पूर्वेच्या समुद्रात -१४

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
13 Jan 2016 - 1:13 pm

पूर्वेच्या समुद्रात- १३

पूर्वेच्या समुद्रात -१४
बायकोने चार दिवस पावसात, वीज नसताना, मुलं आजारी पडलेली घरात कामाला बाई नाही अशा परिस्थितीत कशी काढली याचा विचार करून मला फार वाईट वाटत होते. तेवढ्यात माझ्या मनात एक विचार चमकला कि मी मूळ नौदलाचा अधिकारी इथे तटरक्षक दलात काही स्वयंसेवक म्हणून अर्ज करून आलो नव्हतो त्यातून मी नौदलाच्या रुग्णालयात कामही करत होतो.असे असताना केवळ एका नियम दाखवून त्यांनी मला नौदलाच्या तळावर घर दिले नाही हा स्पष्ट अन्याय आहे. माझे डोकेच फिरले. तिरीमिरीत मी जहाजावर परत आलो आणि ExO कमांडंट विश्वकर्मा यांच्याशी बोललो. ते म्हणाले कि तुला नौदलाचे घर मिळायला पाहिजे.मी पण त्यांना म्हणालो कि आता विशाखापटणम ला गेल्यावर मी त्यांना स्पष्ट सांगणार आहे कि मला घर दिले नाहीत तर मी काही जहाजावर चढणार नाही. मग माझे कोर्ट मार्शल झाले तरी बेहत्तर आणि मी अतिशय कडक शब्दात हे सांगितले. कमांडंट विश्वकर्मा सर्द झाले. थोडा वेळ चर्चा करून मी माझ्या केबिन मध्ये परत आलो.कमांडंट विश्वकर्मानि जाऊन कमांडिंग अधिकारी यांना हे सांगितले. त्यांचे नौदलाच्या पूर्व मुख्यालयाशी बोलणे झाले कि काय ते माहिती नाही. पण त्यांनी संध्याकाळी मला आपल्या खोलीत बोलावून घेतले आणि माझी हजेरी घ्यायला सुरुवात केली. मला सुरुवातीला कळेना हे वाकड्यात का शिरत आहेत? मग मात्र मी पण कडक पवित्रा घेतला. ते म्हणाले डॉक्टर तुला नौदलाच्या राजपूत जहाजात पोस्टिंग हवे आहे का? मी म्हणालो चालेल नौदलाच्या जहाजावर गेलो कि निदान मला घर तरी मिळेल. हा बार फुसका निघाल्यावर त्यांनी विचारले कि जर तुझे निकोबार किंवा कॅम्पबल बे ला पोस्टिंग झाले तर?
आता माझ्या लक्षात आले नि याचा बोलविता धनी कोणीतरी दुसराच आहे. मी त्यांना आव्हान देऊन म्हणालो मी एक वैद्यकीय विशेषज्ञ आहे आणि माझे पोस्टिंग जेथे लष्कराचे कोणते तरी रुग्णालय आहे अशाच शहरात होऊ शकते. मी तुम्हाला आव्हान देतो कि माझे पोस्टिंग करूनच दाखवा. आणि त्यातून ते बेकायदेशीर पणे झालेच तर आंध्र उच्च न्यायालयात मी त्यावर स्टे मिळवेन. आणि ती केस निकाली लागेपर्यंत माझे जहाजाचे टेन्युअर पूर्ण होईल. असे स्पष्ट आव्हान दिल्यावर त्यांचे उसने अवसान गळून पडले आणि ते मोठ्या स्नेहाने मला विचारू लागले तुझा प्रश्न काय आहे? मी सर्व राम कहाणी त्यांना सांगितली आणि परत तेच सांगितले कि विशाखापटणम ला गेल्यावर मला घर मिळाले नाही तर मी काही जहाजावर चढणार नाही. माझे पोस्टिंग आय एन एस सरकार वर आहे आणि तेथून मी तटरक्षक दलात नियुक्तीवर आहे. मी "आय एन एस सरकार" च्या दवाखान्यात जाऊन बसेन पण जहाजावर चढणार नाही. म्हणजे मी सुटी न घेता गैरहजर नसेन( absent without leave) पण नोकरीच्या जागी गैरहजर(absent from place of duty) असेन. हा काही फार मोठा गुन्हा नाही. पण सगळी चौकशी पूर्ण होऊन त्याचा अहवाल दिल्ली पर्यंत सदर करावा लागेल यानंतर कोर्ट मार्शल होईल त्याला पण सात आठ महिने जातील. त्याचा निकाल अगदी माझ्या विरुद्ध गेला तरी मला फार तर कडक शब्दात समज(REPRIMAND) दिली जाईल.त्याने माझ्या करियर वर कोणताही परिणाम होणार नाही. १ डिसेंबर २००० रोजी मला कमांडर पदाची कालानुरूप बढती मिळणारच आहे. अर्थात कोर्ट मार्शल पूर्ण होईपर्यंत माझे टेन्युअर पूर्ण झालेले असेलच. म्हणजे मी काही जहाजावर येणार नाही.
हि सरबत्ती ऐकून कमांडिंग अधिकारी सर्द झाले. दोन मिनिटे विचार करून मला म्हणाले डॉक्टर विशाखापटणम ला गेल्यावर तुला नौदलाच्या तळावर घर मिळवून देणे याची जबाबदारी मी घेतो. हे बोलणे झाल्यावर आम्ही हस्तांदोलन केले आणि मी बाहेर आलो.
कमांडंट विश्वकर्मा बाहेर भेटले त्यांना हा वृत्तांत सांगितला ते म्हणाले डॉक्टर हे एवढं सगळं तू सी ओ ला ऐकवलंस? मी हो म्हणालो त्यावर ते म्हणाले तू "टफ" आहेस. मी फक्त हसलो.
