गुलाब 'जाम' नाही, पण थोडा आवडला

सरनौबत's picture
सरनौबत in काथ्याकूट
26 Feb 2018 - 5:26 pm
गाभा: 

गेले काही दिवस झी मराठीवर 'गुलाबजाम' च्या प्रोमोज ने धुमाकूळ घातला होता. 'चला हवा येऊ द्या' मध्ये 'गुलाबजाम' ची टीम येणार म्हणून तो एपिसोड आवर्जून बघितला. त्यात चित्रपटातील कलाकार, 'खाण्याची आणि बनवण्याची आवड असेल तर हा चित्रपट नक्की पहा' असा आग्रह करित होते. विविध पदार्थ खाण्याची आवड, महाराष्ट्रीय पदार्थांवर विशेष प्रेम, शिवाय पुण्यातील शूटिंग आणि बरेचसे कलाकार पुण्यातले! त्यामुळे चित्रपट बघण्याची उत्सुकता होतीच. इकडे मस्कत मध्ये मराठी चित्रपट फारसे रिलिज होत नाहीत. त्यामुळे हा चित्रपट हुकणार अशी हळहळ वाटत होती. मात्र हा चित्रपट चक्क मस्कत मध्ये ५ दिवस एका चित्रपटगृहात लागणार असल्याचे समजले आणि मला 'गुलाबजाम' ची भूक लागली!

'बेडेकर’ मध्ये मस्तपैकी गोडसर-तिखट मिसळ खायला जावं आणि तिकडे 'रामनाथ' ची झणझणीत आणि डोक्याला मुंग्या आणणारी मिसळ मिळाल्यास जसं वाटेल" तसं चित्रपट बघितल्यावर झालं. चित्रपट अतिशय तरल, कलात्मक वगैरे आहे, कलाकारांची कामे देखील उत्कृष्ट आहेत . पण चित्रपटाचे नाव आणि प्रोमोज पाहून एखादा हलका-फुलका चित्रपट असावा ह्या विचाराने तुम्ही गेलात तर मात्र अपेक्षाभंग होण्याची शक्यता अधिक.

चरचरीत फोडण्या, पांढराशुभ्र ओला नारळ भुरभुरवलेली भेंडीची भाजी, व्यवस्थित भाजलेल्या घडीच्या पोळ्या, कुरकुरीत भजी, वगैरे शाकाहारी स्वयंपाक सुरुवातीला पाहून भूक नक्की चाळवली जाते. "मी माझ्या मनातले सगळे पदार्थांना सांगते... ते समजूनही घेतात आपल्याला आणि मग छान चव येते त्यांना.." किंवा ‘प्रमाण, मापं, हिशोब याच्या पलीकडे जाऊन मनापासून एखादा पदार्थ बनवला ना तर तो सुंदर बनतोच’ यासारखे अनेक संवाद आपल्या मनाला स्पर्शून जातात. कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) त्या पदार्थाशी गप्पा मारतो असे दाखवण्यात आले आहे. या सगळ्या गोष्टी चित्रपटात बऱ्यापैकी जमून आल्या आहेत. मात्र राधा (सोनाली कुलकर्णी) चा भूतकाळ आणि घडलेली ट्रॅजेडी समजल्यावर चित्रपट अतिशय गंभीर वळण घेतो. त्यानंतर चित्रपटाचा मुख्य विषय बाजूला राहून लवकरच 'डोक्याला शॉट' होतो. एकदा हा शॉट लागल्यावर मग पुढचे अनेक प्रसंग अनावश्यक वाटू लागतात. 'भूतकाळ विसरलेल्या राधाला फक्त रणबीर कपूरचेच चित्रपट का आवडतात?' इथपासून ते 'आदित्यला इतक्या लहान वयात झोपेच्या गोळ्या घेतल्याखेरीज झोप का येत नाही?' असे अनेक प्रश्न मनात थैमान घालतात. गुलाबजाम मधला गोड पाक आटण्यास सुरुवात होते आणि लवकरच ते कोरडे गुलाबजाम वाटायला लागतात (ते देखील वरून साखर नसलेले!). 'पाक'क्रियेवरील चित्रपट असूनही पाक म्हणावा तसा जमला नाही असं 'जाम' वाटतं.

