रैना

Primary tabs

arunjoshi123's picture
arunjoshi123 in जनातलं, मनातलं
14 Mar 2017 - 7:14 pm

ईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत - दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्‍यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.

सगळं जग स्वार्थी असतं मात्र त्यात एका निस्वार्थ नात्याला जागा अवश्य असते. नेमकं तेच नातं ईश्वराला पाहवलेलं नसतं. मात्र नसलेली व्यक्ति नाही असं प्रत्यक्षात नसतंच. रात्रीच्या एकांताच्या वेळी ती हरवलेली व्यक्ति इतकी प्रतिक्रियाशील होऊन जाते कि ती नाहीये असा निष्कर्ष काढणं अवघड होऊन जातं. ती कशी दिसेल, कशी बसेल, कशी बोलेल, काय बोलेल, काय करेल, तिने काय घातलेलं असेल, तिचे अविर्भाव कसे असतील, ती कशी वागेल हे सगळं इतकं सुस्पष्ट ठावं असतं कि हे सगळं आपण कल्पना करतोय हे देखील विसरून जायला होतं. तिथे बाह्य जगाच्या दृष्टीनं जो एकांत आहे त्याचं अनुभवकर्त्यासाठी खर्‍या अर्थानं सहवासात परिवर्तन झालेलं असतं. ही विरहदायी व्यक्ति कोणाची आई असेल, पिता असेल, पत्नी असेल, मित्र असेल, प्रेयसी असेल वा अजून कोणी असेल; अस्सल प्रेमाच्या ठिकाणी ही रात्रीभेट कधीकधी अवश्य होते. ही विरहकर्ती, ती अदृश्य भेटकर्ती आणि त्यांचं भावविश्व कसं असेल हे डोकाऊन पाहावयाचं असेल तर बिती ना बिताई रैना हे गाणं एकवार एकांतात बसून अवश्य ऐकावं.

१९८७-८८? तेव्हा मी सातवी-आठवीत असेन. आमच्या घरमालकाच्या पोरींबरोबर उदगीरमधल्या कॅटल क्लास वस्तीतून मी दुधाच्या केटल्या घेऊन नविन बंगल्याबंगल्यांच्या सुखवस्तू निडेबन वेशीकडं जायचो. तिथे एखाद्या त्यातल्या त्यात फ्रेंडली बंगलेवाल्याकडं सगळ्या केटल्या टेकवायच्या नि त्या पोरींचं दूध वितरण चालू व्हायचं. कदाचित दुधाच्या नफ्यात मला हिस्सा नाही म्हणून पायपीट करायचे कष्ट मला न देता तिथेच बसून केटल्यांचे संरक्षण करण्याचे सोपे काम मी करावे असा विचार त्या करत आणि मी कदाचित पोरींचा सहवास हाच पुरेसा मोबदला मानत असेन. त्या उच्चभ्रू लोकांच्याकडे टीवी असे नि घरात प्रवेश नसला तरी बाहेरूनच खिडकीतून आत पलंगावर बसलेल्या लोकांच्या मानांमधल्या दर्‍यांतून त्यांच्या फुलझाडांच्या कुंड्यांमधे पाय ठेवायला जागा शोधत टीवी पाहण्याची मुभा मला होती. अशा प्रकारे मी खिडकितून टीवी पाहत असताना पहिल्यांदा मला टीवीतही खिडकीतून पाहणारी ती पोरगी नजरेस पडली. तिच्या घरातल्या त्या पापुद्रे आलेल्या भिंती, काही जागी टवके पडलेले, त्या भिंतींचा उडालेला रंग, घरात इतकंही काही नीटनीटकं न ठेवलेलं सामान, घरातले अंधारलेले कोपरे, आजारलेलं एक माणूस आणि अगदी साधे कपडे घालून मेकप न करता बसलेली एक साधी पोरगी - हे सिनेदृश्य असलं तरी भपकेबाज असं काहीच नव्हतं त्यात. उलट एक खूप जवळीक वाटलेली. आजही वाटते. घरी येणारांसमोर घर एका विशिष्ट प्रेझेंटेबल अवस्थेत असावं असा हव्यास बरीच मंडळी धरतात नि भेटीगाठीच टाळतात हे निदर्शनाला आल्यापासून या पोरीच्या घराबद्दलची आपुलकी थोडी वाढलीच आहे.

बीती ना बिताई रैना, बिरहा की जाई रैना
भीगी हुयी अँखियोंने लाख बुझाई रैना

त्यावेळेस मला रैना म्हणजे काय ते माहित नव्हतं, आता मला रैना शब्दाचा मी तेव्हा काय अर्थ काढायचो ते आठवत नाही. पण काहीतरी संपत नाहीय असं ती म्हणतेय हे कळे नि नक्कीच ते सुसह्य नव्हतं हे तिच्या नि तिच्या पित्याच्या भावसंवादातून उमजे. रैना म्हणजे काहीतरी विझवायची ज्वालाग्राही गोष्ट असावी. आणि ती ज्वाला विझली कि शांत झोप येत असावी. मात्र कितीही रडून झालं तरी ती ज्वाला काही विझत नाहीय इतका त्या मुलीला आपल्या आईचा विरह होतोय. आता चाळीशीत आल्यावर मला कदाचित लोकांना आई नसण्याची सवय झालीय. म्हणजे क्रिकेटमधे आपण टॉस जिंकतो वा हारतो, नाणं पाहायचं, अल्पसं हळहळायचं नि पुढे कामाला लागायचं. तशी कोणाला आई असते वा नसते, ऐकायचं, 'ओह सॉरी' म्हणायचं आणि पुढे कामाला लागायचं. तसं तेव्हा नव्हतं. एखाद्याला आई नसणं म्हणजे नक्की काय काय नसणं हे तेव्हा कळत असे नि व्यक्तिच्या दु:खाची संपूर्ण अनुभूती येत असे. प्रेमगीतं आवडायचं वय ते (तुम्हाला हे थोडं लवकर झालं असं वाटेल, पण असो तो विषय), पण त्या मुलीनं आपल्या देवाघरी गेलेल्या आईला गायलेली ही बॉलिवूडी रॅरिटी मला फार भावून गेली. आई नसणं म्हणजे फक्त मातृदत्त सुखं नसणं ही माझी अनुभूतीची मर्यादा हे गाणं त्या कोवळ्या वयात विस्तारित करून गेलं. भविष्यात मिळणारी सुखं गेली ते गेलीच मात्र भूतकाळात मिळालेली सुखं देखिल पिच्छा सोडत नाहीत. ती वारंवार त्यांचा नॉन-रेप्लिनेशेबलपणा कसा अद्वितीय आहे हे सांगून पिडतात. ते तर सोडाच, भूतकाळात ज्या सुखांना सुख हे लेबल लावलेलंच नव्हतं ती सुखं वर्तमानात देखील त्यांचे चेतासंदेश किती प्रबल आहेत हे वेळोवेळा सिद्ध करतात.

