मधुर, मोहक ताडगोळे

Primary tabs

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
5 May 2018 - 2:29 pm

आकाशाला भिडायला निघालेली, सरळ उंच वाढलेलं खोड त्यावर झुबकेदार टोकेरी पात्यांची भारदस्त झाडे म्हणजे ताड. ह्या ताडाच्या फळांच म्हणजे ताडगोळ्यांचं आणि माझा लहानपणापासून अतिशय सख्य. ताडगोळे म्हटल्यावरच माझ्या मनात शांत आणि मधुर भाव उमटतात. वाचताना कदाचित हे तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण असच आहे हे पुढच्या लिखाणावरून कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचेल.
उरणला नागांवात माझ्या माहेरी वाडीत ताडाची ७-८ उंच झाडे होती. काही ठिकाणी एकमेकांना सोबत देत दोन-तीन झाडे एकत्र कुटुंब पद्धतीत होती तर कोणी एकटेच शांतताप्रीय, एखादे आपल्याच तोर्‍यात तर कोणी सदा प्रसन्न सळसळते. दुपारच्या भर उन्हात जरी ह्या झाडाखाली गेलं तरी ही भक्कम झाडे स्वतः उन्हाच्या झळा सोसत मातृभूमीवर शीतल सावलीचे छत्र धरून असायची . संध्याकाळ झाली की मग स्वतःही शांत होऊन खट्याळ वार्‍यासोबत दंगामस्ती करत असायची.

ताडगोळे तयार झाले की चार-आठ दिवसातून एकदा ताडाच्या पेंडी काढणारा माणूस यायचा. सोबत त्याचीच आई किंवा बायको असायची. ताडावर चढण्याची कला ही फार साहसी असते. कमरेला कोयता ठेवायचं एक लाकडी साधन दोरीने बांधलेलं असायचं त्याला कोयता अडकवलेला असायचा आणि हाताला मोठाला दोरखंड अडकवण्यापुरता बांधून पायात जाड दोरीच झाडाच्या खोडला पाय फाकतील इतक्या आकाराच वर्तुळ अडकवून पाय फाकवून त्या वर्तुळाच्या दोरीवर उभे राहून त्या महावृक्षाला कडक मिठी मारत हा माणूस झपाझप त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचायचा.

आता एवढ्या उंच मजल मारली तरी तिथे उभे राहणेही सोपे नाही कारण ताडाच्या झावळीच्या देठाला करवतीसारख्या दातांच्या धारदार कडा असतात त्या सांभाळून उभे राहावं लागतच शिवाय भर म्हणून कधी कधी मुंग्यांची वारुळे आणि उंदीरच सामनाही करावा लागतो. पुढेही कसरतच असते. तयार झालेली ताडफळे ओळखायची त्याला दोरखंड बांधायचा मग हळुवार पेंडीचे देठ तोडून दोरखंड हातात धरून ती पेंड लामण्याप्रमाणे पण हळुवार खाली सोडायची. दोरखंड मात्र अजून पेंडी काढायच्या असतील तर हातात तसाच ठेवायचा आणि ह्या हातातल्या टोकाने पुन्हा दुसरी पेंड बांधून घ्यायची. खाली जे कोणी उभे असेल ते पेंडीला बांधलेला दोरखंड सोडायचे. त्या पेंडीला मोकळे केले की दोरखंड परत वर खेचून घ्यायचा आणि दुसरी बांधलेली पेंड खाली सोडायची. एका पेंडीला कमीत कमी तीन-चार आणि जास्तीत जास्त २० ताडफळे असतात त्यामुळे ह्या पेंडी वजन असतात. कधी कधी ५-६ पेंडीही एका झाडावर निघायच्या. पेंडी काढून झाल्या की दोरखंड खाली टाकून चढलेला माणूस झपाझप पायातील दोर्‍याच्या वर्तुळाच्या आधारे खाली यायचा.

