अभ्यास तर्काचा!

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
19 Feb 2018 - 11:39 am
गाभा: 

जीवनात येणार्‍या बर्‍याचशा छोट्या-मोठ्या किचकट समस्या सोडवण्यासाठी तर्क (logic) या विचारपध्दतीचा उपयोग होतो.पण प्रत्येक व्यक्ती याचा उत्तम प्रकारे उपयोग करुन घेण्याइतपत हुशार असेलच नाही.पण उत्तमपैकी तार्किक विचार करता येणं ही काही जन्मजात देणगी नव्हे.बर्‍यापैकी अचूक तर्क कसा करायचा हे व्यवस्थित समजल्यास,थोडा अभ्यास केल्यास,सराव केल्यास यात बर्‍यापैकी प्रगती होऊ शकेल.अनेक समस्या सहज सुटू शकतील.समस्यांनी चिंताग्रस्त होऊन हतबल होण्याऐवजी आणि भावनेच्या भरात काहीवेळा चुकीचा निर्णय घेऊन नुकसान होण्याऐवजी तर्काने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं कधीही चांगलंच!

याच अनुषंगाने खालील प्रश्न समोर येतात.त्यांची उत्तरे मिळाल्यास तर्काचा अचूक वापर करण्यासंबंधाने विषय पुढे सरकू शकेल.

१. तर्क केव्हा चुकतो?त्यामागची कारणं कोणती?

२. तर्क आणि त्यातून निष्कर्ष यासाठी स्मरणशक्ती चांगली असणं ही मुख्य गरज आहे का?(असावी असं मला तरी वाटतं.चुकत असल्यास कृपया गैरसमज दूर करावा!)
कारण तर्कातून निष्कर्ष काढण्यापूर्वी समस्येसंबंधी सर्व मुद्दे,माहिती असणं आवश्यक असतं.आपण सर्व मुद्दे विचारात घेतलेत की काही मुद्दे विचारात घेतलेलेच नाहीत हे नेमकं कसं कळावं? यावर उपाय काय?

३. एखाद्या विषयातल्या आकलनसंबंधाने "मी ऐकतो आणि विसरुन जातो,मी पाहतो आणि माझ्या लक्षात राहतं,मी करतो आणि मला समजतं" ही चिनी म्हण पुढं केली जाते.यात कितपत तथ्य आहे? कारण शास्त्रज्ञांनी जेव्हा चंद्रावर जाण्यासाठी तयारी सुरु केली तेव्हा सर्व गोष्टी कागदावर मांडून किंवा चंद्रावरील वातावरणाचा तर्क करुन तशाच प्रकारचे वातावरण प्रयोगशाळेत निर्माण करुन तिथे सराव केला गेला असावा.पण तो काही प्रत्यक्ष चंद्रावरील वातावरणाचा अनुभव नव्हेच!

किंवा आईन्सटाईनने आपलं सारं संशोधन हे वहीत लिहून तर्क मांडूनंच केलंय.आईनस्टाईन सतत प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करुन मगच निष्कर्ष काढत असे असं काही वाचनात नाही.

मग हे अशाप्रकारे प्रत्यक्ष ती गोष्ट करुन,वापरुन न पाहताही केलेला तर्क बरोबर कसा येतो? अशा प्रकारे कागद,संगणक,कृत्रिम वातावरण अशी साधनं वापरुन केलेल्या तर्कामधे त्रुटी राहू शकतात का? समजा राहत असतील तर पर्यायाने त्या चिनी म्हणीत सांगितलेला तिसर्‍या क्रमांकाचा उपायच (शक्य असेल तर) आधी करुन पाहणं जास्त योग्य असावं का?

४. भावनिकता हे मानवी स्वभावाचे अंग आहे.पण भावनिकता ही तर्काची शत्रू सुध्दा आहे.भावनेच्या भरात घेतलेला निर्णय चुकण्याची शक्यता अधिक असते.याचा अर्थ एखादी व्यक्ती मनाने अगदी कोरडी असेल,भावनिकता अगदी कमी असेल तर ती उत्तम तर्क करु शकेल असं समजावं का? की भावनिकतेचा आणि तर्काचा संबंध नसतो? किंबहुना निष्कर्ष काढताना,निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण कसं ठेवावं?