बीती हुयी बतियाँ कोई दोहराये
भूले हुए नामों से कोई तो बुलाये
चाँद की बिंदी वाली, बिंदीवाली रतिया
जागी हुयी अखियों में रात ना आयी रैना

इंजिनिअरिंगच्या परीक्षा संपल्यात. पुण्यावरनं लातूरला जाणारा मी एकटाच आहे. एक महिन्याची सुट्टी आहे. लालडब्ब्याची बस इंदापूरपुढे कुठेतरी एका ढाब्यावर थांबते. सलग तासंतास बसून कंबरडे ताणलेले सगळे प्रवासी तिथे उतरतात. ढाब्यावरही आणि बसमधेही फार काही लोक नाहीत. हायवेवरून ४-५ मिनिटांनी एखादी गाडी जातेय. ढाब्यापुढे बाजा मांडलेल्या आहेत. दणकून भूक लागलेली आहे. बाजूला एखादं कुटुंब एकमेकांना आग्रह करण्यात, खाऊ घालण्यात मग्न झालं आहे. सगळीकडे अंधारलेलं आहे. ढाब्याच्या प्रत्येक खाटेला एक कंदिल दिला आहे. फक्त काउंटरवर विजेचा दिवा असावा. कमीत कमी बिलामधे जास्तीत प्रमाणात नक्की काय येतं इतका मेनू परिचय नसल्यामुळं नि वेटरला तसं थेट विचारणं हिमतीबाहेरचं असल्यामुळं माझं देखील काहीतरी ऑर्डर करून झालंय. शिवाय किती मिनिटात जेवण उरकायचं आहे त्याची धास्ती कंडक्टरने लावून दिली आहेच. तितक्यात ढाब्याच्या खांबावर लटकावलेला रेडिओ त्या न सरणार्‍या रैनेचं गीत गाऊ लागतो नि माझं या गीताचं दुसरं श्रवण चालू होतं. यावेळेस मात्र मी पहिल्यापेक्षा फार स्मार्ट माणूस झालो आहे. कॉलेजमधल्या हिंदी मुलांमुळे माझी हिंदी पक्की झाली आहे. तिला आता कोणी हसत नाही. काश्मिरच्या रैना आडनावाच्या मुलानंच मला रैना म्हणजे रात्र असा अर्थ सांगीतलेला आहे. गाण्याच्या प्रारंभीच्या तंतूवाद्याच्या आघातांची ताकद अफाट आहे. त्या एकेका आघातामधे काहीतरी गूढ, गुह्य, गुप्त आहे. त्या एकेका पडघमामधे हृदयाचा एकेक कप्पा खोलत आतवर खोल शिरायचं सामर्थ्य आहे. त्या ढाब्यावरच मला माझं हृदय अंतर्बाह्य दाखवलं जातंय. वास्तविक माझ्या आयुष्यात कोणीही माझ्यापासून तसं दूर गेलेलं नाही. टच्चूड, पण माझी स्वतःची आई तर अगदी धडधाकट आहे. पण तरीही गाणं ऐकताना काहीतरी कालवाकालव होतेय. हे जितकं मातृविरहगीत आहे तितकंच ते भावविरहगीतही आहे हे मला जाणवतं. मी मला नक्की काय सोडून गेलं म्हणून सैरभैर होऊन शोध घेऊ लागतो. सात्विक, समाधानी लोकांच्या हरितप्रदेशातून मी कोरड्या, असंतुष्ट लोकांच्या मरुभूमीत येऊन पडलोय का? लहानपणीची गावं आपण नक्की कशासाठी सोडली? आपण जिथे आहोत तिथलं सगळं आपल्याला आवडतं का? आजूबाजूचं सगळं आवडायला हवं असा विचारच विपरित आहे असं मानणार्‍या लोकांत कदाचित आपण केवळ स्वतःसच स्वतःचं कुढणं माहित असलेले 'सामान्य' व्यक्ति तर नाहीत? आपण वयाने मोठे झालो आहोत म्हणून असं होतंय कि आपण स्थलांतरित झालो आहोत म्हणून असं होतंय? जास्त जाण आली कि जगाचा वाईटपणा जास्त प्रकर्षानं जाणवायला लागतो. तसं झालंय का आपलं? मूळात सगळं चांगलंच आहे, वा सगळं चांगलंच होईल, वा सगळं चागलं आपण स्वतः करू शकू असा शाळकरी आशावाद आता चार सहा महिन्यांत जबाददारी अंगावर घ्यायची वेळ आली आहे तेव्हा मूर्खपणा का वाटतोय? जगासाठी आपल्याला काय काय करायचं होतं? ते सगळं करण्याला आपण मुकून एका सिमित चक्राला बांधले जाणार. अस्वस्थ करत होतं सगळं. एरवी मन विषाची सवय झालेल्या शरीरासारखं असतं, पण हे रात्रीगीत ऐकलं कि ते गाणं ते विष सगळं ढवळून काढतं आणि ते चांगलंच उफाळून येतं, भिनतं. ती रात्र खरोखरंच अवघड असते. खिडकीतून मी अंधारच्या सावल्या पाहत मी मी, लोक, जग, ईश्वर कोण कुणीकडे का चाललंय याचा विचार करत असतो, बस लातूरकडे मार्गस्थ झालेली असते. सकाळी मी फार थकून उठलेला असतो, न जाणारी रात्र खरोखरीच फार लांब असते याची पहिली सिद्धता मला मिळालेली असते.