काही दिवस असेच अंदमान च्या समुद्रात इकडे तिकडे गस्त घालत फिरलो आणि आमची परत जायची वेळ झाली होती. दोन महिने समुद्रात घरापासून दूर खवळलेल्या समुद्रात गस्त घालून सगळे जण वैतागले होते. तेवढ्यात एक संदेश आला. जहाज विशाखापणटम ऐवजी चेन्नैला यायचा हुकुम मिळाला. सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. कारण चेन्नईला तटरक्षक दलाचे मुख्यालय होते आणि तेथे गेले तर दुसरी कोणती तरी कामगिरी गळ्यात पडण्याची शक्यता होती. लोकांना घर सोडून दोन महिने होऊन गेले होते. मधल्या काळात वादळ झालेले होते आपले कुटुंब कसे असेल याची सैनिकांना कोणतीही माहिती नव्हती. पगार खिशात होता पण कुटुंबापर्यंत पोहोचवायचा होता. पोर्ट ब्लेअर वरून मनी ऑर्डर जाण्यास दोन महिने लागत असत त्यामुळे कोणीच पगार घरी पाठविलेला नव्हता. ( तेंव्हा सैनिकांना पगार रोख मिळत असे).
असो, आलीया भोगासी असावे सादर म्हणून सगळे हिरमुसल्या चेहऱ्याने तयार झाले. दोन दिवसांनी आम्ही चेन्नईला पोहोचलो. तेथे परत त्या कोळशाच्या जेट्टी वर उभे होतो. त्यावेळी तेथील तट रक्षक दलाच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी chief staff officer CSO (Personnel) आणी CSO (OPS)operations ई भेटीसाठी आले. मी बर्यापैकी वरिष्ठ दर्जाचा असल्यामुळे त्यांच्या बैठकीत मला प्रवेश होता. जहाज २ महिने समुद्रात होते तेंव्हा त्याचे तेलपाणी आणि नियतकालिक देखरेख करायची बाकी होती. त्याबद्दल चाललेली बैठक होती. तेथील वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे होते कि हि १२-१४ दिवसांची देखरेख तुम्ही चेन्नैतच उरकून परत पाल्कच्या सामुद्रधुनीत गस्त घालण्यासाठी जावे. कमांडिंग अधिकारी आणि इतर अधिकारी मूग गिळून स्वस्थ बसले होतई, वरीष्ठांसमोर तोंड कसे उघडायचे म्हणून?
मला संताप आला आणि मी त्यांना विचारले कि हि देखरेख विशाखापणटमला केली तर काय होईल? त्यावर मुख्यालयातील अभियांत्रिकी अधिकारी CSO (TECH) म्हणाला कि तसेही करता येईल. यावर कमांडिंग अधिकारी म्हणाले कि सैनिकांची येथेच राहून देखरेख करण्याची तयारी आहे. त्यांच्या बोटचेपेपणाचा मला राग आला. मी कडक शब्दात म्हणालो कि चाळीस पैकी दोन जरी सैनिक विशाखापणटम ऐवजी चेन्नईत देखरेखीला आम्ही "खुशीने" तयार आहोत असे म्हणाले तरी मी आपल्या कमिशन चा राजीनामा देईन.
मी स्पष्टपणे त्या वरिष्ठ अधिकार्यांना म्हणालो कि इथे सैनिक दोन महिन्यांपासून अंदमानच्या समुद्रात काम करीत आहेत. घराशी कोणाचा संपर्क नाही.कुटुंबाला पगार पोहोचवायचा आहे. घरी वादळानंतर काय परिस्थिती आहे हे पहायचे आहे असे असताना तुम्ही इथेच देखरेख करा कसे म्हणता? तुम्हाला सैनिकांची काळजी वाटत नाही का? मी जहाजाचा सैनिक कल्याण अधिकारी( welfare officer) सुद्धा आहे त्या नात्याने मी तुम्हाला हे सांगू इच्छितो. सुटी घेऊन किती लोकांना विशाखापणटमला पाठवणार? या ऐवजी तुमची देखरेख विशाखापणटमला करा. निदान सैनिक रोज संध्याकाळी घरी जातील. कुटुंब समवेत काळ घालवतील. त्यांची सुटी पण फुकट जाणार नाही आणि ताजे तवाने झाले कि दोन आठवड्याने जिथे कुठे पाठवायचे तिथे पाठवा.
हि सरबत्ती ऐकून ते वरिष्ठ अधिकारी सुद्धा सर्द झाले पण सुदैवाने त्यांनी माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला. आणि आम्हाला दुसर्याच दिवशी विशाखापणटमला कूच करण्याचे आदेश मिळाले. त्या बैठकीतील बोलणे आम्हाला चहापाणी देणार्या स्टेवर्डनि ऐकले होते आणि ती बातमी बाकी सैनिकापर्यंत पोहोचली. दुसर्या दिवशी प्रत्यक्ष आदेश आल्यावर मला कितीतरी तट रक्षक दलाच्या सैनिकांनी खाजगीत येउन धन्यवाद दिले. आता मी विशाखापणटमला घरासाठी होणार्या भांडणाला तयार होत होतो.
लष्करात परखडपणे सत्य मान्ड्ल्याबद्दल मला कधीही शिक्षा झाली नाही. उलट कॉर्पोरेट जगतात सत्य बोलणे हा गुन्हा समजला जातो. पराकोटीची शिस्त असली तरी लष्करात मुलकी जगता पेक्षा जास्त लोकशाही आहे.
क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