५. कॉमनसेन्स (शहाणपणा) हे तर्काचंच अपत्य की दोन्हीमधे काही फरक आहे? कॉमनसेन्स संबंधीचं एक परंपरागत उदाहरण म्हणजे "टोमॅटो हे फळ आहे ही माहिती झाली पण ते फ्रुट सॅलडमधे वापरु नये हा कॉमनसेन्स आहे." आता टॉमॅटो हे फळ असलं तरी तो चवीला आंबट-गोडसर नसतो. फ्रुट सॅलड हे आंबट-गोड फळांचंच बनवतात.म्हणून तो फ्रुट सॅलडमधे वापरत नाहीत.हे यामागचं तार्किक कारण आहे. म्हणजे इथं तर्क आला.
जर तर्क हाच कॉमनसेन्सचा मूळ असेल तर आणि उत्तमपैकी तर्क करणं शिकता येत असेल तर मग "Commonsense is not so common." असा प्रचार होण्याचं कारण काय? खरंच कॉमनसेन्स हा दुर्मिळ असतो का?
कॉमनसेन्स हा दुर्मिळ असेल तर तो विकसित करण्याचे उपाय कोणते?

६. तर्क कुठपर्यंत ताणावा? कुठे थांबावं? तर्काचा अतिरेक कसा अोळखावा?

७. केंद्रगामी (Convergent) आणि बहिर्गामी (Divergent) या विचारांच्या अजून दोन उपपध्दती.
केंद्रगामी म्हणजे रुढ पध्दतीने विचार करणे.ही पध्दत बर्‍याचदा उपयोगी पडते.पण काही वेळा ही पध्दत उपयोगी पडत नाही.अशा वेळी बहिर्गामी पध्दतीने विचार करावा लागतो.खालील उदाहरण पहा.

एकदा दोन हाडवैद्य असणारे मित्र रस्त्याकडेला गप्पा मारत उभे होते.एवढ्यात त्यांना दूरुन एक माणूस थोडासा लंगडत येताना दिसला.एक हाडवैद्य म्हणाला याला गुडघ्याशी संबंधित काहीतरी त्रास आहे.म्हणून हा लंगडत चालतोय.तर दुसरा म्हणाला नाही याच्या पायाच्या घोट्याला काहीतरी इजा झालेली आहे.म्हणून हा लंगडतोय.दोघेही आपापल्या मतांवर ठाम होते.शेवटी तो माणूस यांच्याजवळ आल्यावर यांनी त्यालाच विचारल्यावर तो म्हणाला "बाबांनो मला पायाला कोणताही आजार झालेला नाही.माझ्या चपलेचा अंगठा तुटलाय.म्हणून जरा सावरत चाललोय.इथं चांभार कुठं भेटेल तेवढं सांगा."

विनोद असला तरी बहिर्गामी विचार न केल्यानं अंदाज कसा चुकतो याचं हे उदाहरण!

एखादी गोष्ट घडण्यामागच्या शक्य तितक्या सर्व शक्यता शोधणे म्हणजे बहिर्गामी विचार करणे.केंद्रगामी पध्दत ही वेळ वाचवणारी आहे.परंतु जेव्हा ती वापरुनही उपयोग होत नाही त्यावेळी बहिर्गामी पध्दतच वापरावी लागते.

असा बहिर्गामी विचार करता येण्यासाठी समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज असते.नेमकं तेच काम या पध्दतीत अवघड आहे.काही लोकांना हे जमतं.हे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता येण्यासाठी,जमण्यासाठी काय बरं करता येईल?

८. स्पर्धा परीक्षांमधे विचारली जाणारी कोडी सोडवणं याचा किती उपयोग होऊ शकतो? ही कोडी सोडवण्याचा सराव व्यवहारातील समस्या सोडवण्यासाठी कसा काय उपयोगी पडू शकतो? की केवळ मनोरंजन,मेंदूला खुराक एवढ्याच दृष्टीने त्यांच्याकडे पहावं?

आपापल्या क्षेत्रात तज्ञ असणार्‍या व्यक्तींचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं त्या विषयासंबंधीचं तार्किक ज्ञान.मिपावर आपापल्या क्षेत्रात तज्ञ असणार्‍या बर्‍याच व्यक्ती आहेत.जीवनोपयोगी अशा या विषयावर विस्तृत चर्चा व्हावी ही अपेक्षा!

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2018 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१. तर्क केव्हा चुकतो?त्यामागची कारणं कोणती?

