प्रो कबड्डी - सिझन ५ - ले पंगा

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in जनातलं, मनातलं
27 Jul 2017 - 4:28 pm

नमस्कार मंडळी,
प्रो. कबड्डीच्या चौथ्या मोसमाचे मी जवळपास संपुर्ण महिनाभर वार्तांकान केले होते. जवळपास ३३ दिवस !
मागील वर्षापेक्षा या ५ वर्षाच्या सामन्यांची सुरुवात जवळपास एक महिना उशीराने सुरुवात होत आहे. उद्या २८ जुलै २०१७ पासुन सामने सुरु होतील. ३ महिने सलग वार्तांकन करणे हे माझ्यासाठी मोठेच आव्हान असणार आहे. सगळे सामने बघून मगच त्यावर लिहायचा विचार आहे. मागील वर्षी देखील सामना पाहुन झाल्यानंतर लगेच वार्तांकन लिहून इथे प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता तो सुफळ झाला. असो. तुणतुणे पुरे !

मागील वर्षांपेक्षा या वेळचे वेगळेपण म्हणजे तब्बल १२ संघ आणि जवळपास ३ महिने हे सामने चालणार आहेत. यावेळी दोन गट पाडण्यात आले असुन प्रत्येक गटात ६ संघ आहेत. सालाबादप्रमाणे याहिवर्षी संघांत इराणी आणि कोरियन खेळाडूंचा लक्षणीय सहभाग आहे.

जुने संघ :
१) यु मुंबा २) पुणेरी पलटण ३) दबंग दिल्ली ४) तेलुगु टायटन्स ५) जयपुर पिंक पँथर्स ६) बंगॉल वॉरियर्स ७) बंगळुरु बुल्स ८) पटणा पायरेटस

यावर्षी ४ नवे संघ येत आहेत.
९) गुजरात फॉर्च्युनजायंटस १०) हरियाणा स्टीलर्स ११) तमिळ थलैवाज १२) युपी योद्धा

तसं पाहिलं तर नवीन जुन्याला फार अर्थ राहिलेला नाहिये कारण मागील वर्षातील संघातील खेळाडू जवळपास पुर्णपणे वेगवेगळ्या संघांत गेले आहेत.

प्रो कबड्डी सिझन्सचे आत्तापर्यंतचे विजेते याप्रमाणे.

सिझन १ : जयपुर पिंक पँथर्स
सिझन २ : यु मुंबा
सिझन ३ : पटना पायरेटस
सिझन ४ : पटना पायरेटस

चला तर, आपल्या मातीत जन्मलेल्या या खेळाचा आनंद घेऊ या !

उद्याचे शुभारंभाचे सामने :
सामना क्र. १
२८ जुलै २०१७, रात्री ८.०० वाजता (गच्चीबावली इनडोअर स्टेडिअम, हैदराबाद)
तेलुगु टायटन्स वि. तमिळ थलैवाज

सामना क्र. २
२८ जुलै २०१७, रात्री ९.०० वाजता (गच्चीबावली इनडोअर स्टेडिअम, हैदराबाद)
यु मुंबा वि. पुणेरी पलटण

मागील वर्षाच्या वृत्तांकनाचा दुवा इथे

क्रीडासमीक्षा

प्रतिक्रिया

पी. के.'s picture

27 Jul 2017 - 4:44 pm | पी. के.

आपले खूप खूप आभार आणि शुभेच्या.
आपले वार्तांकान खूप वाचनीय असते पण वेळे अभावी रोज प्रतिसाद देऊ शकत नाही आणि हीच अवस्था माझ्यासारख्या बाकीच्या मिपाकरांची असेल.

या वर्षी काशिनाथ आडके आणि नितीन मदने यु मुंबा कडून खेळणार त्यामुळे आणखी मझ्या येईल.

मागील सारे सीझनचे सर्वच सामने अतिशय मजेदार आणि उत्तम होते.
सर्व खेळाडूंना उत्तम खेळासाठी ऑल दि बेस्ट आणि भारतीय प्रेक्षकांकडून याही सीझन ला उत्तम प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा.

