बेण आणि मी - एक ओळख.

भरत्_पलुसकर's picture
भरत्_पलुसकर in जनातलं, मनातलं
24 Feb 2016 - 7:12 am

तर का मंडळी आमच्या हापिसात बेन हाय एक. ते का नाय जवा बगाव तेवा स्क्रीनला डोळे लावून बसतय अन खी खी खु खु करत असतंय. मायला म्हणलं आपून तर कटाळतो अर्धा तास एका जागेव बसून अन हे बेन कशापायी आनंदात असतंय. एक दिवस म्या हुभा ऱ्हायलो तेच्या मागं. बगत हुतो बेन काय करतंय. तर हे एक पान सरसर वरखाली करून उगा बघितल्यावानी केला आणि पुना डायरेक खाली जाउन थांबला. म्या म्हणलं काय हुतं ते बगू बी दिना. खाली येउन ते बेन हातातल्या पेनाला तोंडात धरलं अन उगा इचारात पडल्यावानी झाला. मंग एकदाचा त्यानं पेन तोंडातन भायेर काढला अन हातानं कीबोर्ड बडवाय घितला.

"छान! आवडले लेखन!" म्या मनात म्हनलु लेका वाचलास का तरी नीट.

पर तेला पुन्यांदा झटका आल्यावानी तेनं चक करून बेकस्पेस धरून ठिवली अन ते लिव्लेलं मुजवून टाकलं. पुन्यांदा तेन लिवाय घेतलं

"अप्रतिम उतरलाय लेख! लिहीत रहा!"

हाय का सोत्ता दर दुसर्या मिनटाला मुजवतुया लिवलेल अन दुसर्याला सांगतय लिवत रावा!

माज्या मनात असा आला इचार अन तेवड्यात आमच्या खुराड्यातली एक मैना खुदुखुदु हासत आली उंडारून. माज्याकड बगून आशी हासली जणू मनती दुसरं काही काम नाही का? लय शानी म्हणलं. तुमी हिकडन तिकडन करून येत्यात अन जरा खुर्चीत बसून कुठं पुस्तक नीट लाव, "शी किती धूळ असते इथे" टेबल उगीच पुसून घे, स्क्रीन पुसून घे असं काहीतरी करायचं अन पुना हात मळले म्हून धुवाय जायचं ते चांगल अर्ध्या पाऊन तासानी उगवायच. असं दिवसातन चार येळा केल की पर्स काखोटीला मारून "सी यु गाईज टूमारो" म्हणत गुल व्हायचं. पर दुसरा काम करतुय का नाय हेच्याव लय बारीक नजर. घार कुठली.

असू दे कुठं लगीन करायचं हाय आपल्याला (तिच्याशी). पैले मला लयच आप्रुप हुत पोरींच. कशा काय अशा छान छान रोज अंघोळ करत्यात. नवे कपडे घालत्यात. सणासुदीचा दिस असल्यावानी तयार बियार हून हापिसात येत्यात. नायतर आमी. शर्ट कुठला पेंट कुठली कशाचा कशाला मेळ नसतुय. पर ते म्हनतात ना दुरून डोंगर साजिरा तसा प्रकार समदा. ही आमची मैना काय करती एरवी आजबात आमाला नजरेम्होर धरत नाय पर रिलीज असली का माग पुढं माग पुढं. अवो चार येळा तर म्या राती राती जागून मैनेच मोडूल दिलं ना जोडून. तेच्या नादात माजे बग रायले तसेच. अजून कुणाच्या ध्येनात नाय आलेला. पर माजा बग मला पुरता हाय ठाऊक. बगुया कवा क्यूए येती वरडत. कुणी काम करत नाय हिथ. बर ते जाऊ दे. घ्या मैना आली की असं हुतं बगा. काय सांगत हुतो न काय बोलत राहिलो. गेली बगा मैना पुना. अरारा खरच लय धूळ बस्तीया तिच्या स्क्रीनवर.

आआछू.

"भरत्या तू कधीपासून उभा आहेस इथे?" हातिच्या शिंकेन घोळ केला. बेन आता तेची स्क्रीन झाकून हुबा ऱ्हायला. बेण्याशी म्या शुद्द भाषेत बोलतु कवाकवा.

"काही नाही रे, काय जोक वाचत असलास तर आपणपण वाचावा म्हटलं. सारखा हसतच असतोस लेका."

