हॉस्टेलः एक लढा! भाग २

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
13 Aug 2016 - 12:10 am

इतकं सोप्पं होतं???

नक्कीच नाही...

-------------------------------------------------------

लढा छोटा असो वा मोठा, काही गणितं, प्रमेये निर्विवाद अबाधित असतात. मसलपावर, ब्रेनपावर, योग्य वेळी योग्य चाली खेळण्याची समज आणि अचूक निर्णयक्षमता लागतेच लागते! पण बंधो एवढ्याने भागत नाय. समोरचाही ही सगळी जंत्री घेउनच मैदानात उतरलेला असतो. तेव्हा काय?

पिरातै म्हणाल्या, 'फिल्मी वाटतंय'. खरंच आहे. आहेच हे फिल्मी. पण फिल्म आणि प्रत्यक्ष जीवनात एक म्होट्टा फरक आहे. कथाकार एक ध्येय ठरवून लिहितो, एक तत्त्वज्ञान जिंकावं अशा हेतूने मांडणी करतो. प्रत्यक्ष जीवनात असे एकांगी बुद्धीबळ नसते. दोन प्रतिस्पर्धी असतात आणि दुसरा काय विचार करतो हे पहिल्याला कळत नसते.

आलं लक्षात! दुसरा काय करु शकतो हे पहिल्याला माहित नसते तेव्हाच बाजी पलटू शकते. मला व्यवस्था काय करु शकते हे माहिती होतं, पण व्यवस्थेला मी काय करु शकतो हे माहित नव्हतं!!

असो!

तर प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होण्याआधी छोट्यामोठ्या चकमकी घडत होत्या. रितसर अर्ज तयार करण्यासाठी मी एका कडून डिजिटल कॅमेरा घेउन हॉस्टेलचे फोटो काढले. फुटक्या पायपांचे, भेगा गेलेल्या भिंतींचे, दुरवस्थेत असलेल्या अनेक सुविधांचे असे अनेक फोटो काढुन घेतले. नंतर मी फोटो काढलेत हे रेक्टर सरांकडे माहिती झाले. त्यांनी मला बोलावले आणि मला विचारले, "किती फोटो काढलेत तू? आणि काय करणार आहेस त्याचं?", मी गप्प होतो. त्यांनी पुढे एक पुडकं काढलं, बाडच ते. म्हणाले, "हे बघ मागच्या दहा वर्षात मी हे इतके फोटो काढून दरवर्षी मन्त्र्यालयाला फेरे घालतोय. कुणीही तिथे ढिम्म हललेलं नाही. काहीही होऊ शकत नाही..." माझ्या समोर जे फोटो होते त्यामधे भयावह परिस्थिती होती, पाणी तुंबलेले, भिंतीच्या ढलप्या पडलेल्या, अजून बरंच काही. हा जो माणूस माझ्यासमोर उभा होता, हा काही साधासुधा माणूस नव्हे. पन्नाशीचा, भरदार शरिरयष्टी, पांढरी दाढी, पांढरे केस. चेहरा व व्यक्तिमत्व असे की कोणी ग्रीक गॉड असावा. एवढेच नव्हे तर मनुष्य प्रचंड हुशार, चलाख, धूर्त. कामात तरबेज आणि व्यवस्थापनात एक नंबर. विलपावर सांगायची तर एका अपघातात स्वारी तीन बरगड्या, एक पाय, खांदा फ्रॅक्चर करुन घेऊनही चवथ्या दिवशी स्वत:च्या पायावर उभं राहून नेहमीच्याच भेदक आवाजात विद्यार्थ्यांना दम भरायला तयार. ही वॉज लवेबल टेरर!

हा असा माणूस जर हताश होऊ शकतो तर आपण काय करणार? ते म्हणाले, "अरे, इथे मी काही करू शकलो नाही, तू काय करणार?" मी म्हटले, "सर, तुम्ही जे करू शकत नाही ते मी नक्कीच करु शकतो, तुम्हाला मर्यादा आहेत, मला नाहीत." सरकारी नोकराला मर्यादा असणारच. व्यवस्थेला हेसुद्धा माहीत असते.