’तर्क हाच मूळी एखादी गोष्ट आहे की नाही, या विषयी शंका उपस्थित करुन काढले जाणारे मत असल्यामुळे तर्काला कोणताही विशिष्ट असा अनुभव नसतो त्यामुळे तर्क चूकतात. ( असे वाटते)

२. तर्क आणि त्यातून निष्कर्ष यासाठी स्मरणशक्ती चांगली असणं ही मुख्य गरज आहे का?
स्मरणशक्ती आनि तर्क यांचा काहीही संबंध नाही असे वाटते. ते एक अंदाजपंचे क्यालक्युलेशन आहे. ( असे वाटते)

३. एखाद्या विषयातल्या आकलनसंबंधाने "मी ऐकतो आणि विसरुन जातो,मी पाहतो आणि माझ्या लक्षात राहतं,मी करतो आणि मला समजतं" ही चिनी म्हण पुढं केली जाते.यात कितपत तथ्य आहे?

या तथ्य आहे. पन्नास पन्नास टक्के ( असे वाटते )

......

भावनिकतेचा आणि तर्काचा काहीही संबंध नाही. पण भावनिकतेने घेतलेले निर्णय चूकण्याची शक्यता असते.

५. कॉमनसेन्स....

कॉननसेन्स ही व्यक्तीसापेक्ष अशी सतत निरंतर चालणारी विकासाची प्रक्रिया आहे, तर्क आणि कॉमनसेन्स यात फरक आहे, कॉमनसेन्स हा अनुभवावर आधारित असतो. ( असे वाटते)

६. तर्क कुठपर्यंत ताणावा? कुठे थांबावं? तर्काचा अतिरेक कसा अोळखावा?
तर्काच्या काही मर्यादा नाही. प्रचंड चूकीच्या निष्कर्षाकडे वाटचाल म्हणजे तर्काचा अतिरेक आहे. ( असे वाटते)

७. केंद्रगामी (Convergent) आणि बहिर्गामी (Divergent) या विचारांच्या अजून दोन उपपध्दती.

पास डोक्याचं खोबरं करणारा प्रश्न आहे. ( असे वाटते)

८.स्पर्धा परीक्षांमधे विचारली जाणारी कोडी सोडवणं याचा किती उपयोग होऊ शकतो?
फक्त अभ्यास करा, अभ्यासाने यश मिळते. माणूस यशस्वी होतो. (असे वाटते)

-दिलीप बिरुटे

उपयोजक's picture

19 Feb 2018 - 12:27 pm | उपयोजक

विस्तृत प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर!

सोपी प्रश्नपत्रिका काढत चला राव. मिळालेल्या सुटीचा भूगा होऊन जातो. ;)

बाय द वे, हे तर्काच्या चर्‍हाटाचं विश्लेषण नक्की करा.
खरं तर काही उत्तर दात्यांना प्रश्नावली पाठवून काही निष्कर्ष काढता आले असते.

डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, मिपाकर, पडिक मिपाकर, स्त्री, पुरुष, गे, अशा वेगवेगळ्या लोकांना एक प्रश्नावली द्यायला पाहिजे होती.

अवांतर : अनाहिता बंद आहे का ? काही भांडकुदळ महिला दिसेनात सध्या.
( संबंधितांनी हलकेच घ्यावे, प्रेमाने आठवण आली इतकाच आशय आहे ) :(

-दिलीप बिरुटे
(काड्या टाकायचा नाद असलेला)

अोक्के

चांगला विचारप्रवर्तक लेख !

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2018 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. तर्क केव्हा चुकतो?त्यामागची कारणं कोणती?

(१) तर्क करणारा प्रामाणिक असला तर... त्याला मिळालेली माहिती अपूर्ण आणि/अथवा चूक असल्यास आणि/किंवा त्याच्या तर्कपद्धतीत कमी असल्यास तर्काचा निष्कर्ष चुकू शकतो.

