कशी सांगावी मी वेदना प्रिये....

सुंड्या's picture
सुंड्या in जनातलं, मनातलं
11 Jun 2016 - 5:46 pm

गर्मीचे दिवस होते, फाल्गुन महिन्याच्या तेव्हढ्यातच बादशहा-सलीमाचा नव-विवाह झाला होता. नव्या नवरीसह आनंदाचे क्षण घालविण्यासाठी बादशाह राजकारभाराच्या जंजाळापासून दूर काश्मीरच्या दौलतखान्यास आले होते.

रात्रीचा दुसरा प्रहर संपत आला होता, बाहेर रात्र चंद्रप्रकाशात भिजून निघाली होती. त्या चांदण्यांत दूरवरची हिमशिखरे काळोखात अधिकच शुभ्र होऊन सुंदर दिसून राहिली होती. आरामबाग महालाच्या खालच्या बाजूस असलेली पहाडी नदी वळण घेत वाहत होती.

मोतीमहालाच्या एका दालनात शमादान जळत होते आणि त्याच्या एका उघड्या गवाक्षाजवळ बसलेली सलीमा त्या चांदण्यारातीच सौंदर्य निरखून राहिली होती. मोकळा केशंभार तिच्या मोरपंखी रंगाच्या ओढ्णीवर ओघळलेला होता. मोती ओळून बनविलेल्या त्या भरजरी ओढ्णीवर, सोन्याचांदीने मढविलेली तंग कुरती आणि पाचूच्या कमर-पट्ट्यावर, अंगुराएवढया मोत्यांची माळ झुलून राहिली होती. सलीमाचा कमनीय रेखीव बांध्याचा रंग सुद्धा मोत्यासारखाच होता. तिच्या संगमरवरी शुभ्र तळव्यांवरच्या जरीकाम केलेल्या पादत्राणांवर दोन ठळक हिरे चकाकत होते.

दालनात कलाकुसरीच्या बहुमूल्य वस्तू आकर्षकपणे सजवून ठेवलेल्या होत्या, मधोमध एक बहुमूल्य इराणी गालीचा अंथरलेला होता, त्यावर पाय ठेवताच तो हातभर दबायचा, त्याच्याच एका बाजूस माणूसभर-उंचीचे चार आरसे लावलेले होते. आजूबाजूला सोन्याचांदीच्या फुलदाणीत ताज्या फुलांचे गुलदस्ते ठेवले होते, तिथेच एका कोपऱ्यात सुगंधित धूप-दिवे जळत होते, कुशलतेने विणलेल्या नागकेसर आणि चाफ्यांच्या माळा दारां-भिंतीवर लटकत होत्या त्यांचा सुगंध दालनभर दरवळून राहिला होता.

बादशाह दोन दिवसापासून शिकार करण्यासाठी गेले होते आणि अद्यापावेतो परत आलेले नव्हते. त्यांचीच वाट पाहत खूप वेळ पर्यंत सलीमा चांदण्या प्रकाशात दूरवर बघत राहिली अखेर तीला राहावेनासे झाले, खिडकीतून उठून ती, काहीसं बे-मनानेच तक्क्यावर जाऊन बसली. वय आणि चिंतेच्या तापाने असह्य होत, तिने अंगावरची ओढणी काढून फेकली आणि स्वगतच चिडून म्हणाली-

“छ्या! काय करावं? कशातच मन नाही लागत, काहीच ठीक नाहीये!...”

चुळबुळ करत तिने जवळच ठेवलेली वीणा वाजविण्यास घेतली. दोन-चार बोटं चालविले, पण स्वर काही सापडला नाही. बावचळून म्हणाली-

“बादशाह सारखी ही सुद्धा मनमर्जीने वागतेय.” त्रासल्या सारखे करून वीणा ठेवत दासीला इशारा केला. झटपट एक दासी हजर झाली.

आलेली दासी खूप सुंदर आणि कमनीय होती. तिच्या सौन्दर्याला गूढ विषादाची रेषा आणि डोळ्यांत नैराश्याची झाक होती. तीला जवळ बसण्याचा आदेश देत सलीमाने तीला विचारले-

“साकी, तुला वीणा आवडते की बासरी?”

विनम्रतेने उत्तर देत दासी म्हणाली- “हुजूर ज्यामध्ये आपण ख़ुश होणार असाल.”

