Skip to main content

उकडीचे मोदक - एक ब्लेमगेम!

लेखक पिलीयन रायडर यांनी गुरुवार, 08/09/2016 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः- इथे तुम्ही नेहमीच एकाहुन एक सरस पाकृ पहाता. पण ते म्हणजे कसं की सेलेब्रेटींचं आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहिल्या सारखं आहे. सामान्यांच्या व्यथा तुम्हाला कशा कळाव्यात? तर समाजातलया तळागाळातल्या लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण ह्या पाकृ मध्ये आहे. हृदय हेलावणारे काही फोटो आहेत. कोमल मनाच्या लोकांनी पाहु नका! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ तर काय झालं की गणपती आले.. मग सगळीकडे मोदकांचे फोटोच फोटो.. साधेसुधे नाही, उकडीचे! आम्ही इथे अमेरिकेत, जिथे आई नाही की चितळे नाहीत की मोदक करुन आयते खाऊ घालतील. (आय ब्लेम अमेरिका!). त्यात पुन्हा वॉट्सअ‍ॅपवर मेसेज की कसं कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या वातावरणामुळे तिकडे उकडीचे आणि घाटावर तळणीचे मोदक असतात. मग मी म्हणलं की आपण आता घाटावरुन काठावर आलो ना (अ‍ॅझ इन इस्ट कोस्ट!) मग करावे का उकडीचे? (आय ब्लेम वॉटसॅप). मग काय झालं की मोदकांचे फोटो पाहुन पाहुन शेवटी एकाक्षणी माझ्या रिकाम्या (अ‍ॅझ इन प्रचंड रिकामटेकड्या!) मनाने निर्णय घेतला की आपण सुद्धा यंदा उकडीचेच मोदक करायचे. एक भारतात फोन, एक स्रुजाला, एक माबोच्या लिंकला भेट आणि एक युट्युब रेसेपी ह्यावरुन माझं मत असं झालं की उकडीच्या मोदकांची उगाच हाईप आहे, हे काय कुणालाही जमतील. स्रुजाला जमले हे कळल्यावर तर माझा आत्मविश्वास दुप्पट झाला! ;) त्यात वर कुणीतरी म्हणे की इडीअप्पमच्या पीठाचे म्हणे फार छान मोदक होतात. आणि काय योगायोग बघा, घरात इडीअप्पमचं पीठ! त्यावर घटक पदार्थ - तांदुळ पीठ असं लिहीलेलं. म्हणलं असेल अजुन काहीतरी बारिक वगैरे दळलेलं पीठ. तर तमाम जनतेने सांगितल्या प्रमाणे जाड बुडाच्या भांड्यात दोन कप पाणी उकळायला ठेवलं, त्यात तुप आणि मीठ टाकलं. उकळलं की त्यात बरोब्बर दोन कप इडीअप्पम पीठ टाकलं. टाकता क्षणी हलवलं आणि तत्क्षणी ते उपम्यासारखं दिसु लागलं! upma म्हणलं वाफ काढलं की होत असेल बुवा नीट. म्हणुन त्यावर झाकण ठेवलं. हां आता इंडक्शन कमी करायला विसरले मी जराशी पण म्हणुन काय ३० सेकंदात त्या पिठाने करपावं?? (आय ब्लेम इंडक्शन!) अर्धं पीठ जीवाच्या आकांताने तळाला चिकटलं होतं. मी जरासं हलवुन काय पाहिलं, सगळ पीठ काळं काळं दिसायला लागलं. मन घट्ट करुन ह्याचे काही मोदक होत नाहीत हे सत्य मी स्वीकारलं आणि नवर्‍याला फोन लावला. उकड चुकेल किंवा मोदक फुटतील अशा अपेक्षा त्याला होत्याच, पण उकड जळाली?? त्याचं खदाखदा हसुन झालं की म्हणलं बाबा तू घरी ये लवकर. आपण परत नुसतं तांदुळाचं पीठ घेऊन करुन पाहु. ह्यावेळेस कुकरच घेतला डायरेक्ट. मागच्या वेळेस जे भांड घेतलं त्याचं बुड पुरेसं जाड नव्हतं वाटतं (आय ब्लेम भांडं!). पुन्हा दोन वाट्या पाणी उकळायला ठेवलं. ह्या वेळेस मात्र एक वाटी पिठ (अपना बझार तांदुळ पीठ - आणि अर्थातच आय ब्लेम अपना बझार) घातल्या घातल्याच ते चांगलंच मिळुन आलं. मी जात्याच चाणाक्ष असल्याने रेसेपीने काहीही सांगितलं तरी अजुन पिठ टाकलं नाही. मला चांगलं आठवत होतं की स्रुजाने सांगितलं