मा. ल. क.-१

Primary tabs

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
21 May 2018 - 11:03 am

एका छोट्याशा गावात एक अत्यंत गरीब ब्राम्हण मुलगा रहात होता. आई-वडील लहानपणीच वारलेले. नातेवाईकांनीही त्याला दुर लोटलेले. जवळ एकही पै नाही. वडीलांचा भिक्षूकी आणि पौरोहित्य हाच व्यवसाय असल्याने शेती-वाडी काही नाही. गावातच एका बाजुला वडीलोपार्जीत घर. तेही पडलेले. एक भिंत कशिबशी ऊभी होती. त्या भिंतीच्या आधारानेच हा मुलगा कसा तरी दिवस काढत होता. पुढे शिक्षण घ्यायची फार ईच्छा असल्याने माधुकरी मागुन आणि वार लावून शिक्षण घेत होता. गावातील अनेकांनी सांगुन पाहीले की “बाबारे, दिवस आता बदलत आहे. ऊपजिवीकेसाठी गरजेचे असलेले शिक्षण घे.” पण मुलाच्या मनात एकच विचार यायचा “पौरोहित्य हा आपला परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. आजोबांनीही तो केला, वडिलांनीही तोच केला. मग आपण परंपरा मोडून कसे दुसरे शिक्षण घ्यायचे. जे ज्ञान पुर्वापार चालत आले आहे त्याचा प्रवाह मध्येच तोडायचा आपल्याला काय अधिकार आहे? भले मला कुणी कर्मठ म्हटले तरी चालेल पण मी वैदिक शिक्षण घेणारच.

तो मुलगा रोज सकाळी पाच घरे माधुकरी मागून आणि. जे मिळे त्याचा कुलदैवताला नैवेद्य दाखवून स्वतः जेवत असे. दुपारपर्यंत त्याचे ‘अध्ययन’ चाले. दुपारी तो ठरलेल्या घरी वाराने जेवायला जाई. थोडा वेळ वामकुक्षी झाल्यानंतर त्याचे पाठांतर चाले. संध्याकाळी तो एकुलत्या एक भिंतीच्या आधाराने पाणी पिवून झोपत असे. असेच दिवसामागुन दिवस गेले, वर्षे गेली. या बारा वर्षात त्याच्या ज्ञानात खुप भर पडली. वेद, वेदांची ऊपांगे, थोडेफार व्याकरण, ज्योतिष असे जमेल ते ज्ञान त्याने आत्मसात केले. पण त्याची माधूकरी मागायची झोळी, एक-दोन धोतरे, आधाराची, पडायला झालेली भिंत यातमात्र काडीचाही फरक पडला नाही. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्याने गावातच पौरोहित्य सुरु केले. पण काळ बदलला होता. त्याच्या ज्ञानाची गावकऱ्यांना फारशी गरज भासत नव्हती. गावातीलच मंदिरात पुजेचे काम करुन मिळणाऱ्या मुठभर तांदुळ आणि काही फळांवर त्याची ऊपजिविका कशीबशी चालली होती. अशा या निष्कांचन अवस्थेमुळे त्याला कुणी मुलगीही देईना. लग्नाचे वय निघून गेले. वय ऊतारवयाकडे झुकू लागले. दातावर मारायलाही पैसा नव्हता. मंदिराचा ‘जुना पुजारी’ म्हणून गावकरी काही बाही देत. पण आता हातातून पुजाही होईना. वयोमानाने आलेल्या विस्मृतीमुळे आता पाठ केलेलेही आठवेणा. काळजी घ्यायला कुणीही नव्हते. संसारच नव्हता. येवून जावून ती एकूलती एक खचलेली भिंत, त्या भिंतीच्या खुंटीला टांगलेली झोळी, भिंतीतच असलेल्या कोनाड्यात असलेले देवघर, एक अंगावरचे व एक वाळत घातलेले असे धडके दोन पंचे एवढाच काय तो त्याचा संसार होता.

