ज्यू असण्याचे जोखड

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in जे न देखे रवी...
6 Jan 2016 - 1:16 pm

रोज शरीराची
मशाल पेटवावीच
लागते,
इच्छा असो वा नसो
तसे फारसे
पर्यायही
उपलब्ध नसतात
मग उगाचच वाटत
राहतं
आपण नाझींच्या छळछांवणीतले
ज्यू आहोत म्हणून ......

यातनागृहे
सर्वत्रच आहेत
तक्रार करण्यात
हशील ते काय ?
जे भोगायचे ते निमुटपणे
फक्त आरश्याला सांगायचे
तेही डोळे मिटून
कारण
उघड्या डोळ्यांनी
आरसा बघवत नाही
अन
त्यात दडले नापाक
असे हे शरीर....

कत्तली, बॉम्बस्फोट
रोजच होत
असतात पण
दूरवर,
तसा संबंध येत नाही
पण उगाचच
वाटत राहतं
इथेही व्हावा
माझ्या जवळ त्यात मी असताना
तसे होत नाही
मग षंढपणा
वाढतच जातो
पेटती काडी अंतापर्यंत
हाती धरूच
शकत नाही मग
फोलपणाही जाणवतो
आपल्याला ते जमणार नाही ....

क्रूर एकांतवास
हा पाचवीला पुजलेला
तो तरी कसा !
आजूबाजूला सारेच
आहेत पण साले
मुके
कि मी बहिरा
ह्याचा शोध घेण्यातच
सारा वेळ जातो
उबग यावा असा दिवस
अन शहारे आणणारी रात्र
काट्यांवर झोपल्यासारखे
वाटते
निलाजरी झोप
डोळ्यापर्यंत येते
पण आत शिरत नाही
मग घुटमाळणा-या झोपेकडे
फक्त अनिमिष नेत्राने
बघायचे,
जमलेच तर थोडी नशा
अन चवीला वासना आणायची
घृणास्पद आहे सारे
पण चालवून घ्यायचे...

आता मी हिशोब
मांडत नाही
पण पापे नाचत असतात
अवतीभोवती
त्यांचे तळतळाट,
कोवळ्या कळ्या फुंकर
घालून उमलवल्या
त्याचे भीतीदायक आक्रोश,
कानाचे पडदे
फाडतात,
काळीज फाटत नाही
निगरगट्ट आहे ना !

मग प्रश्न पडतो
तेव्हा मी नाझी होतो?
आता मी ज्यू आहे का?
आळीपाळीने
मी दोन्हीही भूमिका
उत्तम वठवल्या आहेत
बहुतेक
नाझी असण्याची
सर्वोत्तम भूमिका होती
त्यासाठी तरी कोणी
मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे
पारितोषिक द्यायलाच
हवे !

अश्या बेशरम
विचारांनी रात्र संथ होते
दिवस ढालगज बाईसारखा
उभा राहतो
आणि मी
मानेवर पुन्हा जू घेतो
ज्यू असण्याचे ......

विजयकुमार.........
०७/१०/२०१०,मुंबई

कविता

प्रतिक्रिया

नितीनचंद्र's picture

6 Jan 2016 - 3:03 pm | नितीनचंद्र

शब्द नाहीत.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2016 - 4:12 pm | अत्रुप्त आत्मा

तुमची शब्दांवर जबरदस्त हुकूमत आहे, हे नेहमी जाणवतेच.

या रचने साठी __/\__

प्राची अश्विनी's picture

6 Jan 2016 - 5:48 pm | प्राची अश्विनी

काय अफाट सुंदर कविता आहे!

बोका-ए-आझम's picture

6 Jan 2016 - 6:14 pm | बोका-ए-आझम

एकदम चाबुक ओढलेला आहे!

जव्हेरगंज's picture

6 Jan 2016 - 8:50 pm | जव्हेरगंज

अफाट!
बेफाम!

_/\_

पैसा's picture

6 Jan 2016 - 9:04 pm | पैसा

!!

चांदणे संदीप's picture

6 Jan 2016 - 9:05 pm | चांदणे संदीप

जबरदस्त!

gsjendra's picture

14 Jan 2016 - 6:36 pm | gsjendra

वैताग वैताग वैताग

सूड's picture

14 Jan 2016 - 7:40 pm | सूड

__/\__