उकडीचे मोदक - एक ब्लेमगेम!

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in पाककृती
8 Sep 2016 - 8:44 pm

डिस्क्लेमरः-
इथे तुम्ही नेहमीच एकाहुन एक सरस पाकृ पहाता. पण ते म्हणजे कसं की सेलेब्रेटींचं आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहिल्या सारखं आहे. सामान्यांच्या व्यथा तुम्हाला कशा कळाव्यात? तर समाजातलया तळागाळातल्या लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण ह्या पाकृ मध्ये आहे. हृदय हेलावणारे काही फोटो आहेत. कोमल मनाच्या लोकांनी पाहु नका!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तर काय झालं की गणपती आले.. मग सगळीकडे मोदकांचे फोटोच फोटो.. साधेसुधे नाही, उकडीचे! आम्ही इथे अमेरिकेत, जिथे आई नाही की चितळे नाहीत की मोदक करुन आयते खाऊ घालतील. (आय ब्लेम अमेरिका!). त्यात पुन्हा वॉट्सअ‍ॅपवर मेसेज की कसं कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या वातावरणामुळे तिकडे उकडीचे आणि घाटावर तळणीचे मोदक असतात. मग मी म्हणलं की आपण आता घाटावरुन काठावर आलो ना (अ‍ॅझ इन इस्ट कोस्ट!) मग करावे का उकडीचे? (आय ब्लेम वॉटसॅप). मग काय झालं की मोदकांचे फोटो पाहुन पाहुन शेवटी एकाक्षणी माझ्या रिकाम्या (अ‍ॅझ इन प्रचंड रिकामटेकड्या!) मनाने निर्णय घेतला की आपण सुद्धा यंदा उकडीचेच मोदक करायचे.

एक भारतात फोन, एक स्रुजाला, एक माबोच्या लिंकला भेट आणि एक युट्युब रेसेपी ह्यावरुन माझं मत असं झालं की उकडीच्या मोदकांची उगाच हाईप आहे, हे काय कुणालाही जमतील. स्रुजाला जमले हे कळल्यावर तर माझा आत्मविश्वास दुप्पट झाला! ;) त्यात वर कुणीतरी म्हणे की इडीअप्पमच्या पीठाचे म्हणे फार छान मोदक होतात. आणि काय योगायोग बघा, घरात इडीअप्पमचं पीठ! त्यावर घटक पदार्थ - तांदुळ पीठ असं लिहीलेलं. म्हणलं असेल अजुन काहीतरी बारिक वगैरे दळलेलं पीठ.

तर तमाम जनतेने सांगितल्या प्रमाणे जाड बुडाच्या भांड्यात दोन कप पाणी उकळायला ठेवलं, त्यात तुप आणि मीठ टाकलं. उकळलं की त्यात बरोब्बर दोन कप इडीअप्पम पीठ टाकलं. टाकता क्षणी हलवलं आणि तत्क्षणी ते उपम्यासारखं दिसु लागलं!

upma

म्हणलं वाफ काढलं की होत असेल बुवा नीट. म्हणुन त्यावर झाकण ठेवलं. हां आता इंडक्शन कमी करायला विसरले मी जराशी पण म्हणुन काय ३० सेकंदात त्या पिठाने करपावं?? (आय ब्लेम इंडक्शन!) अर्धं पीठ जीवाच्या आकांताने तळाला चिकटलं होतं. मी जरासं हलवुन काय पाहिलं, सगळ पीठ काळं काळं दिसायला लागलं. मन घट्ट करुन ह्याचे काही मोदक होत नाहीत हे सत्य मी स्वीकारलं आणि नवर्‍याला फोन लावला. उकड चुकेल किंवा मोदक फुटतील अशा अपेक्षा त्याला होत्याच, पण उकड जळाली?? त्याचं खदाखदा हसुन झालं की म्हणलं बाबा तू घरी ये लवकर. आपण परत नुसतं तांदुळाचं पीठ घेऊन करुन पाहु.

