पूर्वेच्या समुद्रात-३

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
10 Dec 2014 - 8:53 pm

गोवा कारवारच्या आसपास नुसते इकडून तिकडे भटकणे झाल्यावर कोची च्या दिशेने कूच केले. तालसेरी (जुने नाव तेल्लीचेरी) च्या आसपास ( मंगळूरू च्या दक्षिणेस) परत काही रडारवर तपास लागला म्हणून पहाटे आमचा मोर्चा तिकडे वळविला गेला. तेंव्हा तेथे दोन मच्छीमार नौका दिसल्या. हे सर्व वीर श्रीलंकेतून येथे आले होते. तेंव्हा त्यांना ताबडतोब थांबण्याचा इशारा दिला गेला. सवयीप्रमाणे त्यांनी पळायला सुरुवात केली. आमच्या नौकेने त्यांच्यावर मशीनगन ने थोड्या गोळ्या डागल्या तरी ते दाद देईनात. मग मोठ्या तोफेतून दोन गोळे त्यांच्या बोटीच्या पुढच्या पाण्यात डागले असता पाण्याचे मोठे कारंजे/ फवारा उडाला त्यातील एक ट्रेसर म्हणजे लाल रंगाचा धोकादर्शक गोळा होता. ते पाहून मात्र त्यांची घाबरगुंडी उडाली आणी ते आहे त्या जागी शांतपणे उभे राहिले. मी आमच्या कॅप्टनला विचारले समजा ते अजून वेगाने पळू लागले असते तर काय? कारण काही बोटींवर आजकाल स्पीडची इंजिने बसविलेली असतात. त्यावर कॅप्टन शांतपणे म्हणाले डॉक्टर आपल्या कडे हेलिकोप्टर आहे हे विसरलास काय? हेलिकोप्टर वर मिडियम मशीनगन लावून त्यांना जिथे पळतील तेथे धरता येईलच. आणी जास्तच पळायला लागले तर सरळ तोफेचे गोळे मारून बुडवून टाकू. नाहीतरी हि तोफ २५ किमी पर्यंत मारा करते त्याचा वापर कुठे होतो? असे म्हणून ते हसायला लागले. ते नंतर म्हणाले कि श्रीलंकन असले तरी काय झाले हे गरीब मच्छीमारचा आहेत. पोटासाठी येतात. तुम्ही आपली सागरी हद्दीचे रक्षण करण्यासाठी कमीत कमी जितकी शक्ती वापरावी लागते तेवढीच वापरायची. हे काही युद्ध नाही. किंवा हि माणसे काही दहशतवादी नाहीत.
मग आमच्या जहाजाने त्यांच्या जवळ येऊन त्यांची विचारपूस चालू केली. त्यांना इंग्रजी किंवा हिंदी येत नव्हते. म्हणून मग जहाजावरील एका नौसैनिकाने( बी एम कुमार म्हणून) त्यांना डोके चालवून तमिळ मध्ये काहीतरी विचारले ते त्यांना समजले. त्यांना थोडेफार तमिळ येत होते. त्यांच्याशी संवाद साधला असता ते श्रीलंकेचे आहेत आणि वाट "चुकून" ते इकडे आले असे त्यांचे म्हणणे होते. अर्थात आम्ही समजत होतो त्यापेक्षा ते जास्त बेरके होते. या सर्व प्रकारामुळे त्यांना आपल्या ताब्यात घ्यायचे ठरले. (सुरुवातीला त्यांना समज देऊन सोडून द्यावे काय असा कॅप्टन विचार करीत होते पण एकंदर त्यांच्या देह्बोलीवरून ते "साधे सरळ" वाटत नव्हते)
भर समुद्रावर दुसर्याचे जहाज ताब्यात घेणे हे एक वेगळेच काम असते. त्या लोकांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांची झडती घेऊन एका खोलीत बंद करून ठेवले जाते. मग आपले नौसैनिक त्यांच्या होडीवर पाठवले जातात होडीची कसून तपासणी केली जाते ( त्यात काही स्फोटक किंवा घातपाती द्रव्ये अथवा शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा आहे काय) त्या जहाजातील सामानाचा पंचनामा( तटरक्षक दलातील तीन अधिकारी त्यावर सह्या करतात) केला जातो आणि ती होडी मग तुमच्या जहाजाला बांधून म्हणजे त्यांना खेचत जवळच्या बंदरात नेले जाते आणि तेथे पोलिसांच्या हवाली केले जाते.
