आल्प्स च्या कुशित आम्ही खुशित !!! भाग १

सुहास बांदल's picture
सुहास बांदल in भटकंती
27 Aug 2016 - 3:22 am

स्वित्झर्लंड आपल्या भारतीय पर्यटकांच्या मनातील एक गोड कोपरा.जिथं बहुतेक प्रत्येकाला जायची इच्छा असते. कुणाला एकटे जायचे असते तर कुणाला एका खास व्यक्ती बरोबर जायचे असते. नुकतंच ऑगस्ट च्या मध्याला स्विस आणि फ्रेंच आल्पस च्या निसर्ग सानिध्यात भटकायचा योग् जुळून आला.तसा हा कार्यक्रम २ महिन्यांपुर्वीच ठरला होता पण काही कौटुंबिक कारणानं मुळे बारगळायची वेळ आली होती आणि त्याला कारण पण मीच होतो. असो असे समर प्रसंग येत च असतात.

शुक्रवारची रजा टाकल्या मुळे आमच्याकडे पुर्ण पणे ३ दिवस हाताशी होते त्यामुळे असलेल्या वेळेचा १००% उपयोग करायचे ठरले होते. पूर्वी स्वित्झर्लंड ला २-३ वेळा जाऊन आल्या मुळे जरा हटके पर्यटन जागां पहाणे यावर एकमत होते.(खरोखर च एकमत होते कारण सौ नि आणि प्रिया ने (प्रशांत ची पत्नी जी नात्यानि बहिण लागते) आधी च ठरवले होते कुठे जायचे आणि मला रथा चा सारथ्य करण्याचा मान दिला व प्रशांत ला (माझा मेव्हणा) वाटाड्या म्हणून कामाची विभागणी केली होती. प्रशांत नि पण आपली निवड सार्थ ठरवली.)

स्वित्झर्लंड मध्ये देशांतर्गत प्रवास हा रेल्वेने,बसने किंवा वैयक्तिक वाहनाने केला जातो. स्वित्झर्लंड चि सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अत्त्युच्च दर्जाची आहे त्यामुळे देशांतर्गत प्रवासाचे आगाऊ आरक्षण करणे जगातली कोणत्या हि कोपऱ्यातुन शक्य आहे.तसेच मदतीला गुगल नकाशे असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला किती वेळ लागेल याचा व्यवस्थित अंदाज येतो.त्यामुळे पर्यटनस्थळ पाहण्याची रूपरेषा आधी च ठरवली होती.

दिवस १:

निर्धारित (बुकिंग) केल्या प्रमाणे सकाळी ६ ला आम्ही लंडन हिथ्रो ला पोचलो. २४ तास उड्डाणाच्या आधी वेब चेक करून आवडत्या सीट पकडल्या होत्या.(पुण्यात असताना ST मध्ये खिडकीतुन रुमाल टाकून सातारा ला जाणारी बस पण खूप वेळा पकडली आहे) पण ऐनवेळी गेट वर कळाले की आमचे आसन क्रमांक बददले आहेत. म्हटले ठीक आहे नवीन बोर्डिंग पास द्या पण गम्मत अशी कि त्यांचा प्रिंटर बंद पडला होता. मग त्यांनी कोऱ्या बोर्डिंग पास वर आसन क्रमांक लिहुन दिला. मला अतिशय हसु आले पण एअर लाईन स्टाफ नि मनापासुन माफी मागितली.गेल्या १४ वर्षात इतकया वेळा विमान प्रवास केला पण असा बोर्डिंग पास कधी मिळाला नव्हता.