(२) तर्क करणारा अप्रामाणिक असला तर... बहुतेक वेळेस, तो अगोदर त्याला आवडणारा/सोईचा/त्याचे हितसंबंध राखणारा निष्कर्ष ठरवतो आणि नंतर
...(अ) त्याच्या निष्कर्षाला पूरक असलेले पुरावे फुगवून सांगतो, आणि/किंवा
...(आ) त्याच्या निष्कर्षाला पूरक असलेले कपोलकल्पित पुरावे निर्माण करतो, आणि/किंवा
...(इ) त्याच्या निष्कर्षाला पूरक नसलेले पुरावे हेतूपुर्रसर दुर्लक्षित करतो, आणि/किंवा
...(उ) त्याच्या निष्कर्षाला पूरक नसलेल्या पुराव्यांवरून इतरांचे लक्ष विचलित होईल असे पुरावे/कल्पित कथा/असंबंधीत कथा उगाळत बसतो.
थोडक्यात, असा तर्क चूक होता असे भविष्यात सिद्ध झाला तरी, अशी व्यक्ती प्रामाणिकपणाच्या बुरख्याखाली हेतूपुर्सरपणे अप्रामाणिक विचारप्रणाली वापरत असते... त्यामुळे, अशा कृतीतून निघालेल्या निष्कर्षाला चूक म्हणण्यापेक्षा, तो निष्कर्ष काढताना "बनेलपणाची कृती" केली होती असेच म्हणावे लागेल.

तुमच्या या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातच पुढच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत ! :)

उपयोजक's picture

19 Feb 2018 - 3:41 pm | उपयोजक

धन्यवाद!

उपयोजक's picture

19 Feb 2018 - 3:43 pm | उपयोजक

वैयक्तिक समस्येसाठी तर्क वापरताना स्वार्थीपणा नक्कीच केला जाणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2018 - 4:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

वैयक्तिक समस्येसाठी तर्क वापरताना स्वार्थीपणा नक्कीच केला जाणार नाही.

हा भोळेपणाचा विचार आहे असे विनयाने नोंदवत आहे ! :)

(ज्यांच्यासठी जग बहुदा भोळसट/विचित्र/तर्कट अश्याप्रकारची शेलकी विशेषणे वापरते असे) काही सन्माननिय अपवाद वगळता, इतर सर्व "तथाकथित तार्किक" कृती वैयक्तिक हितसंबंधांचा (व त्या कृतीने हितसंबंधांवर होणार्‍या बरावाईट परिणामांचा) विचार केल्याशिवाय होत नाही... अर्थातच वैयक्तिक समस्येचाबद्दलचा मनातला प्रामाणिक निष्कर्ष आणि प्रत्यक्षातली कृती यात बराच (कधी कधी जमीनअस्मानाचा) फरक असू शकतो. याची मुख्य कारणे, माणसाचा लोभ आणि भिती (greed and fear) या सर्वावर हावी होणार्‍या भावना आहेत... त्यांच्यावर मात करणे वाटते तितके सोपे नसते.

उदा:
१. संबंध नसलेल्या परक्याने, स्वत:च्या सुहृदाने किंवा खुद्द स्वतः केलेल्या एकसमान मोठ्या गुन्ह्यात सगळ्यांना समान शिक्षा असावी हा झाला सर्वसामान्य प्रामाणिक तर्क. पण तसे प्रत्यक्षात करावे असे म्हणणारी व्यक्ती फार फार विरळा दिसते, आणि
२. तो निष्कर्ष मनात मान्य असला तरी तो उघडपणे अथवा संबधित व्यक्तीच्या तोंडावर बोलून दाखवण्याचे प्रामाणिक धैर्य किती जणांत दिसते ?!
केस क्लोज्ड !

=================

बघा, या प्रतिसादात, तुमच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची पूरेपूर काळजी घेण्यासाठी माझे सर्वात पहिले वाक्य, "हा भोळेपणाचा विचार आहे असे विनयाने नोंदवत आहे ! :)" असे साखरेत घोळवून लिहिलेले आहे. प्रत्यक्ष ओळख नसलेल्या, न भेटलेल्या आणि केवळ जालिय व्यवहारातील व्यक्तीशी केलेल्या व्यवहारात जर स्पष्टोक्तीला इतकी मुरड घालण्याची राजकीय अचूकता (political correctness) पाळावी लागते, तर जवळचे/गुंतलेले (वैयक्तिक/सामाजिक/व्यावसायिक) हितसंबंध सांभाळायला, काय काय करावे लागते, हे उलगडून सांगायची गरज आहे काय ? :)

उपयोजक's picture

19 Feb 2018 - 6:59 pm | उपयोजक

मुद्दा कळला.हे झालं गुन्हा आणि त्यातून स्वत:कडे कमीत कमी निर्दोषत्व घेणे किंवा समोरच्याला न दुखावता संवाद होण्याच्या दृष्टीने केलेले बदल.

