'संघ' टन - एक प्रवास

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
27 Oct 2016 - 2:04 pm

मनुष्य संघटना का स्थापन करतो याचे कारण साधे आहे. त्याला त्याच्या किंवा आपल्या समाजाच्या कमकुवतपणाची जाणीव होते म्हणून. चार लोक जोडल्यानंतर एक शक्ती निर्माण होइल अशी त्याची अपेक्षा असते. हे संघटन समाज लगेच स्वीकारेल अशी स्थिती नसते. त्याला स्वतःसाठी लोकांच्या हृदयात जागा निर्माण करावी लागते. प्रसंगी इतरांना "थोडे सरकून घ्या" असे सांगावे लागते. तरच जागा निर्माण होते.

सुरुवातीच्या काळातली आव्हाने वेगळी आणि नंतरच्या काळातली आव्हाने वेगळी असतात. सुरुवातीला संघर्ष इतरांबरोबर असतो. प्रतिकूलतेबरोबर असतो. निधी आणि साधनांचा अभाव असतो. आपली भूमिका आणि ध्येयधोरणे समाजाला पटवण्यातच बरीचशी शक्ती खर्च होते. नेटाने प्रयत्न केला तर यावर मात करता येते.

खरी परीक्षा संघटनेला समाजात स्थान प्राप्त झाल्यानंतर सुरु होते. समाजाच्या अपेक्षा पुर्‍या करणे हे आव्हान असते. समाजाच्या अपेक्षा पुर्‍या झाल्या तरी समाज कौतुक करत नाही. पण कुठे कमी पडलो तर मात्र तक्रारी, नापसंती व्यक्त केल्याशिवाय राहत नाही. संघटनेचे मुख्य उद्दिष्ट ठरलेले असले तरी ते प्राप्त करून घेईपर्यंत काही उप उद्दिष्टे पूर्ण करावी लागतात. पैशाची कायमची तरतूद हे त्यातले एक उप उद्दिष्ट. त्यासाठी धनिक गाठावे लागतात. त्यांना कामाचे महत्त्व पटले तर ठीकच. नाही पटले तरी त्यांना केवळ पैशासाठी खूष राखावे लागते. वेळप्रसंगी एखाद्या कार्यक्रमात त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा लागतो. अर्थात तोही त्यांच्याच पैशाने. पण या कर्मकांडांना इलाज नसतो.

अर्थात धनिकांची नाटके वाढू लागली तर मात्र वेगळे मार्ग शोधावे लागतात. कार्यकर्त्यांनाच स्वतःच्या खिशातून पैसे उभारावे लागतात. याचा मोठा फायदा असतो. कार्यकर्त्यांच्या मनात आपण कुणाच्याही पैशाचे मिंधे नाही आहोत ही सुखाची भावना असते. पण समाजात संघटनेची स्वीकारार्हता वाढू लागल्यानंतर व्याप वाढायला लागतो. मग पैशासाठी केवळ कार्यकर्ता पुरा पडत नाही. पुन्हा धनिकांचेच पाय धरावे लागतात. कधी या धनिकांना पदाधिकारी म्हणून संघटनेत सामावून घेणे इष्ट असते. कधी त्यांना संघटनेबाहेरच ठेवणे योग्य असते. प्रत्यक्ष काम करणार्‍या कार्यकर्त्यापेक्षा पैसा पुरवणार्‍या पदाधिकार्‍याचे महत्त्व वाढायला लागले तर मात्र समतोल बिघडायला लागतो. ही धोक्याची घंटा असते. सजग संघटकाला ती ऐकूही येते.