चित्रपटात राधा म्हणते कि 'भाजीत आलं लसूण जपून वापरावं, नाहीतर भाजीची मूळ चव लागत नाही'. अगदी असंच चित्रपटाचं देखील झालंय. राधा आणि आदित्यच्या नात्यातील गुंतागुंत उलगडण्याच्या नादात 'मराठी खाद्यसंस्कृती' हा चित्रपटाचा मूळ गाभा थोडासा बाजूला राहिल्यासारखं वाटतं. आर्ट फिल्म्सची आवड असल्यास हा चित्रपट बघण्यास हरकत नाही. मात्र सिरीयस चित्रपट बघून डोकं जाम होत असल्यास तिकिटावर खर्च करण्यापेक्षा हलवायाच्या दुकानातून गुलाबजाम घेऊन खाणे जास्त बरं!

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

26 Feb 2018 - 5:48 pm | चौथा कोनाडा

झकास लिहिलंय ! आवडलं.

बर्‍याच वेळा सिनेमाची जाहिरात करताना अशी काही करतात की आपल्या वेगळ्याच अपेक्षा तयार होतात.
बरं झालं, या परिक्षणामुळं गुलाबजाम आता वेगळ्या अँगलने पाहता येईल.

उपेक्षित's picture

26 Feb 2018 - 5:55 pm | उपेक्षित

परवाच पहिला,

अतिशय उत्कृष्ट चित्रपट झालाय. सोनाली कुलकर्णीचा अभिनय (अभिनय करत आहे वाटत नाही) निव्वळ लाजवाब आणि सिद्धार्थ चांदेकर सुद्धा तोलामोलाची साथ देतो.
विशेष म्हणजे संपूर्ण चित्रपटापैकी जवळपास ८०% फ्रेम मध्ये सिद्धार्थ आणि सोनाली दोघेच आहेत पण कुठेहि कंटाळवाणे वाटले नाही मला.
साधी सरळ कथा आणि सहज सुंदर अभिनय, मला जाम आवडला चित्रपट, आवर्जून बघा मंडळी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2018 - 10:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

चाकोरीची वाट सोडून एका अनपेक्षित आणि अनवट विषयावर बनवलेला आणि सुंदर अभिनयाने नटलेला गुलाबजाम आवडला !

नाखु's picture

27 Feb 2018 - 10:47 am | नाखु

नक्की काय आहे त्यासाठी तरी पहायला हवा

सिद्धार्थ चांअग्निहोत्र पासून पंखा आहेच सोनाली तैं ना अनुकूल खेळपट्टी मिळालेली दिसतेय

नाखु सिनेमावाला पिटातल्या प्रेक्षकांचा प्रतिनिधी

सिनेमॅटोग्राफी (त्यातल्या त्यात फूड आयटम्सचे प्रेझेंटेशन) सोडले तर टोट्टल बोगस पिक्चर आहे.
कशाचा कशाला मेळ नाही.
त्यापेक्षा सोनालीचाच जुना "रेस्टॉरंट" आणि सध्या सैफ खानचा "शेफ" आवडला.

मालोजीराव's picture

28 Feb 2018 - 4:17 pm | मालोजीराव

असे चित्रपट आवडत असतील तर 'कुक अप अ स्टॉर्म' हा चायनीज चित्रपट नक्की पहा ... या प्रकारातला पाहिलेला सर्वात जबरी चित्रपट वाटला

आशु जोग's picture

27 Feb 2018 - 1:00 pm | आशु जोग

या सिनेमाला यू प्रमाणपत्र का दिले आहे
लहान मुलांना नेता येइल का !

सरनौबत's picture

27 Feb 2018 - 4:34 pm | सरनौबत

लहान मुलांना नेता येईल पण शक्य असल्यास नेऊ नये. त्यांच्या दृष्टीने कंटाळवाणा वाटू शकतो

अतिशय देखणा, (सर्व अर्थाने) चित्रपट.
काय सुंदर सिनेमेटॉग्राफी केलीये या चित्रपटात. खल्लास!
कुंडल्या कितीही आगावपणे आणि कुचकटपणे पुण्याविषयी बोलो/लिहो, त्याला पुणं आवडतं खुप हेच दिसतं.
एवढे देखणे पदार्थ इतका काळ पहाणं म्हणजे अन्याय ठरतो निव्वळ. सायली राजाध्यक्ष ज्यांनी फूड डिझाईन केलंय या सिनेमासाठी, त्यांना तर हॅट्स ऑफच आहेत.
आणखी एक अतीप्रचंड आवडलेली गोष्ट म्हणजे 'पार्श्वसंगित'. इतकं लोभसवाणं पार्श्वसंगीत आहे या सिनेमात की बास!
सिद्धार्थ चांदेकर पुर्वी डोक्यात जायचा, या सिनेमात मात्र त्याने अतीशय उत्तम काम केलंय. सो कूलला काय, चॅलेंजच नाही.
माझ्याबाबतीत म्हंटले तर, लेखक सचीन कुंडलकरवरचा राग दिग्दर्शक सचीन कुंडलकरमुळे दूर झाला.

