अवघे विश्वचि माझे घर... हे कितपत खरं?

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
17 Jun 2016 - 2:34 pm

आपण जन्माला कोणामुळे आणि कोणाच्या पोटी येऊ, कुठल्या वातावरणातल्या घरात वाढू, कोणत्या समाजात राहून लहानाचे मोठे होऊ, कसे निपजू आणि किती जगू या सगळ्यातल्या काही गोष्टी तरी आपल्या हातात नसतात. आपल्या हातात असत्या तर? या कल्पनेला रंगवताना आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्या अवस्थेत आहोत आणि आपली मनस्थिती कशी आहे यानुसार रंगसंगतीत कायम फेरफार होत राहतात. लहान असताना ही कल्पना केली तर आपल्याहून जास्त खेळणी मिळणा-या मित्राच्या घरी जन्मलो असतो असं आपण म्हणू शकतो; जरा शिंगं फुटल्यावर आपल्या आचार-विचारांना थोडं आणखी स्वातंत्र्य देणा-या घरात लहानाचे मोठे झालो असतो असं वाटू शकतं; थोडं मोठं झाल्यावर अंगावर येणा-या आणि अन्यायी वाटणा-या बंधनांना वैतागून जरा जास्त प्रगत समाजात जन्माला आलो असतो असं वाटू शकतं; आणखी थोडं मोठं झाल्यावर डोक्यानं थोडा आणखी शहाणा आणि मनानं थोडा आणखी खंबीर असतो असं वाटू शकतं; आणि वय बरंच वाढल्यावर 'काय करायचंय आता जास्त जगून' असंही वाटू शकतं. या पाचही जर तरच्या कल्पना आयुष्याच्या वेगवेगळ्या अशा सर्व अवस्थांमध्ये आपण करून पाहू शकतो पण त्यातली कोणती कल्पना आपल्याला सगळ्यांत जास्त विचलित करेल हे आपल्या कल्पना करतानाच्या अवस्थेवर अवलंबून असतं.

आणि अशा कल्पना ब-यांच असू शकतात, असतात. काही वरकरणी आपोआप आत्मसात होतात, काही मनावर उघडपणे बिंबवल्या जातात. यातली सगळ्यांत प्रभावीपणे बिंबवता येणारी आणि बिंबवली जाणारी कल्पना म्हणजे, 'आपण इतरांचं देणं लागतो'. इतर म्हणजे कोण विचारलं तर 'आपला समाज'. आता या आपल्या समाजात नेमकं कोण कोण येतं या प्रश्नाचं उत्तर तातडीनं मिळतंच असं नाही, आणि तातडीनं मिळालं तर ते उत्तर देणारा तरी अप्रामाणिक असतो किंवा त्याचं 'समाज म्हणजे श्रीमंत गरीब स्त्री पुरूष लहान थोर अशी सगळीच माणसं' हे उत्तर खरं मानलं जात नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला ते खरं मानता येत नाही. मोठं होत जातो तसं लक्षात येतं मानवसमाज कितीतरी लहानसहान उपसमाजांत वर्गीकृत झालेला आहे, आणि त्या त्या समाजांची जगांत स्वतःची अशी ओळख निर्माण झालेली आहे. मग आपण कुठल्या समाजाचे बरं? तर आपल्याला लक्षात येतं की आपण कितीतरी समाजांचे भाग आहोत. आणि हे सगळे समाजप्रकार आपापसांत जोडले गेलेले आहेत. एखाद्या चादरीत जसे शेकडो उभे आडवे धागे एकमेकांत शिस्तबद्ध पद्धतीनं गुंतलेले असतात तसेच हे समाज सुद्धा एकमेकांत गुंतलेले असतात. आणि सतत कोणीतरी हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत ही चादर उसवू पाहात असतो. आपल्या धाग्याचं स्वतंत्र अस्तित्व ठळकपणे दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि तो चादरीच्या टोकाशी उभा राहून प्राणपणाने स्वतःचे धागे आपल्या बाजूने ओढत उसवत असतो. प्रत्येकजण असं समजत असतो की आपलाच धागा सगळ्यांत मोठा आणि सगळ्यांत शक्तिशाली आहे. पण हे जर सिद्ध करायचं असेल तर तो या गुंत्यातून मोकळा करायला हवा, त्याचं स्वतंत्र अस्तित्व इतर धाग्यांना आणि धागेवाल्यांना दिसायला हवं. त्यासाठी त्याला चादरीपासून तोडायला हवं.