युग आते हैं और युग जाए
छोटी छोटी यादों के पल नहीं जाए

पेट्रोल नि डिझेलचा वास मारणारी गोंगाटी शहरं मला आवडत नाहीत म्हणून मी कूलू नि मनाली दोन्ही शहरं गैरसोयीची पडावीत अशा मधल्या जागी थांबलोय. हे वातावरण दिल्लीच्या दमट, उष्ण आणि रोगट वातावरणाच्या माणसासाठी स्वर्ग आहे. बायको, मुलगा, मित्र, त्याचे कुटुंबीय यांच्यासोबत खूप भटकंती केलीय. हिमालयामधे कार चालवण्याचा आनंद घेतला आहे. संध्याकाळचं जेवण झालंय. अंती तोंडात क्षणात विरघळतील असे टपोर गुलाबजाम खाऊन झालेत. त्याचा सुवासिक पाक देखील मनसोक्त चाटून झालाय. सूर्यास्त केव्हाचा झालाय नि समोरची बर्फाच्छादित पहाडे दिसताहेत कि नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या खूप खूप खाली एखादा दिवा तिथे काहीतरी आहे याची साक्ष आहे. मी एकटाच बाहेर फिरायला आलोय. मी खूप थकलोय, पण रात्रीचं, एकांताचं, शांततेचं सौंदर्य पाहायचं अजून उरलंय. अलिकडे एकांत मिळणं बंदच झालेलं आहे. मागे एकट्यानी कधी काय केलं ते आठवतच नाही. कष्ट, कर्म, ताण आणि सुख, स्वच्छंदीपणा यांनी आठवड्याचं आणि वर्षाचं २:५ आणि ३०: (३६५-३०) असं आपापसांत विभाजन करून घेतलं आहे. त्यातला सुखकाल चालू आहे म्हणून मी जाम खुष आहे. वस्तीपासून दूर मी एका दगडावर येऊन बसतो. खाली खोल घळईत दोन उंचच्या उंच समांतर पर्वतांच्या रांगांमधून व्यास नदीचा ओघ वाहत आहे. पाण्याचे अणूरेणू हातात हात घालून एकमेकांना जुन्यापुराण्या प्रवासाच्या गोष्टी सांगताहेत. दिवसा भीडेने चेपलेल्या त्या कणांना रात्रीच्या वेळी खूप आत्मविश्वास आला आहे. बेरात्री घाटांमधे निघालेल्या एखादा द्वाड ट्रक त्यांना बोलण्यात व्यत्यय न होईल याची काळजी घेत गुमान चालला आहे. त्याचा वाहता प्रकाश नागमोडी वळणांच्या रस्त्यावर कधी दिसतोय, कधी दिसत नाहीय इतकीच काय ती त्याच्या असण्याची साक्ष. त्या प्रकाशात उजळून निघालेली झाडं त्या वाहनाला आपल्या विस्ताराची, रादर त्याच्या क्षुद्र आकाराची, अहंपूर्वक जाणिव करून देतात नि क्षणार्धात गडप होतात. हा लपंडाव पाहत मी बराच वेळ पाण्याच्या कणांचं बोलणं ऐकत असतो. त्यांना कुठं जायचं असेल? त्यांचा प्लॅन काय? त्यांना अथांग महासागरात कुठेतरी पडून राहायला जास्त आवडत असेल कि कोण्या झाडाच्या मूळातून पानाकडे शिरायला आवडत असेल? आम्हा माणसांबद्दल त्यांचं काय मत असेल?

अशावेळी सहसा मी गाणी ऐकतच नाही नि ऐकली तर भावगीतं ऐकतो. पण यावेळेस का कोण जाणे, वाटलं आपल्या यादीतल्या शेकडो गाण्यांपैकी एखादं गाणं रँडमली वाजवावं. कमाल म्हणजे पुन्हा व्हायोलिनवर बिती ना बिताई रैना चालू झालं. (https://www.kkbox.com/hk/en/album/Cx-a6FsPk5fBGu0FG4Oo0091-index.html) आवडीचं म्हणून हे गाणं कित्येकदा ऐकलं होतं, मात्र वाद्यसंगीत म्हणून क्वचित. पुन्हा ते पडघम वाजले नि अंतःकरणाची सगळी पटलं उघडली. तसा मांजर जसं दूध पितं तसं मी हे गाणं ऐकतो. ते दूध देणारी गाय कोणती, ते गरम कोणी केलं, थंड कोणी केलं, बशीत कोणी घातलं, आणून कोणी दिलं याच्याशी मला काही देणं घेणं नसतं.

काळ नावाचं असं सवतं काही असतंच का? या ब्रह्मांडाच्या बाहेर नेऊन न्याहाळून पाहू शकू असा काळ नावाचा कोणता पदार्थ आहे का? कि जे सामान्यतः इंट्यूशन होतं कि अन्य बाबींतील बदलांच्या गतींचे जे परस्परसंबंध आहेत त्यांच्यावरच काळ असण्याचा सोयीचा आरोप केला गेला आहे? आईनस्टाइननं तर काळ आणि अवकाश यांचं संयुज असतं आणि ते वाकतं, मंदावतं, थांबतं, धावतं असं सांगीतलं आहे. जगातल्या सर्वात बुद्धीमान माणसानं सांगीतलं आहे तर काळ नावाचं एक सवतं सत्य असावं खरं. काळाचा हा सापेक्षतावाद मला कधीही झेपला नाही. पण रात्र सरण्यामधला सापेक्षतावाद जो कवीनं सांगीतला आहे तो चटकन उमजतो नि भावतो. युगं सरतात पण आठवणींचे काही क्षण त्यांच्यापेक्षा दीर्घायुषी वाटतात. तशी आयुष्याची डिटेल्ड समरी करायला सांगीतली तर माझं तास दोन तासांत सांगून होईल, पण अशा काही मोजक्या आठवणी आहेत, मी मलाच सांगत राहीन आणि माझ्यातलाच एक दुसरा मी ऐकतच राहील आणि ती गोष्ट कधीच संपणार नाही. आता मी अशा क्षणांचं रवंथ करायला चालू करतो. विसरलेले क्षण, न विसरता येणारे क्षण, विसरलेले लोक, न विसरता येणारे लोक, आयुष्यात विशेष स्थान असलेल्या जागा, परतून न जायच्या जागा, विसरलेल्या सवयी, विसरलेले स्वभावपदर, न विसरता येण्यासारखे काही जणांचे शब्द, ... बरंच काही आठवत राहतं. मनात एक काहूर उठतं. हे गीत जितकं विरहगीत आहे तितकंच ते वादळगीत देखील आहे. आठवणींच्या पिटार्‍यातून कितीतरी सिनेमांच्या क्लिप्स रिमिक्स होऊन अव्याहतपणे सुसाटपणे डोळ्यासमोर पळायला लागतात. पापण्यांच्या खालच्या पेशींना मेंदू संदेश देणारच असतो तितक्यात बायकोचा फोन येतो नि वादळ शमवून मी हॉटेलकडे चालू लागतो. तिच्या पदराखाली मी ५-१० मिनिटानी निवांत झोपणार असतो. किमान हिच्या आठवणींत मला हे गाणं कधीच ऐकायला लागू नये असं इश्वराला मनोमन घोकत मी हॉटेलमधे पोचतो नि हुरहुर शांत झाल्यावर रैना नकळत सरून जाते.