चढणारा माणूस उतरला की लगेच तिथेच ताडगोळे सोलले जायचे. एक मोठी टोपली त्यात करंज झाडाचा हिरवागार पाला पसरलेला असायचा. ह्या पाल्याने गारवा येऊन ताडगोळ्यांचा ताजेपणा टिकायला मदत होते. ताडगोळे जिथे सोलायचे तिथे एक गोणपाट पसरवायचे त्यावर लाकडी ओंडका ताडफळे धरण्यासाठी आणि काढणार्‍याच्या हातात कोयता अशी साधने असायची. ताडगोळे काढण्याची कला ही सोपी नसते.

नारळावर कुठेही घाव बसला तरी चालतो पण ताडफळाला नेमक्या जागी घाव बसून तासणे आवश्यक असते नाहीतर नाजूक ताडगोळा फुटून त्याचे पाणी निघून जाते.

ताडफळे तासणार्‍याचा हात चांगलाच सरावलेला असायचा त्यामुळे तो भरभर हे ताडगोळे काढून टोपली भरायची. रिकामी ताडफळे जाळण्यासाठी सुकायला ठेवली जायची. काढलेले ताडगोळे मोजले जायचे मग भाव ठरवून ताडगोळे काढणाराच ते विकत घ्यायचा आणि त्याची घरची मालकीण ते बाजारात विकायला न्यायची. तेव्हा ५ रु. डझन ने बाजारात ताडगोळे विकले जायचे तेही महाग वाटायचे. वाडीत एक ताड मोहाचा होता. मोहाचा म्हणजे त्यातील पाणी अती मधुर आणि गर अगदीच चविष्ट. हे ताडगोळे वडील कधीच विकायचे नाहीत. ते घरात आणि पाहुणे मंडळींसाठी असायचे. बरेचदा काका- आत्या कडेही ह्या ताडगोळ्यांची भेट जायची.

ताडगोळे काढायला सुरुवात केली की वडील आम्हा भावंडांना सांगायचे "टोपलीजवळ बसून राहा व हवे तेवढे ताडगोळे खा". माझं ताडगोळा हे अतिशय प्रिय फळ. कोवळे ताडगोळे गोंडस गुलाबी तर तयार झालेले ताडगोळे पांढरे शुभ्र अगदी मोहक दिसायचे.

मी मनसोक्त त्यावर ताव मारायचे. ताडगोळ्यांचे अतिरिक्त प्रमाण बाधक असते ही आईची सूचना असायचीच पण ताडगोळ्यांच्या बाबतीत "जी ललचाये, राहा ना जाये" हा प्रकार होता. ह्यातले जून ताडगोळे असले की ते चावायला कडक आणि खोबर्‍यासारखे लागायचे ते चाळा म्हणून खायला बरे वाटायचे. ताडगोळे अगदीच जे कोवळे असायचे ते फळातून काढणे शक्य नसायचे. मग त्याचा वरचा भाग कापला जायचा ताडगोळे दिसे पर्यंत. एका ताडगोळ्यात तीन ते चार ताडगोळे असतातच. मग अशा गोळ्यात बोट घालून ते फोडायचं आणि डायरेक्ट तोंडात त्याचे पाणी आणि बोटानेच कुस्करून तोंडात ओढलेला गर अप्रतिम लागायचा. त्याला आम्ही फुरकी मारून खाणे म्हणायचो म्हणून ते फुरकीचे ताडगोळे. आम्ही शेवटी खास अशी फळे तोडून ठेवायला सांगायचो. जे ताडगोळे काढलेले असायचे त्या ताडफळाचा जो वरचा कोवळा गाभा असतो तोही खातात. त्याला आम्ही मोग म्हणतो. हे मोग जरा कडवट असतात. पण काहीच नसले की टाईमपास म्हणून बरे लागतात. हे मोठ्या माणसांना जास्त आवडायचे.
कधी कधी भरपूर पेंडी उतरवल्या जायच्या. मग एका वेळी एवढे ताडगोळे तासणे शक्य नसायचं. अशावेळी वडील व भाऊ मिळून ह्या पेंडी विहिरीत टाकायचे . आश्चर्य म्हणजे ह्या पेंडी पाण्यात तरंगायच्या. मला तर रामाने बांधलेल्या सेतूच्या दगडांचीच आठवण व्हायची आणि मी ही मग खार बनून एखादी छोटीशी तीन-चार फळांची पेंड विहिरीत टाकायचे. हा कार्यक्रम पाहायला मला खूप गंमत वाटायची. कारण पेंडींची वजनदार उडी आणि ते पाण्यात पडल्यावर येणार धब्ब आवाज आणि उडणारे पाणी हे पाहणं नयनरम्य असायचं. पाण्यात राहिल्याने ताडगोळे ताजेच राहायचे. मग जेव्हा हव्या तेव्हा पेंडी काढल्या जायच्या.