आज सकाळपासुनच पावसाने मुसळधार सुरवात केली होती. माधुकरीला जायला जमत नव्हतेच आजकाल त्याला, पण कुणीतरी गावकरी काही-बाही आणून देई. पण पावसामुळे आज कुणीही ईकडे फिरकले नव्हते. तो ऊपाशीच होता तसेच देवघरातले त्याचे देवही ऊपाशीच होते. वाळत घातलेला पंचा वाऱ्यावर फडफडत होता. त्याच्याही आता दशा निघायला लागल्या होत्या. पावसाचा जोर वाढत होता. वाऱ्यापासुन आणि पावसाच्या फटकाऱ्यांपासुन स्वतःला वाचवण्यासाठी तो आणखी आणखी भिंतीला खेटून, तिच्या पोटात शिरल्यासारखे करुन अंग जास्तीत जास्त आकसुन घेत होता. ईतक्यात विज कोसळल्यासारखा आवाज झाला. हळू हळू खचत ती भिंत धाडकन कोसळली. म्हाताऱ्या ब्राम्हणाच्या सगळ्या दुःखांचा, वेदनेचा क्षणात अंत झाला. ज्या भिंतीने त्याला आयुष्यभर आधार दिला तिनेच त्याला आपल्या पोटात घेतले. कोसळलेल्या भिंतिच्या ढिगावर पाऊस आपले पाणी ओततच होता. भिंतीतल्या दगड-विटांवरचा ईतक्यावर्षांचा मातीचा गिलावा पावसामुळे धुवून निघत होता.

सकाळी गावकरी जमले. भिंत कोसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सगळे म्हाताऱ्याच्या काळजीने भिंतीकडे धावले. सगळे गाव गोळा झाले. आणि त्या कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाकडे पहात असताना गावकऱ्यांचे डोळे विस्फारले, तोंडाचा ‘आ’ झाला. समोरच्या ढिगातली प्रत्येक विट सकाळच्या कोवळ्या ऊन्हात लखलखत होती. अस्सल बावनकशी सोन्यापासुन बनवलेल्या त्या विटांखाली ‘गरीब, बिचाऱ्या’ ब्राम्हणाचा ऊपासमारीने सुकलेला देह कुस्करुन गेला होता.

(मार्मिक घु था)

(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे.)

वावर

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

21 May 2018 - 11:11 am | संजय पाटिल

खुपच मा.ल.क.

शाली's picture

21 May 2018 - 11:20 am | शाली

नातरी निदैवाच्या परिवरी। लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी।
परि तेथ बैसोनि उपवासु करी। का दरिद्रे जिये॥
(लोह्या - सुवर्णमुद्रा)

माऊली (नववा अध्याय)

जेम्स वांड's picture

21 May 2018 - 12:13 pm | जेम्स वांड

मालक, मा.ल.क लैच खल्लास प्रकार काढलान तुम्ही!. जियो, लैच आवडले पहिले पुष्प, अजून येऊ द्या, भरपूर येऊ द्या. :)

शाली's picture

21 May 2018 - 3:50 pm | शाली

धन्यवाद जेम्स वांड!
वाटलेच होते तुम्हाला आवडेल हा प्रकार :)

धर्मराजमुटके's picture

21 May 2018 - 1:03 pm | धर्मराजमुटके

अरेरे, फार वाईट झाले. ह्या कधेचा काळ साधारण भारतात नास्तिक, मुस्लिम आणि दलित नव्हते तेव्हाचा आहे काय ?

manguu@mail.com's picture

21 May 2018 - 1:44 pm | manguu@mail.com

छान आहे कथा

श्वेता२४'s picture

21 May 2018 - 1:57 pm | श्वेता२४

छान आहे हा भाग

शित्रेउमेश's picture

21 May 2018 - 3:15 pm | शित्रेउमेश

काय अप्रतिम कथा आहे....
आवडली...

अभ्या..'s picture

21 May 2018 - 3:52 pm | अभ्या..

येऊंद्या अजून.
कथा सुरेख आहे पण ते मा ल क नाव नाही आवडले. :(

असुद्या हो अभ्याभाऊ, दुर्लक्ष करा मधळ्याकडे.
आता सुरवात केलिच आहे तर पाच सहा कथा टाकतो. त्या आवडल्या तर सांगा.

शाली's picture

21 May 2018 - 3:53 pm | शाली

सगळ्यांचेच धन्यवाद!

