लदाख सायकल ने : गोंदला ते जिंगजिंगबार (भाग ५)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
3 Feb 2016 - 12:07 pm

तू तुझे बघ मी माझे बघतो. तू तुझा उद्याचा कार्यक्रम तयार कर, मी माझा बनवतो. जर दोघांचे कर्यक्रम एक सारखे निघाले तर मग आपण एकत्र राहू. नाहीतर मग तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या. या गोष्टीवर दोघांची संमती झाली.
तीन दिवस हाफ पैन्त घातल्या मुले गुड्घ्यापाशी पाय जळाले. खूप आग होत होती. आता उद्या पासून फुल पैन्त घालावी लागणार.
आज दिवसभरात ६४ किलोमीटर सायकल चालवली.

दिवस पाचवा

साडे आठला डोळे उघडले. असे तसे नाही उघडले. सचिन न हलवून हलवून उठवलं. सचिन तर हेल्मेट घालून जाण्याच्या तयारीत होता. त्याला मी कालच बजावलं होतं कि लवकर उठवू नकोस. म्हणून त्यानी नाही उठवलं. त्यानी मला आजचा कार्यक्रम विचारला. आता मी काय डोम्बाल्याचा कार्यक्रम बनवणार? काल कार्यक्रम बनवला होतं कि भरपूर झोपणार पण तो पण अजून पूर्ण झाला नाही. त्याला म्हटले तू जा पुढे निघून. मी येतो मागून सावकाश. सचिन आज जिस्पा किंवा दारचा मध्ये थांबून उद्याची रात्र जिंगजिंगबार मध्ये काढेल. मी आज केलांग किवा जिस्पा मध्ये राहून उद्या जिंगजिंगबार ला मुक्काम असेल. जिंगजिंगबार हे बारालाचा-ला जवळचे जास्त लोकसंख्या असलेले स्थान आहे. मला तो आज जरी भेटला नाही तरी उद्या जिंगजिंगबार नक्कीच भेटणार.

तो गेल्यानंतर मी परत झोपून गेलो. बरोबर अकरा वाजता जाग आली. मागच्या दोन रात्री झोपायच्या पिशवी मध्ये काढल्या होत्या. त्या आधीची रात्र दिल्ली ते मनाली च्या बस मध्ये आणि त्याच्या मागच्या चार रात्री ह्या कामामध्ये रात्र पाळीत. त्यामुळे मागचा संपूर्ण हफ्ता बरोबर झोपू शकलो नव्हतो. त्याची कसर आज भरून काढली.
पहिली अंघोळ करून घेतली. गिजर होतं म्हणून गरम पाण्याचा काही प्रोब्लेम नव्हता. चार दिवसापूर्वी दिल्ली मध्ये अंघोळ केली होती. आता इथून पुढे सहा दिवस तरी अंघोळ मिळणार नाही. पहिल्या दिवशी हाफ टी-शर्ट आणि हाफ पैन्त घालून निघालो होतो. दुसर्या दिवशी पण तेच कपडे. परिणाम झाला काय...उन्हामुळे कोपऱ्या पर्यत हाथ जळाले. जास्त उंचीवर गेल्यावर सूर्याची किरणे पण जास्त तीक्ष्ण होतात. चश्मा न घातल्यामुळे डोळ्याला पण त्रास झाला होता. त्यामुळे आज पूर्ण कपडे घातली. चश्मा पुढे गेल्यावर केलांग मध्ये विकत घ्यायचं ठरवलं.
चश्मा घालायची मला अजिबात सवय नाही. त्यामुळे विकत घेतला तरी घालायची आठवण राहत नाही. मनाली मधेच २०० रुपयाचा चश्मा घासाघीस करून 50 रुपयाला घेतला होता. ५० मीटर पुढे गेलो नाहीतर हरवला. नंतर कोठी मधून परत दुकानदाराकडून ५० ला घेतला तो पण हरवला. बैग मध्ये ठेवला होता. पूर्ण बैग चाचपडली तरी सापडला नाही.