अंदाजे एप्रिल - मे महिन्यांत ताडपत्रींची (ताडाची पाने) म्हणजे ताडकांची तोडणी असायची. ही ताडकं मला मोराच्या पिसार्‍यासारखे वाटतात. अगदी नाचण्यासाठी सिद्ध झालेला मोराचा पिसाराच जणू. हे तोडताना ताडकं ठेवून बाजूच्या जास्त तयार झालेली ताडकं तोडायची. ताडकं तोडून खाली रचून ती उडून जाऊ नये म्हणून त्यावर ताडकांचे करवतीसारखे असणारे अवजड देठ ठेवायचे आणि ही ताडके काही दिवस सुकवायची.

ही ताडके झोपडीच्या छतासाठी, अंगणाच्या छपरासाठी अथवा पडवीच्या पावसाळी बांधणीसाठी गरजेची असायची. ही ताडकं गरजवंत घेऊन जायचे. गरिबांच्या झोपड्यांना वडील फुकटच देऊन टाकायचे. ताडकांच्या धारदार कडांच्या देठांचा कुंपण बांधायला उपयोग व्हायचा. हे कुंपण सुशोभित दिसायचे.
सगळ्याच पेंडी काही ताडावरून काढल्या जायच्या नाहीत. काही जून व्हायच्या त्या तशाच झाडावर पिकायच्या. साधारण जून-जुलै मध्ये ही फळे पिकली की केशरी रंगाची होतात आणि खाली पडतात ह्यांना एक वेगळाच गोड वास येतो. अजूनही त्या फळांची आठवण झाली की पावसाळा आणि त्या फळांच्या गंधाच्या स्मरणलहरींची चलबिचल होते. ह्या फळाचा रस चघळण्यातही एक सुगंधी आनंद असायचा. ह्या पिकलेल्या फळाचा केशरी रस काढून त्याचे काही सुगरणी घावानं, गुलगुल्यांसारखे पदार्थ बनवायच्या. त्या पदार्थांना तो विशिष्ट सुगंध असायचा. एक-दोन फळे पुरी होत असत पदार्थासाठी. बाकीची फळे तशीच पावसाळी चिखलात पडून रुतायची. कापणीचा हंगाम आला की ह्या फळांची मुळे जमीनीत रुतलेली असायची. ती उपटून काढायची. ह्याला आम्ही मोडहाट्या म्हणतो. आता ह्या फळाचा वरील मांसल भाग जाऊन सोललेल्या नारळाप्रमाणे टणक जमिनीच्या रंगाशी एकरूप झालेले असायचे. ते कोयत्याने बरोबर मध्ये फोडायचे मग त्यातून अतिशय चविष्ट गर निघतो. हा खाणे म्हणजे परमानंद. मी बरेचदा दुपारी, संध्यकाळी कधीही लहर आली की कोयता घ्यायचे आणि ह्या मोड हाट्या शोधून तोडून त्यांचा आस्वाद घ्यायचे.