प्रो कब्बडी जुलै २०१७
ले पंगा .....( घेऊन टाक........)

रघुनाथ.केरकर's picture

27 Jul 2017 - 5:34 pm | रघुनाथ.केरकर

रोज भेटु इथेच

रघुनाथ.केरकर's picture

27 Jul 2017 - 5:44 pm | रघुनाथ.केरकर

क्रिकेट मध्ये असतात तसे मोशन कॅमेरे लावले पाहिजेत

जेम्स वांड's picture

27 Jul 2017 - 6:48 pm | जेम्स वांड

काशी मुंबईत आहे ह्या वर्षी? लैच भारी!, बाजीराव होटगे अन आपला रिशांक देवडीगा कुठं आहेत? जंग कुन ली ला बंगाल न रिटेन केलाय का?

Ranapratap's picture

27 Jul 2017 - 9:10 pm | Ranapratap

मजा येणार, काश्याची हनुमान उडी पाहायला.

साधा मुलगा's picture

28 Jul 2017 - 12:53 am | साधा मुलगा

छान ! धाग्यावर लक्ष ठेऊन आहे, शुभेच्छा! वर्ल्ड कप च्या वेळी लई मिस केल बघा तुम्हाला.

सपे-पुणे-३०'s picture

28 Jul 2017 - 8:50 am | सपे-पुणे-३०

दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीही प्रो कबड्डी च्या सिजन बद्दल उत्सुकता आहे. ह्यावर्षी संघांमध्ये बरेच बदल झालेत. मुंबईत राकेश कुमार नाहीये, पुण्यात मनजीत छिल्लर नाहीये... पण झटपट होणाऱ्या ह्या मॅचेस बघायला मजा येते.

मनजीत छिल्लर ला पुण्यानं रिटेन का केलं नसावं? असो तो संदीप नरवाल नावाचा मोठा प्राणी आहे ह्या वेळी पुणेरी पलटण मध्ये

दिवस पहिला : सामना क्र. १ : तेलूगु टायटन्स वि. तमिळ थलैवाज ( स्थळ : गच्चीबावली इनडोअर स्टेडिअम, हैदराबाद)

'कामावरुन घरी यायला उशीर झायला,
वाट बघतोय तमिळ थलैवा वाट माझी बघतोय तमिळ थलैवा'

असे गाणे मनातल्या मनात गुणगुणतच घरी पोहोचलो तो प्रो कबड्डी ५ व्या मोसमाचा उद्घाघटनाचा सोहळा संपून सामना सुरु झाला होता. टिव्हीचा रिचार्ज संपला होता तो मारुन 'एचडी' चे अ‍ॅड ऑन घेता घेता तेलुगु संघाचे ३ तर तमिळ थलैवाजचे २ गुण झाले होते.

आमच्या टीव्हीच्या कंट्रोलची अजुनच गंमतशीर गोष्ट आहे. मुलाने रोज कार्टुन बघू नये म्हणून मी फक्त शनिवार आणि रविवारी २० रु. चे रिचार्ज मारतो. बाकी दिवस टिव्ही म्हणजे नुसता डब्बा असतो. आता बापालाच ३ महिने सामने बघायचे म्हणजे मुलाला ३ महिने कार्टुन बघू देणे आलेच . असो

तर या मोसमात तमिळ थलैवा हा नवा संघ दाखल झालाय. त्याचे मालक आहेत सचिन थलैवा (सॉरी तेंडूलकर ) आणि मा टिव्ही चे चेअरमन निम्मागड्डा प्रसाद. पहा ना काय योगायोग तमिळ चित्रपटसृष्टीचा थलैवा रजनिकांत आणि एकेकाळचा क्रिकेटचा थलैवा आणि आत्ता कबड्डी संघाचा मालक दोघेही मराठी !
छाती ५६"ची झाली ना ? :)

आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने राष्ट्रगीत गाऊन केली. सामना बघायला अक्षय, सचिन, राणा दगुबत्ती, चिरंजीवी, आलु अर्जुन, पी.व्ही. सिंधु, पुलेला गोपीचंद अशी खाशी मंडळी हजर होती. पहिल्या सामन्यात अक्षय ने बरीच पकपक केली त्यामुळे सामन्याचे काही महत्त्वाचे क्षण टिव्हीवर दिसले नाहित.

