माझी ज्यूरी ड्युटी ३

शेंडेनक्षत्र's picture
शेंडेनक्षत्र in जनातलं, मनातलं
1 Apr 2016 - 7:48 am

आधीचा भाग

आधीच्या भागात एक तपशील राहिला. प्रत्येक उमेदवार ज्युररला साक्षीदारांची यादी दिली होती. जर त्यातले कुणी ओळखीचे असतील तर हात उंचावून तसे सांगायचे होते. ह्या यादीत बलात्कारित स्त्रीही होती. पण कायद्याप्रमाणे तिचे आडनाव डो असे खोटेच ठेवले होते (अमेरिकेत ओळख न पटलेल्या पुरुषाला जॉन डो आणि स्त्रीला जेन डो असे म्हणण्याची पद्धत आहे. उदा. एखादा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला तर. त्याला अनुसरून). कुणाही ज्युररने ह्यातले कुणी आपल्या ओळखीचे आहेत असे म्हटले नाही.
आता दोघे वकील रिंगणात उतरले. पाहिली पाळी सरकारी वकिलाची होती. ती एक तरुण श्वेतवर्णी स्त्री होती. तिने असे काही प्रश्न विचारले की स्त्रीवर अत्याचार करणारा कसा दिसतो असे तुम्ही समजता? कुठल्या वंशाचा, कुठली सांपत्तिक स्थिती असणारा असाच हे कृत्य करेल असे वाटते का? कुणीच हात वर केला नाही. एक बाई समोपदेशक असल्याचे तिने सांगितले होते. तिला जास्त प्रश्न विचारले. तिने अत्याचारित लहान मुलांना कसे समजावायचे ह्या विषयात पी एचडी केलेली होती. असे सगळे प्रश्न विचारल्यावर तिने तिची आणि अन्य काही लोकांची गच्छंती केली. एक म्हातारीशी बाई होती तिने अचानक हात वर करून आपण एका फसलेल्या बलात्काराचा बळी होतो असे सांगितले! असे काही असल्यास ते न्यायाधीशाने विचारले तेव्हाच सांगणे अपेक्षित होते. पण तिने का नाही केले देव जाणे! तिलाही जायला सांगितले. नंतर जजने तिला एकटीला चेम्बरमध्ये बोलावून काहीतरी सांगितले. बहुधा दम दिला असावा!
नंतर आरोपीचा वकील उठला. जजच्याच वयाचा श्वेतवर्णी माणूस. कायम सुटाबुटात. त्याने पहिला प्रश्न विचारला, "तुमच्यापैकी कुणी अशा देशातून आला आहात का जिथे ज्युरी पद्धत नाही?" मी आणि अन्य काही लोकांनी हात वर केले. मग मला थेट प्रश्न, "ज्युरी पद्धतीबद्दल तुला काय वाटते?" मी म्हटले "ही पद्धत वेगळी आहे पण त्यात काही वाईट नाही. (इट वर्क्स)" वकीलाचे समाधान झालेले दिसले. एक बाई इस्रायलची होती तिने सौम्य शब्दात "मला ह्या पद्धतीबद्दल कधीतरी शंका वाटते." असे म्हटले. तिला जायला सांगण्यात आले. नंतर इंजिनियर वा संगणकाशी संबंधित लोकांना हात वर करायला सांगितले. आमच्या भागात हायटेक कामाचे प्राधान्य असल्यामुळे अनेक लोक ह्या पार्श्वभूमीचे होते. (अशी एक किंवदंता आहे की ज्युरी म्हणुन इंजिनियर वा तत्सम पेशातले लोक सहसा घेत नाहीत. पण हे तितकेसे खरे नाही असा माझा अनुभव आहे.) अशा सर्वांना, त्यात एक मायक्रोसोफ़्टमध्ये काम करणारा होता त्याच्या रोखाने विशेष असे विचारले की तुम्हाला आकडेवारी, सूत्रे (फॉर्म्युला) वगैरे भाषा जास्त समजते. इथे इतके काळे पांढरे नसते. त्यात मधल्या छटा असतात. त्या तुम्हाला पटतात का? त्याने सांगितले की "आमच्या कामात बर्याचदा तसे असतेच. आमच्या सगळ्या गोष्टी इतक्या काटेकोर नसतात. प्रोबाबिलिटी वगैरे गोष्टी अशाच असतात" त्याने त्याचे समाधान झाले.