होतं "चांगली दणदणीत वाफ काढ!". मग खाली लागत नाही ना हे सतत बघत दणदणीत वाफ काढली. (ऑफकोर्स, आय ब्लेम स्रुजा!). मनासारखी वाफ काढली की त्याला ताटात घेतलं आणि शक्य तेवढं मळलं. एवढी गरम उकड, पण मी हुं की चुं केलं नाही. फार सोशिक आहे हो मी. फायनली घेतला एक लहानसा गोळा आणि अक्षरशः तुपात बुडवुन बुडवन, चारदा मळुन, गोल गोल गरगरीत करुन मोदक करायला घेतला. पण हाय रे माझ्या कर्मा.. त्याला बारिक बारिक तडे जायला लागले. पहिला मोदक भुताचा म्हणुन दुसरा घेतला तर त्याचाही तोच अवतार..! वाफच कमी पडली बै म्हणुन परत ते सगळं प्रकरण पुन्हा कुकर मध्ये टाकुन परत दणदणीत वाफ काढली (स्रुजाच.. टु बी ब्लेमड )परत ते सगळं ताटात घेतलं आणि परत मोदक करण्याचा प्रयत्न चालवला. उद्या तुम्हाला कुणी भाताची मुद देऊन ह्याचा मोदक करुन दाखव आणि कळ्या नाजुक काढ हं असं सांगितलं तर तुम्ही त्याच्या डोक्यात काय घालाल? मी कुकर घालेन..! भाताला आकार दिल्यासारखा आम्ही आपला प्रयत्न करतोय करतोय, त्या मोदकाचे तुकडेच व्हायला लागले. तरी मी बळं बळं सारण भरुन एक मोदक सदृश आकार बनवला. पण पुढच्याला मात्र सारण सुद्धा बाहेर येउन "काय चेष्टा लावलीये राव?" म्हणु लागलं.. मग त्याला "गप रे..गप" म्हणुन लाडु कसे वळतो आपण, तसं वळुन गप्पं करुन टाकलं. ह्या नादात त्याचा लाडुच झाला. तिकडे नवरा गेले साडे अकरा मिनिटं एक मोदक करायचा प्रयत्न करत होता.. मी जोरजोरात कुणा कुणाला ब्लेम करता येईल त्याची लिस्ट काढत होते.. "एक म्हण आहे ना ग!! आठवत नाही मला नीटशी.. काही तरी वाकडं.. कुणाचा तरी नाच.." आय डेफिनाईटली ब्लेम नवरा..! अखेर बर्‍याच झटापटीनंतर "उकडीचे लाडु" झाले. ते आधीच इतके शिजले होते की नाममात्र रेसेपी सेक ३० सेकंद वाफ काढुन आम्ही ते खायलाही घेतले. खाताना बाजुला सारणाचं भांडं घेतलं. एक घास मोदकाचा घेतला की एक बकाणा वर सारणाचा भरायचा. सुंदरच लागत होते लाडु.. आपलं.. उकडीचे मोदक! Modak Ladu ------------------------------------------------------------------------------------ ताजा कलमः- मी मोदक लाडुंची पाककृती टाकल्यावर ४-५ तासातच मला इतके सल्ले मिळाले की का कोण जाणे परत एकदा मला "उकडीचे मोदक काही अवघड नाहीत" असं वाटायला लागलं. (स्रुजाला जमतात म्हणजे काय!!) ताडकन उठुन मी वाटीभर पाणी मीठ आणि तुप घालुन उकळलं. त्यात बरोब्बर एक वाटी पीठ टाकलं आणि लगेच इंडक्शन बंद करुन पटापट हलवलं. इंडक्शन बराच वेळ चांगलंच तापलेलं रहातं म्हणुन भांडं बाजुला सरकवलं आणि झाकुन ठेवलं. साधारण ५-६ मिनिटांनी ताटात घेऊन मळलं. सुमारे ५ मिनिटं पाणी आणि तुपाचा हात लावत लावत पुष्कळ मळल्यावर छोटा गोळा घेतला आणि मोदक करायला सुरवात केली. अगदी सुगरणीसारख्या मोदकाच्या कळ्या आल्या नसल्या तरी किमान कळ्या करता तर आल्या! सारण भरुन हलक्या हाताने मोदक बंद केला. असे ६-७ मोदक झाले. आणि मग ५ च मिनिटं वाफ काढली कारण मुळ उकडीत फार कच्चटपणा नसल्याने फार उकडायची गरज वाटली नाही. आता बाप्पा करो आणि मला अमेरिकेतल्या भिकार सोना मसुरी नामक फडफडीत तांदुळाच्या ऐवजी भारतातल्या सुरेख तांदुळाची पिठी मिळो आणि बारिक बारिक कळ्या असणारा टप्पोरा मोदक माझ्या हातुन घडो!! बघा तीन पैकी दोन मोदक किती चांगले जमलेत! आता एक भुताचा म्हणुन सोडुन द्यायचा!! a

