[ या आधीचा भाग: www.misalpav.com/node/33741 . तशी ती ही एक स्वतंत्र कथा होती आणि ही पण स्वतंत्र आहे. ]
________________________________________________________________________
टिपूर टिपूर चांदणं वढ्यामधी पडलयं. गढाळल्यालं पाणी खळबळ करुन वाहतयं. केक्ताडात बसून सुभान्या वगळीकडं बघतोय.सुताराचं म्हातारं वाट तुडवतं उतरणीला लागतं. पिशवी घीऊन जवा सुभान्यापशी येतं तवा हातातलं पुडकं त्येच्या हवाली करतं. भर अंधारात चिलीम जळत राहते. सुभान्या अंधारच पिऊन टाकतो. नशेत ऊठून चालत चालत सुभान्या भैरुबाच्या टेकाडावर येतो. आन उतरंडीवर घसरत मसणात जातो.
मृतात्मे हात वर करुन मातीतून उठतात. स्मशानाच्या एका टोकाला ताजं प्रेत जळत असतं. एकटंच. झुंझार वाऱ्यात लाकडं पेटतात. ढसाढसा. निखारा! एक निखारा ऊचलून सुभान्या पुन्हा चिलीम पेटवत सुटतो. आपलं एकेक दु:ख त्या ठिणग्यांच्या हवाली करत बसतो.
°°°
"पाखरु माजावर आल्यालं दिसतयं" दाढीवरनं हात फिरवत बाळू जवा सुभान्याला म्हणाला हुता तवा सुभान्या गपगार पडला हुता. समोरच्या झोपडीतला दिवा अजून जळतच होता. आन आलिकडच्या फाट्यावर 'राजदूत'वर बसलेला बाळू सुभान्याला सांगत हुता. आधनं मधनं गाठ पडायची. संध्याकाळच्या वक्ताला तर हमखास. सुभान्या गावातनं घरी जाताना, राजदूतवर म्हागं किटली बांधून बाळ्या दूध घालाय चाल्लेला आसायचा. आज पण अशीच गाठ पडली हुती.
"व्हय भाऊ, माजावर आलंय खरं, पण नागीन हाय ती. डसल" सुभान्या सावध बोलला. त्याला नस्तं लचांड म्हागं नगू हुतं.
"एकदा डाव टाकायलाच पायजेल गड्या, जिरवतुच यकांदिशी" किक मारत बाळू बोलला. सुभान्या नुसताच "बरं" म्हणून खिदळला. बाळू जवा वाटंला लागला तवा सुभान्या झपाझप चालू लागला. आज त्याला झोपडीकडं जायची हिंमत नाही. त्या रातीपासून तो तिकडं फिरकला पण नव्हता. घरी यीवून त्यानं अडगळीचं पोतं भाईर काढलं. आतली भांडीकुंडी चापचून बघीतली. डब्यावरचं नाव त्यानं बारीक नजरेनं वाचलं. 'सौ. शिंदुबाई रामचंद्र मोरे' पुढं तारीख पण लिहीली होती. सुभान्यानं नावावरनं हलकासा हात फिरवला. हे नाव बदलून 'सौ. शिंदुबाई सुभानराव डोरले" कसं करावं याचा विचार करत तसाच बसून राहिला. नाद वाईट. सुभान्या चक्रम. शिंद्रीसारख्या नागीनीचं विष त्याला बाधलं हुतं. घरी आईबाप हाईत याचा त्याला कधीच विसर पडला हुता. आन या पेताड्याला पोरगी तर कोण देनार. तिशी ओलांडुन गेली तरी आजून उजवला नव्हता.
जेवण करुन सुभान्या सतरंजीवर पसरला.
°°°
शिंद्री यायची कधीकधी मळ्यावर. भाईर जास्त दिसायचीच न्हाय. बहुतेक घरातच असायची. कवाडं लावून झोपायची. वळचणीला म्हातारी इकटीच बसून राहायची. तिचा नवरा छकडा. जोगत्या. दिवसदिवस पत्त्या नसायचा.