आता लोकांना रजा देण्याचा वेग मंदावला होता. यथावकाश आम्ही १२ लोक ज्युरर आणि ४ लोक आणखी पर्यायी म्हणून निवडले गेले. मुख्य ज्युरारापैकी कुणी आजारी पडला, अपघात झाला किंवा असे काही अघटित झाले तर ह्यातल्या पर्यायी लोकांना तिथे बसवले जाते. ह्या लोकांना बाकी ज्युररप्रमाणेच सगळी केस ऐकावी लागते. पण शेवटच्या दोषी की निर्दोषी ह्या चर्चेत (डेलिबरेशन ) त्यांचा सहभाग नसतो.
हे शिक्कामोर्तब होण्याकरता सर्वांना उभे केले गेले. प्रत्येकाने एक हात उंचावून सर्व नियम पाळून आपले कर्तव्य करण्याची शपथ घेतली. म्हणजे कोर्टाची क्लार्क बाई मोठ्ठे काहीतरी म्हणते आणि आपण मला मान्य आहे ("यस आय डू") म्हणून संमती द्यायची. मग प्रत्येकाला एक ब्याज दिला गेला ज्यावर कोर्टाचा क्रमांक आणि जजचे नाव, फोन नंबर होता. कोर्टात शिरताना सुरक्षा तपासणी होत असे. कित्येकदा आलेल्या लोकांची मोठी रांग असे. पण असा बयाज असेल तर आणि उशीर होत असेल तर बिनदिक्कत घुसून इतरांच्या आधी ते सुरक्षा तपासणीचे सोपस्कार करण्याची आम्हाला परवानगी होती. खास सरकारी लेटर प्याड आणि पेन दिले गेले. कोर्टात जे काही होते त्यातले काही लिहून घ्यायचे असेल तर फक्त हे वापरायचे. ते घरी न्यायचे नाही. खुर्चीतच ठेवायचे. नंतर शेवटी चर्चेकरता ठरलेल्या खोलीत घेऊन जायचे. केस संपली की ते नष्ट केले जाणार. जवळ बाळगता येणार नाही.
अन्य काही पथ्ये म्हणजे ह्या केसबद्दल आपण स्वत: काही शोधायचे नाही. बाकी ज्युरर लोकांशीही सर्व पुरावे सादर होईपर्यंत केसवर चर्चा करायची नाही (हा नियम १००% पाळला गेला असे वाटत नाही!) ज्युरीने कोर्ट चालू असताना कोर्टात यायचे. नसेल तर, जेवणाची वा अन्य सुट्टी असेल तर ज्युरी रुममध्ये थाम्बायचे. तिथे ज्युरी शिवाय कुणाला जायला परवानगी नसते. कोर्टाबाहेर थांबायचे नाही. प्रेक्षक लोकांशी कुठल्या प्रकारे संबंध ठेवायचे नाही. अशा केसाच्या वेळेस आरोपी वा बळीचे नातेवाईक येतात. त्यांच्या बोलण्यामुळे काही पूर्वग्रह व्हायला नको म्हणून ही खबरदारी. ह्या केसमधील घटनास्थळे ४-५ मैलावर होती. पण तिथे जाऊन जरा बघून येऊ ह्यालाही सक्त मनाई होती. कोर्टात खाणे चालणार नव्हते. झाकणबंद, पिण्याकरता छिद्र असणार्या कपातून प्यायला परवानगी होती (अर्थात चहा कोफी वगैरेच. बियर वा अन्य मादक पेये नाहीत!) कोका कोला वगैरे प्रकारचे कॅनवर बंदी. च्युईंग गमवर जजसाहेबांचा विशेष रोष आहे असे शेरीफ बाईने आवर्जून सांगितले त्यामुळे तेही बाद. मोबाईल वाजता कामा नये. (एका ज्युरर बाईने हा नियम मोडला. आता काय उत्पात होणार हे आम्ही श्वास रोखून बघत होतो. पण जजने दुर्लक्ष केले. पुन्हा असे घडले नाही. मी तर चक्क फोन पूर्ण बंद करुनच कोर्टात जात होतो. उगाच भानगड नको!)

