहिगावला सोडतात.
जोर- ८.१५,१२.३०, २.००,६.१५
वहिगाववरुन बलकवडी धरणाची भिंत डावीकडे ठेवत पुलावरुन कृष्णा नदीचे पात्र ओलांडून नांदगणे किंवा परतवडी गाठता येईल.
२ ) आकोशीहूनः -
वास्तविक कमळगड सर्वात जवळ आहे तो आकोशीवरुन मात्र या मार्गे सहसा कोणी जात नाही. आकोशी गावाच्या मागेच कमळगडाचा पहाड उभा आहे. थेट खडी चढण आपल्याला दोन तासात माथ्यावर घेउन जाते.
आकोशीसाठी वाईवरुन बस व्यवस्था खालीलप्रमाणे आहे
आकोशी- ७.००, १०.१०.२.४५,५.४५
३ ) वासोळ्याहून :-
उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोर्‍यातील असरे, रानोला, वासोळे या गावात वाईहून एसटी ने तासभरात पोहोचता येते. वासोळ्यावरुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. त्यापैकी पहिली वाट सोपी पण थोडी दूरची आहे.
Kamalgad 3
( वासोळे गावातून दिसणारे कमळगडाचे नवरा नवरी सुळके )
अ). वासोळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठ्याच्या दिशेने चढणीस सुरुवात केली असता, आपण साधारण एक ते दीड तासातच माचीजवळ येतो. वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसर्‍या अंगाला खोल दरी आहे. पुढे गेल्यावर "यू टर्न" घेऊन पाऊण तासा नंतर आपण किल्ल्याच्या मुख्य पहाडावर येतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसते. येथून थोडे पुढे ५ ते १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊल वाटेने तसेच वर गेले की १५ ते २० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र आपण मोकळ्या मैदानावर येतो. येथे धनगरांची वस्ती आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास ३ ते ३.३० तास लागतात.
वासोळ्यासाठी वाइवरुन बसच्या वेळा अशा आहेत
वासोळे- ८.००,४.००, ६.००
आ). वासोळ्यावरुन १५ मिनिटे चालत तुपेवाडीला यावे. येथून शाळेच्या बाजुने पुढे जाणारा रस्ता धरायचा. पुढे ७ ते ८ मिनिटात दगडी बांध डावीकडे ठेवून जंगलात जाणारा रस्ता धरायचा. मधे काही ठिकाणी रस्त्याला फाटे फुटले आहेत. गावातून आलेला मुख्य रस्ता सोडायचा नाही. बांध गेल्यावर ५ ते ७ मिनिटात एका ठिकाणी रस्ता उजवीकडे वळतो आणि किल्ल्याची सोंड सुरु होते. या वाटेने दमछाक करणारा चढ आहे. पण तासाभरात आपण माचीवर पोचतो. येथून हाच रस्ता जंगलाच्या वाटेने थेट धनगर वाडीत घेऊन जातो. हा धनगरांचा नेहमीचा रस्ता आहे.
तुपेवाडीसाठी वाइवरुन बसच्या वेळा अशा आहेत
तुपेवाडी- १.००, ६.००
Kamalgad 4
( केटस पाँईट्वरुन दिसणारा घंटेच्या आकाराचा कमळगड )
४ ) महाबळेश्वरहून :-
महाबळेश्वरच्या केट्‌स पॉईंट वरून खाली येणार्‍या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोर्‍यात उतरले की, सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदवणे गावी पोहचतो. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते.
Kamalgad 5

