बाबा उवाच, "वृद्धाश्रम की.....वानप्रस्थाश्रम की......मित्र-मैत्रीणींसह सहजीवन....की....की.....की....."
खूप दिवसांनी बाबांकडे गेलो होतो.
नेहमी प्रमाणे खाणे-पिणे झाले आणि आम्ही बाबांच्या बरोबर गप्पा मारायला बसलो.तसे आमच्या बाबांबरोबर गप्पा कशाही सुरु होतात.
कुठल्याही विषयाचे मर्म फक्त त्यांनाच ठाऊक असते.मग ते ट्रंप-चीन-पाकिस्तान व्हाया रशिया असो किंवा कसाब-दाऊद-व्हाया अबक असो किंवा महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे का उन्नतीकडे? ह्याची चर्चा असो.मुषक-पकड विभागात कामाला असल्याने, त्यांना सगळीकडे सापळे आणि उंदीरच दिसत असावेत.अर्थात बाबा चतूर असल्याने ते स्वतःच सापळे बनवतात आणि उंदरांना पकडतात.
अशा चर्चा सुरु असतांना बाबांच्या सौभाग्यवती (उर्फ सौ.बाई) कधीच चर्चेत भाग घेत नाहीत. (बाबांच्या भाषेत सांगायचे तर, सौ.बाई म्हणजे,"पालथ्या घड्यावर पाणी" आणि त्यांच्या सौभाग्यवतींच्या भाषेत सांगायचे तर, बाबा म्हणजे,---"लोका सांगे ब्रह्मज्ञान"...) पण त्या दिवशी मात्र त्या पण आल्या.
आल्या आल्या त्यांनी मलाच सांगीतले.
सौ.बाई ===> अहो मुवि, तुम्हीज जरा ह्यांना समजावून सांगा ना?
मी ====> (इथे मला शोले मधील बसंती-इमाम आणि इमामचा मुलगा (अहमद?) ह्यांच्या तील संभाषण आठवले.मी पण बसंतीसारखेच उत्तर देणार होतो...पण सौ.बाईंची तळमळ बघून मनातली मळमळ मनातच ठेवली..) काय सांगू? आता बाबा म्हणजे साक्षात प्रति परमेश्वर.आम्ही त्यांना काय समजावून सांगणार?
सौ. बाई (आवंढा गिळत)===> अहो हे आता वृद्धाश्रमात जायचे म्हणत आहेत?कसले हे भीकेचे डोहाळे?चांगलें सूना-नातवंडांनी-नातेवाईकांनी भरलेले घर सोडून कशाला जायचे, ते वृद्धाश्रमात?
बाबा ===> अगं त्यांना कशाला सांगत आहेस? तुला ना आजकाल सगळी कडे हाच विषय बोलायला सुचतो.आत्ता कुठे आम्ही, ट्रंपच्या पुढील धोरणांविषयी ठरवत होतो.तितक्यात तू हा कुठला विषय काढला?खरे तर ह्या घटकेला ट्रंप-यॉट आणि अॅरिस्टॉटल ऑनॅसिस हा गंभीर विषय चर्चेला घेणार होतो.(खरे तर हा विषय एका वाक्यातला आहे.ट्रंप आणि अॅरिस्टॉटल ह्या दोघांच्याही यॉट्स आहेत.पण बाबा सुतावरून स्वर्ग गाठू शकतात आणि इथे तर एक आख्खी यॉट..मग बाबांच्या मनाची कवाडे कुठे-कुठे भरार्या घेतील ते सांगता येत नाही.)
सौ. बाई ===> तो ट्रंप काही कुठे पळून जात नाही,पण तुमच्या ह्या वृद्धाश्रमाच्या ट्रॅप मध्ये मी मात्र फसत चालले आहे.
बाबा ===> अगं कसला ट्रॅप? उलट त्या ठिकाणी आपण एकदम मजेत राहू.शेवटचा हनीमूनच म्हण की.
सौ.बाई ===> उगाच त्या हनीमूनच्या गोष्टी सांगून मला जळवू नका.आपल्या हनीमूनची वेळी नेमकी, तुमच्याच (इथे तुमच्याच ह्या शब्दाला जोर मुद्दाम हून आणायला लागला नाही....) मावस आजीच्या दीराची बायको आजारी पडली आणि आपण तडक गेलोच की.अहो माणसे महत्वाची.आता त्यावेळी मी तिथे गेले म्हणून बरे झाले.तुमच्या आईच जन्मभर माझी आठवण त्या प्रसंगाने काढत होत्या.