तमिळ थलैवाजचा कप्तान आहे 'अजय ठाकूर' (माजी पुणेरी पलटणवासी). अजय ठाकूर, के. प्रपंजन आणि अमित हुड्डा वगळता सगळे नवखे खेळाडू आहेत त्यामुळे सध्या या संघाकडून जास्त अपेक्षा ठेवायला नको असे वाटले.

तेलुगु टायटन्सचा कप्तान राहुल चौधरी हा मागील सिझनचा एक श्रेष्ठ खेळाडू आहे. तेलुगु संघात राहुल चौधरी, निलेश साळुंखे, राकेश कुमार (एक्स यु मुंबा), अमित छिल्लर, सोमवीर, रोहित राणा असे एक से बढकर एक खेळाडू आहेत. त्यामुळे सध्या यांचा संघ चांगलाच तगडा वाटतोय.

कबड्डी हा सांघिक खेळ असला तरी काही खेळाडू असे आहेत हे एकहाती सामना जिंकून देऊ शकतात. अनुप कुमार, रोहित कुमार, मनजित छिल्लर, राहुल चौधरी, निलेश शिंदे, दिपक हुड्डा, संदिप नरवाल, प्रदिप नरवाल, प्रदिप मोंडल ही काही नावे !

अपेक्षेप्रमाणे पहिला सामना तेलुगु टायटन्सने जिंकला. राहुल चौधरी ने चढाईत तब्बल १० गुणांची कमाई केली. दोन्ही संघात सुरुवातीपासुनच ७-८-१०-१२ गुणांचा फरक होता. मात्र तमिळ थलैवाने नवीन असुनसुद्धा चांगली टक्कर दिली. दोन संघामधील गुणांतील अंतर ७ किंवा त्यापेक्षा कमी असेल तर हरणार्‍या संघास देखील एक गुण मिळतो.
चढाईत राहुल ने १० गुण तर पकडीत विशाल भारद्वाजने ५ गुणांची कमाई करत बक्षीसे पटकावली. तमिळ थलैवाज कडून के. प्रपंजन ने ७ गुणांची कमाई केली.

निकाल : तमिळ थलैवाज (२७ गुण) वि. तेलुगु टायटन्स (३२ गुण)
तेलुगु टायटन्स : ५ गुणांनी विजयी.


--------------------------------------------------------------------
सामना क्र. २ : यु मुंबा वि. पुणेरी पलटण

पुण्यात कुठलीही निवडणूक असो, एक पोष्टर नेहमी बघायला भेटते ते म्हणजे 'पुण्याचा कारभारी बदला' अगदी कलमाडी काळापासून बघतोय मी. मात्र कितीही कारभारी बदलले तरी पुण्याचे नशीब बदलत नाही हे एव्हाना पुणेकरांच्या लक्षात आले असेलच :)
वन मॅन आर्मी मनजित छिल्लर यावर्षी पुण्याच्या संघात नाही हे वाचून मी थोडासा रिलॅक्स झालो होतो. त्याजागी दिपक हुड्डा यंदाच्या पुणे संघाचा कप्तान आहे. त्याने पहिल्याच सामन्यात यु मुंबाला चारी मुंड्या चीत केले. (म्हणजे पुण्याचे नशीब बदलले नाही तर ! मनजीत ने लावलेली विजया ची सवय आता त्यांचे व्यसन बनू पाहणार बहुधा ! यु मुंबाला अगदी छु मुंबा करुन टाकले. बघा कुणी मुंबईला नावे ठेवली की आम्ही मुंबईकर त्याला त्याच्यापेक्षा जास्त नावे ठेवतो :) :)

दिपक हुड्डा च्या जोडीला संदिप नरवाल उतरला तेव्हाच मी समजुन चुकलो की हा सामना जिंकणे यु मुंबासाठी अवघड आहे. संदिप नरवाल म्हणजे बचाव आणि पकड फळीतील अभेद्य किल्लाच जणू ! चढाई करणार्‍यांची त्याला पकडण्याची छातीच होत नाही.
यंदा पुणेरी पलटणीत दिपक, संदिप, धर्मराज चेलारथन, राजेश मोंडल हे चार खतरनाक खेळाडू आहेत. त्यामुळे अंतिम फेरीत जाण्याची यांना संधी आहे.