वाचने 80714
प्रतिक्रिया 232

प्रतिक्रिया

In reply to by खटपट्या

यात २ एपिक मोमेंटस होत्या. एक तर पुन्हा एकदा वाफ !! आणि दुसरं म्हणजे एक घास सारणाचा आणि एक मोदकाचा.

In reply to by खटपट्या

ओक्के खटपट्याजी, मग कोणत्या सणाच्या दिवसात मोदक बिघडवल्यास व येऊन सांगितल्यास काही न वाटलेले चालेल?

In reply to by खटपट्या

रेवाक्का आणि पिरा भयंकर इन्टॉलरंट आहेत !! छ्या.. देश आधीच सोडलेला असल्याने निशेध म्हणुन परत जावं का ??

=))) ख्या ख्या ख्या! उगीच अबीरने केलेले राईस बॉल्स आपण केले म्हणून खपवू नकोस! =)) =)) =))

In reply to by पैसा

ठ्ठो!! ___/\__ कॉमेंट ऑफ द ईअर म्हणुयात याला !

In reply to by पैसा

=)) त्याने कुंग फु पांडाचे डंपलिंग म्हणुन खाल्लेत!!

In reply to by पैसा

लोळ :)

In reply to by रेवती

अगं जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती! उकडीच्या लाडवांची पाकृ जनमानसात रुजवण्याची तळमळ आहे हो!

पिरा !! :D :D तू सगळे नियम पाळून (सुद्धा) जर मोदक बिघडले तर पिठाला blame करू शकतेस ;) "इकडे कोकण/मुंबई सारखे मोदकाचे पीठच कसे मिळत नाही !!! " असे म्हणून.

In reply to by प्रियान

नाहीच मिळत!! लोक अग्र्जच्या तांदुळ पिठ्या आणतात पुण्याहुन, फ्रिज करुन ठेवतात, म्हणुन त्यांचे मोदक चांगले होतात हो! बाकी काही सुगरणपणा नाहीये त्यात! ;)

In reply to by पिलीयन रायडर

आजच इथली स्वाद ची तांदूळपिठी आणून त्याचे सुंदर मोदक केले.. त्यामुळे अग्रजचीच पिठी पहिजे असे काही नाही हा.

हा हा हा. अगदी खदखदुन हसले. बाकी उकडीचे मोदक ज्याना जमतात त्याना जमु दे बाबा. मी पण उकडीच्या गोळ्या बरोबर भरपुर टाइमपास करुन झाल्यावर शेवटी हार मानली. आता अजीबात भानगडीत पडत नाही. सरळ उकडीच्या करंज्या करते. एकदम सोपा प्रकार

हा हा हा. अगदी खदखदुन हसले. बाकी उकडीचे मोदक ज्याना जमतात त्याना जमु दे बाबा. मी पण उकडीच्या गोळ्या बरोबर भरपुर टाइमपास करुन झाल्यावर शेवटी हार मानली. आता अजीबात भानगडीत पडत नाही. सरळ उकडीच्या करंज्या करते. एकदम सोपा प्रकार

सर्वात वाइट वाटलं ते इतक्या विनोदी लेखाला विकिछाप प्रतिसाद देऊन सूड घेतला गेला आहे याचं. आमच्याकडेही बाप्पाचा प्रसाद जाहिर केला आणि मी सांगितल्याप्रमाणे हिने मोदक करून दिले पण चवीला उजवे झाले तरी रूपाला डावे झाल्याने पाकृ दिली नाही.बाकी पिरा मोदक पाकृती लेखन सेक्सी का काय ते झाले आहे.