पण हे सगळीकडे कसं लागू होईल? म्हणजे समजा मी एक अभियंता/तंत्रज्ञ आहे.एक मशिन बंद पडलेलं आहे.कामे थांबलेली आहेत.आता ते मशिन का बंद पडलंय यासाठी मला तर्क वापरुन बंद पडण्याचं कारण शोधून ते मशिन दुरुस्त कसं होईल यावर विचार करावा लागेल.इथे मला कोणाशीही संवाद साधायचा नाहीये किंवा स्वत:च्या फायद्याचे निष्कर्ष काढूनही उपयोग नाही.
ते मशिन दुरुस्त होऊन पुढील काम सुरु होणं माझ्यासाठी महत्वाचं.इथे मला तटस्थपणेच कारण शोधावं लागेल.तरच ते यंत्र दुरुस्त होईल.यंत्रासारख्या निर्जीव वस्तूला 'सांभाळून घेण्याचा' प्रश्नच उद्भवत नाही.

जिथे मी कोणाला जबाब द्यायला बांधील नाहीे अशा वैयक्तिक समस्येबाबत मी तटस्थपणे तर्क मांडला तरच मला उत्तर मिळेल आणि समस्यामुक्ती होईल असं वाटत नाही का? यंत्रासारखी निर्जीव वस्तू दुरुस्त करण्यामधे बायस्ड विचार कसा काय होऊ शकतो?

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2018 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या चर्चेची दिशा आदर्शवादावर अबलंबून आहे की वास्तववादावर, यावर चर्चेची दिशा ठरेल. मी वास्तव जमेस धरून बोलत आहे, कारण तर्कशास्त्राच्या प्रक्रियेत वास्तवाचा प्रामाणिकपणे उपयोग करण्याला दुसरा पर्याय नसतो.

ते मशीन दुरुस्त करण्याची प्रामाणिक इच्छा असण्यापर्यंत ठीक आहे. पण, वास्तवात, त्या घटनेमुळे झालेल्या नुकसानाची तात्विक, नैतीक आणि अर्थिक जबाबदारी कशी टाळता येईल (आणि शक्यतो ती आपल्यापासून दूर आणि शक्य असल्यास दुसर्‍यावर कशी ढकलता येईल) असा न विचार करणारे लोक अत्यंत अल्पसंख्य असतात.

दुसर्‍या शब्दांत, चूक स्वतःची असली तरी, केवळ तत्वासाठी ते मान्य करणारे (पक्षी : जगाच्या भाषेत स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड घेणारे) लोक अत्यंत अल्पसंखेने असतात... हे सर्व जगभरचे, सर्वकालीक सत्य आहे.

मलासुद्धा, हे सर्व जग आदर्शवादी असावे असे प्रकर्षाने वाटते, पण तरीही त्याचबरोबर, अतीभावनिक न होता (जे तर्काविरुद्ध होईल), "हे जग आदर्शवादी कधीच नव्हते, आतासुद्धा नाही आणि भविष्यातही नसणार", हे सत्यही मान्य करावेच लागते... कारण हे सत्य मूळ मानवी मानसिकतेचा (बेसिक ह्युमन सायकॉलॉजीचा) गुणधर्म आहे. ही लोभ व भिती यावर अवलंबून असणारी मानवी मानसिकता एक दुधारी तलवार आहे... जगातले अनेक मानवी दुर्गुण तिच्यामुळेच आस्तित्वात आले आहेत; पण, तिच्यामुळेच गेली दोन लाख वर्षे, मानव या जगात प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत तगून राहिला आहे आणि याच मानसिकतेचा परिणाम म्हणून एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत अधिकाधिक विकसित होत गेला आहे.

केवळ आदर्शवादी तत्वांचा विचार करून बघायचे झाले तर, सद्या चर्चेत असलेले बँक घोटाळे करणार्‍यांनी "त्यांनी पैशाचा अपहार करून चूक केली" हे सुरुवातीलाच मान्य करायला हवे होते... किंबहुना, तशी अफरातफर करण्याचा विचारही मूळात त्यांच्या मनातही यायला नको होता, नाही का ?

उपयोजक's picture

19 Feb 2018 - 9:59 pm | उपयोजक

अर्थातच वास्तववादी आहे.त्याचाच उपयोग होईल.