पण पुढे जे युद्ध सुरू झाले त्यात आपले कोण, परके कोण हेच कळेना झाले. आम्ही रितसर अर्ज करुन प्रत्येक रुममधे जाऊन एका एका विद्यार्थ्याला समजावून सांगू लागलो. सही करायला तयार करु लागलो. फोर्थ यिअर कमर्शियलच्या सह्या झाल्या. थर्ड यीअर कमर्शियलच्याही झाल्या. पण फाईन आर्टवाले काही सह्या करायला तयार होईनात. इथे एक सुक्ष्म राजकारण होते. रेक्टरसाहेब फाईन आर्टवाले. फाईन आर्टवाल्यांचे कम्प्युटरशी संबंध नसल्याने उपरोक्त राड्याशी काही घेणेदेणे नव्हते. तसेच साहेब त्यांना कॉलेजमधे परस्पर त्यांच्या डिपार्टमेंटला बोलवून प्रेमसंवाद साधत असल्याने ही पोरे आमच्याकडे वळत नव्हती.

अजून एक प्रकार होत होता. ज्या मुलांनी सह्या केल्या त्या मुलांपैकी कमकुवत, भित्र्या मुलांना एक एकटे गाठून दमबाजी सुरू झाली. दरारायुक्त आवाजात प्रश्न केले गेल्यावर गरिब बिचारी पोरे घाबरून जायची. "तुला एकट्याला काय त्रास आहे का? नाही ना, मग कशाला सही करतोस. त्या पोरांना कायदा सुव्यवस्था बिघडवल्याबद्दल व हॉस्टेलचे वातावरण दूषित केल्याबद्दल काढून टाकणार आहेत, तुलाही जायचे का?" अशी दमबाजी झाल्यावर तयार पोरंही लटपटू लागली.

तिसरा प्रकार, लालूच दाखवणे. साहेबांचे फार्महाऊस होते, मस्त जॅकुझी, दारू वैगेरे पार्ट्या मर्जीतल्या पोरांना घेऊन होत असत. काही मुले (फाईनचीच) - जे आमचे मित्र, रुममेट्सही होते - तिकडे जायची कधीमधी. ह्या हॉस्टेल सुधारणा चळवळीचा प्रारंभ झाल्यावर सुरुवातीला मलाही सूचक निरोप मिळाले. मी बधलो नाही तर थेट ऑफर्स आल्या. म्हणजे तिकडे नेऊन मजा वैगरे करुन झाली की एक नैतिक दडपण येईल आणि मी गप्प बसेन. व्यवस्थेचा हा पवित्राही आधीच माहिती होता. त्यामुळे ते फसले.

अशा पद्धतीने साम, दाम, दंड, भेद, सर्व चाणक्यनिती चहूबाजूंनी दांडपट्टा फिरवित होती. तरी आम्ही पोरांनी हार मानायची नाहीच असेच ठरवलेले. एकट्या गाठल्या जाणार्‍या पोरांच्या मागे मी (किंवा माझा कोणी तरी सहकारी) उभा राहून त्याच्या ऐवजी प्रतिवाद करायला लागलो. अतिशय हुशार माणसासोबतचे वाद-प्रतिवाद म्हणजे अगदी जहाल हाणामारी असते. आयुष्यात मी पहिल्यांदाच असलं काही बघत होतो. तरी तोडीस तोड पुरून उरायचो. ज्याच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला त्याला शांतपणे मागे घेऊन तोफगोळ्यांना टोलवायचो.

प्रश्न कसे, तर असे:
"तुम्हाला एवढ्या सुविधा द्यायच्या तर पैसा नको, कुठून आणायचा पैसा?"
"सर, आम्ही टॅक्स भरतो ना?"
"तू.. तू टॅक्स भरतो?"
"नाही, म्हणजे आमचे पालक भरतात ना..."
"किती टॅक्स भरतात रे तुझे वडिल...?"
"......" (मी गप्प, आमच्या विस-बाविस बकर्‍यांमधून एखादा-दोन बोकड विकून मला मुंबईला महिन्यावारी दोन-तीन हजार रुपये पाठवणारे बाबा आठवले, कधी कधी तर तेही येत नसत.)
"सर, सरकारने याची तजवीज करावी, बजेटमधे याची तरतूद असतेच. त्याचा मी किंवा माझा बाप काय टॅक्स भरतो याच्याशी काय संबंध? मी इथे राहतो, सरकारी नियमांनुसार मला ज्या सुविधा इथे मिळायला हव्यात त्या मिळत नाहीत, त्या उपलब्ध करुन द्यायची जबाबदारी सरकारचीच. ती त्यांनी कशी पार पाडावी किंवा त्यांना त्यात काय अडचणी येतात त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही."

