कुंपणावरच्या मित्रांसाठी....

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
26 Sep 2008 - 11:18 pm

ओळखीच्या घोळक्यात एकट्यासम शाप नाहि
मित्रत्वाने पाठीवरती आपुलकीची थाप नाहि.

जिंकलीस तू लंका सारी, साता समुद्रा पार रे
ओल्याचिंब मिठीसाठी जवळ उरला बाप नाहि.

धावताना जगण्यासाठी, गाठले पैलतीर रे
विसरलास जगणे मागे, उरली फक्त धाप नाहि?

दूरदेशी शांतचित्ती, मनी कर हिशोब रे
आनंद मोजून ठेव नीट, हरवले कीती माप नाही.

आठवते शेणमाती, मनात तोच गंध रे
मात्र हिरव्या नोटेपुढे, परतण्याची टाप नाहि.

आई इथे एकटीच, खोलीत तुझ्या बसते रे
ती म्हणत नसली तरी, दुसरे असे पाप नाहि.

-ऋषिकेश

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

मनीषा's picture

26 Sep 2008 - 11:48 pm | मनीषा

कविता आवडली

दूरदेशी शांतचित्ती, मनी कर हिशोब रे
आनंद मोजून ठेव नीट, हरवले कीती माप नाही....विषेश आवडले

स्वाती फडणीस's picture

26 Sep 2008 - 11:54 pm | स्वाती फडणीस

:)

प्राजु's picture

26 Sep 2008 - 11:54 pm | प्राजु

मनातली कविता...
खरंच घोळक्यात असून सुद्धा एकटेपणाची भावना शाप असते..
अभिनंदन!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टुकुल's picture

27 Sep 2008 - 2:42 am | टुकुल

कविता निर्विवाद खुप सुंदर आहे..

कुंपणावरच्या मित्रांसाठी....
माझ्या मते हे कुंपणापलीकड्च्या मित्रांसाठी हवे होते.. :-)

कुंपणापलीकडचा,
टुकुल

सुनील's picture

27 Sep 2008 - 6:38 am | सुनील

दूरदेशी शांतचित्ती, मनी कर हिशोब रे
आनंद मोजून ठेव नीट, हरवले कीती माप नाही.

खरयं.

मात्र हिरव्या नोटेपुढे, परतण्याची टाप नाहि.
क्या बात है!

आणि हो "कुंपणावरच्या मित्रांसाठी" हे शीर्षकदेखिल सूचक!

(कुंपणावरचा) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

फटू's picture

27 Sep 2008 - 7:57 am | फटू

आठवते शेणमाती, मनात तोच गंध रे
मात्र हिरव्या नोटेपुढे, परतण्याची टाप नाहि

(शेणमातीत लहानाचा मोठा होऊन साता-समुद्रापार गेलेला),
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 8:04 am | विसोबा खेचर

आई इथे एकटीच, खोलीत तुझ्या बसते रे
ती म्हणत नसली तरी, दुसरे असे पाप नाहि.

ऋष्या! हृदयाला हात घातलास रे!

केवळ अप्रतीम काव्य!

तात्या.

अनिल हटेला's picture

27 Sep 2008 - 8:46 am | अनिल हटेला

आई इथे एकटीच, खोलीत तुझ्या बसते रे
ती म्हणत नसली तरी, दुसरे असे पाप नाहि.

अप्रतीम कविता !!!

(आई च्या आठवणीने व्याकूळ !!!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

स्पृहा's picture

27 Sep 2008 - 12:10 pm | स्पृहा

लाखमोलाची गोष्ट ह्या ओळीत सांगितलीत .

एकदम अफलातुन काव्य रचना.

(सुंदर कविता वाचून नि:शब्द झालेली)
हळ्वी स्प्रुहा

मराठी_माणूस's picture

27 Sep 2008 - 1:09 pm | मराठी_माणूस

अतिशय आवडलि. वस्तुस्थितीचे अत्यंत यथार्थ वर्णन

मात्र हिरव्या नोटेपुढे, परतण्याची टाप नाहि.

वरिल वर्णन फार आवडले , तिथे असणारे बरेच मित्र वेगवेगळी कारणे सांगतात (त्यातलि बरीच "माझि तर अजीबात इच्छा नाहि पण .........") पण खरे कारण हेच असते.
(अवांतर : एका संवेदशील मित्राला ही कविता वाचण्याचे सुचवण्याचा विचार आहे, परीणाम करेल असे वाटते)

विसोबा खेचर's picture

28 Sep 2008 - 12:32 am | विसोबा खेचर

तिथे असणारे बरेच मित्र वेगवेगळी कारणे सांगतात (त्यातलि बरीच "माझि तर अजीबात इच्छा नाहि पण .........")

हा हा हा! मलाही मारे चेहेरा पाडून हे कारण सांगणारे अनेकजण भेटले आहेत...! :)

शेवटी पैसा, ऐषोआराम, पॉश गाड्या, बंगले, सुखसमृद्धी, संपन्नता या गोष्टी अधिक महत्वाच्या की आईवडिलांसमवेत राहून त्यांच्या उतारवयात आस्थेने त्यांची सेवा करणं, त्यांना काय हवं नको ते बघणं अधिक महत्चाचं हे ठरवणं हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे हेच खरं!