तर शेवटी एकदाची ती केस सुरु व्हायची वेळ झाली. दुसर्या दिवशी ठीक ९ वाजता हजर व्हायला सांगितले आणि कोर्ट त्या दिवसाकरता सम्पले.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

1 Apr 2016 - 7:56 am | यशोधरा

भलंतच किचकट की..

एस's picture

1 Apr 2016 - 9:20 am | एस

वाचतोय.

सुनील's picture

1 Apr 2016 - 9:28 am | सुनील

वाचतोय.

भारतातही ५५-५६ वर्षांपूर्वीपर्यंत ज्युरी पद्धत होती.

सुप्रसिद्ध नाणावटी खटल्यानंतर ती काढून टाकण्यात आली.

ज्युरींनी 'नॉट गिल्टी' ठरवललेल्या आरोपीला पुढे सर्वोच्च न्यायालयानेदेखिल दोषी ठरवले आणि इथेच त्या पद्धतीचे वाभाडे निघाले.

तर, त्याकाळात ज्युरी ड्युटी देण्याची पद्धत साधारणपणे कशी होती? लेखात वर्णन केल्याप्रमाणे कडक होती किंवा कसे?

बोका-ए-आझम's picture

1 Apr 2016 - 9:47 am | बोका-ए-आझम

ही लोकांचा सरकारी कामातील सहभाग वाढवते हा तिचा मोठा फायदा आहे. अमेरिकेत तर खटला भरायचा की नाही (indictment) या निर्णयालाही विशेष ज्युरींची, ज्याला Grand Jury म्हणतात, मंजुरी लागते. पण आजच्या social media च्या काळात पूर्णपणे नि:पक्षपातीपणा ठेवून निर्णय करणं अवघड आहे. त्यामुळे या पद्धतीच्या विश्वासार्हतेवर शंका अाहेच.पण ज्युरींशिवाय केलेलं न्यायदान हे निर्दोष असतं असं समजणंही चुकीचं आहे.
शेंडेनक्षत्र, उत्कंठा वाढलेली आहे. पुभाप्र!

उगा काहितरीच's picture

1 Apr 2016 - 10:13 am | उगा काहितरीच

बापरे बरीच किचकट असते की प्रक्रिया... वाचतोय, पुभाप्र ...

जयन्त बा शिम्पि's picture

1 Apr 2016 - 10:18 am | जयन्त बा शिम्पि

सविस्तर माहिती मिळत असल्याने , उत्सुकता फारच वाढली आहे, पुढिल भाग लवकर लव्कर यावेत. लिखाण आवडले.

उगा काहितरीच's picture

1 Apr 2016 - 10:21 am | उगा काहितरीच

बापरे बरीच किचकट असते की प्रक्रिया... वाचतोय, पुभाप्र ...

अजया's picture

1 Apr 2016 - 12:19 pm | अजया

पुभाप्र!

पुंबा's picture

1 Apr 2016 - 12:41 pm | पुंबा

खुप आवडतय... पुभाप्र

एक शंका आहे. न्यायालयाच्या अंतिम निकालात ज्युरीच्या मताला किती % महत्त्व असते?

हुप्प्या's picture

2 Apr 2016 - 9:45 pm | हुप्प्या

ज्यूरी ट्रायल असेल तर ज्यूरीचा (दोषी की निर्दोषी) निर्णय पाहून मगच न्यायाधीश शिक्षा देऊ शकतात. समजा आरोपीवर दोन आरोप आहेत. आणि त्यातल्या एकाच आरोपाकरता तो दोषी आहे आणि दुसर्‍याकरता निर्दोष असे ज्युरीने ठरवले तर न्यायाधीश केवळ जिथे तो दोषी आहे त्याच आरोपाकरता सजा सुनावतो.
ज्युरी लोक शिक्षा देत नाहीत. ते काम न्यायाधिशाचे. पुढच्या काही भागात ह्याचा खुलासा येईलच.

आभारी आहे. पुभाप्र.. लव्कर येवू द्या

Jack_Bauer's picture

1 Apr 2016 - 9:12 pm | Jack_Bauer

एक प्रश्न : ज्युरीड्युटी करणाऱ्या कर्मचार्याला कंपन्या तितक्या दिवसांसाठी किमान वेतन देतात आणि म्हणून बर्याचदा अनेक लोक ज्युरीड्युटी करणे टाळतात अस ऐकल आहे , हे खरं आहे का ?

श्रीरंग_जोशी's picture

1 Apr 2016 - 10:24 pm | श्रीरंग_जोशी

जसा इतर कारणांचा सुटीचा कोटा असतो व्हॅकेशन लिव्ह, सिक लिव्ह तसाच ज्यूरी ड्युटी लिव्हचा कोटा असतो. आमच्या कंपनीत १० दिवस (प्रति वर्ष) कोटा आहे.