हे जुगलबंदी बघत मग आणखी पबलिक गोळा व्हायचं. हा कलगीतुरा फुकटचीच जनजागृती करायला लागला. तसं मग हे गोरिला वॉर बंद झालं. पण त्याने परिणाम व्हायचा तो झालाच. घाबरीघुबरी पोरं बळकट झाली. त्यांना आपले अधिकार आणि हक्क कळायला लागले. एकटेपणात सुख नाही हेही समजलं. नंतर आम्हाला जास्त कोणाला समजवत बसायची गरज पडली नाही.

शेवटी साहेबांनी एक मीटींग बोलावली. त्यात आमचे काय म्हणणे आहे ते नीट ऐकून घेतले. त्यावर आपले म्हणणे मांडले. आमच्या मागण्यांमधले लूपहोल्स दाखवले. पण इथेही भीती व दहशत दाखवण्याचा प्रकार झालाच. पण पोरं आता एवढी पेटली होती की कुणाच्या बाचं ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. खुद्द मीही ह्या उर्जेकडे बघून स्तंभित झालो. आगीचा लोळ आणि पाण्याचा लोट आवरता आवरत नाही. जे काम करायला आपल्याला अशी एकता, उत्साह, जोम लागतो त्याला रेगुलेट केलं नाही तर होत्याचं नव्हतं होण्यास वेळ लागत नाही. पुढची कामे जमिनीवर राहून करायची असे मनोमन ठरवले.

आणखी एक. हे फार महत्त्वाचे. म्होरक्या असल्याने बर्‍याच गोष्टी समजायच्या. तेव्हा कळले की नवाकोरा टेबलटेनिसचा टेबल कारकूनाच्या रुममधे नुसताच फोल्ड करुन ठेवलाय. त्याची चौकशी केली तर कळले की हॉस्टेलमधे सर्वच मैदानी, बैठे खेळ उपलब्ध आहेत. पण ते विद्यार्थ्यांना दिले जात नाहीत. बॅडमिंटन च्या रॅकेट्स, फुले, जाळी, फुटबॉल, व्हॉलीबॉल असं सर्वच उपलब्ध आहे. मग दिले वा सांगितले का नाही? तर कारण असे की मुले नीट वापरत नाहीत, मेन्टेनन्स ठेवत नाहीत. रॅकेट्स तोडतात, फुले हरवतात, बॉल फुटतात. कारण ही पोरे निव्वळ गावठी, गावंढळ आहेत, त्यांना अशा उच्चभ्रू सुविधांची समज नाही व त्यांची लायकीही नाही. हे समजल्यावर पुढे काय झाले असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. असो. मुलांना सर्व साधने मिळायला लागली. जबाबदार पोरांना जबाबदारी देऊन सर्व खेळ-साधनांचा नीट वापर होऊ लागला. पण हे सत्य होतेच. फुकटचे मिळाले की त्याची आपण भारतीय लोक पत्रास ठेवत नाहीच. (ही फक्त इथे गावठी पोरांचीच नव्हे तर मल्टीनॅशनलमधे काम करणार्‍या कॉर्पोरेट्सचीही तीच हालत आहे. माझ्या एका कंपनीने युरोपमधे दिल्या जाणार्‍या सर्व सुविधा इथे देऊन तोंड पोळून घेतले होते.)

अर्जाच्या प्रती तयार झाल्या. सगळ्यांच्या सह्याही झाल्या. पुढे त्या रेक्टरसाहेबांकडे रितसर दाखल झाले. व त्यांनी करावयाची कारवाई कायदेशीररित्या त्यांना बंधनकारक झाली.

इथून पुढे एक पाचवा प्रकार सुरु झाला. फाईनचे आमचे मित्र-खोलीमित्र मला म्हणायला लागले, "तू हे जे करतोय ना संदिप, हे फार वाईट करत आहेस. सरांना ह्याचा खुप त्रास होत आहे. तुला कल्पना नाही पण आम्ही रोज बघतो. तो माणूस खूप चांगला आहे आणि त्याला तू उगाच त्रास देतो आहेस" रेक्टरच्या मुलाकडूनही काहीबाही ऐकायला यायचं. मी हे उद्योग आरंभल्यापासून सरांचा बीपी वाढला होता. त्यांना रात्र रात्र नीट झोप येत नव्हती. ते कसल्या तरी भयंकर स्ट्रेसखाली आले होते. हे ऐकून मीही जरा प्रेशरमधे आलो. आपल्यामुळे कोणा इसमास इतका त्रास व्हावा हे वाईट आहे.