ह्यावेळेस कुकरच घेतला डायरेक्ट. मागच्या वेळेस जे भांड घेतलं त्याचं बुड पुरेसं जाड नव्हतं वाटतं (आय ब्लेम भांडं!). पुन्हा दोन वाट्या पाणी उकळायला ठेवलं. ह्या वेळेस मात्र एक वाटी पिठ (अपना बझार तांदुळ पीठ - आणि अर्थातच आय ब्लेम अपना बझार) घातल्या घातल्याच ते चांगलंच मिळुन आलं. मी जात्याच चाणाक्ष असल्याने रेसेपीने काहीही सांगितलं तरी अजुन पिठ टाकलं नाही. मला चांगलं आठवत होतं की स्रुजाने सांगितलं होतं "चांगली दणदणीत वाफ काढ!". मग खाली लागत नाही ना हे सतत बघत दणदणीत वाफ काढली. (ऑफकोर्स, आय ब्लेम स्रुजा!). मनासारखी वाफ काढली की त्याला ताटात घेतलं आणि शक्य तेवढं मळलं. एवढी गरम उकड, पण मी हुं की चुं केलं नाही. फार सोशिक आहे हो मी. फायनली घेतला एक लहानसा गोळा आणि अक्षरशः तुपात बुडवुन बुडवन, चारदा मळुन, गोल गोल गरगरीत करुन मोदक करायला घेतला. पण हाय रे माझ्या कर्मा.. त्याला बारिक बारिक तडे जायला लागले. पहिला मोदक भुताचा म्हणुन दुसरा घेतला तर त्याचाही तोच अवतार..! वाफच कमी पडली बै म्हणुन परत ते सगळं प्रकरण पुन्हा कुकर मध्ये टाकुन परत दणदणीत वाफ काढली (स्रुजाच.. टु बी ब्लेमड )परत ते सगळं ताटात घेतलं आणि परत मोदक करण्याचा प्रयत्न चालवला.

उद्या तुम्हाला कुणी भाताची मुद देऊन ह्याचा मोदक करुन दाखव आणि कळ्या नाजुक काढ हं असं सांगितलं तर तुम्ही त्याच्या डोक्यात काय घालाल? मी कुकर घालेन..! भाताला आकार दिल्यासारखा आम्ही आपला प्रयत्न करतोय करतोय, त्या मोदकाचे तुकडेच व्हायला लागले. तरी मी बळं बळं सारण भरुन एक मोदक सदृश आकार बनवला. पण पुढच्याला मात्र सारण सुद्धा बाहेर येउन "काय चेष्टा लावलीये राव?" म्हणु लागलं.. मग त्याला "गप रे..गप" म्हणुन लाडु कसे वळतो आपण, तसं वळुन गप्पं करुन टाकलं. ह्या नादात त्याचा लाडुच झाला. तिकडे नवरा गेले साडे अकरा मिनिटं एक मोदक करायचा प्रयत्न करत होता.. मी जोरजोरात कुणा कुणाला ब्लेम करता येईल त्याची लिस्ट काढत होते..

"एक म्हण आहे ना ग!! आठवत नाही मला नीटशी.. काही तरी वाकडं.. कुणाचा तरी नाच.."

आय डेफिनाईटली ब्लेम नवरा..!

अखेर बर्‍याच झटापटीनंतर "उकडीचे लाडु" झाले. ते आधीच इतके शिजले होते की नाममात्र रेसेपी सेक ३० सेकंद वाफ काढुन आम्ही ते खायलाही घेतले. खाताना बाजुला सारणाचं भांडं घेतलं. एक घास मोदकाचा घेतला की एक बकाणा वर सारणाचा भरायचा.

सुंदरच लागत होते लाडु.. आपलं.. उकडीचे मोदक!

Modak Ladu

------------------------------------------------------------------------------------

ताजा कलमः-

मी मोदक लाडुंची पाककृती टाकल्यावर ४-५ तासातच मला इतके सल्ले मिळाले की का कोण जाणे परत एकदा मला "उकडीचे मोदक काही अवघड नाहीत" असं वाटायला लागलं. (स्रुजाला जमतात म्हणजे काय!!) ताडकन उठुन मी वाटीभर पाणी मीठ आणि तुप घालुन उकळलं. त्यात बरोब्बर एक वाटी पीठ टाकलं आणि लगेच इंडक्शन बंद करुन पटापट हलवलं. इंडक्शन बराच वेळ चांगलंच तापलेलं रहातं म्हणुन भांडं बाजुला सरकवलं आणि झाकुन ठेवलं. साधारण ५-६ मिनिटांनी ताटात घेऊन मळलं. सुमारे ५ मिनिटं पाणी आणि तुपाचा हात लावत लावत पुष्कळ मळल्यावर छोटा गोळा घेतला आणि मोदक करायला सुरवात केली. अगदी सुगरणीसारख्या मोदकाच्या कळ्या आल्या नसल्या तरी किमान कळ्या करता तर आल्या! सारण भरुन हलक्या हाताने मोदक बंद केला. असे ६-७ मोदक झाले. आणि मग ५ च मिनिटं वाफ काढली कारण मुळ उकडीत फार कच्चटपणा नसल्याने फार उकडायची गरज वाटली नाही.