मुख्य उद्दिष्टे प्राप्त होइपर्यंत आणखीही उप उद्दिष्टे गाठावी लागतात. त्यातली काही उप उद्दिष्टे म्हणजे संस्थाकारण. प्रत्येक गोष्ट नव्याने निर्माण करण्यात अर्थ नसतो. आधीच मौजुद असलेल्या संस्था ताब्यात घ्याव्या लागतात. मग ती वाचनालये असतील, प्रकाशन संस्था असतील, शिक्षण संस्था असतील नाहीतर बँका असतील. त्या संस्थांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याचे रेडीमेड मार्ग खुले होतात. तिथे पूर्वीपासून काम करत असलेला कर्मचारी वर्ग आयता हातात येतो. वेळप्रसंगी कार्यकर्ता हाताशी नसला तरी संस्थेतला कर्मचारी हा कार्यकर्ता म्हणून राबवून घेता येतो. त्याच्या हातात आपल्याला हवे ते झेंडे, आपल्याला हवे ते घोषणांचे फलक देऊन त्याला रस्त्यावर उतरवता येते. संस्था कर्मचार्‍यांचाही इलाज नसतो. पोटासाठी त्यांना कामबाह्य कामे करावीच लागतात.
संस्था म्हणजे एक प्रकारचे गडच असतात. ते नीट ताब्यात राहीले की गडाच्या आजूबाजूच्या प्रदेशावर नीटपणे लक्ष ठेवता येते. आजूबाजूचा प्रदेश ताब्यातही ठेवता येतो. म्हणूनच अशा संस्थारुपी गडाच्या निवडणूका अटितटीने लढवल्या जातात आणि त्या गाजतात सुद्धा.

या संस्था आर्थिक दृष्ट्या भक्कम असतील तर संघटनेची पैशाचीही गरज भागवता येते.

संघटनेसाठी वेळ देणारी माणसे सर्वात महत्त्वाची. काही जण जमेल तेवढा वेळ देतात. काही जण आयुष्यातली काही वर्षे फुलटायमर म्हणून संघटनेचे काम करतात. अशा कार्यकर्त्यांचे नंतर पुनर्वसन करावे लागते. त्यांना आयुष्यात नीट उभे करणे हीदेखील संघटनेची नैतिक जबाबदारी ठरते. शिक्षण संस्था, बँका ताब्यात असतील तर अशा कार्यकर्त्यांना नोकरीला चिकटवता येते. जेणेकरून त्यांची रोजीरोटी सुरु राहते.

कधी कधी मात्र हे प्रकरण अंगाशी यायला लागते. बँकेतल्या नोकरीची ग्यारंटी द्या तरच दोन वर्षे फुल टायमर म्हणून जाइन किंवा शिक्षण संस्थेत चिकटवण्याची ग्यारंटी द्या तरच दोन वर्षे संघटनेला देइन अशी सौदेबाजी सुरु होते. दोन वर्षांचा त्याग त्या बदल्यात ३० वर्षाची नोकरी कार्यकर्ते पदरात पाडून घेतात. मुख्य उद्दिष्टांपेक्षा उप उद्दिष्टेच मग मोठी व्हायला लागतात.

संघटनेची चाके संस्थाकारणात अडकून पडतात. संघटना मूळ उद्दिष्टांपासून भरकटू लागते. ज्या समाजापर्यंत पोचण्याचे साधन म्हणून संस्था ताब्यात घेतल्या जातात. तो उद्देश बाजूला राहून संस्थांच्या माध्यमातून 'रोजगार हमी योजना' असे स्वरूप संघटनेला प्राप्त होते. ज्या कार्यकर्त्यांना अशी रोजगाराची हमी मिळत नाही असे कार्यकर्ते नाराज होवू लागतात, दूर जातात. परिणामी संघटना खच्ची होऊ लागते.

कधी कधी सुरुवातीला त्याग करणारे, फुल टायमर म्हणून काम करणारे कार्यकर्ते शिक्षण संस्थेत चिकटले की बदलतात. अ‍ॅडमिशन्सच्या वेळी गैरव्यवहार करू लागतात. अर्थात हे केवळ शिक्षण संस्थेतच होते असे नाही. संघटनेच्या ताब्यातील इतरही संस्थेत हे व्हायला सुरुवात होते. परिणामी संघटना बदनाम होते. संघटना सांभाळायची की संस्था असा प्रश्न उभा राहतो. संस्थाकरण ओझे बनून जाते. संघटनेचे मुख्य उद्दिष्ट दूरच राहते कारण संस्थेबाहेरही समाज आहे याचा विसर पडतो.

कुठल्याही संघटनेची व्याप्ती वाढल्यावर तिला राजकारण चुकत नाही. संघटनेच्या अंतर्गत आणि बाहेरचे पक्षीय राजकारणसुद्धा.