मुंबई संघात अनुप कुमार, शब्बीर बापू, काशिलिंग आडके, नितिन मदने, कुलदिप सिंह सारखे मातब्बर खेळाडू आहेत पण त्यांचा एकमेकांशी ताळमेळ दिसून आला नाही. मुळात अनुप कुमार कॅप्टन कुल असल्यामुळे आक्रमक होऊन खेळत नाही. आजच्या खेळात एकटा अनुप सोडला तर बाकी कोणाचीही मात्रा चालली नाही. शब्बीर बापू, काशिलिंग आडके, नितिन मदने आणि बचाव फळी पुर्णपणे निष्प्रभ वाटली. सुरुवातीपासूनच पुढे असलेल्या पुणे संघाने आपली बाजू मजबूत करत मुंबईला तब्बल १२ गुणांनी मात दिली.

पुण्याचा दिपक, संदिप, धर्मराज यांनी नेत्रदिपक कामगिरी केली. मुंबई १२ गुणांनी पिछाडल्यामुळे हरल्यावर मिळणारा १ गुणही मिळवू शकले नाही.

निकाल : यु मुंबा वि. (२१ गुण) वि. पुणेरी पलटण (३३ गुण)
पुणेरी पलटण १२ गुणांनी विजयी.
--------------------------------------------------------------------

विजेत्या संघांचे अभिनंदन ! परत भेटूया शुभरात्री !!

स्रुजा's picture

29 Jul 2017 - 12:36 am | स्रुजा

कोणत्या चॅनलवर बघता येतील सामने?

धनावडे's picture

29 Jul 2017 - 4:16 am | धनावडे

स्टार स्पोर्ट

इतका राग आलाय मला यु मुंबाचा काल.......... काय भिक्कात खेळलेयत.

गौतमी's picture

29 Jul 2017 - 12:25 pm | गौतमी

* भिक्कार

सपे-पुणे-३०'s picture

29 Jul 2017 - 4:31 pm | सपे-पुणे-३०

काल यु मुम्बा संघाकडून कर्णधार अनुप कुमार शिवाय कोणीही विशेष खेळलंच नाही. त्यामुळे सामना एकतर्फीच झाला.

दिवस २ रा : सामना क्र. ३ : जयपुर पिंक पॅंथर्स वि. दबंग दिल्ली

जयपुर पिंक पॅंथर्स मागील वर्षी अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. त्याउलट दिल्लीच्या नावे भरपुर सामने हरण्याचा पराक्रम होता. या वर्षी दोन्ही संघात बरेचसे बदल झालेत. जयपुर पिंक पॅंथर्सचा मागील वर्षाचा कप्तान बदलून मनजित छिल्लरला ते पद देण्यात आले. मनजित छिल्लर, भुतपुर्व कप्तान जसबीर सिंह, पवन कुमार, सेल्वामणी, तुषार पाटील, सोमवीर शेखर अशी तगडी टीम दिल्लीला सहज मात देईल असे वाटले होते. पहिल्या सत्रात जयपुरचाच वरचष्मा राहिला. जसवीर ने त्याच्या ३ ही चढायांमधे यशस्वी होत पहिल्या सत्रातच दिल्ली ला सर्वबाद केले.
दुसर्‍या सत्रात मात्र खेळ पुर्णपणे पालटला. दिल्लीचा इराणी कर्णधार मिराज शेख याने अफलातुन खेळ करत जयपुरला दोन वेळा सर्वबाद केले. मिराज ने २० चढायांमधे ७ गुणांची कमाई केली. मागच्या वेळी बंगालचा कर्णाधार असणारा निलेश शिंदे यावेळी दिल्लीकडून खेळतोय. त्याने पकडफळीत उत्तम कामगिरी करत हाय फाय (पकडीत ५ गुण) मिळविले. 'निलेश शिंदे ला तुम्ही टांग देऊ शकत नाहि' असा वाक्प्रचार मागेपुढे रुढ झाला तर आश्चर्य वाटायला नको. त्याचा 'अँकल होल्ड' खरोखरीच अफलातून आहेत.