तात्या.

अवलिया's picture

28 Sep 2008 - 1:37 pm | अवलिया

शेवटी पैसा, ऐषोआराम, पॉश गाड्या, बंगले, सुखसमृद्धी, संपन्नता या गोष्टी अधिक महत्वाच्या की आईवडिलांसमवेत राहून त्यांच्या उतारवयात आस्थेने त्यांची सेवा करणं, त्यांना काय हवं नको ते बघणं अधिक महत्चाचं हे ठरवणं हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे हेच खरं!

अतिशय योग्य बोललात तात्या. खुप वेळेस मात्र हे जेव्हा समजते तेव्हा वेळ निघुन गेलेली असते. मग केवळ पश्चातापाशिवाय हाती काही उरत नाही. असो.

(भारताच्या बाहेर न गेलेला) नाना

मदनबाण's picture

27 Sep 2008 - 1:13 pm | मदनबाण

फारच सुरेख कविता....

मदनबाण>>>>>

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2008 - 2:04 pm | प्रभाकर पेठकर

आठवते शेणमाती, मनात तोच गंध रे
मात्र हिरव्या नोटेपुढे, परतण्याची टाप नाहि.

मला वाटते हिरव्या नोटांचे आकर्षण कमी आणि उच्चराहणीमानाची लागलेली सवय, परतण्याच्या निर्णयावर ठाम कृती करता न येण्यासाठी, जास्त जबाबदार असते. हेच राहणीमान भारतात गाठता आणि टिकवता आले तर कित्येक भारतिय भारतात परतणे पसंद करतील. नोटांचा रंग कुठलाही असू दे.

आई इथे एकटीच, खोलीत तुझ्या बसते रे
ती म्हणत नसली तरी, दुसरे असे पाप नाहि.

ही खंत खरेच फार बोचरी.

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 5:26 pm | विसोबा खेचर

हेच राहणीमान भारतात गाठता आणि टिकवता आले तर कित्येक भारतिय भारतात परतणे पसंद करतील. नोटांचा रंग कुठलाही असू दे.

माझ्या मते वृद्ध, एकाकी, असाहाय्य आईवडिलांपुढे सर्वच नोटांचा रंग फिका आहे!

असो,

आपला,
(सर्वसामान्य भारतीय मध्यमवर्गीय राहणीमान लाभलेला आणि मुख्य म्हणजे आपल्या वयस्कर आईसोबत राहणारा!) तात्या.

--

प्रासाद इथे भव्य परि मज भारी
आईची झोपडी प्यारी!

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2008 - 6:39 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या मते वृद्ध, एकाकी, असाहाय्य आईवडिलांपुढे सर्वच नोटांचा रंग फिका आहे!

हे तर कोणीही मान्य करेल. वृद्ध, एकाकी, असाहाय्य आईवडिलांच्या दु:खांवर कोणी आपल्या सुखाचे इमले उभारत नाही.

कित्येकदा, आई वडील ५५-६० वर्षांचे आरोग्यसंपन्न असतात. आपल्या इतर मुलासमवेत भारतात राहात असतात. तरी पण त्यांच्या पासून दूर गेलेल्या मुलांना आईवडिलांच्या सुखदु:खात चटकन सहभागी होऊ शकत नाही ह्याची खंत असतेच.
स्वतः परदेशात राहून निवृत्त आयुष्य भारतात घालविणारे कित्येक आईवडीलच आपल्या मुलांना परदेश गमनासाठी प्रोत्साहित करतात. त्यांनीही जगभराचा अनुभव घ्यावा, परदेशात जाऊन अधिक ज्ञान, अधिक पैसा कमवावा असे वाटत असते. कधी उत्तम शैक्षणिक संधींसाठी परदेशात पाठविले जाते.
कधी-कधी इतर भावंडे, नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये आईवडील दु:खी नसतातही पण एकाकी पडलेली मुले खंत करीत राहतात.

असो. हे प्रश्न प्रत्येक अनिवासी आणि त्याच्या आईवडीलांच्या बाबतीत एकमेवाद्वितीय असतात. आपण दूरून निष्कर्ष्य काढू शकत नाही.

विसोबा खेचर's picture

28 Sep 2008 - 12:11 am | विसोबा खेचर

वृद्ध, एकाकी, असाहाय्य आईवडिलांच्या दु:खांवर कोणी आपल्या सुखाचे इमले उभारत नाही.

असहमत..

असे इमले उभारणारी मी तरी किमान १० उदाहरणं आत्ता इथल्या इथे सांगू शकेन.. आमच्या घरासमोरचंच एक उदाहरण आहे. तिकडे अमेरिकेत मुलगा आणि सून मजेत आहेत. नुकतेच स्वत:च्या नवीन बंगल्यात वगैरे रहायला गेले आहेत. आणि इथे त्यांच्या आईचडिलांना मात्र औषधपाण्याची, डॉक्टरची गरज लागल्यावर रात्रीअपरात्री शेजार्‍यापाजार्‍यांकडे धावावं लागतं! आम्ही सगळे करतोच हो मदत! शेजारधर्म ही आपली भारतीय संस्कृतीच आहे, तेव्हा मुद्दा तो नाही.

साला, काय चाटायचाय त्या मुलाचा तो नवीन बंगला अन् ते वैभव?