या वेगळेपणा दाखवून द्यायच्या प्रयत्नांत अनेकजण हावरटपणा करत धागे जोरात ओढतात आणि शेवटी धागा अर्धा तुटून त्यांच्या हातात येतो. यानं कोणाला काय मिळतं? कोण तृप्त होतं? कोणीच नाही. ना धागा, ना धागा खेचणारा, ना चादर, ना चादरीत उरलेले इतर धागे.

मग हे अर्धवट उसवलेले, तुटलेले धागे आपणहून नको तिथे अडकत राहतात. आणि चादर आपोआपच अधिकाधिक उसवत जाते. शेवटी तिचे तुकडे होतात आणि पार झिजून झिजून चिंध्या होईपर्यंत पायपुसणीसारखा वापर होतो.

आपण कधीच कुठल्याही एकमेव समाजाचे भाग नसतो. अमूक एका समाजप्रकाराच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी झगडत बसणं आणि त्यापायी त्या समाजाला इतरांपासून तोडणं याची परिणती शेवटी पायपुसण्यासारखं जगण्यात होते. तेच जर शांतपणे आपलं काम करत आपण राहिलो, तर चादर उसवत नाही आणि प्रेमळ उब देण्याचं विधायक कार्य एक समाज म्हणून आपल्या हातून घडतं.

गंमत अशी आहे की आपल्याला स्वस्थ बसवत नाही. काहीतरी चाळे आपण करतोच. काही जण अशी उसवाउसवी करणा-यांना रोखायचे, किंवा निदान त्यांच्या उपद्व्यापाचे गंभीर परिणाम अंगावर शेकणं पुढे ढकलायचे प्रयत्न करत असतात. तुटलेले दोरे पुन्हा जोडायचा प्रयत्न करण्यात लोक आयुष्य खर्च करून टाकतात. पण कुठल्या प्रेरणेनं ही माणसं असं करायला तयार होतात? आधी पोटोबा म्हणत सुखात राहावंसं मनापासून वाटत असताना विठोबा का सारखा आठवत राहतो यांना? 'आपल्या समाजाविषयी' थोडीफार तरी आपुलकी असल्याशिवाय हे शक्य आहे का?

चांगल्या, शहाण्या माणसांना आपल्या वाटणा-या 'समाजाची' व्याप्ती इतर जनांपेक्षा बरीच मोठी असते. पण त्यालाही कुठेतरी सीमा असतेच. 'अवघे विश्वची माझे घर' हे एक अति उदात्त ध्येय झालं, पण ते म्हटलं आणि जरी मनाला पटलं तरी लगेच साध्य होत नसतं. आपल्या शेजारच्या शहरात घडलेली भीषण दुर्घटना, आणि आपण नाव फारसं न ऐकलेल्या कुठल्याशा देशातली तशीच एक अतिभीषण दुर्घटना, या दोहोंच्या बातम्यांवर आपण सारख्याच तीव्रतेनं उत्कट प्रतिक्रिया देतो का? प्रकट प्रतिक्रिया सारखी असू शकते, पण मनात काय वाटत असतं? आणि ती प्रतिक्रिया मनात किंवा उघडपणे व्यक्त झाल्यानंतर आपण सुन्न होऊन मेलेल्या अनोळखी लोकांसाठी अश्रू ढाळत बसतो की चॅनल फिरवून आपली आवडती मालिका किंवा सिनेमा बघत बसतो?

याचं कारण म्हणजे आपल्या नकळत 'आपलं' म्हणजे नेमकं काय आणि त्याला 'कधी' आणि 'कितपत' 'आपलं' मानायचं हे आपण ठरवून मोकळे झालेलो असतो. आणि त्यानुसारच आपण आपापल्या परीनं आणि इच्छाशक्तीनं जमतील तितके 'पर'-उपकार 'आपल्या मानलेल्या' माणसांवर करत असतो.