बाबा ===> अगं बाई हो.पण दर वेळी अशा प्रसंगी मग आपणच धावून जायचो.पण त्यावेळी मला भरपूर वेळ होता.सरकारी नौकरी असल्याने आणि सरकार दयाळू असल्याने, भरपूर रजा घेवू शकत होतो.अगदी बिनपगारी रजा झाली तरी, नौकरी शाबूत होती.पण आता तसे आहे का?साधी मंगळागौर करायची म्हटली तरी बुधवारी सार्वजनिक सूट्टी असेल तरच तो सोहळा साजरा होतो.अनावश्यक रजा मारली तर पगारवाढीवार परीणाम होतो, असे आपली सूनच म्हणत होती.बरं, आता काळ बदलला आहे तर गौरीची पूजा "मंगळवारी" न करता "शनिवारी" केली तर काय हरकत आहे? असे तुम्हाला सुचवले, तर तुम्हाला ते पटत नाही.देव अथवा देवी जर तिन्ही-त्रिकाळ हजर होत असतील, तर गौरी "शनिवारी" पण यायला हवी.उगाच कुठल्या तरी कालबाह्य रुढी आणि परंपरा जपण्यात काय हशील?
सौ.बाई ===> तुमचे हे असेच विचार सुनेला (आणि पर्यायाने मुलाला) पटत नाहीत.मग तुम्ही असे बोलता आणि मग मुले नाराज होतात.
बाबा ===> अगं तसे नाही.आपण जसे काळा प्रमाणे बदलत गेलो तशीच मुले पण बदलतील.पण त्यांना आपल्या बरोबर गप्पा मारायला वेळ तरी कुठे आहे?दुसरा फ्लॅट घेणे परवडत नसल्याने, आपण फक्त एका छताखाली रहात आहोत.ही वस्तूस्थिती.सुनबाई सकाळी ८ वाजता घर सोडते ती रात्री ८ वाजता येते.तर मुलगा ७ वाजता जातो ते रात्री १० वाजता येतो.बरे साप्ताहिक सूट्टी फक्त नावालाच.सुट्टीच्या दिवशी पण ह्यांची फोनाफोनी सुरुच.सकाळी फोनवर बोलत-बोलत घर सोडतात आणि रात्री पण फोनवर बोलत-बोलतच घरी येतात.जेवतांना पण एका हातात फोन असतोच, हे पण कमी काय म्हणून रात्री पण फोन कुरुवाळत बसतात.स्मार्ट फोन मुळे मित्र-मैत्रीण किंवा ज्ञान मिळतही असेल, पण मित्र-मत्रिणींसह एखादी संध्याकाळ घरात साजरी करण्यात काय मज्जा असते? हे ह्यांना कधी समजणार? "पुर्वीचे टेकाडे भाऊजी गेले आणि बोटाडे फोन घरात आले."
बरे, आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना आपण आजकाल बागेतच भेटतो.पण तिथेही शांतता नसते आणि रहदारीच्या आवाजाने आणि वायू प्रदूषणामुळे बागेत जातांनाच कान आणि हृदय त्रास द्यायला लागातात."हृदयाचे नांव काढल्याने नाराज होवू नकोस." अंग प्रदर्शन करत चालणार्या ललना बघून कुणीही पाघळणारच.
परवा आपल्या नातीने, असाच बेंबी दर्शन करणारा ड्रेस घातला, म्हणून मी रागावलो, ते ह्याच कारणासाठी.
सौ. बाई ===> अहो, आता काळ बदलला आहे.असे तुम्हीच तर म्हणालात.बरे नात आता वयात आली आहे.ह्या पिढीला त्यांना काय हवे? काय नको? ते बरोब्बर समजते.
बाबा ===> पण म्हणून रोज रात्री ८ वाजता क्लासाहून येते, हे काही योग्य नाही.रात्री-बेरात्री कशाला क्लास घ्यायचा?ह्या वयात खेळायला जायचे की दप्तर उचलण्याचा व्यायाम करायचा?आपली २ही मुले सेमी-इंग्रजी माध्यमातूनच शिकली आणि ती पण सरकारी अनुदानातून.काय फरक पडला?बरे आता हे मुलाला समजावायला तर जाऊ शकत नाही.जेव्हढी शाळेची फी जास्त तेव्हढी शाळा उत्तम असा त्याचा समज.ज्याला शिकायचे आहे, तो कसाही शिकतो.आणि रात्री ८ वाजेपर्यंत क्लास ही संकल्पनाच पटत नाही.शिक्षकांच्या सवडी प्रमाणे शिक्षण.कठीण आहे.
सौ.बाई ===> बरे झाले तुम्ही हा विषय बोलला नाहीत ते.सुनेच्या मते महाग शाळा हा स्टेटस सिंबॉल आहे.