आता बाप्पा करो आणि मला अमेरिकेतल्या भिकार सोना मसुरी नामक फडफडीत तांदुळाच्या ऐवजी भारतातल्या सुरेख तांदुळाची पिठी मिळो आणि बारिक बारिक कळ्या असणारा टप्पोरा मोदक माझ्या हातुन घडो!!

बघा तीन पैकी दोन मोदक किती चांगले जमलेत! आता एक भुताचा म्हणुन सोडुन द्यायचा!!

a

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

8 Sep 2016 - 8:49 pm | सामान्य वाचक

पुढच्या वेळेला मायक्रोवेव्ह मध्ये उकड करून बघ
लागत नाही, करपत नाही

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 10:03 pm | पिलीयन रायडर

मावे म्हण, ओव्हन म्हण.. काय म्हणशील ते करुन पहाते.. पण आता पुढच्या वर्षी!!

इरसाल's picture

8 Sep 2016 - 9:06 pm | इरसाल

तयार झालेला पदार्थ,
१. भाताचा मळलेला गोळा,
२. भाकरी करण्यासाठी तयार असलेला उंडा,
३. लहान मुलाने बनवलेला सफेद रंगाचा "क्ले" चा चेंडु,
४. तळण्यासाठी तयार खव्याचे गोळे,
५. थोडं भुरभुरवलं तर रव्याचे लाडु,
६. जापनीज राईस बॉल,
७. डोसा बनवण्यासाठी तव्यावर तेल फिरवायला लागणारा ठसा,
८. तांदळाच्या पिठाचा बटाटा-पराठा,
९. आणी तुम्ही म्हणताच आहात तर "मो द क"

म्हणुन कुठेही चालुन जातील.

आय टु ब्लेम पिरा अ‍ॅन्ड स्रुजा ...........खी खी खी ;)

स्रुजा's picture

8 Sep 2016 - 9:45 pm | स्रुजा

ख्या: ख्या: ख्या:

या अपराधाची भरपाई, पिरा, तू इकडे आलीस की तुला उदंड मोदक खायला घालुन करण्यात येईल.

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 9:50 pm | पिलीयन रायडर

=))

खुपच बुवा विनोदी लिहितेस तू.

येतेस का माझ्या घरी. आजच उकडीच्या मोदकाचा घाट घातला आहे. संध्याकाळी होतील करून तयार गरमा गरम.

आता मोदकाच्या टिपा: उकड करण्यासाठी पाणी आणि पिठाच प्रमाण १:१ असच घ्यायच. पाणी उकळलं की त्यात एक चमचा लोणी, चवीला मिठ टाकून मग लगेच पिठी टाकून भराभर हलवून घ्यायच आणि लगेल गॅस बंद करायचा व वर झाकण ठेवायचं, तेवढी वाफ बास होते पिठाला. ते मिश्रण थोड कोरड कोरडच दिसत. ५ मिनिटानी झाकण काढून एका परातीत (किंवा पसरट भांड्यात ज्यात पिठ मळता येईल) पिठ थोड थोड घेउन खुप वेळ मळायच. मळताना पाणी सतत हाताला लावून पिठ मळत राहायचं जोपर्यंत त्याचा मऊ लोण्याचा गोळा होत नाही.

सही रे सई's picture

8 Sep 2016 - 9:13 pm | सही रे सई

आणि हो मोदक वळून झाले की पाण्यात एकदा बुडवून लगेच वर काढायचे म्हणजे चिकटत नाहीत मोदक पात्राला. तसच मोदक पात्रा मधे (किंवा कुकर मधे जाळी ठेवून शिटी काढून टाकूज) १२-१५ मिनिट वेळ लावून चांगली वाफ काढायची (इथे जास्त वेळ शिजवायचे, उकड करताना नाही)

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 9:51 pm | पिलीयन रायडर

तू सांगतेस तर परत करुन पाहिन.. पुढच्या वर्षी!!

तांदुळ पिठ जुनं असणार ग! माझा काही दोषच नाहीये ह्यात!

रुस्तम's picture

9 Sep 2016 - 12:31 am | रुस्तम

मधे एकदा करून बघा प्रॅक्टिस म्हणून पुढच्या गणपती आधी

मी-सौरभ's picture

9 Sep 2016 - 4:57 pm | मी-सौरभ

थोडी रंगीत तालीम करुन बघाच.
दर महिन्यात संकष्टीला कष्ट करुन बघा.