अतिशय तर्कसंगत प्रतिसाद. कारण क्रमांक २ मधील अ, आ, इ आणि उ यांचा प्रत्यय वेळोवेळी मिपा वर चर्चा / प्रतिसाद वाचताना येत असतो.

कोडी सोडवण्याचा पहिला फायदा म्हणजे मनोरंजन. कोणतंही कोडं सोडवल्याने मनोरंजन नक्कीच होते. धारदार सुरी देखील न वापरता तशीच ठेवली तर ती बोथट होते तसच मेंदूचं असावं, न वापरल्याने तो बठ्ठड होत असावा असं वाटतं. कोडी सोडवत राहिल्याने मेंदू कार्यक्षम राहण्यास मदत होत असावी.

माहितगार's picture

19 Feb 2018 - 5:14 pm | माहितगार

८) मी व्यक्तीशः भावना प्रधान असण्यापेक्षा तर्क प्रधान होण्या मागे शालेय वयातील स्कॉलरशीप परी़क्षातून घेतले जाणारे बुद्धीमत्त्ता चाचणीचे सराव, गणितातून घेतल्या जाणार्‍या सिद्धतांचे सराव , वैज्ञानिक दृष्टीकोणाचा विकास , ललितेतर सामान्य ज्ञान, अग्रलेख वाचनाची , वाद-विवाद आणि समिक्षणे वाचनाची आवड पण एवढ सगळही पुरेसे नाही, लॅटरल थिंकींग, नाण्याच्या सर्व बाजू पहाण्याची जिज्ञासा , यू अ‍ॅटीट्ञूड आणि मनाचा खुलेपणा स्विकारण्याचा मनोमन प्रयत्न हे ही महत्वाचे असावेत असे वाटते. म्हणजे हे बाकीचे नसेल तर निव्वळ कोडी सोडवणे अंशतः मनोरंजनात्मक अंशतः तर्काचा सराव ठरु शकण्याची शक्यता वाटते.

७) सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने लॉजीक कसे काम करते हे पहाण्याच्या दृष्टीने अरूण जोशींनी त्यांच्या तर्क म्हणजे काय लेखातून मांडलेली 'माहौलीक सत्याची (कि भ्रमाची?) संकल्पना ' परिपूर्ण नाही पण रोचक आहे. तुमच्या शब्दात ती केंद्रगामी पद्धत आहे. जो पर्यंत एखादा भ्रम भंग होत नाही आणि भंग करण्याची आवश्यकता मन स्विकारत नाही तो पर्यंत ते ते भ्रम त्या त्या व्यक्तीसाठी सत्य असतात. एखादा भ्रम भंग झाला तर तेवढ्यापुरते अ‍ॅडस्टमेंट करुन त्याच्या माहौलीक सत्याच्या दुनियेत सर्वसामान्य माणूस जगत असतो. सर्वसाधारण पणे इथे तर्क प्रधानतेपेक्षा भावना प्रधानतेला अधिक मुल्य असते.

असा बहिर्गामी विचार करता येण्यासाठी समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज असते.नेमकं तेच काम या पध्दतीत अवघड आहे.काही लोकांना हे जमतं.हे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता येण्यासाठी,जमण्यासाठी काय बरं करता येईल?

अंशतः उत्तर क्रमांक ८च्या उत्तरासोबत आलेले असावे. महत्वाचे म्हणजे हे सर्व सरसकट पी हळद आणि हो गोरी असे नक्कीच नसावे, बहुसंख्येने भावना प्रधान मानवास तर्कप्रधान अगदी सहजतेने बनवता आले असते तर मानवी जग कुठल्या कुठे गेले असते.

लॅटरल थिंकींगची उदाहरणे सांगता येतात पण संबंधीत सराव ज्या त्या व्यक्तीने स्वतः करावा लागतो. त्या साठी मनाचा खुले पणा सॉलीड प्रमाणात लागतो, फुट सॅलड मध्ये टोमॅटॉ कांद्या सहीत सर्व पर्यायांचा विचार -भावना प्रधान न होता- करुन तर्क पूर्ण पद्धतीने टोमॅटॉ कांदा टाकणे तर्कपूर्ण नाही हे लक्षात घेतले तर लॅटरल थिंकीग आणि तर्कपूर्णता सोबत सोबत पूर्ण जमू शकतात आणि कॉमन सेन्सला खर्‍या अर्थाने पूर्णत्व येते. हि लेव्हल बहुसंख्य भावना प्रधान लोकांना सहज साध्य नसते हे कुठेतरी स्विकारावे लागते.