तरी पण त्यांच्या पासून दूर गेलेल्या मुलांना आईवडिलांच्या सुखदु:खात चटकन सहभागी होऊ शकत नाही ह्याची खंत असतेच.

कोरडी खंत काय कामाची? राहा की इथे येऊन आईवडिलांसोबत! साला, इथे काय जेवायला मिळत नाही? आणि एकदा आईवडील गेल्यावर जा की हवं तिथे! मग कोण साला तुम्हाला विचारायला येणार आहे? लठ्ठ पगाराची नोकरी महत्वाची,पैसा महत्वाचा, ऐशोआराम, लक्झरी गाड्या-बंगले महत्वाचे, की आईवडिलांजवळ बसून आस्थेने त्यांची चौकशी करणे महत्वाचे?

कधी-कधी इतर भावंडे, नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये आईवडील दु:खी नसतातही पण एकाकी पडलेली मुले खंत करीत राहतात.

इतर भावंडे? सर्वच भावंडे परदेशात गेल्याची किमान सहा उदाहरणे नावा-पत्त्यासकट मी आपल्याला सांगू शकेन. फार दूर जायची आवश्यकता नाही!

नातेवाईक, मित्रमंडळी??

ज्या आईवडिलांनी हाताचा पाळणा करून वाढवलं, आजारपणात रात्र रात्र जागरणं केली, स्वत: काटकसरीने जगून, वेळप्रसंगी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं, लहानाचं मोठं केलं, त्या आईवडिलांची जबाबदारी मुलांनी घ्यायची की नातेवाईक-मित्रमंडळींनी?

ऋषिकेशच्या कवितेतील,

आठवते शेणमाती, मनात तोच गंध रे
मात्र हिरव्या नोटेपुढे, परतण्याची टाप नाहि.

आई इथे एकटीच, खोलीत तुझ्या बसते रे
ती म्हणत नसली तरी, दुसरे असे पाप नाहि.

या ओळी खूप काही सांगून जातात...!

असो,

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2008 - 9:46 am | प्रभाकर पेठकर

असे इमले उभारणारी मी तरी किमान १० उदाहरणं आत्ता इथल्या इथे सांगू शकेन..
आज कित्येक लाख परदेशात राहात आहेत. त्यात ही १० उदाहरणे प्रातिनिधिक होऊ शकत नाहीत.

तरी पण त्यांच्या पासून दूर गेलेल्या मुलांना आईवडिलांच्या सुखदु:खात चटकन सहभागी होऊ शकत नाही ह्याची खंत असतेच.

आपण माझ्या प्रतिसादातील वाक्य संदर्भ तोडून वापरले आहे. आरोग्य संपन्न आईवडील आपल्या इतर मुलांसमवेत राहात असताना एखाद्या मुलाला परदेशात राहावे लागले तर त्यालाही खंत वाटतेच असे मी म्हंटले आहे.

इथे काय जेवायला मिळत नाही?
कोकणातून कित्येक चाकरमानी मुंबईत नोकरीला कशा करता येतात. तिथे कोकणांत काय जेवण मिळत नाही?
तात्या, नुसते जेवण मिळवणे एवढाच जगण्याचा उद्देश असेल तर शिक्षण घ्यायचीही काही गरज नाही, जेवण कसेही कष्ट करून मिळवता येते.

आईवडील गेल्यावर जा की हवं तिथे!
तसे म्हंटले तर प्रत्येकाची जबाबदारी ही फक्त आईवडीलांपुरती मर्यादीत नसते. वडीलांच्या पश्चात मोठ्या मुलाला आपल्या भावंडांचा प्रतिपाळ वडीलांच्या भूमिकेतू करायचा असतो तर आईच्या पश्चात मोठ्या मुलीला आपल्या धाकट्या भावंडांची आई बनून राहावे लागते. कित्येकदा वडीलांच्या पश्चात इतर भावंड धाकटी असतील तर नोकरी करणारी मोठी मुलगी 'लग्न'ही करीत नाही. त्यामुळे आईवडील गेले आता जा परदेशात मजा मारायला (तुमच्या भाषेत) असे कसे वागता येईल?

किमान १० उदाहरणं आत्ता इथल्या इथे सांगू शकेन..
सर्वच भावंडे परदेशात गेल्याची किमान सहा उदाहरणे नावा-पत्त्यासकट मी आपल्याला सांगू शकेन. फार दूर जायची आवश्यकता नाही!
आपल्या जवळ सर्व स्टॅटीस्टीक्स तयार आहे ह्या बद्दल आपले कौतुक करावे तितके थोडेच आहे. म्हातार्‍या आईवडीलांना सोडून सर्व भावंडे परदेशात गेल्याचे उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. कदाचित हा माझ्या लहान वयाचा दोष असेल.

नातेवाईक, मित्रमंडळी??
ज्या आईवडिलांनी हाताचा पाळणा करून वाढवलं, आजारपणात रात्र रात्र जागरणं केली, स्वत: काटकसरीने जगून, वेळप्रसंगी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं, लहानाचं मोठं केलं, त्या आईवडिलांची जबाबदारी मुलांनी घ्यायची की नातेवाईक-मित्रमंडळींनी?