पार डबा झालेल्या गाडीतून प्रवास सुरु झाला. ब्रिटीशांनी वसवलेले माल्कम पेठ गाव ओलांडले, धोम धरणाची भिंत मागे गेली आणि कृष्णेच्या प्रचंड जलायशावरुन येणार्‍या गार वार्‍याने गात्रे प्रफुल्लीत झाली. उजव्या हाताला एखाद्या नांगराच्या फाळासारख्या धोमच्या विस्तीर्ण पसरलेल्या पात्रात घुसलेल्या कमळगडाने दर्शन दिले आणि ओबडधोबड रस्त्यामुळे एस.टी.ला बसणारे गचके विसरुन एकटक या गडाकडे पाहु लागलो.
Kamalgad 6
जसे वहिगाव जवळ येउ लागले तसे मागे एखाद्या पडद्यासारखा महाबळेश्वर पठाराचा डोंगर उठावलेला दिसू लागला. त्यातच आकाशात घुसलेले केटस पाँटचे टोक विशेक्ष लक्षवेधी. खालून देखील त्याचे नेढे स्पष्ट दिसत होते.
वहिगाव ते केटस पॉईंट असा ट्रेक करता येतो.
Kamalgad 7
( धोम- बलकवडी धरणाचा जलाशय , मागे डाव्या बाजुला महाबळेश्वर पठार आणि उजव्या बाजुला कोल्हेश्वर पठार )
या परिसरातील वहिगाव हे मुख्य गाव म्हणता येईल. इथून दोन रस्ते फुटतात. एक रस्ता पश्चिमेकडे जोर या शेवटच्या गावाकडे जातो. इथून एक पायवाट चंद्रगड ते ऑर्थरसीट या वाटेवरच्या बहिरीच्या घुमटीपाशी जाते. एक रस्ता बलकवडी, नांदगणे, परतवडी, आकोशी असा जातो. जर आकोशी किंवा परतवडीला जाणारी थेट बस मिळाली नाही तर वहिगावपर्यंत बर्‍याच एस.टी. बसेस आहेत, तसेच खाजगी जीपची सेवासुध्दा आहे. इथून चालत पुल ओलांडून पुढच्या गावात जाता येते. आम्हाला थेट बस मिळाल्याने काळजी नव्हती.
Kamalgad 8
परतवडी गाव मुख्य रस्त्यापासून थोडे आत आहे. फाट्यावर उतरलो, तो समोरच मंदिर दिसले. आत रामदास स्वामींची मुर्ती होती.
Kamalgad 9
परतवडी गाव ओलांडून खड्या वाटेने आम्ही चढू लागलो. मागे एकदा मी कमळगडावर आलेले होतो, तेव्हा नांदगणे गावातील वाटेने वर चढलो होतो. येताना मात्र ती वाट न सापडल्याने दुसर्‍याच वाटेने खाली उतरलो, ते याच वाटेने परतवडी गावात उतरलो होतो.
या वाटेने चढताना पश्चिमेकडे म्हणजे आपल्या डाव्या हाताला कोल्हेश्वराचा डोंगर दिसत असतो. वास्तविक महाबळेश्वर ईतकीच उंची असणार्‍या या पठारावर आजही घनदाट झाडी आहे. इथेही उत्कृष्ट पर्यटनस्थळ विकसित होउ शकले असते, मात्र दळणवळणाच्या दृष्टीने कोल्हेश्वरला जायला वाहनरस्ता होउ शकला नाही. वाढत्या पर्यटनामुळे महाबळेश्वरची लागलेली वाट बघता, एका दॄष्टीने हे योग्यच झाले असे म्हणावे लागेल. आज या कोल्हेश्वरावर फक्त दोन-तीन घरे आहेत. वर जाण्यासाठी जोर गावातून एक, कमळगडाच्या पठारावरून एक आणि तुपेवाडी-वासोळे गावातून एक अशा तीन वाटा आहेत. गर्द जंगलातील वाटेने आपण कोल्हेश्वराच्या पश्चिम टोकाशी जाउ शकतो. इथून चंद्रगड, ऑर्थरसीट पाँईट, रायरेश्वर, कांगोरी उर्फ मंगळगड असा विस्तृत पॅनोरमा दिसतो. कोल्हेश्वरच्या पठारावरचा हि अनगड कोल्हेश्वरची मुर्ती.
Kamalgad 10
कमळगड परिसराचा नकाशा
Kamalgad 11
