शिंद्री

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
19 Nov 2015 - 9:08 pm

वाजत गाजत छबिना भाईर आला. तालासुरात अगडबंब ढोल बडवले जाऊ लागले. गुरवानं आईराजाचा जोरदार ऊदोऊदो केला. एका हातानं घंटी वाजवत आन दुसऱ्या हातात पंचारतीचं ताट घीऊन गुरव एकएक पाऊल पुढे टाकत चालला. एवढ्या गर्दीत कोपऱ्या कोपऱ्यातनं कुणाच्याना कुणाच्या अंगात यीव लागलं. हाताची घट्ट तिढी मारुन डोळं गच्च मिटुन नानाप्रकारे थयाथया नाचत गुरवाच्या पुढं ते भर अंधारात जाऊ लागले. त्यांनी ना दगड बघीतला ना धोंडा. आप्तगण त्यांच्यावर फुलं ऊधळत ऊदोऊदो करत राहीले.

पालखी जेव्हा पायऱ्यांवरुन खाली मोकळ्या पटांगणात आली तवा आधीच जाळावर शेकलेल्या हलग्या तडातडा बडवल्या जाऊ लागल्या. गोल रिंगाण करुन माणसं बत्तीच्या उजेडात लेझीम खेळायला तयार झाली. सुभान्या तर सायकलीचा टायर जाळत मधोमध ऊभा होता. हुक्की आली की तो पळतच रिंगणात एक गोल चक्कर टाकायचा. हातातला टायर गरागरा फिरवुन पुन्हा मधी यीवुन ऊभा राहायचा. लोकं वरडायची, पण आर्धी बाटली कुरी रिचवलेल्या सुभान्याला त्यांचं जरासुदीक भान नव्हतं.

गावातल्या पोरी ठोरी, बायका नटुन थठुन छबिना बघायल्या आलत्या. ओढ्याच्या पलिकडं दारुकाम पण सुरु झालं. आभाळ नुसतं तोफांच्या ठिणग्यांनी भरुन गेलं. देवळाच्या कडंनं छबिना गोलगोल फिरत राहिला. जसा टायर संपत आला तसा सुभान्या गर्दीतनं वाट काढत डिकमळीपशी यीवुन ऊभा राहीला. तिथनंबी काय दिसना, मग सरळ डिकमळीवर चढला. अंधारात नीट त्यानं सगळ्या गर्दीवर नजर फिरवली. शिंद्री कमरंवर हात ठिवुन लेझीम बघत ऊभी होती. सुभान्या बराच वेळ पाठमोऱ्या शिंद्रीकडं बघत तसाच बसुन राहिला.

°°°°°°°°°

भटकतं भुतं माळावर हिंडतयं. रेताडात पाय घासत रगात ठिबकत चालतयं. संवदडीची म्हैस हंबारते. बोटं कानात घालुन सुभान्या काळोखात फिरतोय. सळसळ करत ऊसातनं वारा पळतोय. गावोगावचं फरारी ह्यातचं निपजतात. चालुन चालुन दमल्यावर सुभान्या एका बुंध्यावर बसला.
दुरवरच्या झोपडीत त्याला एक दिवा मिनमिनताना दिसला.

सुभान्यानं पिशवीतली हत्यारं तपासली. कापडात गुंडाळलेलं जंब्या खुरपं, पोतं, बँटरी, बरच सामानसुमान त्यात ठिवलेलं. येवढ्या रात्रीचा गारठा अंगाला चांगलाच झोंबत होता. बसल्या बसल्याच त्यानं बार भरला. आन एखाद्या वाट चुकलेल्या पाहुण्यासारखा त्या झोपडीकडं झपाझप चालू लागला. मिनमिनता दिवा वाऱ्यानं कधीच विझुन गेला.
जवळ जाऊन त्यानं आधी कानोसा घेतला. कुत्रं नव्हतचं. गोठ्यातला एक बैल त्याच्या टवकारुन बघत होता. वळचणीला बाजंवर एक म्हातारं झोपलं होतं. कडबा खाऊन रवंथ करणाऱ्या गुरांच्या गळ्यातली घंटीची किणकीण सोडली तर सगळी सामसुम होती.