झूठ से काली लागे, लागे काली रतिया
रूठी हुयी अखियों ने, लाख मनाई रैना

घरात मी एकटाच असाच टीवीचे चॅनेल चाळत असतो. परिचय, हे गाणं ज्यात आहे तो सिनेमा लागलाय. सिनेमा पाहावा का ठेवावा असा विचार मी करतोय. भावूकतेचे जास्त संदर्भ माहित झाले तर भाव कोरडे होतात असा अनुभव आहे. नेहमीप्रमाणे आल्याड पल्याड करत मी मधे मधे काही सीन पाहतोय. आपल्या मातेला नि पित्याला आपले कठोर हृदयाचे आजोबा घरातून काढून टाकतात म्हणून मनात अढी ठेऊन असलेल्या नातीस त्या कठोर आवरणाखाली दडलेल्या आजोबांच्या मृदू, प्रेमळ आत्म्याचा परिचय होतो अशी छोटीशी कथा! त्यातल्या नातीने नि तिच्या वडिलांनी त्यांच्या बिकट परिस्थितीच्या काळात मरण पावलेल्या आईच्या आठवणीत हे गाणं. पुन्हा तंतूनाद होतात नि पुन्हा हृदयाचे कप्पे उघडले जातात. एकटं गाठून माझ्या अंतःकरणाला निर्वस्त्र करण्याची या गाण्याला सवयच जडलीय. आयुष्यात फार काही शत्रूसंग्रह केलेला नाहीय परंतु ज्यांच्याबद्दल अवधारणा आहेत असे लोक नाहीतच असं नाही. आपण खरोखरच लोकांशी न्याय्यपणे वागलो आहोत का असा विचार मी करतो. एकेका प्रतिमापतिताची फ्रेम माझ्या डोळ्यासमोरून सरकतेय. अगोदर चांगले वाटलेले, नंतर वाईट वाटलेले. अगोदर वाईट भासल्याने दूर ठेवलेले, नंतर फार छान निघालेले. गळेपडू म्हणून तिटकारलेले. कोरडे म्हणून टाळलेले. इन्कंपॅटिबल म्हणून चार हात दूर ठेवलेले. जोखमीचे वाटले म्हणून अव्हेरलेले. हलकीशी घमेंड दाखवल्यामुळे आयुष्यभरासाठी मित्र बनण्याचे पोटेंशिअल नाही असे मानलेले. मी चांगले वागत असतानाही तिढा ठेऊन वागणारे. अंगावर काहीतरी जबाबदारी टाकतील असे वाटलेले असे आणि असले बरेचशे. आयुष्यात कधी एका जागी स्थिर राहिलो नाही. खूप सर्कल्स बदलली. जास्त तापमान आणि जास्त दाबाखाली जास्त तास लागणार्‍या प्रक्रिया आयुष्यात कधीच झाल्याच नाहीत. जे काही घडलं ते फटाफट घडलं. माणसांबद्दल मत बनवायला फार काही वेळ नव्हता. आपण फार ओपन आहोत, लिबरल आहोत, फ्रेंडली आहोत असा समज नक्की किती सुयोग्य आहे हे क्रॉसचेक करून पाहावं असं कधी वाटलं नाही. ज्यांच्या भिन्न भिन्न ऋण प्रतिमा आहेत असे कितीतरी चेहरे मी नजरेसमोरून घालतो. मी यश पावतो, माझं काही भलं होतं तेव्हा त्यांच्याकडे एक अवहेलनात्मक कटाक्ष टाकतो नि माझे पाठीराखे, माझ्या गुडबूक्समधली माणसं,जी या विघ्नचिंतकांच्या कितीतरी पट आहेत, ती जोरजोरात हर्षोल्लास करत असतात. हे सगळे उत्सव समारंभ माझ्या मनातल्या स्टेडियममधे होत असतात. आयुष्यात प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी हे स्टेडियम खच्चून भरलेलं असतं. माझे सवंगडी भरपूर जल्लोष करत असतात. तिथली ही दुष्ट लोकांची पराभूत टिम हिरमसून गेलेली असते. माझ्या यशाचं त्यांना दु:ख असल्याची मला पूर्ण खात्री आहे. नि माझ्या बाजूच्या लोकांसमोर, लोकांसोबत त्यांना हिणवताना होणारा आनंद सार्थक आहे असंच मी मानत असतो. असंच मानत मी आयुष्य जगत आलेला असतो, मग ती मंडळी माझ्या दैनंदीन आयुष्यात नसोत नाहीतर या जगात नसोत! अचानक ती न सरणारी रैना मला आठवण करून देते कि ही हारकी टिम तुला कोणी लागत नाही का? किमान त्यातले काही? ती नाठाळ नात बनून किती दिवस राहायचं? कधीतरी त्या आजोबाच्या आत्म्याकडे निरपक्षपणे का नाही पाहायचं? मी पुन्हा त्या विघ्नचिंतकांच्या केसेसच्या फाईल्स उघडतो. बर्‍याच ठिकाणी मला माझा अहंकार, टोकाची प्रतिक्रिया, दाबून ठेवावा लागलेला राग, माहिती नसल्यामुळं करून घेतलेले गैरसमज, पूर्वग्रहदोष, संकुचित अस्मिता, ईर्ष्या, लोभ, स्वार्थ यांची एक तटस्थ म्हणून वकीली करता येत नाही. माझीच काही वर्तनं उघडीनागडी पडलेली दिसतात. रैना मला माझं निरपेक्ष निरीक्षण करण्याची जादूई शक्ती देते. जिथे माझ्याच ऋणगुणांचा परिणाम आहे अशा सगळ्या मंडळीना मी अल्लाद उचलून स्टेडियममधे माझ्या मित्रमंडळींमधेच कुठेतरी अ‍ॅडजस्ट करतो. ईथून पुढे आपण काही साजरं करू तेव्हा ते त्यांच्या नाकावर टिच्चून वैगेरे साजरं करायचं नाही असा निर्धार मी करतो. त्या केसेस मी क्लोज करतो. तरी काही केसेस उरतातच. त्या क्लोज करणं अवघड जातंय हे मला स्पष्ट दिसतंय. ही उरलेली अल्प स्वल्प मंडळी माझ्यासोबतच नव्हे तर जनरलीच दुष्ट असल्याचं मला पक्कं माहित आहे. त्यांना चांगलं मानणं बौद्धिक काँप्रोमाइज ठरेल. तरीही ही मंडळी आनंदानं जगतात, त्यांचं माझ्याइतकंच मोठं सर्कल असतं, कधीकधी त्यांना महाजनपद लाभतं, प्रसिद्धी लाभते , नि आपल्या दुष्टपणाचा कुठला गम त्यांना असल्याचं त्यांना दिसतच नाही. कैकदा मीच त्यांच्यासाठी गौण असतो. त्यांना लाभणारी सुखशांती लाभावी कि लाभू नये याबद्दल मी काय विचार करावा? मी या केसेसचं काय करायचं म्हणून बुचकाळ्यात पडलेलो आहे. रात्र उशिरापर्यंत चढलेली आहे.मी त्यांच्याबाजून विचार करायचाय कि माझ्या यात मला खूप संभ्रम व्हायला लागलाय. ज्यांना जी सहानुभूती द्यायला हवी, न्याय्य स्थान द्यायला हवं ते मी कदाचित देत नसेन म्हणून मी अस्वस्थ होतो आहे. मला काही उत्तर काढता येत नाहीय. एक मात्र कळलं आहे कि नक्की काय करायचं आहे हे जाणण्यासाठी मला माझ्याच आत्म्याचा अधिकचा परिचय हवा आहे.