"छे! जोक वगैरे वाचायला आपण काय लहान आहे का आता?"

"लहान तर रागापण नाही ना भाऊ. पण तो वाचतो का नाय कॉमिक."

"…… हा हा हा"

"तरी काय होतं रे?"

बेण्याला आपला सोभाव म्हाईती पुरा. आपून एकदा ठाण्याला जायचं म्हणलं की ठाणा तो ठाणाच! मंग तो हळू आवाजात बोलला.

"अरे ती मिसळपाव नावाची साईट आहे."

"असेल खरं. पण त्यात एवढं हळूहळू सांगण्यासारखं काय आहे.चावटबिवट हाये का ती"

माज्या जोकला मलाच मोठ्यांदा हसू आलं. बेन अजूनच ओशाळल.

"अरे नाही रे. काही काय बोलतो. तिथे छान कविता कथा लेख असतात."

"जे तू न वाचताच छान छान म्हणतो."

"अरे मित्रा तुला नाही कळायचं. कधी कधी वाचलं नाही तरी आपण छान म्हणून जायचं असत. बरं वाटतं ते लेखकांना."

"भारी रे. समजूतदार झालायस. उरकून टाकावं यंदा. लग्न झाल्यावर पण असंच करायचं असतं."
माज्या जोकला पुना मलाच हसू आलं.

"का रे, तिथं कुणीपण उठून लिहत का?"

"ह्या, फक्त सदस्यांना लिहता येत."

"बर नीट विचारतो, कुणी पण उठून सदस्य हुतो का?"

"भरत्या मार खाशील हा काय उद्योग केलास तर" बेन उगा दिसायला हाय धांदरट, पर हाय चाप्टर.

"अरे उद्योग कशाला करीन. तेवढ डोकं असतं तर हिथ कशाला घासली असती." म्या काय कमी नाय.

"भरत्या बघ हा. तुला चांगला ओळखतो मी."

"चल रे मित्रा तुला चहा पाजतो."

फुकट चहा म्हणल्याव बेन खुश. म्या बी तेला चहा दिला. दोन दोन वडापाव खायला घातले. पुना तितं मिल्कशेक बी हुता. त्यो बी घिउन दिला. ह्या कंपन्या फूड कोर्टाच्या नावाखाली अर्धा पगार पुना आपल्याकडच घेत्यात काढून. आता तरणीताठी पोर वाढत्या वयातली हेवड खाया दिसल्याव का मागपुढ बघ्तेत व्ह्य. असू द्या बेन्याकड काम हुतं ना. म्हून गप बसलो.

जरा मग हळू हळूच आलो खुराड्यात. म्या तसा लय भारी हाय. बेन्याच खाउन हुईसत्वर म्या अजाबात काय नाव काढलं न्हाय. असं मनाजोगत पोटात गेलं का तोंडाव आपसूकच साधू संतावानी गोड स्माईल यिती. तवर वाट बघायची असतीया. बेण्याचा चेहरा तसा उजळला अन म्या म्हन्लं

"अरे मला पण लिहायचा नाद आहे. माझा ब्लोग वाचलायस ना तू."

आता जरा बेण्याचा चेहरा कसनुसा झाला. दोन दोन वडापाव अन हे मोठा गिलास भर मिल्कशेक ढोसल्याव अजून काय हुइन म्हंता.

पर मी थांबलो नाय. शेवटी बेण्याला पण संयम शिकायला हवा. म्या तशीच गाडी रेटली.

"मी अस करतो. मी पण येतो मिसळपाववर. माझ्या ब्लॉगवर लिहलेलं तिथं जरा टाकतो. कळेल तरी आपलं लिखाण कसं काय हाये ते." म्या सोताव्र खुश होत बोललो.

तसा जोरात कळ आल्यावानी बेन वरडाय लागलं.
"ए डोकं ठिकाणावर असेल तर असलं काही करू नको."

"च्या मारी मघा म्हणला ना तू कुणी पण उठून तिथं लिहतो म्हून, म्या काय घोड मारलं र." राग आला की आपण गावठी बोलतो.

तसा आपला राग बेण्याला ठाऊक हाय. एकदा आपण ठरवलं ना कल्याणला जायचं तर कल्याण करूनच सोडणार. मंग तो जरा नरमला. काही म्हणा खाल्ल्या वडापावला जागला नाय त्याला मित्र म्हणू नये.

