राम राम मंडळी, दिवाळीचा फराळ आणि आपला दिवाळी अंक वाचता वाचता काही तरी प्रयोग करण्याचा विचार आला. सुट्ट्या चालु आहेत तेव्हा गोदावरीच्या नदी पात्रात गळाला काही मासे लागतात का हा प्रयत्न करुन पाहिला. फिशिंग रॉड विकत घेतला. सोबत आर्टीफिशियल मासे, नायलॉनची बारीक दोरी अशा लवाजम्यासहित आम्ही गोदाकाठी पोहचलो. गेली दोन दिवसापासून जिथे जिथे मासे लागण्याची शक्यता होती अशी सर्व ठिकाणी पालथी घातली पण आम्हाला काही मासे लागले नाहीत. मासे पकडणे ही एक कला आहे. नदीपात्रातील खोलगट भाग, दिवसातील काही ठराविक वेळा, गळाला आर्टिफिशियल मासे लावणे, किंवा नुसत्या गळाला मासे आकर्षित व्हावेत म्हणुन शिदोड, किंवा घुगी (बोली भाषेतील शब्द) चिखलात पंख असेलेली अळी लावण्याच्या पद्धती, गर्दीची ठिकाणं टाळावीत, शेवाळ आणि तत्सम ठिकाणं नको, किंवा काही काही विशेष पद्धतील कोणा जाणकाराला माहित असतील तर ते सांगतील म्हणुन मिपाकरांकडे मदतीचा धागा काढावा वाटला.
युट्युबवर बरेचसे व्हिडियो पाहिलेत, गुगलुन पाहिलं पण ठोस अशी काही माहिती मिळाली नाही. बाईंग अ फिशींग रॉड फॉर माय ग्रँड फादर नावाचं पुस्तक सापडलं पण मंडळी प्रत्यक्षात मासे पकडावेत कसे हे काही जमलं नाही. आता नदीत मासेच नसतील तर गळाला मासे लागणार नाहीत ही गोष्ट मान्य आहे. गोड्या पाण्यात आणि समुद्रात मासेमारी करतांनाचा काही फरक, काही युक्त्या माहिती असतील तर सांगाल अशी अपेक्षा. कोणी म्हणालं गळाला उकडलेल्या गव्हाच्या पीठाची गोळी करुन लावा. कोणी म्हणालं बारीक माशांची पिलं लावा, कोणी म्हणालं गर्दीची ठिकाणं नसावी, आपल्यापैकी कोणी हौशी मिपाकरांनी मासे पकडण्याचे प्रयोग करुन पाहिले असतील किंवा या विषयातील कोणी तज्ञ मंडळी असतील तर त्यांनी योग्य मार्गदर्शन करावे म्हणुन हा प्रपंच.
फिशिंग रॉड.
आर्टिफिशीयल मासे (गळ)
प्रा.डॉ. आणि बंधु. इथे नै तर तिथे तरी मासे लागतील (चर्चा )
हताश प्रा.डॉ. आणि बंधु. :(
प्रतिक्रिया
16 Nov 2015 - 11:03 pm | गवि
ओ डीबीसर, पाखरांची शिकार सोडून मासळीच्यामागे काहून आणि कधीपासून लागलात?
16 Nov 2015 - 11:13 pm | प्रचेतस
मासळी म्हणजे पाण्यातली पाखरं असं आमचे एक सभ्य मित्र नेहमीच म्हणतात म्हणे.
16 Nov 2015 - 11:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गविशेठ, कोण्या गावचं आलेलं पाखरु असु देत किंवा मासळी.... मागे मागे गेलात की मेलात. ;)
जिंदगी भर कोई साथ नही देता यह जान लिया हमने
लोग तो तब याद करते है जब वह खुद अकेले हो...!
पेक्षा हे बरं आहे ना ?
-दिलीप बिरुटे
16 Nov 2015 - 11:11 pm | दिवाकर कुलकर्णी
आमच्या रंकाळ्यात या तंत्रानच मासे पकडतात,आणि त्याना मिळतातहि.
मासळीच्या तंत्रज्ञानाबद्दल मात्र अनभिज्ञ आहे.
16 Nov 2015 - 11:12 pm | अन्नू
आंम्ही साध्या स्टीलच्या छोट्याशा काट्याने तासात सात मासे पकडले होते! तेही विदाऊट काठी- फक्त तंगसाच्या जोरावर!
