आल्प्स च्या कुशित आम्ही खुशित !!! भाग २ उत्तरार्ध

सुहास बांदल's picture
सुहास बांदल in भटकंती
4 Sep 2016 - 3:30 pm

​​
मागील भागाची लिंक http://www.misalpav.com/node/37121

दिवस २

काल चा दिवस थोडा धावपळीत गेला होता त्या मुळे मस्त झोप झाली होती. सकाळी अपार्टमेंट वर च नाश्ता करून आम्ही १० ला निघालो ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अपार्टमेंट ला परत यायचे असे मला सांगण्यात आले (जणु काही प्रवासात माझ्या मुळे च उशीर होतो.) कालच्या प्रमाणे आज पण मला कुठे जायचे आहे याची फारशी कल्पना नव्हती. मग प्रिया ने तिच्या 'Bucket List' मधील एक जागा मला सांगितली. तर आज आम्ही जाणार होतो 'अल्पाईन कोस्टर ग्लेशीयर ३००० ' ला. रस्ता अंदाजे १३५ किमी / वेळ अंदाजे २ तास. म्हणजे आज साधारण पणे ३०० किमी / ४-५ तास रथा च सारथ्य करणे भाग होते. वाढेलले अंतर या साठी धरले की आज पर्यंत चा अनुभव असा आहे की एक तर कुठे तरी रस्ता चुकतो अथवा परत येताना अजून एखादी जागा पाहून येतो आणि स्विस मध्ये असे होण्याची शक्यता नक्की च होती. आज चा दिवस सर्वात लांबच्या प्रवासा चा होता त्या मुळे गाडी मध्ये पाणी, फळे, आणि चॉकलेट्स चा भरणा केला. ऐनवेळी कुठे काही मिळाले नाही तर गडबड होणार आणि मिळाले तर खूप महाग कारण स्विस खूप च महाग आहे.

आज प्रशांत मदतीला होता त्या मुळे दिशा मार्गदर्शनाचे काम सुलभ होणार होते. शनिवार असल्या मुळे रस्त्यावर तुरळक गर्दी होती तरी अस्मादिक पहिल्या २० मिनटातच एक राऊंडअबौट चुकले पण लवकरच प्रशांत च्या मार्गदर्शना मुळे मुळ मार्गा वर आलो. साधारणपणे ४० किमी आम्ही गावातल्या रस्त्यावरून गेलो पण मग वेग मर्यादा असल्या मुळे प्रशांत नि GPS ला हायवे ला न्यायला सांगितले. रस्त्यात २ वेळा टोल भरून आम्ही मार्गस्थ झालो. शेवट चा २५ किमी चा रस्ता खुप च घाटातला आहे. त्यातच कार छोटी आणि पूर्ण पणे वजनदार व्यक्तिमत्वांनी भरल्या मुळे कच खात होती. एक दोनठिकाणी तर वाटले कि डोक्या वर घेऊन जावी लागेल गाडी. लिखाण करताना आणि वाचताना मजा वाटेल पण अशी वेळ कशी निभावून नेली ते मला च ठाऊक. मजल दरमजल करत आमचा लवाजमा एकदाचा पोचला.

गाडी खाली पार्क करावी लागते व इथून पुढचा प्रवास हा केबल कार मधून करावा लागतो. केबल कार चे माणशी तिकीट ९० स्विस फ्रँक्स आहे. केबल कार २ टप्प्यात आपल्याला वरती नेते. केबल कार चा वेग पर्यटकाना व्यवस्थित मजा करण्या जोगा आहे. वरती जाताना स्विस निसर्गाने मन भरून येते. वरती जाताना तापमानातील फरक लगेच जाणवतो. आम्ही जॅकेट्स घेतली होती त्या मुळे वाचलो. वातावरण ७ डिग्री पर्यंत थंड झाले होते आणि थोडी हवा पण होती. समोरचे दृश्य खूप च सुंदर होते. दूर वर पर्वत आणि पर्वत होते पण बर्फ कमी होते. दृश्यमानता (व्हिसिबिलीटी) खूप च दूरवर होती. पण आमचा आधीच्या स्विस च्याहवामानाचा अनुभव पाठीशी होता. इथे हवामान कधी पण बदलु शकते आणि त्याचा फटका १ तासाने बसला.

आता थोडे 'अल्पाईन कोस्टर ग्लेशीयर ३०००'विषयी.'अल्पाईन कोस्टर ग्लेशीयर' Gstaad मध्ये आहे. हि जगातील सर्वात जास्त उंचावर असणारी राईड आहे. २६ मार्च २००७ ला याची सुरवात करण्यात आली . ९७४७ फुट (२९७१ मीटर ) उंच आहे आणि ३३०० फूट (१००० मीटर) एकुण लांब आहे. २५ मैल प्रतितास वेग आहे. ह्या राईडचे तिकीट वेगळे काढावे लागते. ३५ स्विस फ्रँक्स मध्ये ५ वेळा राईड करता येते.

