अनिला भाग 2

abhajoshi14's picture
abhajoshi14 in जनातलं, मनातलं
26 May 2016 - 8:37 am

अनिला भाग 1 - http://www.misalpav.com/node/36145

मग मावशी जरा बोलती झाली. हि सुशीला गोडसे. माझी शाळेतली खास मैत्रीण. आम्ही दोघी एकाच शाळेत एकाच बाकावर बसायचो. 9 वर्षे रोज एकत्र असायचो. तिचे आणि माझे घर पण तसे जवळ जवळ होते. एकाच पेठे मध्ये. आम्ही सगळे शनिवारातले ना .सगळ्यांनाच पुराचा फटका बसलेला. ह्यांच्या कुटुंबांला तर फारच मोठा धक्का होता तो. तिच्या आई बाबांनी शून्यातून परत संसार उभा केला, पदरात पाच मुले. घर राहिले नाही म्हणून दुकानातच आडोसा करून संसार मांडला. हि सर्वात मोठी. हिचे लग्न मात्र पुराच्या आधीच फार घाई गडबडीत झाले होते. बिच्चारी!!!! असे म्हणून मावशी जरा थांबली. माझी उत्सुकता आता शिगेला...
आमची तेव्हा ९ वी चालू होती बहुतेक. त्या काळात लग्ने तशी फार लवकर व्हायची. आणि फारच कमी अपेक्षा असायच्या, नवरा मुलगा बघताना. तसेच काहीसे हिच्या बाबतीत झाले होते. हिला हे परचुरेंचे स्थळ तिच्या आई च्या एका मैत्रिणीकडून आले होते. मुलगा महा नगर पालिके मध्ये कामाला होता. सासू सासरे आणि बरेच सारे दीर आणि नणंदा. दोन थोरले दीर मुंबईला स्थायिक आणि त्यांचे संसार थाटलेले. इथे पुण्याला एका वाड्यात दोन खोल्यांमध्ये उरलेली सगळी माणसे. ह्या खोल्या भाड्याच्या खोल्या पण लवकरच त्यांचा बंगला बांधून होणार होता सहकार नगर मध्ये. पण बहुतेक त्या मुलाची बदली ची नोकरी होती म्हणून हिला बाहेर गावी त्याच्या बरोबर जायची संधी होती. तेवढीच जरा मोकळीक त्या काळी.
तर मग पत्रिका बित्रिका बघितल्या गेल्या. सगळे योग चांगले जमत होते. हिला येवून ती मंडळी बघून गेली. संध्याकाळी जेव्हा आम्ही नदीकिनारी भेटलो तेव्हा हिचा चेहरा एवढुसा. मी विचारले काय झाले तर म्हणते, "अग मला एवढ्या लोकांमध्ये नवरा मुलगा कुठचा ते कळले च नाही. माझ्या बहिणीपण आता अंदाज बांधत आहेत कि नक्की कोण असेल नवरा मुलगा. मला वाटते तो जरा गोरा आणि सरळ नाकाचा वडिलांशेजारी बसलेला मुलगा असेल". आणि सूर्यास्त बघुन आम्ही घरी परतलो. अश्या रीतीने माझी मैत्रीण लग्नाच्या बोहोल्यावर चढली मुहूर्त होता अक्षयत्रीतीयेचा. असे म्हणतात ह्या दिवशी दान करावे, सत्पात्री होते. देव च जाणे कोणी कोणाला दान दिले होते हे आणि कोणत्या जन्मीचे......
नंतर एकदा तिच्या बहिणींबरोबर मी तिच्या घरी गेले होते तेव्हा मला ना फारच धक्का बसला. तिचा नवरा चक्क काळा कुट्ट आणि तिच्याहून बुटका. आमची सुशीला म्हणजे नक्षत्रा सारखी सुरेख, गोरीपान, सरळ नाक, बोलके डोळे आणि साजेशी उंची. तिने जो अंदाज बांधला होता तो माणूस मात्र तिला "अहो वहिनी अहो वहिनी" अशी हाक मारत घरात आला. मला फारच वाईट वाटले. पण तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून मी काही न बोलता निघाले. तरी येताना तिची धाकटी बहिण जी फारच लहान होती म्हणाली खरी, "सुशीला ताईचे काय करून ठेवले ना आई बाबांनी!!!!".
हे होते 1961 साल. तिच्या लग्नाला आता एक वर्ष झाले होते आणि ती अधून मधून माहेरी आली कि हा काळा माणूस तिच्या मागोमाग हजर. मग बिच्चारी ला काही बोलताच यायचे नाही. ह्याच वर्षी पूरही आला आणि हिचे माहेर अगदी कोलमडून गेले. हिची काळजी वाढली पण कुठून काही बातमी नाही. संध्याकाळी जरा पूर ओसरल्यावर तिची भावंडे तिला तिच्या घरी येताना दिसली. छोटे दोन भाऊ तर तिला जावून बिलगले आणि ढसा ढसा रडायलाच लागले. दोन बहिणी एकदम बावरलेल्या होत्या. आई वडील पुराच्या पाण्या मध्ये काही सामान मिळते का बघत होते त्यांच्या घराजवळ. सर्वांचे कपडे चिखलाने भरलेले. त्यांना थोडे फार तिने पुसून काढले आणि स्वयपाक घरात गेली तर सासू ची हाक. "तुझ्या भावंडांना खालच्या खोलीत बसव आणि वर ये". गेली बिचारी वर. थोड्या वेळाने खमंग पोह्यांचा वास येवू लागला. पोरे बिच्चारी खुश झाली ताई खावू आणणार म्हणून. कसचे काय, ह्या परचुरे मंडळींनी आधी पोहे हाणून घेतले आणि मग उरलेले पोहे आणि सुशीलाला खाली पाठवून दिले. दुसर्या दिवशी सगळ्या भावंडाची रवानगी त्यांच्या दुकानात परत.

क्रमश ....
ता क - लिहिताना फार आठवून आठवून लिहावे लागते आणि थोडा फार मानसिक त्रास हि होतो, म्हणून जरा सावकाश टाकतो आहे.

कथा

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

26 May 2016 - 11:10 am | सिरुसेरि

सुन्न करणारा अनुभव . पुभाप्र .

रातराणी's picture

27 May 2016 - 12:04 am | रातराणी

वाचतेय. पुभाप्र.

मराठी कथालेखक's picture

7 Jun 2016 - 4:21 pm | मराठी कथालेखक

पुढील भाग ?