भाषा अहिराणी

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Mar 2018 - 5:48 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात बोलली जाणारी प्रमुख भाषा ही अहिराणी भाषा आहे. पूर्वी घरात, मित्रांत, नातेवाईकांत, बाजारात, दुकानात, दैनंदिन व्यवहारात, शेती व्यवहारात सर्वत्र अहिराणी भाषा बोलली जायची. घरात पूर्णपणे अहिराणीत संभाषण होत असे. कारण खानदेशातली अहिराणी ही लोकभाषा आहे. म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील खानदेशची प्रमाणभाषा अहिराणी आहे.
त्या काळातला प्राथमिक शाळेतला शिक्षक असो की माध्यमिक शाळेतला. शाळेतून शिक्षक बाहेर पडले की ते घरी-दारी अहिराणी भाषा बोलायचे. शाळेत विद्यार्थ्यांनाही आपसात अहिराणी बोलायला अलिखित परवानगी होती. मात्र शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांशी मराठी बोलत. आपसात बोलण्यासाठी विद्यार्थ्यांना मराठीची सक्‍ती नव्हती. घरात आणि नातेवाईकांत नैसर्गिकपणे अहिराणी भाषा बोलली जायची.
पुढे पुढे केव्हातरी भाषेबाबत न्यूनगंड बळावत गेला. भाषेच्या शुध्द अशुध्द स्वरूपावर अधिकारी चर्चा होऊ लागली. बोलीभाषा बोलणार्‍यांना गावंढळ संबोधलं जाऊ लागलं. कोणाकडून भाषेतले उच्चार नीट होत नसले तर हिनवलं जाऊ लागलं. घरी बोली भाषेत बोलणारा शिक्षक शाळेत येताच बळजबरी तथाकथित शुध्द भाषा बोलण्याचा प्रयत्न करू लागला. आणि एखाद्या‍ विद्यार्थ्याच्या तोंडातून चुकून बोलीतला शब्द निघाला की तो शिक्षक त्या विद्यार्थ्याला चिडवत त्याचा अपमान करू लागला. अशा पायरी पायरीने होणार्‍या बदलात शाळेत गेलं की विद्यार्थ्याने मराठीच बोललं पाहिजे अशी आचारसंहीता आपोआप आणि केव्हा तयार झाली हे कोणालाच कळलं नाही.
शाळेत कोणी विद्यार्थी चुकून अहिराणी बोलला तर तो चेष्टेचा विषय होऊ लागला. हिनवला जाऊ लागला. अहिराणी बोलणं ही बाब न्यूनगंड तयार करू लागली. हे सर्व भयानक आहे हे कोण कोणाला सांगेल, अशी परिस्थिती. ‘इथे अहिराणी बोलण्यास सक्‍त मनाई आहे.’ अशा इकडच्या काही सरकारी कार्यालयात पाट्या सुध्दा लावल्या गेल्या. आणि अशा अनेक कारणांनी खानदेशातील बर्‍याच लोकांनी अहिराणी बोलणं सोडलं.
खानदेशातल्या अहिराणी सारखे त्या त्या भागातल्या बोलीभाषांवर हा दबाव येऊन भाषा अस्तास जायला लागल्या. यामुळे बोली भाषांची अतोनात हानी झाली. हा मधला काळ सोडला तर त्यानंतर भाषा शास्त्राचे वारे शिक्षण क्षेत्रात आले हे नशीब. विद्यार्थ्याला त्या त्या बोली भाषेत शिक्षण दिलं गेलं पाहिजे हे मान्य होऊ लागलं. आणि मग ही प्रमाणभाषेची आचार संहीता नष्ट होऊ लागली. पण ह्या गोष्टीला खूप उशीर झाला होता. या आधीच्या न्यूनगंडामुळे बोलीभाषांचं जे नुकसान झालं ते पुढे भरून आलं नाही.
या अशा आणि न्यूनगंडांच्या अनेक कारणांमुळे आज अहिराणी भाषेतून मूळ अहिराणी शब्द लुप्त होत आहेत. आज अनेक अहिराणी शब्दांची जागा इंग्रजी व मराठी शब्दांनी घेतली आहे. अहिराणीच्या बाबतीत जे घडलं ते सगळ्याच बोली भाषांच्या वाट्याला आलं.
नाशिक (जिल्ह्यातील पूर्व भाग), धुळे, नंदुरबार, जळगाव (पश्चिम भाग) या चार जिल्ह्यात अहिराणी भाषा बोलली जाते. खानदेशातली ‍अहिराणी ही लोकभाषा असून याच पट्ट्यात काही अहिराणी पोट भाषा समजल्या जातात. बागलाणी, नंदुरबारी, खानदेशी, खाल्यांगी, वरल्यांगी अशा काही अहिराणी लोकभाषेच्या पोटभाषा आहेत. अहिराणी परिसरात काही जाती- जमातीय भाषाही बोलल्या जातात. भावसारी, तावडी, पावरी, भिल्ली, मावची, गुर्जरी, लेवापाटीदार, देहवाली, कोकणा, वारली, ठाकर, लाडशिक्की, घाटकोकणी आदी बोलीही बोलल्या जात असल्या तरी या सर्व पोट भाषांवर अहिराणी भाषेचा पगडा दिसून येतो.
सगळ्याच बोली आज जपल्या पाहिजेत तरच प्रमाण मराठी जपली जाईल.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

भाषालेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

1 Mar 2018 - 8:13 pm | तुषार काळभोर

आणि एखाद्या‍ विद्यार्थ्याच्या तोंडातून चुकून बोलीतला शब्द निघाला की तो शिक्षक त्या विद्यार्थ्याला चिडवत त्याचा अपमान करू लागला.
शाळेत कोणी विद्यार्थी चुकून अहिराणी बोलला तर तो चेष्टेचा विषय होऊ लागला.
‘इथे अहिराणी बोलण्यास सक्‍त मनाई आहे.’ अशा इकडच्या काही सरकारी कार्यालयात पाट्या सुध्दा लावल्या गेल्या.

आश्चर्य आणि वाईट वाटलं. (हे साधारण कधी घडलं?)

आमच्या घरात अजूनपण सेमी गावठी बोलली जाते. (माझे गाव घरापासून दहा किमी, आईचं माहेर २२ किमी, बायकोचं माहेर ४ किमी, सगळं पुण्याच्या पुर्वेच्या ग्रामीण भागात). नातेवाईकातपण कोणीही प्रमाण मराठी बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत. अर्थात, माध्यमांमध्ये जशी टोकाची ग्रामीण बोली दाखवली जाते, तशी नाहीये. पण पुण्याचा काठावर असूनही प्रमाण मराठीचा आग्रह व सेमी-ग्रामीणची हेटाळणी, असं काही नसतं.
आमची आख्खी शाळा (म्हणजे विद्यार्थी) सेमी-गावठी (जी घरात अजूनही बोलली जाते) त्या भाषेत बोलायची.
कॉलेजमध्ये आमचा ग्रुप शुद्ध गावठी भाषेत बोलायचा. (बाकी बहुतेक सर्वजण जे निम्न-मध्यवर्गीय वा ग्रामीण पार्श्वभूमीचे होते, तेसुद्धा चारचौघात प्रमाण मराठी बोलायचे.)
आता इथं कंपनीत तर माझ्या पिढीतले (ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात जन्मलेले - Millennials) सगळेच पुण्यात-उपनगरात जन्मलेले, पण मूळ ग्रामीण पार्श्वभूमी असलेले- सगळेच 'लई' गावठी बोलतो.
म्हणजे मला कोणत्याच टप्प्यावर बोलीभाषेचा न्यूनगंड असलेली मित्रमंडळी भेटली नाहीत. (अर्थात असा न्यूनगंड असलेले खूप आहेत, पण कर्मधर्मसंयोगाने त्यांच्याशी कधी मैत्री झालीच नाही)

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Mar 2018 - 6:17 pm | डॉ. सुधीर राजार...

अापला अनुभव छान आहे. हेवा वाटण्यासारखा. खरं तर भाषेबाबत असंच वातावरण हवं सर्वत्र. 19 75- 76 च्या जवळपास. पाटी लावण्याचा अनुभव तर फार ‍अलिकडचा. पंचायत समिती बागलाण मध्ये अशी पाटी लावण्यात आली होती. ही 2000 च्या आसपासची गोष्ट. पत्र लिहून ती पाटी काढायला भाग पाडलं. धन्यवाद सर.

पैसा's picture

1 Mar 2018 - 8:14 pm | पैसा

छान माहितीपूर्ण लेख. अहिराणीच्याही इतक्या बोली आहेत हे वाचून विस्मय वाटला.
शाळेत किंवा सरकारी कार्यालयात अहिराणी बोलण्याला बंदी हे अतीच झाले. गोव्यात अनेक वर्षे अशी परिस्थिती होती की शाळेत शिक्षणाचे माध्यम मराठी. वृत्तपत्रे, पुस्तके, इत्यादि सगळे लिखाण मराठीत, लोक नातेवाईकाना पत्रे लिहीत ती मराठीतून. आणि घरात कोंकणी बोलली जायची. कोंकणी ही आज स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता पावली आहे. पण घरी बोलण्यात कोंकणी आणि लोकव्यवहारात मराठी अशी वाटणी असून कोंकणीची गळचेपी झाली नाही. कदाचित एक कारण मला जाणवते ते असे की कोंकणी वेगळी भाषा असली तरी मराठीला अहिराणीहून जास्त जवळची आहे. अहिराणीत अनेक गुजराती हिंदी शब्दांचे मिश्रण आहे असे दुसर्‍या धाग्यात वाचले. त्यामुळे अहिराणी आणि प्रमाण मराठी यात स्विच होताना लोकांना त्रास होत असावा.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Mar 2018 - 6:24 pm | डॉ. सुधीर राजार...

आपल्या मताशी सहमत आहे. मराठीतल्या इतर बोलींपेक्षा अहिराणी मराठी भाषकाला समजायला थोडी कठीण आहे हे नक्की. पण ती गुजरातीलाही खूप जवळची आहे असे नाही. मोजकेच शब्द गुजरातीशी जुळतात. आणि क्रियापद छे चे शे होते. धन्यवाद.