अल्पाईन कोस्टर ग्लेशीयर ३००० ला पोचल्या नंतर प्रिया ने माहिती दिली कि रणबीर कपुर आणि मिनिषा लांबा यांच्या वर 'बचना ए हसींनो ' या चित्रपटातील 'अहिस्ता अहिस्ता' या गाण्याचा थोडा भाग इथे चित्रित केला आहे. मग काय मग आम्ही उभयतांनी फक्त आता गाणे म्हणायचे बाकी होते. अल्पाईन कोस्टर चा आमचा अनुभव भन्नाट होता कारण आम्ही या पुर्वी कधी हा अनुभव घेतला नव्हता. इथे मी आणि सौ एका च कार मध्ये बसलो आणि ओघानेच ड्रायविंग मला च करणे भाग होते. सभोवतालच्या पर्वत रांगांचे मनमुराद दर्शन घेत आम्ही राईड पूर्ण केली. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपला वेग ब्रेक असल्यामुळे नियंत्रित करू शकतो. १ किमी चा पल्ला कमीतकमी २ मिनिटामध्ये पण पुर्णकरता येतो. अर्थात आम्ही निवांत पणे १५ मिनटं घेतली. ह्या पल्ल्या मध्ये अनेक फिरकी नेत्रदीपक वक्र, आणि पूल आहे. आम्ही हे सर्व आसपासच्या डोंगरावरिल मनमोहक दृश्ये पाहत पूर्ण केली फक्त एक कमी जाणवली कि बर्फ असता तर रणबीर सारखे गाणे म्हणायची एक सुप्त इच्छा पूर्ण करून बायकोला धक्का दिला असता. असो पण काही गोष्टी गुलदस्त्यात राहिल्या तर च बरे.

इथले पुढचं आकर्षण म्हणजे 'Peak Walk by Tissot'. हा दोन डोंगर शिखरांना जोडणारा जगातील पहिला झुलता पुल आहे. हा पूल १०७ मीटर लांब आणि ८० सेंटिमीटर रुंद आहे. ह्या पुलावरून चालायला सुरवात केल्या नंतर स्विस च्या लहरी हवामानाची झलक मिळाली. वातावरण आणखी थंड आणि ढगाळ झाले. पुलावरून चालताना ध्यानात आले कि काही भाग हा काचे चा आहे कि ज्या मुळे उंचावरून खाली पाहणे शक्य आहे. चालत आम्ही Scex Rouge ह्या पिक ला पोचलो. इथे Tissot चे मोठे घड्याळ आहे. फोटो काढायला हि जागा चांगली आहे. इथून आपल्याला स्विस च्या बाकी प्रसिद्ध पर्वत रांगा चे दर्शन घेता येते जसे मॅटरहॉर्न, मो ब्लांक, यौन्गफ्रो इत्यादी.हा आता पर्यंत चा माझा अनुभव खूप च भारी होता. The Peak walk was something I will never forget. Kudos to Priya for planning such wonderful locations.

(वरील दोन्ही चित्रे आंतर जालावरून घेतली आहेत.)

साधारणपणे अर्धा तास इथे घालवून आम्ही खाली बर्फ मध्ये उतरलो तेव्हा खाली बर्फामध्ये फिरत असताना समोर च एका उंच डोंगरावर बचाव कार्या साठी हेलिकॉप्टर आले होते. बचाव पथकाच्या काही लोकांनी दोऱ्या सोडून खाली अडकलेल्या गिर्यारोहकांना ओढून घेतले. असे Live Rescue ऑपेरेशन बघण्याचा पहिला चा अनुभव घेतला. बाकी इथे करण्या सारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. खाली बर्फ़ा मध्ये उतरून लांब वर चालत जात येते.बरेच पर्यटक दुर पर्यंत चालत गेल्याचे दिसत होते. बर्फा मध्ये गॉगल्स वापरणे जरुरी आहे नाही तर डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. हिवाळ्या मध्ये पर्यटक स्कीईंग चा आनंद घेतात. स्किईंग चा अनुभव घेण्यासाठी परत थंडी मध्ये यायचे मनात ठरवले होते. बघू ते कसे काय साध्य होणार ते.

