खूप दिवसांनी बाबांकडे गेलो होतो.
नेहमी प्रमाणे खाणे-पिणे झाले आणि आम्ही बाबांच्या बरोबर गप्पा मारायला बसलो.तसे आमच्या बाबांबरोबर गप्पा कशाही सुरु होतात.
कुठल्याही विषयाचे मर्म फक्त त्यांनाच ठाऊक असते.मग ते ट्रंप-चीन-पाकिस्तान व्हाया रशिया असो किंवा कसाब-दाऊद-व्हाया अबक असो किंवा महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे का उन्नतीकडे? ह्याची चर्चा असो.मुषक-पकड विभागात कामाला असल्याने, त्यांना सगळीकडे सापळे आणि उंदीरच दिसत असावेत.अर्थात बाबा चतूर असल्याने ते स्वतःच सापळे बनवतात आणि उंदरांना पकडतात.
अशा चर्चा सुरु असतांना बाबांच्या सौभाग्यवती (उर्फ सौ.बाई) कधीच चर्चेत भाग घेत नाहीत. (बाबांच्या भाषेत सांगायचे तर, सौ.बाई म्हणजे,"पालथ्या घड्यावर पाणी" आणि त्यांच्या सौभाग्यवतींच्या भाषेत सांगायचे तर, बाबा म्हणजे,---"लोका सांगे ब्रह्मज्ञान"...) पण त्या दिवशी मात्र त्या पण आल्या.
आल्या आल्या त्यांनी मलाच सांगीतले.
सौ.बाई ===> अहो मुवि, तुम्हीज जरा ह्यांना समजावून सांगा ना?
मी ====> (इथे मला शोले मधील बसंती-इमाम आणि इमामचा मुलगा (अहमद?) ह्यांच्या तील संभाषण आठवले.मी पण बसंतीसारखेच उत्तर देणार होतो...पण सौ.बाईंची तळमळ बघून मनातली मळमळ मनातच ठेवली..) काय सांगू? आता बाबा म्हणजे साक्षात प्रति परमेश्वर.आम्ही त्यांना काय समजावून सांगणार?
सौ. बाई (आवंढा गिळत)===> अहो हे आता वृद्धाश्रमात जायचे म्हणत आहेत?कसले हे भीकेचे डोहाळे?चांगलें सूना-नातवंडांनी-नातेवाईकांनी भरलेले घर सोडून कशाला जायचे, ते वृद्धाश्रमात?
बाबा ===> अगं त्यांना कशाला सांगत आहेस? तुला ना आजकाल सगळी कडे हाच विषय बोलायला सुचतो.आत्ता कुठे आम्ही, ट्रंपच्या पुढील धोरणांविषयी ठरवत होतो.तितक्यात तू हा कुठला विषय काढला?खरे तर ह्या घटकेला ट्रंप-यॉट आणि अॅरिस्टॉटल ऑनॅसिस हा गंभीर विषय चर्चेला घेणार होतो.(खरे तर हा विषय एका वाक्यातला आहे.ट्रंप आणि अॅरिस्टॉटल ह्या दोघांच्याही यॉट्स आहेत.पण बाबा सुतावरून स्वर्ग गाठू शकतात आणि इथे तर एक आख्खी यॉट..मग बाबांच्या मनाची कवाडे कुठे-कुठे भरार्या घेतील ते सांगता येत नाही.)
सौ. बाई ===> तो ट्रंप काही कुठे पळून जात नाही,पण तुमच्या ह्या वृद्धाश्रमाच्या ट्रॅप मध्ये मी मात्र फसत चालले आहे.
बाबा ===> अगं कसला ट्रॅप? उलट त्या ठिकाणी आपण एकदम मजेत राहू.शेवटचा हनीमूनच म्हण की.