माझा प्रतिसाद पुन्हा वाचावा ही आपल्या चरणी नम्र विनंती. आईवडीलांची जबाबदारी मित्रमंडळींनी घ्यावी असे मी कुठे आडूनही सुचविले असेल तर मी तुमची जाहीर माफी मागेन.

या ओळी खूप काही सांगून जातात...!
जरूर. तरीपण परदेशात गेलेल्या सर्वांनाच ह्या ओळी लागू आहेत असे ऋषिकेषही म्हणणार नाहीत. तूमचा सूर मात्र परदेशात मोठ्या पगाराची नोकरी करणारे सर्व आईवडीलांच्या एकाकी पणाच्या थडग्यावर आपला बंगला बांधणारे आहेत असा आहे. आणि तो चुकीचा आहे असे मला तरी वाटते.

मात्र हिरव्या नोटेपुढे, परतण्याची टाप नाहि.
मी ज्या परदेशात राहात होतो तिथे नोटेचा रंग हिरवा नव्हता पण जो काही होता तो सोडून भारतात परतलो. आणि विश्वास ठेवा, माझ्या सारखे, असे आपल्या भारतीय समाजात अगणित आहेत.

धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

28 Sep 2008 - 10:43 am | विसोबा खेचर

प्रभाकरपंत,

आपला प्रतिसाद पटण्याजोगा आहे.

परंतु मी जे काही लिहिले आहे ते जी मी माझ्या आजूबाजूला प्रत्यक्ष अनुभवले, पाहिले त्यावर आधारीतच लिहिले आहे..

सगळीच एनाआराअय मंडळी अशी नसतात हे मलाही मान्य आहे. माझ्या लेखनातून तसा सूर दिसत असेल तर ती माझी लेखनचूक आहे हे मान्य करतो....

धन्यवाद...

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2008 - 11:15 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद तात्या,

मी जे काही लिहिले आहे ते जी मी माझ्या आजूबाजूला प्रत्यक्ष अनुभवले, पाहिले त्यावर आधारीतच लिहिले आहे..
अगदी खरं आहे. आपण पाहिलेत अशी उदाहरणेही आपल्या समाजात आहेत हे मलाही मान्य आहे. मातृ-पितृ देवो भवो असेच आपली संस्कृती शिकविते. आपल्या संवेदनशील मनाला प्रणाम.

वैशाली हसमनीस's picture

27 Sep 2008 - 4:39 pm | वैशाली हसमनीस

फारच संवेदनाशील कविता !शेवटच्या दोन ओळी तर जिवाला चटका लावण्यार्‍या !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Sep 2008 - 6:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर कविता.
जिंकलीस तू लंका सारी, साता समुद्रा पार रे
ओल्याचिंब मिठीसाठी जवळ उरला बाप नाहि.

पण या ओळी विशेष आवडल्या.

(राणीच्या नोटा सोडून गांधीजींच्या नोटा वापरायला परत आलेली) अदिती

शितल's picture

27 Sep 2008 - 8:37 pm | शितल

संपुर्ण काव्य रचनाच केवळ भावस्पर्शी आहे.
कविता खुप आवडली. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2008 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषी,
कवितेतील सर्वच ओळी मनाला भिडणा-या आहेत.
और भी आने दो !!!

लवंगी's picture

28 Sep 2008 - 8:59 am | लवंगी

कविता मनाला चटका लावणारी आहे. आवडली. आपल्यापैकी बरेच या नौकेतील प्रवासी असतील. काही आइ-बाबानपासुन हजारो मैल दूर राहूनही मानाने जवळ आहेत तर काही एका घरात राहूनही हजारो मैल दूर आहेत. प्रत्येकाच्या मनात आई-बाबांच लाडक निरागस पोर लपालेलच असत. वास्तवाच्या प्रखर उन्हात निरागसता हरवून जाते, आणि अशी एक कविता परत एकदम लहान करून टाकते बघ.

यशोधरा's picture

28 Sep 2008 - 9:05 am | यशोधरा

अतिशय सुरेख कविता. खूपच आवडली.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Sep 2008 - 9:10 am | प्रकाश घाटपांडे

दूरदेशी शांतचित्ती, मनी कर हिशोब रे
आनंद मोजून ठेव नीट, हरवले कीती माप नाही.

सुंदर ऋषिकेश, स्वदेशी बी आमच्या मनात हाच विचार आसतोय.
(नॉस्टल्जिक)
प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश's picture

28 Sep 2008 - 10:31 am | ऋषिकेश

सर्वप्रथम सगळ्या प्रोत्साहकांचे अनेक आभार!
छंद, वृत्त वगैरेत सणकून मार खाणार्‍या ह्या कवितेत एक विशिष्ठ प्रकारच्या परदेशस्थ भारतीयाचा वेध घ्यायचा प्रयत्न होता. त्यातील तांत्रिक गोष्टींशिवाय तुम्ही त्यातील भावना जाणून घेतल्यात त्याबद्दल अनेक आभार!.. बहुतेक हे केवळ मिपावरच घडु शकते... (स्वगतः बहुतेक सगळ्यांना आता पक्कं कळून चुकलंय की हे छंद-वृत्त तुझा प्रांत नव्हे ;) )