वा! नेहमीप्रमाणेच हाही भाग आवडला. शेवटचा परिच्छेद जास्तच!

होबासराव's picture

13 Jan 2016 - 1:47 pm | होबासराव

उलट कॉर्पोरेट जगतात सत्य बोलणे हा गुन्हा समजला जातो. पराकोटीची शिस्त असली तरी लष्करात मुलकी जगता पेक्षा जास्त लोकशाही आहे.

एकदम पटल
नेहमीप्रमाणेच छान लेख

अजया's picture

13 Jan 2016 - 1:50 pm | अजया

छान लेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2016 - 1:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

वाह ! मान गये उस्ताद !

पिलीयन रायडर's picture

13 Jan 2016 - 2:04 pm | पिलीयन रायडर

दबंग खरे काका!!

मला वाटतं की सत्य "कोण" सांगतय ह्यालाही महत्व आहे. तुम्ही तसेही बोलायला रोखठोक आहात. कुणाला न घाबरता सत्य मांडु शकता. पण दीन आणि मुखदुर्बळ माणसाचं सत्य कुठेही ऐकुन घेतलं जात असेल का असा प्रश्न पडतो.

मला वाटतं की सत्य सांगितलं जाण्यापेक्षाही.. "ऐकलं जाणं" महत्वाचं आहे. तुमचं ऐकुन घेतलं कारण तुम्हाला गप्प बसवणं , घाबरवणं किंवा दाबुन टाकणं अवघड होतं. हेच एखाद्या सैनिकाने मांडले असते तर ऐकले गेले असते का? (समोरचा सहकार्‍यांविषयी सहृदयतेने विचार करणारा असेल तर ऐकुन घेईलही.. पण साधारणपणे बॉस लोक ऐकुन घेत नाहीत..)