सौ.बाई ===> उगाच त्या हनीमूनच्या गोष्टी सांगून मला जळवू नका.आपल्या हनीमूनची वेळी नेमकी, तुमच्याच (इथे तुमच्याच ह्या शब्दाला जोर मुद्दाम हून आणायला लागला नाही....) मावस आजीच्या दीराची बायको आजारी पडली आणि आपण तडक गेलोच की.अहो माणसे महत्वाची.आता त्यावेळी मी तिथे गेले म्हणून बरे झाले.तुमच्या आईच जन्मभर माझी आठवण त्या प्रसंगाने काढत होत्या.
बाबा ===> अगं बाई हो.पण दर वेळी अशा प्रसंगी मग आपणच धावून जायचो.पण त्यावेळी मला भरपूर वेळ होता.सरकारी नौकरी असल्याने आणि सरकार दयाळू असल्याने, भरपूर रजा घेवू शकत होतो.अगदी बिनपगारी रजा झाली तरी, नौकरी शाबूत होती.पण आता तसे आहे का?साधी मंगळागौर करायची म्हटली तरी बुधवारी सार्वजनिक सूट्टी असेल तरच तो सोहळा साजरा होतो.अनावश्यक रजा मारली तर पगारवाढीवार परीणाम होतो, असे आपली सूनच म्हणत होती.बरं, आता काळ बदलला आहे तर गौरीची पूजा "मंगळवारी" न करता "शनिवारी" केली तर काय हरकत आहे? असे तुम्हाला सुचवले, तर तुम्हाला ते पटत नाही.देव अथवा देवी जर तिन्ही-त्रिकाळ हजर होत असतील, तर गौरी "शनिवारी" पण यायला हवी.उगाच कुठल्या तरी कालबाह्य रुढी आणि परंपरा जपण्यात काय हशील?
सौ.बाई ===> तुमचे हे असेच विचार सुनेला (आणि पर्यायाने मुलाला) पटत नाहीत.मग तुम्ही असे बोलता आणि मग मुले नाराज होतात.
बाबा ===> अगं तसे नाही.आपण जसे काळा प्रमाणे बदलत गेलो तशीच मुले पण बदलतील.पण त्यांना आपल्या बरोबर गप्पा मारायला वेळ तरी कुठे आहे?दुसरा फ्लॅट घेणे परवडत नसल्याने, आपण फक्त एका छताखाली रहात आहोत.ही वस्तूस्थिती.सुनबाई सकाळी ८ वाजता घर सोडते ती रात्री ८ वाजता येते.तर मुलगा ७ वाजता जातो ते रात्री १० वाजता येतो.बरे साप्ताहिक सूट्टी फक्त नावालाच.सुट्टीच्या दिवशी पण ह्यांची फोनाफोनी सुरुच.सकाळी फोनवर बोलत-बोलत घर सोडतात आणि रात्री पण फोनवर बोलत-बोलतच घरी येतात.जेवतांना पण एका हातात फोन असतोच, हे पण कमी काय म्हणून रात्री पण फोन कुरुवाळत बसतात.स्मार्ट फोन मुळे मित्र-मैत्रीण किंवा ज्ञान मिळतही असेल, पण मित्र-मत्रिणींसह एखादी संध्याकाळ घरात साजरी करण्यात काय मज्जा असते? हे ह्यांना कधी समजणार? "पुर्वीचे टेकाडे भाऊजी गेले आणि बोटाडे फोन घरात आले."
बरे, आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना आपण आजकाल बागेतच भेटतो.पण तिथेही शांतता नसते आणि रहदारीच्या आवाजाने आणि वायू प्रदूषणामुळे बागेत जातांनाच कान आणि हृदय त्रास द्यायला लागातात."हृदयाचे नांव काढल्याने नाराज होवू नकोस." अंग प्रदर्शन करत चालणार्या ललना बघून कुणीही पाघळणारच.
परवा आपल्या नातीने, असाच बेंबी दर्शन करणारा ड्रेस घातला, म्हणून मी रागावलो, ते ह्याच कारणासाठी.