गोंदला गाव चंद्रा नदीच्या कडेला आहे. नदीच्या पडयाल पण एक गाव आहे. त्या गावाच्या वरती ग्लेशियर आहे. हजारो वर्ष्यानुवर्ष्य एकावर एक बर्फ पडून. एकदम ठोस कठीण बर्फ झालेला असतो त्यालाच ग्लेशियर म्हणतात. तो ग्लेशियर खूप भयंकर दिसत होता. गोंदला मधेच रेस्ट हाउस च्या बाजूला एक किल्ला आहे. एकदम छोटासा आहे. त्याला आपण वाच टावर म्हटले तरी काय हरकत नाही.

बारा वाजून चाळीस मिनिटांनी रेस्ट हाउस मधून बाहेर पडलो. इथून मुख्य रस्ता सरळ वरती जातो.
तो रस्ता चढायला २० मिनिटे लागले. नंतर पूर्ण रस्ता उताराचा होता तितकाच खराब पण. आता पुढचे लक्ष्य तांडी होते. सायकल सुसाट तांडी च्या दिशेने निघाली. दहा किलोमीटर चे अंतर एका तासात पूर्ण केले. तांडी मध्ये हिमाचल प्रदेश चा शेवटचा पेट्रोल पंप आहे. इथे एक सूचना लिहिली होती कि, पुढचा पेट्रोल पंप ३६५ किलोमीटर आहे.

टांडी मध्ये चंद्रा नदी आणि भागा नदीचा संगम होतो. दोन्ही नद्या मिळून एक नदी तयार होते. तिलाच चन्द्रभागा नदी म्हणतात. ती पुढे जाऊन जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश करते. तिथे ती चेनाब नदी म्हणून ओळखली जाते. इथे बघा! एकच नदी.. पण तिला पण दोन धर्म स्वीकारावे लागतात. एक हिंदू आणि एक मुस्लिम. चन्द्रभागा आणि चेनाब !!
भागा नदी बारालाचा-ला पासून येते. इथून पुढचा रस्ता भागा नदीच्या कडे-कडेनेच आहे. त्यामुळे पूर्ण रस्ता चढाचा आहे. टांडी मध्ये जेऊन घेतलं. आणि पुढे मार्गस्थ झालो. सुर्य चांगलाच कमरेच्या वरती आला होता. माझ्या कमरे वरती प्रखर सूर्याची किरणे पडत होती. त्यामुळे सारखी कमर खाजवायला लागायची. बाटली मधलं पाणी पण गर्मी मुले गरम झालं होतं. ३००० मीटर वरती एवढ्या गर्मी ची अपेक्षाच नव्हती. सावलीत गेलं कि गार लागायचं आणि उन्हात खूप गरम व्हायचं.

टांडी सोडल्यानंतर रस्ता खूपच खराब होता. पूर्णपणे तुटलेला होता. आणि चढाई पण सुरु झाली. टांडी नंतर एका तासामध्ये फक्त चारच किलोमीटर अंतर पार केले. टांडी पासून केलांग सात किलोमीटर आहे. शेवट २ किलोमीटरचा,चांगला रस्ता आहे. साडे चार वाजल्या पासून ते साडे पाच पर्यंत मी केलांग मधेच थांबलो. तीन दिवसा नंतर एयरटेल ला नेटवर्क मिळालं होतं. घरी सगळ्यांना सुखरूप आहे म्हणून खबर दिली. त्याच बरोबर यार दोस्तांबरोबर सुद्धा बोलून घेतलं. मनदीप त्याच्या परिवार बरोबर केलांग ला फिरण्याची योजना बनवत होता. त्याला रस्त्यांची माहिती दिली आणि परिवारा सोबत येऊ नकोस, असे सांगितले.

केलांग हे लाहौल स्पीति जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे दोन भाग आहेत. लाहौल आणि स्पीति. कुंजम घाट या दोन्ही जिल्ह्यांना वेगळे करतो. कुंजम घाट अजून सुधा वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे केलांग मुख्यालयाचा स्पीति जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे. तरी पण स्पिति ला जायचे असेल तर अजून एक मार्ग आहे, किन्नौर होऊन जावे लागेल. किन्नौर वरून स्पीति ला जाणारा रस्ता हा बारा महिने उघडा असतो. मग स्पीति जिल्ह्याला का नाही किन्नौर जिल्ह्याशी जोडत? अशीच परिस्थिति पांगी ची आहे. पांगी हे चम्बा जिल्ह्यात पडते. पण जास्त काळ, चम्बा जिल्ह्यापासून त्याचा संपर्क तुटलेला असतो. म्हणून पांगी ला लाहौल जिल्ह्याला जोडायला पाहिजे.