चौथा कोनाडा's picture

27 Feb 2018 - 5:26 pm | चौथा कोनाडा

+११,१११

काल गुलाबजाम पाहिला.

सही लिहिलंय बॉस ! याच कारणासाठी मलाही गुलाबजाम आवडला. सिनेमेटॉग्राफी तर सुंदरच आहे. पेठवालं पुणं बघायला जाम मजा येते. सगळीच भट्टी जमून आलीय.
खुप दिवसांनी वेगळा सिनेमा पाहिला !

सुरवातीच्या भागात आदित्य (सिद्दार्थ चांदेकर) पहिल्यांदा गुलाबजाम मटकावतो तो शॉट सॉलिड्ड आहे. सिनेमा खाण्यातून जगण्यात कधी जातो ते कळतच नाही.
सिद्दार्थ चांदेकरचं काम जबरदस्त आहे. फ्रेश, सेन्सिबल ! सोनाली कुलकर्णी बद्दल काय बोलायचं? सिनेमातलं एक गाणं सुद्धा छान आहे.

सचीन कुंडलकरवरचा रेस्टॉरंट पाहिला होता, संथ वाटला. रेस्टॉरंट पेक्षा मला गुलाबजाम आवडला.
( सचीन कुंडलकरवर नेहमी वासावरच सिनेमा बनवतात की काय (उदा: गंध, अईय्या) या सिनेमात सुद्धा पदार्थ पाहताना आपल्याला चक्क वास येतात !

एकंदरीत झकास आहे गुलाबजाम !

आणि खुप आवडला. सुंदर सिनेमेटॉग्राफी सुंदर फूड प्रेझेंटेशन वरती एक लोभसवाणं पार्श्वसंगीत. मजा आली.
फक्त राधा ला शेवटि लन्डन ला घेउन गेले असते तर सिनेमा कंप्लीट झाला असता.

'भाजीत आलं लसूण जपून वापरावं, नाहीतर भाजीची मूळ चव लागत नाही'.

कांदा* लसूण जपून वापरावं.

एकार्थाने ते खरं वाटतं. त्यातलं "ज्यांना स्वयंपाक येत नाही ते असा कांदा लसणाचा मारा करतात" म्हटलेलं वाक्य, कांदा लसणाशिवायचे पदार्थ खाल्ले की तंतोतंत पटतं.
चित्रपटातल्या काही गोष्टी म्हणजे सिद्धार्थला नुसतं डब्यावरचं नाव वाचून घर सापडतं आणि तेही पुण्यातलं!! तो त्या आजोबांच्या बशीत दाणे का घालून जातो, रेणुका शहाणे एकदा शहाणी तर एकदा अप्पलपोटी का वाटते असे बुद्धीला पटणारे प्रश्न बाजूला ठवून त्यातले पदार्थ आणि स्वयंपाकाबद्दलच्या टिप्पण्या पाह्यल्यास नितांतसुंदर आहे.

सरनौबत's picture

27 Feb 2018 - 6:05 pm | सरनौबत

आदित्य ने मुंबईत साखरपुड्याच्या वेळी फाफे सिनेमा बघितला असावा म्हणून सापडलं घर नुसत्या नावावरून.

चौथा कोनाडा's picture

28 Feb 2018 - 4:22 pm | चौथा कोनाडा

:-))) भारी पंच मारलाय !

मलाही प्रश्न पडला, नुसता डबा बघुन कसा काय सापडला बुवा त्या राधा आगारकरचा ?
आता पेठांमधल्या मेसचे डबे बघावे लागतील की नावा बरोबर पत्ता देखील असतो की काय ?

मोहन's picture

27 Feb 2018 - 5:25 pm | मोहन

मला तर जामच आवडला !