सलीमाने विचारले- “पण तुला काय आवडेल?”

दासी कंपित स्वरात उत्तरली- “सरकार, माझ्यासारख्या दासीला कसली आवड-नीवड?”

क्षणभर सलीमा तिच्या चेहऱ्याकडेबघत राहिली- दासीच्या चेहऱ्यावर विषाद, नैराश्य आणि व्याकुळतेच अजब भाव दाटले होते.

सलीमा म्हणाली- “मी तुला दासी सारखी वागवते का?”

“नाही हो हुजूर, असं नाही, आपली तर खास मेहरबानी आहे माझ्यावर.”

“असं!, मग तू का बरे इतकी नाराज, असहज आणि सगळ्यांपासून दूरदूर राहते? जेव्हापासून तू माझ्या सेवेत आली आहेस मी तुला कधी हसत-खेळत बघितले नाहीये, कसलं दुख: आहे?... मला सांगणार नाही का?” असं म्हणतच सलीमा दासी जवळ सरकली आणि तिचा हात पकडला.

सलीमाच्या अनपेक्षित स्पर्शाने दासी थरथरली, पण अबोलच राहिली.

सलीमा म्हणाली- “तुला माझी शपथ! तुझं दुख: मला सांग, तुझ्या मनाला काय सलत आहे ते सांग,..... का बरं तू इतकी उदास असतेस?”

कंपित स्वरात दासी म्हणाली- “हुजूर, आपण सुद्धा आज-काल काहीश्या नाराजच दिसता? ते का बरे?”

सलीमा काहीशी खिन्न स्वरात- “आजकाल जहापनाहा इकडे कमीच येतात, माझी-त्यांची गाठ-भेटही कमी झालीये, यामुळे माझे मन उदास राहतं.”

दासी- “सरकार, हृदयाला भावलेली वस्तू जेव्हा मिळत नाही तेव्हा मन नाराज होतं, उदास राहू लागतं. अमीर असो वा गरीब, सगळ्यांच्या मनाची व्यथा सारखीच असते.”

सहज हसत सलीमा म्हणाली-“अस्स होय, आत्ता समजले तू एवढी नाराज का असते तर. तुझं सुद्धा कुणावरतरी प्रेम आहे, होय ना?. काय नाव आहे गं त्याचं? मला सांग मी तुझं लग्न लावून देते त्याच्याशी.”

साकीला चक्रावल्या सारखे झाले. क्षणात चेहऱ्यावर भावांची अनेक स्थित्यंतरे झाली पण नजर स्थिर होती, वर बेगमच्या डोळ्यांत बघत ती म्हणाली – “माझं... तुमच्यावर प्रेम आहे,..... तुम्हीच मला आवडता.”

हे ऐकताच सलीमा मनमोकळी हसली, फुलांचा सडा पडला. हसण्याच्या त्या आवेगात दासीच्या गांभीर्याकडे तिचे लक्ष गेले नाही. दासी काहीच नं झाल्यासारखी शांत राहत सारंगी सावरत म्हणाली-

“काय ऐकण्याची इच्छा आहे?”

बेगम- “आधी एक काम कर, इथे जरा जास्तच उकाडा होतोय. दालनाचे सर्वच दारं-खिडक्या उघडून घे. सगळे दीप मालवून टाक म्हणजे या टपोऱ्या चांदण्याची मजा येईल.”

दासी उठताच सलीमा तीला म्हणाली- “खूप तहान लागलीये गं, तू पहिल्यांदा शरबत दे.”

दासीने सलीमाला सोन्याच्या प्याल्यामध्ये सुगंधी शरबत आणून दिले, बेगम हाती धरतच म्हणाली

“अगं... खूपच गरम आहे हे, गुलाब नाही टाकला का?”

दासी नम्रतेने म्हणाली-“टाकला तर होता राणी सरकार?”