केलांग पासून स्टिंगरी ६ किलोमीटर वरती आहे आणि जिस्पा २५ किलोमीटर वरती. रस्ता सगळा चढायचा आहे. रात्री १० च्या आत मध्ये जिस्पाला पोहचू शकत नाही. मग का नाही स्टिंगरी लाच थांबावे. असा विचार मनात सुरु झाला.
केलांग पार केल्या नंतर एक ओढा लागला. त्यानी तर ठणकावूनच सांगितलं, मी तर काहीच नाही. माझ्या पेक्ष्या मोठ मोठे ओढे पुढे आहेत. ज्यांच्या मध्ये मोठ मोठे ट्रक वाहून नेण्याची क्षमता आहे. ह्या ओढ्या मध्ये गुडघ्या इतकं पाणी होतं. पाण्याला पण धार होती. सायकल पण वाहता वाहता वाचली. साडे सहा वाजता स्टिंगरी ला पोहचलो. इथे मिलिटरीचा ठिकाणा आहे. तिथे एक फौजी भेटला. बंगाल चा होता. त्याने प्रयत्न केले कि मला कुठे झोपायला जागा मिळेल म्हणून. पण व्यर्थ!! मी सिविलियन होतो त्यामुळे इथे थांबू दिले नाही. तसाच पुढे गेलो.

जिस्पा इथून १९ किलोमीटर लांब आहे. माहिती काढली कि, इथून पुढे १४ किलोमीटर वरती गेमूर आहे. तिथे राहण्याची व्यवस्था होईल. १४ किलोमीटर म्हणजे तीन तास सायकल चालवायची होती. म्हणजे रात्री साडे नऊ पर्यंत तिथे पोहोचणार होतो. रस्ता चांगला होता पण चढाई चा होता. एका तासा मध्ये पाच किलोमीटर सायकल चालवली. नंतर खराब रस्ता सुरु झाला. पावणे आठ ला इतर वाहनांनी लाईट सुरु केल्या तेव्हा लगेच मी पण माझ्या हेल्मेट ची लाईट सुरु केली. आम्हाला कामावरती जास्त उंची वरती काम करावे लागते. त्यामुळे असे हेल्मेट आम्हाला दिले आहेत. ज्याला एलईडी लाइट लावलेल्या आहेत. ह्या हेल्मेट च्या मागे लाल कलर ची लाईट जळत असते. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाला संकेत मिळतो.

पुढे गेल्यावर जास्त चढाईची रस्ता लागला आणि वळणदार पण होता. म्हणजे अजून वेळ जाणार. मन थोडे साशंक झाले. एकतर रात्रीची वेळ..वळणदार रस्ता म्हणजे छोटा मोठा घाट असण्याची शक्यता होती. तितक्यात समोरून एक ट्रक येताना दिसला. मनाली लेह रस्त्यावरती ट्रक सारखे येत जात असतात. त्यानंतर दोन बुलेट वाले निघून गेले. ते पण पुढे वळणदार रस्त्यावरती चढताना दिसले. आता मी समजून चुकलो होतो कि, मला पण त्याच रस्त्यांनी जावे लागणार. नंतर पंजाब च्या दोन गाड्या माझ्या शेजारून गेल्या. पण त्या वळणदार रस्त्यांनी चढताना दिसल्या नाहीत. त्या खालीच थांबल्या होत्या. मी ओळखून चुकलो कि, तिथे फाटा फुटला आहे. मी पुढे गेलो तर खरंच तिथे फाटा फुटला होता. एक रस्ता खालून जात होता तर एक रस्ता वरून. तिथे कोणतीच सूचना पाटी नव्हती. पुढे चार बाया येताना दिसल्या. खाली नदीकडून लाकडाच्या मोळ्या घेऊन येत होत्या. त्यानी सांगितले कि, वरती जाणारा रस्ता कोलोंग गावात जातो. त्यातल्या एका बाइनि चाकलेट मागितलं. मी म्हटलं माझ्याकडं टॉफी आहेत. पन्नास पैश्यावाली!! ती म्हटली ठीक आहे. टॉफी दे. मी खिश्यात हाथ टाकला आणि पाच टॉफी काढल्या. त्या बाई च्या हातात दिल्या. ती म्हटली कि, आम्ही चार आहोत अजून तीन दे म्हणजे सगळ्यांना दोन दोन मिळतील. मी म्हटलं बरोबर आहे. तुम्ही एक एक घ्या राहिलेली एक, मला नको का? मी कुठे जाणार. त्या म्हटल्या किती चिंगूस आहेस रे !!