पण कोणीतरी आपले काम नीट केलेले नाही म्हणून इथे साठ मुलांना त्रास रोज होतोय आणि मी जर हाती घेतलेले काम नीट पूर्ण केले नाही तर तो कायमस्वरुपी होत राहिल ह्याची जाण कोणत्याही टोचणीशिवाय मोठी होती.

अर्जाचा पाठपुरावा बहुतेक संचलनालय लेव्हलवरच झाला. पुढे जायची गरज पडली नाही. रोज कोणी कोणी अधिकारी होस्टेलला यायला लागले. आले की प्रथम मला सांगावा धाडला जायचा. "डांगे कोण आहे त्याला बोलवा आधी..." आधी एक दोनदा मी जरा दबकूनच भेटायला गेलो. पण जसं त्या अधिकार्‍याचं बोलणं सुरू व्हायचं तसं कळायचं, साहेब काकुळतीला आलेत. मला समजवण्याच्या सुरात आपल्या अडचणी सांगत आहेत. एमएससीबी चे इंजिनियर अधिकार्‍यांनी संगणकरुमसाठी सर्व हॉस्टेलची वायरिंग बदलावी लागेल असे सांगितले. ते खुप खर्चिक आणि वेळखाऊ काम आहे असे ते म्हणत होते. मी म्हटले, मला फक्त इथे सर्व रुममधे कम्प्युटर चालतील एवढी व्यवस्था करुन द्या. बाकी खर्चाचं, वेळेचं तुम्ही तुमच्या पद्धतीने म्यानेज करा. आम्ही अजून थांबू शकत नाही. त्यावर त्यांनी तात्पुरती संगणक-कक्षाची वायरिंग बदलून दिली व आमचे काम वेळेच्या बंधनाशिवाय करायची मुभा मिळाली.

नंतर कधीतरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले. ते तर हिशोबाचा, बॅकलॉगचा, राजकिय अडचणींचा पाढा वाचायला लागले. म्हणे निधी फार कमी उपलब्ध होतो, मग तो तातडीच्या कामांकडे वळवला जातो, मग तुमचं काम राहुन जातंय दरवर्षी. मी म्हटलं, बघा ब्वा. आम्ही आमचं काम केलं तर तुम्हाला ती सर्व तातडीची कामे सोडून सर्व निधी इकडेच वळवावा लागेल. वरुन तुम्हालाच बॅकलॉगच्या चौकशीला सामोरे जावे लागेल ते वेगळे.

असे आणखी दोन-तीन अधिकारी येऊन गेले.

मग अचानक कधीतरी महिनाभरात, हॉस्टेलच्या आवारात मोठ मोठे ट्रक्स आले. रेती, विटा, सिमेंट आले. लोखंडी सळया आणि बांबू आले. मजूर आले. पाईप बदलणारे आले. मोजमाप सुरु झाले. जादूची कांडी फिरल्यासारखी जिर्णोद्धाराची कामे सुरू झाली. फिल्मी वाटत असलं तरी हेच सत्य आहे. हे घडलं आणि प्रत्यक्ष घडलं. मला श्रेय घ्यायचं नव्हतंच तरी मला श्रेय मिळू नये म्हणून व्यवस्थेने 'कावळा बसण्यास आणि फांदी मोडण्यास एकच वेळ झाली, हॉस्टेल रिनोवेट होणारच होते, त्या डांगेला वाटतंय त्याच्यामुळे झालंय' असा पित्तू मुलांमधे सोडून दिला. पण जिसने देखा उसनेही देखा. आमचा लढा आम्हीच बघितलेला. कॉलेजमधेही सगळीकडे याची चर्चा झाली होती. 'दबादबासाही सही' पण काही दिवस माझं नाव गाजत होतं. फाईन-कमर्शियल दोन्हीकडच्या पोरांनी भरभरुन साथ दिल्याने हे साध्य झालं होतं.