“अच्छा?....बरं..यात थोडं आणखी इस्तम्बोल टाक”

दासी प्याला घेऊन दुस-या दालनात गेली.त्यात थोडं इस्तम्बोल आणि आणखी एक द्रव मिसळले आणि ते सुवासित मद्यपात्र बेगम सामोरं केलं. एका घोटात ते संपवत सलीमा म्हणाली-

“अच्छा..., आत्ता सांग. तू काय म्हणाली होती?...माझ्यावर प्रेम करतेस?...होय ना? ....हं?...ठीक तर मग गा, एखादं प्रेमगीतच गा”

असं म्हणत सलीमाने खाली झालेल्या प्याल्याला गालिचावर घरंगळते केले आणि स्वतःला तक्क्यावर झोकून दिले आणि रसभरीत नेत्रांनी दासीकडे बघू लागली. दासी सारंगीच्या सुरांत गाऊ लागली-

“कशी सांगावी मी वेदना प्रिये....”

खूप उशिरा पर्यंत सारंगी आणि दासीचे आर्त स्वर दालनात घुमत राहिले. दासीच्या अश्रूंनी सारंगीचा एक काठ ओलावला होता. संगीत, मदिरा आणि यौवनाच्या धुंदीत तल्लीन होऊन सलीमा मान डोलावत होती.

गीत संपवून दासीने सालीमाकडे बघितले, बेगम मदिरेच्या प्रभावात निद्राधीन आहे, मदिरेने तिचे गाल रक्तवर्ण झालेत आणि तामुल-विड्यामुळे लालसर झालेले ओठं अधूनमधून थरथरतायत. पूर्ण दालन तिच्या श्वासगंधाने भरल्यासारखं झालय. मंद वाऱ्याच्या झुळूकीने जशी कोवळी पानं हलतात अगदी तसच सालीमाचे वक्षस्थळ सावकाश वरखाली होतय. दिव्यांच्या प्रकाशात तिच्या कपाळावरचे स्वेदबिंदू उज्ज्वल प्रकाशातील मोत्यांसमान चमकत आहेत.

सारंगी ठेऊन दासी क्षणभर बेगम जवळ येऊन उभी राहीली. ती थरथरली, डोळे जळजळले, घाश्यास कोरड पडली. गुडघे टेकून हळुवारपणे ती बेगमच्या चेहऱ्यावरचे स्वेदबिंदू स्वतःच्या पदराने टीपू लागली..आणि वाकून तिने बेगमच्या नाजूक ओठांचे ओझरते चुंबन घेतले, नजर वर करताच बघितले, गोर-गरिबांचे-वाली खुद्द बादशाह शहाजहां समोर उभे आहेत आणि तिचे हे कृत्य आश्चर्य आणि क्रुद्ध होऊन बघत आहेत.

दासीला जणू सर्पदंशच झाला. हतबुद्ध होऊन बादशहाकडे बघत राहिली.

बादशहा म्हणाले-“कोण गं तू?...आणि हे काय करत होती?”

दासी मंद स्वरात नम्रतेने म्हणाली-“ जहापनाह!....मी उत्तर दिले नाही तर?”

ऎकताच बादशहाचे कानशीलं तापले. एका साधारण दासीची एवढी हिम्मत.

ते म्हणाले- “असं?.. माझ्या प्रश्नाला उत्तर नाही देणार....?..अगं तुला नग्न करून चाबकाचे फटके देण्यात येतील”

दासी कंपित पण गंभीर स्वरात उत्तरली- “मी पुरुष आहे!”

बादशहाच्या डोळ्यात निखारे पेटले, त्यांनी जळजळत्या नेत्रांनी मूर्च्छित सलीमाकडे बघितले. तीचे यौवन अनावृत्त होते. “ओफ्फ, फाहशा” बादशाह उद्गारले, त्यांचा हात तलवारीच्या मुठीवर गेला पण दासी कडे बघत “कुत्र्या.....तुझी ही हिम्मत?”

कठोर स्वरात त्यांनी आवाज दिला – “मादुम!”

तत्काळ एक कर्कश स्त्री बादशाह समोर अदबीनं उपस्थित झाली.

बादशाहाने हुकुम दिला-“कैद कर या हलकटास, तळखान्यात नेऊन टाक, उपाशी मरु दे तिथं.”

मादुम ने आपल्या खरबरीत हातात युवकाचा हात पकडला आणि त्याला घेऊन तळखान्याकडे निघली. थोड्याच वेळात ते दोघे एका लोखंडाच्या मजबूत दारापाशी पोहोचले. मादुम ने चाबी काढली...तळखान्याच्या त्या नि:शब्द वातावरणाला चरे देत ते दार उघडे झाले आणि मादुमने कैद्यास आत लोटून दिले व पुन्हा एकदा चरमरत दार परत बंद झाले.

