डेस्टिनेशन - देवभूमी अर्थात हिमाचल प्रदेश मु. पो . सांगला , किन्नर कॅंप्स भाग ३

Primary tabs

मालविका's picture
मालविका in भटकंती
1 Dec 2017 - 9:40 pm

असाच सुंदर निसर्ग बघत आम्ही चाललो होतो आणि एका वळणार आम्हाला सतलज नदीचं दर्शन झालं. खूपच छान वाटलं ते पाहून. नदीच पात्र चांगलेच रुंद होतं. आणि पाणी फारच उथळ होत. आम्ही एके ठिकाणी चहा प्यायला थांबलो तिथून नदी अगदीच जवळ दिसत होती. नदीचा खळखळाट चांगलाच जाणवत होता. सतलज नदीत रिव्हर राफ्टिंग सारखे गेम्स चालतात अशी माहिती ड्राइवरने दिली. पण आम्ही जिथे जाणारा होतो तिथे हि सोय नव्हती. आम्ही सतलज एका कडेला ठेवून तिच्या बाजूने प्रवास सुरु केला. हळूहळू वस्ती विरळ होत चाललेली आणि गावं लांबच्या लांब पसरलेली दिसत होती. गावात कधी कधी मोजकीच घरं लगत होती. पण एक या टोकाला तर दुसरं त्या टोकाला. एक डोंगराच्या वरच्या बाजूला तर एक खालच्या बाजूला अशी लांब लांब दिसत होती. इथल्या बायका आणि पुरुष आता पारंपरिक पोशाखात दिसायला लागले. मधूनच शाळेत जाणारी अथवा येणारी मुलं दिसत होती. बहुतेक जण स्वेटर घालून वावरत होती. तर ज्यांना सवय झालेली अशी माणसं स्वेटर शिवाय सहज वावरत होती.
आमच्या सुदैवाने सूर्यनारायण प्रसन्न असल्याने लख्ख परंतु उबदार असा सूर्यप्रकाश पडला होता. वातावरण अगदी प्रसन्न होते. तिथल्या लोकांना सवय असल्याने तिथली लोक तेवढ्या उबदार वातावरणात सहज वावरत होती. आम्ही मात्र आमची जॅकेट्स चढवली होती. आता आम्ही सतलज नदी पाठी टाकून बासपा नावाच्या नदीच्या काठाने प्रवास सुरु केला. आमचा प्रवास आरामात सगळीकडे थांबत फोटो काढत चालू होता. एके ठिकाणी एक पूल आला. तिथे बघितलं तर मिलिटरी चे काही लोक होते. पूल जरा अरुंद असल्याने एका वेळी एकीकडची वाहतूक चालू होती. आम्हाला कळेना एव्हढयाश्या कारणासाठी मिलिटरीची लोक का आलेली. पूल पार केल्यावर ड्राइवरने दाखवले कि ज्या बाजूने आम्ही पूल पार केला डोंगराचा तो भाग हळूहळू कोसळायला लागला होता. पुलाच्या पलीकडे नदीचं पात्र भरून जाईल एवढ़े दगड वरून घसरून आले होते. लँड स्लायडिंग चा प्रत्यक्ष अनुभव जरी नाही घेतला तरी साधारण कल्पना आली होती. आधीच पूल याच कारणाने बंद करून हा नवीन पूल मिलटरीने बांधून वाहतूक चालू करून दिली होती. आमच्या समोरही काही छोटे छोटे दगड कोसळत खाली येत होते. वाऱ्याने खाली सरकत येणारी माती चांगलीच उडत होती. आम्हाला ठिकठिकाणी रस्त्याने जाताना नदी इकडून तिकडे पार करावी लागत होती. बासपा नदीला सुरवात झाली आणि JSW अर्थात जिंदाल यांचे हायड्रो प्रोजेक्ट लागायला लागले. कितीतरी ठिकाणी भुयार बांधून,बोगदे खणून पाणी सोडले होते. पाण्यावर वीज निर्मितीचे मोठे मोठे प्रोजेक्ट चालू होते.
असाच घाटातून जात असताना गाडीनं एक वळण घेतले आणि समोर अचानक एक हिमाच्छादित पर्वताच टोक दिसलं. इतकं सुंदर दिसलं ते दृश्य. आजूबाजूला सुंदर हिरवे डोंगर आणि त्यांच्या मधून डोकावणारं बर्फाने मढलेल पर्वताचं टोक. आणि मग आमचं फोटोसेशन आणखीनच भरात आलं. किती फोटो घेऊ आणि नको असं झालं. शेवट ड्राइवर ने आम्हाला सांगितलं कि तुम्ही जाणारा आहेत तिथे चारही बाजूने तुम्हा अशीच शिखरं दिसतील. मग आम्ही स्वतःला आणि कॅमेरा ला यावरून परत प्रवास सुरु केला. मध्ये एके ठिकाणी ड्राइवर ने जेवण्याकरिता गाडी थांबवली. जरा अतीच साधी अशी ती खानावळ होती. मला तिथे जेवायला जायचं अगदीच जीवावर आलं होतं. पण नवऱ्याने आग्रह केला म्हणून आम्ही आत गेलो. अगदी साधी रंग उडालेली बाकडी आणि टेबलं होती. एकच थाळीचा मेनू होता. भात,पोळी,राजमा,डाळ,पापड आणि थोडी काकडी टोमॅटो. बस आणखी काही नव्हत. पावभाजीच्या कप्प्याच्या डिश असतात तश्या ३/४ कप्प्याच्या डिश मधून हि थाळी वाढली जात होती. मी जेवायला सुरवात केली आणि मग मात्र न थांबता जेवत गेले. सुरवातीला नाकं मुरडणारी मी नतर ते सुग्रास जेवण न थांबता जेवले. जेवण अतिशय चविष्ट होते. मोजकेच पदार्थ पण एकदम चवदार. आणि न थांबता वाढत होते. जेवणाने मन अगदी तृप्त झालं. एवढ्याश्या त्या खानावळीत पोट भरून आम्ही दोघे आणि ड्राइवर ३ जण जेवलो आणि बिल फक्त ४५० रुपये झालं. आता तर मी आणखीनच खुश झाले.