सौ. बाई ===> अहो, आता काळ बदलला आहे.असे तुम्हीच तर म्हणालात.बरे नात आता वयात आली आहे.ह्या पिढीला त्यांना काय हवे? काय नको? ते बरोब्बर समजते.
बाबा ===> पण म्हणून रोज रात्री ८ वाजता क्लासाहून येते, हे काही योग्य नाही.रात्री-बेरात्री कशाला क्लास घ्यायचा?ह्या वयात खेळायला जायचे की दप्तर उचलण्याचा व्यायाम करायचा?आपली २ही मुले सेमी-इंग्रजी माध्यमातूनच शिकली आणि ती पण सरकारी अनुदानातून.काय फरक पडला?बरे आता हे मुलाला समजावायला तर जाऊ शकत नाही.जेव्हढी शाळेची फी जास्त तेव्हढी शाळा उत्तम असा त्याचा समज.ज्याला शिकायचे आहे, तो कसाही शिकतो.आणि रात्री ८ वाजेपर्यंत क्लास ही संकल्पनाच पटत नाही.शिक्षकांच्या सवडी प्रमाणे शिक्षण.कठीण आहे.
सौ.बाई ===> बरे झाले तुम्ही हा विषय बोलला नाहीत ते.सुनेच्या मते महाग शाळा हा स्टेटस सिंबॉल आहे.
बाबा ===> आता हेच बघ ना.दर शनिवारी-रविवारी हॉटेल मध्ये जातात.अरे आम्ही पण खस्ता काढल्या आहेत.साधा एक सिनेमा बघायचा असेल तरी महिनाभर प्लॅनिंग करायला लागत होते.पण त्यात मजा होती.पैशाची ही असली उधळपट्टी बघवत नाही.
सौ.बाई (मध्येच) ===> हो क्का? आपण सिनेमाला गेलो की, सासरे पण हेच आपल्या बाबतीत म्हणायचे.
बाबा ===> अगं मी पण तेच म्हणत होतो.की आपण सिनेमाला जातांना पण घरच्यांची काळजी घेवून जात होतो.माझ्या आई-वडीलांचे पथ्य-पाणी तर तूच बघत होतीस.पण इथे मात्र दर शनिवार-रविवार आपले आपणच जेवण बनवतो आणि जेवतो.निदान एक तरी दिवस मुलाने आपल्याबरोबर ४ घास सुखाने खावेत असे मला पण वाटणारच ना?
सौ.बाई ===> अहो, त्यांना पण २च दिवस मिळतात.तुम्ही जरा त्यांचा पण विचार करा ना.
बाबा ===> आपण दोघेही आयुष्यभर फक्त इतरांचाच विचार केला आहे.आधी आपले माता-पिता, मग मुले आणि आता नातवंडे.आता मात्र खूप झाले.नातवंडे आता मोठी झाली आहेत.आता आपण घर सोडणेच इष्ट.नको ते भाजी आणणे आणि दळण आणणे.तुझे ते रोजचे स्वैपाक करून दमणे आणि भांड्यांची उस्तवार करणे.सुदैवाने आपली गंगाजळी बरी आहे, तर आत्ताच जाऊ.
शिवाय पुर्वीची ह्या शहरातली शांतता कधीच लोप पावली आणि आता साधे रस्त्यावरून चालायचे, म्हटले तरी, मगे-पुढे-डावीकडे-उजवीकडे सगळीकडे बघायला लागते.कोण कधी कुठल्या वाहनावरून येईल आणि आपल्याला उडवून पळून जाईल, ते काही सांगता येत नाही.परवाच एक उत्तम सायकल पटू, रस्त्यावरच्या अपघाताने मरण पावला.बरे झाले, की तू मला सायकल चालवायला देत नाहीस.