जी फळे तशीच रुतलेली रहायची त्याला पुढे कोंब फुटून त्याची रोपे तयार व्हायची. बरं अजून ह्याच्या आस्वादाची तपश्चर्या पूर्ण झाली नाही. ह्या रोपांमध्ये जी खोल मुळे रुतली जातात ती एक-दीड फुटाची असतात. ती खणून काढली जातात व ती कापून उकडून खाल्ली जातात. ह्या प्रकाराला तरले म्हणतात. प्रचंड मेहनतीने हे तरले खणून काढले जातात. सगळीच मुळे काढली जात नाहीत. न काढलेली रोपे तशीच रुजून पुढे त्यांचे मोठ्या ताडात रूपांतर होते. आता कोणी म्हणेल कशाला ही रोपे काढतात तर ही खूप जवळ जवळ असतात आणि ती इतकी जवळ वाढू शकत नाहीत म्हणूनच निसर्गाने ही व्यवस्था केली असावी.
ह्या ताडांमध्ये एक लेंडी ताड असायचा. लेंडीताड म्हणजे त्याला फळे धरायची नाहीत फक्त लेंड्या लागायच्या. ज्या सुकल्या की जळणासाठी वापरल्या जायच्या. ही ताडाची नर जात. परागीभवन होऊन फळ लागण्यासाठी एखादा लेंडीताड जवळपास असायला हवा.

ताडाची झाडे उंच असल्याने त्यावर वीज पडण्याचा धोका असतो. ताडावर वीज पडली की ताडकं जळून पांढरी पडलेली दिसायची. असा ताड मृत होतो. असे अचानक फळते, खेळते झाड पांढरे पडलेले दिसले की आम्हा सगळ्यांच्याच जीवाला लागायचे. हे झाड तोडण्यात यायचे. ह्याचे भरभक्कम खोड पाण्याचा विरा (नाला) ओलांडून जाण्यासाठी छोट्या पुलाचे आव्हान स्वीकारून सोबत देई.
ताडाची कोवळी झावळी सुंदर दिसते. तिचा रंग पांढरा आणि त्याला हिरवी किनार साडीच्या किनारी प्रमाणे दिसते. तिचा स्पर्शही गुळगुळीत असतो. एक वर्ष आमच्याकडे एक कातकरी जोडपं कामाला होत. हे जोडपं ताडाच्या कोवळ्या पात्यांपासून वेगवेगळ्या कलाकृती बनवत असे. तेव्हा त्यांनी पात्यांची चटई, केसाच्या अंबाड्याची वेणी केलेली मला आठवते. तेव्हा ते प्रकार मला खूप भावले होते पण ते करण्याइतपत वा ती कलाकृती समजण्याइतपत माझं वय नव्हत. परप्रांतात अशा ताडाच्या पात्यांच्या अनेक कलाकृती बनविल्या जातात.
ताडाच्या पात्यांचे धागे काढून आई वडील शेतातील भाजीच्या जुड्या बांधायला घ्यायचे. तसेच ह्या ताडाच्या पातीच्या धाग्यात बकुळफुलांचाही सुगंध ओवला जातो. पात्या सुकल्या अगदीच तुटलेल्या वगैरे असल्या की त्या जळणासाठी वापरल्या जायच्या.
सुगरण पक्षी ताडाच्या पात्यांना आपले घरटे तयार करतात. पक्षांसाठीही ते आश्रयस्थान आहे.

ताडापासून ताडीही काढली जाते. एक वर्ष वडिलांनी ताडी काढणार्‍या माणसाला सांगून तो प्रयोग केला होता. ताडाला फळे येणारा गाभा थोडा कापून त्यावर मडके ठेवले जाते. मग त्या मडक्यात ताडाचा रस पाझरतो ती ताडी. ही ताडी ताजीच चांगली असते. शिळी झाली की ती आंबूस होते. ताडी औषधी असते असे म्हणतात. आंबवण्याच्या पदार्थात ताडी घालायचे असे काहीतरी आता आठवते. पण हे ताडी प्रकरण वडिलांना पटले नाही कारण त्या गाभ्याची फळे नष्ट होतात आणि नंतर आमच्याकडे कधी ताडी लावायला बोलावले गेले नाही. आता बरीच झाडे जुनी होऊन गेली आणि नवीन असली तरी ताडगोळे काढणारी माणसेच मिळत नाहीत.
तर असा हा ताड आपल्या अनेक प्रकारे माणसाला पुरेपूर उपयोगी पडणारा. ठोस उत्पन्नाचे साधन नसल्याने ह्या झाडांकडे आता समाजात दुर्लक्ष होत आहे. मला वाटत सार्वजनिक रस्त्यावर होणार्‍या विदेशी पाम ट्री च्या ऐवजी अशी Borassus flabellifer हे शास्त्रिय नाव असणारी ताडाची वा नारळाची झाडे लावावीत ज्याने शहरांच नंदनवन होईल.
आता सासरी उरण-कुंभारवाड्यात ताड आमच्या वाडीत नसले तरी काही ठिकाणी ही झाडे आहेत. त्यांच्या भेटी येतात. माहेर वरूनही येतात. मग ताडगोळे दिसले की मन पुन्हा बालपणात धावतं. ताडांच्या झाडांमधून बागडून येत. ताडगोळ्यातला पाणी अलगत डोळ्यांत जागा घेतं. माझ्या पतींना हे माहीत असल्याने ते माझ्यासाठी बाजारातूनही घेऊन येतात. मुलींनाही आवडतात. पण मी जेव्हा बाजारात जाते तेव्हा मात्र मला ते घ्यावेसे वाटत नाहीत कारण ताडाच्या छत्राखालीच ताडगोळे काढून करंज पाल्याच्या हिरव्या स्पर्शाने हवे तसे गुलाबी-सफेद, लुसलुशीत ताडगोळे खाण्यातला आनंद पैशाने विकत घेता येत नाही.