आमची गाडी वळणावळणाने जात होती आणि आणखी आणखी हिमालयाच्या जवळ आम्ही जात होतो. असा समोर हिमालय दिसतोय,बर्फाने आच्छादलेली शिखरं दिसतायत पण बोचरी थंडी मात्र नाही. हे फारच सुखावह होत. शेवटी सगळा प्रवास करून आम्ही इच्छित स्थळी म्हणजेच सांगला या ठिकाणी पोहोचलो.
अतिशय नयनरम्य अशी हि जागा आहे. शांत,सुंदर निसर्गाने,आणि डोंगरांनी वेढलेला हा परिसर खरंच स्वर्गलोक असावा. बासपा नदीच्या तीरावर वसलेलं हे गाव खूपच सुंदर आहे. आमचं राहण्याचं ठिकाण किन्नर कॅम्पस हे होत. गुगल वर शोधल्यावर खूप सुंदर असे फोटो दिसले होते. ट्रिप ऍडवायझर वर खूप चांगले रिव्ह्यू वाचायला मिळले होते. दिलीप नेगी हे या कॅम्पस चे कर्ताधर्ता तर तुलसी हे बल्लवाचार्य. या दोघांनी हे कॅम्पस खूपच चांगल्या तर्हेने चालवले आहेत. तुलसी हे नाव स्त्री च नसून पुरुषाचं आहे.अतिशय सुंदर असे तंबू इथे उभारलेले आहेत. कॅम्पिंगचे चांगल्या तर्हेचे तंबू इथे उभारलेले आहेत. तिथल्या वातावरणाला साजेसे तंबू आहेत. कमीत कमी १ ते जास्तीत जास्त ३/४ माणसं तंबूत राहतात. तंबूच्या आत दोन जणांसाठी सिंगल/डबल मागणीनुसार बेड लावून दिलेले. बेड च्या दोन्ही बाजूला छोटी छोटी टेबलं. त्यावर मोजकेच चार्जिंग पॉईंट. बेडवर स्वच्छ बेडशीट अंथरलेल्या उश्यांचे अभ्रे पांढरेशुभ्र. ब्लँकेट्स व्यवस्थित घडी करून ठेवलेली. समोर दोन वेताच्या खुर्च्या. मध्ये कापडाचं पार्टीशन करून बाथरूम केलेलं. त्याला कापडाचाच चेनने बंद करता येईल असा पडदा. छोटासा चौकोन अंघोळ करण्यापुरता. समोरच अतिशय स्वच्छ कमोड. मध्ये वॉश बेसिन. बाथरूम मध्ये गरम आणि गार दोन्ही प्रकारचे पाण्याचे नळ. खोलीचा दरवाजा देखील कापडाचाच चेन ने लावता येईल असा. चेन आतून बाहेरून लावता येईल अशा प्रकारची. पूर्ण खोलीत एक सॉफ्ट असं कार्पेट अंथरलेलं. आत घरात वापरायच्या असतात तशा चपला,टॉवेल ठेवलेले. अतिशय आखीव रेखीव अशी खोली (तंबू )तयार केलेली. खोलीबाहेर छोटासा व्हरांडा,त्यातही दोन वेताच्या खुर्च्या टाकलेल्या आणि एक छोटंसं टेबल. प्रत्येक तंबू एका एका सिमेंट च्या चौथऱ्यावर उभारलेला. सगळ्या तंबूच्या मधोमध एक मोठा मंडप घातलेला ज्यात जेवण्याची सोय केलेली. साधारण ४ माणस बसतील एव्हढी कडप्प्याची गोल टेबलं आणि मधोमध मोठ्या ग्रुप साठी लांबलचक टेबल. बुफे पद्धत. शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं स्वादिष्ट खाणं. त्यांचा मुख्य कूक तुलसी नावाचा होता. अतिशय लाजाळू असा हा माणूस परंतु हाताला सुंदर चव. एकही पदार्थ नाव न ठेवण्यासारखा. अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर भोजन आम्हाला पाचही दिवस मिळालं.

प्रतिक्रिया

श्रीधर's picture

2 Dec 2017 - 10:43 am | श्रीधर

+१

चामुंडराय's picture

3 Dec 2017 - 11:00 pm | चामुंडराय

+२

या धाग्यावर मी प्रतिसाद दिला होता का? जुने प्रतिसाद उडाल्यासारखे का वाटतेय?

संजय पाटिल's picture

4 Dec 2017 - 12:19 pm | संजय पाटिल

फोटो कुठायत?

दुर्गविहारी's picture

4 Dec 2017 - 7:51 pm | दुर्गविहारी

वर्णन छान केले आहे. मात्र फोटोंची कमी जाणवली. पु.ले.शु.

दुर्गविहारी's picture

4 Dec 2017 - 7:52 pm | दुर्गविहारी

वर्णन छान केले आहे. मात्र फोटोंची कमी जाणवली. पु.ले.शु.

ट्रिप छान चालु आहे. फोटो टाका पण लवकर.

कुलभूषण's picture

13 Jan 2018 - 9:58 pm | कुलभूषण

येथे जाण्यासाठी वर्षातील कोणता महिना सर्वोत्तम असेल?