सौ.बाई ===> हे मात्र तुमचे पटते बघा.सुन बाई लवकर जाणार आणि उशीरा येणार म्हणून मी बराच स्वैपाक करते.अर्थात तिने पण मला समजून घेतले आहेच.पण दळण आणतांना होणारी तुमची दमछाक बघून मला पण मानसिक त्रास होतोच.
बाबा ===> शिवाय आजकाल बरेच उत्तम वृद्धाश्रम निघाले आहेत.तिथे आजारी माणसांची पण उत्तम काळजी घेतात.आपण जर धड-धाकट असतांनाच तिथे गेलो तर, आपले आणि त्यांचे पण संबंध सुधारलेले असतील.
सौ.बाई ===> तरी पण लोक काय म्हणतील?
बाबा ===> लोकांचे ऐकून कुणाचे भले झाले आहे?लोकांचे जास्त ऐकले की गाढव पण रहात नाही.काय मुवि बरोबर आहे ना?
आम्ही नुसतीच मान डोलावली.
बाबांची रजा घेतली आणि २ जानेवारी २०१८ला वृद्धाश्रमात जावून आम्हा दोघा नवरा-बायकोची नाव नोंदणी केली.आता हातात ५-६ वर्षे आहेत.तोपर्यंत आवरा-आवरी करून घेतो.अर्थात बायकोला काही सांगीतले नाही, हो उगाच नुसत्याच वांझोट्या चर्चा करण्यात काही अर्थ नसतो.
बाबा मूषक-पकड विभागात नक्कीच काम करत असावेत, हे आता तुम्हाला पण पटले असेलच....
======
आमची प्रेरणा ===> http://www.misalpav.com/node/41726
आणि
प्रतिक्रिया
13 Jan 2018 - 2:45 pm | एस
उत्तम.
13 Jan 2018 - 3:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
खूप दिवसांनी मिपावर लिहिलेत, मुवि ! स्वागत आहे ! नेहमिचेच यशस्वी बाबा आणि जोडिला त्यांच्या सौ बाईंसह असलेला मुवि शैलितला लेख आवडला. :)
13 Jan 2018 - 3:33 pm | मुक्त विहारि
हा लेख मुद्दाम "चर्चा" ह्या सदरात टाकला आहे.
प्रत्येक नाण्याला २ बाजू असतातच....(कधी-कधी असंख्य)
मी तरी स्वार्थी पणे हा निर्णय घेतला. (४ वेळा आयते जेवण आणि वेळ प्रसंगी कुटुंबा बरोबर...शिवाय नातवंडां बरोबर वेळ घालवायला पण त्यांची परवानगी आहे....फावल्या वेळात शांत चित्ताने संस्कृतचा अभ्यास आणि मोडी.) आणि नाव नोंदणी केली. त्या वृद्धाश्रमाला ५-६ वर्षे वेटिंग लिस्ट असल्याने, नाव नोंदणी आधी करावी लागते.
तुम्ही जर दुसर्या बाजू मांडल्यात तर फार उत्तम.
(शिवाय हा लेख जातीभेद-धर्मभेद-भाषाभेद विरहित असल्याने, "वादे-वादे जायती संवादः" असे नक्कीच होईल.)
13 Jan 2018 - 3:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझे मत तुमच्या बाबांशी आणि पर्यायाने तुमच्याशी मिळतेजुळते असल्याने, दुसर्या बाजूसाठी इतर कोणाची वाट पहावी लागेल असेच दिसते आहे ! :)
13 Jan 2018 - 3:55 pm | पद्मावति
लेख आवडला आणि पटला.
13 Jan 2018 - 6:37 pm | टवाळ कार्टा
उत्तम निर्णय
13 Jan 2018 - 10:40 pm | palambar
अगदी बरोबर निर्णय, मलाही असेच वाटते, फक्त मुलांंना जेव्हा
मदत हवी असेल तेव्हा करायला हवी, असे वाटते.
14 Jan 2018 - 10:02 am | चित्रगुप्त
लेख आवडला.