"अरे तसं नाही मित्रा. तिथे खूप विचार करून लिहाव लागतं. तू ब्लॉगवरच जुनं टाकत राहिलास तर तिथले लोकही शिळं जेवण जेवल्यासारख्या प्रतिक्रिया देतील. आवडेल का तुला ते? नाही ना?"

कवा कवा बेन लयच बायकी बोलत. पर पोईंटच बोलत हुता म्हून म्या हसलो नाय. बेन प्रवचन द्याय लागलं हुतं. म्हणलं मिळतय तेवढ घ्याव पदरात आपलं ते शर्टात पाडून. कायतरी घोळ झालेला दिसतुय. मी बेण्याकडन दीक्षा घ्याया लागलु अन आपसूकच बायकी इचार याय लागले डोक्यात. पर म्या न्हाय लक्ष दिल. म्हणलं चालू द्या. जरा हवा येऊ द्या. बेण्या बेण्या वडापाव तू खातोस अन तरास आमाला.

बेण्यान उजवा पाय डाव्या पायांव टाकून बसला हुता ती पोजिशन बदलली. आता डावा पाय उजव्या पायांव टाकला अन म्होर बोलला.

"तर असं आहे भरत इथले वाचक रसिक आहेत. चोखंदळ आहेत. तू उगीच काहीही लिहीत बसला तर काळ कुत्रही तुझ्या धाग्यावर फिरकणार नाही. "

"कशावर?"

बेण्याच्या लक्षांत इना मला काय कळेना… मग पुना प्रकाश पडल्यावानी बोलला.
"अरे हां धागा. धागा म्हणजे तू लिहशील ते."

"मी कथा लिहणार, कविता लिहणार. धागे काय बोलतो रे?"

"अरे देवा. अरे तू लाख लिहशील रे कथा कविता पण मिसळपावच्या भाषेत त्याला धागाच म्हणतात."

"म्हणतात तर म्हणतात. पुढ बोल."

"भरत्या असं करून चालणार नाही. निदान पहिले काही दिवस तरी तू सगळ्यांच सगळं शांतपणे ऐकून घेतोस असं दाखवाव लागत. तू जर असा उद्धटपणे बोललास तर झालीच तुझी सुट्टी समज."

आली का आता पंचाईत. हिथ आमाला आमचा बा सोडून कुणाला शांत ऐकून घेयाची सवय नाय. बा च्या करकरीत कोल्लापुरीवरन नजर हाटत नाय अज्जून सुदिक. काय हिंम्मत ए का वर तोंड करून बोलायची. पर आता काय करायचं. तसं बी मागल्या टायमाला आय म्हणत हुती आता पोरी बगाय लागुया. आधीपास्न ह्या सायटीवर युन सवय झाली दुसर्याच ऐकायची तर बरच हाय.

"बर बाबा नाही बोलणार उद्धट. गोडच बोलीन. झालं समाधान?" बेण्याकडन दीक्षा घेताना कायतरी घोळ व्ह्याय लागलाय खरा.

"शाबास! पण खूप पण गोड नाही बोलायचं. पुढे अवघड होत मग."

"अवघडच दिसतय हे प्रकरण. बायको आणलेली परवडली."

"परवडली काय अरे तू चार महिने इथे सुखाने नांदून दाखव, बायकोला डोक्यावर घेऊन नाचशील."

मला मी नवरदेवाच्या वेशात हार घिउन हुबा हाय अन मिसळपाव साईट नवरीबाई है, सगळीकड कसा आनंदी आनंद हाय. मंग लगीन हून म्या सायटीत आलुय अन नव्या नवरीच्या उत्साहात काही बाही लिहून हिथ टाकत हाय पर हिथ सख्या चुलत मावस लय सासवा हायेत. तेस्नी म्या लिहलेल काय बी आवडना झालय. सासरेबुवा उठसुठ मापं काढू लागलेत. दीर नंदा उगा माज्या ब्लॉगवरन मला टोमणे माराय लागलेत असं काहीबाही दिसाय लागलं. माज हलकं डोक उगाच जड जड झालं. कसतरी ते चित्र म्या डोक्यातन हुसकावून दिलं अन परवचनात लक्ष दिलं. बेन आता लय तल्लीन झालं हुतं. पायाची पोजिशन आणि एकवार बदलली हुती.