है- फिरवायचा काटा कि टाकायचा पाण्यात! ;)
बाकी तुमचं चालू द्या..
17 Nov 2015 - 12:04 am | शब्दबम्बाळ
तुम्ही ते फ़ेविस्टिक घेऊन गेला होतात का बरोबर?? :D
औन्न, रंड, मून,नाल....
17 Nov 2015 - 12:34 am | अन्नू
नाही हो- नुसतं चपातीचं पिठ होतं, आमच्या गावाकडच्या माशांना ते खुप आवडतं म्हणे! ;)
17 Nov 2015 - 4:31 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
एक नंबर अॅड होती राव ती. =))
16 Nov 2015 - 11:12 pm | मारवा
डॉक्टर साहेब
आमिष बदलुन बघावा इतका एकच उपाय दिसतोय.
ते पेट शॉप मध्ये किंवा जिथे फिश टँक मिळतो त्यांना ते नक्कीच माहीती असणार.
ते एखाद आमिष (शब्द बरोबर आहे का ?) सुचवु शकतील.
16 Nov 2015 - 11:29 pm | परिकथेतील राजकुमार
खुद्द प्रा. डाँ. चा धागा पाहिला आणि धावत आलो. दोन वेळा नीट वाचल्यावरती काही 'मूलभूत' (हा शब्द असच लिहितात) शंका मनात दाटल्या :-
१) शूराच्या हातात जशी रमणी शोभते तैसेच आमच्या प्रा. डाँ. च्या हातात डब्बल बॅरल. मग एकदम हा गळ कुठूनी आला?
२) मिपावरील क्रिप्टीकची कमतरता भरून काढण्यास खुद्द प्रभुगुर्जी हजर झालेले असताना देखील हा लेखन प्रयत्न का केला गेला आहे?
३) शार्क मासे गळात सापडू शकतील काय?
४) चुकून गप्पी मासे पकडले गेले आणि परिसरात डासांची संख्या वाढली तर त्यास जबाबदार कोण?
आपला नम्र,
तारामासा
17 Nov 2015 - 4:31 pm | बॅटमॅन
चुकून तारामासा लिहिलं काय ते "परामासा" च्या जागी? =))
17 Nov 2015 - 6:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवा कसंही कर पण माझा धागा पर्याला दिसू देऊ नको असं देवाला म्हणत होतो आणि धागा दिसला तरी त्याला प्रतिसाद लिहिण्याचा मोह होऊ देऊ नको असं म्हटलं होतं. पण, देवही मी जसजसा नास्तिक व्हायला लागलो तसं तसा माझा आवाज त्याच्यापर्यंत हल्ली पोहचत नै असे दिसते. असो.
>>>> दोन वेळा नीट वाचल्यावरती काही 'मूलभूत' (हा शब्द असच लिहितात)
शब्द बरोबर लिहिला आहे. आणि समजा शुद्ध शब्द लिहिला नसता तर मिपावर कोणी तुम्हाला अपवित्र अपवित्र म्हणुन ओरडलं नसतं. शुद्ध शब्द बिब्द ते तुमच्या मैत्रीणीच्या ब्लॉगवर. (माझ्या मैत्रीणी असं म्हटलं असतं पण मी देवाला म्हटलं आहे, पदरात मैत्रीणी घालशील तर सुंदर घाल नै तर नको घालु)
प्रश्न १ चे उत्तर : प्राडॉला डबल बॅरलचं आता ओझं वाटायला लागलं आहे म्हणजे अब दिल लगता नही असं वाटायला लागलं आहे, म्हणुन हातात गळ.
प्र २ चे उत्तर : प्रभु सरांच्या ( इथे दोन्ही कानाला हात लावले आहेत) क्रिप्टीक लेखनाजवळ पोचण्याची आमची पात्रता नाही. माझं लेखन सरळ प्रामाणिक आणि नाकासमोर खाली पाहुन चालणारं असतं.
प्र.३ चे उत्तर : प्रा.डॉ.ला कोणतेही मोठे मासे गळाला लागावेत असं वाटलेलं नाही.
प्र.४ चे उत्तर : गप्पी मासे गळाला लागत नसतात डासांची संख्या वाढली तर महानगरपालिका जवाबदार असेल.