प्राची अश्विनी's picture

27 Feb 2018 - 5:34 pm | प्राची अश्विनी

खरंय, सिनेमॅटोग्राफी छान आहे. पण शेफ, स्टेनली का डब्बा ई चित्रपटातसुद्धा हे पहामला मिळालंय. पण इथे मराठी पदार्थ म्हणून कौतुक वाटलं. दोनच माणसं इतक्या कमी वेळात इतके सारे पदार्थ इतक्या सा-या जणांसाठी आणि तेसुद्धा सुबक सुंदर इ याचं सुद्धा कोडं पडलं.
कुणाला The 100 feet journeyची आठवण आली नाही का?

आनन्दा's picture

28 Feb 2018 - 1:39 pm | आनन्दा

चांगल्या चर्चेला गालबोट लावताय तुम्ही :)

प्राची अश्विनी's picture

1 Mar 2018 - 9:51 am | प्राची अश्विनी

???

शेफ, स्टॅन्ली का डब्बा, लंचबॉक्स, लव शव दे चिकन खुराणा, बरेली कि बर्फी झालचतर क्वीन, इंग्लिश विंग्लिश, चिनीकम.... (यातले मी तीनच पाहिलेत आणि त्यातला स्टॅन्ली का डब्बा हा एकच आवडला) बऱ्याच चित्रपटात अन्न, हॉटेल, केटरिंग हा महत्वाचा backdrop आहेच.

विजुभाऊ's picture

28 Feb 2018 - 1:43 pm | विजुभाऊ

एक साधा सिनेमा आहे "टुडेज स्पेशल " https://en.wikipedia.org/wiki/Today%27s_Special_(film)
नसीरुद्दीन शाह चे काम अविस्मरणीय सहज झालंय

आशु जोग's picture

1 Mar 2018 - 10:28 pm | आशु जोग

मराठी भाषेबद्दल ऐकले होते. मराठी खाद्यसंस्कृती, मराठी आर्किटेक्चर . . .प्रत्येक गोष्टीला मराठी ट्याग अकारणच लावला जातोय आणि मान्यतेसाठी इंग्लंडला पळावं लागतंय.

पुण्यात चितळेंच्या दुकानात जी पदार्थांची यादी असते ती मराठी खाद्यसंस्कृती. मग भले बाकरवडी गुजराती असेल.

सिनेमाचे दिग्दर्शक कुंडलकर ज्या पेठेत राहीले तिथली खाद्यसंस्कृती म्हणजे अखिल महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती.

हा हा कुंडलकरचे सिनेमे पाहणारे आणि त्याला छानछान म्हणणारे लोक पुणे-पेठ प्रवृत्तीचेच असणार आहेत. त्याला कळलाय आपला प्रेक्षकवर्ग आणि तो त्यांच्यासाठीच चित्रपट बनवतो. शेवटी व्यवसायच आहे तो त्याचा :D

चौथा कोनाडा's picture

2 Mar 2018 - 9:06 am | चौथा कोनाडा

"व्वा, क्या बात हैं" मराठीत नेहमी वापरला जाणारा शब्दसमुह जरी हिंदी भाषेतला असला तरीही, ही दाद मराठीच झाली ना !
एखादा परराज्यातील खाद्य-पदार्थ मराठी माणसाने लोकप्रिय केला, वर्षानुवर्षे दर्जा राखला व नाव कमावले तर ते मराठी म्हणून मिरवायला नको का ?
https://en.wikipedia.org/wiki/Bakarwadi

जगातील विविध देशांकडून मान्यता घेतली जाऊ शकते, मग इंग्लंड मधुन मान्यता घेतली तर बिघडलं कुठं ?
ज्या प्रदेशात जाऊन खाद्यपदार्थाचा प्रसार करणं समुहाला शक्य आहे, तिथंच जाऊन विकणार ना ?
उदा: व्हेज मोमो हा नेपाळी/तिबेटी पदार्थ आहे, तो त्यांनी भारतातील विविध शहरात जाऊन विकला अन मान्यता मिळवली.
त्यांना भारतात प्रचार व प्रसार करणं सोपं आहे ना!
https://en.wikipedia.org/wiki/Momo_(food)

अन लेखक, दिग्दर्शकांनी दाखवलेल्या पेठीय संस्कृतीशी प्रेक्षक जर रेलेट होत असून सिनेमा आवडला तर दुखायचं काय कारण?