"भरत्या तू असं कर तू आयडी घे पण काही लिहू नकोस. एक चार सहा महिने तरी."

"काय चार सहा महिने?" ह्या तर शोकच दिला ना बेण्यानी. घ्यायचा कशाला मग तो आयडी?

"अरे तू इथे येउन जरा बघ. सगळ्यांचे स्वभाव समजून घ्यायचा प्रयत्न कर. कोण कसं लिहीत, कसं रॆयाक्ट होत हे सगळं समजण इज वेरी वेरी इमपौरटंट. " बेन्यान इंग्लिश जोडलं म्हंजी खरच आसल.

"एकदा का तुला जरा थोडीफार माहिती झाली की मग ब्लॉग वरचा सगळ्यात जुना लेख आणून इकडे चिकटव, म्हणजे कॉपीपेस्ट कर."

"पण तू म्हणला ना शिळ जेवण द्यायचं नाही म्हणून."

"अरे राजा सारख सारख नाही द्यायचं. सुरवातीला तुझी ओळख करून देतोय असं म्हणून नम्र शब्दात बर का हा लेख टाकायचा. मग त्याच्यावर चांगल वाईट काही कुणी बोलल तरी शांत राहायचं. हीच खरी परीक्षा असते. " माझ्या मनात आई बहिणी आणि अश्या लय सासूरवाशिनीचा हुंदका आला. पर म्या तो दाबून ठिवला.

"चल आता तुला एक प्रात्यक्षिक दाखवतो."

बेण्यान किल्लीन काम्पुटर उघडला न मिसळपाववर आला. बेण लॉगइन करत हुता तवा मी तेचा युजर आयडी बघितला. बगून तेच्या तोंडाकड बगीतला. डोळे चोळून पुना बगीतला. तर बेण्याच्या मध्नच बायकी बोलनेका राज ये हय. बेन महावस्ताद निघाल की. तिरप्या डोळ्यांन माज्याकड बगत म्हणला.

"भरत्या आपल्या दोस्तीची आण हाय तुला. सांगू नको कुणाला."

"मजा आहे रे तुझी. मैत्रिणी आहेत की नाही मग"

"अरे चिक्कार. अशी मजा येते सांगू. कधी कधी अवघड असतं. सारख सारख त्यांच ते साड्या मेकपन पाक्रु ऐकून कान किटतात. पण मनाने चांगल्या आहेत. फक्त जास्त पंगा घेऊ नकोस त्यांच्याशी. डॉन आहेत एकसे एक. ऐकल नाही की एके सत्तेचाळीस काढतात बाहेर.अरे त्यांचा स्वत:चा वेगळा गाभारा आहे तिथ! "

"च्यामारी तू तर बायकांमध्ये गवळण हायेस की. तू जात असशील ना गाभार्यात?"

मघापासून खुललेला बेण्याचा चेहरा आता जरा उतरला.

"नाही रे. एवढा मोठा पंगा घ्यायला नको वाटतं. त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. मागे एकानी केला होता म्हणतात प्रगो आपलं ते हे प्रयोग पण कच्चा खाल्ला म्हणतात त्याला. त्यापेक्षा आपलं चाललाय ते बर आहे. उगा काहीतरीच करून काय करतो."

"डेंजर दिसतात रे बायका."

झुरळ अंगावर पडल्यावानी बेण्या वरडला.

"बायका नाहीSSSS म्हणायचं. आधी त्यांना अनाहिता म्हणायचे आता मिपाबायका असा शब्द आहे त्यांच्यासाठी. पण ते फार नंतर. तू एवढ्यात तुला खूप माहिती आहे असंही दाखवू नको. संशय येतो लोकांना."

मंग मला बेण्यान महत्वाच्या लोकांचे आयडी सांगितले.

