देव्हारा...६

विनिता००२'s picture
विनिता००२ in जनातलं, मनातलं
18 Apr 2017 - 9:26 am

"ठीक आहोत, आपण आराम करा. आम्ही बाहेर जाऊन येतो. मग आपण बोलुयात!"
"ठीक आहे." तनू उत्तरली.
तिची रहायची व्यवस्था कुलभुषणने आपल्या बंगल्यावर केली होती. ती रुममधे जाऊन फ्रेश झाली. 'कुलभुषणशी काय आणि कसे बोलायचे.' याचा ती विचार करत होती.

देव्हारा...६

रात्रीचे जेवण तिने कुलभुषणच्या फॅमिलीबरोबर घेतले. राजलक्ष्मीशी तिची तिथेच ओळख झाली.

"उद्या आपण फॅक्टरीत जाऊया." म्हणुन कुलभुषणने विषय संपवला.

सकाळी ती तयार होऊन हॉलमधे आली, तेव्हा कुलभुषणबरोबर अजुन दोन व्यक्ती तेथे हजर होत्या.

"मॅडम, तुमची ओळख करुन देतो. हे अभिराम आणि हे रघुराज! हे दोघे पण आमचे स्नेही आहेत आणि कंपनी पार्टनर सुध्दा!"

तनूने हात जोडुन अभिवादन केले. मग थोडावेळ ते बोलत बसले. राजलक्ष्मी चहा-बिस्कीटे घेवुन आली.

"या सुनबाई!" अभिराम हसत उदगारले. ती लाजली. सर्वांना चहा देवुन ती आत निघुन गेली.

"फार गुणी मुलगी आहे!" रघुराज म्हणाले.

"हो ना! पण त्याला कुठे पारख आहे तिची?" अभिराम पुटपुटले.

कुलभुषण फोनवर बोलत असल्याने त्यांनी हे ऐकले नाही पण तनूने मात्र बरोबर ऐकले. कुलभुषण या परिवाराचे नातेवाईक बनणार होते यात शंका नव्हती. तिला बरे वाटले. हे डील व्हायला फारसा वेळ लागणार नव्हता. थोड्या वेळाने त्या दोघांनी निरोप घेतला.

कुलभुषण आणि ती फॅक्टरीत पोहोचले. ती निरीक्षण करत होती. प्रिमायसेस सुरेख होता. कलात्मक दृष्टीने सजवलेला होता. मालक कलाकार असावा. कुलभुषणकडे पैसा होता पण कलात्मकता नव्हती. अर्थात हा विचार तिच्या मनात आला आणि गेला. सध्या तिला फक्त डिलकडे लक्ष द्यायचे होते.

तिला एका केबिनमधे बसवून ते कुठतरी गेले. बर्‍याच वेळाने ते जरा रागातच परत आले.

"काय झाले कुलभुषणजी?" तिने चौकशी केली.

"मी जे काही करतोय ते त्याच्या भल्यासाठीच ना! हा म्हणतोय पार्टनरशीप करणार नाही. पण तुम्ही काही काळजी करु नका. तरुण रक्त आहे, जरा समजवावे लागेल."

तनू जरा विचारात पडली.

"पण ते मानतील ना?" तिने साशंकपणे विचारले.

"त्याला मानावे लागेल. मी त्याचा फायनांन्सर आहे. माझे म्हणणे त्याला टाळता येणारच नाही." कुलभुषणच्या डोळ्यांत खुनशी चमक होती. तनूला ते आवडले नाही, पण ती गप्प बसली. हा त्यांचा अंतर्गत मामला होता.

"मॅडम, तुम्ही पाहिजे तर शहर फिरुन या. ड्रायव्हर तुम्हाला घेवुन जाईल. मला जरा काम आहे."