पद्मावति's picture

8 Sep 2016 - 9:11 pm | पद्मावति

पिरा..=))))

संदीप डांगे's picture

8 Sep 2016 - 9:14 pm | संदीप डांगे

पाकृ सोपी करून सांगितल्याबद्दल धन्यवाद! या विकांताला पुन्हा वाचून हसेन! (पिरा नॉट टू बी ब्लेमड)

सूड's picture

8 Sep 2016 - 9:18 pm | सूड

हे बघा बरं जमलेत का?

modak

किंवा हे मागल्या वर्षीचे?

modak 1

modak 2

modak 3

modak 4

Modak 5

Modak 6

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2016 - 9:27 pm | टवाळ कार्टा

चायला सुडक्याला पण जमतात आणि तुम्हाला जमत नाहीत...कमाल आहे

स्रुजा's picture

8 Sep 2016 - 9:31 pm | स्रुजा

सुडक्याला "पण" म्हणु नकोस. त्यांना बर्‍याच पाकृ सुगरणींसारख्या जमतात. तिचा कॉमेंट आहे ना? स्रुजा ला "पण" जमलं, तो योग्य आहे.

आणि पिरा माझं चुकलंच गं. मी तुला गॅस कमी कर सांगायला विसरले आणि अगं माझं काय होतं ना, मला अवघड गोष्ट सोप्पी करुन सांगायची हातोटीच आहे बाई.. आता काय करु ?

a

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2016 - 9:42 pm | टवाळ कार्टा

सुडक्या"सर" यांना ब्रेच कैकै जम्ते ;)
बाकी तुम्च्याबाब्तीत कै अंदाज नै लाव्ता येत...चले तो चांद तक नै तो शाम तक असे काहिसे चायनीज टैपचे असावे असा अंदाज होता =))

हाहाहा, फार च आवडलंय मला हे. चायनीज मोदक :ड

नाही. पण माझे बरे होतात. आता फोटो आहे का शोधते. आणि यंदाची पिठी फार सुरेख होती (अग्रज, पुणे, अजुन कोण? )

टवाळ कार्टा's picture

9 Sep 2016 - 7:32 pm | टवाळ कार्टा

कर कर...तू चायनीज मोदक कर करुन खिलव मला...मी चायनीज फ्राईड राईस बनवेन तुझ्यासाठी...कट्टा करु

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 9:40 pm | पिलीयन रायडर

आपण कुणाला बोल्ताय?!! सुडरावांना नेहमीच पदार्थ जमतात बाळा!

अभ्या..'s picture

8 Sep 2016 - 9:32 pm | अभ्या..

असे नावाला जागु नये रे सुडक्या. माहिते आम्हाला तू हायस बल्लव पट्टीचा पण ब्लेम करायला असावं ना काहीतरी.

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 9:41 pm | पिलीयन रायडर

नाही तर काय!

प्रमोद देर्देकर's picture

9 Sep 2016 - 3:20 pm | प्रमोद देर्देकर

पी पी पिरा मोदकांच्या वाट्याला गेलीच कशाला? आय ब्लेम पिरा.

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 9:39 pm | पिलीयन रायडर

शप्पथ सांगते हे लिहीताना मला का कोण जाणे तुम्हीच आठवत होतात.. कारण अनेक टिपीकल कोकणी पदर्थांचे तुम्ही टाकलेले फोटो आजवर पाहिले आहेत! त्यामुळे आय ब्लेम यु टु!

रेवती's picture

8 Sep 2016 - 10:03 pm | रेवती

सूड, तुझी बात वेगळी आहे मनुष्या.........

अभिजीत अवलिया's picture

8 Sep 2016 - 9:32 pm | अभिजीत अवलिया

कुणीही यावे आणि हसत खेळत उकडीचे मोदक बनवावे इतके सोपे काम नाही ते. (ह.घ्या.)

कोकणात उकडीच्या मोदकासाठी वेगळे पीठ मिळते त्याचे मोदक (हळदीच्या पानात बनवलेले) खाल्लात तर दिवेआगरच्या बापटांना विसरून जाल.

अभिजीत अवलिया's picture

8 Sep 2016 - 9:42 pm | अभिजीत अवलिया

दिवेआगर पण कोकणच आहे. पण इथे कोकण म्हणजे सिंधदुर्ग जिल्ह्यात म्हणतोय मी.

अरे पण असतंच काय एवढं खास या उकडीच्या मोदकात? भरपूर ठिकाणी खाल्ले. सो सो प्रकार आहे. गिळगींळीत.
मोदक कशे पाहिजेत? घाटावरचे. मस्त खरपूस तळलेले. चुकून थोडासा गूळ वितळून बाहेर आला तरी त्याचा खरपूस वास असलेले. मस्त क्रिस्पी, टेस्टी. वरून तुपाची धार लागली की किती खातोय हे कळू नये अशे.
हे असले मोमो टाईप नकोच वाटतात.