हे सर्व सोपस्कार करण्यासाठी म्हणून आमच्या जहाजात असलेली एक बोट खाली उतरवण्यास कॅप्टननि सांगितले. टायटानिक मध्ये होत्या तशा लाकडी बोटी (व्हेलर) पैकी एक बोट क्रेनने खाली उतरवायचे ठरले. ती बोट क्रेनने उचलली आणि पाण्यात सोडली तिची दिशा नित होत नव्हती म्हणून क्रेन चालवणाऱ्याने ती परत वर घेण्याचा प्रयत्न केला तर ती कुठेतरी अडकली आणि त्याचा लोखंडी दोर काडकन आवाज होऊन तुटला. तो ज्या कप्पिवरून (PULLY ) खाली गेलेला होता त्याच्यावरून प्रचंड वेगाने मागे आला आणि चाबूक जसा हवेत फटकारा मारून उलटा येतो तसा उलटा आला आणि बोटीच्या खालच्या डेकवर उभ्या असणार्या नौसैनिकाच्या डाव्या खांद्याच्या बाजुने दोन इंचावरून खाली बोटीच्या डेकवर आपटला.जहाजाच्या डेकवर ठिणग्यांचा फवारा उडाला आणि मोठा आवाज झाला. हि घटना निमिषार्धात घडली. मी आणि कॅप्टन अवाक होऊन पाहत राहिलो. हा दोर जर त्या सैनिकाच्या डोक्यावर आपटला असता तर त्याच्या शिरस्त्राणाचे सुद्धा (डोक्यासकट) तुकडे झाले असते इतका त्याचा वेग होता. आमची होडी अर्थातच पाण्यात पडली आणि तरंगू लागली होती.
यावर कॅप्टन मला म्हणाले डॉक्टर आता कळले का जहाजावर डॉक्टर कशाला पाहिजे. तू काही काम नाही म्हणून तक्रार करीत होतास पण अशा वेळेसाठीच डॉक्टर लागतो. मी कपाळावर हात मारून घेतला.
मला विक्रांतवर पाहिलेला असाच एक रुग्ण आठवला. तो शेजारच्या अंबा नावाच्या जहाजावरून आला होता. त्याच्या खांद्यावर असाच तुटलेला लोखंडी दोर आपटला होता आणि त्याचे (clavicle) कॉलर बोन तुटले आणि खांदा निखळला ( shoulder dislocation) होता. त्याचे केवळ सुदैव म्हणजे त्याच्या डाव्या हाताकडे जाणार्या रक्तवाहिन्या किंवा नसा तुटल्या नव्हत्या. मी मुंबईत समुद्रकिनारी असूनही त्याच्यासाठी फारसे काहीही करू शकत नव्हतो. त्याला केवळ एक मोठे फडके बांधून हात गळ्यात बांधून जखमेवर मलम आणी बॅडेज बांधून आणि वेदनाशामक औषधाचे इंजेक्शन देऊन मी अश्विनी रुग्णालयात भरती केले होते. इथे भर समुद्रात मला काय करता येणार होते कपाळ?बर्याच वेळेस डॉक्टरचे केवळ हजर असणे हा लोकांना एक मानसिक आधार असतो. पण डॉक्टरला आपली लायकी आणी आपला तोकडेपणा माहित असल्याने तो जास्त अस्वस्थ असतो हे मी आयुष्यात फार वेळेस पाहिलेले आहे.
अर्थात हे सर्व सांगण्याचा तो प्रसंग नव्हता आणि ती वेळहि नव्हती म्हणून मी गप्प बसलो होतो. त्या श्रीलंकेच्या मच्छीमाराना साग्रसंगीत झडती घेऊन जहाजात घेण्यात आले. मी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना नाश्ता देण्यात आला आणि एका खोलीत बंद करण्यात आले. आमचे सहा सैनिक त्यांच्या दोन होडक्यांवर चढले आणि अशी वरात आमची तटरक्षक दलाच्या beypore बेयपूर या ठाण्याकडे निघाली. तेथील तटरक्षक दलाच्या मुख्यअधिकार्याला अशा मच्छीमार नौकांना घेऊन आम्ही येत आहोत हे आधीच कळविले होते.
त्या होडक्यांमध्ये बरीच अत्याधुनिक सामुग्री होती. त्यात दोन इमर्जन्सी (rechargeable) दिवे होते. बेयपुरला पोहोचल्यावर त्या लोकांना केरळ पोलिसांकडे सुपूर्द करण्या आधी ते पोलिस निर्लज्जपणे प्रथम त्या होडक्यात शिरले आणि त्यांची पूर्ण तपासणी केली आणि वरील दोन दिवे हस्तगत केले आपल्या ब्यागेत टाकले आणि मग आमच्या कॅप्टनकडे पुढच्या कारवाईसाठी वळले. मी आणि कॅप्टन अवाक होऊन पाहत राहिलो. त्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर मी कॅप्टनला विचारले कि सर या सर्व साहित्याचा पंचनामा झालेला आहे मग हे लोक इतक्या निलाजरेपणाने सामानाची चोरी कशी करतात. कॅप्टनपण नौदलाचे असल्याने त्यांना पण हा प्रकार नवीन होता पण आमचे EXO ( executive officer) राजकुमार हे तटरक्षक दलाचे असल्याने ते यात अनुभवी होते. ते शांतपणे म्हणाले हे पोलिस हे सामान घरी घेऊन जातील आणि प्रत्यक्ष २-३ वर्षांनी खटला उभा राहील तेंव्हा मुद्देमाल म्हणून कोणतेतरी मोडके दिवे किंवा हेच दिवे पुरावा म्हणून आणून हजर करतील. ते मच्छीमार लोक काही आमचे सामान गेले म्हणून तक्रार करू शकत नाहीत. कारण खटला लांबविण्यात त्यांना कोणताही रस नाही.
क्रमशः
http://www.misalpav.com/node/29373 पूर्वेच्या समुद्रात -१
http://www.misalpav.com/node/29607 पूर्वेच्या समुद्रात -२