टाइल्स बदलल्या, पाण्याचे फिल्टर आले. बाथरुम्सचे पाईप बदलले, रंगरंगोटी झाली. पण हे सर्व बघायला आणि भोगायला मी तिथे नव्हतो. माझे वर्ष संपले होते आणि मी हॉस्टेल सोडले होते. नंतरच्या दोन तीन वर्षापर्यंत माझं नाव हॉस्टेल विसरलं नव्हतं. माझ्यासारखं वागण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलांना 'काय रे, फार डांगे बनतोस काय..?' असा दम देऊन थेट बाहेर काढलं जात होतं. अशी दोन-तीन मुले मला शोधत आली होती. त्यांच्या राहण्याची व्यवस्था मग मी बाहेर केली. आता तर बहुतेक वागळे सोडून माझं नाव तिथे कुणाला आठवत नसेल. ;)

हॉस्टेल सोडल्यावर मी महिनाभर रेक्टरसरांच्या वाशीतल्या फ्लॅटवर राहत होतो. त्यांनी भाडं घेतलं नाही. तो महिनाभर मी एका आलिशान लग्झरियस फ्लॅटमधे आयुष्यात पहिल्यांदाच राहिलो. तो माणूस उत्तमच आहे. त्यांच्यासोबत राहून मला बरंच शिकायला मिळालं, नंतरही आमचे चांगलेच संबंध राहिले. त्यांचा माझ्या आयुष्याच्या एका मोठ्या कालखंडावर प्रभाव आहे, आयुष्यभर राहिलंच.

फक्त एक मला कधीच कळले नाही, कधी परत भेट झाली तर विचारेन.
"सर, तुम्ही आमच्या बाजूने होतात की विरुद्ध?"

-------------------
क्रमशः

(ता. क. : मला गोष्टी फार रंगवून रंगवून लिहिता येत नाहीत. काही तपशील पूर्ण आठवत नाहीत. काही विसरले जातात. तीव्र गतीच्या कथाकथनात काही राहून जातेच. जसे आठवेल तसे कधी कधी लिहित जाईन. पुढचा भाग हा उपसंहार असणार, तेव्हा या लढ्याच्या यशामागची कारणे कळतीलच, धन्यवाद! सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार!)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

अंतु बर्वा's picture

13 Aug 2016 - 2:28 am | अंतु बर्वा

छान अनुभव! प्रॉब्लेम छोटा असो वा मोठा, त्यातुन साध्य झालेलं ध्येय छोटं असो वा मोठं, मुळात तो लढा देण्यासाठी जी इच्छाशक्ती हवी असते तीचीच सगळीकडे वानवा असते. आग भडकायला सुद्द्धा एका ठिणगीपासुनच सुरुवात होते जी तुम्ही बनलात. आमचा कधी हॉस्टेल नावाच्या गोश्टीशी पालाच न पडल्यामुळे या सर्व अनुभवांना मुकलो पण हिरव्या देशात आल्यावर चार वर्शे बॅचलर लाईफ जगायला मिळाली आणी ती कसरही भरुन निघाली :-)

टिवटिव's picture

13 Aug 2016 - 2:31 am | टिवटिव

__/\__

गामा पैलवान's picture

13 Aug 2016 - 2:40 am | गामा पैलवान

संदीप डांगे,

आयशप्पत, इस्कू बोल्ते लडाई ! नाहीतर आम्ही ! इंजिनियरिंगची चार वर्षं हास्टेलात फक्त बसून काढली.

आ.न.,
-गा.पै.

खटपट्या's picture

13 Aug 2016 - 3:00 am | खटपट्या

खूप मस्त झालाय हा भाग. अजून येउद्या.

मुक्त विहारि's picture

13 Aug 2016 - 5:11 am | मुक्त विहारि

मस्त

चाणक्य's picture

13 Aug 2016 - 7:04 am | चाणक्य

वाचतोय. जबरा लढलात.

एस's picture

13 Aug 2016 - 7:52 am | एस

वाचतोय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2016 - 8:32 am | कैलासवासी सोन्याबापु

डांगे बुआ, अकोल्याचे लेकरं कुटी न्याच्या लायकीचे नाही! हे रेकटर सरांसमोर सप्रमाण सटीक सिद्ध केले थुमी!!!, तुमचा लढा आवडला खूप, आवडला पेक्षा कनेक्ट झाला म्हणायला हवे!, तुमचा दावा असलेले हॉस्टेल किमान सरकारी होते, त्यांना उत्तरे देणे बंधनकारक होते, च्यायला मी 8 वर्षे बाहेर राहिलो आहे हो, सेम प्रॉब्लेम पण बिना licencor पार्टी च्या अकौंटंबिलिटी झेलले आहेत पुण्यात काही खास आयटम सांगायचे झाल्यास,
१. तुमचा तो युपीएससी का काय तो कोर्स किती वर्षांचा म्हणे ? (काय सांगू कप्पाळ)
२. अकोला, ह्म्म्म कुठं सातारच्या जवळ आहे का हे गाव? (!)
३. रात्री 8 नंतर दिवा लावायचा नाही (तरी इलेक्ट्रिक बिल मी भरणार अशी बोली झालेली होती हे बरं)
४. इकडे नाही हो तुमच्यासाठी रूम "तुमच्यासारखे" अन "तुमचे" लोक तिकडे वारजे, माळवाडी, कोथरूड कर्वेनगरकडे राहतात तिकडे जाऊन बघा (सर्वात घाण अन मानहानीकारक प्रांतवादी अनुभव)