जयपुरकडून पवन कुमार ने चढाईत ७ गुण तर सोमवीर ने पकडीत ३ गुण घेतले. जसबीर सिंहचा खेळ ठीक ठाक तर मनजित आणि तुषार म्हणावा इतका प्रभाव पाडू शकले नाहीत.

एकंदरीतच हा सामना उत्कंठावर्धक झाला. कालच्या सामन्यांच्या तुलनेत हा सामना खुपच उजवा होता.

निकाल : जयपुर पिंक पॅंथर्स (२६ गुण) वि. दबंग दिल्ली (३० गुण)
दबंग दिल्ली : ४ गुणांनी विजयी.

-----------------------------------------------------

दिवस २ रा : सामना क्र. ४ : तेलुगु टायटन्स वि. पटणा पायरेटस
कालच्या सामन्यात तेलुगु टायटन्सच्या राहुल चौधरी ने सुपर १० केले होते (चढाईत १० गुण म्हणजे सुपर १०). त्यामुळे आज त्याच्याकडून अपेक्षा वाढलेलया होत्या. शिवाय ते घरच्या मैदानावर खेळत असल्याचा फायदा होता. मात्र त्यांच्या समोर गत २ मोसमाचे विजेते पटणा पायरेटसचे कडवे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यास तेलुगु टायटन्सचा संघ दुसर्‍या सत्रात अपयशी ठरला आणि पटणा पायरेटसने आपल्या किर्तीला जागत हा सामना आपल्या खिशात टाकला.

पटणा पायरेटसचा कप्तान परदीप नरवाल हा अष्टपैलु खेळाडू आपल्या उत्कृष्ट चढायांसाठी ओळखला जातो. त्याला 'डुबकी मास्टर' ची पदवी का मिळाली हे जाणून घ्यायचे असेल त्यांनी एकदा तरी त्याचा खेळ नक्कीच पहावा. गतसाली बंगालकडून खेळणारा मोनू गोयत, मुंबईकडून खेळणारा विशाल माने हेच तिघे नावाजलेले खेळाडू पण काल म्हटल्याप्रमाणे काही खेळाडू असे असतात की एकटे विजय खेचून आणतात. परदीप नरवाल हा असाच खेळाडू आहे. त्याने आज २० चढायांमधे तब्बल १५ गुणांची कमाई केली. ५ व्या मोसमातला आतापर्यंतचा हा एक विक्रम आहे. हा विक्रम या मोसमात कोणी मोडेल याची शक्यता वाटत नाही. कदाचित परदीप च ते करु शकेल.

पहिल्या सत्रापर्यंत आणि दुसर्‍या सत्राची जवळपास १० मिनिटे दोन्ही संघात पकडापकडीचा खेळ चालू होता. गुणतालिकेत दोन्ही संघ १-२ गुणांच्या फरकाने वरखाली होत होते. नंतर एका चढाईत परदीप ने अशी डुबकी मारली की चार गुण घेऊनच तो परत आला. तिथून पुढे जो सामना फिरला तो पटणाच्या बाजुनेच राहिला.

राहुल चौधरीच्या नावे प्रो कबड्डीत सगळ्यात जास्त चढाई गुणांचा विक्रम आहे. आज ५०० चा आकडा गाठून तो नवीन विक्रम प्रस्थापित करणार होता पण पटणाने त्याला ४९९ वरच जखडून ठेवले. मला वाटते ५०० चा जादुई आकडा गाठण्याच्या दबावाखाली राहुल दबला गेला तो शेवटपर्यंत त्यातुन बाहेर पडू शकला नाही. त्याला १ गुण मिळवून ५०० गुणांचा विक्रम करण्यासाठी अजुन १ दिवस थांबावे लागणार आहे.