स्रुजा's picture

8 Sep 2016 - 9:51 pm | स्रुजा

पुन्हा एकदा हाय कंबख्त ;)

माझं ही मत लग्नाआधी असंच होतं पण नाही हा, उकडीच्या मोदकांची आपली एक नजाकत (काय शब्द सुचलाय ! असलेच शब्द वापरुन मी काल पिराला घोड्यावर बसवलं, आणि हा सगळा गोंधळ झाला) असते. भरपूर तूप घालुन संपूर्ण भरलेल्या ताटाला इग्नोअर मारुन आधी मोदक संपवायचे, मग निवग्र्या. आणि मग वेळ झाला की उगा आपलं पहिली वाढ संपवुन उठायचं. मग कसं गणपती चा सण आहे असं वाटतं.

रुस्तम's picture

9 Sep 2016 - 12:35 am | रुस्तम

बायको कोल्हापूरची. हेच म्हणायची. ती पण आता स्वतः शिकली उकडीचे मोदक बनवायला.

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 9:54 pm | पिलीयन रायडर

नाही ते चांगले करणारे हवेत.. सुड सारखे. तू स्रुजाच्या हातचे खाल्ले असतील!!

रुपी's picture

8 Sep 2016 - 10:19 pm | रुपी

आधी मला हे उकडीचे मोदक लोकांनी भारी भारी म्हणून आवडायला लागले. म्हणजे "ब्लॅक" पिक्चरचं कसं आहे - की सगळे चांगला म्हणतात तसं तुम्हालाही म्हणावंच लागतं, तुम्ही म्हणालात की ब्लॅक आवडला नाही की लोक तुम्हाला वेड लागलंय की काय अशा नजरेने तुमच्याकडे पाहतात - स्वतःची आई आणि भाऊसुद्धा! तर आधी श्रेयसमध्ये तो गारच उकडीचा मोदकही भारी म्हणून खाल्ला. मग एका मैत्रिणीकडे मात्र खरंच खूप छान होता - तितका छान अजून परत कधीच मिळाला नाही. म्हणून म्हटलं स्वतःच करुन बघावेत कसे जमत नाहीत ते. मग एकदा सा.बां.बरोबर घाट घातला (अर्थात, आय ब्लेम ... , सांगायलाच पाहिजे का?) तेव्हा ते असेच पिरासारखे एकीकडे गोळे आणि बाजूला सारण घेऊन खाल्ले. पण इतक्या लवकर हार कसली मानतेय? मग एका गणपतीत पुन्हा मी एकटीच सरसावले. पुन्हा एकदा पोपट!
नवरा तर असेही दर वेळी साधे तळलेले मोदक खाऊन म्हणतच असे की हेच मोदक जास्त चांगले लागतात. आता निदान ३-४ वर्षे मी त्याच्याशीच सहमत आहे!

साधे तळलेले म्हणू नकात ना,
खरपूस तळलेले असे म्हणायचे.

मी नाही, नवरा म्हणतो .. आता छान खरपूस तळून त्याला खायला घालेन आणि मग तसेच म्हणायला शिकवेन =)

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 10:37 pm | पिलीयन रायडर

तळलेलेच मोदक भारी असतात! वादच नाही! मुख्य म्हणजे चुकत नाहीतच. उकडीचे मोदक खायला नशिब जोरात लागतं. माझ्या मैत्रिणीच्या आईने मी केलेत अगदी तसले मोदक मला खाऊ घातले होते. आणि त्याचं आम्हाला कौतुक सुद्धा करावं लागलं होतं!!

nanaba's picture

10 Sep 2016 - 9:08 am | nanaba

ब्लेक न आवडलेली (माझ्याव्यतिरिक्त )अजून एक व्यक्ती पाहून आनंद वाटला!
इसी बात पे एक उकडीका मोदक हो जाये.. :)

मानसी१'s picture

8 Sep 2016 - 10:27 pm | मानसी१

अगदी मनातले बोललात.

अरे पण असतंच काय एवढं खास या उकडीच्या मोदकात?

हाच प्रश्न आम्हाला त्या तळणीच्या मोदकांच्या बाबतीत पडतो. एकदा हळदीच्या पानात वाफवलेले गरमागरम उकडीचे मोदक खाल्लेस की हा प्रश्न पडणार नाही.

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 12:01 am | पिलीयन रायडर

हे मोदक कुठे मिळतील हे ही सांगा! कारण मला खरंच उकडीचे उत्तम मोदक खाण्याची इच्छा आहे.

बाकी तळलेल्या मोदकांना उकडीच्या मोदकांएवढा हाय क्लास सुगरणपणा लागत नाही हीच ती जमेची बाजु. पण तळलेले मोदक खमंग असतात हां खुप!

आणि हो.. तुमचे फोटो इतके रेडी आहेत तर तुमची रेसेपी सांगा की. नेक्श्ट टायमाला कामाला येईल!

