संन्याशी आणि उंदीर!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
17 Nov 2016 - 10:04 pm

संन्याशी आणि उंदीर!
हि गोष्ट लहानपणी वाचली होती.
एका गावाबाहेर एक मोठ पण जीर्ण असं गणेशाचं देवालय असते. तिथे एक संन्यासी राहत असतो. असतो तसा त्याच गावाचा पण सन्यास घेतल्यामुळे गावाबाहेर ह्या मंदिरात राहत असतो. गावात भिक्षा मागून आपली उपजीविका चालवायची आणि ध्यान धारणेत काल व्यतीत करायचा हा त्याचा दिनक्रम. त्याच मंदिरात एक उंदीरही राहत असतो. तो उंदीर सुद्धा एकटाच राहत असतो. पण तो ह्या सन्याशाने आणलेल्या भिक्षेतील धन्य कधी मधी मंदिरात वाहिलेले धन वगैरे गोळा करत असतो. आता एव्हढासा उंदीर त्याची गरज ती किती असणार! पण स्वभावाप्रमाणे भरपूर संचय करीत राहिल्याने त्याच्या बिळात भरपूर धान्य, धन, संपत्ती गोळा झालेली असते तसेच आयतेच सर्व जवळ मिळत असल्याने तो भरपूर गब्बर/गलेलठ्ठ आणि चांगलाच माजलेला असा झालेला असतो. जोपर्यंत तो संन्याशाला काही त्रास देत नसतो तो पर्यंत संन्याशाला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही नसते पण माजल्यामुळे तो हळू हळू संन्याशाच्या ध्यान धारणेत व्यत्यय आणणे त्याच्या शिजवलेल्या अन्नात तोंड घालून ते अशुद्ध करणे असे प्रकार सुरु करतो. आता संन्याशी तो गणेशाचे वाहन म्हणून आणि हिंसा करायची नाही म्हणून त्याला मारत नाही पण त्याने अजूनच माजून तो संन्याशाला फारच जास्त त्रास देऊ लागतो. आपण फार बलवान असून आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही असे वाटून तो आता दिवसा ढवळ्या संन्याशाच्या समोर त्याच्या अन्नावर ताव मारणे, मूर्तीवर चढून पूजा खराब करणे, रात्रदिवस खुडबुड करून संन्याशाची मना:शांती भंग करणे असे उद्योग चालू करतो. त्याला अन्न मिळू नये म्हणून संन्याशी त्याची भिक्षा उंच अशा शिन्काळ्यात ठेवू लागतो.पण तो उंदीर इतका मस्तवाल झालेला असतो कि जमिनीवरून थेट शिन्काळ्या पर्यंत उडी मारून त्यातील धन्य पळवायला लागतो. आता संन्याशी त्याला हाकलायला रात्रंदिवस काठी घेऊन बसू लागतो. त्याची ध्यान धारणा, तपश्चर्या तर सगळी संपतेच, पण रात्रीची झोप मिळणे हि मुश्कील होते.

एक दिवस त्याचा गावातील लहानपणीचा मित्र त्याला भेटायला, चौकशी करायला येतो. हा मित्र मोठा चतुर, व्यवहारी असतो. तो येऊन बघतो तर त्याचा बालमित्र संन्यासी अगदी चिडचिडा झालेला, अनेक रात्री झोप न मिळाल्या मुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळ तयार झालेली.असा दिसतो . तो चकित होऊन त्याची चौकशी करतो तेव्हा संन्याशी त्याला सगळी हकीकत सांगतो शिवाय आपण त्याला मारू शकत नसल्याने आपली चांगलीच गोची झाल्याची बात त्याला सांगतो. मित्र मोठा चाणाक्ष असतो. तो संन्याशाला सांगतो कि मी त्या उंदराचा तुला होणारा त्रास संपवतो अगदी त्या उंदराला न मारता, त्याची हिंसा न करता. पण मी उपाय केला कि पुढचे काही दिवस तो उंदीर तुला खूप त्रास देईल, तेव्हढ सहन करायचं, पण भिक्षा ह्या मंदिरात आणायची नाही, गावातच एखाद्या मंदिरात ती खाऊन संपवायची किंवा हवे तर माझ्याकडे पुढचे १०-१५ दिवस जेवायला ये पण अन्नाचा किवा धनाचा एक हि कण इथे, मंदिरात आणायचा नाही. आता संन्याशी आधीच इतका वैतागलेला असतो कि ह्या साध्या उपायाला लगेच तयार होतो. मग तो मित्र आणि संन्याशी दोघे मिळून त्या उंदराचे बीळ शोधून काढतात आणि ते पूर्ण खणतात त्यात त्यांना प्रचंड प्रमाणात साठवलेले अन्न धान्य अन धन सापडते. मित्र ते सगळे धन घेऊन जातो व उरलेले धन्य वगैरे जाळून नष्ट करतो शिवाय उंदराचे ते प्रचंड मोठे बीळ खणून काढून नष्ट करून टाकतो.