सुभान्या नजर ठिवून आसायचा. शिंद्री जवा मळ्यात यायची तवा तिला गाठायचा. त्यादिवशी पण गाठलीच.
"हात सुदा लाव नकू मला"
"का गं?"
"आजून माजं काम न्हाय क्येलं त्वा"
"साधं काम हाय वय ती, आखणी कराय लागती, लय डोकं चालवाय लागतं, तवस्तर यक डाव..."
"यकदा सांगितलं ना, हात लाव नगू"
"बासका शिंद्रे, येवढ्या लवकर रंग दाखवचील वाटलं नव्हतं, आता मीच हाय तुला"
शिंद्री तरातरा घराकडं निघून गेली.
"वाटूळं झालं गं माह्या पोराचं" वळचणीला बसून म्हातारी यीवळायची. तिला काय म्हाईतच नव्हतं असं नाही. कधी कधी समजून ऊमजून डोळेझाक करायची. कधीकधी तासतासभर ईकटीच यीवळत बसायची. म्हातारं गेल्यापस्नं हे अजूनच वाढलं. घरात बसून शिंद्रीला सगळं ऐकावं लागायचं. मधूनच एखादा शब्द उफारटा टाकायची. रामा! तिचा नवरा रामचंद्र, तिला ओल्या फोकानं बडवून काढायचा. संध्याकाळी म्हातारीचं यीवाळणं, राम्याचं बडवणं सुरु झालं की शिंद्री जोरजोरात टाहो फोडायची. शिव्या घालायची. नवऱ्याला तोंडावर 'बुळा' म्हणायची. राम्याला अजूनच जोर चढायचा. रात्र आपले गहीरे रंग दाखवायची. शेतातल्या त्या एकट्या झोपड्यात हा प्रकार नेहमी चालायचा. शिंद्री आता या सगळ्याच सरावून गेली हुती. कधी कधी नवऱ्यालापण मारायची. एक दिशी गरम 'तवा'च त्याला फेकून घातलेला. तवापस्नं रामापण शांत आलता. म्हातारीचं यीवाळणं काय थांबलं न्हाय.
°°°
ऊन्हाचं आंग नुसतं भाजून निघत हुतं. बांधावर चिचंच्या झाडाखाली सुभान्या टावेल हातरुन पसरला. तसा तो दिवसभर नुसताच भटकायचा. धर्मशाळेत पत्ते कुटायचा. बारीला जायचा. दत्ताच्या देवळाम्हागं म्हाताऱ्या कोताऱ्यात गांजा फुकायचा. कटाळा आला कि मळ्यात यीवून चिचंखाली झोपायचा.
गदागदा हालवून त्याला ऊठवलं तवा बाळू त्याच्यापुढं बसला हुता.
"हा, काढ गायछाप, पार सगळा ऊस पालथा घातला, पर डाव काय हूईना गड्या"
"भाऊ, नाद सोडा गड्या तिचा, न्हाय शानी बाय ती" सुभान्या डोळं चोळत ऊठून बसला.
"आरं आशी पाखरं रोज न्हायती घावत" बाळू तंबाखू चोळत बसला. हे एक नवंच लचांड म्हागं लागलेलं. बाळू तसा वजनदार घराण्यातला. बायको, दोन पोरं कौलारु घर असूनपण त्याचा मुळचा रंगेल स्वभाव पाखरं शोधत फिरायचा. सुभान्यानं त्येला कवाच वळखलं हुतं. पण गबऱ्या माणसाबरुबर पंगा घ्यायची त्याची ताकद नव्हती. त्यात त्यजे हात आधीच दगडाखाली दाबले गेलेले. बाळू एकेकाळचा जिगरी दोस्त. दोघंही कधीकधी लांबलांबच्या लग्नाला जायची. हाळदीच्या दिवशी मुक्काम ठोकायची. आन रातचं ऊठून घरफोड्या करत सुटायची. सशस्त्र दरोडेखोर म्हणून दोघंबी बदनाम. घराबाराला रक्तबंबाळ होस्तर मारायची. पण खून कधीच पाडला नव्हता. तसा नियमच होता. जो सुभान्यानं त्या राती मोडला.