मैत्री करायचे आयडी तो सांगू लागला. बेण्या हाटिलातला मेनू वाचून दाखीवल्यावाणी म्हणाला,

"मैत्री करावीच लागणारे आयडी
गवी
डॉसुहासम्हात्रेसुबोधखरे
मुक्तविहारी
प्रशांत
गणपास्पा
टवाळकार्टा
आतमबंद
सतीशगावडे
श्रीरंगजोशी
प्रचेतस
बात्मान
अभ्यादोनडॉट
नादखुळा
जेपी
प्रगो
काप्त्नजेकस्पेरो
पैसा
अजया
स्नेहांकिता
पिलियनरायडर
स्वप्नाचीराणी
यशोधरा
पियुशा
निमो
रेवती
.…"

बेण्याची गाडी थांबणा म्हणता मी कागद न पेन घिउन बसलु यादी कराय. तवर तेन ठेसन बदाललं.

"आता भांडायचे आय डी बघू. हे बघ ही वरची यादी आहे ना त्यातल्या सगळ्यांशी तुझं कशा न कशा वरून वाजणारच आहे. पण भांडण विसरून प्रसंगी हो बाई तुझच बरोबर म्हणून पुढे गेलास तर इथे टिकशील. पण स्पेशल भांडायचे लोक आहेत त्यांची नाव मी तुला अशी सहजा सहजी देणार नाहीच. त्यासाठी आपल्याला जरा बसावं लागेल."

हाये का म्हणलं नव्हतं बेन लय महा वस्ताद हाय.

"अजून एक इथे कंपू असा ओपन नाही पण आतल्या आत असतोच तर आपण पण ओपन कुठल्या कंपूत आहे हे नाही कळू द्यायचं. कधी ह्या बाजूने बोलायचं कधी त्या बाजूने. पण मग खरडवहित जाउन स्पष्टीकरण द्यायचं. अगदीच भिडणारा अगर भिडणारी असेल तर आपल व्यनी बरा. "

आमास्नी ल्हानापणापासून खरडपट्टी माहिती. हे खरडवही काय म्हून म्या विचारलं तर बेण्यान तेची खरडवही दाखीवली. त्यात समद्या बायका आं चुकल चुकल मिपाबायका =)) नाहीतर :) नाहीतर ;) असं करून गेल्यावत्या. आणि एक बाप्या "किती सुंदर कविता लिहता, अत्यंत चित्रदर्शी" म्हून गेला होता. एका बाप्यान "दुधाचं पनीर कसं करतात ओ ताई" असा सवाल केला होता. बेण्यान न म्या एकमेक टाळीच दिली. बेण्या बोलला,

"अरे तू आय डी घेऊन ये तर खरं. आपण धमाल उडवून देऊ."

"बेण्या मी जाउन बगू का रे त्या बायकांच्या गाभार्यात काय असतंय. मघाधरन म्या इचार करतुय उद्या पुढं मागं आपलं लगीन हुइल आपल्या आपल्या बायकांशी. तवा तेना इम्प्रेस कराय आपण हिथल्या बायकांच्या गप्पातन शिकू. काय म्हणतो?"

"भरत्या मुद्दा आहे खरा, पण तिथे ओळख बिळख द्यावी लागते म्हणतात. ते कसं जमवणार. आपल्या आहेत त्या मैत्रिणी सोडून जातील आपल्याला त्यांना असलं काही सांगितलं तर. "

"अरे कशाला शिकला सवरला रे तू. आपली मैना हाये ना."

बेण्यान भरत्या भरत्या म्हणत मिठीच मारली मला. मला आक्षी रामाभरताचा सीन आठवला अंदाज अपना अपना मधला.

मैना तवा हात पुशीत खुराड्याकडच परत याय लागली हुती.

तर मंडळी मैनेची आयदेणतीटी कशी मिळवायची याचा बेण्या अन म्या आता प्लान करतुय. पर तवस्तवर ह्यो भरत पलुसकर आसल काही बाही लिहून जाणार हाय. गोड मानून घ्या देवा.

आजच्या ताज्या ताज्या बातम्या:

बेण्यान सांगितल नवत लगीच काय लिहू नगो. तरी म्या तेचा आय डी सांगितला नाय. हे एवढ सांगितल तर बेण्या मला कालधरन नको तिथ हाणतय. खुराड्यात मैना

"गाईज गाईज डोंट फाईट! स्टोप इट! स्टोप इट!" किंचाळतिया.

असं कर्तु बेण्याला जरा वडापाव खायला नेतु. तवर तुमी बसा बरका जायचं नाय!