संगीतविचार

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 Mar 2017 - 7:23 pm | यशोधरा

अनवट.

या शब्दाचा अर्थ थोडा तरल, उत्कट स्वरुपात, इ इ मिळेल काय?

आनन्दा's picture

15 Mar 2017 - 12:07 am | आनन्दा

शब्दार्थ असा आहे.. http://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4...
त्याची आता काय छटा बनते सांगणे कठीण..

पण बहुधा नाजुक या छटेकडे जात असावी.

arunjoshi123's picture

15 Mar 2017 - 2:55 pm | arunjoshi123

धन्यवाद.

पैसा's picture

14 Mar 2017 - 7:26 pm | पैसा

खूप तरल, उत्कट लिहिलंय!!

पद्मावति's picture

14 Mar 2017 - 7:33 pm | पद्मावति

किती सुरेख लिहिलंय. पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणारा लेख !

पुष्करिणी's picture

14 Mar 2017 - 7:59 pm | पुष्करिणी

सुरेख लिहिलयं

पुष्करिणी, पद्मावती आणि पैसातै, धन्यवाद. तुम्हाला लेखन आवडलं, छान वाटलं.

अभ्या..'s picture

14 Mar 2017 - 8:02 pm | अभ्या..

ओहोहोहोहोहोहो.
जोशीबुवा,
काय लिहिता राव तुम्ही. जबरदस्त.

असं म्हणताना तू नक्की कसा चेहरा असणार ते इमॅजिन करता येतंय. धन्यवाद.

अभ्या..'s picture

15 Mar 2017 - 12:57 pm | अभ्या..

अहाहाहाहा,
ही खरी प्रतिभा, जोशीबुवा देवाचे देणे हे. मनातली हूरहूर, मनातली स्वगते इमॅजिन करायची अन शब्दात उतरवायची हे तुम्हास लाभलेले कसब. देवाने मला पण एक असे छोटेसे कसब दिलेय. कुणी शब्दात उतरवले तर त्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मी ते कागदावर उतरवू शकतो. सांगा ना तुम्हीच कसा असेल माझा चेहरा?
सांगा ना, त्या निमित्ताने एक सेल्फ पोर्टेट बनेल.

arunjoshi123's picture

15 Mar 2017 - 5:40 pm | arunjoshi123

अरे अभ्या, कट्ट्याला कलटी मारलीस नि वर विचारतोस मी कसा दिसतो. अवघड करून ठेवलीस ना परिस्थिती! तरीही प्रयत्न करून पाहतो. तू काळा का गोरा, उंच का बुटका, जाडा का वाळका ते काही मला माहित नाही, पण 'जितका तुला वाचला आहे' त्यावरून काही सांगता येतं का पाहतो.
स्वतःला अभिजितराव न म्हणता अभ्या म्हणतोस म्हणजे सन्मानाच्या फार माफक अपेक्षा असाव्यात तुझ्या. पुढच्यांना फार सन्मान देऊ देण्याचा स्कोपच मूळातून काढून टाकायचा. मग अपेक्षांची ददात नको. तू नेहमी घाईत पण घाईत वेळ काढू ईच्छिणारा माणूस असावास. जगाबद्दल जनरली तुझं मत बर्‍यापैकी सर्वसाधारणच असावं (म्हणजे ते न सुधारण्यासारखं वाईट आहे, इ इ ) पण त्यातले हिरवे हिरवे कोपरे पाहून त्यांत कुठेतरी दडी मारावी अशी वाटणारा. तिथे कमालीचा जिव्हाळा. किमान चांगल्या लोकांनी तरी आपल्याला चांगलं वागवावं असं अपेक्षिणारा, यातही अपेक्षाभंग होऊन खट्टू होणारा, मग पुन्हा स्वतःलाच समजावणारा. चोखाळलेला मार्ग धोकादायक, पण आपणच चालून चालून निर्धोक केलेला म्हणून एक सुख समाधान घेऊन चालणारा, तरीही डेलिवरीच्या टेंशन्समधे रोज ट्रॅप होणारा. नोकरीचा सोपा मार्ग सोडून छंद हेच प्रोफेशन केलेलं नि त्यातही नावडता "प्रोफेशनालिझ्म" आणायला लागला तेव्हा आवश्यक ती लबाडी करायला शिकलेला. नेहमी कशाच्यातरी शोधात, काहीतरी गवसेल म्हणून.
त्यात तुला मला फक्त भांडता येतं, वाद घालता येतो इतकंच काय ते माझ्याबद्दल माहित. हा माणूस थोडा कमी उथळ लिहू लागला तरी बरं होईल असं काहीसं माझ्याबद्दलचं मत. माणसाच्या चेहर्‍यावर हजारो मसल्स असतात. अशा प्रकारची माणसं जेव्हा खळाळून दाद देतात तेव्हा क्षणभर त्यांना त्या ताणून ठेवलेल्या मसल्स मोकळं करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. मी जेव्हा असं अपेक्षापेक्षा परिपक्व काही लिहिलं, तेव्हा एकदम तसं झालं.
=============
तुला चेहर्‍यावर काहीतरी व्रण आहे नि तू बाईकवर असतोस अशीही प्रतिमा आहे, पण ते गौण आहे.