सुभान्या आजकाल गपगप राहायला लागला. हा बाळ्याला आपलं नवं झेंगाट कळता कामा नये म्हणून धडपडत होता. पण बाळ्या वास काढत त्याच्यापतूर पोचलाच.
संध्याकाळी सुभान्या जवा झोपड्याकडं गेला तवा शिंद्री वट्यावर भांडी घासत बसली हुती. घराम्हागं सुभान्या जोधळ्यात शिरला. पाठोपाठ शिंद्रीपण आली.
"आरं राजा, कशाला यीतुय सारखा हिकडं?, गावात कुणाला कळलं तर फासावर देत्याली"
"न्हाय कळत, मला करमतच न्हाय तुज्याशीवी"
"कामाचं कुठवर आलयं?"
सुभान्यानं तिला एक खानदिशी कानफटात वाजवली.
"सारखं सारखं काय गं काम? दुसरं बी कायतरी बोलत जा की, आपण न्हाय आता वाईटवंगाळ काम करणार" सुभान्याच्या डोळ्यात आग हुती. शिंद्री हाबकून त्याच्याकडं बघतचं राहिली. पाणी डोक्यावरनं चाललयं. त्या राती शिंद्रीची विचारचक्रं वेगानं फिरली.
°°°
बाळू भेटतच राहिला. माळावर कुसळं पिंजत राहिला. सुभान्यासंग मिळून त्यानं एकदा घोरपडपण पकडली. घरी यीवून कापून फक्कड कालवन पण केलं. त्या राती सुभान्या बाळूकडं जेवला. दोघांनाबी जुने दिवस आठवले. कधीकधी दोघंबी बाजारात फिरायची. धर्मशाळेत सुखदेवला बेदम मारहाणपण केली. ढाब्यावर ऊधारीची जेवणंपण केली. एका ट्रकला भररस्त्यात अडवून लूटमारपण केली. निब्बर गड्यांचे भरीव दिवस पुन्हा सुरु झाले. कित्येक बाया त्यांनी ठोकल्या, पण सगळ्याच छिनाल. शिंद्रीसारखी नागीण आता दोघांच्याही मनात भरलेली. रात रात बाळ्या जोंधळ्यात फिरायचा. सुभान्या मुग गिळून गप्प राहायचा.
गावजत्रंत मशाली पेटल्या. छबिन्यात देवळाम्हागंचं लेझीम खेळण्यात बाळू चूर झाला. चौथऱ्याकडं नजर टाकून बेफान नाचू लागला. रंगात आलेलं लेझीम बघत शिंद्री बराच वेळ ऊभी होती. खुदकन गालात हसत म्होरचा विचार करायला लागली.
°°°
ह्यो संगम तृप्तीचा हाय. वाट आवघड हाय खरी, पण चाललं तर पायजेच ना. भलेभले गेले या वाटेवरुन. बदनामीच्या पांघरुनात झरुन. धडकी भरते काळजात पहिलं पाऊल टाकताना. नेहमीच. ह्या बोचऱ्या थंडीत, घनघोर काळोखात जाताना एक अनाम हूरहूर लागून राहते. सावज जाळ्यात आडकलंय खरं पण त्याला जास्त खेळवण्यात मज्जा नाय. ते दिवस राहिले नाहीत आता. आता आपणंच उगंउगं सावज झाल्यासारखं वाटून घ्यायचं. शिकार मात्र साधतचं राहायची. सावज बनून शिकार करण्यातला आनंद जगावेगळा. आधी नाही का कित्येक शिकाऱ्यांनी सावज बनून आपलीच शिकार केली. त्या चालबाज शिकाऱ्यांचे सावज होण्यातही एक नशा होती. आणि आता हे मुरलेलं सावज बघुया किती शिकारी करतयं.