आमची नर्म इनंती:

गंमत गंमत म्हून ह्यात लिहल हाय. कुणाला राग आला असल्यास आपुन जबाबदार नाय. बेण जबाबदार हाय त्याला. न्हायतर मला काय माहिती हाय व्हय? वय तरी बगा. बेण्याचा आय डी आपुन जान गेली तरीबी सांगणार नाय. शेवटी गुरु हाय माझा तो!

शब्दक्रीडाशब्दार्थविनोदमौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

गवि's picture

24 Feb 2016 - 8:15 am | गवि

पदार्पणातच षट्कार..

जुने जाणते दिसता.. लगे रहो. शुभेच्छा..

जेपी's picture

24 Feb 2016 - 8:31 am | जेपी

+1

भरत्_पलुसकर's picture

24 Feb 2016 - 2:27 pm | भरत्_पलुसकर

सगळी बेने गुर्जीँची किर्पा!

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2016 - 8:43 am | टवाळ कार्टा

खि खि खि
ख्या ख्या ख्या
मस्तयं

उल्लेख नसल्यामुळे आमचा पास!

उगा काहितरीच's picture

24 Feb 2016 - 11:02 am | उगा काहितरीच

+१ :-(

भरत्_पलुसकर's picture

24 Feb 2016 - 2:33 pm | भरत्_पलुसकर

धांदरटपणा नडला नव्हं.
बेनेगुर्जीँनी अभ्यासात तुमची ती कावळ्याची गोष्ट दिलेवती वो वाचाय. काय लिहता काय तुमी!
अन उगा काहीतरीच गपा उगी!
तुमचं नाव आलंय की वो वर. लिश्टीत नसलं म्हुन काय झालं ;)

भीमराव's picture

24 Feb 2016 - 8:57 am | भीमराव

हान तिच्या........ सांगीतल्याली गोष्ट खरी आसल तर झक्कास आचारी आलाय आपल्या हाटेलात. नायतर जुणचं ख्वाड शिंग मुडुन वासरात शिराय बघत आस्ल मजी आजुक १ ड्वायडी म्हणायचा, बाकी ट्रायल जबराट हा.

यशोधरा's picture

24 Feb 2016 - 9:01 am | यशोधरा

मज्जा आली वाचायला! (मैत्रीवाल्या आयडीमध्ये नाव असल्यामुळे प्रतिसाद दिला आहे! )
तुम्ही कोणी जुनीच आयडी असायची शक्यता किती हो भौ? परत आला असाल तर येल्कम ब्याक. :)

सनईचौघडा's picture

24 Feb 2016 - 9:19 am | सनईचौघडा

ते बेणं कोण ते वळीखलंय आमी.

भरत्_पलुसकर's picture

24 Feb 2016 - 2:35 pm | भरत्_पलुसकर

द्या टाळी! बेस!

प्रचेतस's picture

24 Feb 2016 - 9:20 am | प्रचेतस

खी खी खी.
मजा आली. आतमबंद हे आयडीनाव अगदी काळजाला भिडले.

राजाभाउ's picture

24 Feb 2016 - 10:53 am | राजाभाउ

हा हा मी पहील्यांदा आतनबंद वाचल होत.

भरत्_पलुसकर's picture

24 Feb 2016 - 2:38 pm | भरत्_पलुसकर

आतमबॉम्ब लिणार हुतो पर म्हणलं गूर्जीच मन सांभाळाय हव आता.

अजया's picture

24 Feb 2016 - 9:20 am | अजया

:)
पण पदार्पण नाय वाटत ब्वा!
मैत्रीवाल्या आयडीची आयड्या काढल्याने उत्खनन पोस्टपोन केल्या गेले आहे ;)

तुमी जुनं हायतंसा पर इतकं बी जुनं न्हाय ह्ये बी खरंच. रच्याकने, हे 'बेण' म्हंजी त्या वाघुळम्यानाच्या चित्तरपटातलं नसून 'बेणं' हाय ह्ये लगीच कळाना.

नाखु's picture

24 Feb 2016 - 10:05 am | नाखु

"जाणत्या" मुरलेल्या खेळाडूची फलंदाजी...
आवडली , नाव काढलंय म्हणून प्रतीसाद दिलाय्,माझा धागा आल्याव लक्ष्यात ठिवा आणि परत्फेड करा.

या कट्ट्याला एकडाव बेन्याबरूबर हाकानाका !!