प्रसाद१९७१'s picture

13 Jan 2016 - 6:31 pm | प्रसाद१९७१

मला वाटतं की सत्य "कोण" सांगतय ह्यालाही महत्व आहे.

वा पिराताई - मी तर "कोण" सांगतय ह्या वर बर्‍याच वेळा ते सत्य आहे की नाही ते ठरवतो.

स्नेहल महेश's picture

13 Jan 2016 - 2:04 pm | स्नेहल महेश

नेहमीप्रमाणेच मस्त

मुक्त विहारि's picture

13 Jan 2016 - 2:10 pm | मुक्त विहारि

....लष्करात मुलकी जगता पेक्षा जास्त लोकशाही आहे. (२-३ नातेवाईकांकडून पण हे ऐकले आहे.)

आणि

कॉर्पोरेट जगतात सत्य बोलणे हा गुन्हा समजला जातो. (हे अनुभवले आहे...)

प्रमोद देर्देकर's picture

13 Jan 2016 - 2:10 pm | प्रमोद देर्देकर

त्यावर ते म्हणाले तू "टफ" आहेस. हे खरंच आहे. डॉ. तुस्सी ग्रेट हो.

मृत्युन्जय's picture

13 Jan 2016 - 4:06 pm | मृत्युन्जय

लष्करात परखडपणे सत्य मान्ड्ल्याबद्दल मला कधीही शिक्षा झाली नाही. उलट कॉर्पोरेट जगतात सत्य बोलणे हा गुन्हा समजला जातो. पराकोटीची शिस्त असली तरी लष्करात मुलकी जगता पेक्षा जास्त लोकशाही आहे.

जबरी. लष्कराबद्दल माहिती नाही पण कॉर्पोरेट क्षेत्राबद्दलचे तुमचे विधान १००% खरे आहे.

सुबोध खरे's picture

13 Jan 2016 - 6:02 pm | सुबोध खरे

४ वर्षे कॉर्पोरेट जगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.
त्यामुळे बडोदे ( मोठ्या) संस्थानचा दिवाण होण्यापेक्षा औंध( लहान) संस्थानचा राजा होणे पत्करले

प्रचेतस's picture

13 Jan 2016 - 4:15 pm | प्रचेतस

हा भाग पण नेहमीसारखा उच्चच.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jan 2016 - 11:08 am | अत्रुप्त आत्मा

+१
मला हे पटलं. मी आगोबाशी माझ्या मनापासून सहमत आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jan 2016 - 6:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

फारच सही!! माझी अजुन हिंमत होत नाही सुपीरियर लोकांसमोर बोलायची, महापातक केल्यागत फीलिंग येते डॉ!

विवेकपटाईत's picture

13 Jan 2016 - 8:01 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. सरकारी नौकरीत सत्य बोलता येत. जास्तीस्जास्त लोक तुम्हाला सनकी समजतील. शिवाय कोणी तुमच्याशी जास्ती पंगेहि घेणार नाही. एकच नुकसान तुम्हाला कधी फेवर हि मिळणार नाही.

पैसा's picture

13 Jan 2016 - 9:50 pm | पैसा

मस्त लिहिता आहात.

श्रीरंग_जोशी's picture

13 Jan 2016 - 10:14 pm | श्रीरंग_जोशी

अनुभवकथन आवडले. तात्पुरता वाईटपणा घेऊन स्पष्ट व परखड मत वरीष्ठांसमोर मांडण्याची तुमची वृत्ती आवडली.

कॉर्पोरेट जगतात मात्र माझा स्वतःचा अनुभव आजवर सकारात्मक आहे. कदाचित सर्विस बेस्ड कंपन्यांमध्ये (अन तेही अमेरिकेत किंवा भारतातून अमेरिकन क्लायंट्ससाठी) काम करण्यामुळे असेल. वरीष्ठांना वेळेत सत्यपरिस्थितीशी अवगत केल्यास समस्या सोडवण्यापलिकडे जाण्यापासून थांबवता येतात. असे बोलून दाखवणार्‍याचे महत्व वाढते.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jan 2016 - 9:53 am | बिपिन कार्यकर्ते

या धाग्यावर हा विषय अस्थानी होईल असं वाटलं म्हणून बोललो नव्हतो. पण हे असं कॉर्पोरेट जग आणि सैनिकी जग यांच्यात काळं पांढरं करता येणार नाही असे वाटले.