---

इकडे सकाळ झाली. सलीमा शुद्धीवर आली. केसं, ओढणी सावरत चोळी ठीक करण्यासाठी आरश्यासमोरं गेली. सर्व गवाक्ष-दारं खिडक्या बंद होते.

सलीमाने आवाज दिला- “साकी! प्रियं साकी! खूप गरम होतंय, जरा गवाक्ष उघड बरं. रात्री मद्याच्या नशेत केव्हां-कशी गाढ झोप लागली काही लक्षात आलं.....”

कुठेच काही हालचाल नाही झाली, सलीमाने जोऱ्यात आवाज दिला- “साकी!?”

याहीवेळी काही उत्तर आलं नाही हे पाहून सलीमा चकीत झाली. ती स्वतः गवाक्ष-द्वार उघडण्याचा प्रयत्न करू लागली, तिच्या लक्षात आलं की ती सगळी बाहेरून बंद होती. विस्मित होत स्वगतच पुटपुटली- “काय झालंय काही कळत नाही? गेल्यात कुठं या सगळ्या सेविका?”

ती दालनाच्या मुख्य द्वाराकडे गेली. पहाऱ्यावर नंगी तलवार घेऊन एक कर्कश दासी उभी होती. बेगमला पाहताच तीने डोके झुकवून अभिवादन केले.

क्रुद्ध-स्वरात सलीमा म्हणाली- “तू इथे काय करतेयस?”

“बादशाह चा हुकुम आहे”-दासी

“बादशहा आलेत?”

“जी, आलेत.”

“कधी आले?...मला का सांगण्यात आले नाही?”

"तसा आदेश नव्हता.”

“कुठे आहेत बादशाह?”

“जीनतमहलच्या दौलतखान्यात.”

हे ऎकताच सलीमाच्या मनात जळजळलं, सवतमत्सराने हाताच्या मुठी आवळल्या गेल्या, स्त्री अभिमानाने ती म्हणाली-“ असं?...बरोबर आहे ज्यांचा वावरच सौंदर्याच्या बाजारात आहे, त्यांना प्रेमाची काय जाण?...हं!..आज जीनतमहलच नशीब जोरात दिसतंय?”

दासी चुपचाप उभी राहिली. रहावून सलीमा म्हणाली-

“माझी साकी कुठे आहे?”

“कैदेत.”

“का बरं?”

“जहापानाहांच्या आदेशानुसार.”

“तिचा काय दोष?”

“मी सांगू शकणार नाही.”

“त्या कैद्खान्याची चाबी दे, मीच सोडवून आणते तीला.”

“तुम्हाला तुमच्या दालनाबाहेर जाण्याची परवानगी नाही.”

“याचा अर्थ मी पण कैदेत आहे?”

“होय.”

उत्तरानिशी सलीमाचे डोळे पाणावले तुटलेल्या पावलांनी दालनात परतली, तक्क्यावर अश्रू ढाळत विचार करत बसली. काहीवेळ विचार करून तिने एक पत्र लिहिले.

‘हुजूर!
माफी असावी. दिवसभराची थकलेली मी अशी काही निद्राधीन झाले की के आपल्या स्वागतासाठी उपस्थित नाही होऊ शकले आणि माझ्या त्या प्रीय दासीला सुद्धा कैदमुक्त करण्यात यावे. मला मान्य आहे की दौलतखान्यात आपल्या आगमनाची बातमी तिने मला वेळच्यावेळी दिली नाही, पण सरकार तिची चूक पदरात घ्यावी, माफ करा तीला ती बिचारी गरीब आहे आणि सेवेत नवीनच रुजू झाली आहे.

आपली दासी,
सलीमा‘

पहाऱ्यावरची दासी ते पत्र बादशाहांकडे घेऊन गेली. बादशहाची तब्येत सुद्धा काही ठीक नव्हती, डोक्यात एकाच विचारानं थैमान घातलं होतं- त्यांच्या बेगमचे ओठ एका परपुरुषाने चुंबावे?. साऱ्या हिंदुस्थानच्या बादशहाची पत्नी अशी स्वैराचरणी निघावी?. रागाच्या भरात ते तळमळत होते आणि त्या दृश्याची कटू आठवण येताच मद्याचे घोट गिळत होते. आलेल्या संधीचा फायदा घेत जीनतमहलसुद्धा सवतद्वेष उगाळत होती. कर्कश दासीला बघताच बादशाह अधिकच क्रुद्ध होत म्हणाले-

“का? काय झालय?...तू इथे कशी”

दासी बावरतच म्हणाली- “सरकार! सलीमाबीबीची क्षमायाचना आणली आहे.”