स्रुजा's picture

9 Sep 2016 - 12:09 am | स्रुजा

पण सूड भौ, तिला रेसिपी द्यायच्या आधी तिचा कुकर लपवा.

ओके, तर रेसिपी!! सारणाची रेसिपी तुम्हाला माहित असेलच असं समजून ती सांगत नाही. उकड, येणेप्रमाणे!!
साधारण मध्यम आकाराचा बाऊल भरुन पिठी घेतली तर तांब्याभर पाणी उकळत ठेवायचं. पाण्याला उकळी आली की पातेलीच्या बुडापासून साधारण सेंटीमीटरभर उंचीचं पाणी पातेलीत ठेवून उरलेलं वेगळ्या भांड्यात काढायचं. परत पातेली गॅसवर ठेवायची, आता पाण्याला बारीक बारीक बुडबुड्यांसारखं आधण येईल. साधारण चमचाभर साजूक तूप पाण्यात घालायचं. आणि मग पिठी ओतायची. पिठी ढवळायला कालथा वैगरे घ्यायच्या फंदात पडायचं नाही. लाटणं नीट पुसून घ्यायचं आणि त्याने पिठी ढवळायची, सगळी नीट मिसळली की आच मंद करुन झाकण ठेवायचं, ही वेळ दीड ते दोन मिनीटापेक्षा जास्त असता कामा नये. त्यानंतर गॅस ताबडतोब बंद करायचा. त्यानंतर पाचेक मिनीटानी परातीत काढून मळायचं, कोरडं वाटलं तर आधी बाजूला काढून ठेवलेलं कोमट पाणी वापरायचं.
पारी आणि मुखर्‍यांसाठी स्टेप बाय स्टेप फोटोच देईन कधीतरी. मोदक वळून झाले की एक सुती फडकं ओलं करून किंचीत पिळावं, त्यातलं पाणी निथळतं असू द्यावं. चाळणीत अंथरुन त्यावर मोदक ठेवावे आणि उरलेल्या कापडाने झाकावे. असं केल्याने मोदकाला भेगा जात नाही. मोदक काढताना एका पसरट वाडग्यात पाणी घेवून ते एकेका मोदकावर हाताने सोडल्यासारखं करुन उचलावा, म्हणजे कापडाला न चिकटता मोदक निघतात.

आमचेही पहिले मोदक असेच झाले होते, त्यामुळे हार मानू नका.

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 12:46 am | पिलीयन रायडर

तुमचेही मोदक हुकले होते हे वाचुन हुरुप आला!

पण म्हणजे थोडक्यात जी उकड असते ती बर्‍यपैकी कोरडी असते तर. कारण मला वाटलं हे फार कोरडं होईल म्हणुन मी पिठ कमी घातलं आणि वरुन पुन्हा चांगली "दणदणीत" वाफ यायला पाण्याचे हबके मारले (अगदी थोडसच पाणी)

म्हणुन माझी उकड मऊ भातासारखी झाली होती. आणि मला ती फारच छान वाटत होती. पण अर्थात्च तिला तडे गेले आणि मी तिला परत वाफ काढली!!

कुणाला शक्य असेल तर उकड दिसते तरी कशी हे दाखवा राव! कधी उकडच पाहिली नाही तर मोदक कसे जमणार?!

कोरडी असते पण मळल्यानंतर नीट गोळा होतो. त्यातही एखादवेळेस कोरडी परवडते नंतर मळून घेता येऊ शकते. उकडीला नेमकं पाणी ठेवण्याचा अंदाज आपल्या आधीच्या किंवा त्याहून आधीच्या पिढीलाच जमतो असं निरीक्षण आहे. त्यामुळे त्यावर आमचा हा सोपा मार्ग!! अगदी घावन घालावे लागण्यापेक्षा किंचित कोरडी होणं सेफ असतं. ;)

पक्षी: निवगर्‍या वैगरे कराव्या लागण्यापेक्षा ... ;)

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 1:20 am | पिलीयन रायडर

ओके! परत नक्कीच ट्राय करेन!

ओ , निवग्र्या "कराव्या लागत" नाहीत. त्या करायच्याच असतात, उकड जास्त प्रमाणात करुन. काय राव !

त्या करायच्याच असतात,

अगदी!! पण मोदक करणार सांगून सगळ्याच उकडीच्या निवगर्‍या करायला लागणं बरं नव्हे !! =))

स्रुजा's picture

9 Sep 2016 - 8:09 pm | स्रुजा

हां, ते बरोबर च ;)

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Sep 2016 - 4:38 am | भ ट क्या खे ड वा ला

मस्त सही रेसिपी .
शेवटच वाक्य आवडल हार मानु नका जमणार नक्की तुमची रेसिपी वाचून

रुपी's picture

9 Sep 2016 - 4:58 am | रुपी

भारी रेसिपी!