आम्ही परतीच्या प्रवासा साठी जिनिव्हा मार्गे आमच्या अपार्टमेंट कडे निघालो. घाट उतरताना थांबून फोटो काढले. असे काही स्पॉट्स होते कि थांबणे भाग च होते. आल्प्स चे ते सौन्दर्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

आम्हाला ७ पर्यंत अपार्टमेंट वर परत यायचे होते कारण संध्याकाळी जिनिव्हा लेक फेस्टिवल चा आतिषबाजी चा कार्यक्रम होता. पण येताना रस्त्यात कुठे तरी अपघात झाला असल्या मुळे जवळ जवळ २५ किमी कार १० च्या वेगानी चालवावी लागली. कसेबसे बसे ८.३० पर्यंत आम्ही अपार्टमेंट वर पोचलो आणि १० मिनटात तयार होऊन कालच्या चा 'जुनुन ' रेस्टॉरंट मध्ये गेलो . आज जिनिव्हा मध्ये गाडी घेऊन जाणार नव्हतो कारण कालचा अनुभव अजून ताजा होता. रेस्टॉरंट स्टाफ नि खूप मोलांची मदत केली. आम्हाला बस ने जिनिव्हा ला जात येईल असे सांगितले कारण टॅक्सी चे भाडे खूप आहे. तसेच बस स्टॉप पण दाखवला व गाडी पार्क करायची परवानगी दिली. जेवण पण लवकर दिले कारण ९.२२ ची एक बस आम्हाला जिनिव्हा मध्ये घेऊन जाऊ शकत होती. म्हणजे आम्ही फ्रान्स मधून स्विस ला बस ने जाणार होतो. पराक्रमाची शर्थ करून आम्ही बस पकडली आणि जिवात जिव आला. बस मध्ये तिकीट काढणे किचकट वाटले. स्विस फ्रँक्स आणि युरो असे दोन्ही चलने स्वीकारली जातात. बस मध्ये तोबा गर्दी झाली होती बहुतेक सर्व जण आतिषबाजी पाहायला चालेल होते. आम्ही जिनिव्हा मध्ये पोचेपर्यंत कार्यक्रम चालू झाला होता. खूप गर्दी होती आणि गरम पण खूप होत होते. आम्ही तिथे अर्धा तास थांबून निघालो. मला तरी तो आतिषबाजी चा कार्यक्रम नाही आवडला त्या पेक्षा लंडन मध्ये जास्त चांगले कार्यक्रम पहिले आहेत. परत येताना बस ज्या स्टॉप वर येणे अपेक्षित होते त्या ऐवजी दुसरया ठिकाणी आली आणि परत गर्दी चा महापुर त्या बस मध्ये घुसला आणि आम्हाला विना तिकीट स्विस मधून फ्रान्स मध्ये यावे लागले.

सांगायचा मुद्दा असा कि अर्थात हे माझे असे वैयिक्तक मत आहे कि एकाद्या शहराची अथवा जागे ची खरी ओळख तिथल्या सार्वजनिक प्रवासात होते. ह्या वेळच्या अनुभवात खूप भर पडली . स्विस फ्रेंच बॉर्डर वर चे लोक फारसे अगत्यशील नाही वाटले. चालायचं. ड्रायविंग च्या सवयी पण जरा rude वाटल्या. कदाचित स्विस फ्रेंच सीमेवर असल्या मुळे असा अनुभव आला असेल. आज चा दिवस पण खूप धावपळीत गेला होता त्या मुळे झोपेची नितांत गरज होती. बस मधून उतरून गाडीघेतली व अपार्टमेंट वर जाऊन क्रॅश झालो.

दिवस ३

आज आमचा शेवटचा दिवस होता राहण्याचा. जिनिव्हा वरून रात्री ८.३० ची फ्लाईट होती त्या मुळे पूर्ण दिवस हाताशी होता. रात्री परत लंडन ला येणे भाग होते त्या मुळे आज चा दिवस खूप च महत्वाचा होता.

सकाळी साधारणपणे १० ला चेक आऊट करून अपार्टमेंट सोडले आणि Aiguille du Midi च्या दिशेने कूच केले. रस्ता अंदाजे ११० किमी / वेळ अंदाजे १.३० तास. म्हणजे आज सुद्धा साधारण पणे २२५ किमी / ३-४ तास रथा च सारथ्य करणे भाग होते. आम्ही अंदाजे १२/१२.३० वाजता ला Aiguille du Midi ला पोचलो पण पार्किंग शोधण्यात बराच वेळ खर्ची पडला.