सुंदरच दिसत आहेत लाडु.. आपलं.. उकडीचे मोदक! =)) =)) =)) लेखाची पाकृ खास जमली आहे. पुढच्या वेळेस पनीर वापरुन पहा व नंतर ते खाल्लेल्या लोकंचे फोटो टाका ;) :)

मोदक असले कसले फसले वाचक सगळे फिसकन् हसले! पिरा ताई: मिपावरच्या उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे आणि अ‍ॅक्सिडेंटल वडे अशा अजरामर फसलेल्या पाककृतीं मध्ये स्वागत असो!

शेवटच्या चित्रात जे आहे ते--- चंद्रावर कि मंगळावरचे असे दगडगोटे आहेत म्हणे!!

Hahaha.पिलियन रायडर....मोदक नही जम्या पण ल्हिणं जमून आलंय. मस्त. बाकी उकडीचे मोदक अती hyped पाकृ होय!!

हसून हसून पुरेवाट झाली ! क्लास लिखाण ! लेखाला नाव पण कसलं परफेक्ट दिलं आहेत! मला पंधरा वीस वर्षांपूर्वीची आठवण झाली. मी कोकणस्थ, स्वीट टॉकरीणबाई देशस्थ. एक दिवस म्हणाली, "काय तुमच्या उकडीच्या मोदकाचं कौतुक, करून बघतेच!" मला आणि पुनवला बाहेर पिटाळलं. आम्ही तासाभरानी खेळून घामाघूम घरी परतलो. स्वयंपाकघरात डोकावलो तर स्वीट टॉकरीणबाई आमच्यापेक्षा जास्त घामेजलेली! चेहर्यावर हताश भाव! मला काही विचारायचं धाडसंच झालं नाही. तिनी आत्यंतिक तळमळीनी फक्त तीन शब्द उच्चारले, "चिकचिकाट आणि रबरबाट!" आणि तिघेही हसून हसून गडाबडा लोळलो! आता आमच्याकडे नियमितपणे उकडीचे मोदक असतात. 'जोशी फूड्स्' मधून आणलेले.

आम्हाला कुंग-फु-पांडेंचे डम्पलिंग्स खायला मिळाले नै, आय तर लगेच ब्लेम पिरा तै. लेख तर लेख, प्रतिक्रिया पण भारी. बाबा योगीराज.

ताजा कलमः- मी मोदक लाडुंची पाककृती टाकल्यावर ४-५ तासातच मला इतके सल्ले मिळाले की का कोण जाणे परत एकदा मला "उकडीचे मोदक काही अवघड नाहीत" असं वाटायला लागलं. (स्रुजाला जमतात म्हणजे काय!!) ताडकन उठुन मी वाटीभर पाणी मीठ आणि तुप घालुन उकळलं. त्यात बरोब्बर एक वाटी पीठ टाकलं आणि लगेच इंडक्शन बंद करुन पटापट हलवलं. इंडक्शन बराच वेळ चांगलंच तापलेलं रहातं म्हणुन भांडं बाजुला सरकवलं आणि झाकुन ठेवलं. साधारण ५-६ मिनिटांनी ताटात घेऊन मळलं. सुमारे ५ मिनिटं पाणी आणि तुपाचा हात लावत लावत पुष्कळ मळल्यावर छोटा गोळा घेतला आणि मोदक करायला सुरवात केली. अगदी सुगरणीसारख्या मोदकाच्या कळ्या आल्या नसल्या तरी किमान कळ्या करता तर आल्या! सारण भरुन हलक्या हाताने मोदक बंद केला. असे ६-७ मोदक झाले. आणि मग ५ च मिनिटं वाफ काढली कारण मुळ उकडीत फार कच्चटपणा नसल्याने फार उकडायची गरज वाटली नाही. आता बाप्पा करो आणि मला अमेरिकेतल्या भिकार सोना मसुरी नामक फडफडीत तांदुळाच्या ऐवजी भारतातल्या सुरेख तांदुळाची पिठी मिळो आणि बारिक बारिक कळ्या असणारा टप्पोरा मोदक माझ्या हातुन घडो!! बघा तीन पैकी दोन मोदक किती चांगले जमलेत! आता एक भुताचा म्हणुन सोडुन द्यायचा!! Modak