मग खाली वाकत वाकत सुभाण्या घरामागं आला. भिताडाच्या जवळ खाली मातीत मांडी घालुन बसला. एक मोठा दगड घेऊन भिताडावर एक जोरदार प्रहार केला. 'धप्प' आवाजानं भिंत हादरली. पण आत घरात कुठलीच हालचाल जाणवली नाही. मग सुभ्यानं जंब्या खुरपं काढुन भिंत पोखरायला सुरु केली. बारीकसारीक दगडगोटे काढत हळुहळू भिताड पोखरलं जाऊ लागलं. बाजंवरचं म्हातारं तारस्वरात घोरायला लागलं. मधुनच घोरणं थांबवत घसा खरखरत थुकायचं. तवा सुभान्याचा जीव खालीवर व्हायचा. काळोखात चिलटांनी त्याचं हातपाय फोडुन काढलं, पण सुभान्याला त्याची फिकीर नव्हती.

माती बाजुला सारुन त्यानं भिताडाला बऱ्यापैकी मोठं भगदाड पाडलं. अंधारात सरपटत तो कसाबसा आत शिरला. आत आल्यावर त्यानं सावध ईकडंतिकडं नजर फिरवली. त्याचा अंदाज बरोबर ठरला. ती सैपाकाचीच खोली होती. फळीवरची भलीमोठी पिंप त्यानं हातानं चापचुन भगदाडाच्या भाईर काढुन मातीत रुतवली. मग घागर, कळशी, पितळचा शेवगा, कढई, पराती, वाट्या एक एक करत त्यानं सगळं पोत्यात भराय सुरुवात केली. जवा सुभान्या पोतं घीऊन भाईर आला तवा घरात औषधाला पण भांड ऊरलं नव्हतं.
सुभ्यानं आळस देत हात वर केले. भिरभिरत आलेला एक दगड खपकन त्याच्या पेकाटात बसला. चपळाईनं पिशवीतलं जंब्या खुरपं हातात घेत सुभान्या म्हाताऱ्यावर चाल करुन गेला. गोठ्यातली जनावरं सैरावैरा झाली. काळोखात खुरपं घुमवत सुभ्यानं चारपाच वार केलं. म्हातारं निपचित खाली पडलं. आज हे आक्रीतच घडलं.

तरीपण थरथरत खांद्यावर पोतं आन एका हातात टिप घीऊन सुभान्या ऊसातनं, मक्यातनं, जोंधळ्यातनं चालत राहीला. जवा घरी आला तवा पहाट झाली होती. दार ऊघडच होतं. पोतं अडगळीत टाकुन सुभान्या सतरंजीवर पसरला. पार दुपारपर्यंत झोपला. ते पोतं तिथंच राहणार होतं किमान चारपाच महिने तरी.

°°°°°°°°°

डिकमळीवरुन खाली ऊडी टाकुन वाट काढत सुभान्या देवळाम्हागं चौथऱ्यापशी जाऊन अंधारात ऊभा राहिला. एकाएकी शिंद्रीची नजर त्याच्याकडे वळली. सुभान्या थोडा बिचाकला. शिंद्री शांतपणे त्याच्याकडे आली. आयुष्यात आजपर्यंत सुभाण्या येवढा कधीच गारठला नव्हता.
"एक डाव माफी, त्या राती लय मोठी चुक झाली" खाली मान घालुन सुभान्या पुटपुटला.
"आलीकडच्या खोलीत म्या घंटण काढुन ठिवलं हुतं, सोनंनाणं बी हुतं, तू नुसतीच भांडी घीऊन गेला" तिनं जाब विचारला
"तुच मनली हुती, पळुन लगीन करायचं तर आधी भांडीकुंडी, सोनंनाणं तुच आणणार हुती मागनं"

"आता काय दिवस शांत बस, सासरा तर आयताच खपला पण आता सासुला बी बघ कायतरी, मग मी ईकटी घराची राणी आन तु राजा" हवापाण्याच्या गप्पा कराव्या ईतक्या सहज शिंद्री बोलुन गेली.
"आन नवरा?" दरदरुन घाम फुटलेला सुभान्या कसाबसा बोलला.
"त्यो आसुन नसल्यासारखा हाय, नेबळट, त्यला मी बघती, तू म्हातारीच्या तयारीला लाग"
काहिच न सुचून गर्दीत सुभान्या वाट काढत निघुन गेला.
जसं पाहिजे होतं त्यापेक्षा काकणभर जास्तच मिळालं होतं. आता या सुभान्याचा काटा कसा काढावा याचा विचार करत शिंद्री रंगात आलेलं लेझीम बघत कितीतरी वेळ ऊभी होती.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