-दिलीप बिरुटे
17 Nov 2015 - 7:19 pm | मांत्रिक
प्र.४ चे उत्तर : गप्पी मासे गळाला लागत नसतात डासांची संख्या वाढली तर महानगरपालिका जवाबदार असेल. असहमत. डासांची संख्या वाढायला डास-डासीण हेच जबाबदार
:)
17 Nov 2015 - 12:20 am | डॉ सुहास म्हात्रे
मासे पकडण्यात तुमच्या हाताला यश नसेल. चांगल्या भविष्यवेत्त्याला हात दाखवा (शब्दार्थाने घ्या वाच्यार्थाने नाही) ! ;) :)
17 Nov 2015 - 8:40 am | नाखु
हा कूट्मिश्रीत धागा आणि त्यावरची मा>दिया मांदियाळी पाहून आमची एक दाद-भेट ! गळाला असला मासा लावला तर मझा येईल असे आमचे (धायरीकर परात्पर गुरु) म्हणतात खखो तेच जाणे.
मासोळी
हाताची घडी तोंडावर बोट नाखु
17 Nov 2015 - 9:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंडळी आपल्याकडून अजूनही काही मदत मिळाली नाही. आज जायकवाड़ी जलाशय (पैठण) ला जातोय. अनुभव हाच आपला शिक्षक असतो तेव्हा आज दिवसभर कंटाळा येईपर्यन्त प्रयत्न करून पाहतो यश अपयश तुम्हाला नक्की सांगतो.
बाकी प्रतिसादाना दाद देतोच.:)
-दिलीप बिरुटे
17 Nov 2015 - 9:59 am | विजुभाऊ
वावा मस्त लिखान वाचायला मिळाले.
प्रा डॉ यांचे नाव पाहून लेख उघडला.
मित्रानो केवळ वरवरच्या शब्दांवर जाउ नका. त्यामागील अर्थ ध्यानात घ्या.
गोदावरी नदी हे जगाचे प्रतीक आहे तर गळ हे विचारांचे. मासे हे अनुयायांचे प्रतीक आहे.
आमीष हे विचारांना असणार्या शब्दांच्या अवगुंठणाचे प्रतीक आहे.
ज्ञानेश्वरानी ज्याप्रमाणे उत्तम पुरुषाची लक्षणे सांगताना "मार्तंड जे तापहीन ...चंद्रमे जे अलांछन" अशी शब्द रचना केली आहे त्यावरून प्रेरणा घेऊनच सर्वसामान्य जनाना कळावे म्हणून प्राडाँनी ही शिदोडी , घुगी अशी शब्दरचना केलेली आहे.
नेत्याने आपले विचार अनुयायाना समजावून सांगण्यासाठी दोरीरूपी शब्दरज्जू वापरावा. जनांना आकर्षीत करण्यासाठी गोड शब्द तेही जनांच्या आवडीचे वापरावे ह ए प्रा डॉ किती सहजपणे साम्गुन जातात.हे नोंद घेण्यासारखे आहे.
रामदास स्वामी नंतर कदाचित प्रथमच इतके सहज जनप्रबोधनाचे , जनमार्गदर्शनाचे निरुपण झाले आसेल.
मिपाच्या किंवा एकंदरीत मराठी इतकेच काय वैश्वीक आंतर्जालीय दुनियेत हे एक लक्षणीय मैलाचा दगड ठरावा असाच लिखाण म्हणावे लागेल.
प्रा डॉ या लिखाणाचा उत्तरार्ध लिहीतीलच . पण त्या अगोदर त्यांच्या विचारधारेचा धुंडाळून घेतलेला मागोवा आणि आढावा आम्ही लवकरच निरुपित करीत आहोतच.
||प्रयत्ने अखंडीत टंकीत जावे ....... जेजे हाती लागेल तेते उतरवावे
भंजाळूनी सोडावे सकल जन........ विश्व कैचे अवघे प्रतिसादून सोडावे ||
प्राडॉंचा लिखाण पंखा....विजुभाऊमहाराज सातारकर....
17 Nov 2015 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) प्रतिसादासाठीव् जागा राखून ठेवतो. विजूभौ माझ्या ध्येयावरुन मला विचलित करू नका.
-दिलीप बिरुटे
17 Nov 2015 - 10:13 am | सस्नेह
सर तुम्ही विद्यार्थी सोडून माशांच्या पाठीस का लागला आहात ?