तसंही जगात काळं किंवा पांढरं काहीच नसतं. सगळंच करडं असतं, फक्त छटा बदलतात.

मी सैन्यात नव्हतो. पण सैनिकी जगाशी थोडा फार संपर्क आहे. सैनिकांमध्ये (विशेषतः नेव्हल ऑफिसर्समध्ये) बराच वावर झाला होता एके काळी. कॉर्पोरेट जगात तर मी साक्षात जगतोच आहे अनेक वर्षांपासून. त्यामुळे, शेवटची दोन तीन वाक्ये फारच विसंगत वाटली. सगळीकडे सगळ्याप्रकारची माणसे असतात, कारण इथून तिथून माणूस शेवटी तोच... तसाच. धाग्यात लिहिलेली परिस्थिती, त्यातील नौदलाचे संदर्भ काढून एखाद्या कॉर्पोरेटचे संदर्भ घातले तरी जशीच्या तशी घडू शकते, किंबहुना थोड्या फार फरकाने अशा घटना मी स्वतःही पाहिल्या आहेत. सैनिकी जगाचे अत्यंत उत्तम पैलू आहेतच, वादच नाही. पण ते ही तुमच्याआमच्यासारख्या सर्व गुणदोषयुक्तमानवांनीच बनवलेलं आहे.

बाकी, डॉक्टरसाहेबांचे अनुभव रोचकच आहेत आणि ते तब्येतीत लिहितही आहेत. वाचायला मजा येते.

सगळीकडे सगळ्याप्रकारची माणसे असतात, कारण इथून तिथून माणूस शेवटी तोच... तसाच

+१..

अनुभव घेतलेला आहे की कॉर्पोरेटमध्येही खरंच बोललं जातं. नाहीतर प्रचंड नुकसान होतं. जबाबदारी फिक्स केली जाते. खुषमस्करे लोक ओळखले जातात आणि बाजूला पडतात.

सुबोध खरे's picture

14 Jan 2016 - 1:55 pm | सुबोध खरे

बिका साहेब,
लष्करातही तीच माणसे असतात. लष्करात कडक शिस्त असते तरीही खाजगी आस्थापनात असतो तसा "हम करेसो कायदा" नसतो.शेवटी ती सरकारी नोकरी आहे. कॉर्पोरेट रुग्णालयात एक नर्सला रुग्णाशी इंग्रजी ऐवजी हिंदीत बोलल्यामुळे बडतर्फ केलेले मी पाहीले आहे. किंवा रात्री ३ वाजता मोबाईल वर गाणी लावून केवळ रिपोर्ट टंकत असल्याच्या कारणाने बडतर्फ झालेला तंत्रज्ञ पण पाहिला आहे.
सैनिक सुद्धा जन्मजात निर्भय नसतो.पहिल्यांदा समोरुन गोळ्या येत असतील तेंव्हा त्याच्या विजारीचा पण रंग बदलतो. पण त्याला प्रशिक्षणाने तसे बनवले जाते. विक्रांतवर ७ कोर्स चे जेवण( सफेद आणि तांबड्या वारुणी सकट) समोर असताना भरल्या ताटावरून उठायला आम्हा सर्वाना भाग पाडले होते हे मी एका लेखात लिहिलेले होते.
विक्रांतवरच आमच्या कमांडिंग अधिकार्याने मला एकदा सांगितले होते कि डॉक्टर तुझा सल्ला मी प्रत्येक वेळेस ऐकून घेईन पण त्यावर कारवाई करायची कि नाही हा निर्णय माझा असेल. बहुतांश वेळेस मी तसा निर्णय का घेतो आहे याचे स्पष्टीकरणहि देईन पण एखादी वेळ अशी येईल कि मी कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही आणि तुला दिलेला आदेश जसाच्या तसा पाळावा लागेल.
बाकी मूळ मनुष्यस्वभाव सगळीकडेच सारखा आहे हे मान्यच आहे . हांजी हांजी करणे, लांगुलचालन इ लष्करात सुद्धा आहेच.

रेवती's picture

14 Jan 2016 - 4:19 am | रेवती

लेखन आवडले.