सरल मान's picture

21 May 2018 - 4:14 pm | सरल मान

मला वाटतंय सुशिंच्या दुनियादारीमध्ये.....राणी मां चा भूतकाळ सांगताना....

योगी९००'s picture

21 May 2018 - 4:25 pm | योगी९००

छान कथा....बिचारा ब्राम्हण...

मा.ल.क म्हणजे काय?

योगी९००'s picture

21 May 2018 - 4:26 pm | योगी९००

मा.ल.क म्हणजे काय ते कळलं...

मराठी कथालेखक's picture

21 May 2018 - 7:58 pm | मराठी कथालेखक

छान

कथा वाचली आहे ह्याआधी कुठे प्रकाशित केली आहे का ?

उगा काहितरीच's picture

21 May 2018 - 10:10 pm | उगा काहितरीच

कथा आवडली , पण ते मा. ल. क काही झेपलं नाही.

-अज्ञानी उका.

गामा पैलवान's picture

21 May 2018 - 11:36 pm | गामा पैलवान

शाली,

बोधकथा म्हणून चांगलीये. पण कथेतनं सूचित होणारं अनुमान पटलं नाही. कथा वास्तवापासून दूर गेलेली वाटते. वेदविद्या ही पोट भरायची विद्या नाही. त्यामुळे उपजीविकेसाठी ब्राह्मण मुलाने वेगळा कामधंदा करणे अपेक्षित होते.

आ.न.,
-गा.पै.

शाली's picture

22 May 2018 - 10:00 am | शाली

धन्यवाद गा.पै.
पुढील कथा लिहिताना जास्त विचारपुर्वक लिहायचा प्रयत्न करेन नक्कीच.

ट्रेड मार्क's picture

22 May 2018 - 1:09 am | ट्रेड मार्क

याला म्हणतात नशीब!

@शाली: चांगला प्रकार आहे, पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत.

शेखरमोघे's picture

22 May 2018 - 1:28 am | शेखरमोघे

कथा आवडली, शेवटची कलाटणी जास्तच आवडली. बोधकथाच करायची असेल तर प्रत्येकजण वेगवेगळे बोध काढू शकेल : अगदी "जुने ते सोने" पासून "कालबाह्य शिक्षणाने पोट भरत नाही" इथपर्यन्त.

शिव कन्या's picture

25 May 2018 - 9:54 am | शिव कन्या

हेच म्हणायचे होते.

@ शाली, कथा मस्त जमून आलीय...

विजुभाऊ's picture

22 May 2018 - 9:29 am | विजुभाऊ

कथा नायकाच्या आईवडिलांची किंवा त्याच्या पूर्वजांची ही चूक आहे.
जर परंपरेने वेदातले ज्ञान दिले तर मात्र घरात सोने आहे हे साम्गायला विसरले.
त्याच्या आईवडिलांनीही त्याला कधी व्यवहारी चिकीत्सक बनवले नाही ही पण चूकच आहे की
या वरून आठवले
वेदंत पुराणात विज्ञान सांगितलेले आहे, वेदांत अणू उर्जा, विमान विज्ञान सर्व आहे असे म्हणणारे वेदांची चिकीत्सा करतील तेंव्हा ते ज्ञान प्रकट होईल
अन्यथा ते ज्ञान त्या जुन्या भिंतीतील सोन्याच्या विटांप्रमाणे कधीच उपयोगी पडणार नाही

शाली's picture

22 May 2018 - 10:13 am | शाली

@विजुभाऊ
"अन्यथा ते ज्ञान त्या जुन्या भिंतीतील सोन्याच्या विटांप्रमाणे कधीच उपयोगी पडणार नाही" हे आवडले.

सगळ्यांचे प्रतिसाद आणि सुचनांबद्दल धन्यवाद!
मथळा लिहिताना ‘मार्मिक लघु कथा’ याचे संक्षिप्त रुप लिहून कथा पोस्ट केली. पण नंतर हे नाव मलाच जरा रुक्ष वाटले. पण आता सुरवात केलीच आहे तर काही कथा याच नावाने टाकेन म्हणतोय. घ्या सांभाळून.