अवांतर: बिरबलाची गोष्ट आठवली, 'बादशाह झक मार रहे है...'
17 Nov 2015 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शब्द याच साठी आहे, मला शुभेच्छा द्या प्लीज. मंदीर आणि मशिदीत माझ्या गळाला मासे लागावेत म्हणून प्रार्थना करावी. उपवास, मंत्र तंत्र तेही म्हणावेत.
17 Nov 2015 - 4:23 pm | सस्नेह
भरभरून शुभेच्छा !
बाकी ते मंदिर, मशीद, उपवास, मंत्र-तंत्र अपने बसका काम नही बाबा !
17 Nov 2015 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंत्र म्हटले की जंगलातील साप मैदानात आल्याचं मिपावरकुठे तरी वाचलं. जंगलातील साप बाहेर येऊ शकता तर पाण्यातील मासे बाहेर का येऊ शकत नाही ? म्हणुन मंत्र म्हणा म्हटलं होतं. शुभेच्छांबद्दल आभार. मनातून शुभेच्छा दिल्या असत्या तर काही जमलं असतं. ;)
-दिलीप बिरुटे
17 Nov 2015 - 10:42 am | स्वामी संकेतानंद
"अच्छे दिन आएँगे"... म्हणत गळ टाकावा. मासे गळाला लागतील.
17 Nov 2015 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अच्छे दिन आयेंगे याच्यावर आमचा विश्वास आहे. ( मी विश्वास नै म्हटलं तर लोक माझ्या धाग्यावर प्रतिसाद लिहिणार नाहीत) ;)
-दिलीप बिरुटे
17 Nov 2015 - 11:22 am | नीलमोहर
एवढी जय्यत तयारी करून एकही मासा गळाला लागू नये हा किती मोठा दैवदुर्विलास का काय म्हणतात ते :(
तो शेवटचा फोटो (लय भारी!!) पाहून वाटतंय,
गोदावरी म्हणजे आपली मिपामाय,
गळ टाकून बसलेले सर्व (नव)लेखक,कवि इ.
प्रतिसाद रूपी माशांची आस लावून बसलेले,
मासा कधी गळाला लागेल, लागेलही की नाही,
झोळी भरेल का रिकाम्या हाती परतावे लागेल,
कशाचीच खात्री नाही.
जय मिपामाई !!
17 Nov 2015 - 3:34 pm | मांत्रिक
झक्कास प्रतिसाद!!!!!!!!!!!!!!!
17 Nov 2015 - 1:41 pm | दत्ताभाऊ गोंदीकर
मासेमारी करणे एक कला!!
गर्दीपासून दूर ,प्रदूषण विरहीत,पाण्याची
खोली दहाबारा फूट असेल अशी जागा.
माशांना खाद्य गव्हाची कणीक किंवा गांडूळ ,फिशींग रॉडपेक्षा बांबूच्या पाच फूट लांब काठीला नायलॉनची आठ फूट लांब तंगूस बांधून याच्या एका टोकाला साधा ताराचा गळ बांधून दूसरे टोक काठीला बांधा. फिशींग राॉडपेक्षा काठीने मासे धरणं सोपे जाते .कारण रॉडला दोरी गुंडाळाला खूपच वेळ जातो. त्यापेक्षा काठी(छकाठी) एका झटक्यात वर उचलता येते.मी या पद्धतीने नीरा आणि भीमा नदीत मासे धरल्यात.तसेच कमी पाण्यात (पाच फूट)बुड्या घेऊन मास धरल्यात.
17 Nov 2015 - 1:41 pm | पीके
डॉ. साहेब, त्यो तुमचा फॉरिनचा गळ कस चालाल म्हाइत न्हाइ. पण आमी ईस हात लांब नायनल ची बारिक दोरी वापरतु. त्येच्या टोकाला तारेचा विंग्रेजी S आकाराचा सोत्ता बनवलेला हुक लावतो. तळं असल तर बेसच, न्हायतर मंग नदीच्या डव्हाकडला जाउन बसतो. जिथं पानी जास्त व्हातं नसल अश्या ठिकानी. मंग गळाला आमिष म्हनून गांडूळाचा बोटाच्या पेरायेवडा तुकडा लावतो. गळापासून सात आठ हातावार जुंधळ्याच्या धाटाचा वितभर तुकडा घट गाट मारून बांधतो. हि झाली तयारी.