हा आपलेपणाचा भाव आपल्या हातून जशी प्रसंगी चांगली कामं घडवतो, तसेच बहुतेकदा घोर अपराधही घडवतो. म्हणूनच जेव्हा 'आपल्या' समाजाच्या त्रृटी ढळढळीतपणे दिसत असतात, तेव्हा फक्त ते बाहेरचा, परका कोणीतरी दाखवून देतोय म्हणून आपण 'हो याबद्दल काहीतरी करायला हवं खरं' असं साधं मान्य करायचाही विवेक न दाखवता त्या परक्याच्या नाकाला कसा आणि किती शेंबूड लागलाय ते पाहण्यात आणि त्याला दाखवून देण्यात वेळ दवडतो. बहुतेकदा परका जे सांगत असतो ते आपल्याला पटलेलंही असतं, पण आपण केवळ तो परका आहे म्हणून 'आमचं आम्ही काय ते बघून घेऊ तू नको सांगायला' असा पवित्रा घेतो. यालाही एक स्वाभाविक कारण आहे ते असं की आपलाच भरवशाचा समाज इतके टोणगे पैदा करत असताना या परक्यावर विश्वास कसा ठेवावा? त्याचा हेतु कितपत शुद्ध आहे? त्याचा 'अजेंडा' काय आहे? असे प्रश्न मनात उठतात. ते उठण्यात गैर काहीच नाही कारण असे नको ते अजेंडे घेऊन इतर समाजात आपल्या समाजाची टिमकी वाजवणारी माणसं सर्वत्र बहुसंख्येनं असतात.

म्हणूनच मग पीडित समाजाला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगू पाहणारी पीडितांच्या दृष्टीनं प्रगत असलेल्या समाजातली प्रामाणिक माणसंसुद्धा 'लबाड' ठरवली जातात. प्रत्येक चांगल्या सल्ल्याचा उलटच अर्थ काढला जातो. शेवटी वैतागून तो भला माणूस 'ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खरं' असं म्हणाला तर 'पाहा माज पाहा यांचा' असंही म्हटलं जातं. पीडित समाजानं दिलेल्या प्रामाणिक आणि योग्य सल्ल्याबद्दल तर बोलायलाच नको. त्याकडे अगदी सहज दुर्लक्ष केलं जातं. पण प्रगत असो वा पीडित, कुठलेही समाज आणि समाजवासी असे प्रामाणिक आणि योग्य सल्ले क्वचितच मांडताना दिसतात ज्यामुळे भलभलत्या टिकाटिपणीच्या गर्दीत चांगले मुद्दे हरवून जातात. मग असे काही विचित्र निष्कर्ष निघतात आणि त्यांचं जबरदस्त सरसकटीकरण केलं जातं की काही सांगायला नको.

पीडित समाजातल्या लोकांची काही चांगलं करण्याची लायकीच नाही अशा थाटात वर्तणूक दिली जाते. कोणाच्या हातून चांगलं घडलंच तर त्याला नक्कीच कोणा प्रगत माणसाचा आधार मिळाला असणार अशी भूतकाळातील उदाहरणांवरून खात्री व्यक्त होते. आणि समजा मिळालाही असेल एखाद्याला आधार, तरी त्यानं कशातही केलेली कामगिरी काय कमी वाखाणण्याजोगी ठरते का? तुम्हालाही मिळू शकला असता आधार तुम्ही काय मोठं केलंत?

प्रगत समाजाला मिळणा-या सा-या सुखसोयी या पीडितांकडून लुटलेल्या आणि म्हणूनच की काय, पण प्रिव्हिलेज (विशेषाधिकार) मानल्या जातात. हे काय मला कधी पटलं नाही. समजा, एका वर्गात दहा मुलं शिकताहेत. त्यातल्या एका मुलावर शिक्षकांचा काहीतरी बावळट कारणामुळे राग आहे. त्यामुळे त्या मुलाला समान वागणूक मिळत नाही. त्याला मुद्दाम कमी गुण दिले जातात, मुद्दाम जास्त शिक्षा आणि ओरडा मिळतो. त्याला मिळणा-या अशा वागणुकीवरून दोन मुलं त्याला चिडवतातही. त्याविरुद्ध तक्रार करूनही त्या मुलाचं कोणी ऐकत नाही. आता त्याला न्याय्य वागणूक मिळत नाही, आणि त्या दोन मुलांचे याबाबतीत लाड होतात, म्हणून इतर सातजणांना शिक्षकांकडून मिळणारी न्याय्य वागणूक प्रिव्हिलेज ठरावी का? त्यांची काय चूक? बरं आणि त्यांनी सहानुभूती दाखवलीच किंवा अगदी शिक्षकांशीही याबाबत बोलायचा प्रयत्न केला, तर त्या अन्याय झालेल्या मुलानं 'तुम्ही उगाच माझा कळवळा आल्याची नाटकं करू नका' असं म्हणणं कितपत शहाणपणाचं ठरेल?