शेवटचे पाच किलोमीटर उताराचे होते. सायकल चांगली पळत होती. साडे आठ वाजताच गेमुर ला पोहोचलो. एक दुकान उघडं होतं. मी राहण्यासाठी बोलणी केली. तो म्हणाला कि खोली भेटेल. पण शौचालय नाहीय. मला तर नुसती खोली म्हटले तरी तोंडाला पाणी येते. नाहीतर अजून पाच किलोमीटर जिस्प्पाला जावे लागले असते. खोली आणि दोन बिस्तर ..फक्त पन्नास रुपये.
३३०० मीटर उंचा वरती असलो तरी रात्री थंडी वाजली नाही. हिवाळ्यात इथे खूप बर्फ पडतो. टीवी वरती क्रिकेट मैच चालू होती. चैम्पियन्स ट्रॉफी!! इंग्लैण्ड व आस्ट्रेलिया ची मैच होती. मला क्रिकेट जास्त आवडत नाही तरी सिद्धू चा आवाज कानावर पडला.
“इंसान अपना मुकद्दर खुद बनाता है, बाद में उसे होनी का नाम दे देता है।“

दिवस सहावा

गेमुर मनाली पासून १३३ किमी दूर आहे. सात वाजता उठलो. गावाच्या मधोमध ओढा आहे. पाण्याला धार पण चांगली होती. खालच्या बाजूला सार्वजनिक शौचालय आहे. ओढ्याचे पाणी सार्वजनिक शोउचलया पर्यंत गेले आहे. त्यामुळे मी सावकाश पणे गेलो. तरी पण बर्फाच्या थंड पाण्याने पाय भिजलेच. सायकल धुळीने पूर्णतः खराब झाली होती. मग काय ओढ्याचा पूर्णपणे फायदा उठवला. दहा मिनिटात चकाचक!!
इथेच नाश्ता केला. नऊ वाजता निघालो. आजच लक्ष्य होतं. ३६ किलोमीटर लांब जिंगजिंगबार. सचिन माहित नाही रात्री कुठे राहिला होता. पण आज तो जिंगजिंगबार मध्ये नक्कीच भेटणार.

गेमुर पासून जिस्पा ५ किमी दूर आहे. रस्ता चांगला आहे. उतार पण होता. पावून तास लागला. जिस्पा मध्ये हॉटेलांची काही कमी नाही. काल जर गेमुर ला राहण्याचे ठिकाण मिळाले नसते तर मला इथेच यावे लागले असते. जिस्पा वरून ६ किमी वरती दारचा आहे. रस्ता चढाई आणि उतराई चा आहे. साडे दहा ला दारचा मध्ये पोहोचलो. दारचा मध्ये भरपूर नद्यांचा संगम होतो. अशीच एक नदी पुल पाशी चेकपोस्ट जवळ आहे. प्रत्येक गाडी आणि यात्रेकारुचे नाव इथं नोंदल जातं. मला वाटले सायकल ला इथून सूट असेल. मी बैरियर पार करून पुढे जाताच मागून आवाज आला, हेलो सर, एण्ट्री प्लीज. मी त्यांच्या जवळ जाताच,एकाने म्हटले, सर, पासपोर्ट प्लीज?
मी विदेशी असल्याची त्याची समजूत झाली होती.
मी मोठ्या आवाजातच सांगितले, "भाई, देसी हूं। हम पासपोर्ट ना दिखाया करते."
असो मग त्याने एका रजिस्टर मध्ये नाव पत्ता लिहून घेतले. इथे भरपूर जेवलो. अकरा वाजून वीस मिनिटांनी निघालो. कडक उन होतं. दारचा सोडले कि बारालाचा-ला ची चढाई सुरु होते. दारचा ३४६० मीटर उंची वर आहे तर बारालाचा-ला ४९०० मीटर वर. दोघा मधले अंतर ४५ किलोमीटर. दारचा च्या पुढे २३ किलोमीटर वरती जिंगजिंगबार आहे. आज रात्री मला तिथेच राहायचं होतं. रस्ता एकदम भंगार. २ किलोमीटर वरती एक फाटा दिसला. मुख्य रस्त्याला जोडून तो रस्ता पुढे छिया गावात जातो. नाव आता मी विसरलो छिया होते कि जिया काय माहित. हा तोच रस्ता आहे जो मी जानेवारीत बघितला होता निम्मू ते चिलिंग ला जाणारा. हा निम्मू-पदुम-दारचा रस्ता निर्माण योजनाचा भाग आहे. निम्मू पासून ५० ते ६० किलोमीटर पर्यंत बनलेला आहे. पदुम च्या दोन्ही बाजूला पण बनलेला आहे. इथे दारचा मध्ये पण थोडा रस्ता बनलेला आहे. रस्त्या वरचे दगड नवीनच सांगत होते कि, पतसेव दारचा पासून १६ किलोमीटर.