बाबा ===> आता हेच बघ ना.दर शनिवारी-रविवारी हॉटेल मध्ये जातात.अरे आम्ही पण खस्ता काढल्या आहेत.साधा एक सिनेमा बघायचा असेल तरी महिनाभर प्लॅनिंग करायला लागत होते.पण त्यात मजा होती.पैशाची ही असली उधळपट्टी बघवत नाही.
सौ.बाई (मध्येच) ===> हो क्का? आपण सिनेमाला गेलो की, सासरे पण हेच आपल्या बाबतीत म्हणायचे.
बाबा ===> अगं मी पण तेच म्हणत होतो.की आपण सिनेमाला जातांना पण घरच्यांची काळजी घेवून जात होतो.माझ्या आई-वडीलांचे पथ्य-पाणी तर तूच बघत होतीस.पण इथे मात्र दर शनिवार-रविवार आपले आपणच जेवण बनवतो आणि जेवतो.निदान एक तरी दिवस मुलाने आपल्याबरोबर ४ घास सुखाने खावेत असे मला पण वाटणारच ना?
सौ.बाई ===> अहो, त्यांना पण २च दिवस मिळतात.तुम्ही जरा त्यांचा पण विचार करा ना.
बाबा ===> आपण दोघेही आयुष्यभर फक्त इतरांचाच विचार केला आहे.आधी आपले माता-पिता, मग मुले आणि आता नातवंडे.आता मात्र खूप झाले.नातवंडे आता मोठी झाली आहेत.आता आपण घर सोडणेच इष्ट.नको ते भाजी आणणे आणि दळण आणणे.तुझे ते रोजचे स्वैपाक करून दमणे आणि भांड्यांची उस्तवार करणे.सुदैवाने आपली गंगाजळी बरी आहे, तर आत्ताच जाऊ.
शिवाय पुर्वीची ह्या शहरातली शांतता कधीच लोप पावली आणि आता साधे रस्त्यावरून चालायचे, म्हटले तरी, मगे-पुढे-डावीकडे-उजवीकडे सगळीकडे बघायला लागते.कोण कधी कुठल्या वाहनावरून येईल आणि आपल्याला उडवून पळून जाईल, ते काही सांगता येत नाही.परवाच एक उत्तम सायकल पटू, रस्त्यावरच्या अपघाताने मरण पावला.बरे झाले, की तू मला सायकल चालवायला देत नाहीस.
सौ.बाई ===> हे मात्र तुमचे पटते बघा.सुन बाई लवकर जाणार आणि उशीरा येणार म्हणून मी बराच स्वैपाक करते.अर्थात तिने पण मला समजून घेतले आहेच.पण दळण आणतांना होणारी तुमची दमछाक बघून मला पण मानसिक त्रास होतोच.
बाबा ===> शिवाय आजकाल बरेच उत्तम वृद्धाश्रम निघाले आहेत.तिथे आजारी माणसांची पण उत्तम काळजी घेतात.आपण जर धड-धाकट असतांनाच तिथे गेलो तर, आपले आणि त्यांचे पण संबंध सुधारलेले असतील.
सौ.बाई ===> तरी पण लोक काय म्हणतील?
बाबा ===> लोकांचे ऐकून कुणाचे भले झाले आहे?लोकांचे जास्त ऐकले की गाढव पण रहात नाही.काय मुवि बरोबर आहे ना?
आम्ही नुसतीच मान डोलावली.
बाबांची रजा घेतली आणि २ जानेवारी २०१८ला वृद्धाश्रमात जावून आम्हा दोघा नवरा-बायकोची नाव नोंदणी केली.आता हातात ५-६ वर्षे आहेत.तोपर्यंत आवरा-आवरी करून घेतो.अर्थात बायकोला काही सांगीतले नाही, हो उगाच नुसत्याच वांझोट्या चर्चा करण्यात काही अर्थ नसतो.
बाबा मूषक-पकड विभागात नक्कीच काम करत असावेत, हे आता तुम्हाला पण पटले असेलच....
======
आमची प्रेरणा ===> http://www.misalpav.com/node/41726
आणि
http://www.misalpav.com/comment/reply/41726/976782
प्रतिक्रिया
उत्तम.
खूप दिवसांनी मिपावर लिहिलेत,
प्रतिसादा बद्दल धन्यवाद....
माझे मत तुमच्या बाबांशी आणि
लेख आवडला आणि पटला.
उत्तम निर्णय
अगदी बरोबर निर्णय, मलाही असेच
आश्रमात स्वतंत्र स्वयंपाकघर हवे
ह्या साठी एक वेगळा पर्याय पण आहे....
तुम्ही पाहून ठेवलेल्या वृध्दाश्रमाची
खरडवहीत कशाला?
अर्थात....
अबबब!
अभिनंदन!
+ १
मुवि
उत्तम विचार व कृती