पाठीवर सप्टेबरचे उन्ह झेलत एकदाचे कमळगड आणि कोल्हेश्वर याला जोडणार्‍या डोंगरधारेवर आलो. उजव्या हाताला वळून थोडे अंतर चालतो, तो हे गोरक्षनाथाचे मंदिर समोर आले.
Kamalgad 12
मुळ मंदिर बहुधा छोटे असावे. त्याचा जीर्णोध्दार केल्यानंतर मोठे मंदिर बांधले आहे. कमळगडावर जाग तोकडी आहे, शिवाय डोक्यावर छप्पर म्हणावे असे काही नाही, तसेच पाण्याची काहीही व्यवस्था नाही. त्यामुळे जर काही कारणाने या ट्रेकमधे मुक्कामाची वेळ आली तर हे मंदिर हा एकमेव आसरा आहे. कधीतरी एखादे महाराज इथे मुक्कामी असतात.
आम्ही येथेच अंगतपंगत करुन भोजनभाउ होण्याचा आनंद घेतला. घाई नसल्याने सावलीत थोडे आडवे होउन विश्रांती घेतली.
Kamalgad 13
मात्र पाण्याची व्यवस्था ना या मंदिरात आहे, ना कमळगडावर. गोरक्षनाथ मंदिरापासून कमळगडाकडे निघाले कि डाव्या हाताला एक पायवाट जाते. कड्याच्या टोकाशी एक ओढा अखंडीत वहात असतो, हाच या परिसरातील श्वाश्वत पाण्याचा स्त्रोत.
Kamalgad 14
एरवी मिनरल वॉटरसाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागते. इथे मात्र आम्ही मनसोक्त पाणी प्यालो आणि बाटलीत भरुनही घेतले. या पाण्यात एक खेकडा तरंगत होता. आम्ही दोघेही खेकडा खाण्यार्‍यातले नसल्याने, त्या बेट्याला त्या दिवशी तरी जीवदान मिळाले.
Kamalgad 15
दाट झाडीतील वाट तुडवून पुढे आलो तर अचानक एक मोकळवण सामोर आलं. उजव्या हाताला दाट झाडीने वनाच्छादीत कमळगडाचा माथा दिसला.
Kamalgad 16
हि सर्व सपाटी एका धनगर कुटूंबाने नांगरुन लागवडी खाली आणली आहे. या संपुर्ण परिसरात हे एकमेव कुटूंब एकाच मोठ्या घरात वेगवेगळे रहातात. मात्र बोलण्याचा प्रयत्न केला तरी फारसा संवाद साधला जात नाही हा माझा अनुभव. या आधी मी कमळगडावर आलेलो असताना, एक कासार जोडपे या डोंगरकपारीत रहाणार्‍या लोकांना होम सर्व्हिस देण्यासाठी, अर्थात त्यांच्या बांगड्या खपविण्यासाठी इथे आले होते. त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पात त्यांनी या परिसराची माहिती दिली.
शहरी सुखसोयींना चटावलेल्या आपल्या मनाला, इथे असे रहायचे याची कल्पनाही करवत नाही.
Kamalgad 17
शेताच्या कडेने चालत धनगरवाड्यापर्यंत यायचे आणि थेट घरासमोरुन गडाकडे जाणारी वाट पकडायची. दाट झाडीतुन हि वाट थेट गडाकडे घेउन जाते.
Kamalgad 18
या वाटेने जाताना आपल्याला तटबंदीचे दोन भिंती लागतात. याचा अर्थ संरक्षणासाठी कमळगडाला बाह्य कोट असला पाहिजे.
Kamalgad 19
गड जवळ आला तसे कातळकडे दिसू लागले.
Kamalgad 20
गर्द झाडीतून वाट आपल्याला थेट प्रवेशद्वाराकडे घेउन जाते.
Kamalgad 21
मुळ वाट बहुधा भग्न झाली आहे. बहुधा शेवटच्या ईंग्रजांविरुध्दच्या युध्दात पायर्‍या नष्ट झाल्याने भिंतीतील खोबणीत पाय रोवून शरीर वर ढकलून चढावे लागते. थोडे कौशल्याचे आहे, पण फारचे अवघडही नाही.
Kamalgad 22
आता मात्र हि यातायात करावी लागत नाही, कारण नुकतीच ईथे एक शिडी बसवल्याने त्यावरुन आरामात चढून वर जाता येते.
Kamalgad 23