दात-ओठ चावत बादशाह उद्गारले-“मरून जा म्हण तीला.”

तोंड फिरवत त्यांनी सामोरे ठेवलेल्या पत्रास लाथ मारली. दासी सलीमाकडे परतली. बादशहाचे उत्तर ऐकून ती मटकन जमिनीवरच बसली. तिने दासीला बाहेर जाण्याचा आदेश दिला आणि दार बंद करून धायमोकलून रडू लागली. तासंतास ती रडतच राहिली, पाहता-पाहता दुपार ओसरली संध्याकाळ झाली, सलीमा मनोमन म्हणाली-

“हाय रे! बादशाहची बेगम होणे पण एक गुन्हाच झाला! वाट पाहता-पाहता डोळे फुटोत, आळवणी-आर्जव करता-करता जीभ झिजून जाओ की शरीराचे तुकडे होवोत....एका छोट्याश्या चुकीसाठी असे वागणे?...का?...तर ते आले तेव्हा मी झोपले होते!,...जागी झाले नाही!...म्हणून इतकी नालस्ती?...इतकी नाराजी?.....ह:!..असंच असेल तर मी कसली बेगम? जीनत आणि इतर दास्या हे ऐकतील तर काय म्हणतील?...इतक्या निंदा-नालस्ती नंतर माझी तोंड दाखवायची सुद्धा लायकी नाही...अश्या लाजिरवाण्या जीवनाचा अंत केलेलाच बरा. बादशाहची बेगम होण्यापेक्षा एखाद्या गरीबाची पत्नी होणे परवडले असते”

हळू-हळू तिच्या अंतर्मनात स्त्रीत्वाच्या तेजाचा उदय झाला चेहऱ्यावर दुखाच्या छटा मावळल्या. सकाळची दवं सुर्यातेजाने जशी वष्पित होतात तशीच स्थिती सलीमाच्या डोळ्यांतील आसवांची झाली, स्त्रीभीमान आणि खंबीर-निश्चयाचे चिन्ह तिच्या नेत्रात भरु लागले. एखाद्या नागीणसारखी ती चटकन उभी झाली. पुन्हा एकदा एक पत्र लिहिले.

‘सरकार! तुमची पत्नी आणि सेविका असल्यामुळे आपल्या दिलेल्या आदेशाचा आदर म्हणून मरण स्वीकारते, इतकी बेअब्रू होऊन माझ्यासारखीचं मरणच ठीक आहे, पण आपण तर साऱ्या हिंदोस्थानचे बादशाह आहात आपल्याला स्त्रीचा आदर असावा. एका छोट्याश्या चुकीची इतका मोठा दंड दिला जावा, स्त्रीला इतकं गौण समजणे तुमच्या बादशाही सम्मानाला शोभत नाही. माझा कसूर एवढा ना की तुमच्या आगमनाच्या वेळी मी निर्धास्त झोपले होते. ठीक आहे तुमच्या शब्दाला पडू देणार नाही. पण मी मरण्याआधी तुमचे अंतिम दर्शन व्हावे हीच इच्छा. तुम्हाला दिर्घ्यायू लाभो हीच त्या परमदयाळू अल्लाहकडे प्रार्थना करेन.

सलीमा’

ते पत्र अत्तराने सुवासित करून ताज्या फुलांच्या गुलदस्त्यात अश्याप्रकारे ठेवले की कोणाच्याही सहज नजरेत यावे. या नंतर तिने दागिन्यांच्या पेटीतून एक विशेष अंगठी काढली आणि काही वेळ एकटक त्या अंगठीकडे पाहत राहिली आणि मग गिळून टाकली.