टायटन्सकडून चढाईत राहुल ने ७ गुण, निलेश साळुंके ने ६ गुण, विकास ने ५ गुण, तर विशाल भारद्वाज ने पकडफळीत हाय फाय (पकडीत ५ गुण) मिळविले. निलेश साळूंके काल आणि आज दोन्ही दिवशी चांगला आणि सातत्यपुर्ण खेळला. विकास काल चमकला नाही पण आज चांगला खेळला. विशाल भारद्वाज ने काल आणि आज दोन्ही दिवशी 'हाय फाय' चा विक्रम केला.

पटणा : परदीप : १५ गुण (चढाई), मोनु गोयत ८ गुण, विशाल माने ३ गुण,सचिन शिंगाडे आणि विष्णू प्रत्येकी १ गुण.

एकंदरीत आजचे दोन्ही सामने एक से बढकर एक होते. मजा आला !

निकाल : तेलुगु टायटन्स (२९ गुण) वि. पटणा पायरेटस (३५ गुण)
पटणा पायरेटस : ६ गुणांनी विजयी.

-------------------------------------------------

उद्याचे सामने :
यु मुंबा वि. हरियाणा स्टिलर्स
तेलुगु टायटन्स वि. बंगळुरु बुल्स

---------------

विजेत्या संघांचे अभिनंदन ! उद्या परत भेटूया शुभरात्री !!

रघुनाथ.केरकर's picture

31 Jul 2017 - 11:35 am | रघुनाथ.केरकर

यु मुंबा वि. हरियाणा स्टिलर्स सामन्यात शेवटला २९-२८ अशी परिस्थिती असताना शेवटच्या २० सेकंदाची चढाई उ मुंबा कडे आली. तेंव्हा हरियाणाची ६ ची कवर उभी होती. आणि अनुप कुमार चढाई वर आला होता. तेंव्हा त्याने २० सेकंड वेळ काढत १ गुणांची आघाडी कायम ठेवली. आणि हरियाणा शेवटच्या चढाईची वाट बघत बसली. तोवर हूटर वाजून गेला. जर अनुपच्या शेवटच्या चढाईच्या वेळी हरियाणाच्या कवर क्रॉस लावली असती तर? टच लाईन तर अनुप ला झक मारून पार करावी लागली असती. तसे ना करतो तर तो स्वता बाद झाला असता आणि हरियाणा बरोबरीत आली आता. आणि जर अनुप ने अटेंम्प्ट केला असता राईड व्यालीड करायचा तर हरियाणाला चान्स होता त्याला पकडायचा.अनुपच्या उंची मुळे कदाचित तो बचावलासुद्धा असता, पण की हरियाणाच्या रिस्क घेतली पाहिजे होती. शेवटच्या राईडची वाट पाहायला नको होती.

दोन दिवस मेहनतीने टाईप केलेले प्रतिसाद काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकाशित झाले नाहित. इतर धाग्यांवरील प्रतिसाद देखील हवेत गायब झाले. त्यामुळे थोडा हिरमोड झालाय. बघुया आजपासून पुन्हा परत कसे जमते ते !

रघुनाथ.केरकर's picture

7 Aug 2017 - 1:47 pm | रघुनाथ.केरकर

बाकी मुंबैला खुप घाम गाळावा लाग्तोय.

गुजरात फॉर्च्युनजायंटस आणि पटणा पायरेटस मजबूत दिसत आहेत.

धर्मराजमुटके's picture

16 Aug 2017 - 9:58 pm | धर्मराजमुटके

कोणीतरी या धाग्यावर येतयं हे पाहून आनंद झाला. कामाच्या व्यस्ततेमुळे सध्या मॅचेस बघणे होत नाहिये. बाकी यावेळी मुंबईच्या आशा सोडलेल्या आहेत. फायनल मधे बहुधा पटणा पायरेटस, युपी योद्धा आणि गुजरात फॉर्च्युनजायंटस यापैकी दोघे असतील.

मोदींच्या नामप्रतापे की काय कोण जाणे गुजरात टीम फॉर्च्युनेट पण आहे आणि जायंटस पण आहे.

सामने :
यु मुंबा वि.जयपूर पिंक पॅंथर्स
पटणा पायरेटस वि.बंगॉल वॉरियर्स