ह्याला उत्तरे मागायची सोय नव्हती, शेवटी मनाचा हिया केला अन बाहेर पडलो, असले कुजके प्रश्न न विचारता आसरा दिला तो पिंपरी चिंचवड ने, सरळ पदमजी पेपर मिलच्या लेबर चाळीत राहायला गेलो, तिथे खोली ऐन नळासमोर, तिथं अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे इराक युद्धाच्या मधोमध ज्ञानेश्वरी पारायण करणे होय! शेवटी 2 वर्षे युपीएससी बाजूला ठेवले, घराकडे बीएस्सीला 2 वर्षे नापास झालो होतो तेव्हा हार्डवेअरचा धंदा केला होता (नवे कॉम्पुटर अस्सेम्बलिंग, जुने रिपेअर, एएमसी) तेव्हा पुण्यातले काही कॉन्टॅक्ट झाले होते ते परत जगवणे, परत नोकरी केली एका लोकल हार्डवेअर इन्स्टिट्यूट मध्ये, दिवसा नोकरी अन रात्री कॉन्ट्रॅक्टची कामे असे 22 22 तास काम ओढले तेव्हा 2 वर्षात 6 लाख कमावले (आपले खर्च वगळता) एकदा निवांत ते पैसे उचलले अन वडलांच्या समोर ठेवले, पाणी आले होते त्यांच्या डोळ्यात भाऊ, सुदैवाने सहावा वेतन आयोग आला अन टाचा घासलेली खेटरं घालणाऱ्या आमच्या रिटायर्ड मास्तर वडिलांचे दिवस नोकरी सुटल्यावर 4 वर्षांनी पालटले, माझे 6 अरिअर चे पैसे मिळून पुण्यात एक बारीक छोटा फ्लॅट झाला, तेव्हा कुठे अभ्यासाला शांतता मिळाली होती.

तुम्ही असलं काहीतरी लिहिता मग जे विसरून जायचे आहे ते असे भडभडून परत वर येते! :/ तरीही तुम्हाला धन्यवाद!

हांगाश्शी बापू, जिगर भौ जिगर. बाकी कै नै.
पुण्यातल्या जिन्दगीच्या रणांगणावर बी फिरलाय म्हणा कि तुमचा रणगाडा.
ब्राव्हो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2016 - 9:40 am | कैलासवासी सोन्याबापु

फिरवावाच लागला! आमचे परतीचे दोर कापून आलो होतो आम्ही, जगण्याचे मूळ तत्व भांडण अन कलह आहे भाऊ, केकाटून रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नसते, हेच सत्य!, न भांडता काहीच मिळत नसते.असो! गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.

चतुरंग's picture

13 Aug 2016 - 9:42 am | चतुरंग

परतीचे दोर कापल्याशिवाय यशाचा स्वर्ग दिसत नाही!! :)

तुषार काळभोर's picture

13 Aug 2016 - 10:34 am | तुषार काळभोर

नमस्कारापलिकडे काही करू/बोलू शकत नाही.

अमितदादा's picture

13 Aug 2016 - 1:02 pm | अमितदादा

_/\_

बोका-ए-आझम's picture

15 Aug 2016 - 5:33 pm | बोका-ए-आझम

अकोल्याचे पोट्टे महा भंटोल हे कळून राहतंच प्रत्येकाला!

उगा काहितरीच's picture

13 Aug 2016 - 8:32 am | उगा काहितरीच

संदिप भाऊ, जब्राट !

Ujjwal's picture

13 Aug 2016 - 8:41 am | Ujjwal

हा भाग पण मस्त जमलाय. फक्त ते "वैगरे" न लिहिता "वगैरे" लिहावे. बाकी लेख मात्र झकासच!
प्रत्येकाने हाॅस्टेल लाईफ अनुभवली पाहिजे. बर्‍याच गोष्टींचे अनुभव येतात.
पु.भा.प्र.