शेवटी म्हणणं काय, तर माणूस जे सांगतोय त्यातला आशय लक्षात घेऊन त्यावर विचार करावा. इतकीच जर इतरांची तोंडं बंद करण्याची हौस असेल तर ज्या चड्डीत सतत मुतताय ती बदला, तो स्वतःच्या नाकावरचा शेंबूड पुसा, म्हणजे संधीच मिळणार नाही कोणाला तुमच्यावर बोट ठेवायची. पण दिसणा-या समस्येवर विधायक उपाय शोधून काढण्याऐवजी 'कशी जिरवली!' असं म्हणण्यातच जास्त धन्यता मानतो आपण सगळेच आणि याकडे आपापल्या 'व्यापक आणि सर्वसमावेशक' समाजाची चिंता लागून राहिलेल्यांचाच कल जास्त दिसतो.

सिंहावलोकन आजमावण्यापूर्वी आत्मावलोकन करणं अत्यावश्यक असतं. त्याशिवाय 'आपल्या समाजाच्या' विळख्यातून आपल्याला बाहेर पडताच येत नाही. ही 'अवघे विश्वची माझे घर' या ध्येयाची पहिली पायरी म्हणता येईल. जिच्यावरून उडी मारून जाण्याची चूक करणारे पुढे जाऊन पाय सरकून खाली कोसळतातच.

माझा हा लेख वाचणा-या कोणालाही या लेखामागचा माझा 'लबाड अजेंडा' दिसून आला तर कृपया मला तो सांगावा, कारण मला तो दिसत नाहीये.

- © कौस्तुभ अनिल पेंढारकर.

धोरणसंस्कृतीसमाजजीवनमानराहणी

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

18 Jun 2016 - 9:20 pm | आनन्दा

माणसाची 'स्व' ची व्याख्या त्याच्या स्वार्थावर ठरते.. तो स्वतः, त्याचे कुटुंब, त्याचा मित्र परिवार, मग गोतावळा, त्यानंतर जात, धर्म, राज्य, देश वगैरे चढत्या क्रमाने व्यापक होत जाते.

सतिश गावडे's picture

19 Jun 2016 - 12:00 pm | सतिश गावडे

अगदी नेमकं लिहिलं आहे.

नाखु's picture

21 Jun 2016 - 9:54 am | नाखु

एक्दा समाज, देश यांच्यापल्याड गेलेकी पहिल्या एक दोन पायर्यांबद्दल तटस्थपणा आला तरच खरा समाजसेवेचा अंगिकार करता येतो.

अन्यथा गुंत्यातून गुंत्याकडे प्रवास अटळ आहे.

विवेकपटाईत's picture

19 Jun 2016 - 11:38 am | विवेकपटाईत

एकदा कि US विसा मिळाल्यावर विश्व आपसूक घर बनते.

सातवा वेतन आयोग मिळाला तरी सुद्धा :)

कानडाऊ योगेशु's picture

19 Jun 2016 - 2:32 pm | कानडाऊ योगेशु

पूर्ण लेख वाचला नाही पण काय म्हणायचे असावे हे साधारण लक्षात आले.
झाकीर नाईक साहेबांनी त्यावर छान उत्तर दिले आहे. मुस्लीम धर्मात फक्त मुस्लीम ब्रदरहुड मानला जातो. जो जो मुस्लीम तो तो आपला बंधु बाकी विश्वबंधुत्व वगैरे फाजील संकल्पना नाहीत. जर विश्वबंधुत्व मान्य करायचेच असेल तर समोरच्यालाही मुसलमान बनवा व मग त्याला बिनदिक्कतपणे बंधु माना.

वेगळ्या वाटेने केलेला विचार आवडला. अशानेच नवा दृष्टीकोण नविन सत्य गवसण्याची शक्यता वाढते.

चंपाबाई's picture

21 Jun 2016 - 5:43 am | चंपाबाई

छाण