वृद्धाश्रम हे अनेक प्रकारचे असतील, त्याप्रमाणे तिथे राहण्याचा खर्चही वेगवेगळा असणार. सध्या पुणे आणि इतर शहरात याविषयी काय काय पर्याय उपलब्ध आहेत, याविषयी माहिती कुठे मिळेल ?
चांगल्या (म्हणजे महागड्या) आश्रमात सर्व सोय - उदा. डॉक्टर, अँब्युलन्स, मदतनीस वगैरे उपलब्ध असते खरी पण त्यासाठी प्रत्येक वेळी प्रचंड खर्च करावा लागतो, असे कळते.
आश्रमात जेवणखाण जरी मिळत असले, तरी आपल्याकडे लहानसे स्वतंत्र स्वयंपाकघर असले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ पहाटे तीन वाजता चहा हवासा वाटला, किंवा कधी शिंगाड्याचा शिरा, मिर्च्यांची वा केळ्यांची भजी, पाकातल्या पुर्या, थालीपीठ, दुधीच्या सालांची तीळ घालून केलेली चटणी, कालच्या पोळीचा कुस्करा वा लाडू, मुटकुळी, गाकर, गुळाच्या पोळ्या, ताजा फळांचा रस... असले पदार्थ करण्याची सोय असली पाहिजे.
14 Jan 2018 - 12:51 pm | मुक्त विहारि
मित्र-मैत्रिणींसह सामुदाईक सहजीवन.
आणि तसे प्रयोग झालेले आहेत.
अंबरनाथला शेतकरी सामुदाइक सोसायटी आहे.
साधारण २०० एकर परीसरात ही सोसायटी आहे.१९७२च्या सुमारास एकरी २०,०००/- रुपये दराने असलेली जमीन आज ५-६ कोटी पर एकर ह्या दरात असल्याने, त्यात सध्या बरीच आर्थिक आणि राजकीय समीकरणे तयार झालेली आहेत.मूळचे सभासद कधीच देवाघरी गेले आणि आत्ताच्या पिढीला फक्त पैसाच दिसत असल्याने, सभासदांत एकवाक्यता नाही.
---------------------------------
श्री.अरूण देशपांडे (सोलापूर), ह्यांनी पण असाच प्रयोग राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे.पण त्यांच्या जमीनीचा भाव अवास्तव वाटला. ५०,००,०००/- (पन्नास लाख) प्रति एकर.शिवाय जमीनीतील उत्पन्न आपण विकू शकत नाही.
(श्री.अरूण देशपांडे, ह्यांचे बाकीचे प्रयोग मात्र जरूर बघण्या सारखे आहेत. कमीत-कमी जागेत ७-८ लेयर वर शेती करता येवू शकते आणि कमीत-कमी खर्चात घर पण बांधू शकता.डोम टाइप घर आणि ते पण वाया गेलेल्या लोखंडी वस्तूंपासून बनवले तरी जास्तीत जास्त १,००,०००/-रु.त १५०० चौरस फूट घर बांधून होते.)
--------------------
आम्ही काही मिपाकरांनी पण असा प्रयोग करायचा प्रयत्न केला (आणि अद्याप करत पण आहोत.) पण सुयोग्य अशी जमीन अद्याप तरी मिळालेली नाही.ती मिळे पर्यंत आणि तो प्रकल्प अस्तित्वात येई पर्यंत वृद्धाश्रमात अर्ज देवून ठेवला.अर्थात अँब्युलन्स आणि इतर सामुदाइक खर्च (विहीर, कुंपण, रखवालदार, माळी इ.) एकरी शेयर प्रमाणे विभागून.
-------------------------
"आश्रमात जेवणखाण जरी मिळत असले, तरी आपल्याकडे लहानसे स्वतंत्र स्वयंपाकघर असले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ पहाटे तीन वाजता चहा हवासा वाटला, किंवा कधी शिंगाड्याचा शिरा, मिर्च्यांची वा केळ्यांची भजी, पाकातल्या पुर्या, थालीपीठ, दुधीच्या सालांची तीळ घालून केलेली चटणी, कालच्या पोळीचा कुस्करा वा लाडू, मुटकुळी, गाकर, गुळाच्या पोळ्या, ताजा फळांचा रस... असले पदार्थ करण्याची सोय असली पाहिजे."