Ujjwal's picture

13 Aug 2016 - 8:42 am | Ujjwal

हा भाग पण मस्त जमलाय. फक्त ते "वैगरे" न लिहिता "वगैरे" लिहावे. बाकी लेख मात्र झकासच!
प्रत्येकाने हाॅस्टेल लाईफ अनुभवली पाहिजे. बर्‍याच गोष्टींचे अनुभव येतात.
पु.भा.प्र.

चतुरंग's picture

13 Aug 2016 - 8:50 am | चतुरंग

याला म्हणतात लढा. आता नेमकं काय काय झालं शक्य असेल तितकं डीट्टेलवार अ‍ॅनालिसिस येऊद्यात.

तुमचा मास्तर तुमच्या बाजूनेच होता परंतु व्यवस्थेत राहून उघडपणे काही करता येणे शक्य नसते तेव्हा जे करु शकत असतात त्यांना बर्‍याचदा मूक संमतीने बळ मिळते तर कधी मी रागवल्यासारखं करतो तू गप्प बसल्यासारखं कर अशा तंत्राने पुढे जावं लागतं...

(आमचे हॉस्टेलचे दिवस पुन्हा एकदा फेर धरुन आले समोर. मेसच्या जेवणात बदल हवा, बाथरुममध्ये हीटर्स हवेत, खोलीत जास्तीचे प्लग पॉईंट्स हवेत, संगणक प्रयोगशाळा रात्रीची वापरता यायला हवी, घरुन फोन आला तर घेता येण्यासाठी कॉलेजचा फोन सहज अ‍ॅक्सेसिबल हवा अशा अनेक कारणांनी दिलेले छोटेमोठे लढे आठवले! मजा असते! :))
आयुष्यात प्रत्येकाने काही वर्षे तरी निश्चितच हॉस्टेलवरती घालवावीतच, फार निराळं जग बघतो आपण.

असो पुढची कथा ऐकण्यास उत्सुक!!

(तीनवर्षेहॉस्टेलनिवासी)रंगा

उडन खटोला's picture

13 Aug 2016 - 9:04 am | उडन खटोला

जियो डांगे भाऊ.
-4 महिने जेजे हॉस्टेल अनुभवलेला

तुमचे वर्णन वाचून आमचे सरकारी हाॅस्टेल पंचतारांकित हाॅटेल वाटायला लागले आहे!
पुभाप्र.

@सोन्याबापू _/\_

विवेकपटाईत's picture

13 Aug 2016 - 10:26 am | विवेकपटाईत

मस्त लेख. मी कधीच होस्टेलमध्ये राहिलो नाही. तसे म्हणाल २-३ महिने बंगळूरू मध्ये SPGच्या जवानांसोबत त्यांच्या होस्टेलमध्ये राहण्याचा अनुभव घेतला होता. पण सिविलिअन असल्यामुळे माझी चांगली व्यवस्था केलेली होती.

रातराणी's picture

13 Aug 2016 - 12:34 pm | रातराणी

पुभाप्र!
सोन्याबापू _/\_

संदीपभाऊ, बापूसाहेब

एक नंबर!

अमितदादा's picture

13 Aug 2016 - 12:58 pm | अमितदादा

आवडला लेखही आणि लडाही...

संजय पाटिल's picture

13 Aug 2016 - 1:01 pm | संजय पाटिल

आवडला लेख, पु. भा. प्र.

अभिरुप's picture

13 Aug 2016 - 2:03 pm | अभिरुप

खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. यु डिझर्व्ह इट. टेक अ बो बोथ ऑफ यु.

संत घोडेकर's picture

13 Aug 2016 - 2:27 pm | संत घोडेकर

डांगे साहेब
__/\__

खेडूत's picture

13 Aug 2016 - 8:41 pm | खेडूत

मस्त..
पुभाप्र...!

जव्हेरगंज's picture

13 Aug 2016 - 8:57 pm | जव्हेरगंज

ग्रेट!!!

अभिजीत अवलिया's picture

15 Aug 2016 - 3:31 am | अभिजीत अवलिया

पुभाप्र ...

अत्रे's picture

15 Aug 2016 - 12:59 pm | अत्रे

जबरदस्त ..