बादशाह नजरबागेत संध्या-भ्रमण करत होते. कावरे--बावरेसे दोन-तीन चाकर बादशहाकडे पळतच आले आणि पत्र सामोरं करत म्हणाले-“हुजूर, गजब झालंय. सलीमाबिबीनं जहर घेतलंय, मरतेय ती”
बादशाहने सरसर पत्र वाचले. तडकाफडकी महालात पोहोचले. सलीमा जमिनीवर पडून होती. डोळे वर चढले होते. काया काळवंडली होती.

ना राहवून बादशहांनी घाबरतच-“राजवैद्यास बोलवा!”..चाकरांनी तिकडे धाव घेतली.

बादशहाचे शब्द ऎकताच सलीमाने त्यांचाकडे बघितले, आणि क्षीण स्वरात म्हणाली-“आलात तुम्ही? माझं नशीब, अखेरची इच्छा पूर्ण केली”

बादशहा सलीमाजवळ बसत म्हणाले-“सलीमा, बादशाहची बेगम असूनही तू हे ठीक नाही केलं”

कळ सोसत सलीमा म्हणाली-“हुजूर, माझी चूक साधारण होती”

बादशाह कठोर स्वरात म्हणाले-“शाही जनानखाण्यात स्त्रीवेषात एका पुरुषास ठेवण्याला तू साधारण चूक म्हणते? असं काही ऐकले असते तर विश्वास नसता केला, पण जे मी स्वतः पाहिलं ते कसं खोटं ठरेल?”
सलीमाला जणू असंख्य विंचूडंख झाले, त्याही अवस्थेत ती तडफडत म्हणाली-“काssय?”

घाबरून बादशाह मागे सरले. म्हणाले-“खरं सांग, यावेळी खुदाच्या अंतिम-पथावर आहेस, कोण होता तो युवक?”

सलीमाने कससं करत प्रतिप्रश्न केला-“कोण युवक?”

रागात बादशाह म्हणाले-“ज्याला तू साकी बनवून स्वतःजवळ ठेवले होते?”

सलीमा घाबरतच म्हणाली-“अर्रे!....ती पुरुष होती?”

बादशाह-“तुला खरोखर माहित नव्हतं की काय?”

सलीमा उद्गारली-“हे खुदा”

तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सर्व दृष्य तिच्या लक्षात आलं. थोड्या वेळात म्हणाली-”खाविन्द! जर असं असेल तर मग काहीच गैर नाही; असल्या गुन्ह्याचा योग्य तोच दंड मिळाला. माफी असावी पण अल्लाहची शपथ घेऊन सांगते मला असं काहीच माहित नव्हतं.”

बादशहाचा कंठ दाटून आला. ते म्हणाले –“सलीमा, अश्यानं तर तू निर्दोष ठरतेस प्रिये.”

बांध तुटल्या सारखे अश्रुधारांचे ओघळ बादशाहच्या डोळ्यातून वाहू लागले.

सलीमा चाचपडत बादशहाचा हाथ छातीजवळ घेत म्हाणाली- हुजूर, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता समजले, बस सगळं जिवन सार्थ झालं, भूल-चूक माफ असावी....एक अखेरची इच्छा पूर्ण कराल?”

“सांग!... लवकर सांग प्रिये”- बादशाह

थरथरत्या पण खंबीर स्वरात सलीमा म्हाणाली-“शक्य असेल तर त्या युवकाला माफ करा”

सलीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि हाताची पकड एका क्षणासाठी घट्ट होऊन सैलावली, तिचं शरीर थंड पडलं..

कमरेतून वाकत बादशहाने तिच्या मस्तकावर आपले ओठ टेकवले, सलीमाचा निर्जिव चेहरा त्यांच्या आसवांनी भिजू लागला.

---

तळखान्याच्या त्या भयाण एकांत काळोखात तो तहान-भुकेने निपचित पडलेला होता. काही आवाज आले आणि तो विक्राळ लोखंडी दरवाजा करकरत उघडला. आतमध्ये येणाऱ्या उजेडा सोबत गंभीर स्वरात एक प्रश्नसुद्धा आला-

”कैदी शुद्धीत आहे का?”

तीव्र स्वरात युवकाने प्रतिप्रश्न केला- “कोण आहे?”

“बादशाह”

कोणतीही अदब न दाखवत युवक म्हणाला-“ही जागा आपणासारख्या बादशाहच्या योग्य नाही,- कसं काय येणं केलं?”