आता सर्वस्व नष्ट झालेला उंदीर चांगलाच बिथरतो. तो अक्ख्या मंदिर भर धुमाकूळ घालतो. अगदी संन्याशावरही हल्ला करायचा प्रयत्न करतो पण संन्याशी शांतच असतो शिवाय त्याने भिक्षा आणणे बंद केल्याने उंदराला आता उपास घडू लागतात व काही दिवसातच तो क्षीण होऊन जातो.आपल्याला आता इथे आता काही मिळत नाही असे पाहून तो शेवटी तेथून पोबारा करतो. संन्याशाची मन:शांती परत येते.
काही दिवसांनी परत तो बालमित्र आपल्या संन्यासी मित्राची चौकशी करायला येतो तेव्हा आपला संन्याशी मित्र त्याला अगदी आनंदात दिसतो. संन्यासी त्याला विचारतो कि त्या उंदराकडे एवाढी संपत्ती असेल हे तुला कसे कळले? तो मित्र सांगतो जेव्हा तू सांगितलेस कि एक साधासा उंदीर एव्हढा बलवान झालाय कि तुझ्या डोळ्यादेखत थेट उंचावरच्या शिन्काळ्यापर्यंत उडी मारू शकतो, शक्ती सोड पण एवढे धारिष्ट्य एका साध्या फडतूस उंदराकडे येते ह्याचाच अर्थ त्याच्या कडे गैर मार्गाने जमाकेलेली संपत्ती भरपूर असणार. कष्ट करून, कर भरून सन्मार्गाने कमावलेली संपत्ती असा माज कधीही निर्माण करणार नाही. तसेच त्याच्या ह्या काळ्या संपत्तीवर आपण घाव घातला अन ती नष्ट केली तर तो अकांड तांडव हि खूप करेल पण प्राण पणाने ती वाचवायला लढणार नाही. म्हणून मी त्याची संपत्ती नष्ट केली आणि परत ती मिळवायचे मार्ग बंद केले. त्यामुळे ऐदी झालेला तो उंदीर गलितगात्र होऊन गेला.शेवटी आपली काहीच मात्रा चालत नाही असे पाहून त्याने गाशा गुंडाळला.

सध्या मोदी सरकार ने काळ्या पैशाविरोधात जी नोटा बंदी ची मोहीम चालवलेली आहे त्यावरून अनेक नेते, तथाकथित पुरोगामी विचारवंत, जनतेच्या दु:खाचा कैवार घेऊन जो उर बडवत आहेत, घसा कोकलून बोंबलत आहेत ते पाहून का कोण जाणे हि गोष्ट आठवली. आता ह्या उंदरांची बीळहि नष्ट झाली असणार, त्यामुळे काही दिवस ते अकांड तांडव करणारच. वाट पहा, मजा बघा.

थोडे गंभीर होत म्हणायचे तर -
महाभारतातले यक्ष प्रश्न फार प्रसिद्ध. त्यात एक प्रश्न यक्ष असा विचारतो कि ह्या जगातले सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते? ह्यावर धर्माचे(युधिष्ठीर) उत्तर असे, “ ह्या जगात जो माणूस जन्माला तो कधी न कधी मृत्यू पावला आहे हे उघड सत्य आहे. कुणी चुकून मरायचा राहून गेला आहे असे काही कुठे झालेले नाही पण तरीही माणसे जगताना अशी वागतात कि जणू काही आपण कधी मरणारच नाही आहोत.हे फार मोठे आश्चर्य आहे.” संपूर्ण महाभारत लिहून झाल्यावर महर्षी व्यासांनी विषाद व्यक्त करताना म्हटलंय
उर्ध्व बाहू: विरोम्येष, न कश्चित शृणोति माम.
धर्मात अर्थस्य कामश्च, स्वधार्मान की न सेव्यते.
हे दोन्ही बाहू वर करून मी जगाला ओरडून ओरडून सांगतो आहे कि बाबांनो चांगल्या मार्गाने पैसा कमवा. आणि खुशाल त्याचा उपभोग घ्या. (लांड्या लबाड्या,चोऱ्या माऱ्या, खून दरोडे ह्या मार्गाने धनसंचय करू नका) पण कोणी ऐकत नाही. ‌
---आदित्य

कथाविचार

प्रतिक्रिया

विद्यार्थी's picture

17 Nov 2016 - 10:19 pm | विद्यार्थी

मस्त, एकदम आवडली गोष्ट.

जव्हेरगंज's picture

17 Nov 2016 - 11:02 pm | जव्हेरगंज

मस्त!

सिरुसेरि's picture

18 Nov 2016 - 11:48 am | सिरुसेरि

आधुनिक बोधकथा मस्त आहे .

अनुप ढेरे's picture

18 Nov 2016 - 12:03 pm | अनुप ढेरे

छान.

मराठी_माणूस's picture

18 Nov 2016 - 12:44 pm | मराठी_माणूस

पण प्राण पणाने ती वाचवायला लढणार नाही.

का ?

पाटीलभाऊ's picture

18 Nov 2016 - 2:17 pm | पाटीलभाऊ

गोष्ट आवडली

बाजीप्रभू's picture

18 Nov 2016 - 2:53 pm | बाजीप्रभू

आवडली

टुकुल's picture

18 Nov 2016 - 2:59 pm | टुकुल

छान

मराठी कथालेखक's picture

18 Nov 2016 - 3:49 pm | मराठी कथालेखक

गोष्ट जमली नाही.

हि गोष्ट लहानपणी वाचली होती.

??