अभ्या..'s picture

15 Mar 2017 - 6:17 pm | अभ्या..

जोशीबुवा,
हे जे काही आहे, बरंय, वाईटंय, छानंय असं असण्यापेक्षा खूप ओळखीचं आहे.
.
थॅन्क्स, थॅन्क्स अ लॉट.
.
गौण गोष्टीही चुकल्या नाहीत बिल्कुल. ;)

ravpil's picture

14 Mar 2017 - 8:20 pm | ravpil

Anybody has mobile number of vattel te WhatsApp group ? Please share.

हे बहुतेक वाट चुकलेत. यांची मदत करा कोणी.

आनंदयात्री's picture

14 Mar 2017 - 8:26 pm | आनंदयात्री

क्या बात है. ललित अतिशय आवडले. अन हेही जाणवले की याचे पुनर्वाचनही करायला हवे, आता गवसली त्यापेक्षा अजूनही काही गवसेल.

मंजूताई's picture

14 Mar 2017 - 8:28 pm | मंजूताई

लिहीलंय!

नि:शब्द. असे खूप क्षण आपल्या आयुष्यात येतात. आपण केलेले वर्णन एकदम मनाला भिडून आतले आठवणींचे कप्पे उघडून सगळं पसरून टाकतंय.. आता आवरायला किती वेळ लागेल देव जाणे. आजची रात्र कदाचित खूप लांब असेल.

arunjoshi123's picture

21 Mar 2017 - 1:15 pm | arunjoshi123

आता आवरायला किती वेळ लागेल देव जाणे.

नि:शब्द म्हणाला आहात परंतु जे व्यक्त करायचं ते करून झालंय.

अजो, फार सुंदर लेख. तुम्ही खूप तरल, उत्कट ललित लिहू शकता. अजून लिहा प्लिज. पुलेशु.

arunjoshi123's picture

14 Mar 2017 - 10:31 pm | arunjoshi123

धन्यवाद.

अजो, फार सुंदर लेख. तुम्ही खूप तरल, उत्कट ललित लिहू शकता. अजून लिहा प्लिज. पुलेशु.

अत्यंत सहमत..

भीमराव's picture

14 Mar 2017 - 9:25 pm | भीमराव

छान आहे,
मि सुरेश रैना समजुन ऊत्सुकतेनं वाचाय आल्तो,

संजय क्षीरसागर's picture

14 Mar 2017 - 9:31 pm | संजय क्षीरसागर

जसे विचार तसं लेखन आणि ते तसं असलं तरच भावतं . इतका तरल, बहुअंगी आणि विलंबीत लयीतसुद्धा सुस्पष्ट विचार करू शकणारा माणूस मी तरी अजून अंतरजालावर पाहिला नाही, खरं तर असणं शक्यच नाही. असे विचार तुम्ही लेखणीतून उतरवू शकता याचं कायम कौतुक वाटत आलं आहे .

तुम्ही असेच लिहीत राहा, आम्ही वाचत राहू .

खेडूत's picture

14 Mar 2017 - 9:48 pm | खेडूत

निव्वळ सुरेख..
तुम्ही लिहीत रहा..मनापासून आवडतंय!

जेपी's picture

14 Mar 2017 - 9:53 pm | जेपी

लेख आवडला

चतुरंग's picture

14 Mar 2017 - 10:11 pm | चतुरंग

रैना हे गाणं माझंही अतिशय आवडतं. तुम्ही वरती जी प्रभाकर जोगांच्या वायोलिनची लिंक दिली आहे त्याच जोगांची सीडी मी ऐकतो. मला गायलेलं आणि वाजवलेलं दोन्ही गाणी आवडतात. सर्वसवी जमून आलेलं गाणं या प्रकारातली जी गाणी असतात त्यातलं हे अव्वल ठरावं. गुलजार-आरडी-लता-भूपेंद्र-जया-संजीवकुमार यांनी काळाच्या पटलावरती जे काही निर्माण केलं ते पिच्छा पुरवत राहतं. लताची अर्धी ओळ पकडून भूपेंद्र जिथं गाणं उचलतो तिथं मी रडतोच प्रत्येक ओळीच्या पार्श्वभूमीला जो वायोलिनचा वाद्यमेळ आहे तो काळजाला घरं पाडत राहतो...

तुम्ही गाण्याची सुरी फिरवून घेतलेला तुमच्या आयुष्याचा तिरपा छेद हा खरंतर कित्येकांच्या आयुष्याचा असावा असा आहे. भावनेने ओथंबलेली रडारड न घडवता एक पराणी टोचत राहवी, खुपसलीही जाऊ नये आणि दूरही होऊ नये अशी अस्वस्थता...

तुमच्य लिखाणातली आणखीन एक भावलेली गोष्ट म्हणजे भावना व्यक्त करायला जे शब्द मनात आले ते, इंग्रजी का असेनात, तसेच ठेवून तुम्ही लिहिले आहेत. त्यामुळे त्यातला मनस्वीपणा पोचतो.

(माझ्याही इंजिनिअरिंग कॉलेजात रैना नावाचा काश्मिरी मुलगा होता या योगायोगाचं हसू आलं. काही सुंदर काश्मिरी मुलीही होत्या पण माझ्यासारख्याला त्या तशाही अप्राप्यच असं नक्की करुन त्यांना मी बहिणींचा दर्जा देऊन टाकलेला! ;) )

-चतुरंग रैना

मला काहीतरी वेगळेच टोचत राहते. आमची जनरेशन ही रेडिओ कडून मोबाइलकडे गेलेली जनरेशन आहे.. अर्थात शाळकरी वयात टीव्ही ही चैन असलेली, पण कॉलेजमधून बाहेर पडेपर्यंत मोबाईल हातात आलेली.
या सगळ्यात आम्ही नेमके काय गमावले याची एव्हढी प्रकर्षाने जाणीव आजपर्यंत झाली नव्हती. म्हणजे जाणीव तर नेहमीच असते, पण ते शब्दरूप होऊन असे समोर आल्यावर ती बोच आणखीन वाढत जाते..

तुम्ही गाण्याची सुरी फिरवून घेतलेला तुमच्या आयुष्याचा तिरपा छेद हा खरंतर कित्येकांच्या आयुष्याचा असावा असा आहे. भावनेने ओथंबलेली रडारड न घडवता एक पराणी टोचत राहवी, खुपसलीही जाऊ नये आणि दूरही होऊ नये अशी अस्वस्थता...