19 Nov 2015 - 9:15 pm | टवाळ कार्टा

शेवट समजला नाही

तात्या's picture

20 Nov 2015 - 4:46 pm | तात्या

(शिंद्री + सासू + सासरा + नवरा ) / सुभान्या

(सुभान्या + शिंद्री )- (सासू + सासरा + नवरा)

शिंद्री - सुभान्या

शिंद्री = एकटीच राणी

जव्हेरगंज's picture

20 Nov 2015 - 6:26 pm | जव्हेरगंज

भारी हिशोब मांडलाय!
__/\__

मांत्रिक's picture

19 Nov 2015 - 9:51 pm | मांत्रिक

जव्हेरगंज! कथा खत्तरनाक रंगवल्यास. पण काहीतरी गंडलंय. राग मानू नकोस. पण कथा खरेच लक्षात येईना. कदाचित माझी चूक असेल. पण जे लिहिलंयस ना, शप्पथ! भयानक काटा फोडतंय वाचताना.

जव्हेरगंज's picture

19 Nov 2015 - 10:02 pm | जव्हेरगंज

कथा क्रमशः आहे. या भागात काहीच नाही समजनार. पुढच्या भागात हळुहळू ऊलगडा होईल!!
:)

मांत्रिक's picture

19 Nov 2015 - 10:05 pm | मांत्रिक

ओके पण भयाण खतरा लिहिलंयस हे नमूद करतो.
कीप इट अप!

बाबा योगिराज's picture

19 Nov 2015 - 10:00 pm | बाबा योगिराज

वा वा वा....!
पुलडा भाग लवकर पाइज्येल....!

एक नंबर जव्हेरभाऊ. क्रमशःचा रोग जडवून घेऊ नका!

(आणि कथासंग्रह प्रसिद्ध करायचं बघा जरा.)

जव्हेरगंज's picture

20 Nov 2015 - 6:25 pm | जव्हेरगंज

धन्यवाद हो!
संग्रह होण्याइतपत चांगल्या कथा आधी लिहुन काढतो. मग बघतो काय होतय का!
:)

रातराणी's picture

20 Nov 2015 - 12:25 am | रातराणी

जबरदस्त ! पुभालटा.

प्रमोद देर्देकर's picture

20 Nov 2015 - 10:29 am | प्रमोद देर्देकर

अंधारात सरपटत तो कसाबसा आत शिरला. हे जर खरंय तर मग लगेच फळीवरची भलीमोठी पिंप त्यानं हातानं चापचुन भगदाडाच्या भाईर काढुन मातीत रुतवली. मग घागर, कळशी, पितळचा शेवगा, कढई, पराती, हे कसे शक्य आहे. काही तरी चुकते आहे.

जव्हेरगंज's picture

20 Nov 2015 - 6:22 pm | जव्हेरगंज

त्या खटपटीत त्यानं भगदाड पण मोठ्ठं केलं!

जव्हेरगंज's picture

20 Nov 2015 - 12:21 pm | जव्हेरगंज

धन्यवाद
कथा बदलुन संपुर्ण पेस्ट केली आहे
[आता क्रमशः नाहिये]

आतिवास's picture

20 Nov 2015 - 8:03 pm | आतिवास

कथा प्रकाशित करतानाच थोडा जास्त वेळ घेऊन, योग्य ते बदल करून मगच प्रकाशित केल्यास माझ्यासारख्या वाचकांची सोय होईल.

पुढच्या कथेत एकदा ती प्रकाशित केल्यावर कृपया काही बदल करू नका ही विनंती.

जव्हेरगंज's picture

20 Nov 2015 - 8:12 pm | जव्हेरगंज

तुमचं बरोबर आहे!
(मी जरा घाईच करतो) आता मात्रं हे लक्षात ठेवीन!!!!
रसभंग झाल्याबद्दल दिलगीर आहे.

जव्हेरगंज's picture

20 Nov 2015 - 8:12 pm | जव्हेरगंज

तुमचं बरोबर आहे!
(मी जरा घाईच करतो) आता मात्रं हे लक्षात ठेवीन!!!!
रसभंग झाल्याबद्दल दिलगीर आहे.

उगा काहितरीच's picture

20 Nov 2015 - 5:35 pm | उगा काहितरीच

आवडली.

आनंद कांबीकर's picture

20 Nov 2015 - 5:36 pm | आनंद कांबीकर

झक्कास.

एक एकटा एकटाच's picture

20 Nov 2015 - 7:46 pm | एक एकटा एकटाच

जबरदस्त

पण कथेत क्रमश: नको