हा लेख दिनांक ४ मे २०१८ च्या झी मराठी दिशा या साप्ताहीकात प्रकाशित झालेला आहे.

छायाचित्रणलेख

प्रतिक्रिया

मनिम्याऊ's picture

5 May 2018 - 3:01 pm | मनिम्याऊ

जागुताई, किती निसर्गसंपन्न अनुभवविश्व आहे तुमचं. खऱ्या निसर्गकन्या आहात तुम्ही.

अर्धवटराव's picture

6 May 2018 - 4:33 am | अर्धवटराव

अगदी हाच प्रतिसाद मनात आला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2018 - 10:20 am | डॉ सुहास म्हात्रे

++१. लेख वाचताना मन सहपणे बालपणात गेलं !

गेल्या काही दिवसांपासून घराशेजारच्या सार्वजनिक बागेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रथमच एक टेंपोवाला ताडगोळे विकायला लागला आहे. त्यानिमित्ताने, कोवळे नारळपाणी सोडून असा पण काही चवदार मेवा असतो याबद्दल अनेकांचे शिक्षण होत आहे ! :)

नंदन's picture

6 May 2018 - 12:49 pm | नंदन

आहे. सुरेख, छान इ. विशेषणं तोकडी वाटावीत इतक्या सहज तन्मयतेने आलेला लेख.

रॉजरमूर's picture

5 May 2018 - 3:06 pm | रॉजरमूर

अप्रतिम लेख....
सध्या उन्ह्याळाचं ताडगोळ्यांचा आस्वाद घेणं चालू आहे दोन चार दिवसांआड.... अर्थात विकत घेऊन ,प्रचंड महाग मिळतात आता १२० रु. डझन ...
आम्हाला कुठे ताडाच्या झाडाखाली बसून चव चाखायला मिळणार ........

भाग्यवान आहेत तुम्ही अशा निसर्गाच्या सान्निध्यात तुमचे बालपण गेले.

जेम्स वांड's picture

5 May 2018 - 3:06 pm | जेम्स वांड

काय सुंदर लिहिलंय, एका वृक्षाभोवती भिरभिरणारे बालपण मस्तच मांडले आहे तुम्ही, खूप आवडलं, एकदा एका पाहुण्यांनी ताडगोळे खायला घातले होते, ते आठवले.

ताडाचे झाड अन ताडीचा काही संबंध असतो का? ताडी म्हणजेच केरळात मिळते ती पाम टॉडी असते का?

आमच्याकडे ताडाच्या झाडापासून जी निघते तिला ताडीच म्हणतात. माड म्हणजे माडापासून निघते तिला माडी आणि शिंदी पासून निघते ती निरा.
पण ही नावे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वापरतात अस लक्षात आल आहे.

