ऐका हो ऐकाऽऽऽऽ 'मिपा'च्या समस्त गावकऱ्यांना आवाहन! 'गूगल'नामक कंपनीने जगातील सर्व लोकांच्या बुद्धीला उत्तेजन देण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये सर्वांनी आपापल्या बुद्धीला ताण देऊन अशा संकल्पना (ideas) पाठवायच्या की ज्यामध्ये जग बदलण्याची ताकद असेल. ज्या संकल्पना विजयी होतील त्या १ कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य देऊन राबवण्यात येतील. या संधीचा फायदा घेऊन सर्व 'मिपा'करांनी यामध्ये सामील व्हावे होऽऽऽऽऽऽ (जुन्या काळचे गावामध्ये दवंडी देणारे तराळ आता राहिले नाहीत, म्हणून काय झाले? आपल्यासाठी 'मिपा'चा कट्टा आहे ना).
तर 'गूगल'च्या या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती:
उपक्रमाचे नाव: Project 10^100 किंवा Project 10 to the 100th (१०चा १००वा घातांक?)
थोडक्यात माहिती: लोकांनी अशा नवनवीन संकल्पना द्याव्यात की ज्या, जगातील जास्तीत जास्त लोकांना उपयोगी पडतील आणि खऱ्या अर्थाने जग बदलू शकतील.
संकल्पना पाठवण्याची अंतिम तारीख: २० ऑक्टोबर (संकल्पनेला पुरवणी म्हणून ३० सेकंदाची चित्रफीत पाठवता येईल.)
स्पर्धेचा निकाल: 'गूगल'ने निवडलेल्या १०० संकल्पना जनतेसमोर मांडल्या जातील. त्यापैकी २० संकल्पना उपांत्यफेरीत जातील (जनतेच्या पसंतीनुसार). शेवटच्या ५ संकल्पना सल्लागार मंडळातील परीक्षक निवडतील. त्यांना प्रत्येकी २० लाख डॉलर्सचे अर्थसहाय्य दिले जाईल. (ही रक्कम संकल्पना राबवण्यासाठी वापरली जाईल.)
संकल्पनेला कोणतेही ठराविक बंधन नाही (ती कोणत्याही क्षेत्रापुरती मर्यादित नाही). पण निवडीसाठी खालील निकष लावले जातील.
१. ही संकल्पना जगातील किती लोकांच्या आयुष्याला उपायकारक ठरेल? (किती लोकांपर्यंत पोचेल?)
२. एकंदर समाजावर किती खोलवर याचे परिणाम होतील? या योजनेची गरज किती तातडीची आहे?
३. ही संकल्पना (योजना) १ ते २ वर्षात कार्यान्वित होऊ शकेल का?
४. संकल्पना किती साधी व परवडणारी आहे?
५. संकल्पनेचे परिणाम किती काळापर्यंत टिकू शकतील?
या संकल्पना कशा असाव्यात यासाठी 'गूगल'ने काही उदाहरणे दिली आहेत. 'हिप्पो वॉटर रोलर' या संकल्पनेमुळे बऱ्याचशा अफ्रिकेतील देशांमधला पाणी वाहून नेण्याचा प्रश्न सोपा झाला आहे.
तर 'फर्स्ट माईल सोल्युशन्स'मुळे दुर्गम भागांमध्ये खूप कमी खर्चात इंटरनेट सुविधा उपलब्ध झाली आहे.
माझ्या डोक्यात एक विचार आला की 'मिपा'वर इतके बुद्धिवान लोक आहेत (चू.भू.द्या.घ्या. :)). प्रत्येकाने स्वतंत्र संकल्पना पाठवण्यापेक्षा सर्वांनी मिळून, विचारमंथन करून संकल्पना पाठवायला काय हरकत आहे? त्यात पुन्हा आपल्याकडे वेळ थोडाच आहे.
"आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो." ('मिपा'च्या 'लेखन करा'>'काथ्याकूट' मधील वाक्य!). तर तुमच्या बुद्धीला थोडी धार द्या (स्वयपाकघरातल्या सुरीसारखी). थोडी कल्पनाशक्ती, थोडी जागतिक समस्यांबद्दलची माहिती, थोडे brainstorming यातून आपल्याला बऱ्याच संकल्पना सुचतील. किंवा एकाच संकल्पनेचा क्रमश: विस्तार करता येईल. निवडलेल्या काही ठराविक संकल्पना, वरील निकषांवर पडताळून पाहता येतील. जग बदलण्यासाठी मोठमोठ्या दिग्गजांची गरज नसून फक्त एक लहान संकल्पना त्यासाठी पुरेशी आहे.
इथे फक्त स्पर्धा जिंकण्यासाठी संकल्पना मांडायची नसून आपल्या सगळ्यांच्या वैचारिक पातळीचा कस लावायचा आहे. कुणी सांगावे, जर उद्या चुकून आपल्या एखाद्या संकल्पनेला २० लाख डॉलर्स मिळाले तर त्यातून कितीतरी लोकांच्या समस्या सुटू शकतील.
तर मंडळी, जरा डोके खाजवा (स्वत:चे) आणि मांडा तुमच्या संकल्पना!
महत्त्वाची सूचना: आपण मराठी माणसं जशी बुद्धीवादी आहोत तशीच 'विनोदबुद्धी'वादी सुद्धा आहोत. याचा विचार करून, या धाग्यामध्ये फक्त प्रामाणिक संकल्पना मांडाव्यात ही विनंती. 'विनोदी' व 'गमतीशीर' संकल्पना या धाग्यामध्ये जोडू नयेत. त्यासाठी दुसरा धागा बनवण्यात येईल.
राहूल
--
हे विश्वचि माझे घर!
प्रतिक्रिया
28 Sep 2008 - 8:19 am | विसोबा खेचर
संकल्पना पाठवणार्या सर्वांना शुभेच्छा! :)
तात्या.
28 Sep 2008 - 9:53 am | दिपोटी
मंडळी,
ही बातमी वाचून थोडे आश्चर्यच वाटले. हीच कल्पना मुंबईच्या आयायटीने काही महिन्यांपूर्वीच मांडली आहे आणि त्यांची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर आहे. गुगलच्या या उपक्रमाशी मुंबई आयायटीची कल्पना तंतोतंत १००% जुळणारी नसली तरी बहुतांशी (८०-९० टक्के) जुळणारी आहे.
येत्या ५० वर्षात जग बदलू शकणार्या १० कल्पना शोधून काढण्यासाठी आयायटीने हा उपक्रम आयोजिला आहे, ज्याची घोषणा ९ मे २००८ रोजी झाली.
जिज्ञासूंनी खालील लिंक्स् वर पडताळून पहावे.
http://10greatideas.iitb.ac.in/10gi/loginIndex.do
http://www.expressindia.com/latest-news/IIT-Mumbai-asks-for-ideas-to-cha...
- दिपोटी