फक्त कुंपणीतला बिनाकंपु नाखु

भरत्_पलुसकर's picture

24 Feb 2016 - 10:20 am | भरत्_पलुसकर

आलो वाइच ठिगळ लावायचं काम चालू हाय हापिसात.

राजाभाउ's picture

24 Feb 2016 - 10:52 am | राजाभाउ

कुनी का असा नवे जुने पर भारी लिवलयसा. लिवत रा

सुबोध खरे's picture

24 Feb 2016 - 10:53 am | सुबोध खरे

मागे एकानी केला होता म्हणतात प्रगो आपलं ते हे प्रयोग पण कच्चा खाल्ला म्हणतात त्याला

सदस्य काळ - एक दिवस १० तास
काही ताळ मेळ जमत नाही.
बाकी लेख झकास आहे

भरत्_पलुसकर's picture

24 Feb 2016 - 2:43 pm | भरत्_पलुसकर

ही ही ही!
बेन्यान वाचल्याव त्यो बी हेच बोल्ल्ला एक तरी मेंब्र लिव्तोय बग सदस्यकाळ :)
शेवटी गुरूच त्यो! तरी म्या अजून खरडफळ्यात न्हाय गेलू. तिथं म्हण नवा भिडू आला की तेच्याच गळ्यात मार्त्यात राज्य!

अभ्या..'s picture

24 Feb 2016 - 12:06 pm | अभ्या..

हान तिज्यायला.
केलीच काशी एकदाची.
आमच्या हिकडं 'बसल्या ---- ---- -- जड' म्हणतेत ते काय खोटं न्हाय. ;)

बघा जपुन जरा नायतर हापुसातली मैना मिपा वरचीच यखादी मुलुखमैदान तोफ निघायची......

स्पा's picture

24 Feb 2016 - 12:58 pm | स्पा

जडभरत तुमीच का वो

भरत्_पलुसकर's picture

24 Feb 2016 - 2:47 pm | भरत्_पलुसकर

ना ना ना दोबारा मत पूछना!

सिरुसेरि's picture

24 Feb 2016 - 12:59 pm | सिरुसेरि

तुम्ही लेख लिहिण्यापुर्वी मिपाची काळजीपुर्वक रेकी केलेली दिसते आहे .

पैसा's picture

24 Feb 2016 - 1:20 pm | पैसा

मजेशीर लेख! जबरदस्तीची मैत्री ठेवलीत तरी चालेल! तुम्ही पुरेसे जुने आहात आणि मिपाची ओळख आहे हे नक्की. वरची यादी बघून कोण असावेत याचा अंदाज लावता येईल. भेटूच आता इथे मिपावर!

अनाहिता गँगने धरलं तर पैसा हाच सुटका होण्याचा रामबाण उपाय आहे हे लक्षात असू द्या..

नारायण..नारायण...!!!

पैसा's picture

24 Feb 2016 - 2:17 pm | पैसा

त्यांना मिपा बायका पण माहित आहे! =))

मृत्युन्जय's picture

24 Feb 2016 - 1:42 pm | मृत्युन्जय

लय भारी. पुनपदार्पणात षटकार ठोकलात की. कधी कधी सेकंड इनिंग अधिक जोरदार असते ;)

भरत्_पलुसकर's picture

24 Feb 2016 - 3:07 pm | भरत्_पलुसकर

तर मंडळी आल्या आल्या एकदम एवढे गडी हितं यून गेले म्हणता बेने गूर्जीनी आमचा धागा लक्ष दिऊन वाचला हाय! ते म्हणले आता नवी नवी वलख हुतीया तवसत्वर दे स्म्द्यास्नी उत्तर. ते नवी नवरी कशी आला पावना की वाक खाली करती तसं. पर सारंक सारंक बी नाय! नायतर लोकं म्हणतेत तूम्चेच प्रतिसाद निम्मे! मिपा झालंय धीम्मे! तर बेनेगूर्जीनी आजवर ज्या काय चार गोष्टी शिकिव्ल्यात तेच फळ म्हुन आज ह्यो दिस मला दिसला. वर यादीत कुणाचं नाव न्हाई तेनी रुसू नगा फूगू नगा! आमच्या मनात तशी काय खोड न्हाय. नजरचुकीन व्हतं असं कवा कवा.