शशिकांत ओक's picture

14 Jan 2016 - 11:25 am | शशिकांत ओक

सुनावल्याबद्दल सुधीर जी आपले अभिनंदन... सेनादलाच्या असे किस्से कहाण्या वाचायला फार सुंदर वाटतात.
एक मजेशीर प्रसंग आठवला. माझे एक बॉस अत्यंत खडूस म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी एकदा एका अधिकाऱ्याने काही गलथानपणा केला म्हणून त्यांच्या बॉसला मला हा माझ्या ऑफिसात नको आहे तुम्ही त्याला चपरासी म्हणून ठेवलात तरी चालेल म्हणून हाकलला होता. तेच बॉस मला एकदा माझ्या बरोबर बॉसच्या कडे चल म्हणून पुढे गेले. माझ्या सहकाऱ्याने काय पंगा झालाय. तुझीपण हकालपट्टी होणार कि काय म्हणून चिंता व्यक्त केली. मी सीइनसींच्या ऑफिसात त्यांना ांना कडक सॅल्युट केला. माझे बॉस आधीच जाऊन काही कानाफूसी करून बसलेले होते. मला मनावर दडपण की काय होणार मीही होऊन जाऊदे काय ते म्हणत वाक्यांची जुळणी करत होतो. माझे बॉस त्यांच्या बॉसना म्हणाले, हाच तो, मी आताच तुम्हाला सांगितले तो यंग ऑफिसर. हे सगळे त्यानेच केले आहे. मला विंटर युनिफॉर्म मध्ये घाम फुटला होता.
ओह ग्रेट, म्हणून मला बसायला सांगितले. आता मी अडकलो. असे वाटून मी काय केले म्हणून माझी एकदम अशी पेशगी व्हावी असा विचार करत होतो तोवर एयर मार्शल कात्रेंनी नी मला हस्तांदोलनासाठी साठी हात पुढे केला, म्हणाले बॉय कीप इट अप... चहा बिस्किटे आली मी हवाईदलाच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन व प्रॉव्हिडंड फंड आर्मीच्या ऑफीस च्या कचाट्यातून मुक्त व्हायला आम्ही केलेल्या कामाची शाबासकी द्यायला मला भेटायला बोलावले गेले असल्याचा खुलासा नंतर झाला. कधीतरी यावर खुलासेवार हवाईदलातील आठवणीत लिहीन. असो.

सस्नेह's picture

14 Jan 2016 - 12:37 pm | सस्नेह

आर्मी लाईफ आणि सिव्हील लाईफ यात मोठा फरक आहे खराच. तरीही मनुष्यस्वभाव सगळीकडे सारखाच.

टुकुल's picture

14 Jan 2016 - 6:42 pm | टुकुल

डॉक्टर.. अजुन एक मस्त अनुभव तुमच्या कडुन.. लिहित रहा पोतडी रिकामी होईस्तोवर :-)

--टुकुल

अप्पा जोगळेकर's picture

15 Jan 2016 - 2:02 pm | अप्पा जोगळेकर

लष्करात परखडपणे सत्य मान्ड्ल्याबद्दल मला कधीही शिक्षा झाली नाही. उलट कॉर्पोरेट जगतात सत्य बोलणे हा गुन्हा समजला जातो. पराकोटीची शिस्त असली तरी लष्करात मुलकी जगता पेक्षा जास्त लोकशाही आहे.

हे पटले नाही. उलट सामान्य सैनिकांच्या कल्याणासाठी वेल्फेअर ऑफिसरला भांडावे लागते याची भारतीय सेनेतील उच्चपदस्थांना (धोरण ठरवणारे) लाज वाटली पाहिजे. यांना जाब विचारणारे कोणी नाही का ?
कोर्पोरेट मध्ये कारवाईची भीती नसते. एखादा माणूस एब्स्कोण्ड झाला तर कंपनी मनगटे चावण्यापलीकडे काही करू शकत नाही.
तांत्रिक क्षेत्रात कित्येकदा नोकर आपल्या कंपन्यांना रडवतात.

कानडाऊ योगेशु's picture

18 Jan 2016 - 8:35 pm | कानडाऊ योगेशु

प्रकरण नेहेमीसारखेच वाचनीय.

बाकी डॉ. काहीही बोलले तरी ते "खरे" बोलले असेच होणार ना.
किंवा खर्याला कशाची डर... वगैरे वगैरे.
(ह.घ्या.)