आता पाण्याला बारीक बारीक बुडबुड्यांसारखं आधण येईल. >> याला कुणीतरी फार छान उपमा वापरली होती. मिपावरच वाचल्यासारखी वाटत आहे आणि हा ब्लेम गेम वाचायला सुरुवात केल्यापासून आठवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ती उपमा काही आठवेना :(

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 5:08 am | पिलीयन रायडर

हो हो.. मंग.. मुंग.. असं काहीसं.. काहीतरी म वरुन च असावं..

अभिजीत अवलिया's picture

9 Sep 2016 - 1:17 am | अभिजीत अवलिया

कुठे मिळतील म्हणजे? शिकावे लागतील करायला कुणा तरी एक्स्पर्ट व्यक्तीच्या हाताखाली. नाहीतर 'सुकांता' मध्ये मिळतील संकष्टीच्या दिवशी

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 1:19 am | पिलीयन रायडर

सुकांता.. आहे की सोप्पं उत्तर! शिकण्याचा प्रयत्न करुच हो.. पण ते वाटतं तितकं सोप्पं नाहीये..

अभिजीत अवलिया's picture

9 Sep 2016 - 1:25 am | अभिजीत अवलिया

सोपं नाहीच. माझ्या बायकोला पण 2-3 दा प्रयत्न केल्यावर जमू लागले. सध्या 5 पैकी 4 वेळा एकदम 'परफेक्ट' होतात. एक वेळा माती खाणे हा प्रकार होतोच.

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 1:32 am | पिलीयन रायडर

इतकं काही कम्पल्सरी नाहीये! आम्हा देशस्थांचे प्रकार सोप्पे असतात.. त्यामुळे तळणीचे मोदक हा अत्यंत सोप्पा पर्याय मला कायम उपलब्ध आहे! रादर तोच आमच्या घरात जास्त आनंदाने खाल्ला जातो.

पिशी अबोली's picture

9 Sep 2016 - 1:25 am | पिशी अबोली

गौरव स्नॅक्सला सुंदर मोदक मिळतात.

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 1:33 am | पिलीयन रायडर

कुठय ते? १००% जाईन बाई मी..

पिशी अबोली's picture

9 Sep 2016 - 1:38 am | पिशी अबोली

हैला, मला वाटलं गौरव स्नॅक्स वर्ल्ड फेमस असेल..

तुळशीबाग समोरच्या चितळेंच्या शेजारी जी छोटी छोटी दुकानं आहेत, त्यात गौरव स्नॅक्स आहे. मोदक, सुरळीच्या वड्या छान मिळतात. म्हणजे, चांगलं सगळंच मिळतं, पण हे खास.

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 1:47 am | पिलीयन रायडर

तुच माझी खरी मैत्रिण!

स्मिता चौगुले's picture

9 Sep 2016 - 10:49 am | स्मिता चौगुले

अभ्या आपल्या सोलापूरकड्चे कणकेचे वाफवलेले मोदक खल्लेत का?

रॉ प्रोडक्ट तळलेल्या मोदकासारखेच असते , फक्त तळ्ण्या ऐवजी वाफवतात.

ते ही छान लागतात.

ते मस्तच असतात हो स्मिताताई पण कसय ना, काहींचे काही उगाच मानबिंदू असतात. कशाला त्याला धक्का लावायचा.
आमचे सोलापूरचे वाफवलेले मोदक असे म्हणाले की शुभ्रपणाचे गोडवे सुरु होतील. त्यापेक्षा वा वा म्हणायाचे बास्स.

स्मिता चौगुले's picture

9 Sep 2016 - 11:45 am | स्मिता चौगुले

खिक्क..

मी-सौरभ's picture

9 Sep 2016 - 5:01 pm | मी-सौरभ

ऊगीच लोक 'बंदर क्या जाने ....' वगैरे वगैरे म्हणायच्या आधी मांडवली करुन टाक.

अद्द्या's picture

10 Sep 2016 - 2:58 pm | अद्द्या

मोमो टाईप

च्यायला ,,
खो घालतंय दोस्तीत असलं काही बोलून येडं .
अरे . . तो गरमागरम मोदक , तो थोडासा फोडून त्यावर आपरस ओतायचा.. वाटल्यास तूप .,

आणि मग तो अक्खा उचलून तोंडात टाकायचा.. 14-15 तर मीच संपवतोय असे :D

शिवाय मी एकदा भेंडीची भाजी पण जाळली होती ( गॅसवर ठेवुन, झोपुन गेले) त्यामुळे मोदक निदान जळले तरी पाहिजेत च ;)

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 9:42 pm | पिलीयन रायडर

तू आधी तुझ्या मोदकांचे फोटो टाक. मला फार डौट आहे तुझ्यावर!!!