आता हुबारून हवेत गोल गोल फिर्वून जास्तीत जास्त आत मध्ये गळ फेकायचा आनी बोंबाइल वर गानी लाउन बसून सोडायचं. मासा गळाला लागला का धाट आत मध्ये वडलं जातय. मंग भराभार दोरी भाइर वडायची. पायजे तेवडा मोठा मासा नसल तर अलगद काडून पान्यात सोडायचा न्हाय तर बाजुला ठिवायचा.. हा का ना का.
हिच पोर्शीजेर किती मासं पायजेत तिवड्यांदा रिपीट करा म्हंजे झालं.
17 Nov 2015 - 4:08 pm | प्रसाद गोडबोले
आमच्या ऐकीव ज्ञाना नुसार आर्टीफीशीयल गळ कामाचा नाही , गळाला एखादे जिवंत गांडुळ टोचुन प्रयत्न केल्यास मासा घावेल .
मासाळी पकडायची असल्यास पोपशास्त्रींचा सल्ला घेणे ;)
आणि हो , पुढल्या वेरुळ ट्रिपला एक मासेमारीचा कार्यक्रम ठेवुयात नक्की :)
-
आपला णम्र प्रगो
17 Nov 2015 - 4:42 pm | दिपक.कुवेत
बाकी ह्या निमित्ताने "पाठमोरी हताश" व्यक्ती आज पहिल्यांदा पाहीली. धन्यवाद डॉक.
17 Nov 2015 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या अभ्याचं एवढं भारी ब्यानर तुम्ही मग पाहिलंच नै...!
-दिलीप बिरुटे
(खुद गब्बर डीबीसेठ)
18 Nov 2015 - 2:50 pm | दिपक.कुवेत
पण त्यात काय तुम्ही हताश वगैरे नाहि वाटत व्बॉ.
17 Nov 2015 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंडळी, आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आज तिसर्या दिवशी जायकवाडी जलाशयातील (धरण) मासे पकडण्याचा प्रयोग विविध प्रकार करुनही अयशस्वी ठरला. खोल पाणी, अजिबात लोक नाहीत, आर्टिफिशीयल माशांऐवजी गांडुळ, उकडलेल्या गव्हाच्या पीठांच्या बारीक गोळ्या सर्व प्रयोग अयशस्वी झालेत. खेड्यातून टू व्हीलरने रस्ता पार पाडणे अत्यंत कठीण काम होते. पाच तास एकच धंदा. वरुन ऊन आणि मासा गळाला लागण्याची वाट पाहणे भयंकर प्रकरण असतं हे. आता माझी हौस पूर्ण झाली. आता पुन्हा कधी खाज आलीच तर वृत्तांत डकवेनच. :(
धरणात एका भिल्लाच्या पोराचं कुतुहल आमच्या पर्यंत येऊन पोहचलं त्याचं हे छायाचित्र. पोरंग म्हणालं आहेत मासे लागतात सुद्धा. काम चालु ठेवा म्हणे.... !
-दिलीप बिरुटे
17 Nov 2015 - 6:41 pm | विवेकपटाईत
मासोळी कधीच गळाला लागत नाही, शेवटी आपणच कुठल्यातरी मगरीचे भक्ष्य बनतो (सौ. मराठी वाचत नाही). यालाच संसार म्हणतात .
17 Nov 2015 - 7:34 pm | पियुशा
बख्श दो मछलियों को ;)
17 Nov 2015 - 7:38 pm | Sanjay Uwach
डॉ. साहेब, कोल्हापूरात जे मासे पकडतात ते लोक गळाच्या हुकाला पुढे गांडूळ लावतात. कोल्हापूरी भाषेत त्याला ''दानव '' आसे म्हणतात . गांडूळाला दोन तोंडे असल्या मुळे एक तोंड हुकाला राहाते व दुसरे रिकामे असल्याने , हुक पाण्यात सोडल्यावर ,गांडूळाच्या आरडाओरड्याने बरेच मासे सभोवती जमतात व गळाला बरोबर लागतात. आणखीन एक सिक्रेट, कुणाला सांगू नका, आपल्या दोघांच्यातच राहु दे , ज्या माणसाला मासे सापडले आहेत ,त्याच्या पिशवीत आपला गळ हळुच सोडायचा. ( डॉ, साहेब आमचे बोलणे विनोदाने घ्या हं !!)