आता तर मोबाइल वरचा पण बोर्डिंग पास चालतो.शेवटी जिनिव्हा ला जाणाऱ्या स्विस एअर च्या विमानात बसलो. विमान अगदी 'स्विस वेळे' प्रमाणे आकाशांत झेपावले. सांगायचं कारण म्हणजे युरोपातल्या बऱ्याचशा विमान कंपन्या हमखास १५-३० मिनिटे उशिरा उडतात. निर्धारित वेळे प्रमाणे विमानाने लंडन ते जिनिव्हा अंतर १ तास ३० मिनिटा मध्ये पूर्ण केले. स्थानिक वेळे नुसार सकाळी ९ वाजून ३० मिनिट झाले होते. इमिग्रेशन आदि सोपस्कार उरकून आम्ही ३ जण (प्रशांत रात्री १० ला येणार होता) जिनिव्हा एअरपोर्ट वरून शटल बस पकडून कार हायर करता पोचलो. आगाऊ आरक्षण असल्यामुळे UK ड्राइव्हिंग लायसन्स व पासपोर्ट सादर केल्या वर कार ची किल्ली मिळाली. कार अपेक्षेपेक्षा छोटी मिळाली ते बरे झाले असं नंतर समजून आले कारण आमचा प्रवास हा छोट्या गावातून आणी घाटातून होता. पूर्वी चा युरोपातला कार चालवण्याचा जरी अनुभव असला तरी स्विस मध्ये पहिल्यांदाच चालवणार होतो. सौ.नि दिशा दर्शकाचे काम हाती घेतले. तसे लग्न झाल्या पासून मला दिशा दाखवण्याचे काम ती मनापासून करते. आमचे रहाण्याचे ठिकाण जिनिव्हा एअरपोर्ट पासुन १० किलोमीटर दुर फ्रान्स मध्ये होते. फ्रान्स मध्ये प्रवेश करताना आपल्या कडे कसे जकात नाके असतात तशा प्रकारचे चेक पॉईंट्स होते पण तिथे वाहने विनासायास जा ये करत होती. कदाचित फार वर्षांपूर्वी हे चेक पॉईंट्स वापरात असावेत. बॉर्डर पोलीस पण निवांत होते. फक्त ३० मिनिट मध्ये आम्ही ऑर्नेक्स गावात फ्रान्स मध्ये पोचलो. आमचे राहण्याचे अपार्टमेंट सौ. नि Airbnb या संकेत स्थळावरुन आरक्षित केले होते. अपार्टमेंट ची मालकीण आमची वाट पाहत होती. स्वागतासाठी रेड वाईन आणि चॉकलेट्स तयार होती. तिने आम्हाला अत्यंत उपयुक्त स्थानिक माहिती दिली. अर्ध्या तासात आम्ही तयार होऊन मग दुपारच्या भोजनासाठी १०० मीटर वर असलेल्या 'जुनुन' रेस्टॉरंट मध्ये गेलो. मी Trip Advisor वर ह्या रेस्टॉरंट च्या समीक्षा वाचल्या होत्या. सकाळ पासून पोटात काही नसल्या मुळे आम्ही भारतीय जेवणावर येथेच्छ ताव मारला. सौ आणि बहिणाबाईंच्या नजरेत माझ्या साठी अभिमान दिसत होता. माझे ऊर भरून आले कारण माझी भोजनालय ची निवड सार्थ ठरली होती.

आधी च ठरल्या प्रमाणे आमचा पुढचा टप्पा होता Gorges du Fier. साधारणपणे ६० किमी वर होता. महामार्गावरील टोल टाळण्यासाठी GPS नि आम्हांला गावातील रस्त्यानी नेले. त्यामुळे निसर्गा चे अनेक रंग लुटता आले पण खूप राऊण्डबॉऊट्स रस्त्यात होते. युरोपची ती एक खास ओळखच आहे. Gorges du Fier हा काय प्रकार आहे मला तिथे जाई पर्यंत अजिबात कल्पना नव्हती. जो पर्यंत तुम्ही तिथे प्रवेश करत नाही तो पर्यंत बाहेरून कल्पना पण करणे अशक्य आहे. Gorges du Fier एक प्रवेशजोगी नैसर्गिक जागा आहे किंवा घळ आहे.Gorges du Fier नेत्रदीपक अनुभव आहे. फक्त पादचार्यांसाठी असलेल्या अत्यंत अरुंद लोखंडी पुलावरून चालावे लागते. हा अरुंद पुल २ घळीमंधील दगडाला जोडला आहे. जमिनी पासुन अंदाजे २५ मीटर्स वर आहे. आम्ही दुपारी २ वाजता घळी मध्ये प्रवेश केला आणि आज पर्यंत कधीही न अनुभवलेला एक दिवस मनात कोरला गेला. त्याला कारण पण तसेच घडले. अस्मादिक कॅमेरा चे SD कार्ड घरी च विसरून आले होते पण त्या वरून मला काही कुणी बोलले नाही कारण आम्ही सर्व जण त्या घळी मध्ये मंत्रमुग्ध झालो होतो.हा पुल ३०० मीटर लांब आहे. Gorges du Fier फ्रेंच आल्प्स ची एक must visit जागा आहे. जेव्हा आम्ही Gorges मध्ये होतो तेव्हा पाणी खुप वेगानी वाहत होते. पाण्याचा रंग करडा आणि पांढरा आहे. पाण्याचा आवाज पण बऱ्या पैकी होता आणि त्याला हलक्या वाऱ्याची साथ होती. एकंदरीत वातावरण खूपच प्रसन्न आणि शांत होते. काही जागी पुल एकदम च अरुंद आहे त्या मुळे समोरून येणाऱ्या लोकांना जागा द्यावी लागते किंवा ते आपल्याला जागा देतात. पण युरोपात अनुभव असा आहे की 'पहले आप' अशी एक सामाजिक जाणीव आहे. Gorges मध्ये बरीच लहान मुले पण होती आणि शांत पणे वागत होती. घळी मध्ये खूप माहिती फलक आहेत त्या वरून लक्षात येते कि हे काम १९ व्या शतका च्या मध्यावर केले आहे. बाकी पाणी किती ऊंची पर्यंत येऊ शकते याचा अंदाज बाहेरच्या पडताना एक चित्रफित पाहिल्यावर कळते. इथे प्रवेश फी ५. ५० युरो आहे प्रति माणशी. प्रवेश फी एकदम योग्य आहे कारण ज्याप्रकार चे इंजिनीईरिंग केले आहे त्याला तोड नाही. या ठिकाणी साधारण पणे २ तास व्यवस्थित पुरतात.