आता थोडी माहिती Aiguille du Midi विषयी. Aiguille du Midi हे फ्रेंच आल्प्स मो. ब्लॅंक मधील ३८४२ मीटर्स उंचीवरील टोक आहे. मो ब्लॅक मधील सर्वात जवळ चा स्पॉट आहे कि आपण हायकिंग अथवा चढाई न करता पोचू शकतो. Aiguille du Midi पर्यटकांमध्ये खूप च पॉप्युलर आहे. वर्ष भरात अंदाजे ५ लाख पर्यटक भेट देतात अशी माहिती मिळाली. इथे पण वरती जाण्या साठी केबल कार आहे. २ टप्प्यां मध्ये टॉप ला जाता येते पण आमच्या दुर्दैवाने आम्हाला केबल कार चा विचार रद्द करावा लागला कारण खूप गर्दी होती.कदाचित आम्ही ऑनलाईन तिकीट काढलेले असते तर शक्य झाले असते.असो ह्या गोष्टीचा आम्ही कधी विचार नव्हता केला पण परत येण्या साठी सबळ कारण हवे ना म्हणून वाईट न वाटता आम्ही (Chamonix) शामोनी मध्ये वेळ घालवला. स्थानिक आईस्क्रीम चा आनंद घेतला आणि २ तासात जिनिव्हा साठी निघालो. ४ च्या दरम्यान जिनिव्हा मध्ये पोचलो. गाडी कार पार्क मध्ये टाकून पायी च जिनिव्हा लेक कडे निघालो. वातावरण खूप च गरम होते. जिनिव्हा ला आधी २-३ वेळा येणे झाले असल्या मुळे वेळ घालवणे एवढंच काम होते. जिनिव्हा लेक फेस्टिवल मुळे मुख्य रस्ते बंद च होते. ६. ३० पर्यंत निरुद्देश भटकून आम्ही कार परत केली आणि जिनिव्हा एअरपोर्ट ला पोचलो. विमान अगदी स्विस वेळेप्रमाणे निघाले. रात्री ९. ३० ला लंडन ला परतलो.

आज चा ३ रा दिवस फार काय करता नाही आलं फक्त शामोनी मध्ये वेळ चांगला गेला. खूप च सुंदर आहे शामोनी. इथल्या वाहत्या पाण्याचा रंग पांढरा आहे. जिनिव्हा वर खूप मिपा करानी लेखन केले आहे त्यात मी अजुन काही विशेष लिहिणार? अशा रितीने ३ दिवसाची ट्रिप संपली. पहिल्या २ दिवसात आम्ही जि ठिकाणे पहिली तिथे आम्हाला बिलकुल भारतिय पर्यटक दिसले नाहीत. त्या जागा टूरिस्टी अजून तरी झाल्या नाहीत. कदाचित अजून त्या हिंदी चित्रपटांमध्ये आलेल्या नाहीत जास्त वेळा. शामोनी मध्ये मात्र भारतीय पर्यटक भेटले. एक मराठी जोडी तर टेक्सास वरून आली होती.

माझ्या आधी च्या प्लॅन प्रमाणे ३ भागात लिहिणार होतो पण ३ ऱ्या दिवशी विशेष असे काही घडले नाही. त्यामुळे २ भागात च पूर्णविराम घेतो.

प्रवास वर्णन लिहायचा हा शाळे नंतर पहिला च प्रसंग आहे. शालेय जीवनात बऱ्याच वेळेला कधी कुठल्या किल्याला भेट दिली अथवा समुद्र किनारी ट्रिप झाली कि त्या वर लिहले असल्या ची आठवण अजून आहे. असो हा लेख अनेक वेळा विस्कळीत झाला आहे, शुद्धलेखनाच्या चुका असतील तरी आपण सांभाळून घ्यावे.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

4 Sep 2016 - 3:44 pm | पद्मावति

खूप छान लिहिलंय. लेख आणि लेखनशैली दोन्हीही मस्तं!
लिहीत राहा.

प्रसाद_१९८२'s picture

4 Sep 2016 - 4:12 pm | प्रसाद_१९८२

मात्र एकही फोटो दिसला नाही.

अजया's picture

4 Sep 2016 - 8:43 pm | अजया

छान लेख पण फोटो :(

उल्का's picture

4 Sep 2016 - 8:58 pm | उल्का

खूप छान!

निशाचर's picture

4 Sep 2016 - 10:12 pm | निशाचर

मस्त लिहिलंय. पण फोटो दिसत नाहीत.

स्वाती दिनेश's picture

4 Sep 2016 - 10:33 pm | स्वाती दिनेश

हा भागही आवडला.लिहित रहा.
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2016 - 10:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सहल !

फोटोंना पब्लिक अ‍ॅक्सेस दिलेला दिसत नाही. ते केल्यास फोटो दिसतील असे वाटते.

सुहास बांदल's picture

5 Sep 2016 - 12:40 pm | सुहास बांदल

फोटो चा काय घोळ झाला समजत नाही. परत एकदा प्रयत्न करतो.

धन्यवाद !!

सुहास बांदल's picture

6 Sep 2016 - 6:25 pm | सुहास बांदल

परत एकदा प्रयत्न केला आहे. बहुतेक हा प्रयत्न पण व्यर्थ गेला असे वाटत आहे.

सुहास बांदल's picture

6 Sep 2016 - 6:26 pm | सुहास बांदल

सर्वांचे आभार !!! फक्त अजून फोटो कसे अपलोड करायचे ते जमत नाही .