असा एक वृद्धाश्रम ऐकिवात आहे.पण ते प्रकरण फारच महागात पडणार.शिवाय प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी त्या आर्थिक गणितात कशी बसणार? कुणाला ३,०००/-रु. प्रति-महिना/प्रति-व्यक्ती हेच परवडू शकते तर एखाद्याला ५०,०००/-रु. प्रति महिना/प्रति व्यक्ती हे पण सहज शक्य होते.
मला आर्थिक दूष्ट्या काय परवडू शकेल? (शेवटी सगळी गणिते आर्थिकच) आणि मी कुठे अॅडजस्ट करू शकेन? ह्याचा विचार केला आणि वैद्यकिय मदत आणि शारिरीक अवलंबत्व ह्याला प्राधान्य दिले.मी नोंदवलेल्या वृद्धाश्रमात तिन्ही-त्रिकाळ अंब्युलन्स उबलब्ध असते आणि वैद्यकिय मदत १० मिनिटाच्या अंतरावर आहे.शिवाय मुंबई पासून १-२ तासाच्या अंतरावर.
शिवाय वयाच्या ८०व्या वर्षी (अति उतार वयात...आमच्या घराण्याला ९०+ गाठायचा शाप आहे...बरेच जण दयामरण नाही म्हणून जगत राहिले...आणि राहतात.)पोटाला आराम देणारे पदार्थ तिथे मिळतात का?ह्याची पण चौकशी केली.आमच्या मातोश्रीच त्या वृद्धाश्रमात २ दिवस राहिल्या होत्या आणि काही नातेवाईक पण तिथे २-२ दिवस राहून आलेले होते.शिवाय तिथले सध्याचे व्यवस्थापक पण आमच्याच गावातले, (परवा सुक्ष्मात गेलो असतांना, ३-१३-१७६० ग्रहावर पण आमच्या गावातला एक जण भेटलाच) त्यामुळे ऐनवेळी १-२ दिवसापुरती लागणारी शारिरीक मदत तर तिथे नक्कीच मिळेल.शिवाय एकदा तिथे प्रवेश घेतल्या नंतर ती संस्था आपण मरे पर्यंत सर्व काळजी घेते.अगदी वेळ प्रसंगी दहनाची देखील.म्हणजे उद्या जर मुलांना वेळ नाही मिळाला तरी आपला देह उगाच कूजत बसायला नको.ह्या बाबतीत पण मुलांशी बोलणे झाले आहे.मुलांचे प्रेम आहेच पण वेळ कुठून आणणार?
-------------------
मी फक्त वैद्यकिय मदत, ह्याच एका गोष्टी वर लक्ष केंद्रित केले आणि मग तसाच वृद्धाश्रम शोधला.आता ह्या ५-६ वर्षात (साठी येई पर्यंत) "पहाटे तीन वाजता चहा हवासा वाटला, किंवा कधी शिंगाड्याचा शिरा, मिर्च्यांची वा केळ्यांची भजी, पाकातल्या पुर्या, थालीपीठ, दुधीच्या सालांची तीळ घालून केलेली चटणी, कालच्या पोळीचा कुस्करा वा लाडू, मुटकुळी, गाकर, गुळाच्या पोळ्या, ताजा फळांचा रस...इत्यादी जीभेचे चोचले पुरवून घेतो.मग आहेच आपले ४ वेळा सकस खाणे आणि छंद जोपासणे.
14 Jan 2018 - 5:50 pm | सर टोबी
माहिती कृपया खरडवहीत लिहा.
