लकी

मीन's picture
मीन in जनातलं, मनातलं
31 Dec 2015 - 4:13 pm

आई गंऽऽ! खूप कंटाळा आलाय आज. खूप दिवस काही काम केलं नाही. कुठे बाहेर फिरायलाही गेले नाही. अश्शी एका जागी बसून आहे.
मी मुळात आळशी नाही बरं का! खूप कामसू आहे. लोकांना मदत करायला खूप आवडतं मला. कुठे काही वाईट घडलं की जशी काही मला सूचनाच मिळते. डोळ्यांसमोर लाल वर्तुळं दिसतात. कानात भोंगे वाजू लागतात. एक प्रकारचा सिक्स्थ सेन्सच म्हणा ना. मग मी अगदी धावपळ करुन लोकांच्या मदतीला जाते. आणि एक अभिमानाची गोष्ट सांगू? मी आजपर्यंत ज्यांना ज्यांना मदत केलीये, त्या सर्वांवरील संकट टळून ते अगदी सुखरुप बचावले आहेत. म्हणूनच माझे मित्र, नातेवाईक सगळेजण मला ‘लकी’ म्हणतात. माझे खूप लाड करतात. “लकी मदतीला धावली की समजा अगदी जिवावरचं संकटही टळलंच!” स्वतःबद्दल असे उद्गार ऐकले की कोणाला अभिमान नाही वाटणार!!
आता मागच्याच आठवड्यातली गोष्ट घ्या. पलीकडच्या गल्लीतल्या काकांना हार्ट अॅटॅक आला होता. मी आणि माझ्या मित्रांनी कोण धावपळ करुन त्यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोचवलं. काका वाचले आणि काकूंनी कितीवेळा आमचे आभार मानले याची गणतीच नाही.
अयाई गं..चालू झाले हे आवाज परत..भागो लकी भागो.. हायवे वरती पोचायचं आहे.लोक चांगले आहेत. स्वतःहून बाजूला होतात अ. आम्हाला रस्ता मोकळा करुन देण्यासाठी. देवा! काय हे रक्त..किती मोठा अपघात हा..करा करा..जखमींना लवकर एकत्र करा..आपल्याला घाई करायला हवी..
हे मी काय ऐकतीये..लोक वाचणार नाहीत? अत्यवस्थ आहेत आणि ट्रीटमेंटला उशीर झालाय ? नाही नाही..मी असं नाही होऊ देणार. मी लकी आहे. मी सगळ्यांना वाचवेन. माझं नाव खराब नाही होऊ देणार. सार्थ ठरवेन. काळ्जी करु नका. मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोचवण्यासाठीच धावतीये. जिवाच्या कराराने धावतीये. माझ्या डोळ्यांदेखत मी तुम्हाला मरु देणार नाही.
आऽऽऽऽ हे कसले आवाज ? डोळ्यांपुढे लाल दिवे दिसतायेत . आजूबाजूला वाजणारे सायरन कानात घुमतायेत. नक्कीच काहीतरी वाईट झालंय. तेवाढ्यात आरडाओरडा सुरू झाला..

लकी अॅम्ब्युलन्सला अपघात झाला रेऽऽऽ

कथालेख

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

31 Dec 2015 - 4:19 pm | कविता१९७८

मस्त