18 Nov 2015 - 12:00 pm | मोगा
..
17 Nov 2015 - 7:59 pm | बाप्पू
अजून काही सजेशन्स
१) गळाला गव्हाव्चे पीठ लावण्यापेक्षा, गाण्ढुळ वापरा. शक्य असल्यास वाळवलेले मोठे झिंगे वापरा.. मी लहान असताना, रंकाळ्या मध्ये मी या ट्रिक ने भरपुर मासे पकडले होते.
२) शक्यतो मासे पकडताना आवाज करू नका. मासे घाबरून येत नाहीत.
३) शक्यतो शांत पाण्यामध्ये ट्राय करा.
४ ) एकदा फक्त नायलॉन च्या दोरीचा साधा गळ वापरून पहा. त्याला काट्याच्या थोड्या वर एक छोटा दगड बांधा. व जोरात नदीपात्रात किंवा तलावात दूरवर भिरकावून द्या.. मासा लागला आहे के नाही हे कळण्यासाठी दोरीच्या मध्यभागी एखादा थर्मोकोल चा तुकडा किंवा एकदम हलकी व छोटी काठी बांधा.. त्याच्या हालचालीवरून मासा लागला आहे कि नाही त्याचा अंदाज घेऊ शकता.
आणि सगळ्यात महत्वाचे. आपण पुण्यात असाल तर आपला भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि करा. खूप दिवसापासून मासे पकडण्याचा विचार चालू आहे. पण जोडीदार कोणी नसल्यामुळे जाणे शक्य होत नाहीये.
18 Nov 2015 - 7:16 am | दत्ताभाऊ गोंदीकर
बाप्पू! कोणी जोडीदार नसेल तर इंदापूरला या,नीरा किंवा भीमा नदीवर मासं धरु.
18 Nov 2015 - 10:09 am | मांत्रिक
वाव, झक्कास बेत आहे.
18 Nov 2015 - 7:48 am | अत्रुप्त आत्मा
अजुन एक आयडिया सांगतो.. ही आयडीया मी साळला असताना आमच्या हितलि पोरं नदिला माशे धरायला जायची तवा बगितल्याली हाय. पाणी संथ आणि ८ फुटापेक्षा खोल नसावे..
आता कृती:- १पसरट भांडे (वाडग्या सारखे) ,त्याला वरुन एक रुमाला सारख फड़क डग्ग्याला कातडं चढ़ावतात तस टैट बांधायचं ..(बांधन्यापूर्वी भांड्याच्या तळाला आत बरचस गुळपिठ चिक्तवायचं .) आणि मग तुम्ही ज्या ठीकाणी माशे धरणार तिथल्या माशांच्या साईजनुसार त्या तानुन बांधलेल्या कपड्या ला मधे एक होल द्यायच. आता ते भांडे संथ पाण्याच्या तळाला (जिथे माशे आत तरंगताना दिसतात अश्या ठिकाणी बर का!) ठेऊन द्यायच...बास्सस्स! झालं तुमच काम.. पुढे काम त्यांच्..मासे पीठ खायला आत शिरतात..पण भांड्याच्या आत नीट स्पेस न सापडल्यानी त्यांना परत बाहेर पड़ता येत नाही..साधारण अर्ध्या तासाला ५/६मासे मिळतात..(अर्थातच ते मिळण्यासाठी दर अर्ध्या तासाला पाण्यात जउन भांडे परत आनावे ..हे आपलं काम !)
ढिश्श् क्ले मर:-सदर प्रयोग सिद्धिस जाताना आम्ही आमच्या लहानपणी अनेकदा पाहिले आहे..ज्याना खोटे वाटत असेल..त्यानी करुण पहावे..! "अस कधी होत अस्त का?" वगरे विचारुण आमचा छळ कृ नये.. लुलुल्लूल्लु!!! (इन एडव्हांस!)
18 Nov 2015 - 9:48 am | अभिजीत अवलिया
अतृप्त ह्यांनी लिहिलेली आयडीया चालून जाईल. आम्ही देखील लहानपणी असेच माझे पकडायचो नदीत. फक्त वाडग्या ऐवजी नारळाची कवटी वापरली जायची.
18 Nov 2015 - 11:57 am | मोगा
नारळाची करवंटी.. माणसाची कवटी.