बोका-ए-आझम's picture

15 Aug 2016 - 5:28 pm | बोका-ए-आझम

आम्हीपण पुणे विद्यापीठात Department of Communication Studies ला सत्याग्रह करुन आमच्या good for nothing HOD ना बदललं होतं. आमचे HOD दूरदर्शनचे माजी Technical Director होते, एक प्राध्यापक तर ISRO च्या SITE वगैरे प्रकल्पांवर काम केलेले होते, पण या लोकांनी अभ्यासक्रम गुंडाळून ठेवला होता. विचार करा, व्यावसायिक अभ्यासक्रम पण placement cell नव्हता. आमच्या डिपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या EMRC (Educational Media Research Center) च्या सुविधांचा आम्हाला वापर करता येईल असं कागदोपत्री म्हटलं होतं, पण प्रत्यक्षात काहीही नव्हतं. अत्यंत महत्वाच्या असलेल्या internships आम्हाला स्वतःला मुंबईत किंवा इतर ठिकाणी जाऊन मिळवाव्या लागत होत्या. आणि तिथे गेल्यावर आमच्या department बद्दल कुणी ऐकलेलंच नसायचं. त्याच वेळी Symbiosis Institute of Mass Communication मात्र प्रत्येकाला माहित असायची आणि त्याचे संचालक डाॅ. विश्वास मेहेंदळे आमच्या department च्या कुठल्यातरी panel वर होते. हा सरळसरळ conflict of interest होता.
सुरूवातीला आम्ही आमच्या मागण्या जेव्हा HOD ना सादर केल्या तेव्हा त्यांनी त्या धुडकावून लावल्या. आम्ही आहोत ना, तुम्ही कशाला काळजी करताय असा सूर लावला. नंतर, तुम्ही आमची बदनामी करताय आणि त्याबद्दल rusticate करू वगैरे धमक्या झाल्या. मग तुम्हाला काय हवंय - हे देणं शक्य नाही, पण हे देता येईल असा पवित्रा घेऊन झाला. पण आमची बॅच आणि आमचे सीनियर्स हे ऐकायला तयार नव्हते. सप्टेंबर १९९६ मध्ये गणेशचतुर्थीच्या दुस-या दिवशी आम्ही संप जाहीर केला. आमच्यातले काही जण उपोषणाला बसले. हे माझ्या बापाच्याने झालं नसतं त्यामुळे मी त्यात भाग घेतला नाही. पण विद्यापीठाच्या आवारात कायदा आणि सुव्यवस्था भंग केल्याबद्दल आम्हा २० जणांना पोलिसांनी अटक केली आणि चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात lock up मध्ये टाकलं. तिथले एक-दोन हवालदार ओळखीचे होते. त्यांनी आमच्यासाठी डबा वगैरे मागवल्याचं आणि चक्क त्याचे पैसे न घेतल्याचं आठवतं. दोन दिवसांनी विद्यापीठाने तक्रार मागे घेतल्याचं कळलं आणि आम्हाला सोडून देण्यात आलं. मग कुलगुरू डाॅ.वसंतराव गोवारीकर यांच्याशी चर्चा झाली. त्याला गोवारीकर स्वतः आमच्या department ला आले होते. या gesture मुळे आम्ही भारावलो असलो तरी तडजोड करायची नाही हे पक्कं ठरवलं होतं, त्यामुळे चर्चेच्या ३ फे-या झाल्या आणि शेवटी आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. त्यावरून एकच कळलं की कुठलीही system ही लोकांना गृहीत धरते आणि आपल्या हितसंबंधांना जरा जरी धक्का लागला तरी लगेचच प्रतिक्रिया देते. त्या प्रतिक्रियेला लोकांनी घाबरावं अशीच तिथल्या लोकांची अपेक्षा असते आणि तीच सर्वात महत्वाची पायरी असते. कुठलाही लढा हा तिथे यशस्वी किंवा अयशस्वी होतो.

संदीप डांगे's picture

15 Aug 2016 - 5:32 pm | संदीप डांगे

कुठलीही system ही लोकांना गृहीत धरते आणि आपल्या हितसंबंधांना जरा जरी धक्का लागला तरी लगेचच प्रतिक्रिया देते. त्या प्रतिक्रियेला लोकांनी घाबरावं अशीच तिथल्या लोकांची अपेक्षा असते आणि तीच सर्वात महत्वाची पायरी असते. कुठलाही लढा हा तिथे यशस्वी किंवा अयशस्वी होतो.

अचूक बोललात!

अभिजीत अवलिया's picture

15 Aug 2016 - 8:28 pm | अभिजीत अवलिया

बिनतोड प्रतिक्रिया बोका साहेब ...