बहुसंख्य लोकांना त्यांच्या माहौलीक भ्रमातून बाहेर काढणारी माहिती सोशल मार्केटींगच्या तत्वाने म्हणजे त्या नव्या माहिती स्विकारण्याने त्याला नेमके काय फायदे आहेत ह्या स्वरुपात द्यावी लागते . अशा पद्धतीने माहितीचे अधिकाधीक वितरण होऊन काळाच्या ओघात समुदायाच्या मनात त्याच्या मौहोलीक सत्याच्या गोळा बेरजेत सहसा अत्यंत सावकाश झिरपते.

कार्पोरेट मध्ये जाणीवपूर्वक शक्यतेवढे शास्त्रशुद्ध पद्धतीने ट्रेनिंग्स दिल्या जातात पण कॉर्पोरेट ट्रेनिंग्स मधून नेमकी ट्रेनींग्स ची गरज असलेली नेमकी मंडळी सर्व प्रयत्न करुन निसटताना दिसतात . अशा वस्तुस्थिती स्विकारण्या शिवाय बर्‍याचदा पर्याय नसतो.

माहितगार's picture

19 Feb 2018 - 5:17 pm | माहितगार

६. तर्क कुठपर्यंत ताणावा? कुठे थांबावं? तर्काचा अतिरेक कसा अोळखावा?

चांगला प्रश्न आहे. विचार करुन उत्तर देतो तुर्तास रुमाल टाकून ठेवतो.

माहितगार's picture

19 Feb 2018 - 5:31 pm | माहितगार

२. तर्क आणि त्यातून निष्कर्ष यासाठी स्मरणशक्ती चांगली असणं ही मुख्य गरज आहे का?(असावी असं मला तरी वाटतं.चुकत असल्यास कृपया गैरसमज दूर करावा!)
कारण तर्कातून निष्कर्ष काढण्यापूर्वी समस्येसंबंधी सर्व मुद्दे,माहिती असणं आवश्यक असतं.आपण सर्व मुद्दे विचारात घेतलेत की काही मुद्दे विचारात घेतलेलेच नाहीत हे नेमकं कसं कळावं? यावर उपाय काय?

तर्कातून निष्कर्ष काढण्यापूर्वी समस्येसंबंधी सर्व मुद्यांची किमान तोंड ओळख असणे नक्कीच गरजेचे पण मुख्य म्हणजे नाण्याच्या सर्व बाजू शोधण्याची आणि तपासण्याची जिज्ञासा आणि त्या जिज्ञासेस पूर्ण वाव देईल असा मनाचा खुलेपणा महत्वाचे.

माहित असलेल्या बाजूंचे स्मरण यासाठी उपयूक्त असले तरी अत्यूत्तम स्मरणशक्ती तर्क प्रधानतेला नेहमी उपकारक ठरेलच असे सांगता येत नाही काही किंबबहूना बर्‍ञाच वेळेस अपकारक ठरु शकते. स्मरणशक्ती चांगली नसेल तर तर्कपूर्ण विचारावर भर द्यावा लागतो त्या दृष्टीने स्मरण शक्ती अत्यूत्तम नसणे जिज्ञासूपणा आणि मनाचा खुलेपणा असल्यास वरदान ठरते .

अत्युत्तम स्मरणशक्ती इतरांनी पुर्वी केलेले तर्कांचे प्रोग्रामींग जसेच्या तसे स्विकारत जाते, त्यातही तर्क असला तरी तो पुर्व्वी कुणीतरी करुन ठेवला आहे आणि तर्क ही गोष्ट पुन्हा पुन्हा घासून पहाण्याची आहे याचे मात्र चांगली स्मरणशक्ती असलेल्यांना चांगलेच विस्मरण होत असू शकते.

मला वाटते बाकी प्रश्नांची उत्तरे विचार अभ्यास करुन द्यावी लागतील . त्यासाठी अधिक अवधी घेईन.

उपयोजक's picture

19 Feb 2018 - 7:10 pm | उपयोजक

फक्त एक विनंती की आपल्या मुद्द्यांसोबतच तो मुद्दा स्पष्ट करणारी व्यवहारातील उदाहरणे देऊ शकलात तर अधिक सहज आकलन होईल.

दीपक११७७'s picture

21 Feb 2018 - 10:22 am | दीपक११७७

छान चर्चा