अशी समान रुचींची लोकं भेटली कि छान वाटतं. किंबहुना सारखी गाणी आवडणार्‍या व्यक्तिंच्या व्यक्तिछटा सारख्याच असाव्यात. शिवाय या गाण्यात ऐकणाराला रडवायची ताकद आहे खरी. केवळ मी रडत नाही वा भावूक व्हायचं मला जमत नाही म्हणणं वेगळं, त्या भावूकतेचा आवेग आवरता येत नाही म्हणून ऐकणं टाळणं वगेळं, मनसोक्त रडणं वेगळं, पण या सर्वांपेक्षा श्रेष्ठ म्हणजे हे गाणं जी अस्वस्थता माजवतं ती झेपत, झेलत, सहन करत त्याचा सहवास पुढे चालू ठेवणं. या अस्वस्थतेच्या कारणांचे कर्तेधर्ते आपण स्वतः असू वा बाजूचा काळ असो, ती अस्वस्थता हवीहवीशी नाही वाटली तरी दूर लोटावी वाटत नाही.

कंजूस's picture

15 Mar 2017 - 8:30 am | कंजूस

भारी लेखनकाव्य.
तुम्ही नदी आहात. नर्मदा.

नर्मदा नदीचं वैशिष्ट्य कायय हो?

सुमीत भातखंडे's picture

15 Mar 2017 - 11:03 am | सुमीत भातखंडे

खूपच छान.
लेख वाचल्यावर पुन्हा-पुन्हा ऐकलं हे गाणं. संपूच नये असं वाटणार्या गाण्यांपैकी एक.

सानझरी's picture

15 Mar 2017 - 11:51 am | सानझरी

इतक्या छान लेखाला दाद काय द्यावी हा प्रश्न पडलाय..
खूप सुरेख लेखन!!!

नीलमोहर's picture

15 Mar 2017 - 12:26 pm | नीलमोहर

इतके तरल, भावस्पर्शी लिहिणाऱ्यांचा खूप हेवा वाटतो.
आत्ता एवढ्यातच, ऐकतांना उगीच हूरहूर वाटत राहते म्हणून हे गाणं मोबाईल मधून काढून टाकलं होतं, आता परत घ्यावं लागेल.

अजूनही अशी अनेक सुंदर गाणी आहेत, त्यावरही लिहाल.
बरेच काही समजून घेण्यासाठी हे लिखाणही अनेकदा वाचावं लागेल हे मात्र नक्की.
धन्यवाद :)

अजया's picture

15 Mar 2017 - 12:35 pm | अजया

अतिशय तरल लिहिलेलं सुगम ललित खूप दिवसांनी वाचलं. फार आवडलं.

लॉरी टांगटूंगकर's picture

15 Mar 2017 - 1:30 pm | लॉरी टांगटूंगकर

सुंदर लिहीता आहात अजो. खरंच काय दाद काय द्यावी कळेना आहे.

निशाचर's picture

15 Mar 2017 - 5:44 pm | निशाचर

वाचून हुरहूर लागल्येय.

अजो, आता इंदापूरला खास या.. माझं घर तिथून दहा किमीवर (निमगाव केतकी) आहे फक्त.

अवश्य. तुमचं बागायती शेत असेल तर अजूनच अवश्य.

बागायती नाही पण शेत आहे. या तुम्ही नक्की.

उजनीचं पाणी इंदापूरला पोचत नाही कि तुम्ही अ‍ॅक्टिवली शेती करत नाही?

अहो, आम्ही उजनीच्या वरच्या अंगाला राहतो. उजनीचा उपयोग नाही. बारामती-पुणे रोडवर माझे गाव आहे. बारामतीवरून येणार्‍या निरा डावा कालव्यातून पाणी मिळते परंतू बारमाही नाही. माझ्या गावासारखी आणखी २१ गावे फक्त ह्या बारमाही पाण्यापासून वंचीत आहेत. त्यामुळे बागायत वगैरे काही नाही. अर्थात, आहे विचार डाळिंबाची लागवड करण्याचा पण सध्या जरा वेगळ्या प्रायोरिटीज आहेत. एक दोन वर्षाने शेतीत मोठी इन्व्हेस्टमेंट करायचा विचार आहे.
आणि अरे तुरे करा हो, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा.

arunjoshi123's picture

15 Mar 2017 - 11:03 pm | arunjoshi123

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचताना खूप छान वाटतंय. माझ्या लेखनाला अशी दाद मिळेल अशी बापजन्मी अपेक्षा नव्हती. तसा मी एकास एक लांबच लांब प्रतिक्रिया देणार्‍या बाण्याचा माणूस आहे, पण आता किंचित बिझि चाललोय, फुरसत मिळेल तसा उत्तर देईन.

ट्रेड मार्क's picture

16 Mar 2017 - 3:10 am | ट्रेड मार्क

असे अर्थगर्भ शब्द असलेलं एखादं काव्य आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ऐकताना वेगळे परिमाण प्राप्त होते. तुम्ही त्या कडव्यांची तुमच्या आयुष्याच्या टप्प्यांबरोबर जी गुंफण केलीये ती खरंच मस्त आहे. हे गाणंच असं जमून आलेलं आहे की ऐकताना डोळ्यात पाणी येतंच. काव्य, संगीत, गायन आणि दृष्य सगळ्यात सरस असलेली कलाकृती!

असेच लिहीत रहा.

प्राची अश्विनी's picture

16 Mar 2017 - 4:17 pm | प्राची अश्विनी

क्या बात! अप्रतिम!

अप्पा जोगळेकर's picture

16 Mar 2017 - 5:24 pm | अप्पा जोगळेकर

मी रैना गाण ऐकल नाही. किंबहुना गाणी फारशी ऐकतच नाही.
पण अशाच एखाद्या न संपणार्‍या रात्रीच्या वेळेस हा लेख आणि त्यातली काही वाक्य नक्कीच आठवत राहतील.

जागु's picture

17 Mar 2017 - 11:42 am | जागु

छान लिहील आहे.

सर्व वाचकांचे धन्यवाद.

हतोळकरांचा प्रसाद's picture

18 Mar 2017 - 11:31 pm | हतोळकरांचा प्रसाद

निशब्द!!! अतिशय सुंदर विचार नितांत सुंदर शब्दांच्या आणि वाक्यांच्या झालरी पांघरून मनावर अशी काही जादू करून गेल्या कि बास!! या लिखाणाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे!

अरुण जोशी : मनःपूर्वक धन्यवाद!

मितान's picture

18 Mar 2017 - 11:42 pm | मितान

किती आतून आतून पालवी फुटल्यासारखं आहे हे लेखन ! अशा लेखनात आनंदाची शाश्वती असते ! अजून लिहा !!!