पुढे गेल्यावर चांगला रस्ता सुरु झाला. पण चढाई बारालाचा-ला पार केल्याशिवाय संपणारी नवती. एक ओढा भेटला. त्यावरती पूल नव्हता. पाणी पण जोरात वाहत होते. बर्फ वितळून पाणी खाली येत होते. पाणी किती थंड असेल त्याचा विचारच करू नका. कसा तरी ओढा पार केला. मागून एक मोटारसायकल वाला आला. ओढा पार करताना त्याच्या दोन्ही बुटात पाणी गेलं. मग ओळख झाली हाल चाल विचारले. ते इंदोर चे पंकज जैन होते. मोटारसायकल वरून लदाख ला चालले होते. इथून एक किलोमीटर पुढे गेलो नाही तर परत मोठा ओढा लागला. दोन्ही बाजूला वाहनाची लाइन लागली होती. एक बुलडोजर ओढ्या मधले दगड काढत होता. काही छोट्या गाड्या पण इथे अडकल्या होत्या. एका कामगाराने बिडी पाजायाच्य अटी वरती सायकल ओढा पार करून देतो असं सांगितलं. मी म्हटलं माझ्यात तेवढा दम आहे. मी स्वत सायकल ओड्याच्या पार केली.
पावणे चार वाजता पतसेव ला पोहोचलो. भूख लागली होती. पराठे खाल्ले. आज खूप थकलो होतो. उंचीमुळे आणि चढाई मुळे. आणि ताईत पैन्त मुळे अजूनच पाय दुखत होते.
पतसेव पासून जिंगजिंगबार नऊ किलोमीटर वर आहे. यातले ३ किलोमीटर सायकल वर बसून गेलो. बाकीचे सहा किलोमीटर पायाने. इथे पण एक ओढा पार करावा लागला. बुलडोजर रस्ता साफ करत होता. दोन्ही बाजूना गाड्यांची रीघ होती. पण सायकल ला कोणी थांबू शकत नाही.

साडे सहा वाजता जिंगजिंगबार च्या एक किलोमीटर मागेच होतो. म्हणून सायकल ची गती कमी केली. जेव्हा जिंगजिंगबार ला पोहोचलो तर धक्काच बसला. राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था इथून पुढे ६ किलोमीटर वरती आहे. बरे झाले बीआरओ चा ट्रक तिकडेच चालला होता. सायकल ट्रक वर कामगारानीच टाकली. माझी हालत खूपच खराब झाली होती. सकाळी ३३०० मीटर वर होतो आणि आता ४३०० मीटर वर. त्यात मला जिंगजिंगबार नि धोखा दिला होता. इथे ६० ते ७० कामगार राहतात. इथे चार पाच तंबू होते. हिंडफिर्यांसाठी राहण्याची आणि खाण्याची चांगली व्यवस्था होती. इथे एका तंबू मध्ये मी शिरलो. चादर घेऊन झोपून गेलो. खूपच थकलो होतो. चांगली झोप लागली. संध्याकाळी नऊ वाजता मुलांचा आवाज ऐकून जाग आली. इथे अजून काही वाटसरू होते. मेरठ वरून आले होते. आमच्याच शेजारचे. आजू बाजूच्या तंबू मध्ये सचिन ला शोधले. पण नाही दिसला. बहुतेक त्याने बारालाचा पार केला असेल. माझ्या पेक्ष्या तो अनुभवी पण आहे आणि शरीराने मजबूत. मी आपला हळू हळू कसा तरी इथे आलो. तो नक्कीच माझ्या पुढे गेला असेल.....