“तुझी बाजू जाणण्यासाठी”

थोडावेळ चूप राहून युवक म्हणाला-

“सलीमाची खोटी बदनामी होऊ नये म्हणून सांगतो, सलीमा जेव्हा लहान होती, मी तिच्या वडिलांचा नौकर होतो. त्यांच्याकडे काम करायचो तेव्हापासूनच मी तिच्यावर प्रेम करू लागलो. सलीमा सुद्धा माझ्यावर प्रेम करायची; बालपणाच निरागस प्रेम ते कुठपर्यंत टिकणार, वयात येता-येता सगळं बदललं. सलीमा बुरखा-पडद्यात वावरू लागली आणि लग्नानंतर बादशाहाची बेगम बनली. पण मी मात्र सलीमा आणि ते बालपणाच प्रेम, कधीच विसरु शकलो नाही. पाच वर्ष वेड्यासारखा इकडेतिकडे भटकत राहिलो. अखेर वेषांतर करून तुमच्याकडे दासीची नोकरी पत्कारली. फक्त तिला पाहत राहणे आणि तिची सेवा करणे इतकाच माझ्या जिवनाचा उद्देश्य होता. पण त्या रात्रीचं ते चांदणं, फुलांचा सुगंध, मद्याची धुंदी आणि एकांत या एकूण वातावरणाने माझा संयम सुटला. सलीमा धुंद होऊन झोपली असतांना मी माझ्या पदराने तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि ओठांचे चुंबन घेतले, आणि हा एवढाच गुन्हा केला. बिचाऱ्या सलीमाला यातलं काहीच माहित नाही.”

ऐकून झाल्यावर बादशाह काही वेळ निश्चल उभेच होते. एक दीर्घ श्वास सोडत सावकाश पावलांनी तिथून निघून गेले, कैद्खान्याचे दारं सताड उघडेच होते.

---

सलीमा जाऊन आता दहा दिवस झालेत. रात्रंदिवस बादशाह सलीमाच्याच दालनात बसून असतात. समोर नदीच्या पैलतीरावर, झाडांच्या गलक्यात सलीमाची शुभ्र-संगेमरवरी कबर बनविलेली आहे. सलीमा ज्या गवाक्षापाशी बसून त्या दिवस-रात्री बादशाहची वाट पाहत बसली होती, बरोबर अगदी तसच, त्याच नजरेनं तिथंच बसून बादशाह रात्रंदिवस सलीमाची कबर पाहत असतात. कुणालाही त्यांच्याकडे जायची परवानगी नाहीये. जेव्हा अर्धी रात्र उलटून जाते, त्या गंभीर रात्रीच्या शांततेत एक मर्म-भेदी गीत-ध्वनी उठते. बादशाहाला ते स्पष्टपणे ऐकू येत, कुणी करूण-कोमल स्वरात गातंय-

“कशी सांगावी मी वेदना प्रिये....”

------
('दुखवा मै कासे कहु मोरी सजनी, लेखक-आचार्य चतुरसेन शास्त्री' या हिंदी कथेचा जसा जमेल तसा केलेला अनुवाद...वाचकांनी हातचे न राखता परखड प्रतिसाद/सूचना द्याव्यात.)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

अनुवाद आहे हे शेवटी समजलं. फारच छान.

कानडाऊ योगेशु's picture

11 Jun 2016 - 11:22 pm | कानडाऊ योगेशु

अनुवाद आहे हे शेवटी समजलं.

+७८६

कथा उत्कृष्ठच निवडलीत अनुवादासाठी.

सुंदर कथा आणि अनुवाद सुद्धा तितकाच सुंदर जमलाय. कथेला न्याय दिला आहे.

संजय पाटिल's picture

12 Jun 2016 - 10:45 am | संजय पाटिल

सहमत..+१११११

चलत मुसाफिर's picture

12 Jun 2016 - 12:19 pm | चलत मुसाफिर

प्रखर हिंदुत्ववादी लेखक. सोमनाथची लूट वगैरे विषयांवर यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

सुंड्या's picture

12 Jun 2016 - 5:35 pm | सुंड्या

आदरणीय एस, कानडाऊ योगेशु, हकू, संजय पाटील, चलत मुसाफिर आपल्या बहुमूल्य प्रतिसादांबद्दल धन्यवाद.एक चांगली कथा मिपावर (पर्यायाने आंतरजाळावर) मराठी वाचकांना उपलब्ध व्हावी हा एकच उद्देश्य म्हणून अनुवाद करण्याचे धाडस केले व ते यशस्वी झाल्याचे तुमच्या प्रतिसादरूपाने कळत आहे. माझ्या लेखनात सुधारणा होण्यासाठी सर्व सूचना/सुधार/टीका ई.चे स्वागत आहे.