आता आम्ही Annecy ला जायला निघालो. Gorges du Fier पासुन Annecy साधारण पणे ११ किमी वर आहे. २० मिनटात आम्ही तिथे पोचलो. स्विस च्या मानाने तापमान खूप च होते. २४ डिग्री तरी असावे. Annecy दक्षिण फ्रान्स मधील एक अल्पाइन शहर आहे. Annecy लेक प्रसिद्ध आहे. Annecy लहान दगडांनी बनवलेल्या रस्त्यानं साठी पण प्रसिद्द आहे तसेच बरेच पाण्याचे कालवे,किल्ले आणि कॅथेड्रल्स आहेत. स्थापत्य शास्त्रा मध्ये ज्यांना आवड आहे त्यांना नक्की आवडेल.कालव्यांच्या बाजुला असलेल्या घरांचे रंग अतिशय सुंदर आहेत. असे वाटते कि कुणी चित्रकारांनी रंगवले आहे. Annecy लेक जवळ आम्ही बराच वेळ घालवला कारण दुसरे काही नियोजन नव्हते आणि एकंदर वातावरण झकास होते. बरेच युरोपिअन्स बाजू च्या गवता मध्ये बिअर चा आस्वाद घेत लोळत होते. आम्ही पण मग जरा मऊ हिरवळीवर लोळत पडलो. बरेच पर्यटक Annecy लेक मध्ये बोट भाड्यानी घेऊन समोर दिसणाऱ्या पर्वत रांगा पाहत होते. Annecy ला Venice of the Alps असे पण म्हणतात. खूप वेडे वाकडे कालवे असल्या मुळे आपण त्यात नक्कीच तल्लीन होऊन जाऊ शकतो. थंडी मध्ये जर इथे येण्याचा विचार असेल तर इथून बर्फाच्छादित हिमशिखरे पाहता येतात.आम्ही इथे आईसक्रीम चा आस्वाद घेऊन परत जिनिव्हा च्या मार्गाला लागलो.