ही कविता व्हायला एक तात्कालिक कारण होतं ते असं:
गुरूवारी एका मित्राचा अमेरीकेहून फोन आला.
"अरे घरी जातोस का या विकेंडला.. बाबांना जीटॉक डाऊनलोड करून दे.. आणि बघ जरा आई म्हणतेय की ते जरा अस्वस्थ असतात.. बघ लागलं तर डॉक्टरांकडे घेऊन जा"
"ओक्के जातो मी.. बाकी तु कधी येणार आहेस?"
पुढे काहि क्षण सन्नाटा होता. हा मित्र अगदी जवळचा असल्याने मनातलं बोलला आणि मला मुकं करून गेला...
"खरं सांगु का.. इथे जाम कंटाळा आलाय.. त्यातही तिथे सणवार सूरु झाले ना की तिथे यावंसं वाटतं.. खरंतर तिथेही इतका पगार मिळेल की आरामात राहू शकेन पण मग एक मन म्हणतं.. इतका आराम, मनात आलं की हातात मिळणार्‍या गोष्टी, आचार-विचार हे सगळं माझ्यापेक्षा माझ्या मुलांना फारच सवयीचं झालं आहे.. त्यांच्यासाठी तरी इथेच रहावं लागेल. इथे राहण्याचा कधीकधी खूप कंटाळा येतो... पण......."
....
....
शुक्रवारी रात्री त्यांच्याकडे गेलो होतो. जीटॉक डाऊनलोड दिला, गप्पा चाल्लु होत्या. त्याच्या आईनेदेखील मुलगा तिकडचा झाला हे स्वीकारलं आहे. तिची तक्रारदेखील नाहि. पण त्याहून भिडलं कि त्याची खोली अजूनही आहे तशीच ठेवली आहे. कधी चुकून आलाच तर .....

अश्या यायची इच्छा असलेल्या "पण" मुळे अडलेल्या कुंपणावरल्या मित्रांसाठी ही कविता आहे.. अर्थात सगळ्या सरसकट परदेशस्थ भारतीयांची प्रातिनिधीक कविता नक्कीच नाहि...

काहि भावना प्रकाशकाका म्हणतात त्याप्रमाणे स्थानातीत आहेत हे खरंय!

पुन्हा एकदा सगळ्यांचे अनेक आभार

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2008 - 11:09 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद ऋषिकेश,

अशा काही व्यक्ती मीही बधितल्या आहेत ज्यांना भारतात परतायचे नसते, हा देश सोडलाच तर अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियात जायचे असते.
पण त्याहून कितीऽऽऽतरी जास्त भारतिय असे भेटले ज्यांची भारतात परतण्याची कारणे होती, भारतात असलेले वृद्ध आईवडील.
एक जण म्हणाला भारतात लहान भाऊ आहे. पण त्याने तरी किती करायचे आई वडीलांचं, माझीही काही जबाबदारी आहेच. ती मी पार पाडू इच्छितो.
काही जण म्हणाले, मुलं आता मोठी झाली. त्यांचं आयुष्य इथेच गेलं. त्यांनाही भारतिय संस्कृतीची, मराठी समाजाची, चाली-रितींची जवळून ओळख झाली पाहीजे.
काही जणं म्हणाले ठीक आहे, 'भारतात दोन पैसे कमी मिळतील पण इथे आयुष्य काढायचे नाहीए. आता बस झाले, परत जाऊया.'
ही झाली अरबस्थानातील उदाहरणं. पण ह्या सर्वांना अमेरिकेत-ऑस्ट्रेलियात संधी मिळाल्याच नसत्या असे नाही. पण त्यांना मायभूमीस परतायचे होते.

आपल्या आजूबाजूला मनुष्य स्वभावाचे विविध कंगोरे दिसून येतात. अगणित. काही काही तर, 'अशीही माणसे असतात?', 'ह्यांना माणसे म्हणायचे?' असा विचार मनांत चमकून जावा इतक्या टोकाच्या विचारसरणीची भेटतात. पण ती अल्पसंख्य असतात.
ही गोष्टही खरी आहे की 'आपला हिरव्या नोटांचा मोह झाकण्यासाठी, काही जणं मुलांच्या आवडीनिवडी, शिक्षणाच्या ढाली पुढे करतात.' आई-वडीलांचे हाल होत असताना हिरव्या नोटांचा हव्यास केव्हाही अमानुषच म्हणावा लागेल.
दुसरी, बाजू आई वडीलांची. त्यांचेही हट्ट काही कमी नसतात. त्यांना परदेशात राहायचे नसते. मुलाने कितीही बोलावले तरी जात नाहीत. मुलगा घरी आला की त्याच्याशी व्यवस्थित वागतील, गोड बोलतील, तुझ्या प्रगतीचं आम्हाला कौतुक आहे वगैरे सांगतील आणि तो परत गेला की शेजार्‍या पाजार्‍यांकडे तक्रारी करीत बसतील. हे ही प्रमाण अत्यल्प आहे. पण, आहे हे विसरून चालणार नाही. असो.