संघटना सगळ्या समाजाची आहे. आम्ही पक्षीय राजकारणापासून अलिप्त आहोत असे ढोल बडवले जातात. पण पक्षीय राजकारणाला शरण जावेच लागते. आपली ध्येय धोरणे राबवण्यासाठी पुढे मागे उपयोगाला येइल म्हणून कुठल्यातरी पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा द्यावाच लागतो. क्वचित प्रसंगी आपल्या कार्यकर्त्यांचे बळ त्या त्या पक्षाच्या दावणीला बांधावे लागते. यामधे कार्यकर्ता सहभागी असला तरी प्रत्यक्ष संघटनेचे नाव कुठे येणार नाही याची काळजी घ्यावी लागते कारण एका पक्षाची बाजू घेतली की बाकीचे पक्ष आपोआप शत्रू होणार हे ठरलेले असते.

माणसाप्रमाणेच संघटनेचा प्रवासही ठरवल्याप्रमाणे होत नाही. प्रवासात काही अनपेक्षित वळणे येतात. पक्षीय राजकारणापासून अलिप्त म्हणवणारी एखादी संघटना स्वतःचाच एक राजकीय पक्ष स्थापन करून बसते. इथून पुढची स्वतःची वाटचाल अवघड करून ठेवते.

त्यातून हा पक्ष सत्तेवर नसेल तर प्रश्न नसतो पण हा पक्ष सत्ताधारी झाला तर संघटना विरुद्ध पक्ष असा सामना रंगतो. पक्षाला जन्म देणारी संघटना मोठी की पक्ष मोठा हा प्रश्न विचारला जाऊ लागतो. व्यक्तिंप्रमाणेच पक्ष आणि संघटनांचा 'इगो' फणा काढून बाहेर यायला लागतो.

सत्तेकडे तिजोरीच्या चाव्या असतात, सत्ता ही संपत्तीची निर्मितीही करत असते. यामुळे कधी कधी संघटनेला पक्षापुढे झुकावे लागते. सत्तेच्या संपत्ती निर्मितीत संघटना किंवा तिचे पदाधिकारी वाटा मागू लागतात. सरकारी कंत्राटे आपल्यालाच मिळाली पाहीजेत हा त्यांचा आग्रह असतो. नव्हे तो त्यांना आपला हक्कच वाटू लागतो. आजवर संघटनेसाठी त्याग केला. त्याची आता भरपाई करून घेऊ हाही विचार असतो.

काही ठिकाणी संघटनेपूर्वीच पक्ष जन्मलेला असतो अशा वेळी संघटनेचा प्रवास आणखी वेगळ्या अंगाने जातो.

संघटनेच्या आयुष्यातली सुरुवातीची आणि नंतरची आव्हाने वेगळी असतात. अति अनुकूलता पचवता येत नाही. र्‍हासाला इथेच सुरुवात होते. आरंभी बंडखोर असणारी संघटना स्वतःच प्रस्थापितांची जागा घेते आणि नवी भरभक्कम चौकट निर्माण करते. मग ही नवी चौकट मोडून काढण्यासाठी आणखी एका नव्या संघटनेच्या जन्माची प्रतिक्षा करावी लागते.

जगभरातल्या सगळ्या संघटनांचा प्रवास साधारण असाच असतो, त्यांची ध्येय धोरणे काहीही असली तरी.

समाजसमीक्षा

प्रतिक्रिया

ओके. मला वाटले दुसऱ्याच कशाबद्दल आहे.

बाकी लेखातील निरीक्षण आवडले.

नर्मदेतला गोटा's picture

27 Oct 2016 - 3:36 pm | नर्मदेतला गोटा

दुसऱ्याच कशाबद्दल

म्हणजे

म्हणजे शीर्षकावरून लेख रा. स्व. संघाबद्दल असेल असे वाटले.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2016 - 12:01 pm | llपुण्याचे पेशवेll
llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2016 - 12:01 pm | llपुण्याचे पेशवेll
नर्मदेतला गोटा's picture

30 Oct 2016 - 5:21 pm | नर्मदेतला गोटा

काय ते लिहा ना

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2016 - 12:01 pm | llपुण्याचे पेशवेll

.... त्यांची ध्येय धोरणे काहीही असली तरी."

+ १

नर्मदेतला गोटा's picture

30 Oct 2016 - 5:19 pm | नर्मदेतला गोटा

तेच ना

त्या पुस्तकाचा अभ्यास सुरुच आहे ...

त्यात पण तालिबान मध्ये पडलेल्या फुटी संदर्भात पण भाष्य केलेले आहेच...

शिवाय आजच तेगडियांनी नविन पक्षाची स्थापना, केलीच आहे.

असो,

माकडापासूनच माणसाची उत्क्रांती झाली हे निर्विवाद सत्य .....