शिंद्री चालतचं राहते. पांदीची वाट वाकडी करुन खूणेच्या झाडापशी पोचते. उघडाबंब बाळू सावज बनून तिची कधीपासून वाट बघतोय.
°°°
स्मशानात प्रेत जळत राहतं. रात्रभर. सुभान्या मातीत पसरलाय. आजपण. त्याच्या हातनं आक्रीत घडलं हुतं. दुपारी म्हातारी जवा ओढ्याकाठी धुणं धूत हुती तवा तिला त्यानं म्हागनं अलगद धक्का दिला. आज दुसरं काम फत्ते झालं. नवखा शिकारी नकळत जाळ्यात अडकला. म्हातारीच्या चितेशेजारी फुफाट्यात झोपला. फाट्यावर बाळूच्या डोक्यात सुभान्याचा काटा शिजत चालला. आज शिंद्री धाय मोकलून रडली. घरी रजईच्या पांघरुनात ऊत्तान झोपली.
°°°
प्रतिक्रिया
6 Dec 2015 - 5:08 pm | चांदणे संदीप
जब्राट!
6 Dec 2015 - 5:47 pm | DEADPOOL
GREAT!
6 Dec 2015 - 6:13 pm | टवाळ कार्टा
भारी
6 Dec 2015 - 6:21 pm | एक एकटा एकटाच
मस्त
चाबुक
6 Dec 2015 - 8:07 pm | आनंद कांबीकर
तिसरा भाग पण तुमच्या डोक्यात दिसतोय. लवकर टाका.
6 Dec 2015 - 8:30 pm | जव्हेरगंज
येस,
आहे खरा, पण येईलच असे नाही. बघू कसं जमतयं ते...
7 Dec 2015 - 1:14 am | चाणक्य
झकास जमतीये. बाकी शिंद्री लय बाराचीये ओ.
7 Dec 2015 - 9:19 am | प्रचेतस
लैच भारी.
7 Dec 2015 - 9:51 am | बोका-ए-आझम
जव्हेरभौ! पण अजून ही कथा संपलेली नाही!पुभाप्र!
7 Dec 2015 - 9:58 am | बाबा योगिराज
_____/\_____
भेष्ट. आवड्यास. पुभाप्र. तीसरा भाग बी येऊ द्या....
7 Dec 2015 - 1:17 pm | रातराणी
एक नंबर! कथासंग्रहाच सिरीयसली मनावर घ्या!
7 Dec 2015 - 2:46 pm | नाखु
अगदी झपाटून टाकतोय जव्हेरभाऊ....
पुभाप्र
7 Dec 2015 - 2:58 pm | नाव आडनाव
मस्त.
7 Dec 2015 - 4:48 pm | जव्हेरगंज
7 Dec 2015 - 7:40 pm | अभ्या..
जव्हेर भाऊ हे नाय चालायचं आं.
आपला काय करार होता? चित्रं म्या टाकायची अन भारी भारी लिखाण तुम्ही करायचं.
मग?
असा मोडायचा नाही करार. म्या पण लिव्हायला चालू करीन मग.
7 Dec 2015 - 7:48 pm | जव्हेरगंज
हा हा हा!
चित्रं ऊधारीवर आनलीत हो..
म्या पण लिव्हायला चालू करीन मग.>>>>>> वाट बघतोय मालक! येऊंद्या!
7 Dec 2015 - 5:39 pm | उगा काहितरीच
झक्कास ! जव्हेरभाऊ बॅक इन फॉर्म ...
11 Dec 2015 - 9:47 am | अभिजीत अवलिया
झकास.
11 Dec 2015 - 10:41 am | प्रमोद देर्देकर
कथा आवडली. पुभाप्र.
11 Dec 2015 - 11:51 am | प्रास
मस्त कथा. झकास वातावरण निर्मिती....