एखादी कंपनी तुम्ही म्हणता तसे काही करत असल्यास ते Fraudulent वाटते.

हा ही भाग आवडला. लेखमालिकेतली रंगत भागागणिक वाढत आहे.

हुप्प्या's picture

2 Apr 2016 - 9:54 pm | हुप्प्या

ज्यूरी ड्युटी चालू असताना पगार देणे हे उद्योगाला बंधनकारक नाही. अनेक छोटे उद्योग असे आहेत ज्यांच्याकडे एक नि दोन नोकर असतात. त्यांना असे करणे परवडणारे नाही. पण ज्युरी लोकांना त्या कामाचा भत्ता सरकारतर्फे दिला जातो. तो अल्प असतो पण ज्यांचे हातावर पोट असते त्यांचा त्यात निभाव लागत असेल. मात्र खटला चालवण्याकरता ज्युरी हा एक आवश्यक घटक आहे त्यामुळे बहुतेक राज्ये असा कायदा करतात की मालक आपल्या नोकराला ज्युरी ड्युटी करण्यापासून रोखत असेल तर तो गुन्हा समजला जावा किंवा ज्युरी ड्युटी केली म्हणून नोकरीतून काढून टाकणे हा गुन्हा आहे. ह्या बाबतीत नियम करण्यास राज्ये स्वतंत्र आहेत. पण माझ्या माहितीनुसार सगळीकडे हा नियम आहेच. नाहीतर ज्युरी शोधणे अवघड होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2016 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा भागही आवडला. बारकाव्यांसकट लेखन असल्याने ते अधिकच रोचक होत आहे. पुभाप्र.

आनंदयात्री's picture

1 Apr 2016 - 10:53 pm | आनंदयात्री

असेच म्हणतो, पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत.

मंदार कात्रे's picture

1 Apr 2016 - 10:43 pm | मंदार कात्रे

प्रेक्षक लोकांशी कुठल्या प्रकारे संबंध ठेवायचे नाही.

द प्रॅक्टिस या मालिकेचे सात सीझन पाहिलेले आहेत. अमेरिकन कोर्ट आणि न्यायव्यवस्थेची अतिशय जवळून अन वास्तवदर्शी ओळख करून देणारी रोचक मालिका
या मालिकेत एका भागात एका केस मध्ये एक ज्युरी कोर्टाच्या लिफ्ट मध्ये गुन्हेगाराच्या एका वकिलास भेटून सांगतो की "ज्युरी एकमताने तुमच्या गुन्हेगारास निर्दोष सोडणार आहेत" हे खरे म्हणजे बेकायदेशीर असते व वकिलाने त्वरित जजला व बार असोसिएशन ला रिपोर्ट करुन हे सांगणे गरजेचे असते ज्यायोगे ज्युरीजना डिसंमिस करुन केस पुन्हा चालवणे भाग पडेल ... पण त्याऐवजी वकील बाई आपल्या गुन्हेगारास ज्युरी निर्दोष ठरवणार म्हणुन हरखून जाते व त्यामुळे जो गुन्हेगार गुन्हा कबूल करुन कमी शिक्षेस पात्र ठरणार असतो (plead Guilty ), तो गुन्हा नाकबूल करतो व परिणामतः शेवटी ज्युरी त्यास दोषी ठरवून फाशीची शिक्षा देतात.
नन्तर वकिल बाई तक्रार करते की एका ज्युरीने तुमच्या गुन्हेगारास निर्दोष सोडणार आहेत असे मला सांगितले , तर त्यावर ही गोष्ट लपवली म्हणून वकिलिण बाई वरच disbarment ची कारवाई होते ............

खरोखर सर्वांनी पाहण्यासारखी आहे ही मालिका

जुइ's picture

1 Apr 2016 - 11:46 pm | जुइ

भलतीच किचकट निवड पद्धत आहे. वाचत आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

खेडूत's picture

2 Apr 2016 - 6:09 am | खेडूत

वाचतोय.
एकदम वेगळा विषय.

मराठीतही यावर एक छान पुस्तक वाचले होते- नांव आठवतंय का कुणाला?

lgodbole's picture

3 Apr 2016 - 4:48 pm | lgodbole

छान

राजाभाउ's picture

4 Apr 2016 - 12:34 pm | राजाभाउ

मस्त !!!. पभाप्र.