Kamalgad 24
( कमळगडाचा नकाशा )
वर चढून आलो आणि धोम जलाशयावरून येणार्‍या थंडगार झुळूकांनी आमचा चढण्याचा शीण हलका केला.
Kamalgad 25
कमळगडाचा माथा म्हणजे जांभ्या दगडाचा ताशीव चौथरा आहे. माथ्यावर फारसे अवशेष नाहीत. फक्त एकच आकर्षण म्हणजे पायर्‍या असलेली विहीर.
Kamalgad 26
कमळगडाचा ईतिहास फारचा ज्ञात नाही. पन्हाळ्याच्या शिलाहार भोजाने या परिसरात जे पंधरा किल्ले उभारले त्यापैकी कमळगड एक. जुन्या कागदपत्रात याचा उल्लेख "घेरा भेळंजा" म्हणून येतो. पुढच्या ईतिहासात फार उल्लेख नसला तरी या परिसरातील इतर गडकोटांबरोबरच याचे हस्तांतर होत असणार. शिवाजी महाराजांनी सन १६७०-७१ मधे पांड्वगड आणि एप्रिल १६७४ मधे केंजळगड घेतला. तेव्हाच या दोन किल्ल्यामधील कमळगड सन १६७० ते १६७४ दरम्यान घेतला असण्याची शक्यता आहे. पुढे एप्रिल १८१८ मधे मेजर थॅचर याने फारशी लढाई न करताच कमळगड ताब्यात घेतला.
Kamalgad 27
गडाच्या मध्यभागी जमीन चिरत गेलेली ५०-५५ पायर्‍या असलेली हि विहीर म्हणजे कमळगडाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Kamalgad 28
आम्ही संप्टेबर महिन्यात गेलो असल्याने विहीराच्या तळाशी पाणी होते. दिवाळीनंतर मात्र हि विहीर कोरडी पडते.
Kamalgad 29
खोल विहीरीत उतरण्यासाठी एकाबाजुला पायर्‍या आहेत. अगदी अशीच विहीर पाटणजवळच्या दातेगडावर आहे. याचा अर्थ या दोन्ही गडाचा निर्माता एकच असणार.
Kamalgad 30
जांभ्या दगडामधे कोरलेल्या लालसर रंगाच्या पायर्‍या उतरुन आम्ही खाली गेलो. आतले कुंद वातावरण चांगलेच गुढ होते. गडावर कोणतेच मंदिर नाही, त्यामुळे आजुबाजुच्या गावातील गावकर्‍यांची जत्रा, यात्रे निमीत्त गडावर वर्दळ नसते. मात्र एकदा पाणी आटले कि विहीराच्या तळाशी असणारी काव काढण्यासाठी थोडेफार गावकरी येथे जातात. चकट्फू मिळणारी हि काव वाईच्या बाजारात विकता येते किंवा आपल्या घराच्या अंगणाच्या सुशोभीकरणासाठी वापराता येते.
Kamalgad 31
हि कातळकोरीव विहीर सोडली तर येथे किल्लेपणाची कोणतीही खुण नाही. दक्षिण बाजुला थोडी शिल्लक तटबंदी दिसते, याचा अर्थ कदाचित आधी पुर्ण गडमाथ्याला तटबंदी असावी.
Kamalgad 32
नाही म्हणायला याच बाजुला एका वाड्याचे उध्वस्त अवशेष दिसतात. पण आपणच या गडकिल्ल्यांची रखवाली उन, वादळ, वारा यांच्यावर सोपवली असल्याने त्यांचे काम ते ईमाने ईतबारे करताहेत.
Kamalgad 33
समुद्रसपाटीपासून ४५११ फुट उंचीच्या कमळगडाच्या माथ्यावर उभारल्यास पुर्ण ३६० अंशात मोठा नजारा दिसतो. अगदी खाली आपण ज्या परिसरातून चढून आलो तो धनगरवाड्याचा परिसर आणि गडाभोवतीचे घनदाट जंगल दिसते.
Kamalgad 34
एका बाजुला नवरा-नवरीचे सुळके दिसतात. स्थानिक लोक त्यांना "म्हातारीचे दात" अशा मजेदार नावांनी ओळखतात. गड उतरताना वेळ असल्यास चालत या सुळक्यापाशी जाउन, जवळून यांना न्याहाळणे आनंददायी आहे.
Kamalgad 35
गडाच्या पुर्व बाजुला धोम धरणाच्या पाण्याचा फुगवटा दिसतो. उजवीकडून कृष्णा आणि डावीकडून वाळकी नदीचे पात्र दिसते. या जलाशयात एखाद्या जहाजासारखा कमळगड मधोमध तरंगतो आहे.
Kamalgad 36
ईशान्येला कातळटोपीमुळे केंजळगड लक्ष वेधून घेतो, तर थेट उत्तरेला एखाद्या भिंतीसारखा रायरेश्वराचे पठार आडवे पसरले आहे. हवा स्वच्छ असेल तर रायरेश्वर आणि केंजळगड यांच्यामधून रोहिडा दर्शन देतो.
Kamalgad 37
पश्चिमेला घनदाट वृक्षराजीचे घोंगडे पांघरलेले कोल्हेश्वराचे पठार दिसते.
याशिवाय या परिसरातील ट्रेक करतानाच पांडवगड, वैराटगड, केंजळगड या गडांबरोबरच ईतरही ठिकाणे पहाता येतील. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. मूळ मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्याने प्रसिद्ध झाले. थोर संत कवी वामन पंडित यांचीही जवळच भोमगावाला समाधी आहे. नाना फडणवीसांचा वाडा असणारे मेणवली गाव तर न चुकता भेट द्यावे असे. हल्ली या परिसरात मोठ्या प्रमाणात चित्रपटांचे चित्रीकरण चालते, त्यामुळे हा सर्व परिसर तुम्ही सध्याच्या हिंदी, मराठी चित्रपटातून पाहिला असणारच. मात्र या परिसराला प्रत्यक्ष भेट देण्याची मजा और आहे. उत्तम हवामान, रहाण्या, जेवण्याच्या चांगल्या सोयी यामुळे वाई-महाबळेश्वर परिसराची सर्व ऋतुत भटकंती सुखावह असते.

( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटिअर
२ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३ ) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतीश अक्कलकोट
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Jun 2018 - 1:47 pm | प्रचेतस

उत्तम लिहिलंय.
कमळगडाच्या विहिरीसारखीच असणारी एक विहिर गणेशगुळ्याच्या अलीकडे आहे.

यशोधरा's picture

1 Jun 2018 - 1:59 pm | यशोधरा

उत्तम लिहिलंय.

सिद्धार्थ ४'s picture

1 Jun 2018 - 6:23 pm | सिद्धार्थ ४

छान माहिती दिलीत.

(एक प्रश्न : हे काव काय असते?)

प्रचेतस's picture

1 Jun 2018 - 7:15 pm | प्रचेतस

गेरू
तांबड्या रंगाची लोहयुक्त माती.

सिद्धार्थ ४'s picture

1 Jun 2018 - 7:38 pm | सिद्धार्थ ४

___/\___

कमळगडाला ती शिडी कधी बसवली राव! :-(

लेख नेहमीसारखाच सर्वांगीण आणि परिपूर्ण.

धनावडे's picture

1 Jun 2018 - 8:49 pm | धनावडे

एक वर्षांपूर्वी

धनावडे's picture

1 Jun 2018 - 9:00 pm | धनावडे

ते वहिगाव नाही वयगाव आहे. आकोशी एसटी मिळाली नाही तर वडाप किंवा एसटीने बलकवडी ला उतरुन दहा मिनिटे चालल्यावर नांदगणे ला जाता येते आणि हिच सगळ्यात सोप्पी वाट आहे.

सुरेख! माहितीपुर्ण लेख.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jun 2018 - 5:21 pm | अमरेंद्र बाहुबली

छान लेख

दुर्गविहारी's picture

8 Jun 2018 - 12:28 pm | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. या धाग्याबरोबरच या वर्षीचा उन्हाळी भटकंतींचा समारोप करतो. यावर्षी कोयना-महाबळेश्वर परिसरातील सर्व किल्ल्यांची ओळख करुन घेतली. पुन्हा पुढच्या वर्षी भेटुया जांभळे, करवंदे हा डोंगरी मेवा खायला आणि आंब्यांसवे उन्हाळी ट्रेक करायला. सर्वांचे पुन्हा एकदा आभार.