सर्व प्रकारची माणसे, मनुष्यस्वभाव पाहायला मिळतात. 'माणसं परदेशात नुसती सुखातच असतात' अशा गैरसमजातूनही, त्यांच्या भावभावनांना काहीच महत्त्व नाही, असाही विचार करणारे करतात.
तुम्हाला एक स्पेसीफीक केस पाहायला मिळाली त्याला तुम्ही कवितेच्या माध्यमातून वाचा फोडलीत ते योग्यच आहे. त्याच बरोबर
'सगळ्या सरसकट परदेशस्थ भारतीयांची प्रातिनिधीक कविता नक्कीच नाहि... ' हे नमूद करण्याचा मनाचा मोठेपणा तुमच्यापाशी आहे. तुमची प्रतिक्रिया डोळस आहे हेच जाणवते.

धन्यवाद.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Sep 2008 - 9:33 am | llपुण्याचे पेशवेll

मी देखील बरीच माणसे पाहीली आहेत जी सर्व काही सोडून आई-वडीलांसाठी परत आली आहेत. आईवडील हे एकच कारण नाही तर मातीची ओढ लावणारी अनेक कारणे आहेत. माझा एक मित्र तर $80kpa ची अमेरीकेतील नोकरी सोडून गणपतीमधे शाळेकडून ढोल वाजवायला मिळतो म्हणून परत पुण्यात आला. आणि अजूनही तो पुण्यातच आहे आणि त्याचे पुण्यातही खूप चांगले चालले आहे. त्यामुळेच मातीच्या ओढीने परत येणारी माणसे असतात यावर माझा दृढ विश्वास आहे.

(मातीच्या ओढीने परतलेला)
पुण्याचे पेशवे

धनंजय's picture

29 Sep 2008 - 11:20 pm | धनंजय

स्फूर्ती घेऊन कविता लिहिली आहेस. भावना, जखमा अजून ओल्या आहेत.

एकलव्य's picture

28 Sep 2008 - 11:23 am | एकलव्य

भावना अगदी सुंदरपणे शब्दात बांधल्या आहेत. विचार आणि उच्चार दोन्ही आवडले. धन्यवाद!

अवांतर - भारतात परतणे ही पर्वणी मानणारे बरेच आहेत. पण त्या सगळ्यांनाच ही लक्झरी परवडण्यासारखी नसते.

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Sep 2008 - 1:34 pm | ब्रिटिश टिंग्या

सुंदर कविता!

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2008 - 8:20 pm | बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश, कविता सुंदर लिहिली आहेस. ज्या घटनेवरून ही कविता तुला सुचली ती घटना पण तितकीच हृद्यस्पर्शी आहे. आवडली.

वरती, तात्यांचा आणि पेठकरकाकांचा उद्बोधक संवाद झालेला आहेच. मी पेठकरकाकांशी पूर्ण सहमत आहे. तात्याच्या मूळ प्रतिक्रियेत मलाही थोडा एकांगी / जनरलायझेशन केल्या सारखा सूर जाणवला, पण तात्याने पुढे खुलासा केलाच आहे. व्यक्ति तितक्या प्रकृति आणि तितक्याच विकृति आहेत. दोन्ही बाजूनी प्लस - मायनस असतं. पण मूलतः प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की खरोखरच परिस्थिती बिकट आली तर प्राधान्य सामान्यतः आई-वडिलांना द्यावंच द्यावं.

बाकी, हा विषय खूप मोठा आहे.

बिपिन.

गणा मास्तर's picture

29 Sep 2008 - 9:53 am | गणा मास्तर

ऋषिकेश कविता अगदी मनाला भिडली. वरचे प्रतिसादपण उद्बोधक, विशेष्करून तात्या आणि प्रभाकर पेठकर काकांचा.
हिरव्या नोटेच्या प्रेमात बरेचजण पडतात, अजुन थोडे अजुन थोडे करत परतायचा काळ निघुन जातो.
नंतर वाटते आता परतणे, पुन्हा त्या मातीत रुजणे शक्य नाही.
आपला
(कधी एकदा परततोय असे झालेला)
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

सर्किट's picture

29 Sep 2008 - 10:49 pm | सर्किट (not verified)

पंकज उधास च्या "नाम" ह्या चित्रपटातील "चिठ्ठी आयी है" चे मराठीकरण वाटते.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

स्वाती दिनेश's picture

29 Sep 2008 - 11:25 pm | स्वाती दिनेश

कविता मनाला भिडली ,नि:शब्द केलेस ..
स्वाती

संदीप चित्रे's picture

29 Sep 2008 - 11:32 pm | संदीप चित्रे

खूपच सुरेख कविता आहे. मला नेहमीच वाटत आलंय की कवितेमधे तंत्रापेक्षा भाव जास्त महत्वाचा असतो त्यामुळे छंद, वृत्त सहज असले तर ठीक नाही तर मार गोली. (मी वृत्तबद्ध कविता लिहिताना भाव हरवायची भीती वाटायला लागली आणि 'मार गोली' सुरू झालं ;) )

तर माझे २ पैसे असे की आपण कुणालाच सरसकट चांगलं किंवा वाईट ठरवू शकत नाही. माझ्या मते जर परदेशात राहिल्याने मुलगा / मुलगी वाईट ठरत असेल तर आई-वडिलांबरोबर राहून त्यांचं जीवन नरकमय करणारा मुलगा / मुलगी दहापट वाईट असतो/ते.