14 Jan 2018 - 6:13 pm | मुक्त विहारि
इथेच सांगतो.
https://www.google.co.in/search?ei=jU9bWoq6I9PM8wWP2rrgCg&q=lokmanya+sev...
त्यांचा वृद्धाश्रम जांभूळपाड्याला आहे.
http://www.lssparle.org.in/p/contact-us.html
14 Jan 2018 - 6:21 pm | मुक्त विहारि
मी म्हणतो तेच योग्य असे नाही.
प्रत्येक वृद्धाश्रम वेगळा.
मला शांत आणि वैद्यकिय मदत आयुष्यभर देणारा वृद्धाश्रम हवा होता. त्या अटींमध्ये हा वृद्धाश्रम चपखल बसला.
शिवाय, दरवाढ पण जास्त नाही. मागच्या वर्षी ५,२००/- रु. प्रति महिना प्रति व्यक्त्ती अशी फी होती.
ह्यावर्षी ५३००/-रु. प्रति महिना प्रति व्यक्ती अशी आहे. म्हणजे वार्षिक जेमतेम २% वाढ झाली.महागाई मात्र वार्षिक १० ते १२% वाढत आहे.त्यामुळे पुढेही परवडायला हरकत नाही.
(शिवाय ट्रस्ट चंचालीत असल्याने, मून्नाभाईंचे भय नाही.)
14 Jan 2018 - 8:28 pm | Nitin Palkar
'पाकातल्या पुर्या, थालीपीठ, दुधीच्या सालांची तीळ घालून केलेली चटणी, कालच्या पोळीचा कुस्करा वा लाडू, मुटकुळी, गाकर, गुळाच्या पोळ्या', हे पदार्थ महिन्यातून किती वेळा करता तुम्ही? केवळ उत्सुकता म्हणून...
14 Jan 2018 - 2:54 pm | पैसा
हे पाऊल उचलायला तुमच्या अर्धांगिनीची साथ आहे हे फार महत्त्वाचे.
14 Jan 2018 - 3:37 pm | मुक्त विहारि
अर्धांगिची साथ हवीच.
(आणि खरं सांगायचे तर, आयते गरम गरम जेवायला, पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच जास्त आवडते...ते मेहूण वगैरे आपले उगाचच ....बाकी मग मंगळवारची, शुक्रवारची सवाष्ण (हे कमी की काय म्हणून आजकाल गुरुवारची लक्ष्मी पण अॅड झाली आहे, आणि मग गेला बाजार संक्रांतीची सवाष्ण, चैत्रातली सवाष्ण वगैरे असतेच.... तिला पण हेच आमिष दाखवले....शिवाय रोजची भांडी घासणे, कपडे धुणे, जेवणानंतरची उस्तवार हे पण उतारवयात शक्य होत नाही..... आणि पंखे पुसा, फ्रीज आवरा, केर काढा, प्लंबिंगची किंवा इलेक्ट्रिशियनची कामे करा हा माझा त्रास पण वाचला.बादवे, आमच्या वृद्धाश्रमात कपडे पण धुवून मिळतात.काही वृद्धाश्रमात ही कपडे धुण्याची सोय नाही.)
14 Jan 2018 - 5:27 pm | नाखु
15 Jan 2018 - 11:11 am | ज्ञानोबाचे पैजार
आजकालच्या बदलत्या जीवन शैली प्रमाणे हा बदल स्विकारणेही अपरिहार्य झाले आहे. आयुष्यभर मुलांना चिकटून रहायचे एकाकी जीवन जगायचे की वृध्दाश्रमात जायचे हा ज्याचात्याचा प्रश्र्ण आहे.
बहुगुणींच्या धाग्या मुळे या विषयाला वाचा फुटली आणि मुविंनी त्यावर आपल्या परीने पर्याय शोधला देखिल.
मुविंचे हार्दिक अभिनंदन, या वाटेवरची तुमची प्रगती मिपाकरांना कळवत रहा .
पैजारबुवा,