वरुण मोहिते's picture

19 Mar 2017 - 12:17 am | वरुण मोहिते

बुझाई रैना ........जागी हुवी अखियोंमे रात ना आयी रैना ......
बस सर विषय कट.
एक नंबर

गॅरी ट्रुमन's picture

19 Mar 2017 - 11:15 am | गॅरी ट्रुमन

लेख आवडला.

मला स्वतःला ललित लेखनातले फारसे समजत नाही त्यामुळे लेखातील नक्की काय आवडले हे सांगता येणार नाही. पण लेखातले 'काहीतरी' आवडले हे नक्कीच.

सहमति का समाधान मिला और सहमति का समाधान मिला। धन्यवाद.

सतिश गावडे's picture

19 Mar 2017 - 2:21 pm | सतिश गावडे

अतिशय तरल आणि गाण्याईतकंच भावस्पर्शी लेखन.

अनरँडम's picture

21 Mar 2017 - 9:54 pm | अनरँडम

सुंदर लिहीले आहे. आणखी येऊ द्या.

परीक्षण सुद्धा ताकदीचे झाले आहे. जर तुम्हाला हे गाणे दो नैनो मै आसू भरे है आवडत असेल तर अजुन एक अप्रतिम परीक्षण लिहा अशी नम्र विनंती.

arunjoshi123's picture

24 Mar 2017 - 1:24 pm | arunjoshi123

धन्यवाद. परीक्षण कि आत्मपरीक्षण?

परीक्षण सुद्धा ताकदीचे झाले आहे. जर तुम्हाला हे गाणे दो नैनो मै आसू भरे है आवडत असेल तर अजुन एक अप्रतिम परीक्षण लिहा अशी नम्र विनंती.

सहमत.

सिरुसेरि's picture

23 Mar 2017 - 7:54 pm | सिरुसेरि

छान आठवणी . "बिते ना बिताई रैना " , "रैना बिती जाये .. शाम ना आये" हि सुरेख गाणी आहेत .

वरुण मोहिते's picture

24 Mar 2017 - 1:40 pm | वरुण मोहिते

रैना बिती जाये ह्यावर , आनंद बाबू

अॅट लेजर वाचायचा म्हणून हा लेख बाजुला ठेवला होता. शेवटी आज मुहुर्त लागला.

अजो इन फिलॉसॉफिकल मुड?? हम्म...

पण खरं सांगायचं तर बालपणीचे आणि तारुण्यातले म्युजिंग मलातरी भिडले नाही. कोरिलेटच करता आलं नाही काही.
अजो यावेळी डिसअपॉइंट करणार की काय अशी भिती वाटू लागली.
पण पुढचे दोन्ही अनुभव+विचार इतके छान लिहलेत की आहाहा! खासकरुन ते रात्री एकांतात, निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण. कधीतरी हे असं मलादेखील करायचंय. स्त्रि असल्याने ते जमेल की नाही शंकाच आहे. अशा काही बाबतीत पुरुषांबद्दल खरोखरच जेलसी वाटते.

एनीवे... तर अजो, लेख खासच जमलाय! अगदी लिरीकल वगैरे झालाय. लिहीत रहा.

सहज कुतुहल म्हणून एक प्रश्न: हा लेख तुम्ही उस्फुर्तपणे लिहलाय की प्रयत्नपुर्वक (मुद्दे मांडून, खोडून, दुसरा तिसरा ड्राफ्ट बनवत)? मला उस्फुर्त अजो जास्त आवडतात. गोष्टी/घटना सांगता येणे हे रेअर, अवघड स्किल आहे. ते नैसर्गिकरीत्या तुमच्यात आहे. शक्यतो त्याला हरवू देऊ नका.

प्रयत्नपूर्वक नाय हो. पण आपले गमभन दोष, स्पेलिंग चूका तरी करता रिवू केला आहे.
=======================================
मला लिहिताना खूपदा खूप थांबावं लागतं. उपविषय खूप वाढत जातो. तो सुंदरच असतो, पण माझ्यासाठी. वाचक कंफ्यूज होईल.
=======
धन्यवाद.

पण खरं सांगायचं तर बालपणीचे आणि तारुण्यातले म्युजिंग मलातरी भिडले नाही.

अजून खूप तरुण असणार तू. म्यूजिंग करायच्या वयाची हो नि वाच.

हम्म. तुमचे जुने ललित लेखन आणि हे यात फरक जाणवला म्हणून विचारलं. कदाचीत ते फक्त ललित होतं; इथे गाण्याचा आस्वाद+ललित+फिलॉसॉफिकल स्वसंवाद एकत्र आलंय; त्यातपरत माझा पिंड फक्त कल्पित/कथा/ललित वाचण्याचा... या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून तसे वाटले असेल.

ही ही ही तरुणतर मी आहेच! पण ते तारुण्य 'पिटर पैनसारखे आय रिफ्युज टू ग्रो अप' आहे की 'डोरीयन ग्रेसारखं आत्माच्या बदल्यात मिळालेलं' आहे ;-)

बिति ना बिताई रैना हे कोवळ्या तरुणपणी आवडायचं प्रकरण नाही. पण जर चुकून तसं झालं, तर म्हातारपणाचं दिवाळं वाजलं समजा.

सुखीमाणूस's picture

1 Apr 2017 - 5:24 pm | सुखीमाणूस

रैना मला माझं निरपेक्ष निरीक्षण करण्याची जादूई शक्ती देते. जिथे माझ्याच ऋणगुणांचा परिणाम आहे अशा सगळ्या मंडळीना मी अल्लाद उचलून स्टेडियममधे माझ्या मित्रमंडळींमधेच कुठेतरी अ‍ॅडजस्ट करतो

हे फार भारी लिहिलय. एवढा विचार करुन त्रास नाही का होत...

एक मात्र कळलं आहे कि नक्की काय करायचं आहे हे जाणण्यासाठी मला माझ्याच आत्म्याचा अधिकचा परिचय हवा आहे.

फार पटल हे विधान.
आणि कुणासाठी तरी आपण ही दुष्ट असतोच ना....

अनरँडम's picture

14 Jun 2020 - 9:47 pm | अनरँडम

मजा यायची त्यांचे प्रतिसाद वाचतांना. असे अधुन्मधून ललित मस्त लिहीत. त्यांच्या मताशी मी क्वचितच सहमत असे. (त्यांना मी 'वर्‍हाडी नेमाडे' असे नाव ठेवले होते, असो.)

वीणा३'s picture

16 Jun 2020 - 12:02 am | वीणा३

अप्रतिम.

रातराणी's picture

17 Jun 2020 - 11:33 am | रातराणी

किती सुरेख लिहलंय!!!