(अवांतर -- गुजराथी लोकांना नावं ठेवण्यात आपण पुढे असतो पण माझ्या माहितीत गुजराथी कुटुंबे आहेत ज्यांच्या तीन पिढ्या आनंदाने अमेरिकेत राहत आहेत. त्यांच्या घराबाहेर पडले की जाणवतं आपण अमेरिकेत आहोत म्हणून !!)

Pain's picture

17 May 2010 - 12:45 am | Pain

मानसिक छळ/जळजळ
खुदाराने!

सौंदाळा's picture

24 Jul 2013 - 4:48 pm | सौंदाळा

चांगली आहे कविता.
परदेशात राहणार्‍याची अगतिकता आणि त्यांच्या इथे राहणार्‍या पालकांची हतबलता छान व्यक्त झाली आहे.

दिपक.कुवेत's picture

24 Jul 2013 - 4:50 pm | दिपक.कुवेत

शेवटचं कडवं विशेष आवडलं

मैत्र's picture

24 Jul 2013 - 5:47 pm | मैत्र

थोड्या कमी प्रमाणात हे भारतात फार इतरत्र राहणार्‍या आमच्यासारख्या काहींना पण लागू होते.
बरेचदा तसे पर्याय आपल्या गावात किंवा आसपास मिळत नाहीत आणि त्याच वातावरणात इच्छा असली तरी परत येण्याची सोयच राहात नाही!

पण अतिशय सुंदर शब्दयोजना --
दूरदेशी शांतचित्ती, मनी कर हिशोब रे
आनंद मोजून ठेव नीट, हरवले कीती माप नाही.

हे विशेष आवडले.

बॅटमॅन's picture

24 Jul 2013 - 6:28 pm | बॅटमॅन

पूर्ण सहमत. परदेशच कशाला, आपले गाव सोडून पुण्यामुंबैला आयुष्य काढावं लागतं आणि आईवडील कैकदा नवीन शिटीला अ‍ॅडजस्ट करू शकतही नाहीत...त्यावेळीही अशीच परिस्थिती असते. अन त्या अगतिकतेला काहीच उत्तर नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2013 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> आईवडील कैकदा नवीन शिटीला अ‍ॅडजस्ट करू शकतही नाहीत....

शीटी (सीटी) नव्हे तर शहरातील माणसं त्यांना अ‍ॅडजस्ट करुन घेत नाहीत असं मला वाटतं. शहरातील तौरतरीक्यात त्यांची कुत्तरओढ होते, दमछाक होते, आधुनिक विचारातील तरुणांच्या स्वातंत्र्यात त्यांची अडचण होते, मधे मधे बोलतात, नसत्या गोष्टी करत असतात जसे की, शेजारी-पाजारी जाऊन बसणे. लोकांच्या मुलांशी खेळत बसणे, शेजारपाजारांशी गप्पा मारत बसणे, तसेच आधुनिक सुनांच्या विचारांशी त्यांच पटत नाही, आदळ-आपट वाढते... आणि मग त्यांना वाटतं मुलांच्या आनंदात आपली अडचण नको आणि ते म्हणतात गड्या आपला गाव बरा....! (अपवाद असतीलच)

-दिलीप बिरुटे

सरजी, माझ्या प्रतिसादातून तसा सूर जाणवत असेल तर क्षमस्व....तसा उद्देश आजिबात नव्हता.

दोष कुणाचाही असो, पण आईवडिलांना मोठ्या शिटीत करमत नाही कैकदा हेच सत्य आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2013 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>माझ्या प्रतिसादातून तसा सूर जाणवत असेल तर क्षमस्व
वो बस का राव अशानं तर आपला संवादच खुंटुन जाईल ! :(

आईवडीलांना शीटी मानवत नाही हे एकमेव त्यांना शहर सोडायला प्रवृत्त करतं असं मला वाटत नाही, असे म्हणतो आहे. अनेक कंगोरे आहेत त्याला.... तुम्ही म्हणता तसं त्यांना सीटीत करमत नाही, हेही एक असेलच की.....!

उत्तम कांबळेंचं 'आई' हे पुस्तक मी म्हणतो म्हणुन वाचा. वाचलं असेल तर गैरलागु. :)

-दिलीप बिरुटे

संवाद कशाला खुंटेल? मला बडबड करायला आवडते ;)

तुम्ही म्हणता तसे त्याला अनेक पैलू आहेत हे खरंच. क्लॅश ऑफ जीवनपद्धती झाला की डोस्के फिरणार नै तर काय...असो.

उत्तम कांबळेंचं पुस्तक नै वाचलं, जल्द अज जल्द जरूर वाचेन, धन्यवाद :)