साधारण पणे संध्याकाळी ७ च्या दरम्यान जिनिव्हा मध्ये पोचलो. संध्याकाळी जेवणाचा बेत 'लुगिनी' या इटालियन रेस्टॉरंट मध्ये होता. बहिणाबाईंनी Trip Advisor वरच्या समीक्षा वाचून हे रेस्टॉरंट सुचवले होते. पिझ्झा पास्ता एक नंबर होता त्या वर ताव मारून आम्ही जिनिव्हा एअरपोर्ट ला जायला निघालो कारण प्रशांत रात्री १० ला येणार होता. पण लगेच एक अनपेक्षित धक्का आम्हाला मिळाला. जिनिव्हा लेक फेस्टिवल चालु असल्या मुळे आमचे एअरपोर्ट कडे जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले होते. GPS परत परत एका च जागी आणत होता. आम्हाला २ तास तिथे अडकून पडावे लागले.चक्रव्यूहा मध्ये अडकलो असे वाटत होते मग शेवटी प्रशांत ला फोन करून परस्पर आम्ही दुपारी जिथे जेवलो होतो त्या 'जुनुन' रेस्टॉरंट पाशी थांबायला सांगितले. इकडे कार मध्ये सौं च्या दिशा मार्गदर्शनाला भगिनी मंडळा ची साथ मिळाली आणि आम्ही तो चक्रव्यूह जिनिव्हा चे रात्री दर्शन करून भेद केला. अखेर आमच्या निवासाच्या दिशेने मार्गस्थ झालो.वाटेत प्रशांत भेटला. तो मस्त पैकी रस्त्याच्या कडे च्या बाकड्यावर घरून आणलेली खिचडी खाऊन झोपुन गेला होता अखेर दिवसाचा शेवट छान झाला. रस्त्यातच मग दुसऱ्या दिवसा चा कार्यक्रम ठरत होता पण माझे मन कधी एकदा गादी वर जाऊन पडतो असे झाले होते.

क्रमश:

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

27 Aug 2016 - 4:37 am | अभिजीत अवलिया

फोटो दिसेनात

कंजूस's picture

27 Aug 2016 - 7:24 am | कंजूस

कंजूस's picture

27 Aug 2016 - 7:30 am | कंजूस

1)

3)

नवी प्रवासी मेजवानी! नुकतेच अगदी टुरिस्टी स्विस दर्शन करुन आल्यावर परत असेच स्वतः जायचे प्लॅनिंग करतोय आणि हा धागा आला!
पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2016 - 1:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रवास व फोटो !

तुम्ही फोटोंच्या लिंक्स तश्याच धाग्यात टाकल्याने फोटो दिसत नव्हते.

लेखनाच्या चौकटीच्या वर डावीकडून पहिल्या (सुर्योदयाचे चित्र) असलेल्या बटणाची मदत घेऊन फोटो धाग्यात टाकायचे असतात.

अधिक माहिती येथे मिळेल.

पद्मावति's picture

27 Aug 2016 - 3:37 pm | पद्मावति

मस्तं लिहिलंय.

स्वाती दिनेश's picture

27 Aug 2016 - 5:09 pm | स्वाती दिनेश

छान वर्णन आणि फोटो.
अजया म्हणते तसे टूरिस्टी स्वीस चोप्रा आणि मंडळींच्या कृपेने सिनेमात अनेकदा बघितलेले स्वीस आणि आल्प्सच्या कुशीतले स्वीस ह्यात खूप फरक आहे. तुमची अनवट स्वीसची सफर वाचत आहे.
स्वाती

चांगलं आहे. फक्त ते रोमन लिपीतले शब्द उच्चारायचे कसे हे सांगितले तर बरे होईल.

सुहास बांदल's picture

30 Aug 2016 - 4:49 pm | सुहास बांदल

@अभिजीत अवलिया - फोटो अपलोड करण्याचा पहिलाच प्रयत्न होता त्या मुले गडबड झाली. क्षमस्व
@कंजूस - फोटो बद्दल धन्यवाद
@अजया,डॉ सुहास म्हात्रे ,पद्मावति,स्वाती दिनेश,एस आणि सर्व वाचकांचे आभार
@एस - ते रोमन लिपी मधील शब्द फ्रेंच मधील आहेत. मला पण नक्की कळले नव्हते कि कसे उच्चारायचे. चुकीचा उच्चार टाळण्यासाठी तसेच लिहिले.

भ ट क्या खे ड वा ला's picture

30 Aug 2016 - 9:17 pm | भ ट क्या खे ड वा ला

छान वर्णन आणि फोटो .
पुढील भागांची प्रतिक्षा .

सिरुसेरि's picture

31 Aug 2016 - 11:36 pm | सिरुसेरि

सुंदर प्रवास वर्णन व फोटो ! +१००

सुजल's picture

1 Sep 2016 - 7:59 pm | सुजल

सुंदर प्रवास वर्णन

सुहास बांदल's picture

4 Sep 2016 - 12:57 am | सुहास बांदल

@भटक्या खेडवला, सिरुसेरी , सुजल धन्यवाद.
पुढील भाग आज उद्या मध्ये टाकीन.