आमची समजूत होती की ताडाच्या झाडापासून रात्रभर मडके लावून काढलेली ती नीरा. पण सकाळपर्यंन्त नीरा, जसजसे उन्ह चढत जाते तसतसे ती आंबू लागते व त्याची ताडी तयार होते. त्या ताडीलच शिंदी असे म्हणतात.
सोलापुरात ताडीचा फार मोठा इतिहास आहे. सुप्रसिध्द मार्शल लॉ हा ताडीच्या झाडाच्या तोडीचे तात्कालिक कारण घेउनच सुरु झालेला. सरकारी नियमानुसार शिंदीच्या झाडांची मोजणी होऊन तितक्या शिंदीखान्यांना परवानगी मिळते. सरकारी दारुच्या गुत्त्याप्रमाणे शिंदीखाने आहेत. पण सध्या झाडे नसल्यामुळे सगळे सरकारने बंद केलेत. आजही केमिकल्स वापरुन शिंदी बनवली जाते. ती कमी किंमतीमुळे कामगार आणि गरीब लोक पितात. दरवर्षी काही दुर्घटना होतात. पुन्हा जैसे थे चालू राहते.
पुण्यात दिवसभर नीरा कशी विकतात त्याचे समीकरण अजुनही मला कळलेले नाही.

श्वेता२४'s picture

5 May 2018 - 4:27 pm | श्वेता२४

तुमच्या जिवंत लेखनाने ताडगोळ्यांच्या कधीही न पाहिलेल्या निसर्गरम्य जगात फिरवून आणले

उपेक्षित's picture

5 May 2018 - 6:15 pm | उपेक्षित

दंडवत घ्या ताई, अप्रतिम लेख आणि शेवट तर डोळे ओलावणारा आहे.

माहितगार's picture

5 May 2018 - 6:52 pm | माहितगार

केवळ वर्णनच वाचू शकतो, आपल्या वर्णातून तादगोळ्याचेच नव्हे ग्रामीण जिवनाचे माधूर्य पोहोचले . निसर्गातीलच गोष्टींचा पुर्नवापराची लूप्त होणारी काहीशी कमर्शीअलाईज होत चाललेली संस्कृती जाणवली. लेख नुसताच वर्णनात्मक नव्हे माहितीने परिपूर्ण ठेवण्याचा प्रयासही महत्वाचा. चांगला लेख लिहिण्यासाठी वाचनात आणण्यासाठी अनेक आभार

डँबिस००७'s picture

5 May 2018 - 7:29 pm | डँबिस००७

जागु ताई,

तुमच्या जिवंत लेखनाने मला पुन्हा माझ्या बालपणात नेल, २८ - ३० वर्षांपुर्वी जेंव्हा बोरीवलीला रहात असताना वसई वैगेरे साईड हुन आलेले ताड गोळे खाण्याच भाग्य मिळालेले, आताच्या पिढीला ताडाच्याखाली ताडगो ळे खाण्याचे भाग्य म्हणजे स्वप्नवतच आहे.

आताश्या नारळ, सुपारी काढणारे मिळत नाहीत. गावाकडे नारळ , सुपारी झाडावर रहातेय !

अभ्या..'s picture

5 May 2018 - 10:19 pm | अभ्या..

एकच नंबर जागुताई,
ह्यातले 5 टक्के पण माहिती नव्हते.
अप्रतिम माहिती असलेला लेख.
घ्या शिफारशीत.

ताडगोळे खाल्लेले आता जमाना उलटून गेलाय. फार भावला लेख. काही फोटो माझ्या ब्राऊजरमध्ये लोड झाले नाहीत. पण वर्णन वाचून भावना पोहोचल्या. खूप छान.

जागूताई भारीच! शब्दच सुचत नाहीएत तारीफ करायला.

प्रमोद देर्देकर's picture

6 May 2018 - 11:24 am | प्रमोद देर्देकर

ताडगोळ्या विषयी एव्हढी माहिती प्रथमच वाचतोय.
पूर्वीच्या लोकांनी खालेल्या काही पदार्थांची चव सुध्दा आत्ताच्या पिढीला चाखयला मिळणे मुश्किल आहे.
खूप खूप धन्यवाद.

मंदार कात्रे's picture

6 May 2018 - 5:25 pm | मंदार कात्रे

कमरेला कोयता ठेवायचं एक लाकडी साधन दोरीने बांधलेलं असायचं त्याला कोयता अडकवलेला असायचा

या लाकडी साधनाला कोकणात " आकडी " असे म्हणतात .