तो उगारलेला कुकर माझ्यावर च नेम धरुन होता हे कळतंय मला आता. तरीच मला ठेचा लागत होत्या येता जाता काल.

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2016 - 9:44 pm | टवाळ कार्टा

गॅस कोणी पेटवला मग ;)

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 9:49 pm | पिलीयन रायडर

बायका लावल्यात तीन!! तीन हजार पगार वाल्या!!

स्रुजा's picture

8 Sep 2016 - 9:53 pm | स्रुजा

९ गं ९ हजार वाल्या. एवढ्या स्वस्तात भेंडीची भाजी जाळुन मिळत नाही. गॅस लावुन झोपले रे टक्या.

खटपट्या's picture

8 Sep 2016 - 9:49 pm | खटपट्या

काय लोकं असतात. गण्पतीच्या दीवसात मोदक बिघडवतात. आणि वर इथे येउन सांगतात.
वाटत पण नाही काही...

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 9:53 pm | पिलीयन रायडर

गणपतीच मोदक बिघडवत असतो.. आय ब्लेम गणपती!

खटपट्या's picture

8 Sep 2016 - 9:55 pm | खटपट्या

माझ्या आइने हे मोदक बघीतले असते ना तर गणपतीबरोबर तुमच्याही पाया पडली असती...:)

यात २ एपिक मोमेंटस होत्या. एक तर पुन्हा एकदा वाफ !! आणि दुसरं म्हणजे एक घास सारणाचा आणि एक मोदकाचा.

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 9:58 pm | पिलीयन रायडर

गप की!! फुकट मला घोड्यावर बसवलं!!

बरं ह्या सगळ्यात त्या निवगर्‍या राहुनच गेल्या!! =))

स्रुजा's picture

8 Sep 2016 - 10:03 pm | स्रुजा

शोधतेच थांब.

निवग्र्या केल्या नाहीत??? आयटम कुठची ! आता येच तू. मेनु फिक्स्ड !

सामान्य वाचक's picture

9 Sep 2016 - 9:00 am | सामान्य वाचक

हसून हसून

ओक्के खटपट्याजी, मग कोणत्या सणाच्या दिवसात मोदक बिघडवल्यास व येऊन सांगितल्यास काही न वाटलेले चालेल?

खटपट्या's picture

12 Sep 2016 - 9:47 pm | खटपट्या

गणपतीच्या दीवसात मोदक बिघडवल्यामुळे भावना वगैरे दुखावल्या गेल्या ना....

स्रुजा's picture

12 Sep 2016 - 10:54 pm | स्रुजा

रेवाक्का आणि पिरा भयंकर इन्टॉलरंट आहेत !! छ्या.. देश आधीच सोडलेला असल्याने निशेध म्हणुन परत जावं का ??

पैसा's picture

12 Sep 2016 - 10:57 pm | पैसा

आधी चौथीच्या वर्गात मिळालेले बक्षीस परत करा.

पिलीयन रायडर's picture

12 Sep 2016 - 10:59 pm | पिलीयन रायडर

अर्रेर्र्र्रे!!!

=))

स्रुजा's picture

12 Sep 2016 - 11:29 pm | स्रुजा

लोल.. नको आता मला रेवाक्का आणि पिरा खुप महान वाटायला लागल्यायेत. मला अतुल्य मोदकां ची अ‍ॅम्बॅसेडर करा :प

निशेध म्हणुन परत जावं का ??
कश्याला? तिकडचे आनंदी लोक्स बघवत नाहीत का?

भावनाबद्दल तुमच्या घरी माहिती आहे का?

खटपट्या's picture

28 Sep 2016 - 10:29 pm | खटपट्या

बघा, काढलीत ना खपली? :(

पैसा's picture

8 Sep 2016 - 9:57 pm | पैसा

=))) ख्या ख्या ख्या! उगीच अबीरने केलेले राईस बॉल्स आपण केले म्हणून खपवू नकोस! =)) =)) =))

स्रुजा's picture

8 Sep 2016 - 9:59 pm | स्रुजा

ठ्ठो!! ___/\__

कॉमेंट ऑफ द ईअर म्हणुयात याला !

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 10:01 pm | पिलीयन रायडर

=))

त्याने कुंग फु पांडाचे डंपलिंग म्हणुन खाल्लेत!!

खटपट्या's picture

8 Sep 2016 - 10:02 pm | खटपट्या

लोळ :)

या लेखमालेतली 'सैराट पाककृती'!