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

10 Dec 2014 - 10:42 pm | मुक्त विहारि

एका वेगळ्या विश्र्वाची सफर, मस्त सुरु आहे.

वाचतिये. लोखंडी दोर तुटणे भीतीदायक होते.

अर्धवटराव's picture

10 Dec 2014 - 11:13 pm | अर्धवटराव

डॉ. खरे स्टाईल :)
पुढे काय झालं ?

खटपट्या's picture

10 Dec 2014 - 11:27 pm | खटपट्या

जबरदस्त !!
खूप नवीन माहीती.

स्पंदना's picture

11 Dec 2014 - 4:32 am | स्पंदना

वाचते आहे.
डॉक्टर म्हणुन येणारी हतबलता समजली.

प्रमोद देर्देकर's picture

11 Dec 2014 - 9:10 am | प्रमोद देर्देकर

डॉक्टर साहेब कथा वाचतोय.
पुढे काय होणार यासाठी पुभाप्र.

प्रचेतस's picture

11 Dec 2014 - 9:17 am | प्रचेतस

एकसे एक अनुभव आहेत तुमच्यापाशी.

बोका-ए-आझम's picture

11 Dec 2014 - 11:02 am | बोका-ए-आझम

जबरदस्त अनुभव आणि एकदम visual लेखनशैली! पुभाप्र!

हपापाचा माल गपापा या म्हणीचे चांगले उदाहरण.

काय अनुभव हो! आणि कमालीच्या बाहेर उत्कंठावर्धक लिहिलंयत!
धन्यवाद!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2014 - 12:00 am | डॉ सुहास म्हात्रे

जबरदस्त अनुभव !

पुभाप्र.

स्वीत स्वाति's picture

12 Dec 2014 - 10:25 am | स्वीत स्वाति

आपत्कालीन व्यवस्था नसते का जहाजावर …जर एखादा अपघात झाला तर डॉक्टर फक्त जुजबी च उपाय करू शकतात एवढीच सोय असते का ?
भर समुद्रात तर कठीण स्थिती होत असणार मग तुमची ...

आधीचा आणि हा असे दोन्ही भाग वाचले... :)
आता पुढच्या भागाची प्रतिक्षा...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it
Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin'
Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'

सूड's picture

12 Dec 2014 - 3:07 pm | सूड

पुभाप्र