अजून एक बेन म्हणलं जरा मैनेच काम हुईसत्वर महिला मंडळाशी जपून. तवा तेस्नी स्म्द्यास्नी हितून्च नमस्कार करतो हं!

मिपा इतिहास असा नवा वर्ग घेयाची म्या बेने गूर्जीस्न इंनंती केली हाय. ते म्हणले त्यात लय स्फोटक गोष्टी हायेत. तुझं मडके अजून पक्क नाय तवा जरा दम धर.

कट्ट्याला बॉल्व्तील त्यास्नी व्हय म्हण. टांग कशी मारायची ते दातार गुर्जी शिकिवत्याल. तेवढे कूट दिसले दातार गुर्जी तर आपली गाठ घालून दया बर का. ;)

पार मैदानाबाहेर ठोकलाय षटकार, भारीच्च !!
धन्य ते बेणं, काय ती मैना अन धन्य ते लिहीणारे :)

"मैत्री करावीच लागणारे आयडी" - मैत्री करावीच का लागणार ते समजलं नाही.

सगळ्या जुन्या-जाणत्या दिग्गज मिपाकरांच्या रांगेत आम्हाला बसवू नका हो,
मात्र आपले नाव असण्याची यत्किंचितही अपेक्षा नसतांना ते आलेले पाहून काय वाटले ते शब्दांत सांगू शकत नाही,
मन भरून आलंय.. डोळे पाणावून वाह्यलेत... अर्रर रूमाल कुठाय...

नाव आहे आणि तेही निमो, हम्म्म्.. ये तो कोई पुराना खेडाळू लगता हय :)

रोहित गोसावी's picture

24 Feb 2016 - 4:00 pm | रोहित गोसावी

कृपया कोणाकडे पेशवेकाळातील विश्रामबागवाड्याचे महत्व आहे का..असेल तर प्लिज मला whtsapp करा...

नीलमोहर's picture

26 Feb 2016 - 2:10 pm | नीलमोहर

लोक वाट चुकतात पाहिलं होतं, हे जरा जास्तच झालं ;)

तरीपण आलाच आहात तर हे घ्या, विश्रामबागवाड्याचे महत्व आमच्यासाठी आहेच,
http://www.maayboli.com/node/46180

रोहित गोसावी's picture

24 Feb 2016 - 4:01 pm | रोहित गोसावी

my no 8421060808

सुमीत भातखंडे's picture

24 Feb 2016 - 5:28 pm | सुमीत भातखंडे

(जुने जाणते असलात तरी) वेलकम टु मिपा.

रातराणी's picture

25 Feb 2016 - 12:37 am | रातराणी

धमाल लिहिलंय!

ण वर टिंब द्यायचं धेनामंदी र्हायलं नव्ह

मस्तच. जुना आयडी असेल तरी बेरींग मस्त पकडलय. काही काही पंचेस तर एकदम खतरनाक.

ते म्हणले आता नवी नवी वलख हुतीया तवसत्वर दे स्म्द्यास्नी उत्तर. ते नवी नवरी कशी आला पावना की वाक खाली करती तसं.

"अरे मित्रा तुला नाही कळायचं. कधी कधी वाचलं नाही तरी आपण छान म्हणून जायचं असत. बरं वाटतं ते लेखकांना."

"भारी रे. समजूतदार झालायस. उरकून टाकावं यंदा. लग्न झाल्यावर पण असंच करायचं असतं."

जव्हेरगंज's picture

26 Feb 2016 - 8:19 pm | जव्हेरगंज

लय भारी !

किचेन's picture

27 Feb 2016 - 9:06 am | किचेन

लै भारी!
आॅफिसात नेहमी सगळे विचारत असतात, कशापायी दात काढती म्हनून.आता कुनी विचारलं तर तुमचा धागा दावते.समद सोप्प करुन टाकलत भाऊ तुम्ही.धन्यु हं!

स्पा's picture

27 Feb 2016 - 9:13 am | स्पा

किचेन ताई , कित्येक वर्षांनी

-- लिविंग रूम

मुक्त विहारि's picture

27 Feb 2016 - 9:45 am | मुक्त विहारि

एकदम खुसखूशीत.

सस्नेह's picture

27 Feb 2016 - 12:06 pm | सस्नेह

कोल्लापुरी नमुणा वाट्टं ?
चान चान ! सगळ्यांना शेंदूर फासायचं काम बाकी झकास :)