"आकडी- कोयती घेवून कामाला ये " असे गडीमाणसास सांगण्याची पद्धत आहे .

खुप खुप धन्यवाद. हा शब्द आठवत नव्हता. बरोबर आकडीच म्हणायचे त्याला.

अतिसुंदर. तुम्ही जगावे अन लिहावे, आम्ही वाचावे. मज्जानी लाईफ.

शब्दबम्बाळ's picture

7 May 2018 - 9:44 am | शब्दबम्बाळ

घरात ८-१० ताडगोळे आणले असताना तुमचा लेख वाचला! :)
महाराष्ट्रामध्ये असताना हे कुठेच दिसले नाहीत कधी! पण बेंगलोरला आल्यावर, हातगाड्यांवर छोटे काळसर नारळ असल्यासारखे काहीतरी फळ बऱ्याच ठिकाणी दिसत होते. आधी वाटले भाजी वगैरे करत असतील याची त्यामुळे घेतले नव्हते पण एकदा तिथेच उभा राहून एक माणूस याचा एक गोळा गट्टम करताना दिसला मग मात्र लागलीच तिथे जाऊन हे काय आहे? कसे खायचे? कुठल्या झाडावर उगवते? असे अनेक प्रश्न त्या विकणाऱ्याला विचारून १ ताडगोळा घेतला. त्यानं फळाचं नाव ताडी सांगितलं तेव्हा वाटलेलं कि 'चढते' कि काय? पण घरी आल्यावर जरा शोधाशोध केल्यावर कळलं कि फळाने ताडी तयार होत नाही.
इथे १० रुपयाला एक ताडगोळा मिळतो एका फळामध्ये शक्यतो ३ तरी गोळे असतात. काहीजण ताडगोळ्यावरची साल न काढता एक्दम सगळा खाऊन टाकतात, पण मला त्याला पूर्ण सोलून मग मऊ चकाकणारा गर आणि त्यातले पाणी एकत्र खायला मजा येते!
पण आपल्याइथे नीरा मिळते मग ताडगोळे का मिळत नाहीत हा प्रश्न पडतो...

सोललेले ताडगोळे (चित्र आंजा वरून साभार)
link

रॉजरमूर's picture

7 May 2018 - 1:19 pm | रॉजरमूर

.

महाराष्ट्रामध्ये असताना हे कुठेच दिसले नाहीत कधी!

मिळतात महाराष्ट्रात पुण्या-नाशकात तर हमखास.
आताही उन्हाळ्यात ठिक ठिकाणी ताडगोळ्यांच्या गाड्या लागतात किंवा रस्त्याच्या कडेला झाडाखाली घेऊन बसतात विक्रेते आणि तिथेच सोलून पण देतात.
आता उत्तर भारतीय लोकं घुसलेत याही धंद्यात ...तेच दिसतात शक्यतो ...

मनीम्याऊ, अर्धवटराव, डॉ. सुहास, नंदन, रॉजर, जेम्स, श्वेता, उपेक्षीत, माहितगार, डँबीस, अभ्या, एस, शाली, प्रमोद, मंदार, बॅटमॅन, शब्दबंबाळ सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद. सगळ्यांच्या प्रतिक्रियाही फार मधुर.

सुखीमाणूस's picture

9 May 2018 - 3:46 pm | सुखीमाणूस

तुमचा आठवणीचा समृद्ध ठेवा असाच आम्हाला वाचावयास मिळत राहुदे.
या सगळ्या सुन्दर लेखांचे छान पुस्तक येऊदे लवकर.

पियुशा's picture

9 May 2018 - 3:52 pm | पियुशा

खुप मस्त लिहिलेस :)

विशुमित's picture

9 May 2018 - 4:05 pm | विशुमित

बरीच नवी माहिती मिळाली.
महत्वाचे म्हणजे फोटो छान आलेत.