कुलभुषणचा निरोप घेवुन ती केबिनमधुन बाहेर पडली. कॉन्फर्सहॉलजवळून जाताना अचानक तिची नजर एका फोटोकडे गेली. येताना तिने तो फोटो नीट पाहीला नव्हता. ती जवळ जाऊन तो पाहू लागली. सहायसाहेबांच्या कुठल्यातरी अवॉर्ड सेरीमनीचा तो फोटो पाहताना ती चमकली. बाजुच्या गर्दित तिला अभिजीत दिसला. तिची काया थरथरली. बाजुने एक ऑफिस कर्मचारी चालला होता. तिने त्याला थांबवले.

"हा फोटो कुणाचा आहे?" तिने उत्सुकतेने विचारले.

"हे आमचे मोठे साहेब आहेत." तो उत्तरला.

"...आणि हे बाकिचे?"

"हे अभिरामजी, रघुराजजी आणि हे अभिजीतसर....आमचे आत्ताचे 'एम.डी.' " त्याचे उत्तर ऐकुन तनिष्का सुन्नच झाली. अभिजीत... 'एम.डी.', कुलभुषणचा जावई!

शहर फिरण्याऐवजी ती रुमवर परत आली. अभिजीतची स्थिती तिच्या लक्षात आली. पण तरी एकदा तिला अभिजीतला बघुन खात्री करुन घ्यायची होती. संध्याकाळी ती परत फॅक्टरीकडे गेली. थोडावेळ वाट पाहील्यावर कारकडे जाणारा अभिजीत तिला दिसला. त्याचा वर्ण थोडा का़ळवंड्ला होता, पण चालण्यातली ऐट तिच होती. तनूचे मन व्याकुळ झाले. धावत जाऊन त्याला भेटावे असे वाटुनही तिने स्वत:ला आवरले. ती परत रुमवर आली.

रात्री डायनिंग टेबलवर फक्त ती आणि राजलक्ष्मीच होत्या. राजलक्ष्मी गप्पच होती.

"कुलभुषणजी आले नाहीत का?" तनूने चौकशी केली. राजलक्ष्मीने नकारार्थी मान हलवली.

"थोडा प्रॉब्लेम झालाय. पप्पांनी त्यांना पार्टनरशीप करा नाहीतर सर्व पैसे परत करा म्हणुन सांगीतलेय. ते पण चिडले. सध्या त्यांच्याकडे पैशांची व्यवस्था करण्यासाठी काही उपलब्ध नव्हते. त्यांनी देव्हार्‍यातले देवच गहाण ठेवायला काढलेत." राजलक्ष्मी उदासपणे बोलली.

"पण देव... आणि त्यांचा ऐवढा पैसा मिळेल?"

"सांगता येत नाही. कारण त्यांचे देव साधेसुधे नाहीत, सोन्याचांदीच्या मुर्तींना हिरे मोती जडवलेले आहेत."

त्या नंतर राजलक्ष्मी काही बोलली नाही. थोडेसे खाऊन ती उठली. तनूला पण विशेष भूक नव्हती. ती पण रुममधे येवुन बसली. रात्रभर ती टक्क जागी होती.

अभिजीत बंगल्यावर पोहोचला, तेव्हा दोन्ही भाऊ आणि वहिन्या त्याच्याकडे पहात असलेले त्याला जाणवले. पण त्याने दुर्लक्ष केले. तो फ्रेश होऊन आला.

"अभि, तुला असे करता येणार नाही." अभिराम पुढे येत म्हणाला.

"का?" अभिने शांतपणे विचारले.

"आम्ही फॅक्टरीतला हिस्सा सोडला, घरातला हक्क सोडला. पण तू आता देव विकायला निघालास?" अभि किंचित हसला.

"तुम्ही तुमचा हिस्सा मला दिलात, कारण ते सर्व गहाण पडले होते. कंपनी दिवाळखोरीत निघाली होती." अभिच्या उत्तराने रघुराज खवळला.

"म्हणुन आता देव विकुन तू एकटाच मजा मारणार?"

"रघुभैया, मी काय करणार आहे ते समजण्याची सारासार विचारशक्ती आता तुमच्यात उरलेली नाही. या पुढे मला कुठलाही प्रश्न विचारु नका, उत्तर द्यायला मी बांधील नाही." आणि तो वडिलांच्या रुममधे निघुन गेला. सर्व प्रकार त्याने इत्थंभुत वडीलांना सांगीतला.