जगप्रवासी's picture

13 Jun 2016 - 3:19 pm | जगप्रवासी

सुंदर कथा आणि तितकाच अप्रतिम अनुवाद

निर्धार's picture

13 Jun 2016 - 6:01 pm | निर्धार

छान अनुवाद जमला आहे...

पद्मावति's picture

13 Jun 2016 - 6:31 pm | पद्मावति

सुंदर!

मराठी कथालेखक's picture

14 Jun 2016 - 3:08 pm | मराठी कथालेखक

छान कथा. जूना काळ , मुस्लिम राजघराणे असूनही बोजड शब्दांचा मारा नाही हे चांगले केलेत

अत्रन्गि पाउस's picture

14 Jun 2016 - 4:18 pm | अत्रन्गि पाउस

अनुवाद वाटतच नाही ..
पण हि सत्य कथा किंवा त्यावर आधारित आहे किंवा कसे ?

अभ्या..'s picture

14 Jun 2016 - 5:12 pm | अभ्या..

कथा वाचलेली होती. अशाच स्वरुपाच्या कथांचे अनुवाद एका संग्रहाच्या स्वरुपात वाचलेले होते.
जमलीय ही.

सुंड्या's picture

14 Jun 2016 - 11:25 pm | सुंड्या

जगप्रवासी, निर्धार, पद्मावति, मराठी कथालेखक, अत्रन्गि पाउस, अभ्या.., आपणास कथानुवाद आवडला व त्याची पोच म्हणून दिलेला प्रतिसाद ह्या बद्दल आपला आभारी आहे.
@मक-'बोजड शब्द' मिपाकर कसे वाचतील हा विचार करतच अनुवाद केला.
@अपा- कथा काल्पनिकच असावी कारण शहाजहान (४ पैकी पहिला आणि दुसरा) ने सलीमा किंवा जीनतमहल सोबत विवाह केल्याचे गूगल/विकिपीडियावर आढळले नाही.
@अभ्या..-सदर मूळ हिंदी कथा ही आम्हाला पदवी अभ्यासक्रमाला होती (पुस्तकाचे नाव 'अनुभूती'...त्यातल्या दोन तीन सुंदर कथांचा मराठी अनुवाद करण्याची इच्छा आहे.)

बहुगुणी's picture

25 Jul 2016 - 8:43 pm | बहुगुणी

ही अनुवादित कथा वाचायची राहूनच गेली होती, सुरेख अनुवाद! आणखी येऊ द्या, सुंड्या भाऊ! (अवांतरः तुमच्या गीतांवरच्या या प्रतिसादाचा मागोवा घेत घेत तुम्हाला शोधत आलो तर हा लेख सापडला, तुमच्या गाण्यांच्या आवडीविषयीचे लेखही वाचायला आवडतील.)

सुंड्या's picture

25 Jul 2016 - 10:43 pm | सुंड्या

'बहुगुणी' भाऊ प्रतिसादाबद्दल आभारी आहे. सवड मीळताच आपल्या इच्छेचा मान राखण्याचा प्रयत्न करतो.

निखिल निरगुडे's picture

26 Jul 2016 - 4:07 am | निखिल निरगुडे

काही वर्णने खूपच आवडली! अगदी वाटलंच नाही कि अनुवादित आहेत.

यशोधरा's picture

26 Jul 2016 - 7:52 am | यशोधरा

आवडली कथा.

नाखु's picture

26 Jul 2016 - 9:12 am | नाखु

भावानुवाद...

अजून कथा असतील तर टाकणे.

मिपा नितवाचक नाखु

सुंड्या's picture

26 Jul 2016 - 8:15 pm | सुंड्या

निखिल, यशोधरा ताई, आणि नाखु- प्रतीसादबद्दल आभारी आहे. लवकरच तुम्हा सर्वांना आवडेल असा 'वाचनीय' धागा काढण्याचा प्रयत्न करतो.