गामा पैलवान's picture

9 May 2018 - 5:16 pm | गामा पैलवान

जागूतै,

कस्ली आठवण काढलीत म्हणून सांगू. ताडगोळ्याची गारशार मलई जिभेवर कशी दुलईसारखी अलगद पसरते ते आठवलं. आम्ही लहानपणी खाल्लेत हे गोळे. ताटगोळे म्हणायचो त्यांना. अर्थात दारावर विकत घेऊन. झाडावरचे ताजे खाण्याचं भाग्य लाभलं नाही तुमच्यासारखं, पण कल्पना करता येते. ताडगोळ्यांच्या मलईचा पोत काही वेगळाच असतो. अगदी तसाच एकदम चवदार पोताचा लेख आहे. धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

सुखी माणूस, पियुशा, विशुमित, गामा खुप खुप धन्यवाद.

तुमचे लेख वाचून "दिल गार्डन गार्डन हो गया" म्हणजे काय ते समजते. खूप छान माहिती + फोटो + अनुभव

मुक्त विहारि's picture

11 May 2018 - 8:25 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

व्य.नि. करतो.

धन्यवाद विणा आणि मुक्त विहारी.

धन्यवाद विणा आणि मुक्त विहारी.

गामा पैलवान's picture

11 May 2018 - 1:36 pm | गामा पैलवान

अवांतर : 'विणा'चा अर्थ वेगळा होत ना?
-गा.पै.

पाषाणभेद's picture

14 May 2018 - 8:49 am | पाषाणभेद

मुविंनी हा लेख आल्याचे सांगितले अन वाचून सार्थक झाले.
निसर्गकन्या हि पदवी सार्थ आहे तुमच्यासाठी.

निसर्गकन्या हि पदवी सार्थ आहे तुमच्यासाठी.

+ १

मदनबाण's picture

17 May 2018 - 6:09 pm | मदनबाण

जागु तै... तुझ्या जवळ अनमोल आठवणींचा आणि अनुभवांचा खजिना आहे ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Daru Badnaam | Kamal Kahlon & Param Singh | Official Video |

सुधीर कांदळकर's picture

18 May 2018 - 11:07 am | सुधीर कांदळकर

छान ताडगोळे मिळ्तात. फणसाचे गरे दिसायला लागले की ताडगोळे पण दिसू लागतात. रानडे रस्त्यावर भाजीवाल्यांच्या रांगेत ताडगोळेवाल्या बायका बसतात, सायकलची चार चाके लवलेल्या हातगाड्यावर देखील ताडगोळे विकले जातात. अंधेरी पूर्व स्थानकाजवळ, बोरिवली पश्चिम, स्थानकाबाहेर तसेच बाजाराबाहेर ताड्गोळेवाले दिसतात. दहा वर्षापूर्वी दहा रुपयांना तीन ते पाच मिळत. सोलून फ्रीजमध्ये ठेवून नुसतेच, शेवयांसारख्या लांब सळ्या काढून व्हॅनिला आइसक्रीमबरोबर छान लागतात. आम्ही स्ट्रॉबेरी जेली + ताडगोळ्यांचे शेवईवीसदृश काप आणि व्हॅनिला कस्टर्ड या थंडगार मिश्रणात देखील खात होतो. शनिवारी ताडगोळे आणायचे, रविवारी सकाळी हे सारे बनवून फ्रीजमध्ये सरकवायचे आणि दुपारी चहाऐवजी हा प्रकार असा शालेय विद्यार्थी असलेल्या चिरंजीवाच्या उन्हाळ्याच्या सुटीतला एखादा रविवार जायचा. हाती कला नसल्यामुळे हे सारे सजवायला दोनदोन तास लागत. एकदा तर उंच चौकोनी ग्लासात हे मिश्रण ठेवून त्याखाली फनेलने रोझ सिरप ओतले होते. त्यात घालायला फुगलेला सबजा नसल्यामुळे हळहळलो, पण दृश आणि चव दोन्ही अप्रतिम होते.

ताडगोळ्यांच्या सळ्या कांदेपोह्यात घालून पण छान लागतात.

९०च्या दशकातल्या अशा अनेक आठवणी ताज्या करणारा एक रसाळ आणि अप्रतिम लेख. धन्यवाद.