"पप्पा, मला माहीत आहे, देव बाहेर काढणे तुम्हाला आवडणार नाही. पण सध्या माझ्यापुढे दुसरा काही मार्गच नाहीये. तरी पण तुम्हाला काही मार्ग सुचत असेल तर...!" उत्तरादाखल पप्पांनी त्याच्या हातांवर थोपटले. अभिला बरे वाटले. पपा तरी त्याच्याबरोबर होते. रात्री बेडवर आडवा होऊन तो विचार करत होता. अचानक त्याला कॉलेजचे दिवस आठवले. आदेशची मैत्री, तनूचे प्रेम आठवले. त्याच्या डोळ्यातुन अश्रु ओघळले. 'आता तनू त्याच्याबरोबर असती तर तिने कसे रिअ‍ॅक्ट केले असते?' तो या विचारात रमला. तिला ही गोष्ट कधीच सहन झाली नसती. अभि जो विचार करत होता तो अगदी खरा होता. तनू घरी परत आली आणि आदेशला भेटली. अभिजीतची सर्व परिस्थिती तिने आदेशच्या कानावर घातली.

"आदेश, त्याला मदतीची गरज आहे. तू बँक मॅनेजर आहेस. जाऊन त्याला भेट. तो देव गहाण ठेवायला निघालाय. पण मी त्याला असे करु देणार नाही. पपानंतर त्यांची सर्व संपत्ती माझ्या नावावर झाली आहे. आमचा बंगला, बँक बॅलंस सर्व मिळुन अभिला हवी आहे तेवढी रक्कम नक्कीच मिळेल."

आदेश उठुन तिच्या जवळ गेला.

"तनू, तू हे कसे काय साध्य करणार आहेस?"

"हे सर्व तू करशील. अभिला काही सांगायची गरज नाही. त्याला या अवस्थेत बघणे मला सहन होत नाहीये. कुलभुषण कसाही असला तरी मातब्बर आसामी आहे. अभिच्या घरच्यांनीही कुलभुषणशी रिश्ता पक्का केलाय. त्यांना त्याचा भविष्यात पण उपयोगच होईल."

"आणि तो देव्हारा?" आदेशने विचारले.

"तो माझ्या घरात राहील. त्याच्या घरचे देव माझ्याच घरचे नाहीत का? तसे पण देव्हार्‍यात एकदा देवाची प्राणप्रतिष्ठा केली की ते हलवता येत नाहीत. हलवले तर त्यांचे विसर्जनच करावे लागते. आई खुप वेळा लग्नाचा विषय काढते पण माझ्या मनाच्या देव्हार्‍यात अभिची मुर्ती विराजमान आहे, ती कशी हलवू?" आदेशने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती वास्तवात आली. तनूकडुन अभिचा पत्ता घेवुन आदेश निघुन गेला.

(क्रमश:)

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

हं आता शिर्षकाचा अर्थ कळ्तोय. मस्त चालू आहे. पुभाप्र.

प्राची अश्विनी's picture

18 Apr 2017 - 2:53 pm | प्राची अश्विनी

+१ छान चाललीय गोष्ट.

विनिता००२'s picture

18 Apr 2017 - 12:37 pm | विनिता००२

धन्यवाद सर ___/\__

पद्मावति's picture

18 Apr 2017 - 1:41 pm | पद्मावति

मस्तच. पु.भा.प्र.

नीलमोहर's picture

18 Apr 2017 - 3:51 pm | नीलमोहर

छान लिहीत आहात,

पैसा's picture

18 Apr 2017 - 4:01 pm | पैसा

छान लिहिताय

विनिता००२'s picture

18 Apr 2017 - 5:19 pm | विनिता००२

धन्यवाद मैत्रिणींनो ___/\___

मनिमौ's picture

18 Apr 2017 - 8:47 pm | मनिमौ

रंगत चालली आहे कथा. पुढच्या भा ल टा