गोंडला पासून दिसणारा चंद्रा च्या पलीकडचा नजारा


गोंडला चा किल्ला


लांबून दिसणारं गोंडला गाव


गोंदला पासून टाण्डीला जाणारा रस्ता


पुढचा पेट्रोल पंप ३६५ किलोमीटर वरती


टाण्डी पुल हा भागा नदी वर बांधलेला आहे.


टाण्डी पुलावरून घेतलेला फोटो. समोर चंद्रा भागेचा संगम.


टाण्डी पासूनचे अंतर


केलांग ला पोहोचणार आहे.


टाण्डी पासून ५ किमी पुढे


केलांग मध्ये आपले स्वागत आहे.


गेमुर गाव


जिस्पा


दारचा कडे


दारचा


दारचा च्या पुढे


इथे फाटा फुटला आहे . एक रस्ता पदुम ला जातो.


बारालाचा-ला कडे


दारचा पासून तीन किलोमीटर पुढे.


जोरात पाण्याचा प्रवाह असलेला ओढा


हा ओढा पहिल्या ओढ्या पेक्षा जास्त खतरनाक होता. गाड्यांची लाइन लागली होती.


पाण्याच्या जास्त प्रवाह मुळे मोटारसायकल वाल्याचा तोल गेला.


पतसेव पाशी एक तलाव


पतसेव- मनाली पासून १६० किलोमीटर पुढे


जिंगजिंगबार च्या चार किमी अलीकडे एक ओढा. वाहून आणलेल्या दगडामुळे रस्ता पूर्ण पणे झाकून जातो.


बारालाचा-ला वरून येणारी भागा नदी


जिंगजिंगबार पासून पुढे ६ किमी - हाच ट्रक होतं ज्यात मी माझी सायकल टाकून नेली.

(क्रमशः)

पुढील भागात जाण्यासाठी ......

प्रतिक्रिया

झकास.. आता सवडीने वाचतो. :)

भव्यदिव्य थरारक. प्रणाम.

यशोधरा's picture

3 Feb 2016 - 1:02 pm | यशोधरा

हे फोटो पाहून मला सगळे काही सोडून धोकटी पाठीला मारुन हिमालयात सुटावे असे वाटू लागले आहे!

पिलीयन रायडर's picture

3 Feb 2016 - 1:02 pm | पिलीयन रायडर

काय तो थरार.. काय ते फोटो..!!
सुरेख चालु आहे लेखमाला! आणि पटकन टाकताय पुढचे भाग म्हणुन बरं वाटलं.

जबरदस्त ''केल्याने होत आहे रे ...'' !

स्पा's picture

3 Feb 2016 - 2:25 pm | स्पा

थरारक

एक विनंती : फोटो शेवटी न टाकता लिखाणानुसार अध्ये मध्ये टाकले तर जास्त बरे पडेल :)

राजकुमार१२३४५६'s picture

3 Feb 2016 - 2:33 pm | राजकुमार१२३४५६

फोटोची संख्या खूप आहे. याच भागात ४७ फोटो आहेत. वाचताना व्यत्यय येऊ नये म्हणून फोटो शेवटी ठेवलेत. तरी पण फोटोच्या खाली Caption दिले आहेत. जेणेकरून फोटो कश्याबद्दलचा आहे ते कळेल.

वेल्लाभट's picture

3 Feb 2016 - 2:26 pm | वेल्लाभट

कडक !

प्रचेतस's picture

3 Feb 2016 - 4:40 pm | प्रचेतस

खूपच जबरदस्त.
सगळे भाग एकत्रच वाचले.
निव्वळ थरारक.

सतिश पाटील's picture

3 Feb 2016 - 5:27 pm | सतिश पाटील

मजा आली.
आठवणी जाग्या झाल्या. फोटो आणि वर्णन दोन्ही छान.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2016 - 7:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

जबरदस्त !

पहिला फोटो (गोंडला पासून दिसणारा चंद्रा च्या पलीकडचा नजारा) भयानक आवडला !

पद्मावति's picture

3 Feb 2016 - 10:44 pm | पद्मावति

अफाट!

पतन्ग's picture

4 Feb 2016 - 10:05 am | पतन्ग

जबरा!