सर, प्रतिसादाशी थोडी असहमती आहे. शहरे ही नोकरी करण्यासाठी/ पोटापाण्याच्या धंद्यासाठी विकसित होत गेली तसतशी तिथली संस्कृती ही (गरजेनुसार) बदलली. गाव सोडून जाणारा नेहमीच आनंदाने जात नसेल ना! शेतीच्या व्यवसायात नुकसान होत असल्यास घरातील एखाद्याने आर्थिक गरजा भागवण्यासाठी शहरात येणे ही नेहमीची गोष्ट होऊन बसली. कोकणातून हजारोंनी लोक देशावर आले. देशावरचे (आणि आणखीही) लोक परदेशात गेले. माझ्या बघण्यात तर असे कितीतरी लोक पुन्हा कोकणात /आपापल्या गावांमध्ये परत येऊ शकले नाहीत. आता आर्थिक गणितापुढे गुढगे टेकलेले शहरी लोकही कधीकाळी शहरी तौरतरिक्यांच्या दमछाकीतून गेलेले असतात पण (बरेचदा) तरूण वयात! आता वयस्क झालेले आईवडील यासाठी तयार नसतात. शहरी वातावरणातून मस्त, शांत गावात जाऊन राहू म्हणून रिटायरमेंटनंतर गावात गेलेलेही अनेकदा अपेक्षाभंग होऊन परत येतात किंवा जुळवून राहण्याचा प्रयत्न करतात. आदळआपट ही फक्त शहरांमध्ये होत नाही. मला स्वत:ला शेतीवरून, बांधावरून होणारी डोकेफोड ही 'महा डेंजर' वाटते. कारण सवय नाही. गावात राहून "आम्ही साधे लोक." असं म्हणावणारे संधी मिळेल तेंव्हा जिवाचे शहर करायला चटावलेले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकंदरीत आपल्या जगण्याच्या पद्ध्तीची सवय झाली की दुसरीकडे पटत नाही. मोल्ड होण्याचे वय असेल तर जमून जातेही पण वयस्करांना अवघड जाते.

प्रभाकर पेठकर's picture

24 Jul 2013 - 8:00 pm | प्रभाकर पेठकर

एकंदरीत आपल्या जगण्याच्या पद्ध्तीची सवय झाली की दुसरीकडे पटत नाही. मोल्ड होण्याचे वय असेल तर जमून जातेही पण वयस्करांना अवघड जाते.

आपण जिथे जातो तिथल्या समाजाशी, राहणीमानाशी, वेळापत्रकाशी, हवामानाशी जुळवून घेतल्यास त्रास कमी होतो. पण, जिथे जाईन तिथे 'मी माझ्या अटींवरच राहीन' असा ताठरपणा असेल तर शहरातल्यांना गावाकडे आणि गावाकडच्यांना शहरात राहणे कठीण जाते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2013 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकतर आपला प्रतिसाद मला कळलाच नाही. शहरात मुलांबरोबर आईवडील स्थिरावत का नाही, त्याबद्दल मला म्हणायचं होतं. शहरातील लोक डेंजर असतात आणि खेड्यागावातील कमी डेंजर असतात असं कुठं म्हटलं काय मी ? माणूस म्हटलं की तो डेंजरच असेल, तो कुठेही राहात असला तरी. शहरी संस्कृतीत खेडेगावातून आलेली माणसं रमत नाहीत त्याची काय विविध कारणं आहेत ? हल्ली आम्ही दोघं आणि आमची दोघं यात शहरी भागात तिसरे आणि चौथे हे आईवडील आहेत, तेव्हा ते एकत्र राहु शकतात काय ? एक कारण करमत नाही. दुसरं कारण शहरातील वाढता खर्च. तिसरी गोष्ट कुटुंबात अधिकार राहात नाही, त्यांची कोणतीही मतं ही पटत नाही. जुनी वाटतात. विचारांमधे प्रचंड तफावत असते, आपलं गावपण त्यांना सुटत नाही. आई-वडील शहरात येतात ते आपलं सर्व गावपण घेऊन. मग, मत पटली नाही की, ताण तणाव वाढतो. व्यक्त होता येत नाही म्हणुन मग आदळ आपट (ही आदळापटही कुठेही होऊ शकते) होते असे मी म्हणतोय. सामंजस्यचा मुद्दा पेठकर साहेबांनी खाली मांडलाच आहे, तो आवश्यक आहे, ते होत नाही. म्हणुन ते म्हणतात. आम्ही राहतो रे गावात. सणासुदीला येत चला. इतकेच....

आता जिथे शक्यच नाही, तिथे मग ऋषिकेशची कविता लागु होतेच....

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

24 Jul 2013 - 9:54 pm | रेवती

शहरातील माणसं त्यांना अ‍ॅडजस्ट करुन घेत नाहीत
आणि
शहरात मुलांबरोबर आईवडील स्थिरावत का नाही
आता समजले. मला आधी वाटले की शहरातील शेजारीपाजारी अ‍ॅडजस्ट करत नाहीत असे म्हणावयाचे आहे का! शहरातील माणसे म्हणजे त्यांचीच मुले असा अर्थ घ्यायचा असल्याचे लक्षात आले.

अग्निकोल्हा's picture

24 Jul 2013 - 11:35 pm | अग्निकोल्हा

कोणाचि आगतिकता अभिप्रेत धरलि आहे ? आपलि कि घरच्यांची ?

मुख्यत्वेकरून स्वतःची. काही प्रमाणात घरच्यांची.

हे तर फार सुरेख...

आई इथे एकटीच, खोलीत तुझ्या बसते रे
ती म्हणत नसली तरी, दुसरे असे पाप नाहि.

तसे पाहता हिरव्या नोटेची माया परदेशस्थ लोकांना आईची मायेपेक्शा जास्त भावते...

स्पंदना's picture

26 Jul 2013 - 7:47 am | स्पंदना

मस्त हो ऋषीकेश!
खरच भावगर्भ कविता आहे.

पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार! :)