In reply to by पिलीयन रायडर

वा! मस्तच! बाकी तुझं लेकरू तुला इतके प्रयोग करु देतं आणि लिहायलाही वेळ देतं म्हणजे फारच गुणी हो :)

In reply to by पिलीयन रायडर

जमलं की!! आता उगाच उपदेशाचे बोलः मुखर्‍या करताना आपली तर्जनी पारीच्या आतल्या भागात ठेवायची आणि जिथे तर्जनी असेल, पारीचा नेमका तो भाग अंगठा आणि मधल्या बोटाच्या चिमटीत धरायचा. असं केलं तर आरामात ९-१० मुखर्‍या होतात.

In reply to by सूड

हो कळ्या काढता येतात मला बर्‍यापैकी पण कालच्या उकडीच्या सुद्धा कडा तुटत होत्याच. पण किमान कळ्या सदृश काही करता तर येत होतं हीच काय ती समाधानाची बाब. आता अजुन प्रॅक्टिस करुन उकड करते. पण तुमच्यामुळेच जमलं हां!! तुम्ही आणि सईने फार छान टिप्स दिल्या! धन्यवादः ।

In reply to by पिलीयन रायडर

किती किती वेळा शाब्बासकी देऊ तुला. तुझ्या उत्साहाला आणि चटकन शिकण्याला माझा त्रिवार सॅल्युट. मस्त झाले आहेत मोदक. आता पुढच्या वर्षी बप्पा नाचत नाचत येतील तुझ्या हातच्या मोदकांचा नैवेद्य खायला मिळणार म्हणून.

In reply to by सूड

?? कळालं नाही हो! पण काल मल मोदक जमले आहेत ह्याला माझा नवरा, फेसबुक आणि स्रुजा साक्षी आहे!! टाईमस्टॅम्प्स दाखवु का?! =))

In reply to by पिलीयन रायडर

नवरा डझ नॉट काऊंट ! :प तो आधीच्या मोदकांना पण छान म्हणालाय आम्हा सगळ्यांच्या साक्षीने.

In reply to by स्रुजा

+१ आणि फेस्बुकावर तर लोक स्वतःबद्दल कायपण लिहितात, म्हणजे तो पण फाऊलच आहे. एकंदरीत हा दावा २/३ बहुमताने फेटाळला गेलेला आहे. :)

In reply to by पिलीयन रायडर

पिरा,उकड खूप मळून घ्यावी लागते.तेलपाण्याचा हात लावून आणि ती सुद्धा गरम असतानाच.म्हणजे तुटत नाही पारी.

१००

कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती .... स्वानुभव :) शुभेच्छा!मोदक करण्यात अयशस्वी झाली असली तरी निर्दोषत्व सिध्द करण्यात यशस्वी :) लेख उत्तम जमलाय..

काटेकोर बनवणे, सुंदर प्रेझेंटेशन, उत्कृष्ट फोटो, झक्कास एण्डप्रॉडक्ट हे सगळं एकत्र करून पाककृती टाकायला 'कौशल्य' लागतं. अज्जिबात न जमलेला पदार्थ खुसखुशीत शैलीत मिपावर टाकायला डेरिंग लागते. आणि फिनिक्सप्रमाणे भरारी घेत मस्स्त उकडीचे मोदक बनवायला मिपाचं सदस्यत्व लागतं. हाबिणंदन ओ...

मोदक : शुभांगीताईंची मोदक करण्याची (ते मधे जाड ठेवायचे इ.इ. पद्धत मस्त आहे. शुभांगी ताईंनी केलेले चिकन मात्र फार मस्त होते. मोदक आता बायकोला करायला सांगणार आहे. पण सूड यांनी सांगितलेली टीप वाचायला देऊन.... :-)